Skip to main content

कुणी जाल का सांगाल का

लेखक संजय क्षीरसागर यांनी शनिवार, 27/09/2014 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
विरहाची व्यथा प्रियकरानं आणि तीही गाण्यातून सांगावी असा योग दुर्लभ. कवी अनिलांची ही अन्योक्ती अलंकारातली कविता, कोकिळेकडे संकेत करत विरहवेदना इतकी नज़ाकतीनं मांडते की नुसत्या काव्यार्थाशी जरी समत्व साधलं तरी रसिक दाद देईल. एकेक ओळ, एकेक शब्द, लयीचा असा काही तोल सांभाळत लिहीलायं की क्या कहेने! म्हणजे एक तर काव्यविषय वेगळा तरीही अत्यंत तरल, त्यात विरहाची विविधांगांनी अशी काही मांडणी की जान कुर्बान. त्यात कहर म्हणजे वसंतरांवचा चिरतरुण आवाज. जणू काही स्वतःचीच कविता असल्यासारख्या हुकुमतीनं त्यांच वेदनेची तरलता व्यक्त करणारं गाणं. जरा कालावधी सापडायचा आवकाश की वसंतराव शब्दाचं सोनं करणार. तर असं हे मराठी भावगीतांच्या रम्य बागेतलं, ज्या खाली कधीही निवांत बसून रमावं असं, एक गुलमोहराचं झाड : कुणी जाल का सांगाल का सुचवाल का त्या कोकिळा …(२) रात्री तरी गाऊ नको …(२) खुलवु नको अपुला गळा || धृ || खरं तर कोकिळा रात्री कधीही गात नाही. पण अनिलांच्या मनातली प्रियतमा त्यांना अहोरात्र घेरुन आहे. तिच्या मोहक आवाजाची जादू संध्याकाळपासनं अस्वस्थ करत होती. आता रात्री तरी तुझा आठव नको, अशी विनवणी (कोकिळेकडे संकेत करत) ते, प्रियतमेला करतायंत! रसिकानं फक्त कविशी समचित्त होण्याचा आवकाश आहे. कल्पना करा, तुम्ही एकटे आहात आणि अशा एकाकी वेळी, सखी तुमच्या मनाच्या मैफिलीत गाणं म्हणतेयं.... आणि तुमचा आर्जव असा की सखे, रात्री तरी इतकं विकल करणारं गाणं... गाऊ नकोस! रात्री तरी गाऊ नको …(२) खुलवु नको अपुला गळा || धृ || _________________________________ आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली …(२) परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली …(२) हार पुर्वीचा दिला जो श्वास साहुन वाळला .…(२) आत्ताच आभाळातला …(२) काळोख मी कुरवाळीला || १ || बरसात दोन्हीकडे आहे, बाहेर पावसाची आणि आत आठवणींची. त्यात प्रेयसी जशी जाताजाता रेंगाळावी तशी बरसात लांबलीये. इथे पुन्हा बरसात म्हणजे तीच! मग त्यावर कहर म्हणजे तिच्या चिंब चुंबनाची स्मृती! कविकल्पनेची प्रतिभा तर शेवटच्या चार ओळीत क्लायमॅक्सला पोहोचते. एकतर जातांना तिचा गजरा तीनं भेट म्हणून दिला होता, तो श्वासांचा उष्मा साहून कोमेजलायं. आणि आता तर तिचा भास इतका अंतरर्बाह्य एकरुप झालायं की ती जवळ नसतांना सुद्धा असल्यासारखी आहे. प्रियकर तिला कवेत घेऊ गेला तर रात्रीचा काळोखच कुशीत शिरलायं! कुणी जाल का सांगाल का सुचवाल का त्या कोकिळा …(२) रात्री तरी गाऊ नको …(२) खुलवु नको अपुला गळा || धृ || ________________________________________ सांभाळुनी माझ्या जीवाला, मी जरासे घेतले …(२) इतक्यात येता वाजली, हलकी निजेची पाऊले …(२) सांगाल का त्या कोकिळा, कि झार होती वाढली, .…(२) आणि द्याया दाद कोणी, …(२) रात्र जागून काढली || २ || आता जरा सावरलो तर `हलकी निजेची पाऊले' वाजली ! काय कमाल आहे कवी अनिलांच्या कल्पनेची, सो डेलिकेट! आणि शेवटाला तर ते जी काही उंची गाठतात त्याचा जवाब नाही. ती आसपास सुद्धा नाही, जे काही तिचं गाणं चाललंय ते प्रियकराच्या मनात आहे. मनातली कोकिळा गातेयं. पण तो स्मृती कल्लोळ इतका पराकोटीचा वास्तव झालायं की; आत गाणार्‍या मनाचा स्वर देखिल झारदार झालायं, अत्यंत मोहक आणि जीवघेणा झालायं. आता अशा कोकिकेळेच्या गाण्यानं हलकेच आलेल्या निजेला दूर सारुन, प्रियकर रात्रभर जागा राहिलायं, कारण इतक्या उत्कट क्षणी निजलो तर मग अशा मोहक गाण्याला दाद कोण देणार? गीत : कवी अनिल, संगीत : यशवंत देव, गायक : डॉ. वसंतराव देशपांडे
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 24032
प्रतिक्रिया 76

प्रतिक्रिया

मला अश्या अर्थ लावायला लागणार्‍या कविता पटत नाहीत. म्हणजे असे का लिहावे हे कळत नाही. त्यापेक्षा उर्दू शायर ( गालिब, साहीर, शकील ) सरळ लिहीतात, ते जास्त भावते. रुपक वगैरे काही भानगड नाही. संक्षी साहेबांनी फार ओढ्न ताणुन अर्थ काढला आहे असे वाटते. कवि ला असे काही म्हणायचे असेल असे वाटत नाही. मी घरी गायला लागलो की माझी आई मला हे गाणे ऐकवुन गप्प करायची :-)

In reply to by प्रसाद१९७१

पण ज्यांनी प्रेम केलंय आणि विरहव्यथा जाणलीये, त्यांना तो भावलायं असं प्रतिसादांवरुन दिसतंय. कवि अनिल खुद्द असते तर त्यांना देखिल तो आवडला असता कारण त्यांच्या प्रतिभेला आणखी उंची देण्याचा प्रयत्न या रसग्रहणातून केलायं. राहूल देशपांडेशी कधी गाठ पडली तर त्याला हे रसग्रहण वाचायला देण्याची मनिषा आहे. मला भावलेल्या अर्थानं तो ते गाणं पुन्हा गायला तर कमाल करेल हे नक्की!

अलौकीक कलावंत असे मानतात व जाहीरपणे सांगतात की एखादी कलाकृती त्यांच्या हातुन 'घडली' आणि त्याचे श्रेय ते स्वतःकडे न घेता कोणा 'Higher Power' ला देतात. ही कलाकृती 'कशी' घडली ह्याचा वृत्तांत फार तर ते सांगु शकतील, पण त्या मागे नेमकी काय स्फुर्ती / प्रेरणा होती ह्याचे अचुक विष्लेषण करणे त्यांनाही जड जाते. एवढेच नव्हे तर प्रचंड लोकाश्रय लाभलेल्या अनेक कलाकृतींचा रिव्हुयु करताना मूळ कलाकार सुद्धा संभ्रमात पडतो. पण त्याच बरोबर अशा कलाकृती रसिकांना मात्र खुप आनंद देतात. परंतु त्या कोणाला कश्या रुपात भावतील हे सांगणे कठीण. प्रेक्षक / श्रोता स्वतः ज्या मनस्थितीत असेल तसा तो त्या कलेचा आनंद घेतो असे बरेचदा घडते. या उलट "आपल्या या कलाकृतीमध्ये असे काय आहे की ज्याने लोक एवढे मंन्त्रमुग्ध झाले?" असा प्रश्न स्वतः काही कलावंतांनी जाहीरपणे प्रकट केला आहे. 'कालातीत' कलाविष्कार हा 'निर्मितीचा एक क्षण' असतो, कॅलिडोस्कोप मध्ये आपल्याला जे दिसते त्याचा अनुभव आणि आस्वाद मनसोक्त घ्यावा. तोच कॅलिडोस्कोप इतरांना वेगळे रुप दाखवेल, so what? After all, beauty lies in the eyes of the beholder.

हे गीत ज्याच्यासाठी लिहिले गेले, त्या खुद्द मुकुलने हे गायले आहे का? असल्यास उपलब्ध आहे का ?

In reply to by चित्रगुप्त

मुकुलनं हे गाणं गायलेलं माझ्या तरी ऐकण्यात नाही. पण या गाण्यातली दोन्हीही कडवी, म्हणजे :
आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली …(२) परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली …(२) हार पुर्वीचा दिला जो श्वास साहुन वाळला .…(२) आत्ताच आभाळातला …(२) काळोख मी कुरवाळीला || १ ||
आणि
सांभाळुनी माझ्या जीवाला, मी जरासे घेतले …(२) इतक्यात येता वाजली, हलकी निजेची पाऊले …(२) सांगाल का त्या कोकिळा, कि झार होती वाढली, .…(२) आणि द्याया दाद कोणी, …(२) रात्र जागून काढली || २ ||
संपूर्णपणे वेगळी भावदशा आणि अभिव्यक्ती दर्शवतात, त्यांचा मुकुलशी (किंवा त्याच्या मातृवियोगाशी) सुतराम संबंध नाही.