✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मै ऐसा क्यूं हूं?

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
Mon, 05/03/2010 - 18:47  ·  लेख
लेख
जेव्हापासून आठवतंय तेव्हापासून घरात पुस्तकंच पुस्तकं असायची. त्यामुळे मला वाचनाची मुद्दाम सवय लावावी वगैरे लागली नाही कुणाला. मला अगदी लहानपणचं जे आठवतंय त्यापैकी एक असं... रात्रीची वेळ. सगळे जेवायला बसले आहेत. आणि मी काही तरी पुस्तक वाचतो आहे. आई जेवायला बोलवून बोलवून थकली आहे आणि शेवटी आता वाचन पुरे म्हणून एक धपाटा घालून जेवायला नेलं मला. :) बरं पुस्तकं खूप म्हणजे किती असावीत? अक्षरशः घरात माणसांच्या अगदी बरोबरीने पुस्तकांची दाटी असावी. घरात आजोबा, आजी, आई, बाबा, दोन काका, एक आत्या, ताई आणी सगळ्यात लहान मी. एवढी माणसं. प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं. माळ्यावर ट्रंकेत पुस्तकं. ग्यालरीतल्या शेल्फात पुस्तकं. माझ्या कप्प्यात अर्ध्या भागात कपडे, अर्ध्या भागात पुस्तकं. असं सगळं. अगदी सुरूवातीला वाचलेली पुस्तकं म्हणजे (बहुधा) ज्योत्स्ना प्रकाशनाची अथवा केशव भिकाजी ढवळे प्रकाशनाची लहान मुलांच्या गोष्टींची पुस्तकं. राजाराणी, राक्षस, त्याचा पोपटात असलेला जीव वगैरेंची. वेगळ्याच एका अद्भुत दुनियेत घेऊन जाणारी. सुट्टी असो नाही तर शाळा असो... रोज एखादे तरी पुस्तक वाचायचोच. मग रात्री स्वप्नातही तेच दिसायचं. अर्थात तेव्हा राजकन्या वगैरे पेक्षा तो राक्षस, पोपट आणि त्याच्या राजपुत्राशी होणार्‍या लढायाच जास्त दिसायच्या स्वप्नात. पण एकंदरीत मजा यायची. जसजसा थोडा मोठा झालो तसतसं मग क्षितिज विस्तारले. बाबा दर शुक्रवारी का अशाच कोणत्याशा वारी 'द इलस्ट्रेटेद विकली ऑफ इंडिया' आणायचे, ऑफिसातून येताना. त्यातली रंगीत चित्रं बघायला मजा यायची. त्यातच ओळख झाली 'फँटम'ची. फँटम, त्याची लेडी डायना, जंगल, मधून मधून त्या फँटमचा होणारा मि. वॉकर, सध्याच्या फँटमचा पूर्वज जो पहिल्यांदा फँटम झाला, त्याने कवटी हातात घेऊन घेतलेली शप्पथ, फँटमची मुलं, म्हातारा गुर्रन हे सगळं मला अगदी अजूनही खरं वाटतं. आता, हे सगळं काल्पनिक आहे असं माहिती आहे, पण वाटत नाहीच अजूनही. अजून थोडा मोठा झाल्यावर भेटली, इंद्रजाल कॉमिक्स. बाबांपाशी हट्ट करून पेपरवाल्याकडे दर आठवड्याचे नवीन प्रसिद्ध झालेले कॉमिक्स टाकायला लावले होते. त्यात प्रामुख्याने मँड्रेक आणि त्याचा पैलवान सहाय्यक लोथार यांचे कारनामे असत. जादूचे कॉलेज, तिथला प्रिन्सिपॉल थेरॉन आणि ते मनाच्या शक्तीचे प्रयोग इत्यादी हे केवळ अद्भुत. त्याच वेळेस आणि त्याच बरोबरीने वेड लावले होते ते अमर चित्रकथांनी. माझ्या मते अगदी अजूनही 'कॉमिक्स' या प्रकारातली ही सगळ्यात छान अशी मालिका आहे. या चित्रकथांनी माझ्यासारख्या मराठी माध्यमात शिकणार्‍या मुलाला भारतिय हिरोज आणि भारतिय संस्कृतीतल्या गोष्टींचा प्रच्चंड खजिना अतिशय नेटकेपणाने खुला केला. रामायण, महाभारत वगैरे तर आहेच... पण राजपुतान्यातल्या राणा संगा, राणा प्रताप, राणी पद्मिनी सारख्या थोर आणि शूर व्यक्तींचा परिचय मला झाला. आजही मला अमरचित्रकथांचा संपूर्ण संग्रह माझ्या मुलींसाठी विकत घ्यायची इच्छा आहे. अमर चित्रकथांचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सुंदर रेखाटनं आणि साधी सरळ भाषा. नुसती बघत रहावी अशी रंगसंगती. अमर चित्रकथांना माझ्या मनात एक अगदी वेगळेच स्थान आहे. नेहमीच राहील. चांदोबा आणि किशोर मासिकं तर अगदी नववीत वगैरे जाईपर्यंत दर महिन्याला घरी येत असत. आम्हाला पाचवीपासून इंग्रजी सुरू झाले. हळूहळू अक्षरओळख झाली आणि वाचनाची गाडी त्या भाषेकडे वळायला लागली. सतत प्रयत्न केल्याने बर्‍यापैकी लवकर इंग्रजी वाचता येऊ लागले. रोजचे इंग्रजी वर्तमानपत्र वाचणे हा तर नियमच झाला. माझ्या वडिलांना अ‍ॅगाथा ख्रिस्ती किंवा डॅफ्ने डु मॉरिएच्या कादंबर्‍या वाचायचा दांडगा शौक. त्यांच्याकडे बर्‍याचशा कादंबर्‍या संग्रही होत्याच. अर्थात हे सगळे वाचता येऊ लागे पर्यंत बराच वेळ गेला. पण पुस्तकं हाताशी असल्याने नेहमीच ती चाळली जात. मला आठवतंय, मी सातवीत की आठवीत असताना मला माझ्या आत्याने दिवाळीत शेरलॉक होम्सच्या सगळ्य कथांचा संग्रह दिला होता. सुट्टी संपायच्या आत वाचून संपले होते दोन्हीही खंड. बाबांच्या संग्रहामुळे हर्क्युल पायरॉची ओळख झालीच होती. मराठीतल्या गुरूनाथ नाईक वगैरेंची पुस्तकं तर तेव्हा सर्रास उपलब्ध असत. त्यांची तर पारायणं चालूच होती. एके दिवशी माळा साफ करताना, एका ट्रंकेत त्यांनी आणि माझ्या वडिलांनी त्यांच्या तरूणपणी जमवलेली अर्ल स्टॅनले गार्डनरची आख्खीच्या आख्खी पेरी मेसनची सिरिजच हाती लागली. थोड्याच दिवसात त्याचाही फडशा पाडण्यात आला. अशा रितीने हळूहळू माझी वाचनाची सवय वाढत होती... अगदी हाताबाहेर जात होती असे म्हणले तरी चालेल. वाणसामान गुंडाळलेल्या पुड्यांचे कागदही सुटत नव्हते माझ्या तावडीतून. घे कागद की वाच, घे पुस्तक की वाच असं चालायचं. पण माझ्या वाचनावर खरा प्रभाव असेल तर तो माझ्या काकाचा. घराण्याच्या गुणधर्माला अनुसरून तोसुद्धा वाचनकिडा आहेच. आमच्या घराजवळच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची शाखा होती. खूपच सुसज्ज लायब्ररी होती ती. अजूनही आहे बहुधा. काका तिथे मेंबर. त्याची साहित्याची जाणही प्रगल्भ आहे. तो जी पुस्तके आणत असे ती दिवसा माझ्या ताब्यात असत. कथा / कादंबर्‍या / मासिकं अगदी भरपूर वाचन केलं त्याच्याजोडीने. लहान वय असल्यामुळे सगळंच कळलं असेल असं नाही, पण ती नावं, ती भाषा न कळत मनावर ठसत होती, संस्कार करत होती. काका 'ललित' मासिकाचाही सदस्य होता. दर महिन्याला त्याच्या जोडीने मीही नवीन अंकाची वाट बघत असे. 'ठणठणपाळ' तर लै हिट्ट होता त्यातला. अजूनही ते मिशाळ ठणठणपाळाचे सरवट्यांनी काढलेले व्यंगचित्र डोळ्यासमोर आहे. 'ललित'चा दिवाळी अंकही दणदणीत असायचा. माझ्या वडिलांचा आत्तेभाऊ साहित्यिक / प्राध्यापक वगैरे. तो नेमाडपंथी. म्हणजे, नेमाड्यांच्या अगदी रोजच्या बैठकीतला. त्या कनेक्शनमुळे माझा काकाही तसाच. कोसला, बिढार, झूल इत्यादी कादंबर्‍या घरच्याच संग्रहातल्या. अगदी शाळकरी वयातल्या. 'कोसला' पहिल्यांदा वाचली तेव्हा काहीतरी वेगळंच (पण त्या वयात नेमकं लक्षात न येणारं) असं काही आपण वाचतो आहे हे कळत होते त्या जाणिवेची आठवण अजूनही मनात घर करून आहे. महानोर, कोलटकर वगैरे नावं ऐकून माहित झाली. त्यापैकी महानोरांची कविता समजायला जास्त सोपी म्हणून त्याची पारायणं झाली. 'या नभाने या भुईला दान द्यावे' वगैरे ओळी तर मनात घर करून बसलेल्या. त्यावेळच्या नवीन वाटा चोखाळणार्‍या साहित्यिकांची ओळख अशा रितीने घरातच होत होती. काकाकडे 'फणीश्वरनाथ रेणू' या महान हिंदी सहित्यिकाची काही पुसकं / कादंबर्‍या होत्या. त्यापण वाचत होतो. आज हे सगळे आठवायचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी झालेला मेघनाबरोबरचा संवाद. तिच्याशी बोलताना जुन्या आठवणी निघाल्या आणि मी विचार करायला लागलो. आज मला कोणी विचारले की तुला काय करायला सगळ्यात जास्त आवडेल तर मी रात्री झोपेतसुद्धा 'वाचन' असे उत्तर देईन. मग 'मै ऐसा क्यूं हूं?' असा विचार करत असताना मला लहानपणापासून सहजतः मिळालेला पुस्तकांचा सहवास आणि माझ्यसमोर घरातले इतर लोक करत असलेले वाचन हे त्याचे मुख्य कारण आहे असे जाणवले. मग असा विचार आला मनात की एखादा धागा टाकावा. सगळ्यांनाच काही ना काही छंद असतो, आवड असते. माझ्यासारखी आणि माझ्यहूनही जास्त वाचनाची आवड असणारे थोर लोक इथे आहेत. त्यांच्या त्या त्या आवडीनिवडी अथवा छंद त्यांना कसे लागले असावेत? त्या लोकांनी त्यांचे अनुभव / आठवणी इथे शेअर कराव्यात अशी कल्पना. प्रत्येकाने वाचन वगैरे बद्दल लिहावे असे नाही. मला वाचनाचा छंद आहे. अजून कोणाला पर्यटनाचा असेल, कोणाला गिर्यारोहणाचा असेल. कोणाला चित्रकलेचा अथवा संगिताचा असेल. कोणी जुन्या हिंदी गाण्यांचा / चित्रपटांचा शौकिन असेल. तर प्रत्येकाने असे काहीना काही लिहावे ही अपेक्षा.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
48172 वाचन

💬 प्रतिसाद (97)

प्रतिक्रिया

वीरधवल

स्पंदना
Mon, 05/03/2010 - 19:18 नवीन
ही माझी सर्वात पहिली कादम्बरी. तुम्ही खाल्लेले धपाटे आमच्या ही नशीबी होते. कळतच नाही त्याना कि लिन्क तुटते. काय खातोय हे सुद्धा लक्षात येत नसे कधी कधी.'छान वाटल वाचताना. पुरा मागोवा घेतला तुम्ही सुरवातिच्या पुस्तकान चा. मिळेल तिथ मिळेल तस वाचल जाई. खर तर दुरदर्शन न वाचनाची दुर्दशा केली. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments

माझ्या मनातले विचार

संदीप चित्रे
Mon, 05/03/2010 - 19:20 नवीन
कुणीतरी उचलून नेटकेपणाने मांडलेत असं वाटलं रे ! >> रात्रीची वेळ. सगळे जेवायला बसले आहेत. आणि मी काही तरी पुस्तक वाचतो आहे. आई जेवायला बोलवून बोलवून थकली आहे आणि शेवटी आता वाचन पुरे म्हणून एक धपाटा घालून जेवायला नेलं मला. >> वाणसामान गुंडाळलेल्या पुड्यांचे कागदही सुटत नव्हते माझ्या तावडीतून. घे कागद की वाच, घे पुस्तक की वाच असं चालायचं. अगदी म्हणजे अगदीच सहमत. 'ऑडियो बुक' ऐकतोस का? नसशील तर जरूर बघ... वाचनाचे एक वेगळेच दालन खुलं होईल.
  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
Mon, 05/03/2010 - 20:06 नवीन
उत्तम धागा. (इथे प्रतिसादाकरता जागा राखून ठेवतो. ) अशा स्वरूपाचा अन्यत्र असलेला हा अजून एक धागा. अनेक लोकांनी उत्तमोत्तम प्रतिसाद येथेही दिलेत. http://www.anothersubcontinent.com/forums/index.php?showtopic=4222&hl=
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

लई आवडल

sagarparadkar
Tue, 05/04/2010 - 17:07 नवीन
एकदम सहमत .... हे वाचनाचे वेड एकदा लागले कि मग काही विचारुच नका ... पण असे का होते कि अवान्तर वाचन अफाट केले जाते अगदी न कन्टाळ्ता, पण अभ्यासाचे वाचन मात्र थोडेसे केले तरी खूप कन्टाळा येतो. हे असे सर्वान्चेच होते कि ही माझी खोड आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

मै भी ऐसाच्च हूं !

रामदास
Mon, 05/03/2010 - 19:21 नवीन
मी अनील अवचट होता होता वाचलो आहे.दर पंधरा दिवसानी एक नविन खूळ झपाटून टाकायचं .मग पुढच्या महीनाभर तेच तेच. या खूळांपैकी वाचनाचं खूळ /वेड मात्र तसंच सोबत राहीलं. आजच मिपाच्या धाग्यावर पाडसची आठवण कोणीतरी केली होती. परत दुपारपर्यंत पाडसच डोक्यात होतं.पहील्या प्रकरणातल्या पाणचक्कीपासून ते पाचं आणि मुलाचं शेवटचं संभाषण सगळं काही आठवलं.(मग त्यामुळे वडलांची आठवण दिवसभर येत राहीली ती गोष्ट वेगळीच.) रात्रीच्या प्रवासात मागच्या सिटवरून पाण्याची बाटली घरंगळत पायाशी येते आणि दचकायला होतं तशा अनेक आठवणी पुस्तकांसोबत जोडल्या गेल्या आहेत. गेली पन्नास वर्षं हा एकच छंद माझ्या सोबत आहे. एका वेळी पाच ते सहा पुस्तकांचं वाचन करायची सवय त्यामुळेच लागली आहे. नीलकांतनी पुस्तकविश्व सुरु केल्यावर तर आता हा छंद वाढणारच आहे. बिपीन , हा धागा म्हणजे आमच्या यमना सारखा चिरंजीव धागा आहे.
  • Log in or register to post comments

खल्लास!

धमाल मुलगा
Mon, 05/03/2010 - 19:44 नवीन
काय अप्रतिम प्रतिसाद आहे! :) _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

अवचट

सन्जोप राव
Tue, 05/04/2010 - 22:12 नवीन
मी अनील अवचट होता होता वाचलो आहे. तुम्ही किती नशिबवान आहात याची तुम्हाला कल्पना नाही! रात्रीच्या प्रवासात मागच्या सिटवरून पाण्याची बाटली घरंगळत पायाशी येते आणि दचकायला होतं तशा अनेक आठवणी पुस्तकांसोबत जोडल्या गेल्या आहेत. रामदास स्पेशल! सन्जोप राव किताबोंमे छपते हैं चाहत के किस्से, हकीकत की दुनियामें चाहत नही है जमानेके बाजारमे ये शै हे की जिसकी किसीको जरुरत नही है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

छान धागा आणि प्रतिसाद

खंडेराव
गुरुवार, 03/05/2015 - 16:52 नवीन
आजच मिपाच्या धाग्यावर पाडसची आठवण कोणीतरी केली होती. परत दुपारपर्यंत पाडसच डोक्यात होतं.पहील्या प्रकरणातल्या पाणचक्कीपासून ते पाचं आणि मुलाचं शेवटचं संभाषण सगळं काही आठवलं.(मग त्यामुळे वडलांची आठवण दिवसभर येत राहीली ती गोष्ट वेगळीच.)
पाडस पहिल्यादा वाचले ते ८-९ चा असताना. नंतर पुन्हा पुन्हा, कैक वेळा. ज्योडी आणि मा ची स्वयंपाकघरातील वर्णने कायम डोक्यात घोळायची. हरणे काय आणि मगरी काय. विन्ग्रजी पाडस घेउनही वाचली, पण ती काय तितका आनंद देउ शकली नाही. राम पटवर्धनांचा अनुवाद जबरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

आम्ही असेच आहोत

शेखर जोग
Mon, 05/03/2010 - 19:27 नवीन
नमस्कार बिपीनसाहेब! मनापासून नमस्ते! जगात जे काही खूप वाचणारे व खुळे लोक असतात अगदी आपल्या रामदाससारखे ते मला व्यक्तीशः अत्यंत आवडतात. मी ही अशीच खुळं घेऊन वावणारणारा एक वेडा. पण मला तुमच्या लेखाने प्रोत्साहन मिळाले! धन्यवाद
  • Log in or register to post comments

हा हा!!

धमाल मुलगा
Mon, 05/03/2010 - 19:41 नवीन
मस्तच! वाचनप्रवास अप्रतिम. बाकी, रांगता रांगता हळुच उठुन उभे राहताना पहिलं पाऊल टाकताना आधारासाठी धरायला मिळावे ते साहित्याचे बोट..ह्यापेक्षा सुंदर बाब आणखी काय असावी? (च्चॅ! काय रे नंद्या, फारच दवणीय झालं काय हे वाक्य? :D) आम्हीही वाचनपंथीच. फरक इतकाच, की साहित्यमुल्य, वाचनाची/आशयाची खोली वगैरे प्रकार आमच्या सामान्य कुवतीच्या बुध्दीला झेपलेच नाहीत. त्यामुळॅ 'सुंदर, नेटकं, उच्च अभिरुची' वगैरे विशेषणांचे धनी असलेले साहित्य फारसं वाचलं गेलंच नाही. मिळेल ते वाचणं ही आवड. किती कळतंय, बुध्दीचा टीपकागद काम करतोय की नाही वगैरे बाब अलाहिदा. :) संध्याकाळी आईआबांसोबत फिरायला गेलं की येताना खारे शेंगदाणे रोज घ्यायचेच...तेही एका ठराविक गाडीवरुनच..का? तर त्याच्याकडे बर्‍याचदा कोणत्याशा पुस्तकांची पानं असायची सुरनळ्या करायला ठेवलेली..शेंगदाणे खाऊन झाले की ती सुरनळी उलगडुन वाचायला सुरुवात :D मग रस्त्यानं चालताना ठेचकाळणं हे आलंच...मी यत्ता चौथी की पाचवीत असताना उजवा अंगठ्याला लागलेली ठेच जवळपास सहा महिने तशीच होती...सारखे ठेचकाळुन.. इतका आमचा येडेपणा. आजी संध्याकाळी शाळेतुन आली की तिला चहाही न घेऊ देता 'हे वाचुया, ते वाचुया' करुन छळ करायचा.त्याचा फायदा झाला की मी पहिलीत गेलो तेव्हा माझा पहिलीचा सगळा अभ्यास आधीच पुर्ण झालेला. (पुढे कालपरत्वे ही अभ्यासाची वेडी ओढ ओहोटीला लागत गेली म्हणा. पण ते असो!) बर्‍याचदा जेवायला बसलेलो असतानाचं चित्र म्हणजे छानपैकी सगळेजण समोर ताटं घेऊन बसलो आहोत. माझी बोटं वरणभात त्यावरच वाळुन पिवळीधम्मक झालीयेत, डोकं पुस्तकात खुपसलेलं..शेजारी आजीच्या हातातला पोळीचा घास वाळुन चाललेला-तिच्याही डाव्या हातात पुस्तक, (सुटीला घरी आली असेल तेव्हा-) समोर आत्या पुस्तक जमिनीवर ठेऊन ते वाचण्यात गुंगलेली...पानात काहीच शिल्लक नाही ह्याचं भानच नाही.. आणि आमच्या मातोश्री हे सगळं पाहुन वैतागलेल्या :D पुढे पुढे दिवाळी-उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे आमच्या लायब्ररियनला संकट वाटायला लागलं :) कारण सकाळी एक पुस्तक घेऊन यायचो, ते बदलायला संध्याकाळी पुन्हा हजर :) शेवटी त्यानं नियम बाजुला ठेऊन मला सगळ्या रॅक्समध्ये उचकापाचक करण्याची पुर्ण मुभा देऊन टाकलेली! निगडीला आत्या घरीच लायब्ररी चालवायची...आधीच ती आवडती आत्या, मी तिचा आवडता भाचा, त्यात तिच्याकडं खंडीभर पुस्तकं...नुस्ती मज्ज्ज्जा! सकाळी उठावं, ब्रश करुन झालं की मस्त एखादं पुस्तक उचलावं आणि बाल्कनीतल्या आरामखुर्चीवर ऐसपैस पसराव...आत्या आपली आहेच सेवेसि हजर..दुधाचा कप बाल्कनीत...नाष्टाची डिश बाल्कनीत...जेवायला मात्र आत जावं लागायचं :( हळुहळु विंग्रजी पुस्तकात काय असतं बुवा..ह्या उत्सुकतेपोटी आबांच कपाट उचकुन झालं...किंग लियर, क्लिओपात्रा अन काय अन काय...मग पुढे इंग्रजी वाचताना नजर मेल्यावर सिडने शेल्डन सुरु केलं..आणि मग एकामागुन एक पुस्तकं कुरतडतच राहिलो :) गावाच्या लायब्ररीतली सिडनेची सगळी बुकं संपल्याअवर अ‍ॅलिस्टर मॅक्लिनकडं मोर्चा वळवला.....पुढे अर्ल गार्डनरच्या पेरी मेसनने भुरळ घातली... (मध्येच कॉलेजात जायला लागल्यावर अंमळ पिवळ्या पुस्तकांचाही फडशा पाडायला लागलो.. ;) ) पण ह्यासोबत टवाळक्या करण्याची आवड आपोआप कशी काय वाढीला लागली कळालंच नाही...मग पुस्तकं राहिली बाजुला आणि गप्पांष्टकांचे फड रात्र रात्र रंगायला लागले...... क्या करूं? मै ऐसा ही हूं.... :D
  • Log in or register to post comments

शीर्षक

श्रावण मोडक
Mon, 05/03/2010 - 19:43 नवीन
शीर्षक 'बदनाम' आहे. लेखनाची जातकुळी पाहता ते पटले नाही हे आधी नोंदवतो. अनुभव जवळपास असेच. थोडा फरक (म्हणजे इथल्या लेखनापुरता, प्रत्यक्षात बिकाचेही ते अनुभव असतील) इथं नोंदवतो. त्या काळात आम्ही पोरा-पोरांनी मिळून चालवलेली एक लायब्ररी आठवते. त्या लायब्ररीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील (हा उल्लेख मुद्दाम, कारण मी कर्नाटकात होतो) गड किल्ल्यांची माहिती देणारी एक पुस्तकमालिका आठवते. साठेक पानी पुस्तकं असावीत. त्याहीपलीकडं आठवतं ते एक पुस्तक - धनगराचा पोर. लेखकाचं नावही आज आठवतं - कायुम तांग्राकुलियेव्ह. तेव्हाच्या सोव्हिएतमधून प्रगती प्रकाशनाची पुस्तकं यायची. त्यांची खरेदी बाबा करायचे (त्यामागचे एक कारण आर्थीक असावे, नव्हे असेलच). त्या पुस्तकांच्या गठ्ठ्यात हे एक पुस्तक होते. भला मोठ्ठा आकार. आजच्या ए-४चा. रेखीव मुखपृष्ठ. ते पुस्तक वाचल्यापासून धनगरांच्या प्रवासात सहभागी होण्याची इच्छा मनात घर करून बसली आहे, ती अद्याप कायम आहे. दरवर्षी मेंढपाळ कोकणात जाताना पाहतो आणि ही इच्छा उसळी मारून वर येते. मी तिथंच आहे अजूनही. प्रगतीच्या या पुस्तकांबरोबरच मला आणखी एक नियतकालीक (बहुदा मासीक) आठवतं - स्पॅन. आजही निघत असावं. अमेरिकी दूतावासाचं. त्या मासिकाच्या एका मुखपृष्ठावर गरुडाचा एक होलोग्राम होता तो आठवतो. ते वाचायचो. पण किती कळायचं किंवा का वाचायचो हे आजही सांगता येणार नाही. चांदोबा होता. चंपक होतं. त्यांच्या जोडीनं मी पोथ्या वाचायचो. डोक्यावरून जायच्या. पण वाचायचो. आणखी एक - डिटेक्टीव्ह पुस्तकं. गुरूनाथ नाईक हेच एक नाव लेखकाचं म्हणून आठवतं. पण शिलेदार कथा, काळा पहाड, नाईटकिंग (आणखी एक कोणी स्त्री डिटेक्टीव्हही होती) वगैरेंची मोहिनी असलेला एक काळ होता, आजही त्या मिळाल्या तर आवडीने वाचेन. त्यातही शिलेदार कथा हमखास. कॅप्टन दीप, लेफ्टनंट शेख, हवालदार कदम, जंगम आणि पाचवा... कोण? आठवेना आत्ता... पण त्या पुस्तकांचं वेड होतं अक्षरशः. मिळेल तिथून ती पुस्तकं आणायचो. एकेका दिवसात (म्हणजे, बाकी उद्योग करतच) दोन-दोन पुस्तकं संपायची. त्या बदल्यात घरी ओरडणी खाल्ली आहेत - "असली पुस्तके काय वाचतोस?" ज्याला साहित्य म्हणतात, तेही वाचलं. पण त्याविषयी काही लिहावं असं ते वय नाहीच. तेव्हा आपलं ते वाचायचं इतकंच महत्त्वाचं असायचं. सर्वाधिक तिटकारा असलेली पुस्तकं - शालेय! ;)
  • Log in or register to post comments

हे आणखी एक आले. :)

धमाल मुलगा
Mon, 05/03/2010 - 19:51 नवीन
>>त्यातही शिलेदार कथा हमखास. कॅप्टन दीप, लेफ्टनंट शेख, हवालदार कदम, जंगम आणि पाचवा... कोण? आठवेना आत्ता.. रिबेलो का हो? च्यायला मलाही आठवेना आता. >>सर्वाधिक तिटकारा असलेली पुस्तकं - शालेय! ++++++१ ही:ही:ही: त्यात वाचण्यासारखं असायचं ते काय? फारतर फार इतिहासाच्या पुस्तकातल्या चित्रांना दाढीमिश्या काढायचा उपयोग ;) अवांतरः ह्यावरुन इयता सातवीत(की सहावीत..) असताना मराठीच्या पुस्तकात 'शिरगणती' हा धडा होता त्याचं दोन पानी चित्र होतं त्यात कॉमिक्समधल्यासारखे प्रत्येकाच्या डोक्याशी डायलॉग्ज बबल टाकुन स्वतःची अक्कल चालवुन लिहिलेले संवाद आठवले =)) ते इतकं हिट्ट झालं की आजुबाजुच्या वर्गातली पोरंही पुस्तक मागायला यायला लागली...कोण्या नतद्रष्टानं ते पुस्तक सरळ मुख्याध्यापकांच्या हातात ठेवलं... :( :( :( शाळेत त्यांचा मार..घरी आल्यावर पिताश्रींचा... (आमच्यातल्या एका भावी कॉमिक्सवाल्याचा अकाली मृत्यु झाला तो हा असा. :D )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

आणि गरुड कथा ?

सातबारा
Mon, 05/03/2010 - 23:08 नवीन
कॅप्टन दीप बरोबर ती मारीया लोबो पण .. शिवाय गरुड कथा पण असायची. त्यात त्याने फेल्ट हॅट पुढे ओढली की, चेहर्‍यावर लाल भडक चोच यायची म्हणे, मग तो अंगात आल्यासारखी मारामारी करायचा. आता हसू येते, की तो गरूड होता की पोपट ? पण त्या वयात माझा जाम विश्वास होता. आणि अर्नाळ्करांचा झुंजार ! त्याचा तो झुंजार महाल, त्यातीला असाच वीस की बावीसाव्या मजल्यावरचा स्विमींग टँक, त्याची सेक्रेटरी इ. आणि तो कायम ब्यूक गाडी वापरायचा. हे ब्यूक काय असते याचे जाम कुतूहल होते. बाकी तो वेताळ, त्याची कवटी गुहा, त्याचा तुफान आणि वाघ्या, त्या जंगलातील म्हणी, आणि ढोलांद्बारे पाठविले जाणारे संदेश खासच. वेताळाबरोबरच मॅंड्रेक पण. चौथी ते सातवी बर्‍याच वेळेस मी पायी जावून बसचे पैसे वाचवायचो. ज्ञानेश्चर चौकात एक रद्दीचे दुकान होते, तेथे हे इंद्रजाल कॉमिक्स आणि गुरुनाथ नाईक, अर्नाळकर यांची पुस्तके रद्दीत आलेली असत. त्याच्याशी सेटींग लावून नियमीत पणे ती पुस्तके घ्यायचो. पुस्तक वाचत वाचत चालत घरी. दोनदा वाटेतल्या खांबाला धडकलो तेव्हा सवय जरा कमी झाली. शिवाय मॅजेस्टीक ग्रंथ प्रदर्शनात यापायावरचे त्या पायावर असे उभे राहून तर किती तरी पुस्तके वाचली. आणि विश्रामबागवाड्याचे शासकिय विभागीय ग्रंथालय जणू दुसरे घरच ! असो. बिकाशेठ, काय मस्त विषय काढला राव तुम्ही ..! --------------------- हे शेतकर्‍यांचे राज्य व्हावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

मॅजेस्टिक ...

sagarparadkar
Tue, 05/04/2010 - 17:40 नवीन
>> शिवाय मॅजेस्टीक ग्रंथ प्रदर्शनात यापायावरचे त्या पायावर असे उभे राहून तर किती तरी पुस्तके वाचली. << अरे हो ... मी तर ह्या मॅजेस्टिक्च्या समोरच राहत असे. मग उन्हाळ्याच्या सुट्टीत दिवसभर एका पायावर उभे राहुन वाचन आणि सन्ध्याकळी त्या सुप्रसिद्ध "मॅजेस्टिक गप्पा" ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सातबारा

कायुम तांग्राकुलियेव्ह.

खंडेराव
गुरुवार, 03/05/2015 - 16:58 नवीन
कायुम तांग्राकुलियेव्ह. तेव्हाच्या सोव्हिएतमधून प्रगती प्रकाशनाची पुस्तकं यायची.
नाव वाचुन २०-२५ वर्ष मागे गेलो.. मी या सोवियत पुस्तकांचा वेडाच होतो. घरी अजुनही जपुन ठेवली आहेत. ग्रह आणि तार्याविषयी, माणुस बलाध्य कसा बनला आणि कैक इतर. कायुम तांग्राकुलियेव्हचे सोनेरी प्याला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

सगळ्यात आवडलेली मराठी कादंबरी आहे रणजीत देसाईंची "स्वामी"

सुधीर काळे
Mon, 05/03/2010 - 19:53 नवीन
मराठी पुस्तके खूप वाचली, पण मला सगळ्यात आवडलेली मराठी कादंबरी आहे रणजीत देसाईंची "स्वामी"! किती वेळा वाचली? अगणित वेळा. कुठूनही सुरुवात केली तरी वाचकाला खिळवून टाकते..... 'समग्र पुल' व 'वपुं'ची पुस्तकं-गोष्टी-कथाही मस्त. माझे इंग्रजी वाचन सुरू झाले अर्ल स्टॅन्ली गार्डनर यांच्या 'पेरी मेसन' कादंबर्‍या वाचून! पण खरी डौलदार इंग्रजी भाषा मी वाचली ती जेम्स हेडली चेसच्या कादंबर्‍यांत. १९६०१९५०-१९६०च्या काळात लिहिलेल्या या पुस्तकांतील इंग्रजी भाषा आजही मला मॉडर्न वाटते! इंग्रजी भाषेतील लवचिकपणा मला त्यांच्या लि़खाणात पहिल्यांदा जाणवला व आजही मला त्यातली इंग्रजी भाषा आवडते! त्यानंतर माझ्या इंग्लिश भाषेवर संस्कार केले 'टाईम' या नियतकालिकातील भाषेने. आजचा सर्वात आवडता इंग्रजी लेखक आहे टॉम क्लॅन्सी. बिपिन यांच्या लेखाने हे लिहावे असे वाटले. नंतर सवडीने अधीक लिहीनही! सुधीर काळे, या आठवड्यात तलाहासी, फ्लॉरीडा येथे बहिणीकडे! ------------------------ 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9
  • Log in or register to post comments

काही वर्षांपूर्वी

रामदास
Wed, 05/05/2010 - 10:49 नवीन
चेसच्या पंच्च्यांशी कादंबर्‍या माझ्या संग्रहात होत्या. नो ऑर्कीड्स फॉर मिस ब्लँडीश ही फार आवडती कादंबरी होती. Mark Girland नायक असलेल्या सगळ्या कादंबर्‍या आवडायच्या. भावुक होण्याच्या वयात वपु पण आवडले होते. पुलंच्या असा मी असामी च्या शेवटच्या सहा सात ओळी फ्रेम करून टेबलावर ठेवल्या होत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

मला भरपूर

अरुंधती
Mon, 05/03/2010 - 19:56 नवीन
मला भरपूर लिहायचंय ह्या विषयावर..... अगदी खुलं कुरण आहे चरायला, पण तूर्तास थोडी गडबडीत आहे.... जरा रात्री निवांत पोस्ट करेन आतापर्यंतच्या ''वाचनखुणा''!! धागा मस्त आहे....खूप दिवस मनात ह्यावर काहीतरी लिहायचे घोळत होते, आता आयती संधी मिळाली आहे!!! :D अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

वाचन चांगल

शानबा५१२
Mon, 05/03/2010 - 20:00 नवीन
वाचन चांगल असत.जे नाही वाचत ते आपलीच खोटी करत फीरतात साले.......... आज एक भेटलेला तसाच &$&$#&%@#! ************************************************* देवाने सर्व गोष्टींची एक वेळ ठरवलेय हेच सर्वात मोठ सत्य आहे! ते आज मला "ओर्कुत" व "फचेबूक" वर जे सापडल्/भेटल्/मिळाल त्यावरुन पुन्हा एकदा कळल.
  • Log in or register to post comments

माझी पहीली

शुचि
Mon, 05/03/2010 - 20:01 नवीन
माझी पहीली कादंबरी - ययाती (यत्ता ४ थी :SS ) पण मला अतोनात आवडलेली. दक्षता, शतायुषी, मेनका, माहेर अगदी दर दिवाळीला चांदोबा दर महीन्याला अमर चित्रकथा ठीक ठीक आवडायच्या. पण जयवंत दळवी, जीए, गंगधर गडगीळ, मिरसदार, काळे हे सगळे जीव का प्राण. विशेषतः जयवंत दळवी खूप आवडायचे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
  • Log in or register to post comments

छंद आपल्या

मेघना भुस्कुटे
Mon, 05/03/2010 - 20:14 नवीन
छंद आपल्या पिंडधर्माइतकेच आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवरही अवलंबून असतात, अशाच आशयाचं बोलणं नुकतंच माझ्या रूममेटशीही झालं. इतक्या स्वस्त लायब्रर्‍या आसमंतात असताना, तुला वाचायला आवडत असतानाही तू का नाही वाचायला लागलीस असा माझा तिला प्रश्न होता. त्यावरची तिची उत्तरं ऐकताना आणि त्याच्याशी - मी आतापावेतो सर्वसाधारण म्हणून गृहित धरलेले - माझे अनुभव ताडून पाहताना माझ्या असं लक्षात आलं, की ’माझा’ छंद असं मी निर्लज्ज अभिमानानं म्हणते खरी. पण त्यात माझ्याखेरीज इतर अनेक जणांचं मोठंच ऋण आहे. मला वाचायला आवडतं. पुढे पुढे निरनिराळ्या लायब्रर्‍या हुडकणं, कुणाकुणाकडे निर्लज्जपणे पुस्तकं उसनी मागणं, कमवायला लागल्यावर जमतील तशी विकत घेणं हे मी केलं, करतेच. पण अगदी लहानपणी मला अक्षरओळखही होण्याआधी माझ्याकडे गोष्टींची पुस्तकं होती. ’१२० गोष्टी’. ’हितोपदेश’, ’इसापच्या नीतिकथा’ ही पुस्तकं तर मला स्पष्ट आठवतात. साधारणपणे एफोर साइझपेक्षा थोडी रुंद, पण तितकीच उंच ही पुस्तकं होती. माझ्या हातांत तेव्हा ती मावतही नसत. पण आई-बाबा-एक लांबची आजी यांनी अनेक वेळा त्यांतल्या गोष्टी वाचून दाखवल्यामुळे, सांगितल्यामुळे गोष्टी मात्र मला पाठ असत. आणि तरीही त्या मला पुन्हा पुन्हा ऐकायच्या असत. मग त्यांतलं एखादं पुस्तक हातांत उघडून अक्षरश: भीक मागितल्यासारखी ’आता फक्त एकच गोष्ट... दाखव ना वाचून’ असा धोशा लावत मोठ्या माणसांच्यामागे भुणभुण केल्याची स्पष्ट आठवण मला आहे. माझी पुष्कळदा निराशा होत नसे. बिपिनप्रमाणेच माझ्याही घरी अगदी लहानपणापासून माझ्याकरिता बरीच लहान मुलांची मासिकं येत. किशोर, आनंद, चंपक, ठकठक, चांदोबा, कुमार, किशोर... आणि दिवाळीत यांतल्या बर्‍याचश्या अंकांचे दिवाळी अंकही. दिवाळी अंकांची ओळख मला तेव्हापासून आहे! हे अंक मी आत्ताआत्तापर्यंत ठेवले होते. तसेच आमच्या शाळेचे ग्रंथपाल, अण्णा तेंडुलकर. बाबांशी असलेल्या त्यांच्या परिचयामुळे मला विशेष सवलत असे. कितीही पुस्तकं, कितीही दिवाळी अंक घरपोच मिळत. फक्त आमच्याच शाळेत नव्हे, आमच्या शाळेच्या इतर शाखांच्या लायब्रर्‍यांतूनही (मला माहीत आहे हा चुकीचा शब्दप्रयोग आहे, पण मी त्या शब्दाचं सामान्यरूप करून त्याला मराठीच केलं आहे!) मला मुक्तद्वार असे. शाळेच्या लायब्रर्‍यांचा मी पुरेपूर वापर केला, आणि अजूनही अधूनमधून करते. स्वत: निवृत्त झाल्यावर एकदा कधीतरी अण्णा घरी आले होते. दिवाळी अंकांसाठी आईबाबांकडे भुणभुण करण्याची वेळ आणि त्यांच्या येण्याची वेळ एकच आली. तेव्हापासून ते अगदी आत्ताआत्तापर्यंत, अगदी मी पैसे कमवायला लागेपर्यंत, आईबाबांना न जुमानता दर दिवाळीला अण्णा खास दिवाळी अंकांसाठी मला हौसेनं पैसे देत होते. (आणि मी निर्लज्जपणे घेत होते!) मला पुस्तकं सतत हवीच असत. त्यामुळे वाढदिवसाला, बक्षीस म्हणून, खाऊ म्हणून मला पुस्तकंच मिळत. कितीतरी वेळा कामावरून येताना बाबा अनपेक्षितपणे पुस्तक घेऊन येत आणि माझ्या हातात देत. त्यातला आनंद वेगळाच. त्यांचं वाचन खरं तर वर्तमानपत्रापुरतं मर्यादित. आईचंही वाचन होतं, आहे. पण ते मासिकांपर्यंत - कादंबर्‍यांपर्यंतच. काहीसं ’बायकी’. पण असं असूनही, फारसे पैसे नसूनही त्यांनी हे लाड पुरवले खरे. तसंच सिनेमा-नाटकंचही. लहानपणापासून उन्हाळी सुट्ट्या आणि दिवाळीच्या सुट्ट्यांत आमच्या चाळीतल्या लहान मुलांची वरात नाटकाला निघे. तिकिटं बाबा आधी काढून आणत. मग येतील त्या सगळ्या बालनाट्यांना ’आम्ही एकटे जाणार’ करत आम्ही सगळी चाळीतली पोरं, नाट्यगृहापर्यंत बाबा सोडायला, खाऊला ’स्वतंत्र ५ रुपये’ आणि येताना ’एकट्यानं रस्ते क्रॉस करून’ आम्ही घरी! रंगायतनच्या एसीचा वास, तिथला तो गूढ-रंगोन्मादी-मोहक पडदा आणि तिथला अंधार यांची भूल मला तशातच कधीतरी पडली असणार. कितीतरी नाटकांची पुढची आणि मोक्याची तिकिटं मिळावीत, म्हणून बाबा सकाळी सहा वाजता रंगायतनमधे रांग लावायला गेलेलेही आठवतात. एकदा तर ऐन सहामाही परीक्षेत ’उद्या नाहीतरी मराठीचाच पेपर आहे, आणि आदल्या दिवशी कुठे होतो अभ्यास’ असं म्हणून मी सहकुटुंब नाटकाला गेल्याचंही मला आठवतं. पुढेही अभ्यास या गोष्टीवरून पुरेसा आरडाओरडा होऊनही, मला सिनेमाला जाताना अपराधी म्हणून कधी वाटत नसे, ते त्यामुळेच असणार! ’चांगला सिनेमा एकदा बघून थोडाच पुरतो? परत बघितल्यावर निराळा आवडतो’ असा युक्तिवाद करून मी आईकडून एकच सिनेमा तिसर्‍यांदा बघायलाही पैसे उकळले होते आणि कमाल म्हणजे तिनं युक्तिवाद पटल्यावर नाईलाजानं दिलेही होते! ’१९४७ अर्थ’ मला कसंही करून पाहायचाच होता. मित्रमैत्रिणी इतके सिनेमे पाहतच नसत. शिवाय त्यात ’तसे’ सीन्स होते! ’उद्या सिनेमा जाईल, आता फक्त गुरुवार रात्रीचा शो आहे’ म्हणून मी तारांगण केल्यावर बाबा माझ्यासोबत रात्रीचा शो पाहायला आले आणि झोपले. मी सिनेमा संपल्यावर त्यांना उठवलं आणि मग मी आमीरच्या नजरेतलं ते श्वापद आठवत मंत्रचळ्यासारखी घरी आले. असे किती सिनेमे... मैत्रिणींसोबत सिनेमाला जाणं मला कितीतरी दिवस अपरिचितच होतं. उलट त्यांच्यासाठी न थांबता विश्वासघातकीपणे मी पहिल्या संधीला सिनेमा पाहिलेला असणे, हाच आमच्यातल्या भांडणाचा मुद्दा अजूनही असतो. आता या सगळ्याबरोबरच, मला ट्रेकिंग आवडत नाही, मुळात मला विषामृतही खेळायला आवडत नसे, शाळेतली पीटीची परीक्षा देतानाही मी फाफलत असे... या सगळ्यालाही माझ्या ’बश्या’ पिंडाइतकंच माझं भोवतालही कारणीभूत आहे; असं वाटल्यामुळे मला दिलासा मात्र वाटतो आहे!आणि उच्च अभिरुची म्हणे ’माझी’! हे सगळं आठवायची संधी दिल्याबद्दल बिपिनदांचे मात्र मनापासून आभार.
  • Log in or register to post comments

छान!

सुबक ठेंगणी
Mon, 05/03/2010 - 20:48 नवीन
बिपिनदा किंवा इतर काही प्रतिसादकांसारखं तहानभूक विसरून वाचन मी केलेलं नाही हे आधी नमूद करते. मलाही वाचनाची सवय बाबांनी लावली. आमच्याकडेही कानाकोप-यात पुस्तकं आहेत. इतकी की त्यांच्यासाठी वेगळं घर घ्यायला लागेल की काय असं वाटायचं. अजूनही कुणाच्या घरी गेलं आणि पुस्तकं दिसली नाहीत की मला फार परकं वाटतं. लहान असताना आम्हाला वाचनाची आवड लावण्यासाठी बाबा निरनिराळ्या क्लुप्त्या करत. ब-याचदा अर्धीच गोष्ट वाचून एखाद्या सुरस वळणावर "आता मी नाही वाचून दाखवणार पुढे! " असं जाहीर करत आणि मग रात्री झोप नीट लागणार नाही म्हणून पुस्तक वाचलं जाई. :) पुढे मोठी झाल्यावर जाणवलं की पुस्तकातून मिळणारा आनंद हा माझ्यासाठी एखाद्या नव्या जगात गेल्याचा आणि नवीन माणसांना भेटल्याचा होता. तोच आनंद भटकंती, ट्रेकिंग ह्यातूनही मिळतो असं कळल्यावर त्याचीही आवड लागली. नुसती भटकंतीच नव्हे पण त्याआधीचं प्लानिंग, कमीतकमी बजेटमधे सगळं बसवण्यासाठीची शोधाशोध, जिथे जाणार तिथली माहिती गोळा करणे हे सगळं करण्यात थ्रिल वाटायला लागलं. आजकाल वाचनाची उपासमारच होते. त्यामुळे सध्या भटकंतीच्या वेडाने जोर धरलाय. त्याचबरोबर काहीही नवीन करायला कधीच नाही न म्हणणा-या आईबाबांची खूप आठवण येते आहे.
  • Log in or register to post comments

.... चुकून टाकलेले उत्तर काढून टाकले आहे.

जयंत कुलकर्णी
Mon, 05/03/2010 - 22:09 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबक ठेंगणी

उत्तम धागा

राजेश घासकडवी
Mon, 05/03/2010 - 21:00 नवीन
अतिशय छान चर्चा. मूळ लेखातले आणि प्रतिसादकर्त्यांचे वाचनाविषयीचे अनुभव वाचून अगदी आपली माणसं भेटल्यासारखं वाटलं. वाचनाच्या बाबतीत थोड्याफार फरकाने माझे अनुभव असेच आहेत. एका हातात पुस्तक धरून दुसऱया हाताने चेंगटासारखं जेवण चिवडायचं, अंधूक प्रकाशात खडखडत्या बसमध्ये 'अरे चष्मा लागेल अशाने' असा ओरडा खात वाचायचं, रस्त्यातून चालताना पुस्तक हातातच घेऊन वाचत जायचं... मग काय वाचतोय याने तितका फरक पडत नाही. ही आवड आमच्या आईवडलांनी जोपासलेली. बायकोसुद्धा त्याच पठडीतली. आता आमचा अडीच वर्षांचा मुलगासुद्धा ते पाय पाळण्यात दाखवतोय - वाचत नाही पण आमच्या मागे त्याची पुस्तकं घेऊन बसून पुन्हा पुन्हा गोष्टी सांगायला लावतो. इतक्या वेळा की आम्हाला वाचवा म्हणण्याची पाळी येते... मी ठरवलं होतं की सगळ्यांनीच वाचनाविषयी लिहिलं आहे तर आपण काहीतरी वेगळं लिहावं. वाचन हा प्रचंड मोठा छंद. माझी चित्रकला तशी बरी होती, त्यात पाचवीच्या सुमाराला मासिकावरची चित्रं काढायचा छंद लागला. मिळेल त्या कागदाच्या चिठोऱ्यावर ती चित्रं काढलेली होती. सुरूवातीला जमत नसत तेव्हा सगळे म्हणायचे, 'अरे, डोळे चुकलेयत'. खरं तर इतर काहीतरी प्रमाणं बरोबर नसायची. पण ते ऐकून मला गंमत वाटायची. पुढे चांगली चित्रं जमायला लागल्यावर मग मात्र थोडंसं चुकलेलं असलं तरीही 'छान आलंय' अशी प्रतिक्रिया यायची.... नंतर परीक्षा तोंडावर आलेली असताना खूप चित्रं मोह घालायची. आणि मग मी अभ्यास सोडून चित्र काढत बसायचो. स्केचिंग आताशा मागे पडलंय, कधीतरी पुन्हा सुरू करेन. पण सगळ्यांत ज्या छंदाने आयु्ष्य बदललं तो म्हणजे गणिताचा. आमच्या बाबांनी मला रविवारी दुपारी गुंतवून ठेवण्यासाठी गणितं घालायला सुरूवात केली. ती तोंडीच सोडवायची. त्यामुळे आकड्यांशी खेळणं हा एक मोठा विरंगुळा होता. इतर छंद जोपासायला सुद्धा त्याची मदत झाली, कारण दहावीपर्यंत अभ्यास करण्याची काहीच गरज नव्हती. कोडी सोडवणं हा असाच छंद. लहानपणी बुद्धीबळ बरं खेळायचो, अमेरिकेत आल्यानंतर वर्ष-दीड वर्ष त्याने झपाटलेलं होतं. तेही आता बॅकग्राउंड इन्फर्मेशन म्हणून आहे. तसे इतर बारीकसारीक छंद बरेच आहेत. पण मला वाटतं छंद असणं हा एका जास्त मोठ्या प्रवृत्तीचा परिपाक आहे. ती म्हणजे कुठच्या तरी अचेतन वस्तूंमध्ये, रममाण होऊन जाणं, गुंगून जाणं. इतर मित्रमंडळींप्रमाणे खेळायचो वगैरे अर्थातच, पण पुस्तकं, चित्रं काढणं अधिक प्रिय. याचं मुख्य कारण मला वाटतं म्हणजे अशा गोष्टींनी गुंगून जाण्याची, तहानभूक हरपण्याची, काहीवेळा अतिरेक करून जगापासून तोडून घेण्याचीही... प्रवृत्ती. बिपिननी म्हटलेलं आहे की मी वाचनामुळे असा झालो. मला वाटतं या प्रवृत्तीमुळे हे छंद बळावतात. राजेश
  • Log in or register to post comments

छंदाला

शुचि
Mon, 05/03/2010 - 21:33 नवीन
छंदाला वाहून घेणं, त्यात रमून जाणं, देहभान हरपून , स्व विसरून झपाटून जाणं यासारखी सुंदर गोष्ट नाही. छंदांचे वैद्यकीय फायदे जरूर असणार. घासकडवी यांचा प्रतिसाद नेहेमीप्रमाणे सुरेख. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

पुस्तक खाण्याचं खूळ

भोचक
Mon, 05/03/2010 - 21:19 नवीन
काही दिवसांपूर्वीच या विषयावर लिहिणं झालं होत, त्यामुळे त्याचीच लिंक इथे देतोय. तरीही त्या लेखापलीकडे जाऊन सांगण्यासारखं बरंच आहे. वेळ मिळाला की सविस्तर लिहिनच. (भोचक) महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव
  • Log in or register to post comments

व्वा बिका...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/03/2010 - 21:32 नवीन
बिका, आपलं पुस्तक प्रेमाचा प्रवास मस्तच. बाकी, प्रतिसादही आवडलेत. वेळ मिळाल्यावर आमच्याही पुस्तक प्रेमाबद्दल खरडतो..! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सुशि ला कोणी ओळ्खत नाही वाटते ?

अश्फाक
Mon, 05/03/2010 - 21:43 नवीन
सुशि ला कोणी ओळ्खत नाही वाटते ? दुनियादारी - कितिहीदा वाचा , कुठुनही वाचा एव्हरग्रीन
  • Log in or register to post comments

बास का...बास

धमाल मुलगा
Mon, 05/03/2010 - 22:01 नवीन
बास का...बास का...बास का भौ????? सुशिशिवाय आणि त्याची दुनियादारी वाचल्याशिवाय कुणी कॉलेजचं आयुक्ष पार करु शकतो का? :D च्यायला... सु शि म्हणजे द बेश्ट..द गिरेट ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अश्फाक

!

मुक्तसुनीत
Mon, 05/03/2010 - 22:03 नवीन
रमो व्हिस्को नही तो खिस्को.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

'दुनियादारी' आवडते?

संदीप चित्रे
Mon, 05/03/2010 - 22:34 नवीन
'दुनियादारी' म्हटलं की माझा हा लेख पुन्हा एकदा देण्याचा मोह आवरत नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अश्फाक

सुरेख

प्राजु
Mon, 05/03/2010 - 21:48 नवीन
सुरेख धागा.. वाचनाची (आणि काही प्रमाणात लिखाणाची सुद्धा) आवड अगदी लहानपणापासून. हिमगौरी सात बुटके, गुहेतला ससा.. अशा गोष्टींपासून सुरूवात होऊन.. कॉमिक्स, चाचा चौधरी, चांदोबा वगैरे वाचत वाचत, मग सुहास शिरवळकर, वि स खांडेकर, शिवाजी सावंत,इरावती कर्वे यांच्यासोबतच कुसुमाग्रज, इंदिरा संत वाचून झाल्या. आईच लेखिका त्यामुळे घरात पुस्तकेच पुस्तके. कॉलेज मध्ये मात्र काही प्रमाणात कमी झालं वाचन. पण आता इथे सुद्धा अमेरिकेत २० च्या वरती पुस्तके आहेत माझ्याजवळ. शिवाय मित्रमैत्रीणींकडून आणलेली वेगळी. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments

पुस्तके

sagarparadkar
Tue, 05/04/2010 - 18:02 नवीन
>> ...शिवाय मित्रमैत्रीणींकडून आणलेली वेगळी. ... << ही मित्र-मैत्रिणिन्कडून आण्लेली पुस्तके परत कर्ण्याची माझी पद्धतच नव्ह्ती. पुधे पुधे ते विसरुन जात कि आप्लेच एखदे पुस्तक ह्याने नेले आहे ... मग मी नव्या जोमाने पुस्तके मागाय्ला तयार ... काही मित्रन्ची तर इन्गिनियरिन्ग्ची पुस्तके पण अशीच माझ्याकडे येउन स्थिराव्लेली आहेत ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

वर अणेक

टारझन
Mon, 05/03/2010 - 23:54 नवीन
वर अणेक लेख आलेले आहेत :) त्यात बिपीनचाही एक दिसतोय ;) मस्त लिहीलंय :) आपल्याला काही एवढं क्रेझ नव्हतं वाचनाचं :) आपण ठकठक , नागराज (डायमंड पब्लिकेशण्स ची सगळी कॉमिक्स) चांदोबा , अकबर आणि बिरबल , टारझन-द एप मॅण एवढाच आपला शौक ... बाकी उगाच "प्रतिसादात लेख" पाडण्याइतकं काही नाही ;) - वाचिन भुतासार्खे
  • Log in or register to post comments

>>बाकी उगाच

धमाल मुलगा
Tue, 05/04/2010 - 18:03 नवीन
>>बाकी उगाच "प्रतिसादात लेख" पाडण्याइतकं काही नाही हाय कंबख्त तुने पी ही नहीं... :) वाच टार्‍या, वाच...मग बघ कसं तुही भरभरुन लिहिशील पुस्तकांच्या आवडीबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

आर्रर्रर्र

राजेश घासकडवी
Wed, 05/05/2010 - 13:12 नवीन
टारझनसाहेब, आजकाल तुमची सही विडंबणं आर लीव्हींग अ लाट टू बी डिझायर्ड बरका... सध्या काही टेण्शणमध्ये वगैरे आहात का? जे काय असेल ते होईल व्यवस्थित पण तुमच्या कलेवर असा परिणाम होऊ देऊ नका... काही काळ संण्यास घ्या हवा तर, पण तुमच्या लेखणीतून अशी केविलवाणी विडंबणं आली की हृदय गलबलून जातं. आता वाचिन भुतासार्खे हे बिपिन कार्यकर्तेच्या वृत्तात बिलकुलच बसत नाही. तुमचं विडंबण 'लिहिण आर्धमुर्धे' झालं. 'सहित पाट्याभर्ते'ही म्हणता येईल कदाचित. ते अगदीच 'दाणकन' पाडलं होतं का, या प्रतिसादासारखं? 'रिडिंग जास्तबूके' कसं वाटतं? किंवा तुम्हाला स्वत:ला उद्देशून म्हणायचं असेल तरी 'हितिण वाच्लिफक्त' कसं काय? किंवा तुम्हा स्वत:विषय़ीच 'उगिच काड्याकर्ते' हेही काही वाईट नाही. 'बरिक पिंकमार्ते' कसं काय वाटतं... 'लिहिन सहीपुर्ते' ही बरं आहे, म्हणजे प्रतिसादात लेख लिहायचा नाही म्हणून.... अजून हवी असल्यास सांगा... राजेश घासकडवी (वा, बरं वाटलं वाचायलाच. हे नाव बिनविडंबणाचं बघण्याचीच सवय नाही...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हा हा हा ....

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 05/05/2010 - 13:22 नवीन
"कलेवर" या शब्दाची अंमळ मौज वाटली! बाकी चालू द्या! ;-) शब्देश मौजवाटवी (हे बळचकर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

आजकाल

टारझन
Wed, 05/05/2010 - 22:10 नवीन
आजकाल तुमची सही विडंबणं आर लीव्हींग अ लाट टू बी डिझायर्ड बरका...
:) :) :) - टारेश नावंपाडवी
सध्या काही टेण्शणमध्ये वगैरे आहात का? जे काय असेल ते होईल व्यवस्थित पण तुमच्या कलेवर असा परिणाम होऊ देऊ नका...
हाहाहा .. आम्हाला टेण्शण्स आहेत , तोवर स्वतःला फाट्यावर मारुन घ्या ... आणि जे असेल ते व्यवस्थित करूच करु :) आमच्या कलेची एवढी चिंता पाहुन डोळे मात्र पाणावले =)) - चिंतेश डोळेपाणवी
काही काळ संण्यास घ्या हवा तर, पण तुमच्या लेखणीतून अशी केविलवाणी विडंबणं आली की हृदय गलबलून जातं.
=)) =)) भलतेच विणोदी की हो तुम्ही !! टारझन ने कधी कोणाला काय वाटलं ह्याची काळजी केली नाही =)) बाकी तुमच्या नावांची सोलपटे काढल्यावर सुमाने ४५ व्यनि आणि ५०+ चॅट पिंग्ज मात्र आल्या बरंका =)) ते "कोल्गेट दातकिडवी" ,"हळुच गाजरहलवी" इत्यादीने आम्हाला वैयक्तिक मौज वाटली =)) बाकी तुमच्या त्या लेंड्या पाडल्यासारख्या कविता आणि दोन परिच्छेद वाचेस्तोवर घोरायला लावणारे लेख ही खुप खुप छाण असतात बरंका =)) - काव्येश बाराकडवी उर्फ लेखेश झोपउडवी
आता वाचिन भुतासार्खे हे बिपिन कार्यकर्तेच्या वृत्तात बिलकुलच बसत नाही.
=)) बरं बरं - टारेश वृत्तमोडवी
तुमचं विडंबण 'लिहिण आर्धमुर्धे' झालं. 'सहित पाट्याभर्ते'ही म्हणता येईल कदाचित. ते अगदीच 'दाणकन' पाडलं होतं का, या प्रतिसादासारखं?
ह्म्म .. जळजळ पोचली !! - इनोश जळजळवी
'रिडिंग जास्तबूके' कसं वाटतं? किंवा तुम्हाला स्वत:ला उद्देशून म्हणायचं असेल तरी 'हितिण वाच्लिफक्त' कसं काय? किंवा तुम्हा स्वत:विषय़ीच 'उगिच काड्याकर्ते' हेही काही वाईट नाही. 'बरिक पिंकमार्ते' कसं काय वाटतं... 'लिहिन सहीपुर्ते' ही बरं आहे,
स्तुत्य प्रयत्न , सरावाने कदाचित सराईतपणा येऊ शकेल. :) - टारेश ट्रायमारवी
म्हणजे प्रतिसादात लेख लिहायचा नाही म्हणून..
आहो लाजता काय ? लिहा की लेख प्रतिसादांत =)) - लाजेश गाशकलवी
अजून हवी असल्यास सांगा...
हो हो ... णक्की सांगतो बरंका =)) - मागेश फुसकारवी
राजेश घासकडवी (वा, बरं वाटलं वाचायलाच. हे नाव बिनविडंबणाचं बघण्याचीच सवय नाही...)
खुलाश्याबद्दल धण्यवात - बुडेश लालकरवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

जमत असतील तर...

राजेश घासकडवी
Wed, 05/05/2010 - 22:39 नवीन
बिपिन कार्यकर्तेंची सहि विडंबणं ठीक करा म्हणून सांगितलं. तर ते सोडून तुमची रेकॉर्ड भलतीकडेच अडकलेली दिसते... वृत्ताची तक्रार तुम्हीच केली होतीत म्हणून आपलं दाखवून दिलं. असो, तुम्हाला जी टेण्शणं आहेत त्यापासून लवकर तुमची सुटका होवो ही प्रार्थना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हो का ?

टारझन
Wed, 05/05/2010 - 22:46 नवीन
हो का ? आम्ही पण बिपींदांच्या सहि विडंबणांविषयीच बोललो की !! तुम्ही का धावतं गाढव ओढवुन घेताय ? आय मीन आमच्या रेकॉर्डची काळजी करताय ? :) बाकी तुम्हाला नक्की आमच्या टेण्शण्स ची काळजी आहे की सहि विडंबणांची ? जरा "बेस पक्का करा " =)) - खोलेश जन्मकुंडली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

दोघांनाही समज!

चतुरंग
Wed, 05/05/2010 - 22:56 नवीन
खव आणि व्यनितून भांडता येऊ शकेल! चांगल्या धाग्याचा विचका नको. (अन्यथा वरचे लाघवी संवाद उडवून टाकावे लागतील. ;)) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

प्रकाटाआ.

मनिष
Tue, 05/04/2010 - 11:25 नवीन
प्रकाटाआ.
  • Log in or register to post comments

छंद

sur_nair
Tue, 05/04/2010 - 01:34 नवीन
माझे आई -वडील बेताचेच शिक्षित व मराठी / इंग्रजी अजिबात लिहिता वाचता यायचे नाही. पण तरीही वाचन व संगीताची आवड लागली, त्याचे खुपसे श्रेय शेजारी एक कुटुंब राहायचे त्यांच्यामुळे. वाचन मराठी आणि इंग्रजी, दोन्ही तितकेच आवडीचे. पुण्यात ब्रिटीश लायब्ररीचा सदस्य होतो तर आता US मध्ये तर पुस्तकांना काही तोटा नाही. वर्षात १५-२० पुस्तकं नक्कीच वाचून होतात. इंग्रजीचा विस्तार जरा जास्त कारण त्यात सर्व जगातील संस्कृतीबद्दल वाचायला मिळते. पुलं, सुनिता देशपांडे, रणजीत देसाई, नासं इनामदार, गोनीदा, Toni Morrison , Barbara Kingsolver, William Boyd , PD James हे काही आवडीचे लेखक (चटकन आठवले ते). संगीतात हिंदुस्तानी,मराठी नाट्यगीते, भावगीते, गजल, चित्रपट संगीत आवडते. गेल्या ४-५ वर्षात हिंदुस्तानी संगीत मुद्दाम शिकलो. शिवाय इतरही छंद आहेत. लेखन, गायन, अभिनय, भटकंती, नाटक-चित्रपट पाहणे, cooking वगैरे
  • Log in or register to post comments

मस्त धागा

अरुंधती
Tue, 05/04/2010 - 04:28 नवीन
मस्त धागा आहे. अस्मादिकांचे वाचनवेड लहानपणीच दिसू लागले होते. त्यात नवलही नाही, कारण आई व बाबा दोघेही ठार वाचनवेडे!!!! आमच्या घरात त्यामुळे एकवेळ सर्वसामान्य घरांमध्ये आढळणार्‍या चीजवस्तू नसतील, पण ढीगभरून पुस्तके जरूर होती. मला आठवतंय तेव्हापासून आईबाबांनी माझ्यासाठी भरभरून गोष्टींची पुस्तके आणली आहेत. चांदोबा, किशोर, आनंद, चंपक, फुलबाग, छावा मासिके दर महिन्याला घरी यायची. त्यांचा फडशा पाडल्याशिवाय चैन नसे. काकांकडे विचित्र विश्व, ठकठक यायचे. तेही त्यांच्याकडे जाऊन वाचायचे. आमच्याकडे बाबा रशियन भाषांतरित पुस्तके घेऊन यायचे.... अशी अनेक पुस्तके वाचली. सूर्यावरचे वारे नावाचे एक सुंदर पुस्तकही होते त्यात. रशियन परीकथा, प्राणीकथाही वाचल्या. नंतर हॅन्स अ‍ॅन्डरसनच्या परीकथा, जादूच्या गोष्टी, भूत-खेत, राक्षस, पर्‍या, राजकन्या-राजपुत्रांच्या ह्या आभासी दुनियेत तर मी खूप रमत असे. सिंहासन बत्तिशी, अमरचित्रकथा, फास्टर फेणे, पौराणिक कथा वगैरे भन्नाट वाचत असे. टॉम अंकलचे केबिन ही वर्णद्वेषावर आधारित कथा त्या वयात मनास फार चटका लावून गेली. गंगा, यमुना नद्यांचा इतिहास, त्यांचे भौगोलिक, सांस्कृतिक व आर्थिक महत्त्व विशद करणारी त्याच नावाची सचित्र पुस्तकेही माझी खास आवडती होती. प्र.के.अत्र्यांच्या झेंडूची फुले व साष्टांग नमस्कारचे अनेकदा पारायण झाले. वि.वा.बोकील, गंगाधर गाडगीळांची लहान मुलांसाठीची पुस्तकेही खूप आवडायची. सुट्ट्यांमध्ये पुण्यातील साहित्य परिषद, नगर वाचनायलय, पुणे मराठी ग्रंथालय अशा ग्रंथालयात ठिय्या असायचा.... रोज सकाळ संध्याकाळ पुस्तके बदलून आणायची! शाळेच्या ग्रंथालयातूनही पुस्तके आणायचे. सकाळी उठल्यापासून रात्री झोप अनावर झाल्यावर डोळे मिटेपर्यंत सतत नाक पुस्तकात खुपसलेले असायचे. त्यामुळे अनेकदा समोरचे ताट/खाणे तसेच दुर्लक्षित राहणे, आवरायला विसरणे, अंधार पडला तरी दिवे न लावता तस्सेच अंधुक प्रकाशात डोळे ताणताणून वाचणे वगैरे प्रकार खूप केले व त्याबद्दल धपाटेही खाल्ले, पण सुधारणा नाही!!!! एका सुट्टीत मातृस्मृती ग्रंथालयाचे सभासदत्व घेतले. त्यांच्याकडे सगळी धार्मिक, पौराणिक पुस्तके! त्यातील असे अनेक खंड वाचून काढले. कथाकल्पतरु नावाचे सात खंड वाचले. सर्व पौराणिक कथा.... त्यात बरेच माझ्या वयाला अनाकलनीय काय काय [प्रौढांसाठी फक्त!] होते, मग प्रश्न विचारून घरच्यांच्या तोंडचे पाणी पळवले!!! त्या पढित ज्ञानाचे दिवे नको तिथे पाजळून अजूनच कहर केले. लिओ टॉल्स्टॉयचे वॉर अ‍ॅन्ड पीस अनुवादित पुस्तक पाचव्या यत्तेत वाचून काढले. त्यातले बरेचसे डोक्यावरून गेले ते वेगळे! शाळेत अवांतर वाचनासाठी जी जी पुस्तके असायची ती ती त्या यत्तेत प्रवेशण्याअगोदरच वाचून संपलेली असायची. स्वामी, मृत्युंजय, तुंबाडचे खोत पासून शेक्सपियर पर्यंत जे जे मिळेल ते ते वाचले. शेरलॉक होम्स तर खराच वाटायचा! शिवाय पुढच्या यत्तेची मराठी, इतिहास, इंग्रजीची पुस्तके खाऊसारखी सुट्टीतच वाचून संपवायचे. आई-बाबा बाहेरगावी गेले की त्यांना घरी परतल्यावर माझा पुस्तक टॅक्स द्यावा लागे. शिवाय वाढदिवस, खास प्रसंगाला पुस्तक भेट मिळाले की खजिना मिळाल्याचा आनंद होई. आमच्या वाड्यात तळमजल्याला बाह्य भागी एक प्रसिध्द पुस्तकांचे दुकान होते. मी अनेकदा त्यांच्याकडे पुस्तक घ्यायला म्हणून जाई, आणि तिथेच काऊंटरपाशी स्टुलावर बसून न वाचलेली नवी नवी पुस्तके वाचून काढत बसे. मग लाजेकाजेस्तव आईला तिथून एखादे पुस्तक विकत घ्यावेच लागे!! शेजारी-पाजारी ही अशीच पुस्तकांची दोन-तीन दुकाने होती. तिथेही जाऊन पुस्तकांच्या विश्वात रमण्यात, कोर्‍या पुस्तकांचे वास भरभरून घेण्यात फार मौज येई. शाळेत तर प्राथमिक मध्ये असताना आम्ही वर्गमैत्रिणींनी आपापसात पुस्तक लायब्ररीच सुरु केली होती. त्याची फी म्हणजे चॉकलेटच्या चांद्या, पिसे, शिसपेन्सिलीचे बुटुक वगैरे असायची! अशीही खूप पुस्तके वाचली. नकाशावाचन देखील खेळाच्या माध्यमातून शिकलो. वडीलांनी भारताचा एक मोठा नकाशा तक्तास्वरूपात भिंतीला लावला होता. आम्ही भावंडे एकत्र जमलो की ''गाव शोधून दाखवा'' खेळत असू.... एकाने नकाशातील एखादे गाव इतरांना ठराविक वेळेत हुडकायला सांगायचे....खूप धम्माल यायची खेळताना.... एक ऑक्सफर्डची सचित्र डिक्शनरीही होती....ज्यात मानवी शरीर, प्राणी, पक्षी, वाहने, कपडे, खाद्यपदार्थांची भांडी, अवजारे इ.इ. वर्गीकरण करून त्यांची सचित्र इंग्रजी नामे व त्याचे उच्चार, मराठी अर्थ इ.इ. दिलेले असे. त्या डिक्शनरीचाही आम्ही खेळासाठी उपयोग करत असू. त्यातील वेगवेगळे शब्द हुडकून काढायचे वगैरे. काही चिनी पुस्तकेही होती. गोंडस चित्रे, अप्रतिम रंगसंगती, अनाकलनीय भाषा/ लिपी व अतिशय सुरेख दर्जाचा कागद अशी ती पुस्तके मुळात इतकी अर्थवाही होती की त्यांना वारंवार निरखणे हा एक छंदच होता. अनेक नव्या पुस्तकांच्या धारदार कडांनी खूप वेळा हात कापला गेला आहे. नव्या पुस्तकाला कव्हर घालायचे म्हटले की मला मळमळायला व्हायचे. इतक्या सुंदर मुखपृष्ठाला का म्हणून झाकायचे???? आणि आईवडीलांनी कव्हर घालायला लावलेच तरी ते काहीच दिवसांत जीर्ण होऊन फाटायचे, इतकी मी त्या पुस्तकाला हाताळत असे, व वारंवार कव्हर उलगडून मुखपृष्ठ पाहत असे!! असो. हे सर्व वाचन साधारण इयत्ता सहावी पर्यंतचे आहे. आता पुढचे वाचन पुढच्या प्रतिक्रियेत!! हुश्श्श्श्श्श्श्श्श्श्!!!! अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

विचीत्र

शुचि
Tue, 05/04/2010 - 06:16 नवीन
विचीत्र विश्व आणि सिंहासन बत्तीशी ची छान आठवण करून दिलीस. आजोबा "सोव्हिएट युनिअन" (तेच नाव होतं वाटतं) घ्यायचे ..... मी ते पण वाचायचे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

"सोव्हिएट देश"

sagarparadkar
Tue, 05/04/2010 - 18:11 नवीन
"सोव्हिएट देश" आणि "सुर्यावर्चे वारे" अशी ती पुस्तके ... शिवाय कोलेज्मधे अस्ताना कोणाला तरी शोध लागला कि विज्ञानावर्ची रशियन प्रकाशकान्ची पुस्तके अधिक सोपी असतात .... मग ती पुस्तके मित्रन्कडून मिळ्वून वाचाय्ची ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

लेख छानच

चित्रा
Tue, 05/04/2010 - 05:13 नवीन
वरच्या बर्‍याच लोकांसारखेच अनुभव आहेत. पुस्तके वाचण्याचा मला नाद होता, आता आठवतही नाही कधी लागला ते. बहुदा घरातूनच आवड होती. नंतर सविस्तर लिहीते.
  • Log in or register to post comments

वाचनाचा छंद लागण्याचे कारण

चित्रा
Wed, 05/05/2010 - 00:34 नवीन
घरातली/शेजारची सर्वांची वाचनाची आवड असे आहे. बहुदा माझी जनुके कारणीभूत असावीत! ;) वडिल, दोन्हीकडचे आजोबा, काका, मावश्या सगळेच आपापल्या परीने भरपूर वाचत असत. आणि आम्ही भावंडेही. (आमचे एकत्र कुटुंब असल्याने सर्वांची पुस्तके राहतील अशी भिंतीतली कपाटे असलेली एक खोलीवजा जागा होती होती) - त्याला काही कारणाने आम्ही मधला पॅसेज म्हणत असू, खरे तर हा मधला पॅसेज कुठेच जात नसे! आमच्या गावी आमचे आजोबा ज्यांच्याकडे आश्रित म्हणून एकेकाळी वाढले अशा एका सद्गृहस्थांच्या घरी अक्षरशः जमिनीपासून ते वरच्या छतापर्यंत जागा मिळेल तिथे पुस्तके ठेवलेली असत, तीही सगळी त्यांच्याकडे दोन चार महिन्यांनी गेले की वाचत असे. असो. तर भरपूर वाचत होते. अगदी परिकथांपासून ते विंदा करंदीकरांच्या कविता, आणि पुल, श्रीमान योगी. इ. इ. रशियन कथा, नॅशनल बुक ट्रस्टची पुस्तके आणि इंग्रजी वगैरेही बरेच काही. माझ्या बहिणीचे लग्न ठरल्यापासून तिचे सासर जवळच असल्याने इंग्रजी पुस्तके मला तिच्या सासर्‍यांकडून मिळायला लागली. बाकी म्हणजे भाषांतरे आणि लेख, आणि मुख्य म्हणजे रोजचे चार आणि रविवारची नऊ वर्तमानपत्रे! त्यामुळे वाचनाचा छंद म्हणण्यापेक्षा माझा अविभाज्य भाग होता, पुस्तके म्हणजे. दुसरा छंद म्हणजे गाणे ऐकणे/गाणे. गायला अजूनही आवडते, पण एक दोन वर्षांपलिकडे शिकू शकले नाही, आणि आता आवाज उरला नाही. पण ऐकण्याचा प्रयत्न करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

वाचन

मीली
Tue, 05/04/2010 - 07:03 नवीन
छान पुस्तक वाचायला असेल तर दुसरे काही नको ....पुस्तकांसारखे मित्र नाही म्हणतात ना. आई ने लहानपणापासून वाचायची सवय लावली,बदली झाली तरी ती आधी लायब्ररी शोधायची मग तिच्या बरोबर मी पण पुस्तके घ्यायची .गोट्या,श्यामची आई ,पर्या नी राक्षसांच्या गोष्टीत रमायची. नन्तर मग सानिया ,स्नेहलता दसनूरकर,शैलेजा राजे,पुलं देशपांडे यांचे कथा संग्रह वाचून काढले.माहेर ,मेनका मध्ये पण छान कथा असायच्या. अनिल अवचट यांची पुस्तके पण संपल्याशिवाय चैन पडत नाही.सध्या ऋजुता दिवेकर चे पुस्तक वाचले ,डोंट लूज युवर माईण्ड,लूज युवर वेट!मस्त आहे. एखादे छान पुस्तक हाताला लागले कि झपाटून टाकल्यासारखे होते मग घरातल्या इतरांची चिडचिड पण जाणवत नाही. पण इकडे दुसर्या देशात मात्र पुस्तकांचा तुटवडा प्रकर्षाने जाणवतो.मग कोणी इकडे येणार असेल तर पुस्तके मागवली जातात.....नाहीतर नेट वर शोधाशोध. लोकसत्ता मुळे लोकप्रभा वाचायची छान सोय आहे.मिपावर पण छान लेखन वाचायला मिळते. मीली
  • Log in or register to post comments

वा..

केशवसुमार
Tue, 05/04/2010 - 07:58 नवीन
बिका मस्त लेख.. आमच्या लहानपणीच्या वाचनाच्या आवडीची आठवण झाली.. आमची वाचनाची आवड एकदम जगावेगळी होती.. आई किंवा बाबांनी वाचनालयातून पुस्तकं आणलं की ते दोन्ही बहिणींच्या आधी ताब्यात घ्यायचे..आणि वाचून होईपर्यंत ते लपवून ठेवायचे..त्यावरून भांडण पण केलीत.. आमचा वाचनाच वेग इतका प्रचंड असायचा की घरचे सगळे वैतागून जायचे.. शेवटी आमचा एक अलिखित करार झाला.. पुस्तक घरी आले आणि जर का मी सर्वांच्या आधी ताब्यात घेतले तर (की जे मी नेहमीच घ्यायचो) माझ्या बहिणींनी ते मोठ्यांने वाचायचं आणि मी आरामात लोळत ऐकायचे..पुढे इंजिनिरिंगची चार वर्षे आभ्यास असाच केला आमच्या एका मित्राला मोठ्याने वाचल्याशिवाय लक्षात राहायचे नाही.. मी त्याच्या घरी जायचो ऐकायला ...आभ्यासाला.. ;) स्वःता होउन जे काही वाचले ते सुशि च बहुदा... नंतर पाडगावकर, करंदिकर आणि बापट प्रत्यक्ष ऐकायला मिळाले आणि कवितेने पछाडले..कविता कसे एकदम आटोपशीर.. १०-१२ ओळीत खेळ खलास.. कोणी सांगितल ते पान पान.. किलो किलो वाचायला..अगदिच प्रसिद्ध पुस्तक असेल तर पहिली १-२ पने आणि शेवटची १-२.. येव्हडीच आमची साहित्य सेवा अता शिल्लक आहे..
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा