✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रटाळ 'फायंडिंग फॅनी'

स
समीरसूर यांनी
Mon, 09/22/2014 - 14:22  ·  लेख
लेख
हे परीक्षण चार-पाच दिवस आधी लिहून ठेवले होते. कार्यालयात खूप काम असल्याने अर्धवट पडून होते. कसेबसे पूर्ण करून आज टाकतोय. चित्रपटाप्रमाणेच परीक्षण देखील रटाळ असल्यास उदार अंतःकरणाने क्षमा करावी. यथा पिक्चर, तथा परीक्षण! :-( --------------------------------------------------------------------------------- 'फायंडिंग फॅनी' या नावाचा चित्रपट येऊ घातला आहे असं जेव्हा मी वृत्तपत्रात वाचलं तेव्हा मला वाटलं जगमोहन मुंदडा ('कामसूत्र' फेम), कैझड गुस्टाड (द ग्रेट 'बूम' फेम) सारखे उद्बोधक चित्रपट काढणार्या एखाद्या धीट दिग्दर्शकाचा हा पुरुष आणि स्त्री यांच्यातल्या शारिरीक आकर्षणावर गूढरम्य, गंभीर, आणि भावनिक भाष्य करणारा एक बेफाम चित्रपट असावा. 'फॅनी'चा स्लँग अर्थ तसा भलताच असल्याने माझा असा समज झाला. पुढे वाचलं की यात दीपिका, अर्जुन, पंकज, नसीरुद्दीन, डिंपल असे कलाकार आहेत. मग बुचकळ्यात पडलो. पण मनात म्हटलं का नाही? व्हाय नॉट? 'बूम'मध्ये जर अमिताभ बच्चनसारखा अभिनेता असू शकतो तर 'फायंडिंग फॅनी'ने असं काय 'तोंड काळं' केलं असावं की त्यात आघाडीच्या अभिनेत्यांनी काम करू नये. शक्य आहे. पण दीपिका? छे छे...काहीतरीच काय? नंतर कळलं की तो होमी अदजानिया नावाच्या दिग्दर्शकाचा चित्रपट आहे. मी त्याचा 'बीईंग सायरस' पाहिला होता. ठीक होता. 'कॉकटेल' पाहण्याची अजिबात इच्छा झाली नव्हती. पण त्यातल्या "सेकंड हँड जवानी" गाण्यात दीपिका आवडली होती. पोस्टर्सवरून चित्रपट वेगळा असल्याची जाणीव झाली. दीपिकाचे फोटोज सुरेख होते. पंकज कपूर 'चमेली की शादी'मध्ये आवडला होता. त्यानंतर कुठे कधी नीटसा भेटलाच नाही. नाही म्हणायला 'जाने भी दो यारो', 'एक रुका हुआ फैसला' वगैरे होते पण ते मेनस्ट्रीमचे चित्रपट नव्हते. 'चमेली की शादी'मध्ये तो जाम सही होता. नसीरुद्दीन शाह तर उत्तम आहेच. पण त्याला कॉमेडी जमणार का हा प्रश्न पडला. 'हीरो हिरालाल', 'जाने भी दो यारो' मध्ये वगैरे त्याने थोडी कॉमेडी केली होती पण ती अगदीच तोंडी लावण्यापुरती. गेल्या शनिवारी संध्याकाळी कंटाळा आला होता. मोबाईलवरुनच तिकीट बुक करून टाकले. मोठ्या अपेक्षेने थेटरात जाऊन बसलो. आधी १०-१५ मिनिटे क्रॉसवर्डमध्ये जाऊन भारी भारी इंग्रजी पुस्तके हातात धरून शायनिंग मारली. कोथरूडच्या सिटी प्राईडमध्ये शनिवारची रात्रीची ९ वाजताची वेळ! प्रेक्षक छान नटून-थटून आले होते. एक मंद सुगंध मनाला प्रसन्न करत होता. दुसर्या दिवशी रविवार असल्याने सगळे निवांत होते. 'हिरवळ' सोडा; आख्ख्या सिटी प्राईडमध्ये जणू 'एकर्स ऑफ लॉन' अवतरली होती. चित्रपट सुरु झाला. गोव्यातले कुठलेतरी पूर्ण ख्रिश्चन लोकवस्तीचे छोटेसे गाव. दीपिकाचा आवाज येत असतो. ती गाव आणि तिथल्या लोकांविषयी सांगत असते. सुरुवातच धाडकन आपटली होती. अतिशय संथ, निरुत्साही, आणि कंटाळवाणी सुरुवात होती. नंतर हळूहळू कॅमेरा नसीरुद्दीनच्या घरात शिरतो. नसीरुद्दीन शक्य तेवढ्या विचित्र वेषभूषेत काहीतरी करत असतो. इथे 'पेस्तनजी'ची आठवण होते. अत्यंत गचाळ घर! गोगलगायीपेक्षाही संथ गतीने नसीरुद्दीन हालचाली करत असतो. दाट रात्र झालेली असते. इथेच पहिली जांभई डोळ्याच्या कडा ओलावून गेली. पहिली सलामी! चित्रपटाचा वेग सेट झाला होता; मूड सेट झाला होता. काही वेळाने नसीरला एक पत्र येतं. आणि नसीर जोरात हंबरडा फोडतो. आसपासच्या घरातले दिवे लागतात. त्याने कधीकाळी (४७ वर्षांपूर्वी) एका मुलीला प्रेमाची कबुली देणारं पत्र पाठवलं असतं आणि ते तिला न मिळता ४७ वर्षांनी नसीरला परत मिळतं. तो दु:खी होतो. तिला आपलं हृदय कळलंच नाही. आणि आपण ती नाही म्हटली असंच समजून इतकी वर्षे जगत होतो असं वाटून नसीर निराश होतो. कॅमेरा संथपणे फिरतोय. नसीरदेखील संथपणेच हलतोय. संवाद अस्पष्ट आहेत. गावात डिंपल ही विधवा तिच्या विधवा सुनेसोबत राहत असते. दीपिकाचा नवरा रणवीर सिंग हा लग्नाच्या समारंभातच मृत्यू पावतो. तेव्हापासून या दोघी एकत्र राहत असतात. गावात एक चित्रकार (पंकज) राहत असतो. दीपिकाला काहीच कामधंदा नसल्याने तिच्या मनात नसीरची ४७ वर्षांपूर्वी हरवलेली प्रेयसी शोधायला जाण्याची खुमखुमी येते. रटाळपणाचा कहर! दुसरी तगडी जांभई! विचित्र पार्श्वसंगीत वाजतेय. अर्जुन कपूर गावात आलेला असतो. त्याला दीपिकाने सोडलेलं असतं. म्हणून तो रागावलेला असतो. दीपिका घरचं कार्य असल्याप्रमाणे पंकज, नसीर, अर्जुन यांच्या गळी आपली 'फॅनी'ला शोधायला जाण्याची कल्पना उतरवते. सगळे तयार होतात. डिंपल आपल्या मांजरीला घेऊन येते. आणि ते पाचही नग एका अत्यंत घाणेरड्या गाडीत बसून या आगळ्यावेगळ्या सहलीला निघतात. मी जांभया मोजणं एव्हाना बंद केलंय. सगळे गाडीत बसून प्रवास करत असतात. मध्येच मांजरामुळे नसीरला शिंका येतात. मग तो मांजराला मांडीत ठेवतो. ते त्याच्या नको त्या भागाला कडकडून चावा घेतं. प्रेक्षक हीहीही करून हसतात. तो ते मांजर उचलून खिडकीच्या बाहेर फेकतो आणि झाडावर आपटून ते मांजर मरतं. माझं डो़कं गरगरायला लागलं होतं. बायको खाऊ की गिळू नजरेने माझ्याकडे बघत होती. तिला हा चित्रपट पाहण्याची अजिबात इच्छा नव्हती. नावावरूनच तिला हा पिक्चर टुकार आणि कंटाळवाणा असणार याची खात्री वाटली होती. मी खूपच आग्रह करून तिला जवळपास खेचून आणलं होतं. घरी गेल्यावर आपलं काही खरं नाही याची खात्री मला पटली. नंतर अचानक पेट्रोल संपतं. लांबचा ग्रामीण भागातला प्रवास आहे; पेट्रोलची सोय असली पाहिजे वगैरे साधा विचार कुणीच करत नाही. एरवी मोबाईलचा चार्ज संपल्यावर लोकं घाबरतात. दूर आडरानात पेट्रोल संपलं तरी हे पाचही जण ओक्के असतात. झाड शोधतात. पंकज तिथेच डिंपलला कपडे बदलायला लावून तिचं चित्र काढतो. डिंपल अतिशय भयानक कपडे घालून विचित्र अशी पोझ घेऊन उभी राहते. पंकज तिचं अत्यंत घाणेरडं चित्र काढतो. इथे मला पश्चात्तापाचे कढ यायला सुरुवात झाली होती. सहाशे वीस रुपयांच्या नोटा वाकुल्या दाखवायला लागल्या. इकडे दीपिका आणि अर्जुन रंगात येतात. अंधार पडतो. डिंपल झाडाखाली पसरते. नसीर आणि पंकज तिच्या उशा-पायाशी बसतात. म्हटलं आता हे यांचं काही दाखवतात की काय म्हणून मला घाम फुटला. पण दिग्दर्शकाला थोडी तरी अक्कल असल्याचे जाणवते. डिंपल अस्ताव्यस्त पसरलेली असते. इकडे दीपिका आणि अर्जुन आधी भांडतात. अर्जुन लघुशंका करत असतांना दीपिका त्याच्याजवळ येऊन थांबते. मला वाटलं आता 'शूशूशू...' असा आवाज काढून त्याला मदत करते की काय. पण तसं काही होत नाही. ती अगदी जवळ येऊन त्याला विचारते, "क्या कर रहे हो?". खरं म्हणजे हे कार्य करणारा पुरुष मागून जरी पाहिला तरी तो काय करत असावा याचा अंदाज येतोच. उभं राहण्याची ती ढब सगळं शब्दावीण सांगून जाते. पण दीपिका त्याच्या जवळ जाऊन त्याने तिच्याकडे पाहिल्यावर त्याच्या झिपकडे बघत 'ओह सॉरी' असं अगदीच कॅज्युअली म्हणते. इतकं क्यॅज्युअली की आपला कुणाला चुकून हलका धक्का लागल्यावर आपण कसे सॉरी म्हणू, अगदी तस्सं! अर्थातच तो एक सिग्नल असतो. ग्रीन सिग्नल. मग अर्जुन तिचं एक दीर्घ चुंबन घेतो. आणि ती भडकते. का? कळत नाही. आणि मग डायरेक्ट ते झुडुपामध्ये जातात. झुडुपात जे जे करण्यासारखं असतं ते ते सगळं घडून जातं. असं सगळं कसं आनंदात चाललेलं असतं. कुणाला काहीच टेंशन नसतं. मध्येच केव्हातरी ते फॅनीच्या जुन्या पत्त्यावर जातात. तिथे एक विचित्र माणूस काहीबाही बडबडतो. मध्येच नसीर गायब होतो. अर्जुन, डिंपल, पंकज, आणि दीपिकाला कारमध्ये एक छोटी बंदूक सापडते. झटापटीत त्यातून गोळी सुटून मागच्या सीटवर बसलेल्या पंकजला लागते. तो ताबडतोब गतप्राण होतो; कारचा दरवाजा उघडला जातो; चालत्या कारमधून तो बाहेर फेकला जातो; तळ्यात कोसळतो; आणि थेट तळाशी जाऊन विसावतो. मध्येच नसीर पुन्हा उगवतो. पुन्हा बसतो. मग उलथलाच का होता हे कळत नाही. मग एक प्रेतयात्रा दिसते. ती बहुधा फॅनीची असते. माझी शिव्यांची लाखोली सुरुच होती. नंतर नसीर आणि डिंपल आणि दीपिका आणि अर्जुन लग्न करतात. हुश्श्श... रटाळपणाचे सारे विक्रम 'फायंडिंग फॅनी' ने मोडीत काढले असावेत. अत्यंत मंदगती, कंटाळवाणे लांबलचक प्रसंग आणि संवाद, कळकट नसीर आणि पंकज (किती वेळा यांना असं बघायचं?), मध्येच विनाकारण पार्श्वभागावर टर्रकन फाटलेला झगा दाखवणारी डिंपल, अत्यंत फालतू कथा, अत्यंत नीरस सादरीकरण, ठिगळं लावल्यासारखे जोडलेले असंबद्ध प्रसंग (नसीरच्या शिंका, मांजरीचा चावा फॉलोड बाय मृत्यू, तिचा दफनविधी, डिंपलचे चित्र, अर्जुनची सूसू, प्रेतयात्रा, इत्यादी), कंटाळवाणी पटकथा, 'आता पुढे काय होणार' अशी पुसटशीही जिज्ञासा प्रेक्षकांना वाटू नये ही लेखक-दिग्दर्शकाने घेतलेली खबरदारी...काही विचारू नका. आता मला खूप मोठी जांभई यायला लागली आहे. पुरे करतो. चित्रपट अजिबात बघू नका. त्यापेक्षा गुगलवर दीपिकाचे छान छान फोटो बघा, 'सागर' आणि 'जानबाज'मधल्या डिंपलला आठवा, आणि पैसे वाचवा!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
समीक्षा

प्रतिक्रिया द्या
20796 वाचन

💬 प्रतिसाद (90)

प्रतिक्रिया

माझ्या मते हीन्दी चित्रपट

मदनबाण
गुरुवार, 09/25/2014 - 10:52 नवीन
माझ्या मते हीन्दी चित्रपट स्रुष्टीला पडलेले एक सुन्दर स्वप्न आहे "श्रद्धा कपूर" १००% सहमत ! ;) Image removed.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

श्रद्धा कपूर

समीरसूर
Fri, 09/26/2014 - 11:16 नवीन
श्रद्धा कपूर आजच्या जमान्याची सोनाली बेंद्रे आहे काय? किंवा अजून मागच्या जमान्याची विद्या सिन्हा? अर्थात तिचा अभिनय खचितच सोनाली बेंद्रेपेक्षा उजवा आहे. 'आशिकी २' मध्ये मला आवडली होती ती. पण तिच्यात तो 'क्ष' फॅक्टर नाही असे वाटते. जे अमृता राव, अमृता अरोरा, तारा शर्मा, नेहा धुपिया, सोहा अली खान, अनिता राज, सोनाली बेंद्रे, महिमा चौधरी, इशा देओल, भूमिका चावला, स्नेहा उल्लल, सोनम कपूर अशा तमाम नट्यांमध्ये कधीच नव्हते नेमके ते श्रद्धामध्ये देखील नसावे असे वाटते. ज्याला 'उम्फ' किंवा 'अपील' म्हणता येईल अशा एका हिंदी नट्यांमध्ये आवश्यक असणार्‍या आकर्षणमुल्याची गोष्ट करतोय मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

ह्यालाच 'अभ्यासू' प्रतिसाद

प्यारे१
Fri, 09/26/2014 - 16:03 नवीन
ह्यालाच 'अभ्यासू' प्रतिसाद म्हणतात का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

खरे आहे तुम्चे. अजुन ती

खटपट्या
Sat, 09/27/2014 - 04:39 नवीन
खरे आहे तुम्चे. अजुन ती "निरागस" मोड मधुन बाहेर आलेली नाहीय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

असहमत..!

काउबॉय
Sat, 09/27/2014 - 11:11 नवीन
अर्थात 3पत्ती बघितल्यावर हेच विचार आले होते जे आशिकी व एक विलन बघितल्यावर विर्घळुन गेले. नई हय वोह.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

तिच्यात तो 'क्ष' फॅक्टर नाही

रेवती
Tue, 09/30/2014 - 01:23 नवीन
तिच्यात तो 'क्ष' फॅक्टर नाही असे वाटते हेच ते! काहीतरी खटकतय त्या श्रद्धाच्या डोळ्यात/चेहर्‍यात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

शी इज गोइंग प्लास्टिक

काउबॉय
Tue, 09/30/2014 - 01:34 नवीन
तिची ऐश्वर्या बनू नये इतकीच अपेक्षा आहे. अवांतर :- अभिनय कौशल्य राहुदे पण फक्त बोलके डोळे मधुबाला, श्री देवी, जेनेलिया, व श्रध्दा कपूर यांचेच आहेत. यांच्या डोळ्यात अखंड बघत रहावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

श्रद्धा कुपरच्या डोळ्यात मठ्ठ

रेवती
Tue, 09/23/2014 - 22:16 नवीन
श्रद्धा कुपरच्या डोळ्यात मठ्ठ भाव आहेत असे नाही का वाटत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

रेवतीताई आजकालच्या नट्यांकडून

खटपट्या
Wed, 09/24/2014 - 10:32 नवीन
रेवतीताई आजकालच्या नट्यांकडून आपण अभिनयाची अपेक्षा करावी का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हम्म्म...

रेवती
Wed, 09/24/2014 - 19:44 नवीन
हम्म्म...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

तुम्ही 'एक व्हिलन' बघावा अशी

प्यारे१
Wed, 09/24/2014 - 12:33 नवीन
तुम्ही 'एक व्हिलन' बघावा अशी तुम्हाला णम्र विणंती. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

'एक व्हिलन' हा चित्रपट सुरु

खटपट्या
गुरुवार, 09/25/2014 - 10:40 नवीन
'एक व्हिलन' हा चित्रपट सुरु केला. मोजून २० मिनिटे बघितला आणि माझा धीर सुटला. चित्रपट बंद करून मस्तपैकी टोम एंड जेरी बघून झोपी गेलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

तेच तर चुकलं ना तुमचं. अजून

प्यारे१
गुरुवार, 09/25/2014 - 12:20 नवीन
तेच तर चुकलं ना तुमचं. अजून थोडा बघायला हवा होता. ;) सुंदर सिनेमॅटोग्राफी आहे राव. कथेसाठी कोण बघायला सांगतंय? हिंदी चित्रपटांमध्ये कथा, अभिनय वगैरे विचारात घ्यायचं नसतं ह्या मतावर मी आलेलो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

असे आहे होय. पर्त बघतो की,

खटपट्या
Sat, 09/27/2014 - 04:37 नवीन
असे आहे होय. पर्त बघतो की, जातोय कुटं ? बगुन सान्ग्तो ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

रेतवी (अर्थात रेवती),

प्रभाकर पेठकर
Wed, 09/24/2014 - 15:20 नवीन
रेतवी (अर्थात रेवती), ती 'श्रद्धा कूपर' नाही, 'श्रद्दा कपूर' आहे, हे सहज कळावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

काका, ते मुद्दाम लिहिले आहे.

रेवती
Wed, 09/24/2014 - 19:44 नवीन
काका, ते मुद्दाम लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

हाहा!

पैसा
Tue, 09/23/2014 - 14:42 नवीन
परीक्षण आवडलं. सिनेमा ठीक आहे. गोव्यातल्या टिपिकल झोपाळू श्टाईलने जातो. सुशेगात!
  • Log in or register to post comments

मस्त परिक्षण ! आवडले. सिनेमा

चौथा कोनाडा
Wed, 09/24/2014 - 11:49 नवीन
मस्त परिक्षण ! आवडले. सिनेमा बघतानाचा कंटाळा लेखनात पुरेपुर उतरलाय !त्या करती शंभर पैकी एकशे साडेतीन गुण ! सिनेमा कदाचित चांगला असावा. असल्या सिनेमा साठी निवांत पणा पांघरून ट्यून व्हायला पाहिजे ! ना.कुकनूरचा "मोड" सुद्धा निवांतच होता. लोकाना झेपला नाही म्हणतात !
  • Log in or register to post comments

किती निर्मात्यांना आयुष्यातुन

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 09/24/2014 - 13:59 नवीन
किती निर्मात्यांना आयुष्यातुन उठवणार आहात अजुन =)) ?
  • Log in or register to post comments

हम्म्म!

उत्खनक
Wed, 09/24/2014 - 15:13 नवीन
संथ आहे आणि बहुदा त्यामुळेच रटाळही वाटत राहतो. अभिनयाच्या बाबतीत तर नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर आणि डिंपल यांना खरंच सलाम! मधूनच थोडासा ब्लॅक कॉमेडीच्या जवळ जाणारा प्रकार आहे. उदा: पंकजकपूर जे चित्र काढतो त्याआधीचे त्याचे वागणे आणि नंतरचा एकदम आलेला रिलक्टन्स अन् तुसडेपणा.. आणि त्यात काहीही न बोलता बरेच काही बोलून जाणारी डिंपलची देहबोली.. हा प्रकार एखाद्या व्यक्तीला हव्यासाने वापरून फेकून दिल्यासारखे दर्शवतो..! ठीक वाटला. :)
  • Log in or register to post comments

बाकी चालू द्या.. पण ते

हाडक्या
Wed, 09/24/2014 - 20:45 नवीन
बाकी चालू द्या.. पण ते धाग्याचे शीर्षक तेवढे मजेदार हो.. ते मी दोन तीन वेळा रायडींग फॅनी असं वाचलं चुकून... *lol*
  • Log in or register to post comments

त्या शीर्षकाजवळ Brazzers असा

बॅटमॅन
Fri, 09/26/2014 - 15:02 नवीन
त्या शीर्षकाजवळ Brazzers असा बॅनर नै ना दिसला खाली कुठे ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

>>Brazzers असा बॅनर नै ना

सूड
Fri, 09/26/2014 - 15:46 नवीन
>>Brazzers असा बॅनर नै ना दिसला खाली कुठे ? __/\__ मान गये, आप और आपकी पसंद !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

गप्रांव मेल्या! (बरोबर जमलं

बॅटमॅन
Tue, 09/30/2014 - 03:23 नवीन
गप्रांव मेल्या! (बरोबर जमलं का?) जसे काय खट्याळ आम्रविकेला नाकंच मुरडतोस किनै ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

बब्बौ....

काउबॉय
Tue, 09/30/2014 - 10:12 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

>>खट्याळ आम्रविकेला

सूड
Tue, 09/30/2014 - 19:05 नवीन
>>खट्याळ आम्रविकेला हायला!! कुठून सुचतं रे बाबा एकेक भाषांतर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

श्शी अचरत बावलत..

हाडक्या
Fri, 09/26/2014 - 16:01 नवीन
श्शी अचरत बावलत.. *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

दंडवत...

मुक्त विहारि
Tue, 09/30/2014 - 00:57 नवीन
तुम्हाला आणि सर्व प्रतिसादकांना....
  • Log in or register to post comments

चित्रपट थोडा कंटाळवाणा होतोच,

भृशुंडी
Tue, 09/30/2014 - 01:18 नवीन
चित्रपट थोडा कंटाळवाणा होतोच, पण उत्तरार्धात. परीक्षण सिनेमापेक्षा रटाळ वाटलं. असो.
  • Log in or register to post comments

मान्य!

समीरसूर
Wed, 10/01/2014 - 10:02 नवीन
परीक्षण रटाळच होतं. एकदम कबूल! मलाच नंतर वाचवलं गेलं नाही. :-) एका बैठकीत लिखाण नाही झालं तर असा विचका होतो. म्हणूनच लिखाणाच्या आधीच क्षमा मागून घेतली. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भृशुंडी

पद्मिनी कोल्हा पुरे तिची

निनाद मुक्काम …
Wed, 10/01/2014 - 18:16 नवीन
पद्मिनी कोल्हा पुरे तिची मावशी मराठी व पंजाबी मिक्स तडका आपल्याला बुआ आवडते , किंबहुना ती दैव व नशिबाला अधिक आवडते. ते तिच्यावर फिदा आहे. आता हैदर येत आहे. फेनी हा मल्टी प्लेकस च्या लोकांसाठी बनविलेला शिनेमा तो इंग्रजी मधून पाहण्यात खरी गंमत बॉलीवूड शिनेमा इंग्रजीत पाहणे रोचक वाटले , त्याचे हिंदी वर्जन पकाऊ वाटते असे वाचून व ऐकून आहे. एक प्रयोग म्हणून दीपिकाने आपल्या कारकिर्दीच्या उभरत्या काळात ह्या सिनेमाला निवडल्याचे कौतुक वाटते. मागच्या वर्षी तिच्या सिनेमांनी ५०० कोटीचा धंदा गेला. अवांतर शक्ती मुलांच्या सोबत युकेत पंचतारांकित हॉटेलात मला भेटला होता , ही गोष्ट २००४ ची तेव्हा नुकतेच त्याचे स्टिंग गाजले होते. त्यांचे मुलगा मुलगी अतिशय साधे होते व ह्याच्या तेथे माकडचाळे चालू होते , दोन्ही मुलांनी मी मराठी आहे हे कळल्यावर अस्स्खलित मराठीतून माझ्याशी संवाद साधला तेव्हा कोल्हा पुरे कनेक्शन माहिती नसल्याने मी तीन ताड उडालो होतो. अभिनेत्री यशस्वी होण्यासाठी नशिबाची साथ महत्वाची माधुरीचे व अभिताभ चे सुरवातीचे ८ ते १० सिनेमे तद्दन बकवास मग अचानक त्यांच्यात ष घुसला की काय नशिब बलवान तो गधा भी पेहेलवान अवांतर ह्या वर्षी ष बहुदा दिपिकेच्या पत्रिकेत आला असावा. शशी चा पेइङ्ग गेस्ट पण इंग्रजीत झ्याकपाक वाटला होता. .
  • Log in or register to post comments

षक्ती कपूर एकंदरीतच घाणेरडा

रेवती
Wed, 10/01/2014 - 18:30 नवीन
षक्ती कपूर एकंदरीतच घाणेरडा आहे. मलाही तो एयरपोर्टावर दिसला होता. त्याच्या स्टींग ऑपरेशनबद्दल काही माहित नव्हते. आता माहित झाले. काय अचरट मनुष्य आहे! बायकोने त्याची खेटराने पूजा बांधायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

आज्जी..

सूड
Wed, 10/01/2014 - 19:13 नवीन
आमची श्रद्धा मात्र भांगेच्या जुडीत तुळस सापडावी तशी आहे बरं !! सगळ्या सुंदर मुलींचे तीर्थरुप असेच असतात, डोक्यावर पडलेले!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आतातरी तुझी 'सुंदर मुलगी हवी'

रेवती
गुरुवार, 10/02/2014 - 18:38 नवीन
आतातरी तुझी 'सुंदर मुलगी हवी' ही अट बदलणारेस का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

लग्न मुलीशी करायचंय की तिच्या

बॅटमॅन
Wed, 10/08/2014 - 15:53 नवीन
लग्न मुलीशी करायचंय की तिच्या बापाशी, त्यावर बहुधा बदलणे- न बदलणे अवलंबून असावेसे वाटते. चॉईस अपना अपना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

कसला हुश्शार रे!!

सूड
Wed, 10/08/2014 - 18:28 नवीन
ब्याट्याच्या या असल्या हुश्शारीचं आपल्याला नेहमीच कवतिक वाटतं ब्वॉ!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सूडक्या, संदर मुलीबरोबर

रेवती
Wed, 10/08/2014 - 18:33 नवीन
सूडक्या, संदर मुलीबरोबर विचित्र बाप फ्री! फ्री! फ्री! तुला चालत असेल तर एकच का, दहा सुंदर मुली तुला सांगून येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

खरंय.

प्यारे१
गुरुवार, 10/09/2014 - 20:59 नवीन
खरंय. श्रद्धा कितीही चांगली असली तरी तिचा शक्ती कपूर चांगला असणंसुद्धा समाजात आवश्यक असतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

दोन टोकाची परीक्षणे आणि मते

तुमचा अभिषेक
गुरुवार, 10/09/2014 - 20:51 नवीन
दोन टोकाची परीक्षणे आणि मते येत आहेत या चित्रपटाला .. गेले दोन आठवडे पेन ड्राईव्हमध्ये पडलाय.. बघावे की न बघावे :(
  • Log in or register to post comments

बाकी चित्रपट जर खरेच रटाळ

तुमचा अभिषेक
गुरुवार, 10/09/2014 - 20:54 नवीन
बाकी चित्रपट जर खरेच रटाळ असेल तर परीक्षणाने नेमका मूड पकडलाय .. म्हणजे रटाळपणा छान उतरलाय अशी कॉम्प्लइमेंट आहे ही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा