Skip to main content

अंडी पालक

अंडी पालक

लेखक जागु
Published on बुधवार, 30/04/2014
साहित्यः ६-७ अंडी एक जूडी पालक दोन छोटे किंवा एक मोठा कांदा चिरून १ चमचा आल, लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट अर्धा चमचा हळद १ चमचा मसाला पाव चमचा हिंग अर्धा चमचा गरम मसाला चवी नुसार मिठ अर्धा किंवा पाव लिंबू फोडणी पुरते तेल. कृती १) प्रथम अंडी उकडून, साले काढून त्याला सुरीने हलक्या हाताने वरून चिरा द्या. २) पालक गरम पाण्यात थोडा वाफवून त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करुन घ्या. ३) भांड्यामध्ये तेल गरम करून त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होई पर्यंत शिजवा. ४) शिजलेल्या कांद्यावर हिंग, हळद, मसाला घालून जरा परतवा. ५) आता वरील मिश्रणावर पालक घालून थोड ढवळा व त्यात गरजे नुसार मिठ, लिंबू रस व गरम मसाला घालून ढवळा. ६) ह्या मिश्रणाला थोडी उकळी आली की त्यात उकडलेली अंडी सोडून हलक्या हाताने ढवळा व झाकण देऊन थोडी वाफ येऊ द्या. तयार आहे अंडी पालक. ही मी माझ्या मनानेच बनवलेली रेसिपी आहे. चविला अप्रतिम लागते ही डिश. माझ्या दोन्ही मुलींना प्रचंड आवडला हा प्रकार. टिपः चिरा देताना अंड्याचे तुकडे होउ देऊ नका. बलक लागे पर्यंतच चिर द्या म्हणजे पालक मसाला आत मुरेल.

याद्या 14666
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

वाह. दिसतेय तर सुंदर. नेहमीच्या अंडा मसाला पेक्षा वेगळे. एकदा करुन बघायला हरकत नाही. :)

In reply to by जागु

"मधून मधून फेरफटका मारून जात होते." - जागू ताई, तुमच्या पाककृती पाहून, तोंडाला पाणी सुटून भुकेने जीव जायची वेळ येते. आता आणखी वर कशाला ह्या बिचार्या 'फेरफटक्याला' मारताय? ;)

मस्त पाकृ आहे. पालक पनीरामधले पनीर ताजे नसेल तर अ‍ॅलर्जी येते. अंडी कधीही सेफ! अशाच प्रकारची पण जरा वेगळी पाकृ बहुतेक मंगला बर्वेंनी दिली होती. त्यात पालकावर छोटे खड्डे करून अंडी फोडून टाकायची आणि मग शिजवायची अशी कृती होती.

In reply to by पैसा

हो. मंगला बर्वेंच्या पाककृतीत अंडी फोडुन घालायची होती. पण त्यात पालक नव्हता माझ्या मते. माझ्या आयुष्यातली वाचुन बनवलेली पहिली रेसीपी होती मंगला बर्वेंची. :)

फारच कातील आलाय. डिशप्रमाणे रंगसंगतीहि सुरेख आहे.

भारीच !! मी यात अंड्या ऐवजी कोळंबी घालतो. ते काँबीनेशनही भन्नाट लागतं.

In reply to by गणपा

मी ह्या पालकाच्या रश्श्यात, कोंबडीच्या तंगड्या घालतो. मस्त लागतात. कधी-कधी ह्यातच तळलेले बटाट्याचे काप किंवा फ्रेंच फ्राइज घालतो. दोन्ही काँबिनेशन मला आवडतात.पण.....पण.... पालकाची चव खरी खुलते ती, कोवळ्या मटणाबरोबर.

In reply to by मुक्त विहारि

पालकाची चव खरी खुलते ती, कोवळ्या मटणाबरोबर.
आहाहा!!! कधी खाल्लं नाही पण नक्की करुन बघणार.

In reply to by शुचि

मटण शक्यतो ताजे आणि कोवळे हवे.(अगदी, आसनगांव जवळच्या शहापूरला मिळते ना तसे.) आणि पालक मटणाच्या पाण्यात शिजवावा.आणि मग त्याची ग्रेव्ही करावी. म्हणजे आधी मटण बर्‍यापैकी शिजत आले, की त्या मटणाच्या पाण्याचा उपयोग पालकासाठी करावा. आणि सगळ्यांत महत्वाचे, ह्या पा.क्रु.चे फोटो काढून ठेवावेत.श्रावण महिन्यांत कामाला येतात.

In reply to by मुक्त विहारि

पालक मटणाच्या पाण्यात शिजवावा.आणि मग त्याची ग्रेव्ही करावी.
वावा!! मस्त आयडीया. आमचे गाव लहान असल्याने इथे फार्म्-रेझ्ड बोकडाचे अत्यंत ताजे मटन घरपोच मिळते. नक्की करेन.
आणि सगळ्यांत महत्वाचे, ह्या पा.क्रु.चे फोटो काढून ठेवावेत.श्रावण महिन्यांत कामाला येतात.
हाहाहा

In reply to by मुक्त विहारि

ह्या पा.क्रु.चे फोटो काढून ठेवावेत.श्रावण महिन्यांत कामाला येतात. यानबूला श्रावणात ही पाकृ केल्यास फोटो अजिबात काढू नयेत... काढलेच तर फोटोत तारीख दिसणार नाही याची पूर्ण खबरदारी घ्यावी. (घरचे जास्तच हुशार असले तर इमेज फाईल्सच्या तारखा बदलायची आयड्या करायाला इसरू नै) ;) किंवा ब्येस्ट म्हंजे कोनालाबी अजाबात घाब्रू नै =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ह्या आखाती देशांत ताजे मटण मिळणे जरा दुरापास्तच. तसे आमच्या यानबूला ताजी मासळी मात्र एकदम फक्कड मिळते, बघा. जमल्यास या. मस्त कोलंबी भात खावू, सौदी शँपेन पिवू आणि ए.सी.त बसल्या बसल्या इतर मिपाकरांबरोबर गफ्फा हाणू.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पण काय करणार? आज काल सौदी शँपेन आणि नॉन अल्कोहोलिक बियर पिवूनच तहान भागवावी लागत आहे. जावू दे. नकोच त्या रम्य आठवणी.आता जूनमध्येच उपास सोडावा लागणार.

In reply to by मुक्त विहारि

पालक-मटण वाचून मस्कत मधला अनुभव आठवला. शनिवार असल्याने मला व्हेजिटेरियन जेवण लागेल असे मेसमधल्या पाकिस्तानी खानसाम्याला सांगीतले तर तो म्हणाला: "कोई प्रॉब्लेम नही साहब. आज पालक-गोश्त बनाया है । सब बोटी निकालके सिर्फ पालक रोटीके साथ पेश करता हू ।" :)

In reply to by मुक्त विहारि

पालक को या गोश्त को?

In reply to by दिपक.कुवेत

पाकिस्तानी के मेंदू को....

In reply to by गणपा

काही नाही तर निदान, पालक-कोलंबीची रेशीपी येवू द्या. आणि त्यातून पालक-गोश्त दिलेत तर फार उत्तम.

In reply to by गणपा

आयला, हा लेख म्हणजे पालक-जत्राच झाला की, आता कूणी ताकातला पालक आणि डाळ-पालक, ह्यांची रेसीपी दिली की झाले. अरेच्चा, ती पालक-भजी राहिलीच की.

In reply to by कवितानागेश

ठ्ठो.... एकदम चपखल शब्द. पण ह्या पालक सभेचा अध्यक्ष कोण? पालक गोश्त की बैदा-पालक?

आवडली. पण ह्या डिश बरोबर लिंबू मस्ट आहे.

मस्तच दिसतंय. पालक पनीर आणि अंडयाची भुर्जी पेक्षा नवीन प्रकार. करून पाहायला हरकत नाही.

वाह जागुताई जबरी पाकृ :) पालक-पनीर, आलू-पालक, कॉर्न-पालकला उत्तम पर्याय. फोटो मस्त्त्त्तं आलाय अगदी तोंपासू. मी नक्की करुन बघेन हे .

सही क्रिएटीव्ह कधी ऐकले पाहिले नव्हते आणि चव जीभेवर घोळवायचा विचार करता टेस्टी लागेल, तसेच पालक झेपणार्‍यांना नक्की आवडेल असे वाटतेय. अवांतर - मला याला अंडी पालक ऐवजी बैदा पालक ऐकाबोलायला बरे वाटेल. :) अवांतर क्रमांक २ - आताच मी मटणाच्य चटणीत टाकलेले उकडलेले अंड खाऊन आलो. हे नेहमीच करतात आमच्याकडे. मटण वाढवायला म्हणून नाही तर मटण एके मटण खाऊन बोअर होण्यापेक्षा एक अंड्याचा फ्लेवर वाढवायला.

In reply to by तुमचा अभिषेक

आयला, एकवेळ दारूच्या बाबतीत हे "झेपणे" वगैरे ठीक होते.पण चक्क पालकाच्या बाबतीत, अब तो तेरेकू पालक-गोश्त खाणेके लिये बुलाना ही पडेगा. अभी मी डोंबिवलीमें आयेगा ना तब तेरे कू बुलायेगा. तूम आना रे बाबा.....

In reply to by स्पंदना

नाही नाही, मी झेपणे हा शब्द पचणे या अर्थाने नाही तर चव आवडणे या अर्थानेच वापरला होता. खरे तर मी शुद्ध मांसाहारी असल्याने सर्वप्रकारचा शाकाहार घासफूस मानणार्‍यांच्या गटातला आहे तरीही पालक आणि थोडीफार मेथी हे पालेभाजीचे प्रकार खातो. तर मी माझा स्वताचा बेंचमार्क ठेऊन वरचे विधान केले होते. अन्यथा लोक्स वांगे, भेंडी, सुरण, पडवळ, भोपळा, दुधी, वाल, राजमा, तोंडली, गवार, वगैरे वगैरे भाज्या कश्या आवडीने खातात हे माझ्या आकलनाबाहेरील.. :) असो, पालक मला झेपते तर पालक चिकन मटण अंडी पैकी काहीही घालून केलेले खायला मी केव्हाही तयार आहे :)

In reply to by तुमचा अभिषेक

आम्हा शाकाहारी घरातून मांसाहाराचे संस्कार घेतलेल्यांचे एक बरे असते. की आम्हाला वाल-पडवळ किंवा मटकी-तोंडली ह्यांच्या इतकेच प्रॉन्स-पालक आणि खिमा-घोटाळा पण प्रिय.

मस्त ग जागु! आता असली अंडी घातलेली पाककृती करावी लागणारच नाही का? ;) नशिबाने पालक आणि अंडी दोन्ही आहेत. बघते करुन.

हिरव्यागार पालक ग्रेव्हीवर पांढरीशुभ्र अंडी ! एकदम तोंपासु.

पालक सभा मस्त रंगलेय. अशी डिश असते हे मला माहीतच नव्हत. मला वाटल मीच तयार केली आणि आपली कॉलर ताठ केली. धन्यवाद सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल.

ह्या विकांताला अंडा-पालक पक्का... मस्त दिसतेय पाकृ.

लक्षच गेले नव्हते माझे ईकडे. शेवटचा फोटु भन्नाटच.