✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

माझी बायपोलर डिसॉर्डर

श
शुचि यांनी
Mon, 04/21/2014 - 21:04  ·  लेख
लेख
मी डॉक्टर नाही, हे एक प्रांजळ आत्मकथन आहे केवळ या २ हेतूनी केलेल (१) की जर कोणी अशी लक्षणे अनुभवत असेल तर त्यांना मदत व्हावी (२) माझ्या समाधानाकरता की माझे सत्य सांगीतले, माझी कथा सांगीतली या धाग्यावर अवांतर न केल्यास उपकार होतील ____________________________________________
"मी उद्याची अपॉईंट्मेन्ट घेतली आहे, एकतर तू सायकिअ‍ॅट्रीस्ट कडे चल किंवा मला घटस्फोट दे. या दोनांव्यतिरीक्त दुसरा पर्याय मी तुला देत नाही."
आजवरच्या आयुष्यात मी ऐकलेले सर्वात प्रभावी अन निर्वाणीचे वाक्य/संवाद. ज्या वाक्याने अन पुढील घडामोडींनी संपूर्ण आयुष्यालाच एक सकारात्मक कलाटणी मिळाली असे हे वाक्य मी तब्बल ९-१० वर्षांपूर्वी ऐकले. ऐकले अन तेव्हा मी घाबरले. मला कळेचना माझा नवरा असे का म्हणतो आहे? म्हणजे भांडणे तर सर्वांकडे होतात. नवरा-बायको म्हटले की मतभेद हे अनिवार्यच नाही का? हां आता आमची वरचेवर होतात, रोज होतात, मी आदळाअपट करते अन तो घराबाहेर निघून जातो, मी रडते, धुसफुसते अन मग शांत होते पण म्हणून मी वेडी आहे? हा मला वेडी ठरवतोय? होय सायकिअ‍ॅट्रीस्ट्कडे जाणे/दाखविणे म्हणजे वेडे असणे हीच माझीदेखील समजूत होती. मला हे दिसत नव्हते, कळत नव्हते की मी अतिशय अ‍ॅग्रेसिव्ह होते आहे, सतत भांडते आहे, वस्तू फेकते आहे. रात्री मी दचकून उठे.... रोज रोज रोज!!! पण मला वाटे सर्वांना निदान बर्‍याचजणांना ही समस्या असते. मला बर्‍याच रात्री झोप नीट लागत नसे. कधी अतिशय शांतीचा अनुभव येई तर ९०% वेळा पूर्वायुष्यातील वाईट साईट प्रसंग आठवून, अंगाची लाही लाही होई. सतत चिडचिडेपणा, अति अन निरर्थक आवेश (अ‍ॅग्रेसिव्हनेस) अन भांडखोर वृत्ती. अन शिवाय माझी "साडेसाती" चालू आहे हे का नाही विचारात घेत हा? साडेसाती संपली की हे सर्व बंद होईल. होईल???? ______________________________________________________ दुसर्‍याच दिवशी आम्ही पटेल डॉक्टरांकडे गेलो. मी एक प्रश्नावली भरली व वाट पहात आम्ही वेटींग रुम मध्ये बसलो. खूप गर्दी होती. पण ते सर्व लोक वेडे होते अन माझी खात्री होती मी त्यातली एक नाही. माझा आत्मविशवासच दांडगा होता, अन स्वतःबद्दलच्या कल्पना अनरिअ‍ॅलिस्टीक!!! मला माहीत होते आम्हाला डॉक्टर "मॅरेज काऊन्सिलींग" बद्दल काही सांगतील अन मग सुट्टी!! पण आमची वेळ आली, डॉक्टरीण बाई ५-७ मिनीटे माझ्याशी बोलल्या अन निदान झाले - ------बायपोलर डिसॉर्डर!!!------ मला काही गांभीर्य लक्षात आले नाही कारण ते कळण्याची माझी मनस्थितीही नव्हती ना माहीती. त्या दिवशीच प्रिस्क्रिप्शन दिले अन प्रायोगिक तत्वावर माझी औषधे तत्काळ सुरु केली गेली. ____________________________________________________________ घरी आल्यावर मी वाचले अन मला कळले - हा एक गंभीर स्वरुपाचा मानसिक आजार आहे, मेंदूतील असंतुलनाचे निदर्शक असलेला. एक प्रकारची मूड डिसॉर्डर!!! या आजारात एखाद्या लंबकाप्रमाणे मूड हेलकावे खातो. नैराश्याची गर्ता अन उन्मादाचा पिसाटपणा या दोहोंच्या मध्ये मूड हिंदोळे घेत रहातो. भयंकर!!!! माझा विश्वासच बसेना.
नाही मी सांगते घरातच दोष आहे. वास्तुदोष!!! वास्तुदोष!! भूत आहे हो घरात. हे घरच पछाडलेले आहे. घर बदलले तर सर्व काही सुरळीत होईल. अगदी १००%.
..........मी २० वर्षाची असताना, या विश्वासातूनच आम्ही घर बदलले. कारण? कारण मला रात्री भयस्वप्ने पडत. दरदरुन घाम फुटे अन मी आई-बाबांकडे धाव घेई त्यांना तक्रार करे. मला इरॅशनल भीती वाटे - मी घर गिळेन याची, मी गादी गिळेन , मी टीव्ही गिळेन ........ अगदी अगदी इरॅशनल असे पण माझा कंट्रोल नसे. पण भयंकर भीती वाटे..... पॅनिक अ‍ॅटॅक्स!!! सर्वांची खात्री होती भूत अन वास्तुदोषाबद्दल. अर्थात घर बदलूनही काही फायदा झाला नाहीच मला रात्री किंचाळ्या ऐकू येणे चालूच राहीले. पण वेळेवर औषधोपचार न मिळाल्याने, माझी मात्र अपरिमीत हानी झाली - अभ्यासावर परीणाम झाला, लग्नानंतर कौटुंबिक स्वास्थ्याची पूर्ण वाट लागली. _____________________________________________________ पटेल डॉक्टरांनी ताबडतोब औषधे सुरु केली. पण ती लागू पडेनात, कधी दिवसा पेंग येई तर कधी रात्री ट्क्क जाग येई. कधी अत्यंत वाईट प्रसंग आठवून मी तासन तास गुडघ्यात डोके घालून बसे .... होय अगदी सार्वजनिक ठिकाणीही. रात्री कोणीतरी चापट मारुन जागे करते आहे असले भास होत. दचकून उठणे व निद्रानाश हे तर पाचवीला पूजले होते. बरेचदा वेळ अगदी संथपणे पुढे सरके, अक्षरक्षः गोगलगाईच्या गतीने. अन्य कोणाला त्याचा त्रास होत नसे पण मला अतिशय त्रास होई. या सर्वांचे कारण होते दर ३ दिवसांनी बदलणारी औषधे अन लागू न पडणे हा फॅक्टर. दुहेरी भीती ही असे की अरे बापरे औषधे संपली तर पुढे काय - शॉक ट्रीटमेन्ट??? पण घाबरण्याचे कारण नव्हते, आता अनेक अनेक अगणित औषधे निघालेली आहेत अन शॉक ट्रीट्मेन्ट्ची खरच फारशी गरजच उरलेली नाही. निदान असा विश्वास मला डॉक्टरीणबाई देत. शेवटी औषधांचे एक कॉकटेल सापडले, ती औषधे फाइन ट्यून झाली अन हळू हळू मी बरी होऊ लागले. अक्षरक्षः आमूलाग्र बदल घडू लागला. मूड, व्रुत्ती, विचार, स्वप्ने सार्‍यात बदल घडू लागला.अन अक्षरक्षः स्फिन्क्स पक्षासारखी झेप घेत मी बरी होऊ लागले. कधीही दुसर्‍याचा तीळमात्र विचार न करणारी मी, माझ्या घासातून घास वेगळा ठेऊ लागले. सततची चीड्चीड संपली, तिची जागा शांततेने घेतली अन मुख्य म्हणजे काही पूर्वायुष्यातील काही भयंकर प्रसंग आयुष्यात पहील्यांदा विस्मृतीत गेले. मला जग सकारात्मक भासू लागले. स्वप्नेही लॉजीकल सिक्वेन्स असलेली पडू लागली. कमाल आहे या औषधांची! जे जग खरच वैर्‍यासारखे भासे तेच आता आनंददायक वाटू लागले. ____________________________________________________ नवर्‍याने या आजारात अथक अथक अन निव्वळ अमेझिंग साथ दिली. हे माझे पूर्वसुकृत अन पुण्याइ का काय माहीत नाही पण जिथे सर्वांनी होय सर्वांनी त्याला सांगीतले होते की हिला वेड्यांच्या इस्पितळात फेकून दे, तिथे त्याने मला चिकाटीने त्या नरकातून बाहेर काढले. मला रोज व्यायाम करायची सक्ती केली, फक्त कॉम्प्लेक्स अन पौष्टीक अन्न खाण्याची सवय अंगी बाणवली. माझ्या झोपेच्या वेळा आम्ही "रिलीजसली" पाळू लागलो. आयुष्याला एक वलण आले, एक क्वालिटी आली. हा आजार बरा होत नाही. मी मेल्यावरच हा संपणार पण ... पण ....समाधानाची बाब ही की "अत्यंत प्रेडिक्टेबल अन मॅनेजेबल" आहे. औषधे-आहार-निद्रा व व्यायाम या चार भक्कम पायांवर डोलारा सांभाळला की हा आवाक्यात येतोच येतो. तरता येतो. आहे भयंकर पण वेसण तुमच्या हातात असते.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
57080 वाचन

💬 प्रतिसाद (167)

प्रतिक्रिया

अपॉईंटमेंट घ्यायची गरज पडलीच

सूड
Tue, 04/22/2014 - 18:38 नवीन
अपॉईंटमेंट घ्यायची गरज पडलीच कधी तर कॉन्टॅक्ट डिटेल्स व्यनि करु शकता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

येथे

आजानुकर्ण
Tue, 04/22/2014 - 18:43 नवीन
सध्या त्यांचा नंबर माझ्याकडे नाही पण साधू वासवानी चौकातील परमार सेंटर बिल्डिंगमध्ये त्यांचे समुपदेशन केंद्र आहे. खालील दुव्यावरील माहिती तपासून पाहता येईल. ती न चालल्यास जस्टडायल किंवा तत्सम सेवांमार्फत नंबर मिळवता येईल. http://www.indiacom.com/bp/dr-jyoti-shetty_in_pune/ http://www.onlymyhealth.com/doctors/dr-jyoti-shetty-1848580167.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

धन्यवाद. ते जस्ट डायल विसरलोच

सूड
Tue, 04/22/2014 - 18:46 नवीन
धन्यवाद. ते जस्ट डायल विसरलोच होतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

पुण्यात उल्हास लुकतुके (

प्रसाद१९७१
Wed, 04/23/2014 - 19:00 नवीन
पुण्यात उल्हास लुकतुके ( लक्ष्मी रोड वर ) आहेत. खूप अनुभवी आणि स्पष्ट बोलणारे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

मन उलगडतांना या पुस्तकाची

सिफ़र (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 04/23/2014 - 19:31 नवीन
मन उलगडतांना या पुस्तकाची लेखिका डॉ. विजया फडणीस (हडपसर पुणे) यांच्याकडे जाऊ नये असं सुचवतो. पुस्तक तसं वाचायला बरं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

पुण्यात डॉ के एस कुलकर्णी पण

llपुण्याचे पेशवेll
Fri, 04/25/2014 - 09:20 नवीन
पुण्यात डॉ के एस कुलकर्णी पण चांगले आहेत. निसर्ग हॉटेल समोर एक केरळी ख्रिश्चन असलेले डॉ जॉर्ज व्हर्गीस नावाचे डॉक्टर पण छान आहेत. फक्त त्यांना मराठी येत नाही अजून तितकेसे पण तुम्ही इंग्रजीतून संवाद साधू शकत असाल तर जॉर्ज एक उत्तम डॉक्टर आहे असे म्हणेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

अतिरेक

आजानुकर्ण
Tue, 04/22/2014 - 18:23 नवीन
इतर शारीरिक व्याधींमध्ये ईसीजी, रक्तातील साखर वगैरे चाचण्या घेऊन आरोग्याचा धारण अंदाज घेता येतो. मनोविकाराच्या अशा चाचण्या घेता येत नाहीत असे वाटते. प्रत्येकाच्याच स्वभावात दोष असतात. मात्र काही मनोव्याधी दिसत नसेल तर मनोविकारतज्ञाकडे जाऊन खाजवून खरुज काढण्यात काहीच पॉईंट दिसत नाही. एखादा मनोविकारतज्ञ बरा बकरा गावला म्हणून काहीतरी विचित्र गोळ्या सुरु करण्याचीही शक्यता आहे. नंतर गोळ्यांपासून सुटका करुन घेणे अवघड होते. जेव्हा मनोव्याधी सुरु होते तेव्हा ती लख्खपणेच कळते. मनोविकारतज्ञाकडे जाण्याशिवाय गत्यंतरच नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

पेठकर साहेब

सुबोध खरे
Wed, 04/23/2014 - 12:01 नवीन
पेठकर साहेब मानवी मन हे अजून न समजलेले कोडे आहे. शिवाय शारिरिक आजाराचे संशोधन हे प्राण्यांवर करून औषधांचे संशोधन/ परिणाम त्यांच्या वर पडताळुन पाहता येतात. दुर्दैवाने मेंदूच्या रचनेत प्राणी आणि माणूस यात फार मोठा फरक आहे. म्हणजे सर्वात प्रगत प्राणी म्हणजे चिंपॅन्जी त्याच्या आणि मानवी मेंदूतच इतका फरक आहे की कोणतीही मेंदूवर परिणाम करणारी औषधे चिंपॅन्जी वर काय परिणाम करतात तसच माणसावर होत नाही. असे संशोधन दुसर्या महायुद्धातील युद्धकैद्यांवर केल्यावर आढळले मेंदूवरील संशोधनातील हा एक मोठा अडथळा असल्याने जशी शारिरिक रोगात प्राण्यांवर प्रयोग करून चाचण्या परिष्कृत करता येतात तशा मेंदूवर करता येत नाहीत.शिवाय बरोबर आणि चूक यातील रेषा ही फार रुंद आणि धूसर आहे त्यामुळे एखाद्या माणसाचे एकाच भेटीत रोगनिदान होणे कठीण असते. त्यामुळे आपल्या वागण्यात झालेला बदल याबद्दल आपल्या जवळच्या नातेवाईकांचे( आई वडील किंवा बायको) मत घेणे हि याची पहिली पायरी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

धन्यवाद.

प्रभाकर पेठकर
Wed, 04/23/2014 - 19:28 नवीन
आजानुकर्ण, प्रसाद१९७१, सुबोध खरे मनापासून धन्यवाद. सुबोध खरेसाहेब, शारीरिक व्याधींबद्दल वेगवेगळ्या तपासण्या करुन अंदाज बांधता येतो. तद्वत, मानसोपचार तज्ञाला अगदी एका बैठकीत नसले तरी वारंवारच्या बैठकांमधून कांही स्वभावदोष लक्षात येत असतील असे वाटले होते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

वारंवारच्या बैठकांमधून कांही स्वभावदोष लक्षात येत असतील

सुबोध खरे
Fri, 04/25/2014 - 13:15 नवीन
होय मनोविकार तज्ञ या वरूनच आपले निदान करीत असतात. त्याच बरोबर ते आपल्या जवळच्या नातेवाईकांकडून (आहार निद्रा भय मैथुन या चार मूल भूत बाबीसकट) आपली इतर बरीच माहिती मिळवून निर्णयाप्रत पोहोचतात. पण एकाच बैठकीत निदान होण्यासाठी मनोविकार बराच पुढे गेलेला असतो जेंव्हा रुग्णाची लक्षणे सहज लक्षात येऊ शकतात. पण जो मनुष्य अन्यथा व्यवस्थित आहे त्याची अव्यवस्था लक्षात येण्यास बरीच माहिती आणि मानसिक चाचण्या घ्याव्या लागतात. दुर्दैवाने मानसिक चाचण्या या व्यक्तीसापेक्ष असतात म्हणून एका फटक्यात काळे कि पांढरे सांगता येत नाही. .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

अत्यंत मननीय धागा.

चित्रगुप्त
Tue, 04/22/2014 - 17:04 नवीन
अत्यंत मननीय धागा. तुमच्या आणि पतिदेवांच्या हिंमतीला सलाम. काही प्रश्नः ही व्याधी जन्मजात असते का? की काही विशेष परिस्थिती/कारणांमुळे ती होऊ शकते? अशी कारणे कोणती? या व्याधीच्या अगदी सुरुवातीच्या अवस्थेत कोणती लक्षणे दिसून येतात? जन्मपत्रि़का बघून या व्याधीबद्दल भाकित करता येते का? (हा प्रश्न घाटपांडे सरांसाठी)
  • Log in or register to post comments

कडक सलाम

निनाद मुक्काम …
Tue, 04/22/2014 - 17:09 नवीन
कडक सलाम तुमच्या यजमानाचे विशेष कौतुक
  • Log in or register to post comments

काय बोलु शब्द्च सुचत नाहित..

स्मिता चौगुले
Tue, 04/22/2014 - 17:18 नवीन
हॅट्स ऑफ टू यू.. तुमच्या आणि तुमच्या नवर्‍याच्या धैर्याला सलाम..
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

उपाशी बोका
Tue, 04/22/2014 - 17:22 नवीन
तुम्ही अगदी मनापासून आणि प्रांजळपणे लिहिले आहे. तुमची तब्बेत अशीच छान राहू दे ही सदिच्छा आणि तुम्हाला आणि तुमच्या नवर्‍याला शुभेच्छा. तुमचे आणि तुमच्या नवर्‍याचे पण खूप कौतूक वाटले. (हो ना, नाही तर इतक्या खुलेआम नवर्‍याची स्तुती करणारी बायको पण तशी दुर्मिळच. :)
  • Log in or register to post comments

धाडसी आणि प्रांजळ आत्मकथन आवडले.

राही
Tue, 04/22/2014 - 17:23 नवीन
स्वतःविषयी असे काही लिहून स्वतःला इतके उघडे करणे यासाठी जबर आत्मविश्वास लागतो. तसा तो तुमच्यामध्ये आलाय हे या लिखाणावरून स्पष्ट आहेच पण आणखीही एक गोष्ट स्पष्ट होतेय-आणि मला ती फार महत्त्वाची वाटतेय-ती म्हणजे असा संतुलित आत्मविश्वास येणं ही तुमचा आजार बरा झाल्याची किंवा बरा होत असल्याची खूण आहे. तुम्ही हिंमतीने या भयानक कालखंडाला तोंड दिलंत आणि तुमच्या कुटुंबाने, विशेषतः नवर्‍याने तुम्हाला पुरेपूर साथ दिली यासाठी तुमच्याबरोबर त्यांचे खास अभिनंदन. इतकी समंजस माणसे मिळणे हे तुमचे सद्भाग्य आहे. तुमच्या लिखाणावरून तुमच्या स्थितीची थोडीफार कल्पना आली होती. पण व्य.नि. एकदाच आणि फार सौम्य आणि अवगुंठित भाषेत केला कारण थेट लिहिलेले कसे घेतले जाईल आणि त्यामुळे मूड अधिक बिघडेल की काय असे वाटले. शिवाय नुसत्या जालीय ओळखीद्वारे कुणाच्या पत्रव्यवहारात शिरणे उचित नसतेच. बायपोलर, ओसीडी, स्किझोफ्रेनिआ, लो आय क्यू, अल्झाय्मर्स (हा मानसिक आजार नाही पण मेंदूपेशी मृत होऊ लागल्याने स्मरणशक्तीवर परिणाम होऊन मानसिक रुग्णावस्थेतली काही लक्षणे दिसतात.) या सर्व आजारांशी फारच जवळून संबंध आला आहे. आत्यंतिक भीती, आत्यंतिक आक्रमकता, स्वतःच्या भ्रामक विश्वात रमणे, प्रेम, माया ही नाती किंवा व्यावहारिक संबंध न कळणे, मूर्खपणाकडे झुकणारा आत्यंतिक भाबडेपणा या सर्व गोष्टी कुटुंबियांना सळो की पळो करून सोडतात. समाजाकडून सहानुभूती तर मिळत नाहीच उलट अवहेलना होते. मुंबईत रेल्वे मध्ये विकलांगांसाठी वेगळा डबा अलीकडे झालाय. पूर्वी जाणत्या मुलाला उपचारांसाठी रेल्वेने घेऊन जायचे म्हणजे पुरुषांच्या डब्यांतून जावे लागे. त्या जीवघेण्या गर्दीतून मुलाला घेऊन चढणे-उतरणे हे आईसाठी दिव्यच असायचे. शिवाय अशा लोकांना सतत कोणीतरी श्रोता हवा असतो. त्यांच्या खर्‍याखोट्या सर्व तक्रारी कोणीतरी सतत ऐकत रहायला हव्या असतात. आईवडिलांना एव्हढा वेळ देता येईलच असे नाही. बाकीची सपोर्ट-सिस्टिम भक्कम असेल तर थोडाफार निभाव लागतो. आईवडील करतेसवरते असतील तोपर्यंत सांभाळतात. पुढे काय हा प्रश्न भयानक असतो. अलीकडे अनेक संस्था निघाल्या आहेत, त्या आपापल्या परीने प्रयत्न करताहेत हे खरे पण हे प्रयत्न फारच तोकडे आहेत. असो. आपल्या पुढील आयुष्यास अनेकानेक शुभेच्छा. तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदमय होवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments

सहमत

आजानुकर्ण
Tue, 04/22/2014 - 18:26 नवीन
स्वतःच्या आजाराकडे तटस्थ पाहण्याइतपत सुधारणा होणे हे प्रगतीचे लक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

शुचि,

चौकटराजा
Tue, 04/22/2014 - 18:12 नवीन
आपली कहाणी व त्यावरील सर्व प्रतिसाद पूर्ण वाचले. गतिमंद मुलगी व अल्झायमर झालेली ( फार गंभीर अवस्थेचा नव्हे) आई याच्या खेरीज डॉक्टरानाच मनोरूग्ण ठरवणारा व पूर्ण बरा झालेला मित्र अशा विविध रूपात मनविषयक आजार जवळून पाहिले आहेत. माझ्या सुदैवाने म्हणा यातील कोणी टोकाचे आजारी नव्हते. पण मानवी मन हा माझ्या कुतुहलाचा विषय आहे. काही वाचन त्या बाबत झाले आहे पण फार नाही. माणसाचे मानसिक आजार हे मानसिक व मनोशारिरिक असे असतात. आपल्या भवतालची परिस्थिती आपल्या मनाची जडण घडण करीत असते. तर आपल्या मेंदूत काही बदल अपघाताने वा अनुवांशिक कारणानी होतात. कौन्सिलिंगने मानसिक आजार बरे होतात .मन व मेंदू तसे भिन्न आहेत. आपला आजार मेंदूतील विशीष्ट रासायनिक प्रक्रियानी दोन्ही पैकी कोणत्या तरी दिशेने बळावतो. तो मेंदूतील आजार आहे म्हणून औषधानी थोडा सुधारता येतो. यात आपले नशीब आहे. मन हे मत बनविते तर मेंदू हा वर्तणूक असा सर्वसाधारण नियम करायला हरकत नाही. मस्त जगा खुशीत जगा बी पॉसिट्व्ह असे मानसिक सल्ल्ले न देता आपले औषध वेळेवर घ्या असा सोमॅटिक सल्ला देतो. आपण दीर्घकाळ जास्तीत जास्त " सेटर" ला राहून जगा अशी प्रार्थना करतो.
  • Log in or register to post comments

लेख अप्रतिम आहे

प्रसाद गोडबोले
Tue, 04/22/2014 - 21:01 नवीन
इतक्या प्रांजळपणे लेख लिहिल्याने अतिषय उत्कृष्ठ झाला आहे :) (लेख वाचुन मनात बरेच प्रश्न उद्भवले आहेत जसे की असे काही ना काही प्रॉब्लेम सगळ्यांना असतातच मग मनोविकार कोणता हे कसे ठरवणार ? वगैरे वगैरे पण हे कदाचित इथे अवांतर ठरेल म्हणुन टाळत आहे ! ) पुनश्च एकदा आभार आणि शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

मनोविकार कोणता

आजानुकर्ण
Tue, 04/22/2014 - 21:13 नवीन
'बोस्टन लीगल' या मालिकेत याबाबतचा एक उत्कृष्ट प्रसंग आहे. डिप्रेशनची रुग्ण असलेली तरुणी अॅलन शोअरशी बोलताना त्याला सांगते की बऱ्याच लोकांना मी माझ्या डिप्रेशनबद्दल सांगते तेव्हा त्यांना ते पूर्णपणे कळत नाही. घरातले नातेवाईक, मित्र वगैरे ऊठ, मोकळ्या हवेत फिर वगैरे गोष्टी डिप्रेशनवरचा उपचार म्हणून सांगत असतात पण मी हे सर्व करण्याची इच्छा असूनही करु शकत नाही कारण डिप्रेशनमुळे मी बेडमधून उठूच शकत नाही. माझे शरीर प्रतिसादच देत नाही. I literally cannot get up even though I want to. जेव्हा तुम्हाला तुमचे सामान्य जीवन जगणे अशक्य होते व 'शारीरिक' चाचण्यांमध्ये काही सापडत नाही तेव्हा मनोविकाराचे निदान केले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

कारण डिप्रेशनमुळे मी बेडमधून

शुचि
Tue, 04/22/2014 - 21:17 नवीन
कारण डिप्रेशनमुळे मी बेडमधून उठूच शकत नाही. माझे शरीर प्रतिसादच देत नाही. I literally cannot get up even though I want to.
अगदी अगदी!!! तू असे विचार करु नको/तसे विचार करु नको, डोकं थंड ठेव अशा सूचना लाख मिळतात पण खरच कंट्रोलच नसतो. कारण मेंदूतील रासायनिक बदल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

+१

मूकवाचक
Wed, 04/23/2014 - 00:06 नवीन
नैराश्याचा प्रवास वर्तुळाकार असतो. नैराश्यामुळे खचून गेलेली व्यक्ती नैराश्यातून बाहेर पडण्याचे अयशस्वी प्रयत्न केल्याने अधिक खचत जाते, हताश होत जाते. असे म्हणतात की भोवर्‍यात सापडलेली व्यक्ती पोहताना बाहेर पडण्यासाठी जितके हातपाय मारेल, तितकी खोलवर बुडायला लागते, तसलाच प्रकार! त्यात जवळच्या नातेवाईकांनी मंद, आळशी वगैरे लेबले लावण्यापासून सुरूवात करून याला चांगल्या दोन सणसणीत लाथा घाला म्हणजे कामाला लागेल पर्यंतचा टप्पा गाठेपर्यंत जगणे असह्य होउन गेलेले असते. एकीकडे मस्त रिलॅक्स व्हा, बीअर घ्या, चिल आउट मॅन वगैरे सल्ले देणारे महाभाग जीव खातात. आपण कसल्या कसल्या प्रसंगावर मात केली आहे याचे आत्मप्रौढीयुक्त अतिशयोक्त किस्से सांगणारे काका मामा चान्स पे डान्स करून घेतात. नैराश्याने पुरत्या खचून गेलेल्या माणसाला अंधश्रद्ध, बावळट, थोतांडी वगैरे ठरवून तोंडसुख घेणारे महाभाग त्यांचे वैफल्य हलके करून घेतात. आधुनिक श्रद्धाविरहीत अध्यात्मवाले त्यांची प्रवचनबाजी करून घेतात. असो. योग्य उपचार आणि व्यावसायिक तज्ञांचे समुपदेशन मिळेपर्यंत हे दुष्टचक्र तसेच सुरू राहते. दुर्दैवाने नैराश्याने खचलेल्या रूग्णाला योग्य उपचार मिळावेत असा विचार करणारे आणि तशी तजवीज करणारे लोक तथाकथित सुशिक्षित समाजातही अल्पसंख्यांकच आहेत ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

आपण कसल्या कसल्या प्रसंगावर

शुचि
Wed, 04/23/2014 - 00:34 नवीन
आपण कसल्या कसल्या प्रसंगावर मात केली आहे याचे आत्मप्रौढीयुक्त अतिशयोक्त किस्से सांगणारे काका मामा चान्स पे डान्स करून घेतात.
=)) =)) तू नेहमीप्रमाणेच चौके लावलेयस :) पण खरं आहे तुझं म्हणणं. योग्य उपचार मिळणे आवश्यक असते. अन औषधाचाही गुण यावा लागतो. तेच अजानुकर्ण यांच्या खवत लिहीत होते की - इतका त्रास होतो नवीन नवीन लागू न होणारी औषधे घेऊन. त्या काळात मी संध्याकाळी "औषधे चिंतयेद विष्णुं भोजने च जनार्दनम" तसच "वैद्यनाथाष्टक" अन "वैद्यो नारायणो हरि:" असल्या छापाची स्तोत्रे म्हणत असे. खरच बुडत्याला काडीचा आधारही पुरतो, लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

@मूकवाचक

सुबोध खरे
Wed, 04/23/2014 - 09:58 नवीन
@मूकवाचक आपले म्हणणे म्हणजे नैराश्य या आजाराच्या रुग्णाची खरी कैफियत आहे. दुर्दैवाने अगदी जवळच्या नातेवाईकाला सुद्धा हा माणूस नखरे करीत नाही हे समजत नाही. त्यामुळे अशा रुग्णांची फार हेळसांड/ परवड होते. सर्वसामान्य लोकांच्या भाषेत सांगायचे झाले तर मेंदूत उत्साहवर्धक रसायनांची झालेली कमतरता हे मूळ कारण आहे. असे का होते ते रुग्णाला सांगता येत नाही( खर तर डॉक्टरना सुद्धा नाही कारण असे का होते यावर संशोधन चालू आहे).त्यामुळे त्याला मानसिकच् नव्हे तर शारिरिक सुद्धा मंदपणा येतो. यावर त्याला तुम्ही कितीही द्न्यानामृत पाजले तरी पालथ्या घड्यावर पाणी असते. ही उत्साहवर्धक रसायने तयार होतात आणि थोड्या वेळात त्यांचे विघटन होऊन ती नष्ट होतात. जी औषधे दिली जातात ही या विघटनाच्या क्रियेला आळा घालतात त्यामुळे कमी प्रमाणात तयार झाली तरी उत्साहवर्धक रसायने मेंदूत जास्त वेळ टिकून रहात असल्याने रुग्णाची उत्साहाची पातळी वाढते आणि नैराश्य कमी होते. हे औषध जास्त झाले तर रुग्णाच्या स्नायुना ताठरता येते आणि नंतर कंप होतो(ट्रेमर्स) आणि कमी झाले तर नैराश्य परत येते. त्यामुळे त्याची पटली हळूहळू वाढवत न्यायला लागते. शिवाय या औषधांचा परिणाम पूर्णपणे दिसायला तीन आठवडे ते एक महिना लागतो त्यामुळे रुग्णाची परिस्थिती अगदी पूर्ववत व्हायला सहा महिने पर्यंत लागू शकतात. या कळत त्या रुग्णच्या जोडीदाराला फार धीर आणि संयम ठेवायला लागतो. मुळात हे का होते हे माहित नसल्याने हा आजार आजमितीला पूर्णपणे बरा होत नाही. औषधे थांबविली तर आजार परत येतो.मधुमेह या आजाराचे तसेच आहे पण मी म्हटल्याप्रमाणे तो उच्चभरु आजार आहे आणि दुर्दैवाने मनोविकार हे कलंकित आजार आहेत.म्हणून त्यांच्या कडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. जेंव्हा सामान्य लोक मनोविकार हा शारिरिक आजारासारखाच आहे हे समजून घेतील तेंव्हाच मनोविकाराच्या रुग्णांची परवड थांबेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

आपल्या धैर्याला सलाम

Prajakta२१
Tue, 04/22/2014 - 22:38 नवीन
आणि आपल्याला शुभेच्छा
  • Log in or register to post comments

__/\__

निशदे
Tue, 04/22/2014 - 23:17 नवीन
तुम्हाला अन तुमच्या सर्व कुटुंबाला माझा प्रणाम....
  • Log in or register to post comments

आत्ता वाचला

विकास
Tue, 04/22/2014 - 23:39 नवीन
आपला लेख आणि सर्व प्रतिक्रीया आत्ता वाचल्या! प्रांजळपणे स्वानुभव सार्वजनिक संस्थळावर सांगण्याबद्दल तुमचे तसेच आलेल्या आजारास धैर्याने सामोरे जाण्यासाठी मदत करणार्‍या आपल्या नवर्‍याचे मनःपूर्वक कौतुक! मला आपला अनुभव वाचत असताना स्किझोफ्रेनिया असलेले नोबेल पारीतोषिक विजेते प्रा. जॉन नॅश आणि त्यांच्या जीवनावर आधारीत असलेला ऑस्कर विजेता A Beautiful Mind हा चित्रपट आठवला. या धाग्याच्या निमित्ताने आलेले प्रतिसाद तसेच अजानुकर्ण यांचा स्वानुभव ह्यांना देखील "सलाम" !
  • Log in or register to post comments

+१

पैसा
Tue, 04/22/2014 - 23:49 नवीन
आजानुकर्ण यांनीही अगदी निर्लेपपणे आपला अनुभव आणि त्याअनुषंगाने अतिशय उपयोगी अशा सूचना दिल्या आहेत. त्यांनाही अभिनंदन आणि धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

शुची,

स्वाती२
Wed, 04/23/2014 - 01:37 नवीन
शुची, हॅट्स ऑफ! तुमच्या धैर्याचे आणि तुमच्या जोडीदाराच्या समंजसपणाचे फार कौतुक वाटले. खूप जवळच्या व्यक्ती बायपोलर आणि स्किझोफ्रेनिआ या व्याधीसमवेत जगत आहेत. त्यामुळे रुग्णाच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या आयुष्यातील कसोटीचे क्षण फार जवळून अनुभवलेत. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना खूप खूप शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

आजाराविषयी काहीच माहिती

झकासराव
Wed, 04/23/2014 - 12:19 नवीन
आजाराविषयी काहीच माहिती नव्हतं. काल गुगलुन थोडसं कळाल. हॅट्स ऑफ टु तुमचे जोडीदार आणि तुम्ही दोघांसाठीही. :) शुभेच्छा नेहमी आहेतच सोबत.
  • Log in or register to post comments

शुचि , खुप खुप कौतुक !!

मीता
Wed, 04/23/2014 - 12:23 नवीन
स्किझोफ्रेनिआ जवळून माहित आहे .घरातली कर्ती बाई जर या आजाराची बळी असेल तर घर कसं विस्कटत ते माहिती आहे . माझा वय तेव्हा १० वर्ष होत आणि माझी बहिण ४ वर्षाची. काय होतंय आईला ते समजून घेण ,तिच्याशी कसं वागायचं या सगळ्यात डॉक्टर्रांनी खूप मदत केली होती .
  • Log in or register to post comments

प्रांजळ आत्मकथन

भ ट क्या खे ड वा ला
Wed, 04/23/2014 - 13:59 नवीन
आवडले, हेतू प्रामाणिक असल्यामुळे फारच भावले. आपण उभयतांनी पती पत्नीच्या नात्याला एका वेगळ्याच उंची वर नेउन ठेवले आहे.
  • Log in or register to post comments

तुमचे आत्मकथन अतिशय प्रांजळ

ऋतु हिरवा
Wed, 04/23/2014 - 17:13 नवीन
तुमचे आत्मकथन अतिशय प्रांजळ आणि उपयुक्त आहे. मानसिक आजाराबद्दल सहसा कोणी बोलत नाही आणि तो आजार स्विकारतही नाही. त्यामुळे त्या व्यक्तिचे आणि तिच्याबरोबरच्या इतर नातेवाईकांचेआयुश्यष्य त्रासात जाते. पण तुम्हाला तुमच्या पतीने यातून बाहेर पडण्यासाठी मदत केली यासाठी त्यांचे अभिनंदन. तुम्हांला पुढील वाटचालीसाठीशुभेच्।च!
  • Log in or register to post comments

शुचि, अतिशय प्रांजळ कथन वाचून

मितान
Wed, 04/23/2014 - 17:38 नवीन
शुचि, अतिशय प्रांजळ कथन वाचून फार बरं वाटलं. अगं साधं मुलांच्या अभ्यासासंदर्भात चर्चा करायला बोलावलं तरी आधीच 'आम्हाला काउन्सेलिंगची गरज कशी नाही' हे सांगत येणारे अनंत लोक रोज पाहाते. अतिशय भयंकर स्वरूपाच्या शारीरिक व्याधी लोक जितक्या सहजतेने सांगतात तेवढे त्यामानाने साधे असणारे मानसिक आजार सांगत नाहीत. स्वीकार तर पुढची गोष्ट. लोकांना सायकिअ‍ॅट्रिक ट्रीटमेंटसाठी तयार करणं हे एक आव्हानच असतं. माझ्याकडे एक पिल्लु येतं बायपोलारची लक्षणं स्पष्ट दाखवत. आज तुझा लेख त्या पालकांना वाचायला दिला. मला आशा आहे की ते योग्य उपचार घेतील. असे अनुभव शेअर करणं ही मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातली फार मोठी समाजसेवा आहे. तू हे केलंस त्याबद्दल खूप आभार. तुझ्या निर्भय प्रांजळतेबद्द्ल मनःपूर्वक अभिनंदन ! :)
  • Log in or register to post comments

ले़खानासाठी तुम्हाला सलाम __/

सिफ़र (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 04/23/2014 - 18:49 नवीन
ले़खानासाठी तुम्हाला सलाम __/\__
"मी उद्याची अपॉईंट्मेन्ट घेतली आहे, एकतर तू सायकिअ‍ॅट्रीस्ट कडे चल किंवा मला घटस्फोट दे. या दोनांव्यतिरीक्त दुसरा पर्याय मी तुला देत नाही."
या निर्वाणीच्या वाक्यासाठी तुमच्या नवर्याने जी काही मनाची तयारी केली असेल कदाचित त्याचा अर्थ फक्त "तू सायकिअ‍ॅट्रीस्ट कडे चल!" एव्हडाच असेल. तो अर्थ समजुन तुम्ही उगाच "नवरा माझ्या विरुद्ध कट वगैरे रचतोये" असा विचार न करता सायकिअ‍ॅट्रीस्ट कडे जाण्याची तयारी दाखवली यासाठी तुमच्या वैचारीक कृतीची कितीही प्रशंसा केली तरी ती कमीच आहे. त्यामुळेच तुमच्या दोघांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. पण काही स्त्रि-पुरुष/पालक असा सारासार विचार न करता असा प्रसंग आल्यास उगाच अभिव्यक्तीस्वातंत्र, टोकाची स्त्रिवादी भुमीका घेउन पार बिघडवुन टाकतात. फार जवळुन अशी उदाहरणं बघीतली आहेत. असो. कालच माझ्याबरोबर जुन्या कंपनीत सोबत असनार्या एका बायपोलर मित्राचा फोन आला,आम्ही रोज किमान तासभर तरी गप्पा मारायचो. त्याने अचानक एक दिवस रागाच्या भरात रीझाईन केल होतं. त्याची तब्येत आता चांगली झालीये आहे असं सांगत होता. आज तो आनंदी तर आहेच परत त्याने कॅपजेमीनी मध्ये अडीच वर्षे यशस्वीरीत्या पुर्ण केलीत. फार बरं वाटलं. भावी आयुष्यासाठी आपल्याला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

_/\_

गणपा
Wed, 04/23/2014 - 19:42 नवीन
_/\_ प्रांजळ आत्मकथन आवडलं. डेयरींग लागते बप्पा असं चार चौघात सांगायला. आपल्या यजमानांचंही कौतुक आहेच.
  • Log in or register to post comments

खूप आवडले लेखन

लंबूटांग
गुरुवार, 04/24/2014 - 03:22 नवीन
अतिशय प्रामाणिक आणि धाडसी लेखन. हॅट्स ऑफ टु यू बोथ! तू आधी कुठेतरी कुत्रे आवडत नाहीत असे लिहीले आहेस पण गूगल वर या विषयी बरीच माहिती मिळाली https://www.google.com/search?q=pet+therapy+bipolar+disorder अर्थात कुत्रे म्हणजे बरेच काम आहे त्यामुळे ते समजूनच त्या फंदात पडणे, नाहीतर बायपोलर चालेल पण कुत्रा आवर असे व्हायचे ;)
  • Log in or register to post comments

धन्यवाद लंबूटांग. कुत्रा एकदा

शुचि
गुरुवार, 04/24/2014 - 03:31 नवीन
धन्यवाद लंबूटांग. कुत्रा एकदा चावला असल्याने आवडत नाही. मांजर मात्र आवडते. हा दुवा नक्की वाचेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

शेवटी तुमचा निर्णय आहे पण

लंबूटांग
गुरुवार, 04/24/2014 - 06:28 नवीन
आपण एकदा पडलो म्हणून चालायचे थांबत नाही किंवा एकदा गाडीचा अपघात झाला म्हणून गाडी थांबवायचे थांबवत नाही. त्यामुळे कधीतरी कुत्रा चावल्याने कुत्राच पाळू नये हे काहीसे पटत नाही. हा, पण सांभाळणे शक्य नसेल व्यापामुळे तर समजू शकतो. -(श्वानप्रेमी आणि मालक) लंबूटांग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

sorry मला म्हणायचे होते -

शुचि
गुरुवार, 04/24/2014 - 07:01 नवीन
sorry मला म्हणायचे होते - कुत्री आवडतात खरच आवडतात पण भीती वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

व्यथा...

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 04/24/2014 - 12:28 नवीन
माझ्या बायकोला तर कुत्रा कधी चावलेलाही नाही पण तरी तिला कुत्रा आवडत नाही. त्यामुळे, मला आणि मुलाला कितीही आवडला तरी, 'कुटुंबप्रमुखाला' तो आवडत नसल्याने आम्हाला पाळता येत नाही. *sad* :-( :( +( =( :-(( :(( +(( =(( :sad:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

पेठकर साहेब यावर एप्रिल च्या

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 04/24/2014 - 16:15 नवीन
पेठकर साहेब यावर एप्रिल च्या अनुभव च्या अंकात एक छान सत्यकथा आहे डॉ समीर कुलकर्णी यांची. वाचाच श्वानद्वेष्ट्या कुटुंब प्रमुखाचे धर्मांतर कसे झाले ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

आंतरजालावर आहे? 'दुवा'.दिलात

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 04/24/2014 - 20:58 नवीन
आंतरजालावर आहे? 'दुवा'.दिलात तर मी दुवा देईन तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

आंतरजालावर उपलब्ध नाही. पण

प्रकाश घाटपांडे
Fri, 04/25/2014 - 13:23 नवीन
आंतरजालावर उपलब्ध नाही. पण माझ्याकडे तो अंक आहे. मी वर्गणीदार आहे अनुभवचा. या कि एकदा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

नक्कीच...

प्रभाकर पेठकर
Sat, 04/26/2014 - 01:18 नवीन
धन्यवाद. पुढच्या पुणे भेटीत हे एक अत्यंत तातडीचे आणि तितकेच महत्वाचे कार्य हाती घेतले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

अभिनंदन आपले

आश
गुरुवार, 04/24/2014 - 04:32 नवीन
शुचीताई, मनापासुन अभिनंदन आपले, कि यातुन आपण, आपलं कुटुंब सावरलं. कमाल आपल्या मनोध्येर्याची, आपण हे फार चांगल्या हेतुने जगासमोर मांडले, आणि यातुन लोकांना नक्कीच फायदा होईल.
  • Log in or register to post comments

मनापासून आभार तुमचे

मृगजळाचे बांधकाम
गुरुवार, 04/24/2014 - 09:52 नवीन
तुझ्या या लेखामुळे माझ्या आयुष्यातला न सुटणारा गुंता सुटायला मला मदत झालीय.खूप खूप आभारी आहे तुझा
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

आयुर्हित
गुरुवार, 04/24/2014 - 16:43 नवीन
मृगजळाचे बांधकाम, आपले अभिनंदन! आणि शुचि तसेच मिपा दोघांनाही आधी धन्यवाद मग मनापासून अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगजळाचे बांधकाम

होय बांधकाम भाऊंनी व्यनि केला

शुचि
गुरुवार, 04/24/2014 - 17:45 नवीन
होय बांधकाम भाऊंनी व्यनि केला होता. उत्तर दिलेले आहे. त्यांना काही मदत झाली असेल तर आनंदच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

कडक

दिपक.कुवेत
गुरुवार, 04/24/2014 - 13:28 नवीन
शुचितै जे असाध्य होतं ते समजुन/उमजुन तु साध्य करुन दाखवलस त्याबद्दल अभिनंदन. ह्या खडतर प्रवासात तुझ्या मि. साथ होती म्हणुन त्यांचहि कौतुक करावं तेवढं थोड आणि हे सगळं ईथे लिहिण्याचं जे डेअरिंग केलेस त्याला आपला सलाम. तुला आनंदि दिर्घायुष्य लाभुदे हिच सदिच्छा.
  • Log in or register to post comments

हॅट्स ऑफ

पद्मश्री चित्रे
गुरुवार, 04/24/2014 - 20:27 नवीन
तुम्हा दोघान्चे प्रथम अभिनंदन. तुझे कौतुक की तू या सर्वातून सावरत आहेस. इतरांचा विचार करात इथे लिहित आहेस.. तुझा सच्चेपणा , निस्वार्थीपणा आणि धीटपणा.. मानलं तुला ..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा