✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझी बायपोलर डिसॉर्डर

श
शुचि यांनी
Mon, 04/21/2014 - 21:04  ·  लेख
लेख
मी डॉक्टर नाही, हे एक प्रांजळ आत्मकथन आहे केवळ या २ हेतूनी केलेल (१) की जर कोणी अशी लक्षणे अनुभवत असेल तर त्यांना मदत व्हावी (२) माझ्या समाधानाकरता की माझे सत्य सांगीतले, माझी कथा सांगीतली या धाग्यावर अवांतर न केल्यास उपकार होतील ____________________________________________
"मी उद्याची अपॉईंट्मेन्ट घेतली आहे, एकतर तू सायकिअ‍ॅट्रीस्ट कडे चल किंवा मला घटस्फोट दे. या दोनांव्यतिरीक्त दुसरा पर्याय मी तुला देत नाही."
आजवरच्या आयुष्यात मी ऐकलेले सर्वात प्रभावी अन निर्वाणीचे वाक्य/संवाद. ज्या वाक्याने अन पुढील घडामोडींनी संपूर्ण आयुष्यालाच एक सकारात्मक कलाटणी मिळाली असे हे वाक्य मी तब्बल ९-१० वर्षांपूर्वी ऐकले. ऐकले अन तेव्हा मी घाबरले. मला कळेचना माझा नवरा असे का म्हणतो आहे? म्हणजे भांडणे तर सर्वांकडे होतात. नवरा-बायको म्हटले की मतभेद हे अनिवार्यच नाही का? हां आता आमची वरचेवर होतात, रोज होतात, मी आदळाअपट करते अन तो घराबाहेर निघून जातो, मी रडते, धुसफुसते अन मग शांत होते पण म्हणून मी वेडी आहे? हा मला वेडी ठरवतोय? होय सायकिअ‍ॅट्रीस्ट्कडे जाणे/दाखविणे म्हणजे वेडे असणे हीच माझीदेखील समजूत होती. मला हे दिसत नव्हते, कळत नव्हते की मी अतिशय अ‍ॅग्रेसिव्ह होते आहे, सतत भांडते आहे, वस्तू फेकते आहे. रात्री मी दचकून उठे.... रोज रोज रोज!!! पण मला वाटे सर्वांना निदान बर्‍याचजणांना ही समस्या असते. मला बर्‍याच रात्री झोप नीट लागत नसे. कधी अतिशय शांतीचा अनुभव येई तर ९०% वेळा पूर्वायुष्यातील वाईट साईट प्रसंग आठवून, अंगाची लाही लाही होई. सतत चिडचिडेपणा, अति अन निरर्थक आवेश (अ‍ॅग्रेसिव्हनेस) अन भांडखोर वृत्ती. अन शिवाय माझी "साडेसाती" चालू आहे हे का नाही विचारात घेत हा? साडेसाती संपली की हे सर्व बंद होईल. होईल???? ______________________________________________________ दुसर्‍याच दिवशी आम्ही पटेल डॉक्टरांकडे गेलो. मी एक प्रश्नावली भरली व वाट पहात आम्ही वेटींग रुम मध्ये बसलो. खूप गर्दी होती. पण ते सर्व लोक वेडे होते अन माझी खात्री होती मी त्यातली एक नाही. माझा आत्मविशवासच दांडगा होता, अन स्वतःबद्दलच्या कल्पना अनरिअ‍ॅलिस्टीक!!! मला माहीत होते आम्हाला डॉक्टर "मॅरेज काऊन्सिलींग" बद्दल काही सांगतील अन मग सुट्टी!! पण आमची वेळ आली, डॉक्टरीण बाई ५-७ मिनीटे माझ्याशी बोलल्या अन निदान झाले - ------बायपोलर डिसॉर्डर!!!------ मला काही गांभीर्य लक्षात आले नाही कारण ते कळण्याची माझी मनस्थितीही नव्हती ना माहीती. त्या दिवशीच प्रिस्क्रिप्शन दिले अन प्रायोगिक तत्वावर माझी औषधे तत्काळ सुरु केली गेली. ____________________________________________________________ घरी आल्यावर मी वाचले अन मला कळले - हा एक गंभीर स्वरुपाचा मानसिक आजार आहे, मेंदूतील असंतुलनाचे निदर्शक असलेला. एक प्रकारची मूड डिसॉर्डर!!! या आजारात एखाद्या लंबकाप्रमाणे मूड हेलकावे खातो. नैराश्याची गर्ता अन उन्मादाचा पिसाटपणा या दोहोंच्या मध्ये मूड हिंदोळे घेत रहातो. भयंकर!!!! माझा विश्वासच बसेना.
नाही मी सांगते घरातच दोष आहे. वास्तुदोष!!! वास्तुदोष!! भूत आहे हो घरात. हे घरच पछाडलेले आहे. घर बदलले तर सर्व काही सुरळीत होईल. अगदी १००%.
..........मी २० वर्षाची असताना, या विश्वासातूनच आम्ही घर बदलले. कारण? कारण मला रात्री भयस्वप्ने पडत. दरदरुन घाम फुटे अन मी आई-बाबांकडे धाव घेई त्यांना तक्रार करे. मला इरॅशनल भीती वाटे - मी घर गिळेन याची, मी गादी गिळेन , मी टीव्ही गिळेन ........ अगदी अगदी इरॅशनल असे पण माझा कंट्रोल नसे. पण भयंकर भीती वाटे..... पॅनिक अ‍ॅटॅक्स!!! सर्वांची खात्री होती भूत अन वास्तुदोषाबद्दल. अर्थात घर बदलूनही काही फायदा झाला नाहीच मला रात्री किंचाळ्या ऐकू येणे चालूच राहीले. पण वेळेवर औषधोपचार न मिळाल्याने, माझी मात्र अपरिमीत हानी झाली - अभ्यासावर परीणाम झाला, लग्नानंतर कौटुंबिक स्वास्थ्याची पूर्ण वाट लागली. _____________________________________________________ पटेल डॉक्टरांनी ताबडतोब औषधे सुरु केली. पण ती लागू पडेनात, कधी दिवसा पेंग येई तर कधी रात्री ट्क्क जाग येई. कधी अत्यंत वाईट प्रसंग आठवून मी तासन तास गुडघ्यात डोके घालून बसे .... होय अगदी सार्वजनिक ठिकाणीही. रात्री कोणीतरी चापट मारुन जागे करते आहे असले भास होत. दचकून उठणे व निद्रानाश हे तर पाचवीला पूजले होते. बरेचदा वेळ अगदी संथपणे पुढे सरके, अक्षरक्षः गोगलगाईच्या गतीने. अन्य कोणाला त्याचा त्रास होत नसे पण मला अतिशय त्रास होई. या सर्वांचे कारण होते दर ३ दिवसांनी बदलणारी औषधे अन लागू न पडणे हा फॅक्टर. दुहेरी भीती ही असे की अरे बापरे औषधे संपली तर पुढे काय - शॉक ट्रीटमेन्ट??? पण घाबरण्याचे कारण नव्हते, आता अनेक अनेक अगणित औषधे निघालेली आहेत अन शॉक ट्रीट्मेन्ट्ची खरच फारशी गरजच उरलेली नाही. निदान असा विश्वास मला डॉक्टरीणबाई देत. शेवटी औषधांचे एक कॉकटेल सापडले, ती औषधे फाइन ट्यून झाली अन हळू हळू मी बरी होऊ लागले. अक्षरक्षः आमूलाग्र बदल घडू लागला. मूड, व्रुत्ती, विचार, स्वप्ने सार्‍यात बदल घडू लागला.अन अक्षरक्षः स्फिन्क्स पक्षासारखी झेप घेत मी बरी होऊ लागले. कधीही दुसर्‍याचा तीळमात्र विचार न करणारी मी, माझ्या घासातून घास वेगळा ठेऊ लागले. सततची चीड्चीड संपली, तिची जागा शांततेने घेतली अन मुख्य म्हणजे काही पूर्वायुष्यातील काही भयंकर प्रसंग आयुष्यात पहील्यांदा विस्मृतीत गेले. मला जग सकारात्मक भासू लागले. स्वप्नेही लॉजीकल सिक्वेन्स असलेली पडू लागली. कमाल आहे या औषधांची! जे जग खरच वैर्‍यासारखे भासे तेच आता आनंददायक वाटू लागले. ____________________________________________________ नवर्‍याने या आजारात अथक अथक अन निव्वळ अमेझिंग साथ दिली. हे माझे पूर्वसुकृत अन पुण्याइ का काय माहीत नाही पण जिथे सर्वांनी होय सर्वांनी त्याला सांगीतले होते की हिला वेड्यांच्या इस्पितळात फेकून दे, तिथे त्याने मला चिकाटीने त्या नरकातून बाहेर काढले. मला रोज व्यायाम करायची सक्ती केली, फक्त कॉम्प्लेक्स अन पौष्टीक अन्न खाण्याची सवय अंगी बाणवली. माझ्या झोपेच्या वेळा आम्ही "रिलीजसली" पाळू लागलो. आयुष्याला एक वलण आले, एक क्वालिटी आली. हा आजार बरा होत नाही. मी मेल्यावरच हा संपणार पण ... पण ....समाधानाची बाब ही की "अत्यंत प्रेडिक्टेबल अन मॅनेजेबल" आहे. औषधे-आहार-निद्रा व व्यायाम या चार भक्कम पायांवर डोलारा सांभाळला की हा आवाक्यात येतोच येतो. तरता येतो. आहे भयंकर पण वेसण तुमच्या हातात असते.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
57081 वाचन

💬 प्रतिसाद (167)

प्रतिक्रिया

प्रसिद्ध ब्रिटीश विनोदवीर

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 04/25/2014 - 02:13 नवीन
प्रसिद्ध ब्रिटीश विनोदवीर स्टीव्हन फ्राय याने स्वतःच्या बायपोलरबद्दल बनवलेला माहितीपट - याचा दुसरा भागही आहे, तो ही पहा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद, बघते आदिती. मी

शुचि
Fri, 04/25/2014 - 03:57 नवीन
धन्यवाद, बघते आदिती. मी "अन्क्वाएट माईंड" पुस्तक वाचलय अन नेट्फ्लिक्स वरची बायपोलर्वरची एक डॉक्यु. पाहीली आहे. वरील क्लिप्स देखील पाहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

सलाम

सुधीर
Fri, 04/25/2014 - 08:56 नवीन
__/\__ शब्द नाहीत.
  • Log in or register to post comments

सर्वप्रथम तुम्हा दोघांचेही

चावटमेला
Fri, 04/25/2014 - 10:05 नवीन
सर्वप्रथम तुम्हा दोघांचेही हार्दिक अभिनंदन आणि पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

शुचि,

संजय क्षीरसागर
Fri, 04/25/2014 - 13:08 नवीन
सगळ्या मानसिक आजारांची एकच किमया आहे, ते तुम्हाला स्वतःपासून दूर नेतात. जेंव्हा तुम्ही एकसंध होता तेंव्हा बरे होता. हे एकसंध होणं स्वास्थ्य आहे; आणि मेंटल अ‍ॅक्टिवीटी कह्यात असणं हे मानसिक आरोग्याचं एकमेव लक्षण आहे. प्रेम हे मनाला एकसंध करणारं सर्वोच्च औषध आहे, कारण प्रेमात तुम्ही हृदयाशी संलग्न होता. प्रेमात मेंटल अ‍ॅक्टिवीटी शून्यवत होते आणि शरीर आपापतःच मेंदूच्या संप्रेरकांचं कार्य सुधारण्याच्या कामी लागतं. सो इन अ वे, योर हजबंड वॉज योर फर्स्ट मेडिसीन. (अँड ऑफ कोर्स, ही विल कंटिन्यू टू बी सो टिल द एंड.) पती-पत्नी नात्यातला पारस्पारिक अनुबंध, कोणत्याही मानसिक आंदोलनात (दोघांचाही) सर्वात मोठा आधार आहे. आणि त्यामुळेच भारतीय संस्कृतीत विवाहाला केंद्रस्थानी ठेवलंय. मानसिक अस्वास्थ्याला (हा आजारापेक्षा विधायक शब्द आहे, मग ती बाय-पोलर डिसॉर्डर असो, स्किझोफ्रेनीया की अल्झायमर); न्यूरो, सायको, फिजीओ आणि सिच्युएशनल अशी चार परिमाणं आहेत. १) शारीरिक दृष्ट्या मेंदू उत्तम राहण्यासाठी सर्वांगासन आवश्यक आहे त्यानं मेंदूचा रक्तपुरवठा सुरळीत होतो. २) सुप्तवज्रासनात सुखावह होईल तीतका वेळ राहाण्यानं आणि त्या आसनात सावकाशपणे चेहरा डावीकडे व उजवीकडे फिरवण्याचा व्यायम केल्यानं न्यूरो सिस्टमची इफिशियंसी (फ्लेक्सिबिलीटी) कायम राहाते. ३) अनुलोम-विलोम या प्राणायमानं न्यूरो सिस्टमची कार्यक्षमता वाढते. भ्रामरी हा प्राणायाम सायको सिस्टीमसाठी सर्वोच्च मानला गेला आहे, त्यानं मनावर उत्तम नियंत्रण राहातं. ४) सिच्युएशनल फॅक्टर्स तुमच्या अवाक्या बाहेर असतात पण त्यावर मात करण्याचा उपाय म्हणजे प्रसंगाकडे पाहाण्याचा तुमचा दृष्टीकोन आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी केलेलं बौद्धिक समायोजन हे आहेत. यू आर लकी, आय विश यू बोथ अँड योर फॅमिली अ हॅपी लाईफ. शेवटी एक नक्की, बायपोलर डिसॉर्डर शेवटापर्यंत बरोबर राहाणार हा विचार निराधार आहे आणि तशा भीतीखाली राहाण्यात अर्थ नाही. कोणतंही मानसिक आंदोलन तुम्हाला स्वतःपासून किती दूर नेतं याला महत्त्वं नाही, किती कमीतकमी वेळात तुम्ही स्वतःशी पुन्हा कनेक्ट होता ते खरं कौशल्य आहे. आणि हे एकदा समजलं की तुम्ही कायम निर्भय आणि आनंदी राहाल.
  • Log in or register to post comments

सं क्षी, विस्तृत

शुचि
Fri, 04/25/2014 - 15:40 नवीन
सं क्षी, विस्तृत प्रतिसादाबद्दल आभार.
शारीरिक दृष्ट्या मेंदू उत्तम राहण्यासाठी सर्वांगासन आवश्यक आहे त्यानं मेंदूचा रक्तपुरवठा सुरळीत होतो.
सहज करता करता मला एकाच आसन आत्तापर्यंत जमलेले आहे ते म्हणजे सर्वांगासन. अन तेही मजेमजेत , जिममध्ये मैत्रीणीशी स्पर्धा करत/खेळत सापडलेले आसन. मला वाटायचे की थायरोईड वरती ते उपयुक्त आहे पण जर मेंदूही कार्यरत रहाणार असेल तर मी नक्कीच रोज करत जैन.
तुम्ही स्वतःशी पुन्हा कनेक्ट होता ते खरं कौशल्य आहे.
होय क्वालिटी ऑफ लाइफ़ यालाच आमचाही अग्रक्रम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

सर्वांगासनानं मेंदूला रक्तपुरवठा आणि थायरॉइड कार्यक्षम राहाणं

संजय क्षीरसागर
Fri, 04/25/2014 - 21:06 नवीन
ही दोन्ही कामं होतात. बोकोमा (Bokoma) हेडमसाजरनं मेंदूच्या सर्व पेशी कार्यन्वित राहायला मदत होते. हा अत्यंत साधा, सोपा आणि अत्यंत स्वस्त डिवाइस आहे. Image removed. सुप्तवज्रासन जमायला थोडा वेळ लागेल पण इट इज द बेस्ट रेमीडी फॉर न्यूरो फिटनेस Image removed. प्राणायामावर लिहीन तेवढं कमी आहे कारण सर्व सायकी आणि इंडोक्राईन सिस्टम श्वासाच्या लयीशी संबधित आहे. तरीही अनुलोम-विलोमनं (मध्यनाडीतून श्वसन सुरु झाल्यानं) मेंदूला ऑक्सिजन मिळतो आणि भ्रामरीमुळे मेंदूच्या सर्व पेशी सक्षम राहून अल्झायमर होण्याची शक्यता नाहीशी होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

ते बोकोमा मस्त वाटतय राव!!!!

शुचि
Fri, 04/25/2014 - 21:10 नवीन
ते बोकोमा मस्त वाटतय राव!!!! मला माहीत नव्हते असे काही यंत्र उपलब्ध आहे. आताच अ‍ॅमेझॉनवर मागवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

येस,

संजय क्षीरसागर
Fri, 04/25/2014 - 21:53 नवीन
इट इज अ लवली, हँडी डिवाईस अँड गीवज द बेस्ट रिलॅक्सेशन एनी टाईम, ट्राय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

'बेड, बाथ अँड बियॉंड'

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 04/25/2014 - 22:00 नवीन
'बेड, बाथ अँड बियॉंड'मध्येही मिळेल. स्वस्त आहे बरंच. अॅमेझॉनवर पोस्टेजचाच खर्च जास्त होईल. तुला काय सोयीचं आहे ते पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

वा!!! धन्यवाद. जाइनच बेड अँड

शुचि
Fri, 04/25/2014 - 22:01 नवीन
वा!!! धन्यवाद. जाइनच बेड अँड बाथ मध्ये. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अच्छा याला बाकोमा म्हणतात तर.

प्रकाश घाटपांडे
Sat, 04/26/2014 - 09:57 नवीन
अच्छा याला बाकोमा म्हणतात तर. फार मस्त असते. आपले आपण करण्यापेक्षा इतरांनी आपले डोके मसाज केले तर एकदम भारी इफेक्ट येतो. याला मी ङ ङ इफेक्ट म्हणतो. एकदम ब्रह्मानंदी टाळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

खूपच उशिरा पाहिला लेख!

अनन्न्या
Sat, 04/26/2014 - 16:25 नवीन
साष्टांग दंडवत!!! आता सर्व काही छानच होईल्, अगदी खात्रीने!! पुढील आयुष्यासाठी खूप साय्रा शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

सलाम

चाणक्य
Sun, 04/27/2014 - 04:15 नवीन
तुमच्या धैर्याला, स्वतःमधे बदल घडवून आणण्याच्या तुमच्या दुर्दम्य ईच्छाशक्तीला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पतींच्या साथ देण्याला !
  • Log in or register to post comments

!

धमाल मुलगा
Sun, 04/27/2014 - 20:07 नवीन
फार भोगलंस गं. आणि हे असं जाहीरपणे मांडण्याचं धाडस पाहता नि:शब्द झालो आहे.
  • Log in or register to post comments

त्रिवार सलाम!

समीरसूर
Tue, 04/29/2014 - 14:57 नवीन
शुचि जी, हा धागा नजरेतून इतके दिवस निसटला याचे अतीव दु:ख होत आहे. त्याबद्दल क्षमस्व! आपल्या धैर्याला त्रिवार सलाम! आपण (आणि आपले पती) कुठल्या परिस्थितीमधून गेल्या असाल याची कल्पनादेखील करता येणे कठीण आहे. घरातल्या अशा कुंद वातावरणामुळे घरात राहणार्‍यांची कशी ससेहोलपट होते हे ठाऊक आहे. काहीच पुढे सरकत नाहीये असे वाटत राहते. बाकीचे जग, आप्तेष्ट, मित्र, आणि इतर सगळे या घोडदौडीत आपल्या शतयोजने पुढे निघून गेलेत आणि आपण या दलदलीत कसे अडकून पडलो आहोत या विचारांची काजळी मूळ आजाराइतकीच मन आणि बुद्धी पोखरून तीव्र वेदना देणारी असते. तुमच्या पतिराजांना मनापासून सलाम! सोबत राहून हे सगळं सहन करणं आणि सगळं सुरळीत करण्यासाठी अथक परिश्रम करणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. रोजच्या जगण्यात लक्ष लागत नाही; दिवस-रात्र मेंदू विचारांनी पोखरला जातो. घर भकास होत जातं. तुम्ही उभयतांनी खूप धैर्याने या संकटाचा सामना केलात आणि समंजसपणा दाखवून औषधोपचार, आहार, व्यायाम या उपचारसूत्राचा अवलंब करून तुम्ही समाधानी आयुष्य जगत आहात हे वाचून बरे वाटले. आपल्याला हार्दिक शुभेच्छा! आपण एका सार्वजनिक संकेतस्थळावर आपल्या आजाराविषयी व्यक्त होण्याचे धाडस केलेत ही तर खरंच खूप धाडसाची गोष्ट आहे. कुठल्याही प्रकारे मदत होऊ शकेल असे वाटल्यास अवश्य सांगा. आजानुकर्ण यांचा अनुभवदेखील सुन्न करणारा होता. आयुष्यात असे काही टप्पे येतात बहुधा. भक्कम साथसोबत, मित्र-नातेवाईक यांचा आधार, औषधी, व्यायाम, आहार, आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर आपण नक्कीच यातून बाहेर पडू शकतो आणि एक चांगले सुदृढ आयुष्य जगू शकतो हाच संदेश या अनुभवांवरून मिळतो. हे अनुभव कथन केल्याबद्दल धन्यवाद. --समीर
  • Log in or register to post comments

...

मन१
गुरुवार, 02/11/2016 - 15:00 नवीन
चांगलं लिहिलस गं
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा