✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कुणी जाल का सांगाल का

स
संजय क्षीरसागर यांनी
Sat, 09/27/2014 - 14:14  ·  लेख
लेख
विरहाची व्यथा प्रियकरानं आणि तीही गाण्यातून सांगावी असा योग दुर्लभ. कवी अनिलांची ही अन्योक्ती अलंकारातली कविता, कोकिळेकडे संकेत करत विरहवेदना इतकी नज़ाकतीनं मांडते की नुसत्या काव्यार्थाशी जरी समत्व साधलं तरी रसिक दाद देईल. एकेक ओळ, एकेक शब्द, लयीचा असा काही तोल सांभाळत लिहीलायं की क्या कहेने! म्हणजे एक तर काव्यविषय वेगळा तरीही अत्यंत तरल, त्यात विरहाची विविधांगांनी अशी काही मांडणी की जान कुर्बान. त्यात कहर म्हणजे वसंतरांवचा चिरतरुण आवाज. जणू काही स्वतःचीच कविता असल्यासारख्या हुकुमतीनं त्यांच वेदनेची तरलता व्यक्त करणारं गाणं. जरा कालावधी सापडायचा आवकाश की वसंतराव शब्दाचं सोनं करणार. तर असं हे मराठी भावगीतांच्या रम्य बागेतलं, ज्या खाली कधीही निवांत बसून रमावं असं, एक गुलमोहराचं झाड : कुणी जाल का सांगाल का सुचवाल का त्या कोकिळा …(२) रात्री तरी गाऊ नको …(२) खुलवु नको अपुला गळा || धृ || खरं तर कोकिळा रात्री कधीही गात नाही. पण अनिलांच्या मनातली प्रियतमा त्यांना अहोरात्र घेरुन आहे. तिच्या मोहक आवाजाची जादू संध्याकाळपासनं अस्वस्थ करत होती. आता रात्री तरी तुझा आठव नको, अशी विनवणी (कोकिळेकडे संकेत करत) ते, प्रियतमेला करतायंत! रसिकानं फक्त कविशी समचित्त होण्याचा आवकाश आहे. कल्पना करा, तुम्ही एकटे आहात आणि अशा एकाकी वेळी, सखी तुमच्या मनाच्या मैफिलीत गाणं म्हणतेयं.... आणि तुमचा आर्जव असा की सखे, रात्री तरी इतकं विकल करणारं गाणं... गाऊ नकोस! रात्री तरी गाऊ नको …(२) खुलवु नको अपुला गळा || धृ || _________________________________ आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली …(२) परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली …(२) हार पुर्वीचा दिला जो श्वास साहुन वाळला .…(२) आत्ताच आभाळातला …(२) काळोख मी कुरवाळीला || १ || बरसात दोन्हीकडे आहे, बाहेर पावसाची आणि आत आठवणींची. त्यात प्रेयसी जशी जाताजाता रेंगाळावी तशी बरसात लांबलीये. इथे पुन्हा बरसात म्हणजे तीच! मग त्यावर कहर म्हणजे तिच्या चिंब चुंबनाची स्मृती! कविकल्पनेची प्रतिभा तर शेवटच्या चार ओळीत क्लायमॅक्सला पोहोचते. एकतर जातांना तिचा गजरा तीनं भेट म्हणून दिला होता, तो श्वासांचा उष्मा साहून कोमेजलायं. आणि आता तर तिचा भास इतका अंतरर्बाह्य एकरुप झालायं की ती जवळ नसतांना सुद्धा असल्यासारखी आहे. प्रियकर तिला कवेत घेऊ गेला तर रात्रीचा काळोखच कुशीत शिरलायं! कुणी जाल का सांगाल का सुचवाल का त्या कोकिळा …(२) रात्री तरी गाऊ नको …(२) खुलवु नको अपुला गळा || धृ || ________________________________________ सांभाळुनी माझ्या जीवाला, मी जरासे घेतले …(२) इतक्यात येता वाजली, हलकी निजेची पाऊले …(२) सांगाल का त्या कोकिळा, कि झार होती वाढली, .…(२) आणि द्याया दाद कोणी, …(२) रात्र जागून काढली || २ || आता जरा सावरलो तर `हलकी निजेची पाऊले' वाजली ! काय कमाल आहे कवी अनिलांच्या कल्पनेची, सो डेलिकेट! आणि शेवटाला तर ते जी काही उंची गाठतात त्याचा जवाब नाही. ती आसपास सुद्धा नाही, जे काही तिचं गाणं चाललंय ते प्रियकराच्या मनात आहे. मनातली कोकिळा गातेयं. पण तो स्मृती कल्लोळ इतका पराकोटीचा वास्तव झालायं की; आत गाणार्‍या मनाचा स्वर देखिल झारदार झालायं, अत्यंत मोहक आणि जीवघेणा झालायं. आता अशा कोकिकेळेच्या गाण्यानं हलकेच आलेल्या निजेला दूर सारुन, प्रियकर रात्रभर जागा राहिलायं, कारण इतक्या उत्कट क्षणी निजलो तर मग अशा मोहक गाण्याला दाद कोण देणार? गीत : कवी अनिल, संगीत : यशवंत देव, गायक : डॉ. वसंतराव देशपांडे
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कविता
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
23813 वाचन

💬 प्रतिसाद (76)

प्रतिक्रिया

इतक्या उत्कट क्षणी निजलो तर

काउबॉय
Sat, 09/27/2014 - 14:24 नवीन
इतक्या उत्कट क्षणी निजलो तर मग अशा मोहक गाण्याला दाद कोण देणार?
व्वा...!
  • Log in or register to post comments

श्री. क्षिरसागरांचे कौतुक

जयंत कुलकर्णी
Sat, 09/27/2014 - 14:33 नवीन
श्री. क्षिरसागरांचे कौतुक करायची पण आजकाल भिती वाटते........
  • Log in or register to post comments

जयंतराव,

संजय क्षीरसागर
Sat, 09/27/2014 - 14:42 नवीन
जो रंग असेल त्यात रंगून जा. वाद असेल तिथे तुटून पडा आणि मिठी मारायची तर सगळं विसरुन, बेहतहाशा मिठी मारा. जी गोष्ट सखीची, तीच गोष्ट जगण्याची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

@जी गोष्ट सखीची, तीच गोष्ट

अत्रुप्त आत्मा
Mon, 09/29/2014 - 00:09 नवीन
@जी गोष्ट सखीची, तीच गोष्ट जगण्याची!>>> वाह ये जिंदादिली!!! ---------------------------------------------- समांतरः- जी गोष्ट रसग्रहणाची,तीच प्रतिसादाची! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

वाह

श्रीरंग_जोशी
Mon, 09/29/2014 - 00:38 नवीन
तुमच्या या जीवनविषयक तत्वज्ञानाला सलाम. मूलतः चंचल स्वभाव असल्यामुळे व Multi-tasking करत राहण्यामुळे असे जगायला मला जमत नाही. क्वचित एखादेवेळेस जमतेही परंतु ते क्वचितच. बाकी मूळ विषय सध्या तरी फारसा कळला नाही भविष्यात कळेल अशी आशा करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

>>जो रंग असेल त्यात रंगून जा.

सूड
Mon, 09/29/2014 - 18:16 नवीन
>>जो रंग असेल त्यात रंगून जा. मान गये !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अहाहा ! सुंदर कविता निवडली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 09/27/2014 - 14:33 नवीन
क्या बात है संक्षीसेठ...! आवडली कविता आणि भावार्थ. सावरलो की प्रतिसाद लिहिन. सध्या दाद देतोय ती तुम्ही निवडलेल्या अनिलांच्या कवितेला. आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली …(२) परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली … अगं माय गं मेलो. खल्लास. ''बरसात दोन्हीकडे आहे, बाहेर पावसाची आणि आत आठवणींची. त्यात प्रेयसी जशी जाताजाता रेंगाळावी तशी बरसात लांबलीये. इथे पुन्हा बरसात म्हणजे तीच! मग त्यावर कहर म्हणजे तिच्या चिंब चुंबनाची स्मृती!'' वॉव.. मी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क दिलेत. आता पुन्हा पावसात भिजणं आलं. ''कल्पना करा, तुम्ही एकटे आहात आणि अशा एकाकी वेळी, सखी तुमच्या मनाच्या मैफिलीत गाणं म्हणतेयं.... आणि तुमचा आर्जव असा की सखे, रात्री तरी इतकं विकल करणारं गाणं... गाऊ नकोस!'' सुरेख...म्हणुन मी तिला म्हणत असतो गाणं नको म्हणु मला त्रास होतो ती ऐकत नै संक्षीसेठ. दुर आलोय तरी फोनवर गाणं म्हणतेच ती...तिला काय आपला जीव जातो इथे..कालच तिने सुर लावला होता. अशी रुसली रुक्मिनी गेली पद्मपुरात असा प्रितीचा विठ्ठल मिठी घालतो गळ्यास. अशी रुसली रुक्मिनी अशी शेजारी बसेना, असा अभीर गुलालाचा वास हिला सोसेना, -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

खरंतर खफवर `झार' चा अर्थ विचारला गेला होता

संजय क्षीरसागर
Sat, 09/27/2014 - 14:54 नवीन
आणि तो सांगतांना या कवितेवर लिहायचा मोह झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाह सं.क्षी. साहेब ,

प्रमोद देर्देकर
Tue, 09/30/2014 - 11:46 नवीन
वाह सं.क्षी. साहेब , मी ख. फ वर एका अक्षराचा अर्थ विचारला तर अख्खी कविताच तुम्ही आकलनासाठी सोप्पी केलीत. मजा आली. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

खल्लास

स्पा
Sat, 09/27/2014 - 15:20 नवीन
वाह.. अप्रतीम लिहिलय माझ्या काही निवडक गाण्यांपॆकि एक.. वसंतरावांनी वेगळ्याच उंचीवर नेलं गाण्याला अनिलांचे शब्द तर कातीलच आहेत. मझा आ गया, तुफान
  • Log in or register to post comments

मस्त रसग्रहण !

चौकटराजा
Sat, 09/27/2014 - 15:27 नवीन
संक्षी , या तुमच्या रसग्रहणाने आज सॉंग ओफ द डे मिळाले. मग थोडेफार वाजवून ही पाहिले. ओ पी नय्यर , यशवंत देव ई महान संगीतकार म्हणतात शब्दच चालीला आपल्याकडे घेउन येतात. हे मला वाटते अशा प्रकारचे एक " कातील" उदाहरण आहे !
  • Log in or register to post comments

शब्दच चालीला आपल्याकडे घेउन येतात!

संजय क्षीरसागर
Sat, 09/27/2014 - 15:32 नवीन
हे एकदम खरंय. केंव्हा पासनं प्रयत्न चाललेत, गाण्याची एंबेडेड यूआरल पेस्ट होत नाहीये... कविता आणि फक्त कविताच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

सुंदर!

अनिता ठाकूर
Sat, 09/27/2014 - 15:53 नवीन
फार तरल भाव व त्यात श्री. वसंतरावांचा झारदार आवाज!गाण्यातील आर्तता मनाला भिडतेच अगदी. असेच, 'चाला वाही देस' व 'सहेला रे' चे रसग्रहण आपण कराल काय? मात्र, मी फक्त कानसेन हां..! मी शास्त्रीय संगीत अजिबात शिकलेली नाही.
  • Log in or register to post comments

अप्रतीम रसग्रहण.

आनंद
Sat, 09/27/2014 - 15:53 नवीन
अप्रतीम रसग्रहण. अजुन येवु द्या.
  • Log in or register to post comments

वा वा! क्या बात है!!

चतुरंग
Sat, 09/27/2014 - 16:37 नवीन
माझं एक अत्यंत आवडतं गाणं सकाळी सकाळी ऐकायला मिळालं. अनिलांचे जीवघेणे शब्द, यशवंत देवांनी असोशीने चालीत गुंफलेत आणि वसंतखांनी जीवघेणे गायले आहेत!!! त्रिवेणी संगम!!!
  • Log in or register to post comments

वाह् !

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 09/27/2014 - 17:09 नवीन
वाह् ! सुंदर काव्याचे सुंदर रसग्रहण ही संक्षींची खासियत आहे ! असे अजून लिहा.
  • Log in or register to post comments

मस्तं!

अनुप ढेरे
Sat, 09/27/2014 - 17:48 नवीन
मस्तं!
  • Log in or register to post comments

धाग्याकरिता धन्यवाद.

बॅटमॅन
Sat, 09/27/2014 - 18:16 नवीन
धाग्याकरिता धन्यवाद. रसग्रहण छानच लिहिले आहे. आता यावच्छक्य दिलेले गाणे ऐकतो.
  • Log in or register to post comments

मस्तच.

जेपी
Sat, 09/27/2014 - 18:27 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments

अतिशय जबराट रसग्रहण लिहिले

किसन शिंदे
Sat, 09/27/2014 - 19:50 नवीन
अतिशय जबराट रसग्रहण लिहिले आहे संक्षीजी. जाम आवडलेय.
  • Log in or register to post comments

वा सं.क्षी.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 09/27/2014 - 20:42 नवीन
वा सं.क्षी. :)
  • Log in or register to post comments

मस्तं गाणं!

साती
Sat, 09/27/2014 - 20:46 नवीन
गाणं आवडीचं आहे. रसग्रहण उत्तम आहे. हा आस्पेक्टही असू शकतो हे लक्षात आले.(कोकिळा म्हणजे प्रेयसी) मला मात्र अजून पर्यंत कोकिळा गात नाही कोकिळ गातो असेच समजत होते. 'सुचवाल का त्या कोकिळा ' म्हणजे 'त्या कोकिळा(स) सुचवाल का ??' असा अर्थं लावत होते.
  • Log in or register to post comments

अहो, गातो तो कोकीळचं.

प्रचेतस
Sat, 09/27/2014 - 20:58 नवीन
अहो, गातो तो कोकीळचं. कोकिळा गाणे ऐकत्ये आणि निवड करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

तेच तर.

साती
Sat, 09/27/2014 - 21:49 नवीन
जिला सुचवायचंय ती प्रेयसी म्हणजे कोकिळा असती तर 'सुचवाल का त्या कोकिळे' असे गाणे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

'सुचवाल का त्या कोकिळा '

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 09/27/2014 - 21:52 नवीन
'सुचवाल का त्या कोकिळा ' म्हणजे 'त्या कोकिळा(स) सुचवाल का ??' असा अर्थं लावत होते. ते तसेच आहे. नाहीतर "सुचवाल का त्या कोकिळे" असे असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

गातो तर कोकिळ पण पण इतका साधा अर्थ घेतला

संजय क्षीरसागर
Sat, 09/27/2014 - 23:09 नवीन
तर कविता रसशून्य होईल. मग कोकिळ रात्री गात नाही असाही विचार पुढे येईल. आणि एकेक शृंखला वेगळी होत जाईल. बरसात निव्वळ पाऊस होईल आणि तो थबकेल कशापायी? त्याचं `चिंब चुंबन' म्हणजे पावसात (एकट्यानंच) भिजणं होईल. जर कोकिळ गात असेल तर त्याच्या आवाजाची झार, निजेला रोखू शकेल हे संवेदनाशिल मनाला तरी पटणार नाही आणि मग त्या गाण्याला दाद द्यायला कुणी रात्र जागून काढेलसं वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

व्याकरणदृष्ट्या पाहता कवीने

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 09/28/2014 - 12:39 नवीन
कवीने कवितेत व्याकरणदृष्ट्या बरोबर शब्दाने (नर) 'कोकिळा'चाच उल्लेख केला आहे, (मादी) कोकिळेचा नाही. (नर) कोकीळ आपल्या प्रेयसिला त्याच्या आवाजाने साद देतो... हे वास्तव आहे आणि कवितेतली कल्पनाही. कविता कोकिळाने दिलेल्या सादामुळे कविच्या मनात उठलेल्या आठवणींच्या तरंगांबद्दल आहे. तुम्ही तिचे उत्तम रसग्रहण केले आहे हे अगोदर लिहीले आहेच. थोडक्यात, कविता व्याकरण आणि वास्तव या दोन्ही दृष्टींनी योग्यच आहे. त्यात वादाचा काही प्रश्नच नाही असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

कोकिळ गातो याबद्दल तर सर्वांशी सहमत आहे

संजय क्षीरसागर
Sun, 09/28/2014 - 13:49 नवीन
पण कवीला पोएटिक लिबर्टी हवी. त्याला प्रेयसी कोकिळाच वाटायला हवी, नाही तर काव्यातला सारा आर्जवच व्यर्थ होईल. कोकिळाच्या गाण्याला दाद द्यायला कवी रात्र जागणार नाही. खरं तर `आपली कोकिळा' आठवायला आणि कविता सुचायला, (मग तो भले गैरसमज असू दे), कविला कोकिळाच गातेयं असं वाटायला हवं स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकरला सुद्धा गान-कोकिळाच म्हटलंय. (त्याला पक्षीतज्ञांचा आक्षेप असला तरी बेहत्तर!) त्यामुळे वास्तविकात जरी कोकिळ गात असला तरी कवी-मनात गाणारी कोकिळाच असायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

वा वा!

पैसा
Sun, 09/28/2014 - 14:47 नवीन
पण कवीला पोएटिक लिबर्टी हवी.
क्या बात है! हेच्च कधीपासून सांगतेय ना मी हे. भावार्थ चांगला लावला आहे! पण मला वाटत होतं की कवी हे स्वतःच स्वतःला सांगतो आहे! कवीला लिहायचे स्वातंत्र्य आहे आणि वाचकाला अर्थ लावायचं. आणि माझाच अर्थ बरोबर असंही कोणाला वाटू नये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अर्थात!

संजय क्षीरसागर
Sun, 09/28/2014 - 14:52 नवीन
आभार मानतांना हे नमूद केलंय : जे लिहिलंय तो कवितेकडे पाहायचा माझा नज़रीया आहे. एखादा रसिक इतक्या सुरेख कवितेचा आणखी वेगळा आणि उत्कट अंदाज़ सादर करु शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

पण कवीला पोएटिक लिबर्टी हवी.

प्रचेतस
Sun, 09/28/2014 - 16:21 नवीन
पण कवीला पोएटिक लिबर्टी हवी.
कवीला पोएटिक लिबर्टी हवी आणि असायलाही यात काहीच दुमत नाही. पण सुचवाल का त्या कोकिळा … रात्री तरी गाऊ नको यात कवीने 'कोकीळ' हाच गात असल्याचे सूचित करून आपल्याला (म्हणजे कवीला) वास्तवाचे भान असल्याचेही सुचित केलंय. आता कोकीळ रात्रीही गातो हे मीही बर्‍याच वेळी पाहिलंय. म्हणजे येथेही कवीने वास्तवाचे भान सोडले नाही हे स्पष्ट आहे. येथे कवीने नर कोकीळाची तुलना स्वतःशीच केलीय न की त्यांच्या प्रियतमेची असे मला वाटते. कोकीळ पक्ष्याला कोकीळेसाठी गाताना कवीला आपल्या प्रियतमेचा म्हणजे कोकीळेचा विरह सहन होत असल्याने होणारी तगमग येथे स्पष्टपणे दिसत्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

वल्लीश्री!

संजय क्षीरसागर
Sun, 09/28/2014 - 19:21 नवीन
येथे कवीने नर कोकीळाची तुलना स्वतःशीच केलीय न की त्यांच्या प्रियतमेची असे मला वाटते. कोकीळ पक्ष्याला कोकीळेसाठी गाताना कवीला आपल्या प्रियतमेचा म्हणजे कोकीळेचा विरह सहन होत असल्याने होणारी तगमग येथे स्पष्टपणे दिसत्ये.
कोकिळ म्हणजे स्वतः कवी असेल, तर तो स्वतःला (च) `खुलवू नको अपुला गळा' कसं म्हणेल? कोकिळ रात्री गातो हे तुम्ही ऐकलंय पण खुद्द कवीतेत `रात्री तरी गाऊ नको' अशा ओळी आहेत. म्हणजे निदान कवीला तरी रात्रीचं कोकिल-कूजन अपेक्षित नसावं. आणि कवितेचा सारा माहौल `रात्री तरी गाऊ नको' मधे एकवटलायं. तुम्ही कुणीही, :
येथे कवीने नर कोकीळाची तुलना स्वतःशीच केलीय न की त्यांच्या प्रियतमेची असे मला वाटते
या अंगानं रसग्रहण करुन इथे द्या, बघूया काय नवा अँगल मिळतोयं ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कोकिळ म्हणजे स्वतः कवी असेल,

प्रचेतस
Sun, 09/28/2014 - 22:05 नवीन
कोकिळ म्हणजे स्वतः कवी असेल, तर तो स्वतःला (च) `खुलवू नको अपुला गळा' कसं म्हणेल?
येथे कवी म्हणजे स्वतः कोकीळ नाही पण त्याने रूपकार्थाने आपली तुलना ही कोकिळाशी केलीय.
कोकिळ रात्री गातो हे तुम्ही ऐकलंय पण खुद्द कवीतेत `रात्री तरी गाऊ नको' अशा ओळी आहेत. म्हणजे निदान कवीला तरी रात्रीचं कोकिल-कूजन अपेक्षित नसावं.
दिवसभर कोकिळाचे कुहूकुहु पक्षी गायन सुरु असतेच. मात्र रात्री आपल्या प्रेयसीचा विरह कवीला असह्य होतोय. त्याच आर्त भावनेने तो म्हणतोय खुलवू नको अपुला गळा, रात्री तरी गाऊ नको निदान रात्री तरी विरहाग्नीत न तडफडता कवीच्या मनास शांतता मिळावी आणि हो, रात्रीच्या वेळी कोकिळगायनास दाद द्यायला त्याची कोकिळा नाही तेव्हा उगा गाऊन काही फायदा नाही हा ही एक उद्देश कवीच्या मनी असावा.
या अंगानं रसग्रहण करुन इथे द्या, बघूया काय नवा अँगल मिळतोयं ते.
रसग्रहण माझा प्रांत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

साधा-सरळ अर्थ घ्यायचा तर मग रुपकात्मकेची देखिल आवश्यकता नाही

संजय क्षीरसागर
Sun, 09/28/2014 - 22:26 नवीन
कोकिळ गातोयं, कवीला प्रेससीची आठवण आली, त्यानं आपल्या मनोदशेचं वर्णन केलं आणि कोकिळाला म्हणाला, रात्री तरी गाऊ नको, मला विरह सहन होत नाही...संपली कविता! मग रसग्रहणाला अर्थच उरत नाही, सगळे सोपे शब्द आहेत आणि उघड वर्णन आहे. इथल्या काही सदस्यांना असा अर्थ घ्यावसा वाटेल, ओके!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

(No subject)

प्रचेतस
Sun, 09/28/2014 - 22:31 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

असंच आहे. उगाच कशाला काहीही

प्यारे१
Mon, 09/29/2014 - 13:07 नवीन
असंच आहे. उगाच कशाला काहीही आणता मध्ये? कैच्या काय! (थांबा अजून काही प्रतिसाद चोप्य पस्ते करायचे आहेत.)

संपादित

संपादित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

संपादित

अनुप ढेरे
Mon, 09/29/2014 - 18:22 नवीन
संपादित संपादित
नवीण संपादकांनी कात्रीचं उद्घाटन केलय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

पण कवीला पोएटिक लिबर्टी हवी.

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 09/28/2014 - 17:07 नवीन
पण कवीला पोएटिक लिबर्टी हवी. नक्कीच, पण न घेतलेली पोएटिक लिबर्टी त्याच्यावर लादण्याचा हक्क कोणालाच नाही, हे ही तितकेच खरे (अर्थात तुम्हाला मान्य असेल तरच) ! शिवाय "तुमचे म्हणणे तेच खरे" हे म्हणण्याचा हक्क तुम्ही ज्या निर्धाराने सतत वापरता (आणि त्यातून एखादा कवीसुद्धा सुटू शकत नाही) हे खरेच कौतूकास्पद आहे, इतके बोलून मी माझे भाषण पुरे करतो. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

(No subject)

प्यारे१
Sun, 09/28/2014 - 17:11 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

झक्कासच!!!!!!!

विलासराव
Sat, 09/27/2014 - 20:50 नवीन
झक्कासच!!!!!!!
  • Log in or register to post comments

गाण्याचं रसग्रहण आवडलं.

आतिवास
Sat, 09/27/2014 - 23:26 नवीन
गाण्याचं रसग्रहण आवडलं. अवांतरः मलाही आधी रात्री कोकिळ कुठे गातो, असं वाटायचं. पण आता इतक्या वेळा रात्री 'कोकिळ'चा स्वर ऐकला आहे की, 'बाबा, रात्री तरी गाऊ नको' असं वैतागाने त्याला म्हणायची वेळ येते अनेकदा!
  • Log in or register to post comments

अनिलांना कविता सुचली त्या वेळी कोकिळ नक्कीच रात्री गायला असेल!

संजय क्षीरसागर
Sun, 09/28/2014 - 07:03 नवीन
आणि ज्या तरल भावदशेत जाऊन प्रतिसाद देणार्‍यांना देखिल ती भावलीये, त्या चित्तदशेत कदाचित ते देखिल असावेत, नाही तर गाण्यातून आणि शब्दातून रसिकाला जाणवणारी इतकी उत्कटता कशी शक्य आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

सुरेख!

सुधीर
Sat, 09/27/2014 - 23:55 नवीन
रसग्रहण उत्तम आहे.
  • Log in or register to post comments

मस्त हो संक्षी

दिपक.कुवेत
Sun, 09/28/2014 - 00:17 नवीन
गाणं तर अप्रतिम तर आहेच त्याचबरोबर तुम्हि समजाउन सांगीतलेला भावार्थहि.....अगदि साधा, सरळ आणि सोपा. हा प्रतिसाद दिल्यावरहि गाणं परत एकदा एकणार आहे.
  • Log in or register to post comments

सुंदर

प्रसाद गोडबोले
Sun, 09/28/2014 - 00:56 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments

खूप छान तरल रसग्रहण केलंय.

प्यारे१
Sun, 09/28/2014 - 02:32 नवीन
खूप छान तरल रसग्रहण केलंय. आवडलं.
  • Log in or register to post comments

फार छान लेख

vikramaditya
Sun, 09/28/2014 - 08:36 नवीन
आता गांणे रिपिट मोड वर पुनः पुनः एकणे आले....
  • Log in or register to post comments

अावडत्या गाण्याचं सुरेख

अजया
Sun, 09/28/2014 - 08:41 नवीन
अावडत्या गाण्याचं सुरेख रसग्रहण.खूप अावडलं.
  • Log in or register to post comments

रसग्रहण नेहमीप्रमाणेच उत्तम.

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 09/28/2014 - 09:33 नवीन
रसग्रहण नेहमीप्रमाणेच उत्तम. गाणे आवडते आहेच पण हे रसग्रहण वाचल्या नंतर ते ऐकायला जास्त मजा आली. जिओ सं. क्षी. जिओ. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

अप्रतिम

रिकामटेकडा
Sun, 09/28/2014 - 11:12 नवीन
या आधीही हे गाण आवडीच होत. आता तुमच्या या रसग्रहणामुळे. तर स्पेशल मधे आलाय वाचून अगदी वाह! अस झालं पुनश्च एकदा धन्यवाद
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा