मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दुस्री

आतिवास · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
म्या पास. निम्मी, अंक्या, भान्याबी पास. गुर्जी म्हन्लं "आता दुस्रीत". म्या धावत घरी. वराडले, “म्या दुस्रीत ग्येली.” आयनं हसून श्येंगदानं दिलं. आज्जीनं गूळ दिला हातात. आण्णा पेन देनार हायेत. गावभर हिंडून दारात बसली. मंग राम्या, मुक्या, सुर्की दिसली. आगावू हायती दुस्रीची पोरंपोरी. कायबी कराया गेलं की "ए पयलीच्या पोरांनो, मागं व्हा" म्हनत्येत. त्येबी आमच्यावानी साळंला येत्येत; पाडं म्हन्त्येत; गुर्जींची कामं करत्येत; मारबी खात्येत. पन सोताला शाने समजत्येत जादा. म्या म्हन्ली, “लई शानपना नका दावू. म्याबी दुस्रीत हाये आजपासून!” राम्या जीब दावत बोल्ला, “आन्जी दुस्रीत, आमी तिस्रीत!” म्या तिस्रीत जाईल तवा हे चवथीत. म्हंजे आमी कितीबी आब्यास क्येला तरी हेच पुडं?

वाचने 25781 वाचनखूण प्रतिक्रिया 62

संग्राम गुरुवार, 05/15/2014 - 03:04
आन्जी ब्याक! >>म्हंजे आमी कितीबी आब्यास क्येला तरी हेच पुडं? ..... निरागस प्रश्न :)

In reply to by बालगंधर्व

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/15/2014 - 18:32
त्मच म्हन्न क्ळ्ल न्हि. मरठित सन्गा. कोण म्हणतोय रे की, या बेशुद्ध कोलांट्या उड्या आता विनोदी न वाटता लक्ष वेधण्याचा करूण प्रयत्न वाटत आहेत म्हणून ?

In reply to by आदूबाळ

नाय, नाय. "त्य चुप्य प्येयस्त अहे"*. तेम्च इन्गलिश सपेलिन्ग पन ब्यकार अस्नार्च. (बेशुद्ध टाईप करण्याचा त्रास करून घेऊन लोक काय म्हणून स्वतःची फजिती करून घेतात बॉ? ह्याला स्वपिडन टाईपचं सॅडिझम म्हणता येईल का?)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन Sun, 05/18/2014 - 14:20
(बेशुद्ध टाईप करण्याचा त्रास करून घेऊन लोक काय म्हणून स्वतःची फजिती करून घेतात बॉ? ह्याला स्वपिडन टाईपचं सॅडिझम म्हणता येईल का?)
तुम्हांला मॅसोकिझम म्हणायचं असावं बहुधा.

In reply to by बॅटमॅन

नाय, नाय ! ही निर्बुद्ध टायपिंग करताना "स्वपीडन" करून घेऊन नंतर "स्वतःचे हसे" आणि "दुसर्‍याचे पीडन" करण्यात आनंद समजणारी चोम्प्लिचतेद च्रोनिच "ट्रीप्पल व्हॅम्मी" केस आहे ;) =))

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/15/2014 - 10:50
आंजीच्या पराब्लेम्वर माज्याकडं येक आयड्या हाय ! आंजी लई डोस्केबाज हाय. दुस्री-तिस्रि येका वर्सात करून तिला फुडच्या वर्शि यकदम तिस्रीत टाका की वो, अतिवास मॅडम. मंग आंजीला राम्या-मुक्या-सुर्कीला ठेंगा दाकवता यील :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कुर्पया "यकदम तिस्रीत टाका" आयवजी "यकदम चौतीत टाका" आसं वाचा. गलतिशे मिस्टेक व्हुवा भाय ;)

चिगो गुरुवार, 05/15/2014 - 10:54
म्हंजे आमी कितीबी आब्यास क्येला तरी हेच पुडं?
आन्जे आन्जे.. अगं किती गं दुखः ते तुझं? आतिवास ताईंच्या लेखणीतून उतरलेली आणखी एक सुंदर निरागस आन्जीकथा..

धर्मराजमुटके गुरुवार, 05/15/2014 - 11:11
म्या तिस्रीत जाईल तवा हे चवथीत. म्हंजे आमी कितीबी आब्यास क्येला तरी हेच पुडं? त्या लहान मुलीचं सोडून द्या हो. पण यालाच प्राक्तन म्हणतात. मी पैलीतून दुस्त्रीत गेलो हयाचा आनंद न मानता तो तिस्त्रीत गेला म्हणून दु:खी होणार्‍यांची संख्या जगात कमी नाहीये.

एस गुरुवार, 05/15/2014 - 11:22
म्या धावत घरी. वराडले, “म्या दुस्रीत ग्येली.” आयनं हसून श्येंगदानं दिलं. आज्जीनं गूळ दिला हातात. आण्णा पेन देनार हायेत.
आमच्याकडून आंजीला फूल... Rose

पैसा गुरुवार, 05/15/2014 - 11:31
सकाळीच वाचलं. आजचा दिवस मस्त जाणार!

प्यारे१ गुरुवार, 05/15/2014 - 15:49
ऐला! खासच. बाकी 'शरेत' सोत्ताशीच लाव म्हना आन्जीला.

बबन ताम्बे गुरुवार, 05/15/2014 - 16:10
आवडली आंजीचा निरागसपणा. "त्येबी आमच्यावानी साळंला येत्येत; पाडं म्हन्त्येत; गुर्जींची कामं करत्येत; मारबी खात्येत.पन सोताला शाने समजत्येत जादा." आमच्यावानी कधी कधी साळंला बुट्टी पण मारते. :-)

हाडक्या गुरुवार, 05/15/2014 - 16:26
त्येबी आमच्यावानी साळंला येत्येत; पाडं म्हन्त्येत; गुर्जींची कामं करत्येत; मारबी खात्येत. पन सोताला शाने समजत्येत जादा. म्या म्हन्ली, “लई शानपना नका दावू. म्याबी दुस्रीत हाये आजपासून!” राम्या जीब दावत बोल्ला, “आन्जी दुस्रीत, आमी तिस्रीत!” म्या तिस्रीत जाईल तवा हे चवथीत. म्हंजे आमी कितीबी आब्यास क्येला तरी हेच पुडं?
हे बाकी शाश्वत सत्य बोलली बघा.. कितीही ठरवलं तरी तिस्रीतल्या लोकांकडे दुर्लक्ष करता येत नाही. आपण केलं तरी ते आपल्याकडे करतील असं सांगता येत नाही. थोडक्यात हा प्रश्न सहजासहजी सुटत नाही..

राजेश घासकडवी गुरुवार, 05/15/2014 - 17:57
आंजीला म्हणावं, धीर सोडू नगस. त्येंच्या मागं हायेस ते फकस्त आधी जलमले म्हनून. राम्या, मुक्या, सुर्कीपेक्षाबी लय जोर मारून अभ्यास केलास तर ते ज्यवा त्येंच्या आयला 'मॉं मै बीए पास होगया' म्हनून पेढं देऊन कायतरी न्वाकरी करायला लागतील, त्यवा तू तुजं कायतरी वेगळं चालू ठ्यव. नक्की फु़डं जाशील बग. कारण तेच्यानंतर बी लय अंतर बाकी आस्तं.

जयनीत Fri, 05/16/2014 - 04:03
आन्जे पोट्टे नुस्त पास होऊन कसं जमनार? म्हन त्या शाईन्या पोट्टे लोकाईले का ह्या टायामाले म्या फक्त पास झाली, पुढच्या टायमाले वरपास होउन दाखवीन तवाच नावाची आन्जी! कसं?

आतिवास Sun, 05/18/2014 - 19:03
सर्व वाचकांचे आभार. प्रोत्साहनासाठी सर्व प्रतिसादकांचे आभार.

एस Wed, 05/28/2014 - 19:04
ही आन्जी मस्त डोक्यात भरून राहिलीय. एरवी धुरळा उडवत स्कोर सेटल करण्यात धन्यता मानणार्‍या लेखांच्या गदारोळात असं काही पुनःपुन्हा वाचावंसं वाटणारं आंतरजालावर कमीच भेटतं. वाचनखूण लावली आहेच. अजून येऊद्यात. सोबत एखादं धमाल व्यंगचित्र असेल तर अजूनच गंमत वाढेल. :-)

In reply to by एस

आतिवास Fri, 05/30/2014 - 12:17
सोबत एखादं धमाल व्यंगचित्र असेल तर अजूनच गंमत वाढेल. मी कसली चित्र काढतेय? मला चित्रकलेत नापास व्हायची नेहमीच भीती असायची :-) मिपाकर मीता यांनी एक प्रयत्न केला आहे. मी खरडवही वापरत नाही पण माझ्या 'खव'त तुम्हाला मीता यांनी केलेलं रेखाटन दिसेल. कदाचित ते मीता यांच्या 'खव'तही असेल - मला खात्री नाही.

म्हैस Fri, 05/30/2014 - 11:32
लय भारी. आम्ही पयलीत गेलो कि बाई रागवताना म्हणायच्या लहान आहात का बालवाडीतल्या मुलांसारख करताय ते .. दुसरीत गेलो कि म्हणायच्या पहिलीत आहात का? तिसरीत गेलो कि म्हणायच्या अक्कल नाही का पहिली दुसरीच्या पोरांसारखा वागताय ... :-( अतिवास तुमच्या अजून कविता आहेत का? सगळ्या एकत्र कुठे मिळतील ?

In reply to by म्हैस

आतिवास Fri, 05/30/2014 - 12:22
धन्यवाद. हे लेखन कविता नसून 'शतशब्दकथा' (म्हणजे शंभर शब्दांतली कथा) आहे. मला वाटतं तुम्ही माझ्या नावावर टिचकी मारलीत (क्लिक केलंत) की तुम्हाला माझे अन्य लेख पाहायला मिळतील. त्यातल्या नेमक्या शतशब्दकथा कोणत्या आहेत त्याचा दुवा बहुधा देता येणार नाही - मला तरी देता येणार नाही!

In reply to by आतिवास

सखी Fri, 05/30/2014 - 21:44
मला वाटतं तुम्ही माझ्या नावावर टिचकी मारलीत (क्लिक केलंत) की तुम्हाला माझे अन्य लेख पाहायला मिळतील. -खरतर असे केले तर तुमचे लेख आणि प्रतिसादही दिसतात. फक्त तुमचं लेखनच बघायच असेल तर इथे जा http://www.misalpav.com/user/13089/authored यातल्या जनातलं, मनातलं मधल्या शिर्षकांवर टिचकी मारली तर बहुतेक सर्व तुमच्या शतशब्दकथा आहेत. आणि अतिवासताई ते पुस्तकाचे खरच मनावर घ्या इथे तुमचे खुप फॅन, ऐसी आहेत :)