कुणी जाल का सांगाल का
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
विरहाची व्यथा प्रियकरानं आणि तीही गाण्यातून सांगावी असा योग दुर्लभ. कवी अनिलांची ही अन्योक्ती अलंकारातली कविता, कोकिळेकडे संकेत करत विरहवेदना इतकी नज़ाकतीनं मांडते की नुसत्या काव्यार्थाशी जरी समत्व साधलं तरी रसिक दाद देईल.
एकेक ओळ, एकेक शब्द, लयीचा असा काही तोल सांभाळत लिहीलायं की क्या कहेने! म्हणजे एक तर काव्यविषय वेगळा तरीही अत्यंत तरल, त्यात विरहाची विविधांगांनी अशी काही मांडणी की जान कुर्बान.
त्यात कहर म्हणजे वसंतरांवचा चिरतरुण आवाज. जणू काही स्वतःचीच कविता असल्यासारख्या हुकुमतीनं त्यांच वेदनेची तरलता व्यक्त करणारं गाणं. जरा कालावधी सापडायचा आवकाश की वसंतराव शब्दाचं सोनं करणार. तर असं हे मराठी भावगीतांच्या रम्य बागेतलं, ज्या खाली कधीही निवांत बसून रमावं असं, एक गुलमोहराचं झाड :
कुणी जाल का सांगाल का
सुचवाल का त्या कोकिळा …(२)
रात्री तरी गाऊ नको …(२)
खुलवु नको अपुला गळा || धृ ||
खरं तर कोकिळा रात्री कधीही गात नाही. पण अनिलांच्या मनातली प्रियतमा त्यांना अहोरात्र घेरुन आहे. तिच्या मोहक आवाजाची जादू संध्याकाळपासनं अस्वस्थ करत होती. आता रात्री तरी तुझा आठव नको, अशी विनवणी (कोकिळेकडे संकेत करत) ते, प्रियतमेला करतायंत! रसिकानं फक्त कविशी समचित्त होण्याचा आवकाश आहे.
कल्पना करा, तुम्ही एकटे आहात आणि अशा एकाकी वेळी, सखी तुमच्या मनाच्या मैफिलीत गाणं म्हणतेयं.... आणि तुमचा आर्जव असा की सखे, रात्री तरी इतकं विकल करणारं गाणं... गाऊ नकोस!
रात्री तरी गाऊ नको …(२)
खुलवु नको अपुला गळा || धृ ||
_________________________________
आधीच संध्याकाळची
बरसात आहे लांबली …(२)
परत जाता चिंब चुंबन
देत दारी थांबली …(२)
हार पुर्वीचा दिला
जो श्वास साहुन वाळला .…(२)
आत्ताच आभाळातला …(२)
काळोख मी कुरवाळीला || १ ||
बरसात दोन्हीकडे आहे, बाहेर पावसाची आणि आत आठवणींची. त्यात प्रेयसी जशी जाताजाता रेंगाळावी तशी बरसात लांबलीये. इथे पुन्हा बरसात म्हणजे तीच! मग त्यावर कहर म्हणजे तिच्या चिंब चुंबनाची स्मृती!
कविकल्पनेची प्रतिभा तर शेवटच्या चार ओळीत क्लायमॅक्सला पोहोचते.
एकतर जातांना तिचा गजरा तीनं भेट म्हणून दिला होता, तो श्वासांचा उष्मा साहून कोमेजलायं. आणि आता तर तिचा भास इतका अंतरर्बाह्य एकरुप झालायं की ती जवळ नसतांना सुद्धा असल्यासारखी आहे. प्रियकर तिला कवेत घेऊ गेला तर रात्रीचा काळोखच कुशीत शिरलायं!
कुणी जाल का सांगाल का
सुचवाल का त्या कोकिळा …(२)
रात्री तरी गाऊ नको …(२)
खुलवु नको अपुला गळा || धृ ||
________________________________________
सांभाळुनी माझ्या जीवाला,
मी जरासे घेतले …(२)
इतक्यात येता वाजली,
हलकी निजेची पाऊले …(२)
सांगाल का त्या कोकिळा,
कि झार होती वाढली, .…(२)
आणि द्याया दाद कोणी, …(२)
रात्र जागून काढली || २ ||
आता जरा सावरलो तर `हलकी निजेची पाऊले' वाजली ! काय कमाल आहे कवी अनिलांच्या कल्पनेची, सो डेलिकेट! आणि शेवटाला तर ते जी काही उंची गाठतात त्याचा जवाब नाही.
ती आसपास सुद्धा नाही, जे काही तिचं गाणं चाललंय ते प्रियकराच्या मनात आहे. मनातली कोकिळा गातेयं. पण तो स्मृती कल्लोळ इतका पराकोटीचा वास्तव झालायं की; आत गाणार्या मनाचा स्वर देखिल झारदार झालायं, अत्यंत मोहक आणि जीवघेणा झालायं.
आता अशा कोकिकेळेच्या गाण्यानं हलकेच आलेल्या निजेला दूर सारुन, प्रियकर रात्रभर जागा राहिलायं, कारण इतक्या उत्कट क्षणी निजलो तर मग अशा मोहक गाण्याला दाद कोण देणार?
गीत : कवी अनिल, संगीत : यशवंत देव, गायक : डॉ. वसंतराव देशपांडे
प्रतिक्रिया
सर्व रसिकांचे मनःपूर्वक आभार आणि
इतकं सुरेख लिहल्या बद्दल आपलेही धन्यवाद.
आसक्ति नजाकतीने अभिव्यक्त होणे म्हणजेच कला होय!
मित्रांनो
मित्रांनो
प्रतिसाद आवडला!
सुंदर र्हदयस्पर्शी
कैच्या कैच अर्थ ???
मला संक्षींनी लावलेला अर्थ
कैच्या कैच तुमचं चित्रगुप्तजी
त्यांनी स्वतः मात्र, खाली असं म्हटलंय !
य ऐसा चल्ताच रयता हय !
चित्रगुप्तजी अनेक धन्यवाद!
मी सुद्धा
मला अजूनही तसं वाटत नाही
प्रतिक्षेत.
संक्षि: जेंव्हा कधी हे गाणे
खिक्क!
तू टाक की ..
अजुन एक विनंती सं.क्षी साहेब
क्या बात है!
मला अश्या अर्थ लावायला
खरोखरी, अर्थ फार ओढून ताणून काढलायं
अनेक
मुकुलने हे गायले आहे का
आता पुन्हा विषय निघालाच आहे तर सांगतो
Pagination