Skip to main content

डाॅक्टरांची फी

लेखक स्वधर्म यांनी बुधवार, 11/03/2015 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच माझ्या मित्राच्या एका नातेवाइकाचे ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली. बायपास सर्जरी! हे एक मेजर अाॅपरेशनच अाहे. पुण्यातल्या एका प्रसिध्द रूग्णालयात त्यांना ८ दिवस दाखल केले गेले व अाता ते नातेवाईक घरी अाले अाहेत. तब्येत सुधारत अाहे. सर्व काही अपेक्षेप्रमाणेच. बोलता बोलता मित्राला विचारले, की बील किती झाले? तो म्हणाला दोन लाख अठ्ठावन्न हजार रूपये. हे ठीकच! पण त्यातले डाॅक्टरांचे किती विचारल्यावर त्याने माहिती दिली की मुख्य डाॅक्टरांची फी ऐंशी हजार व सहाय्यक डाॅक्टरांची वीस हजार रूपये. मला जरी साधारण कल्पना होती, तरी ही एवढी डाॅक्टरांची फी ऐकून मी चाट पडलो. माझ्या कुटुंबातही एका वीस मिनीटांच्या शस्त्रक्रियेसाठी बारा हजार सर्जननी चार्ज केल्याचे अाठवले. मी त्याला थोडी अाधिक माहिती विचारल्यावर असे समजले की शस्त्रक्रिया साधारण अडीच तास चालली. नंतर रोज सकाळ-संध्याकाळ डाॅक्टर पेशंटला भेटून तपासत असत, व पुढील औषधे वगैरे सांगत. हा वेळ साधारणपणे पाच-दहा मिनिटे असे. सदर डाॅक्टरांच्या कौशल्याबद्दल वादच नाही. त्यांची जबाबदारीही फार मोठी अाहे. अाज हे अाणि असे महाकुशल डाॅक्टर जिथे पोहोचले अाहेत, ते सर्वसामान्य माणसाचं काम नाही हेही मान्य. पण म्हणून सहा ते अाठ तासांच्या कामाचे ऐंशी हजार रूपये, हे कुठेतरी अजब वाटतात. खासकरून समाजातल्या इतर लोकांचे मानधन पाहता. एखाद्याचा जीव वाचवणे ही फार मोठीच गोष्ट अाहे. पण सिटी बसच्या चालकानेही अापल्या कामात ब्रेक दाबायला किंवा बस वळवायला पाव सेकंदाचा उशीर केला, तर परिणाम तेवढेच गंभीर नाहीत का? त्याच्यावरही पन्नास-साठ लोकांचा जीव अवलंबून नाही का? यांचे अगदी मोठ्या शहरातले म्हटले तरी महिन्याचे वेतन किती असेल? मला वाटते साधारण २५ ते ३५ हजार रूपये. क्रिकेटर्स किंवा गाजलेले गायक हेही असेच महाप्रचंड मेहेनताना घेतात. तेही काही तास अानंद देतात अन् लाखो रूपये घेतात. पण एक फरक हा, की त्यांना मिळणारे मानधन हे अनेकांकडून (अक्षरश: लाखो लोकांकडून) थोड थोडे पैसे घेउन वसूल केले जाते. अतिकुशल बडे डाॅक्टर मात्र एकाच व्यक्तीकडून मोजक्या तासांची महाप्रचंड फी सर्रास वसूल करतात. अतिदुर्मिळ कौशल्य असलेल्यांनी जास्त मानधन घेणे यात चूक काहीच नाही, पण इथे काहीतरी न्याय्य (फेअर या अर्थाने) नाही असे वाटते. पुढे मी ते डाॅक्टर रोज किती, अाठवड्याला, महिन्याला किती शस्त्रक्रिया करत असतील वगैरे विचार करायला धजावलो नाही. - स्वधर्म

वाचने 82765
प्रतिक्रिया 429

प्रतिक्रिया

In reply to by निनाद जोशी

तुम्ही सरकारी आणि खाजगी सेवांमधे गल्लत करत आहात. सरकार नियंत्रित क्षेत्रांमधे नागरिकांना सोयीचे पडेल असे निर्णय घेण्याची सोय असते. एक उदाहरण म्हणून मोबाईल सेवेचे घेऊ. वरकरणी इथे आपण खाजगी कंपन्यांची सेवा वापरत असलो तरी मूळ त्या कंपन्या सरकारी मालमत्ता (बँड्विड्थ स्पेक्ट्रम्स) वापरून सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांनी काय दर लावावे यावर ट्राई सारखी संस्था नियंत्रण ठेवून असते. तेच पेट्रोल बाबत पण आहे आणि रेल्वे बाबत पण आहे. खाजगी वैद्यकीय सेवेबद्दल असे म्हणता येणार नाही ते का याचे उत्तर खाली दिले आहे.

In reply to by निनाद जोशी

आम्हाला कितीही प्रॉब्लेम असू द्याहो, ऐकतं कोण इथे? भाजीचा दर ५ रुपय किलो असो की ५० रुपए किलो असो, न कुर्कुरता द्यावा लागतो. नाहीतर जेवायला मिळत नाही. कधी भाजी घ्यायला बाजारात जात नाही का तुम्ही?

In reply to by निनाद जोशी

सॉरी, त्यांना विसरलो ते. पण कसं आहे ना भौ, ही हेल्थ इंड्स्ट्री आता लोकसेवा म्हणून केली जात नाही. प्रचंड नफा कमावण्यासाठी औषध कंपन्या कुठल्याही थराला जातात. ०.०००५ पैसे उत्पादन खर्च असलेली एक गोळी तिच्या सो-कॉल्ड अव्दितीय असण्यामुळे ५,००० काय ५०,००० रुपयाला पण विकली जाते. जे लोक ती किंमत देऊ शकतात त्यांनाच जगायचा अधिकार आहे का असा मला पूर्वी प्रश्न पडायचा. खरेतर आपल्या संशोधनासाठी उचित रॉयल्टी घेऊन ते संशोधन सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिले तरी समाधानकारक नफा कमावला जाऊ शकतो. पण समाधान ही सापेक्ष भावना असल्याने वैद्यकिय क्षेत्रात दुर्मिळ झाली आहे. त्याला डॉ़क्टरसुद्धा अपवाद कसे असणार? अमूक एक औषध सांगितले की ते कितीही किंमतीचे असले तरी लोक आणतातच हे त्यांची अगतिकता लक्षात येऊन मस्त लुटालुट चालली आहे. एखाद्या गरीब रुग्णाला सांगितलेला ३० दिवसांच्या गोळ्यांचा कोर्स घेणे परवडत नाही, ते मेडिकलवाल्याला ८ दिवसाचं औषध द्यायला सांगतो. मेडिकलवाल्याला माहिती असतं हा प्राणी पुढील औषधे घेणारंच नाही आणि फुकट मरेल म्हणून तो त्याला पुर्ण कोर्स घ्यायला जबरदस्ती करतो. हे दृश्य फार हेलावून जाते. बर्‍याचदा गरज नसलेल्या शस्त्रक्रिया, औषधे सांगितली जातात. रुग्ण हतबल असल्याने काहीच करू शकत नाही. मी वर दिलेला सल्ला उपरोधिक अजिबात नाही. खरंच कुशल व प्रामाणिक डॉक्टरांना समाजाने अधिक संख्येने पुढे आणले तर समाजाचाच फायदा आहे. सध्या मागणी तसा पुरवठा तत्त्वावर चालू आहे तसे नको असेल तर मागणी कमी करायला लागेल किंवा पुरवठा वाढवायला लागेल. या व्यवसायक्षेत्राला रेगुलेशन यायला पाहिजे. कारण हा नागरिकांच्या जिवनमरणाचा प्रश्न आहे.

In reply to by संदीप डांगे

पण म्हणजे तुम्हालाही पटते आहे ना कि हि शुद्ध लुटालूट आहे ते..... माझे हेच तर म्हणणे होते. ह्या विरुद्ध नक्कीच काही नियम हवेत हेच तर मी म्हणत होतो नाहीतर हि लुटालूट चालूच राहणार......

In reply to by निनाद जोशी

नाही हो. दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. १. एखाद्याचा मेहनताना ठरवणे. २. एखाद्या क्षेत्रात मनमानी कारभार चालू असेल तर त्यावर शासकिय नियंत्रण आणणे. दोन्ही गोष्टी शक्य नाहीत कारणः १. एखाद्याचा मेहनताना त्याची सेवा किती दुर्मिळ आणि महत्त्वाची आहे यावर ठरतो. २, सरकारने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याकडे पाठ फिरवून खाजगी कडे जाण्याचा निर्णय नागरिक स्वतः घेतात. मग बाजारपेठेनुसार सरकारी सेवेपेक्षा जास्त पैसे मोजावे लागले तर सरकारला तक्रार करण्याची काय गरज? सरकार का म्हणून लक्ष देईल? फारतर नागरिक सरकारी सेवा उत्कृष्ठ दर्जाची करण्याबाबत दबाव आणू शकतात. खाजगी क्षेत्रावर नियंत्रण आणणे शक्य होणार नाही कारण खाजगी सेवा ही नागरिकांनी स्वत:च्या चैनीसाठी आणि प्रतिष्ठेसाठी उभी केलेली व्यवस्था आहे, त्यात लुटालुट झाली तर आरडाओरडा करण्यात अर्थ नाही.

In reply to by संदीप डांगे

हेच लॉजिक इतर ठिकाणी लावून बघतोय... सरकारने लोकल बस सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याकडे पाठ फिरवून रिक्षाने जाण्याचा निर्णय नागरिक स्वतः घेतात. मग बाजारपेठेनुसार सरकारी सेवेपेक्षा जास्त पैसे मोजावे लागले तर सरकारला तक्रार करण्याची काय गरज? सरकार का म्हणून लक्ष देईल?

In reply to by यसवायजी

खाजगी, सार्वजनिक आणि सरकारी ह्या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं धरून ते लॉजिक मांडलंय. रिक्षाचे दर कोण ठरवतं? त्यावर खरंच सरकारचं नियंत्रण असतं? एका हॉर्न सोडून सगळं वाजणार्‍या खस्ताहालत रिक्षामधे बसण्याचे तेवढेच पैसे आणि आणि नव्या कोर्‍या गुबगुबित सिट्स असलेल्या आरामदायक रिक्षात बसण्याचे तेवढेच पैसे हे लॉजिक मला ती कधीच पटलेले नाही. फाईव्ह स्टार हॉटेलमधे न धुतलेल्या चादरी, जळमटं, पानाच्या पिचकार्‍या मला तरी अजून कुठे आढळल्या नाहीत.

In reply to by संदीप डांगे

@ रिक्षाचे दर कोण ठरवतं? त्यावर खरंच सरकारचं नियंत्रण असतं? >> सरकारचं नियंत्रणच असते. म्हणजे नक्की कोण? बहुतेक काही Regional Transport Authority (RTA) असतात. त्या ठरवतात. The Hindu मधील ही बातमी- The government has increased the minimum fares for autorickshaws and taxis to Rs.20 and Rs.150 respectively. रिक्षासारखी सुविधा, जी मेडीकलपेक्षा कमी महत्वाची आहे असे मला वाटते, तिच्यावर नियंत्रण का आहे मग?

In reply to by संदीप डांगे

जेव्हा तातडीच्या मेडिकल सेवेची गरज असते तेव्हा करता रुग्णाच्या नातेवाईकांकडून अत्यंत भावनिक होऊन विचार केला जातो. अशा प्रसंगी रॅशनल विचार करणे शक्यच नसते. या गोष्टींचा फायदा घेऊन पिळवणूक चालू आहे. अमेरिकेत जसे ओबामाकेअरच्या धर्तीवर इन्शुरन्स कंपन्या व हेल्थकेअर इंडस्ट्रीला चाप लावला आहे त्या धर्तीवर भारतात काहीतरी रेग्युलेशन हवे आहे.

अगदी सरळ बोलतोय. माझ्या नात्यातल्या एका लहान मुलीचा मागच्या महिन्यात हात तुटला. घरचे पैसेवाले असल्यामुळे हैदराबाद च्या प्रसिध्द हॉस्पिटलात गेले. १५ मिनिटात प्लास्टर आणि ओपरेशन झाले, २ नेल्स टाकले. बिल किती यावे? १,३५,००० ( ९०,००० प्लास्टर लावायचे, ४५,००० काढायचे ) कसाही विचार केला तरी हा हिशोब कळत नाही. गावाकडे ५,००० लागले नसते साध्या दवाखान्यात.

In reply to by रेवती

या प्रतिसादावर हसावे की रडावे तेच कळत नाही. समजा हात तुटला ऐवजी हात मोडला म्हटले तर तेवढ्याने ती मुलगी ऑपॉप बरी होणारे का? कायतरी एकेक चमत्कारिक कल्पना असतात. बाकी यावर बिनबुडाच्या प्रावचनिक बुडबुड्यांच्या प्रतीक्षेत.

In reply to by रेवती

भावना पोहोचल्या. आठवायचा प्रयत्न केला, लहानपणापासुन तुटणे हा समानार्थी म्हणुन वापरला गेलाय गावाकडे. फ्रॅक्चर टाइप करण्याचा प्रयत्न करण्यात बोटे फ्रॅक्चर व्हायची वेळ आली. आता चोप्य पेस्त केलाय.

In reply to by खंडेराव

खंडेराव मुलीच्या हातात दोन खिळे टाकले म्हणजेच तिची शल्यक्रिया झाली. हि शल्यक्रिया गावाचा हाडवैद्य करू शकेल काय याची शंका वाटते. तो कदाचित ९० % वेळेस काम व्यवस्थित करेलही पण उरलेला १० % धोका आपण पत्करायचा कि नाही हे आपण ठरवु शकता. वाढत्या वयात हाताची दोन हाडे जर व्यवस्थित सांधली गेली नाही तर एका बाजूचे हाड जास्त वाढते आणि दुसरे हाड वाढत नाही. शिवाय जर हाड वाकडे जुळले तर आयुष्यभर वाकडा हात राहिल्याची शिक्षा त्या निष्पाप मुलीला मिळेल. आयुष्यभर अपंग म्हणून तिला राहायला लागेल किंवा परत शल्यक्रिया करून हात सरळ करावा लागेल. (जर हे केले नाही तर) अशा वाकड्या हाताच्या मुलीला लग्नाच्या वेळेस पत्करणारा मुलगा हा त्याची किंमत वसूल केल्याशिवाय राहील काय? शेवटी लग्न हा बाजार आहे. बाकी इतकी किंमत का याचे उत्तर लांबलचक आहे आणि ते देऊनही बर्याच लोकांना पटवून घ्यायचेच नाही त्यामुळे मी ते देत नाही.

In reply to by सुबोध खरे

आहे हो. जर आपण या किंमतीला योग्य म्हणत असु, आणि वर असेही वाटत असेल की कमी किमतीत हे करण्यात धोका आहे तर परिस्थिती अवघड आहे. किती लोक एवढे पैसे देउ शकतात? प्रत्येक स्किल्ल या योग्य ती किंमत मिळाली पाहीजे, पण जेव्हा अवास्तव पैसा मागितला जातो, तिथे अडचण सुरु होते. झोमटो सारखी एखादी साइट असावी, जिथे दरपत्रके आणि रिव्यु मिळतील दवाखान्यांचे पण.

एखाद्याचा जीव वाचवणे ही फार मोठीच गोष्ट अाहे. पण सिटी बसच्या चालकानेही अापल्या कामात ब्रेक दाबायला किंवा बस वळवायला पाव सेकंदाचा उशीर केला, तर परिणाम तेवढेच गंभीर नाहीत का?
:-))

माझ्या नात्यातील एका व्यक्तीची बायपास सर्जरी १० वर्षापूर्वी झाली होती. तेव्हा एकूण खर्च ५०००० रुपयाच्या आसपास आला होता. मेडिकल'सेवे'चे इन्फ्लेशन बघितले तर दहा वर्षात ही किंमत पाचपट झाली आहे हे सहज लक्षात येईल. त्यामुळे अडीच लाख रुपये खर्च हा सद्य बाजाराच्या दरानुसारच वाटतो आहे. हा दर योग्यच आहे असे मला म्हणायचे नाही. उदा. आजकाल मोतीबिंदूसारख्या शस्त्रक्रियांचा खर्च सत्तर ते ऐंशी हजारापर्यंत गेला आहे. एकंदर किंमत बाजाराच्या दरानुसार असल्याने त्याच्या अंतर्गत आयटमायझेशन कसे केले आहे याने पेशंटला तत्त्वतः काहीही फरक पडत नाही. माझा असा अंदाज आहे की इन्शुरन्स कंपनीच्या नियमांना वळसा घालण्यासाठी हॉस्पिटले सोयीस्कर आयटमायझेशन करतात. उदा. इन्शुरन्स कंपनीच्या नियमानुसार सलाईनच्या बाटलीचे पैसे देणार पण बाटली अडकवण्याच्या स्टँडचे भाडे नाही असे काही असेल तर बाटली व स्टँड असे मिळून सर्व पैसे बाटलीला लावले जात असावेत. त्याचप्रमाणे डॉक्टरची फी इन्शुरन्स कंपन्यांना एक्स्क्लुड करता येत नसल्याने जो खर्च मिळण्याची शक्यता कमी आहे तो डॉक्टरच्या फीमध्ये पकडला जात असावा. तुम्ही इन्शुरन्स क्लेम केले की नाही याचा यात फरक पडू नये. बिलिंग सिस्टम सोपी ठेवण्यासाठी सर्वच पेशंटला एकाच प्रकारचे दर लावण्याचा हॉस्पिटलचा हेतू असावा. पुन्हा एकदा हॉस्पिटलचा दर व एकंदर सिकनेस केअर व्यवस्थेचे मला चुकूनही समर्थन करायचे नाही. भरमसाट पैसे घेऊनही अत्यंत कमी अकाऊंटॅबिलिटी असलेली ही व्यवस्था आहे. दुर्दैवाने आपल्या लोकप्रतिनिधींना हा प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही व तुलनेने भंकस असे घरवापसी, गोहत्याबंदी वगैरे विषयांवर वेळखाऊपणा चालतो याचे वाईट वाटते.

In reply to by आजानुकर्ण

भरमसाट पैसे घेऊनही अत्यंत कमी अकाऊंटॅबिलिटी असलेली ही व्यवस्था आहे. दुर्दैवाने आपल्या लोकप्रतिनिधींना हा प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही व तुलनेने भंकस असे घरवापसी, गोहत्याबंदी वगैरे विषयांवर वेळखाऊपणा चालतो याचे वाईट वाटते. पूर्णपणे पटले....

क्षय रोग उच्चाटनासाठी सरकारी रुग्णालयात डॉट अंतर्गत क्षय निदान व उपचार मोफत राबवला जातो. तेथील तपासण्या व औषधे प्रमाणीत असतात. परंतू क्षयाचे बरेचशे रुग्ण खाजगी रुग्णालयात जास्त पैसे मोजून उपचार घेतात. मोफत त्यात सरकारी म्हणजे कमी दर्जाचे असा लोकांचा समज असतो. त्यामुळे खाजगी डॉक्टरांचे फावते. माझ्या आजोबांच्या मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियेला जे.जे.रुग्णालयात अंदाजे ६००० रू. खर्च आला. ह्यात नेत्रतपासणी, लघवी रक्त, ईसीजी तपासणी,शस्त्रक्रीया, लेन्स (नामांकीत कंपनीची) औषधे, दोन दिवस रुग्णालयात मुक्काम,दिवसातून दोन वेळा दूधपाव व डॉक्टरांची व्हीजीट हे सर्व समाविष्ट आहे. खाजगी रुग्णालयात हाच खर्च ३० ते ३२ हजरापर्यंत गेला असता.

स्वत: च्या कौशल्याचे एखाद्याने किती पैसे मागावे हे तोच ठरवू शकतो. पण ते द्यावे की नाही हे आपण ठरवावे. पैसा सगळ्यांनी कमवावा पण स्वत: पुरती एखादी नियमावली आखून घ्यावी. डॉक्टर च्या बाबातीत बोलायचं तर माझ्या मते नियमावली खालीलप्रमाणे असावी. १. दवाखान्यात दाखल होऊन शस्त्रक्रिया किंवा अन्य उपचार घेऊन जर एखादा पेशंट नंतर रुटीन चेक अप साठी आला असेल तर त्याच्याकडून फी घेऊ नये किंवा नाममात्र घ्यावी. (असे काही डॉक्टर माझ्या पाहण्यात आहेत) २. औषध लिहून देताना रुग्णाच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून शक्य असल्यास तुलनेने स्वस्त औषध द्यावीत. ३. मेडिकल इन्शुरन्स आहे म्हणून अव्वाच्या सव्वा दर लाऊ नये. ४. जेवढी गरज आहे तेवढेच उपचार करावेत. शक्यतो घरगुती उपाय सांगावे. ५. सेकंड ओपिनियन घ्यायला आलेल्या रुग्णाला परत सगळ्या चाचण्या करायला लावू नये

In reply to by चिनार

मेडिकल इन्शुरन्स आहे म्हणून अव्वाच्या सव्वा दर लाऊ नये.
ही खालची माझी मतं आहेत- माझ्याकडे पुरावा नाही. पण कार्यकारणभाव मला तरी योग्य वाटतोय- इंशुरन्स कंपन्या मंजे काय संत महंत आहेत का? हॉस्पिटलवाले अव्वाच्या सव्वा दर लावतील आणि कंपन्या देऊन मोक्ळ्या होतील? त्यांच्याकडे अनेक ऑपरेशन्चे तयार दर असतात. ते दर अनेक निगोशिएशन नंतर ठरतात. कुठल्या गोष्टीला नक्की किती खर्च कुठल्या ठिकाणी येऊ शकतो याचा सखोल अभ्यास करूनच ते निगोशिएशनला येतात. त्यांना दर परवडला नाही, तर ते सरळ त्या हॉस्पिटलवर काट मारतील. त्यांच्याकडे पुरेसे लोक आणि वेळ आहे हे सगळं करायला. सामान्य माणसाकडे मात्र हे दोन्ही नसतं. मुळात तो हॉस्पिटलमध्ये येतो तेच ऐन वेळी. तो थोडीच काही निगोशिएशन करू शकतो. शेवटी अव्वाच्या सव्वा दर हे अन-इन्शुअर्ड माणसाकडनं घेणंच जास्त शक्य होत असावं, असं आपलं मला वाटतं...

In reply to by असंका

साधारणपणे माझा असा अनुभव आहे की तुम्ही इन्शुरन्स कंपनीशी भांडू शकता. आयआरडीए वगैरेकडे जाऊ शकता. त्यामुळे जास्त क्लेम केला आणि तो नाकारला गेला तर पेशंट व इन्शुरन्स बघून घेतील असे हॉस्पिटलचे साधारण धोरण असते. मात्र हॉस्पिटल व डॉक्टर यांच्या संदर्भात कुठेही दाद मागण्याची सोय मला माहीत नाही.

In reply to by असंका

इंशुरन्स कंपन्या मंजे काय संत महंत आहेत का? हॉस्पिटलवाले अव्वाच्या सव्वा दर लावतील आणि कंपन्या देऊन मोक्ळ्या होतील? त्यांच्याकडे अनेक ऑपरेशन्चे तयार दर असतात. ते दर अनेक निगोशिएशन नंतर ठरतात. कुठल्या गोष्टीला नक्की किती खर्च कुठल्या ठिकाणी येऊ शकतो याचा सखोल अभ्यास करूनच ते निगोशिएशनला येतात. त्यांना दर परवडला नाही, तर ते सरळ त्या हॉस्पिटलवर काट मारतील. त्यांच्याकडे पुरेसे लोक आणि वेळ आहे हे सगळं करायला. अनुभव

ऐशी हजार त्या डॉक्टरानी घेतले, असे मान्य करू. बाकीचे एक लाख सत्तर हजार कुठे गेले? दुसरे, समजा, तुम्हाला हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर बायपास सर्जरी करायची आहे. तुमच्या समोर ३ पर्याय आहेत. १. डॉ. ख्यातनाम सुप्रसिद्ध क्षक्षक्ष. (यांची फी ८० हजार रुपये आहे. तशी पाटी त्यांनी दवाखान्यात लावलेली आहे, तुम्हाला स्टँप्ड पावतीही दिली आहे. हा व्हाईट व्यवहार आहे, व त्यात सगळे प्रकार मिळून ४०% टॅक्स सरकारला जातो हे तुम्हाला ठाऊक नसेल कदाचित. टोटल खर्च २.५ लाख) २. एक नवखे / डॉ. अननोन. यांची फी माफक ४० हजार रुपये आहे. टोटल खर्च १.७५ लाख ३. शासकीय इस्पितळ उदा. जेजे. तिथे अँजिओप्लास्टी करणे पोस्टग्रॅज्युएट वैद्यकिय विद्यार्थ्यांना शिकवले जाते. कदाचित डॉ क्षक्षक्ष यांच्याच मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन होईल, पण ते करणारा विद्यार्थी असेल. किंवा नसेल. ते ऑपरेशन नक्की कोण करील ते तुम्हाला समजणार नाही. इथे खर्च फुकट आहे, कारण तुमच्याकडे पिवळे/केशरी रेशनकार्ड आहे. नसेल, तर सगळा मिळून ५५ हजार. आता या परिस्थितीत, तुम्ही कुणाकडे उपचार घ्याल? व का? की ४. उपचार न घेता आपले लाडके आयुर्हित सांगताहेत तसे घरी बसाल?

In reply to by आनंदी गोपाळ

माझ्या प्रतिसादात "उपचार न घेता घरी बसा" असे कुठे म्हटले आहे? उपचार घ्यायचे तर घरी बसूनही उपचार घेता येतात, या कारणासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायची गरजच नाही! आणि फक्त हृदयातिल तर सारे ब्लॉक निघतातच, संपूर्ण शरीरात अजून कोठे(मानेत, मेंदूत, यकृतात, वृक्कमध्ये, डोळ्यात, पायात) असतील तिथले सारे ब्लॉक निघतात. त्यासाठी एवढी महाग आणि जीवघेणी "बायपास"च का? डॉक्टर ती सुचवितात कारण या सर्जरीने एका दिवसात लाखो रुपये कमावता येतात म्हणूनच, इतर काही कारण नाही.

In reply to by आनंदी गोपाळ

आपल्याला Modern Medical Procedures जर माहित असते तर बायपास ला नक्कीच पर्याय सांगितला असता! पण नाही.... माहित असेल तर सांगालना. आपल्या माहितीसाठी मी नीम हकीम नाही तर Modern Medical Procedures चा अभ्यासू व खंदा पुरस्कर्ता आहे!

उदाहरण अ. मला शर्ट विकत घ्यायचा आहे. ब्रँडेड शोरूममधे "शर्ट" साडेतीन हजार रुपयाला मिळतोय. शेजारीच श्री जयहिंद क्लॉथ स्टोअरमधे "शर्ट" १५००ला आहे बाहेर फुटपाथवर "शर्ट" १५० रुपयांत आहे. घासाघीस करून सव्वादोनशेत जोडी मिळेल. जगातल्या मोठ्ठ्ठ्ठ्या ब्रँड्सचेही कपडे चीन बांग्लादेश वगैरे ठिकाणच्या स्वेट्शॉपमधेच शिवले जातात. लेबलही तिथेच लावतात. पुढची किंमत ब्रँडमुळे वाढते. उदाहरण ब. ताजमधे "चहा" कितीला मिळतो? अमेरिकेत कितीला? बर्‍या हॉटेलमधे? रस्त्यावरच्या टपरीवर? का? उदाहरण क. सरकारी सेवा. रेल्वे. जनरल बोगी तिकिट किती? स्लीपर कोच किती? थर्ड एसी, सेकंड एसी, फर्स्ट क्लास? डिझेल तितकेच, इंजिन तेच, रुळही तेच, मशीनरीतली इन्व्हेस्टमेंटही तीच. त्यातही पासवाल्यांना एसीचा रेट वेगळा, सीझन तिकिट वाल्याला वेगळा, सैनिकाला वेगळा इ. का? उदाहरण ड. व्हॉट्सॅपवरचा फेमस केळीवाला जोक. भैय्या, केले कैसे दिया? घर मे खानेको १० रुपये. मंदिरमे चढानेको १५, अस्पताल्वाले मरीज को देनेके लिये २० एमेसईबी ज्यु. इंजिनियर : भाई, केला वोही, भाव अलग क्यूं? केलेवाला : साब, बिजली वही, डोमेस्टीक, धार्मिक, कमर्शिअल भाव अलग क्युं? चला, निनाद जोशींना सोबत घेऊन आपण या सर्वच प्रकारच्या असमानतेबद्दल आंदोलन करू या. त्यांना (काही) डॉक्टरांना मिळणार्‍या पैशांचा फारच राग आलेला दिसतोय. ;)

फारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. डॉक्टरला 'धंदा' कुणी शिकवत नाहीत कालेजात. बिझिनेसचे ज्ञान शून्य असते. घरचा दवाखाना वगैरे आधीच असेल तर वेगळी बाब, पण खानदानात प्रथमच हा उद्योग करणार्‍याचा लोचा होतो. एकतर सरकारी हॉस्पिटलात पैसे घ्यायचे नसतात ही सवय. आपण केलेल्या कामाचेही पैसे मागायची खरच लाज वाटते, अन त्या काळात अनेक फुकटे लुटून घेतात. हे झाले अवांतर. तर गम्मत अशी, की प्रॅक्टीस सुरू केली तेव्हा मी माझी कन्सल्टेशन फी ठेवली होती ३० रुपये. (त्या पहिल्या पेशंटने दिलेल्या १० रुपयांच्या ३ नोटा अजूनही फ्रेम करून ठेवल्यात माझ्यापाशी.) कारण, गावातल्या सिनियर कन्सल्टंट्सची फी ४० रुपये असे. म्हटलं आपण ज्युनियर, आपल्याला जास्त पैसे मागणे शोभणार नाही. ४-६ महिन्यांत एका पेशंटने मला अक्कल शिकवली. नवा असल्याने वेळ भरपूर असायचा, पेशंट्शी गप्पा वगैरे मारायचो. पठ्ठ्या थोड्या गप्पांनंतर खुलून मोकळं बोलत मला म्हणतो कसा, "साहेब काय करणार? गरीबी आहे. थोडे जास्त पैसे गाठीला असते, तर 'भारी' डॉक्टरला दाखवले असते.." दुसर्‍या दिवशीपासून मी माझी फी ५० रुपये आहे असा बोर्ड बाहेर लावला. तुम्हा सगळ्यांच्या आशिर्वादाने आजपर्यंत दुकान भरभरून वाहते आहे. धन्यवाद!

In reply to by आनंदी गोपाळ

सचोटीने व्यवसाय करणारे किंवा अगदी सेवाभावी वृत्तीने मदत करणारे डॉक्टर नाहीत असे नाही. पण राजकारणी-बिल्डर-कंत्राटदार मंडळींबाबत जे परसेप्शन आहे अगदी तेच परसेप्शन वैद्यकीय व्यवसायाबद्दल का होतंय याचा विचार त्या क्षेत्रातील मंडळींनीच करणं आवश्यक आहे. पब्लिकला आमचा खर्च/अडचणी कळत नाही किंवा डॉक्टरांच्या पैशावर जळतात हे फारच सुलभीकरण वाटते. आजकाल किमान दर्जाची वैद्यकीय सेवा घ्यायची म्हटली तर खर्च होणार याची मानसिक तयारी बहुतेकांची असतेच. मात्र त्या सेवेची खात्री आणि त्यात हलगर्जीपणा झाल्यास त्यासंदर्भातील हॉस्पिटल/डॉक्टर यांनी घ्यायची जबाबदारी याबाबत सर्वत्र आनंदीआनंद आहे.

In reply to by आजानुकर्ण

खाली दिलंय ते स्टँडर्ड ग्यारंटीवालं उत्तर आहे. अन त्याला नाईलाज आहे. कारण आम्ही शरीरं रिपेयर करणारे मेकॅनिक्स असलो, तरी प्रत्येक इंजिन वेगळं आहे, अन त्याच रिपेअर टेक्निकला प्रत्येक इंजिन वेगळा रिस्पॉन्स देतं. तोच नट त्याच खाच्यात फिट होईल असंही नसतं, व स्पेअर्स बाजारात मिळत नाहीत हा मोठा प्रॉब्लेम आहे. शिवाय ते इंजिन मुळातच आम्ही बनवलेलं नसल्याने, ब्ल्यूप्रिंट, यूजर मॅन्युअल वगैरे कुठे मिळत नाहीत. असो. या व्यवसायात चोर शिरलेत ते १००% खरे आहे. व त्यांचा बंदोबस्त व प्रतिकार करण्याचा प्रयत्न आमच्यातलेच अनेक लोक करीतच असतात. समाजही आपल्यापरीने आमच्यावर अंकुश ठेवून असतो. ताळतंत्र सोडून स्त्रीभ्रूणहत्या होवू लागल्या, तेव्हा समाज व कायद्याचा बडगा इतका तीव्रतेने पडला, की फॉर्म भरताना कानामात्राविलांटी चुकली तरी डॉक्टरला ५-५ वर्षे खडी फोडावी लागते. परवाची पुण्यातलीच केस आहे पेपरात. सुक्याबरोबर ओलेही जळतेच, पण त्यामुळे सगळ्याच पेशाला बदनाम करणारे असे धागे काढण्यात काय हशिल आहे?

In reply to by आनंदी गोपाळ

आपण उद्वेगाने असेल कदाचित डॉक्टरांची तुलना मेकानिक्स वगैरेंशी करता ते अतिशय खटकते ... अहो जिवलगांच्या जीवावर बेतते तेव्हा डॉक्टरांची पायरी चढतो माणूस....कमालीच्या विश्वासाने म्हणा किंवा पराकोटीच्या अगतिकतेने डॉक्टर म्हणतील ते करायला तयार असतात सामान्य लोक ..क्षुल्लक गाडी रिपेयर कार्नार्यंची इथे तुलना कशी होऊ शकेल ..... पैसा सत्ता आणि अधिकाराच्या माजोरडेपणाने उन्मत्त वर्तन करणारे काही लोक आहेत पण ते बहुतांश नव्हे .. राग मानू नका पण त्यांच्या समोर तसेही फारसे कुणाचेच काही चालत नाही ... तुमच्यात इतका रोखठोक कडवटपणा आलाय त्याची कारणे असतीलच ..ते नाकारत नाही ...पण एक गोष्ट लक्षात ठेवा आजही डॉक्टर देवासारखे मानले जातात आपल्या देशात...आपल्या माणसाला बरे करणारे डॉक्टर माणूस जन्मभर विसरत नाही हां त्याची पैशात भरपाई करू शकत नाहीत सगळे पण प्रसंगी वाटेल ती मदत करतील त्यांच्या अखत्यारीत .. ... तुम्हाला अनुभव येत असतीलच ..
जाता जाता :
पेशंटच्या आर्थिक /सामाजिक परिस्थितीची एका लिमिटच्या पलीकडे पर्वा न करता कमालीच्या सेवाभावाने आपले काम करणारे आणि हाताला गुण असणारे शेकडो डॉक्टर्स आजहि कार्यरत आहेत आणि तुम्ही कमालीच्या कुत्सितपणे ज्यांना हेटाळून बोलता ते 'जीप्डे'पण आहेत आणि प्रख्यात सर्जन्स वगैरे पण आहेत ...आणि देव करो ते ते तसे सतत कुठे नं कुठे समाजात येत राहोत ...

In reply to by अत्रन्गि पाउस

क्षुल्लक गाडी रिपेयर कार्नार्यंची इथे तुलना कशी होऊ शकेल
अत्रंगी साहेब, कष्ट करुन खाणारा कोणीही क्षुल्लक होउ शकत नाही. कृपया कुठल्याही कष्टकरी वर्गाला मग तो किती का कमवत असेना नावं ठेउ नका. धन्यवाद. बाकी प्रतिसादाशी सहमत.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

गाडी रिपेयर हे प्राधान्याने 'क्षुल्लक' काम आहे शरीर रिपेयर करण्यापुढे असा त्याचा हेतू आहे ... अहो फार फार तर गाडी स्क्रप मध्ये काढू ...पण शरीराचे तसे नाही ... मेकानिकला नावे ठेवणे हा हेतू नाही आणि अनवधानाने तसे सूचित झाले असेल तर पुन्हा क्षमस्व ...

फाईव्ह स्टार क्वालिटी ट्रिटमेंट पाहिजे आणि दाम मात्र खाणावळीचे हवे हो!!

In reply to by अजया

किंवा फाईव्ह स्टारचे पैसे घेेणार आणि खाणावळीच्या दर्जाचे जेवण देणार.

In reply to by आजानुकर्ण

फाईव्हस्टारचं जेवून खरंच पोट भरलंय का कधी तुमचं? त्या मळमळीत जेवणाला इतके पैसे का घेतात तेच कळत नाही मला. (हो. मिळमिळीत नाही. मळमळीत.) (एका कॉन्फरन्सला ला मेरिडियनवाल्यांनी 'राइस लेंटिल सूप' नावाखाली चक्क अत्यंत बेचव वरणभातात भरपूर पाणी घालून लोकांना खायला ठेवलं होतं. प्र च ण्ड शिव्या घातल्या होत्या, व घालू शकलो होतो, कारण पैसे देणारा ऑर्गनायझर मी होतो. तिथे लूट होते तेव्हा ती कंपनीच्या एक्स्पेन्स अकाऊंटावर जाते म्हणून खुश रहाणारे अकाउंटावरचे शहाणे डॉक्टरला पैसे देताना का खळखळ करतात? )

In reply to by आनंदी गोपाळ

तिथे लूट होते तेव्हा ती कंपनीच्या एक्स्पेन्स अकाऊंटावर जाते म्हणून खुश रहाणारे अकाउंटावरचे शहाणे डॉक्टरला पैसे देताना का खळखळ करतात?
असंच काल कोणीतरी विचारलं होतं, दुसऱ्याच्या जमिनीवर झालेल्या धरणाचे पाणी तुम्ही पिता तर तुमची जमीन गेली तर त्याचे इतके वाईट का वाटते. I do not have ability to counter this kind of argument.

In reply to by आनंदी गोपाळ

एका कॉन्फरन्सला ला मेरिडियनवाल्यांनी
बघा. तरी डॉक्टरांना सध्याचे एक्स्पेन्सेस परवडत नाहीत असं तेच म्हणतात. :)

In reply to by अजया

हो पण अशा ठिकाणांची यादी कुठे प्रकाशित होत नाही. पैसे खर्च करुन, शारीरिक हाल झाल्यानंतर आता हे ठिकाण चांगले नाही, दुसरे पाहू अशी काट मारता येते. इथे कुणाला अशा ठिकाणांची माहिती असल्यास ती या निमित्ताने समोर आली तर उत्तम. आयफोनबाबत तसे नाही. निदान वर्षभरासाठीची वॉरंटी तरी असते.

In reply to by आजानुकर्ण

आयफोनबाबत तसे नाही. निदान वर्षभरासाठीची वॉरंटी तरी असते.
तुम्हीही 'वरच्या' कंपनीतून आणलेले तुमच्या शरीराचे ग्यारंटी कार्ड मजकडे घेऊन या. तुमच्यावर केलेल्या प्रत्येक उपचाराची "वॉरंटी" त्यावरच ल्हिहून देईन. :)

In reply to by आनंदी गोपाळ

उपचारांच्या हलगर्जीपणाबाबत काय अकाऊंटॅबिलीटी आहे, हा प्रश्न विचारला तर डॉक्टर लोक प्रचंड डिफेन्सिव होतात किंवा विनोदी वक्तव्य करुन वेळ मारुन नेतात हा अनुभव नवा नाही.

In reply to by आजानुकर्ण

क्षमा करा, वर उत्तर टाईप करतच होतो. इथे ते ग्यारंटीचे लिहिल्याशिवाय राहवले नाही. डिफेन्सिव्ह का होतात, याचे कारण म्हणजे, अकाउंटेबल रहायला हरकत नाही, पण कित्येकदा परिस्थिती आमच्याही हाताबाहेरची असते, व 'नुकसानभरपाई' इन काइण्ड देणे अशक्य असते. इंजिन खोलतानाची तूटफूट, स्पेअरपार्ट्स इ. वर लिहिले आहेच. तुमच्या गाडीचे इंजीन रिपेयर करताना कुणा मेकॅनिककडून चूक झाली तर तो सिव्हिल ऑफेन्स होतो, की क्रिमिनल? त्याच्याकडून तुम्ही पैसे मागता, की त्याला जेलीत धाडायची वा हातपाय तोडायची मागणी करता? ज्या जीवनाची खरंच ग्यारंटी नाही, ते रिपेअर करतानाची ग्यारंटी इतकीच, की माझे पोट माझ्या रेप्युटेशनवर अवलंबून असते, हे तुम्ही लक्षात घेणे. मी घिसाडघाईने, वा पब्लिकला *तिया बनवून नुसतेच पैसे कमवायचा प्रयत्न केला, तर नक्कीच मारही खाईन व उपाशीही मरेन, हे आजच नाही, प्राचीन काळापासून सत्य आहे.

उपचाराने वाचणारे किती,हलगर्जीने दगावणारे किती?काय रेशो? काही विदा? किती आणि कोणते डाॅक्टर ठरवुन हलगर्जीपणा करुन मारतात पेशंटला? हे प्रश्न आयुर्वेदिकच्या नावाखाली,कोणतीही सर्जरी लागणार नाही,औषधांनी बरे व्हा असे सांगुन रितसर भरपूर पैसे घेणार्या इतर पॅथी डाॅक्टर्सना विचारले जातात का?(एक कुतुहल)

In reply to by अजया

ठरवून हलगर्जीपणा करणे आणि चुकून हलगर्जीपणा करणे यात डावेउजवे असे काही नाही. शिवाय उपचार घेणाऱ्या त्यात पेशंटचा काहीही दोष नाही. जर पैसे घेतात तर त्या दर्जाची सेवा मिळायला हवी हा पेशंटचा हक्क आहे. एवढेच म्हणायचे आहे. रस्त्यावर होणाऱ्या अपघातात ठरवून दुसऱ्याला मारले जात नाही. तरीही अपघातकर्त्याला शिक्षा होतेच. उपचाराने वाचणारे हे हलगर्जीपणाने दगावणाऱ्यांपेक्षा जोपर्यंत जास्त आहेत तोपर्यंत काही काळजी करायची नाही का? अगदी एक जीवही हलगर्जीपणामुळे जात असेल तर त्याची शिक्षा होणे आवश्यकच आहे. माझा स्वतःचा अॅनेकडोटल अनुभव असा आहे की आजपर्यंत चार वेळा मी व घरातील इतर यांना हॉस्पिटलायझेशन करावे लागले. त्यातील तीन वेळा चुकीचे उपचार, चुकीचे निदान आणि अॅडमिट केल्याचे दिवस वाढवण्यासाठी वेळकाढूपणा हे प्रकार अनुभवास आले. यातील एक वेळा आयसीयूपर्यंत विनाकारण फेरी मारावी लागली. या सर्व प्रकारात झालेला मनस्ताप फक्त आम्हाला झालेला आहे. प्रत्यक्षात सदर घटनेस जबाबदार व्यक्तींना त्याची काहीही तोशीस नाही. आता या सर्व गोष्टी कुठे डॉक्युमेंट होतात ते सांगितल्यास मी विदा व रेशो पुरवू शकतो. त्यात सद्य परिस्थितीत पारंपरिक न्यायालयांकडे दाद मागण्याशिवाय रुग्णांकडे काहीही पर्याय नाही. आयुर्वेदिक व्यक्तींना किंवा तत्सम अल्टरनेटिव मेडिसिन प्रकाराला मी डॉक्टरी मानतच नाही. शिवाय अॅलोपथीच्या हॉस्पिटलायझेशनच्या तुलनेत त्यांची फी नगण्य आहे.

In reply to by आजानुकर्ण

शिवाय अॅलोपथीच्या हॉस्पिटलायझेशनच्या तुलनेत त्यांची फी नगण्य आहे.
यांना कुणीतरी बालाजी तांबे नामक क्वॅकच्या दुकानातला 'हर्बल चहा' पाजा हो कुणीतरी. पैसे यांच्याकडून घ्या. मग टोटल फीबद्दल बोलू.

In reply to by आनंदी गोपाळ

बालाजी तांबे आणि डॉक्टर यांचे वर्क एथिक्स एकच असावेत अशी तुमची मागणी असल्यास पुढे चर्चा करण्यात काहीच पॉईंट नाही.

In reply to by अजया

मुळात ही सर्व Modern Medicine Procedure आयुर्वेदिक प्रक्रिया नसली तरी त्याचे उद्देश आयुर्वेदिक पद्ध्तीसारखेच आहे आणि ती म्हणजे "आजाराचे संपूर्ण व समूळ उच्चाटन" सर्व प्रक्रिया (Procedure) Non-invasive चिरफाडरहित व धोकाविरहित असल्याने पूर्ण उपचार घेणारे सर्वच जण वाचतात व आयुष्याचा पुरेपुरे आनंद घेतात. अगदी साधारण डॉक्टरांनी "बेड रेस्ट घ्या" म्हणून सुचविलेल्या पेशंटला आपण सिंहगड चढतांना पहिले तर आश्चर्य वाटून घेवू नका! आणि शेवटचे काही महिने उरलेत आता यांची घरी नेवून फक्त सेवा करा म्हणून सुचविलेल्या पेशंटला आपण पुढचे १० ते २० वर्ष जगतांना पहिले तर मुळीच आश्चर्य वाटून घेवू नका!!

In reply to by आयुर्हित

आयुर्हीत साहेब आपण बायपास वर सल्ला दिलात म्हणून सांगतो. मी एशियन हार्ट ला असताना ३००० तीन हजार बायपास च्या शल्यक्रिया पाहिल्या आहेत. यातील बहुसंख्य रुग्णांना बरेच अडथळे( multiple blocks) असत. एक किंवा दोन अडथळे असतील तर अन्जीयो प्लास्टी केली जाते. बहुसंख्य रुग्णांना लेफ्ट मेन मध्ये अडथळा असे. यातील कित्याक रुग्ण मला असे विचारत( मी रुग्णांशी जास्त मोकळेपणाने बोलत असे म्हणून) कि डॉक्टर माही बायपास केला नाही तर काय होईल. मी त्यांना शांतपणे सांगत असे ९० % काहीच होणार नाही. आणि तुम्हीच मला ५ वर्षाने सांगाल कि अहो डॉक्टर मला बायपास सांगितला होता पण मी तो केला नाही आणि तरीही मी ठणठणीत आहे. पण जर तुम्ही उरलेल्या १० % मध्ये असाल तर तुमचा रोग असा आहे कि तुम्ही कदाचित रुग्णालयापर्यंत सुद्धा पोहोचू शकणार नाही. आता तुम्ही या ९०% मध्ये आहात कि १० % मध्ये आहात हे समजायला मी काही ज्योतिषी नाही. तेंव्हा तुम्ही तुमच्या ज्योतिषाला विचारून पहा कि माझा मृत्युयोग केंव्हा आहे. दुसरे असे आहे कि हा इथे मागे पश्चीम द्रुतगती मार्ग आहे(एशियन हार्ट च्या मागिल खिडकीतून दिसतो) तो आपण डोळे मिटून पार करा १०० पैकी ९० वेळा आपण सुखरूप पार कराल. पण तो धोका पत्करायचा कि नाही ते तुम्ही ठरवा. एका दीड शहाण्या रुग्णाने माझ्या दवाखान्यात हेही सांगितले कि डॉक्टर तुम्ही म्हणता त्याला काही अर्थ नाही. माझा मृत्युयोग नसेल तर मला काहीही होणार नाही. मी त्यानाही थंडपणे सांगितले कि साहेब तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर. तुमचा मृत्युयोग नसेल तर तुम्ही मरणार नाही. पण तुमचा मृत्युयोग नाही म्हणून हे दवाखान्याच्या समोर असलेले रेल्वेचे रूळ तुम्ही डोळे मिटून पार करणार का? हा विचार तुम्हीच करायचा आहे. अर्थात त्यांनी माझे म्हणणे मान्य केले. तेंव्हा आपण या ९०% शक्यतेमध्ये खेळत आहात हे ध्यानात ठेवा आणी विचार करा. उरलेल्या १० टक्क्यातील लोक सुद्धा मी बरेच पाहिलेले आहेत कि तीन वर्षे माधवबाग, चिलेशन, बलून पंप वगैरे करून हृदय विकाराचा झटका आला कि यांना बायपासची आठवण होते. असो. जाता जाता के इ एम चे CVTS किंवा, जे जे रुग्णालय किंवा AIIMS आणी आमच्या MH CTC पुणे लष्करी रुग्णालयात येथील डॉक्टराना बायपास केल्याचे पाच पैसे सुद्धा अतिरिक्त मिळत नाहीत मग तेथील डॉक्टर असे बायपास का करतात याचाही विचार करा.

In reply to by सुबोध खरे

मानले बुवा आपल्याला. अगदी स्पष्ट शब्दात सांगितले आपण. सर्वात महत्वाचे म्हणजे हृदय विकाराचा झटका आला कि यांना बायपासची आठवण होते! अगदी ह्याच गोष्टीचा डॉक्टर गैरफायदा घेतात, जो त्यांनी घेवू नये. जास्त पैसे हवे असतील तर मेहनत वाढवावी, ४ नवीन ठिकाणी शाखा उघडाव्या अथवा स्वत:चे ४ नवीन हॉस्पिटल उघडावे, पण अडल्या नडलेल्या गरीब श्रीमंत जनतेला नाडू नये, हेच मनापासून वाटते आणि धागाकर्ताही हेच सांगायचा प्रयत्न करतोय. ज्या गोष्टीत धोका आहे ती मुद्दामहून का म्हणून करावी? जी गोष्ट अत्यंत चुकीची आहे, जे ओपेरशन करतांना लोकांची आयुष्यभराची कमवलेली कमाई जाते, किंबहुना बऱ्याच लोकांचा प्राणही जातो, ती गोष्ट का करावी? ज्या गोष्टीला चांगला पर्याय उपलब्ध आहे तो का वापरू नये? अगदी अन्जिओग्राफिच्या खर्चात पूर्ण शरीरातील ब्लॉकेज निघू शकतात ते का सुचवू नये?

In reply to by आयुर्हित

ज्या गोष्टीला चांगला पर्याय उपलब्ध आहे तो का वापरू नये?
कोणते कोणते चांगले पर्याय आहेत ते सांगावेत. समस्त मिपा कराना फायदा होईल.
अगदी अन्जिओग्राफिच्या खर्चात पूर्ण शरीरातील ब्लॉकेज निघू शकतात.
माहितीसाठी कुठे आणि कस करतात ते सांगाल का? मिपा करांचे रुपये तरी वाचतील…

In reply to by रुस्तम

आपल्या महितातल्या रुग्णाला सांगून त्याची माहिती मला व्यनीतून कळवावी. पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, कोल्हापूर आणि जयपूर येथे ठरवून माझी प्रत्यक्ष भेट घेवू शकतात.

In reply to by कपिलमुनी

एकदाच व थोडक्यात सांगतो : आजाराची लक्षणे नव्हे तर मूळ करणे शोधणे व त्यावर सुयोग्य (पेशंटला हवा तो परिणाम कायमस्वरूपी साधणारी) उपचार सुचविणे, व ते सहजसाध्य होईल ते पाहणे.

In reply to by आयुर्हित

सबिंसा (sabinsa) किंवा (sami labs limited) या कंपनीच्या औषधांबद्दल जर बोलत असाल तर जरा जपून. उगा खेळ व्हायचा कुणाच्या तरी जीवाशी.

In reply to by स्पंदना

हा विषय वेगळाच आहे. आपले काही अनमोल अनुभव असतील किंवा याबद्दल अधिक काही सांगायचे असेल तर वेगळा धागा काढाल प्लीज....

अनुभव वैयक्तिक आहेत. अनुभव पहिला : तातश्रींना पोटाचा आजार अनेक वर्षांपासून आहे. एका ठिकाणी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. डॉक्टरांनी सांगितलं भिंगातून पाहून काय प्रॉब्लेम आहे हे निश्चित करू. पण भूल दिल्यानंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. बाहेर तीन सुपुत्र (आम्ही) बसले होते. त्यातल्या एकाच्या सह्या घेतल्या. आठवडाराभर ठेवलं. लाखभर बिल झालं. काही दिवसांनी पुन्हा पोट दुखायला लागलं. मग औषधं लिहून देऊ लागले. पण लघवी कोंडल्यासारखे वाटत असल्याने रात्रभर वेदना होत होत्या. डॉक्टर बदलला : पूर्वीच्या सर्व चाचण्या दाखवल्या. डॉ म्हणाले मुंबईला एक चाचणी करावी लागेल. सुपुत्र क्र्म २ घरी होते. त्यांनी हे काम केलं. मग पुण्यात त्याच चाचण्या वेगवेगळ्या डायग्नॉस्टीक सेंटर मधे करवून घेण्यात आल्या. त्यातलं एक स्वारगेट, दुसरं बंडगार्डन, तिसरं म्हात्रे ब्रिज आणि चौथं पिंपवड येथे. जबरदस्त पुणे दर्शन झाल्यावर रिपोर्ट्स पूर्वीप्रमाणेच नॉर्मल आले. मग आनखी एक टेस्ट करू म्हणाले. दोन दिवसाची औषधं दिलेली. झोप लागली. घरचे खूष. तिस-या दिवशी पहिल्यापेक्षा जास्त वेदना. सदर सुपुत्र घरी आल्यावर गोळ्या पाहील्या तर वेदनाशामक ! सहा महीने सहन करून झाल्यावर फरक पडला नाही. आता पुन्हा डॉक्टर बदलला. आता कर्वे रस्त्यावर एका सराफाच्या इमारतीतला ! पुन्हा त्याच चाचण्या, पण जवळच्याच इस्पितळात. ही जागा राज ठाकरेंचं नाव घेतलं की लक्षात येते. चाचण्या झाल्या. या वेळी बिल रग्गड आलं. सहजच बिलात पाहीलं तर डॉक्टर फीज २०००० रुपये आणि व्हिजीट फी ३०००/-. याबद्दल विचारलं तर उडवाउडवीची उत्तरं मिळाली. मग बंधूंकडून जुनी बिलं घेतली. सग़ळीकडे हेच. डायग्नॉस्टीक सेंटरकडून विविध चाचण्यांपोटी पाच हजारापासून तेरा हजारापर्यंत डॉक्टरला गेले होते. हे लक्षात येऊनही नाईलाजाने वा-या चालू आहेत. तातश्रींकडे बघवत नाही. आता चांगला म्हणवला गेलेला एकही डॉक्टर शिल्लक नाही. निदान होत नाही. पैसे भरपूर गेले आहेत. आम्ही काही खूप गरीब नसलो तरी श्रीमंत वर्गात मोडत नाही. डॉक्टरच्या अक्कलहुशारीचे असते तर काही वाटलं नसतं. अनुभव २ सासूबाईंना अस्वस्थ वाटलं म्हणून मेव्हण्याने पूर्व भागातल्या एका हॉस्पिटलमधे नेलं. त्याच्या समोरचं हॉस्पिटल क्रमा़ंक एकचं आहे. पण मध्यंतरी डेड बॉडी दाखल करून घेऊन दीड दिवसाचं बिल एक लाख सत्तर हजार दिलं होतं. तो ग्राहक पंचायतीचा ट्रॅप होता. पेपरमधे आलं होतं. ज्यांना हे माहीत आहे ते समोरच्या इस्पितळात जातात. आता देशातील एका लीडींग हॉस्पीटलची मॅनेजमेंट आहे. साबाना अँजिओग्राफी करायची होती. ज्या डॉक्टरने शिफारस केली होती त्याने व्हॉल्व्ह ब्सवण्याची गरज नाही, फक्त पहायचं असं सांगितलं होतं. सहजच रेट पाहून आलो. बाहेरच्यापेक्षा जास्तच होते. पण अँजिओप्लास्टी ७५०००/- त होईल असं मित्रानं सांगितलं. इकडं मेव्हणा गायब होता. तीन तासाने भेटला तर त्याने सांगितलं अडीच लाख खर्च सांगितलाय. तेव्हां त्याला ओरडलोच. मग त्याला घेऊन गेलो तर घोळ होता. हा इन्शुरन्स विभागात गेला होता. तिथला जो कुणी होता तो म्हणत होता तुम्हाला काय करायचंय ? खिशातून थोडीच जातात ? कंपनी कॅशलेस करतेय. याची लिमीट पाच लाख म्हणून अडीच लाख. त्याला त्यांच्याच हॉस्पीटलचे दर सांगितले तर तो म्हणाला इन्शुरन्स कंपनीनेच आम्हाला हे दर सँक्शन केले आहेत. गोची अशी होती की, ज्या हॉस्पीटलची मॅनेजमेंट आहे त्यांचे दिल्लीतले दर कंपनीने सँक्शन केले आहेत. पण पुण्यात हे दर आकारले जात नसताना दिल्लीच्या दराने पैसे घेणं यात चुकीचं काही आहे असं त्यांना वाटतच नव्हतं. माझ्या समोरच त्याचा बॉस आलाअ. दुस-या एका केसमधे त्याने दोन लाखाचं एस्टीमेट कंपनीला दिलं होतं. बॉस त्याला ओरडला अरे या केसमधे मागच्या महीन्यात आपण साडेतीन लाखाचा क्लेम दिलेला आहे... अशाने इन्शुरन्स कंपन्यांचे प्रीमीयम वाढतील हे एक. दुसरं म्हणजे सर्रास अशी फसवणूक होत असेल तर हेल्थ इंशुरन्सच्या बाबतीत गरजूंचे क्लेम्स पास होणार नाहीत हा एक धोका आहे. या दोन्ही अनुभवांमधे डॉक्टरला, हॉस्पिटलला त्यांचे हक्काचे पैसे मिळाले आहेत असं म्हणता येईल का ? हा काही युनिक अनुभव नव्हे.

चर्चा भरकटू देऊ नका. डागतरांस्नी मन्मानी फीया घ्यायच्या का न्हाय ह्योच सवाल हाय. थे अकौंटीबिलिटी व्यैग्रे वायला टापिक हाय. हलगर्जी झाली तर ग्राहक न्यायालयात जाता येतं. त्याचा डॉक्टरांच्या फीशी काय संबंध? उद्या समजा सगळया डॉक्टरांना सरकारी नोकरीच करायला लावली मास्तरांइतका पगार देऊन तेव्हा उपचारांचा दर्जा काय असेल आणि हलगर्जी झाली तर कोण जबाबदार? जास्त फी आकारणारा डॉक्टर चांगला असतो तो उपचार चांगले करतो म्ह्णून की फी जास्त आकारतो म्हणून? फी जास्त आकारणारा हलगर्जी करण्याची शक्यता कमी आहे, हलगर्जी करणाराकडे पेशंट जाण्याची शक्यता कमी आहे भले तो फुकट का इलाज करेना... तर मंडळी, चर्चेचा मुद्दा आहे डॉक्टरांच्या भरमसाट फिया, हलगर्जी करणारे डॉक्टर नाही. ते त्या मिश्रेयाताईंच्या धाग्यावर आहेत. तिकडे जाऊन भांडा.