Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शुचि on Mon, 04/21/2014 - 21:04
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
मी डॉक्टर नाही, हे एक प्रांजळ आत्मकथन आहे केवळ या २ हेतूनी केलेल (१) की जर कोणी अशी लक्षणे अनुभवत असेल तर त्यांना मदत व्हावी (२) माझ्या समाधानाकरता की माझे सत्य सांगीतले, माझी कथा सांगीतली या धाग्यावर अवांतर न केल्यास उपकार होतील ____________________________________________
"मी उद्याची अपॉईंट्मेन्ट घेतली आहे, एकतर तू सायकिअ‍ॅट्रीस्ट कडे चल किंवा मला घटस्फोट दे. या दोनांव्यतिरीक्त दुसरा पर्याय मी तुला देत नाही."
आजवरच्या आयुष्यात मी ऐकलेले सर्वात प्रभावी अन निर्वाणीचे वाक्य/संवाद. ज्या वाक्याने अन पुढील घडामोडींनी संपूर्ण आयुष्यालाच एक सकारात्मक कलाटणी मिळाली असे हे वाक्य मी तब्बल ९-१० वर्षांपूर्वी ऐकले. ऐकले अन तेव्हा मी घाबरले. मला कळेचना माझा नवरा असे का म्हणतो आहे? म्हणजे भांडणे तर सर्वांकडे होतात. नवरा-बायको म्हटले की मतभेद हे अनिवार्यच नाही का? हां आता आमची वरचेवर होतात, रोज होतात, मी आदळाअपट करते अन तो घराबाहेर निघून जातो, मी रडते, धुसफुसते अन मग शांत होते पण म्हणून मी वेडी आहे? हा मला वेडी ठरवतोय? होय सायकिअ‍ॅट्रीस्ट्कडे जाणे/दाखविणे म्हणजे वेडे असणे हीच माझीदेखील समजूत होती. मला हे दिसत नव्हते, कळत नव्हते की मी अतिशय अ‍ॅग्रेसिव्ह होते आहे, सतत भांडते आहे, वस्तू फेकते आहे. रात्री मी दचकून उठे.... रोज रोज रोज!!! पण मला वाटे सर्वांना निदान बर्‍याचजणांना ही समस्या असते. मला बर्‍याच रात्री झोप नीट लागत नसे. कधी अतिशय शांतीचा अनुभव येई तर ९०% वेळा पूर्वायुष्यातील वाईट साईट प्रसंग आठवून, अंगाची लाही लाही होई. सतत चिडचिडेपणा, अति अन निरर्थक आवेश (अ‍ॅग्रेसिव्हनेस) अन भांडखोर वृत्ती. अन शिवाय माझी "साडेसाती" चालू आहे हे का नाही विचारात घेत हा? साडेसाती संपली की हे सर्व बंद होईल. होईल???? ______________________________________________________ दुसर्‍याच दिवशी आम्ही पटेल डॉक्टरांकडे गेलो. मी एक प्रश्नावली भरली व वाट पहात आम्ही वेटींग रुम मध्ये बसलो. खूप गर्दी होती. पण ते सर्व लोक वेडे होते अन माझी खात्री होती मी त्यातली एक नाही. माझा आत्मविशवासच दांडगा होता, अन स्वतःबद्दलच्या कल्पना अनरिअ‍ॅलिस्टीक!!! मला माहीत होते आम्हाला डॉक्टर "मॅरेज काऊन्सिलींग" बद्दल काही सांगतील अन मग सुट्टी!! पण आमची वेळ आली, डॉक्टरीण बाई ५-७ मिनीटे माझ्याशी बोलल्या अन निदान झाले - ------बायपोलर डिसॉर्डर!!!------ मला काही गांभीर्य लक्षात आले नाही कारण ते कळण्याची माझी मनस्थितीही नव्हती ना माहीती. त्या दिवशीच प्रिस्क्रिप्शन दिले अन प्रायोगिक तत्वावर माझी औषधे तत्काळ सुरु केली गेली. ____________________________________________________________ घरी आल्यावर मी वाचले अन मला कळले - हा एक गंभीर स्वरुपाचा मानसिक आजार आहे, मेंदूतील असंतुलनाचे निदर्शक असलेला. एक प्रकारची मूड डिसॉर्डर!!! या आजारात एखाद्या लंबकाप्रमाणे मूड हेलकावे खातो. नैराश्याची गर्ता अन उन्मादाचा पिसाटपणा या दोहोंच्या मध्ये मूड हिंदोळे घेत रहातो. भयंकर!!!! माझा विश्वासच बसेना.
नाही मी सांगते घरातच दोष आहे. वास्तुदोष!!! वास्तुदोष!! भूत आहे हो घरात. हे घरच पछाडलेले आहे. घर बदलले तर सर्व काही सुरळीत होईल. अगदी १००%.
..........मी २० वर्षाची असताना, या विश्वासातूनच आम्ही घर बदलले. कारण? कारण मला रात्री भयस्वप्ने पडत. दरदरुन घाम फुटे अन मी आई-बाबांकडे धाव घेई त्यांना तक्रार करे. मला इरॅशनल भीती वाटे - मी घर गिळेन याची, मी गादी गिळेन , मी टीव्ही गिळेन ........ अगदी अगदी इरॅशनल असे पण माझा कंट्रोल नसे. पण भयंकर भीती वाटे..... पॅनिक अ‍ॅटॅक्स!!! सर्वांची खात्री होती भूत अन वास्तुदोषाबद्दल. अर्थात घर बदलूनही काही फायदा झाला नाहीच मला रात्री किंचाळ्या ऐकू येणे चालूच राहीले. पण वेळेवर औषधोपचार न मिळाल्याने, माझी मात्र अपरिमीत हानी झाली - अभ्यासावर परीणाम झाला, लग्नानंतर कौटुंबिक स्वास्थ्याची पूर्ण वाट लागली. _____________________________________________________ पटेल डॉक्टरांनी ताबडतोब औषधे सुरु केली. पण ती लागू पडेनात, कधी दिवसा पेंग येई तर कधी रात्री ट्क्क जाग येई. कधी अत्यंत वाईट प्रसंग आठवून मी तासन तास गुडघ्यात डोके घालून बसे .... होय अगदी सार्वजनिक ठिकाणीही. रात्री कोणीतरी चापट मारुन जागे करते आहे असले भास होत. दचकून उठणे व निद्रानाश हे तर पाचवीला पूजले होते. बरेचदा वेळ अगदी संथपणे पुढे सरके, अक्षरक्षः गोगलगाईच्या गतीने. अन्य कोणाला त्याचा त्रास होत नसे पण मला अतिशय त्रास होई. या सर्वांचे कारण होते दर ३ दिवसांनी बदलणारी औषधे अन लागू न पडणे हा फॅक्टर. दुहेरी भीती ही असे की अरे बापरे औषधे संपली तर पुढे काय - शॉक ट्रीटमेन्ट??? पण घाबरण्याचे कारण नव्हते, आता अनेक अनेक अगणित औषधे निघालेली आहेत अन शॉक ट्रीट्मेन्ट्ची खरच फारशी गरजच उरलेली नाही. निदान असा विश्वास मला डॉक्टरीणबाई देत. शेवटी औषधांचे एक कॉकटेल सापडले, ती औषधे फाइन ट्यून झाली अन हळू हळू मी बरी होऊ लागले. अक्षरक्षः आमूलाग्र बदल घडू लागला. मूड, व्रुत्ती, विचार, स्वप्ने सार्‍यात बदल घडू लागला.अन अक्षरक्षः स्फिन्क्स पक्षासारखी झेप घेत मी बरी होऊ लागले. कधीही दुसर्‍याचा तीळमात्र विचार न करणारी मी, माझ्या घासातून घास वेगळा ठेऊ लागले. सततची चीड्चीड संपली, तिची जागा शांततेने घेतली अन मुख्य म्हणजे काही पूर्वायुष्यातील काही भयंकर प्रसंग आयुष्यात पहील्यांदा विस्मृतीत गेले. मला जग सकारात्मक भासू लागले. स्वप्नेही लॉजीकल सिक्वेन्स असलेली पडू लागली. कमाल आहे या औषधांची! जे जग खरच वैर्‍यासारखे भासे तेच आता आनंददायक वाटू लागले. ____________________________________________________ नवर्‍याने या आजारात अथक अथक अन निव्वळ अमेझिंग साथ दिली. हे माझे पूर्वसुकृत अन पुण्याइ का काय माहीत नाही पण जिथे सर्वांनी होय सर्वांनी त्याला सांगीतले होते की हिला वेड्यांच्या इस्पितळात फेकून दे, तिथे त्याने मला चिकाटीने त्या नरकातून बाहेर काढले. मला रोज व्यायाम करायची सक्ती केली, फक्त कॉम्प्लेक्स अन पौष्टीक अन्न खाण्याची सवय अंगी बाणवली. माझ्या झोपेच्या वेळा आम्ही "रिलीजसली" पाळू लागलो. आयुष्याला एक वलण आले, एक क्वालिटी आली. हा आजार बरा होत नाही. मी मेल्यावरच हा संपणार पण ... पण ....समाधानाची बाब ही की "अत्यंत प्रेडिक्टेबल अन मॅनेजेबल" आहे. औषधे-आहार-निद्रा व व्यायाम या चार भक्कम पायांवर डोलारा सांभाळला की हा आवाक्यात येतोच येतो. तरता येतो. आहे भयंकर पण वेसण तुमच्या हातात असते.
  • Log in or register to post comments
  • 57083 views

प्रतिक्रिया

Submitted by स्पंदना on Tue, 04/22/2014 - 08:54

Permalink

ह्म्म्म्म! विचार करण्यासारखी

ह्म्म्म्म! विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्नांची राणी on Tue, 04/22/2014 - 09:05

Permalink

किती धीराची आहेस तु शुचि..!!

किती धीराची आहेस तु शुचि..!!
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Tue, 04/22/2014 - 09:18

Permalink

हुम्म

झाले ते विसरा आणी पुन्हा जोमाने नव्या जीवनाला तुमच्या अत्यंतिक काळजी घेणार्‍या जोडीदाराबरोबर पुन्हा एकदा सामोरे जा. जीवनातला प्रत्येक क्षण असाच आनंदाने उपभोगा.दोघांचे अभिनंदन आणी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Tue, 04/22/2014 - 09:26

Permalink

बायपोलर असलेले एक दोघे जण

बायपोलर असलेले एक दोघे जण माहित आहेत. तुमच्या करेजला सलाम
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Tue, 04/22/2014 - 09:26

Permalink

शुचि,

पुढील आयुष्यासाठी अनेक हार्दिक शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

Submitted by पेट थेरपी on Tue, 04/22/2014 - 09:41

Permalink

विथ यू ऑलवेज.

वाचून काळजी वाटली. अवघड असते हे सगळे. तुम्हाला व तुमच्या अहोंना हार्दिक शुभेच्छा. पुढील जीवनासाठी.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Tue, 04/22/2014 - 09:41

Permalink

शाब्बास आहे तुमच्या नवर्‍याला आणि तुम्हालाही

शाब्बास आहे तुमच्या नवर्‍याला आणि तुम्हालाही. मोठ्या धैर्याने आणि चिकाटीने त्यांनी आणि तुम्ही आलेल्या आपत्तीचा मुकाबला केलात. पुढील वाटचाली साठी तुम्हा दोघांना हार्दिक शुभेच्छा. (लेख वाचता वाचता एक नवरा म्हणुन माझ्या कडुन झालेल्या चूकांची यादी माझ्या डोळ्या समोर तरळुन गेली आणि वाटलं त्यातल्या काही चूका टाळता आल्या असत्या तर बरं झाल असत.)
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Tue, 04/22/2014 - 14:00

In reply to शाब्बास आहे तुमच्या नवर्‍याला आणि तुम्हालाही by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

+१

खरचं मी मिपाचा सदस्य आहे याचा आज अभिमान वाटतोय. बाकी
(लेख वाचता वाचता एक नवरा म्हणुन माझ्या कडुन झालेल्या चूकांची यादी माझ्या डोळ्या समोर तरळुन गेली आणि वाटलं त्यातल्या काही चूका टाळता आल्या असत्या तर बरं झाल असत.)
याच्याशी बाडीस.. :-(
  • Log in or register to post comments

Submitted by नि३सोलपुरकर on Tue, 04/22/2014 - 09:50

Permalink

शुभेच्छा

शुचि..!! जीवनातला प्रत्येक क्षण असाच आनंदाने उपभोगा.दोघांचे अभिनंदन आणी शुभेच्छा
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर कांदळकर on Tue, 04/22/2014 - 09:55

Permalink

संयत प्रामाणिक लेखन .......

आवडले. आमच्या माजी शेजार्‍यांनी सुमारे १९८५ साली मला डॉ. श्रीकांत जोशी लिखित 'मनाचा मागोवा' नावाचे पुस्तक वाचायला दिले होते. त्यात बर्‍याच मानसिक विकारांचे वर्णन आहे. परंतु आता उपचारपद्धती बरीच बदलली आहे. त्या लेखकाच्या मते ज्याने मनोविकारावरच्या पहिल्या औषधाचा शोध लावला त्याला नोबेल मिळायला हवे होते. या मतात मनोविकारोपचाराचे महत्त्व आढळून येते. माझ्या एका डॉक्तर मित्राच्या मते समुपदेशनाने बर्‍याच प्रमाणात खिन्नता, भावनोद्दीपन वगैरेंवर ताबा मिळवता येतो. मानसोपचारतज्ञ आणि समुपदेशक हे बहुधा जोडीने उपचार करतात. समुपदेशक हा शक्यतो स्वभाषिकच असावा. त्यामुळे भावना आणि व्यथा अचूक व्यक्त करणे चांगले जमते. समाजातल्या निदान २० ते ३० टक्के व्यक्तींना समुपदेशनाची गरज आहे असे मला वाटते. त्यांच्यामुळेच वास्तुशास्त्र वगैरे थोतांडाचे अमाप पीक येते. आपल्या यजमानांना प्रणाम. चांगल्या लेखाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Tue, 04/22/2014 - 10:15

Permalink

शुचि आपल्या लिखाणावरुन मी हे

शुचि आपल्या लिखाणावरुन मी हे निदान केव्हाच केले होते.फक्त ते व्यक्त केले नव्हते. कारण तसे ते व्यक्त करणे हे उचित ठरले नसते. आपले लिखाण हे प्रबोधनाचा उत्तम मार्ग आहे. शरिर जसे आजारी पडते तसे मन पडते, शरिराला जसे व्यायाम,स्वच्छता,डागडुजी आवश्यक असते तसे मनालाही. पण समाजाचा मानसिक आरोग्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन अजूनही मागासलेला आहे.तो मुख्यतः अज्ञानामुळे व पुर्वदूषितग्रहांमुळे.तो आपल्यासारख्या लोकांच्या प्रबोधनामुळे हळू हळू सुधारेल. मी स्वतः आयबीएस या पोटाच्या सायकोसोमॅटिक त्रासासाठी मानसोपचारतज्ञांची मदत घेतो. समाजात हळू हळू हा बदल होतो आहे ही मला समाधानाची बाब वाटते. अंधश्रद्धा व मनोविकार यांचा जवळचा संबंध आहे त्यामुळे हा विषयासाठी अंनिस मधे मानसमित्र या संकल्पनेचा व उपक्रमाचा उदय झाला आहे. असो आपल्या लेखाचा अनेकांना सकारात्मक उपयोग होणार आहे हे भाकित मी वर्तवतो :)
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Tue, 04/22/2014 - 14:13

In reply to शुचि आपल्या लिखाणावरुन मी हे by प्रकाश घाटपांडे

Permalink

आपल्या लेखाचा अनेकांना

आपल्या लेखाचा अनेकांना सकारात्मक उपयोग होणार आहे हे भाकित मी वर्तवतो Smile
हाहाहा :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 04/22/2014 - 10:26

Permalink

सायकिअ‍ॅट्रीस्ट्कडे जाणे

सायकिअ‍ॅट्रीस्ट्कडे जाणे म्हणजे त्यांच्याकडे जाणारी व्यक्ती ही गॉन केस आहे हा विचारच मुळात चुकीचा आहे.जशी शरिराला व्याधी होउ शकते तशीच अवस्था मनाची देखील होउ शकते. जर त्यातुन बाहेर पडणे शक्य असेल तर मग उपचार का घेउ नये ? त्यामुळे तुझे विशेष अभिनंदन ! ? :)
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Tue, 04/22/2014 - 10:28

Permalink

सलाम!

कडक सलाम! _/\_ मागे "कोणार्कची शिल्पे" आणि आता हे लेखन. मिपाकरांकडे मनातले खास काही उघड बोलायला लोकांना आवडते-जमते-चालते, हे मिपाच्या वातावरणाचेही यश आहे
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Wed, 04/23/2014 - 21:59

In reply to सलाम! by ऋषिकेश

Permalink

मिपाकरांकडे मनातले खास काही

मिपाकरांकडे मनातले खास काही उघड बोलायला लोकांना आवडते-जमते-चालते, हे मिपाच्या वातावरणाचेही यश आहे
:) हे वाक्य आपल्या मनाचा मोठेपणा दाखविते ऋषीकेश. आपल्याबद्दलचा आदर अधिक दुणावला.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 04/22/2014 - 10:35

Permalink

प्रांजळपणाने केलेले लिखाण

प्रांजळपणाने केलेले लिखाण मनापासून आवडले. भावी वाटचालीसाठी अनेक हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on Tue, 04/22/2014 - 10:53

In reply to प्रांजळपणाने केलेले लिखाण by प्रचेतस

Permalink

शुचि. तुम्हाला _________/\___

शुचि. तुम्हाला _________/\_________ खरोखर हिम्मत लागते.. हे सगळं सहन करायला.. आणि तितक्याच धैर्याने लोकांसमोर मांडायला!!!.. रीअली हॅट्स ऑफ्फ!!!.....
  • Log in or register to post comments

Submitted by मेघना मन्दार on Tue, 04/22/2014 - 10:48

Permalink

शुभेच्छा

खुप खुप शुभेच्छा पुढील वाटचाली साठी .. :-) नेहमी आनन्दी रहा आणि हसत रहा.. :)
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Tue, 04/22/2014 - 10:57

Permalink

ऋषिकेश आणि वल्ली

आणि इतर मिपाकरांशी सहमत आहे. हा आजार बरा होत नाही. मी मेल्यावरच हा आजार संपणार असे म्हणण्यापेक्षा येणार्‍या प्रत्येक दिवसात हा आजार सोबत असण्याची शक्यता शून्याकडे जाईल असेच म्हणू या. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by सार्थबोध on Tue, 04/22/2014 - 10:57

Permalink

तुमचे कौतुक करावे तीतके थोड़ेच

तुमच्या यजमानाना मानले, आणि तुमची रोगवर मात करायची धमक पाहुन तुमचे कौतुक करावे तीतके थोड़ेच ....तुम्हाला दोघाना नमस्कार
  • Log in or register to post comments

Submitted by थॉर माणूस on Tue, 04/22/2014 - 11:16

Permalink

_/\_

_/\_ तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबीयांनाही...
  • Log in or register to post comments

Submitted by सविता००१ on Tue, 04/22/2014 - 11:46

Permalink

शुचि....

शुचि तुझे व तुझ्या नवर्‍याचे खूप कौतुक. शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 04/22/2014 - 11:53

Permalink

किती वेगळी आहेस ग तू.. तुझं

किती वेगळी आहेस ग तू.. तुझं लिखाण नेहमीच वेगळं असतं.. म्हणजे त्यात एक निरागसपण आहे.. तुझ्या धाग्यांवर अनेकदा कुणी निगेटिव्ह केमेंट केली तरी तू ती अनेकदा सहजपणे स्वीकारतेस. तुझ्या त्या परवाच्या ऑफिसवरच्या धाग्यावर सुद्धा तू विरोधी कमेंट्सपण समजुन घेतल्यास.. आताही हा लेख वाचुन समजत नाहीये की काय बोलावं.. किती प्रांजळपणे लिहीलय.. मनापासुन.. तुला खरच सलाम! आणि हो तुझ्या नवर्‍यालाही!
  • Log in or register to post comments

Submitted by बाबा पाटील on Tue, 04/22/2014 - 12:00

Permalink

प्रथम अभिनंदन...

या आजारातुन उभे राहिल्या बद्दल. दुसरे तुमच्या धैर्याला सलाम.
  • Log in or register to post comments

Submitted by पिंगू on Tue, 04/22/2014 - 12:01

Permalink

दंडवत तुला आणि साष्टांग

दंडवत तुला आणि साष्टांग स्पेशल दंडवत तुझ्या नवर्‍याला. कारण भोगणार्‍यापेक्षा शुश्रुषा करणार्‍याला अधिक त्रास असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by अद्द्या on Tue, 04/22/2014 - 12:22

Permalink

काकू. .

काकू. . असं लिहायला जबरदस्त मानसिक ताकत लागते . तुम्हाला . आणि तुमच्या "ह्यांना" . . लैच कडक सेल्युट . . बाकी फक्त एवढंच करू शकतो . ________/\_________
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Tue, 04/22/2014 - 12:44

Permalink

शुचितै तुम्हाला आणि तुमच्या

शुचितै तुम्हाला आणि तुमच्या नवर्‍याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by Mrunalini on Tue, 04/22/2014 - 13:44

Permalink

शुचि ताई, तुम्हाला आणि

शुचि ताई, तुम्हाला आणि तुमच्या नवर्‍याला खुप शुभेच्छा!! असा नवरा मिळणे खरच खुप भाग्य लागते.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Tue, 04/22/2014 - 14:11

Permalink

इतक्या शुभेच्छा दिल्यात,

इतक्या शुभेच्छा दिल्यात, मनोधैर्य वाढविलेत, कौतुक केलेत, इतकी परिपक्वता दाखविलीत काय बोलू. मला खूप बरे वाटले. रामदास म्हणतात तसे "प्रत्येक दिवस मला व्याधी पासून मुक्तच करतो आहे." ही भावनाच सुखावह आहे. कांदळकर यांनीही समुपदेशनाचा मांडलेला मुद्दा योग्यच आहे. पिरा म्हणते तशी - "विरोधी कमेंट्स समजून घेते" कारण मला माहीत आहे की I do not (absolutely) do not have luxury of excited mood, any unusal upheavals of mood. भावनोद्दॆपन टाळायचे (sorry I am typing on some site & copy pasting hence many typos) परत एकदा सर्वांचे आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Tue, 04/22/2014 - 14:18

Permalink

खूप हिंमत आहे शुचि तुझ्याकडे.

खूप हिंमत आहे शुचि तुझ्याकडे. अगदी डॉक्टरचे निदान स्विकारण्यापासून आणि स्वतःमध्ये बदल करायला तयार होण्यापासून खरोखरच खूप हिंमत दाखवली आहेस. त्यामुळेच तु त्यातून बाहेर पडलियेस आणि आनंदी राहू शकतेयस. असे स्वतःकडे नि:पक्षपाती द्रुष्टीनी पहायची हिम्मत सगळ्यांकडे नसते. उलट 'बाहेरच्या' कुठल्यातरी कारणाकडे बोट दाखवलं जातं. पण 'आत' काहीतरी बिघदलय, काहितरी कमी पडतय, त्यामुळे imbalance व्हायला बाहेरचे निमित्त पुरतंय, हे लक्षात घेतले जात नाही. मानसिक आजारांच्या बाबतीत तर नाहीच नाही, त्यामुळे बरेचवेळेस पुढचे उपाय करणंच शक्य होत नाही. आता सगळे उपाय करणं शक्य असतानाच्या काळात सुद्धा काही स्किझोफ्रेनिच/डिप्रेशनच्या पेशन्ट असलेल्या मुलींना परत माहेरी आणून सोडलेलं पाहिले आहे. त्या पाश्वभूमीवर, तुझ्या नवर्‍यानी मात्र कायम तुझ्या बाजूनी आणि तुझ्या आजाराविरुद्ध उभे रहाणं अगदी आदर्श म्हणावं असंच आहे. खरोखरचा 'सखा सोबती'. ग्रेट कपल. :)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 04/22/2014 - 14:31

Permalink

प्रांजळ कथन आवडले. तुम्हाला

प्रांजळ कथन आवडले. तुम्हाला आणि तुमच्या पतिदेवांना सलाम! उगाच ज्योतिषी, ग्रहशांती, फेंगशुई असले काहीतरी अशास्त्रीय करण्याऐवजी थेट डॉक्टरांकडे तुमची समस्या घेऊन गेल्यामुळेच लवकर समस्यामुक्त झालात. बायपोलर डिसऑर्डर असणारे इतरही काही जण असतील. अशांसाठी एखादा मदत/आधार गट असेल तर त्यात सामील होऊन इतरांना मदत करता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Tue, 04/22/2014 - 14:32

Permalink

अभिनंदन..

सर्वप्रथम तर एवढा समजूतदार नवरा मिळाला, ह्याबद्दल अभिनंदन.. त्यानंतर, मनोरोग म्हणजे फिल्मी स्टाईल वेडेपणा नसतो, आणि त्यावर उपाय आहेत हे समजुन उपचारांना सामोर्‍या गेल्यात, ह्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन. आणि, उपचार लागू पडल्याने तुम्ही आता सुखात आहात, ह्यासाठी त्रिवार अभिनंदन.. आता दाद घेण्याची पाळी.. स्वतःला एक मनोरोग होता, आहे हे खुल्या संस्थळावर सांगण्याची हिंमत दाखवलीत, त्या हिंमतीला दाद देतो.. ह्या लेखातून जर दुसर्‍या कुणाला त्रास असेल तर त्यानी तो ओळखावा आणि इलाज करावा म्हणून स्वतःची गोष्ट सांगितलीत, त्या नि:स्पृह वृत्तीची दाद देतो.. आणि तुमच्या पुढच्या सुखाच्या आणि समृद्धीच्या सहजीवनासाठी तुम्हा दोघांनाही शुभेच्छा..
  • Log in or register to post comments

Submitted by vrushali n on Tue, 04/22/2014 - 14:36

Permalink

…/\…

hats off
  • Log in or register to post comments

Submitted by आरोही on Tue, 04/22/2014 - 14:44

Permalink

खरेच ग शुचीताई खूप कठीण

खरेच ग शुचीताई खूप कठीण काळातून गेलीयेस ग ...आणि धीराची आहेस हे सुद्धा पटले ..असा अनुभव सार्वजनिक स्थळी मांडायला खरेच खूप धैर्य हवे...hats off to you and your husband
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 04/22/2014 - 14:50

Permalink

एक विशेष सूचना

शुचि ताई, कौतुक इ. इ. बरेच झाले. आता यापुढे आपण कुणावर जरासा तिरकस प्रतिसाद दिलात तरी ( मिसळपाव मधील माझ्या थोड्याशा अनुभवानुसार) लोक आपल्या आजारावर घसरण्याची शक्यता आहे हे लक्षात घ्या. आपल्याला त्यांच्या "अशा" प्रती-प्रतीसादाची अपेक्षा ठेवूनच वागावे लागेल. असे फार मोठ्या प्रमाणात भारतात समाजात होताना दिसते.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 04/22/2014 - 15:02

In reply to एक विशेष सूचना by सुबोध खरे

Permalink

>>आता यापुढे आपण कुणावर जरासा

>>आता यापुढे आपण कुणावर जरासा तिरकस प्रतिसाद दिलात तरी ( मिसळपाव मधील माझ्या थोड्याशा अनुभवानुसार) लोक आपल्या आजारावर घसरण्याची शक्यता आहे हे लक्षात घ्या. एखाद्याला असलेल्या आजाराच्या बाबतीत तरी मिपाकरांनी असं काही केलेलं अजून तरी पाहण्यात नाही. आधीही असा कोणाचा आजार उघडकीस आला/ त्या व्यक्तीने स्वतःहून मिपाकरांना सांगितला त्याला/तिला इथे समजून घेण्याचाच प्रयत्न केला गेला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Tue, 04/22/2014 - 15:11

In reply to >>आता यापुढे आपण कुणावर जरासा by सूड

Permalink

+१

निदान ९०% लोकांबद्दल खात्री आहे, की ते असे करणार नाहीत. आणि कुणी तसे केलंच तरी त्याचा त्रस करुन न घेण्याइतकी शुचि खंबीर आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 04/22/2014 - 15:18

In reply to +१ by कवितानागेश

Permalink

+२

सूड आणि माऊशी सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 04/22/2014 - 15:12

In reply to >>आता यापुढे आपण कुणावर जरासा by सूड

Permalink

मानसिक आणि शारीरिक आजारात फ़रक

सूड साहेब हाच मानसिक आणि शारीरिक आजारात फ़रक आहे. लोक वाद थांबवताना पटकन "अरे वो सायकिक केस है, जाने दो" असे म्हणून त्या रुग्णाला न भरून येणारी जखम करून जातात. आजाराचे सुद्धा उच्चभ्रू आणि गरीब असे प्रकार आहेत. चष्मा लावणाऱ्या कडे कुत्सित नजरेने पाहिले जात नाही पण कानाला यंत्र लावणाऱ्या कडे " वेगळ्या" नजरेने पहिले जाते. हि वस्तुस्थिती आहे. म्हणूनच पन्नाशीचा माणूस चष्मा सहजपणे लावतो पण कानाचे यंत्र लावत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 04/22/2014 - 15:15

In reply to मानसिक आणि शारीरिक आजारात फ़रक by सुबोध खरे

Permalink

>>>चष्मा लावणाऱ्या कडे

>>>चष्मा लावणाऱ्या कडे कुत्सित नजरेने पाहिले जात नाही पण कानाला यंत्र लावणाऱ्या कडे " वेगळ्या" नजरेने पहिले जाते. हि वस्तुस्थिती आहे. :) खरंय! - डाव्या कानानं आजाबात ऐकू न येणारा आणि उजव्या कानाचं आप्रेशन झालेला ;)
  • Log in or register to post comments

Submitted by दिव्यश्री on Tue, 04/22/2014 - 15:24

In reply to मानसिक आणि शारीरिक आजारात फ़रक by सुबोध खरे

Permalink

+++++++++++++++++ १ . अगदी खर

+++++++++++++++++ १ . अगदी खर , योग्य बोलले , लिहिले आहे . सगळे लोक सगळीकडे सदासर्वदा सद्गुणांचा पुतळा असल्यासारखे नाही वागत . ते त्यांच्या सोयीनुसारच वागतात . मिपावर हे होणार नाही याची काळजी , खबरदारी आपणच घेतली पाहिजे .सगळी कडे चांगले / कमी चांगले / आजीबात चांगले नाही असे लोक आढळतातच कि . डॉ.णी अगदी योग्य तेच सांगितले आहे . शारीरिक आजार दिसतो मानसिक दिसत नाही त्यामुळे त्या व्यक्तीला होणारा त्रास /यातना ह्या फक्त ते भोगणारी व्यक्तीच जाणू शकते . मारणार्याचा हात धरता येतो पण बोलणार्याच तोंड नाही धरू शकत तसच लिहिणार्याचा हात नाही धरू शकत कोणी .
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 04/22/2014 - 15:07

In reply to एक विशेष सूचना by सुबोध खरे

Permalink

खर्‍यांचं म्हणणं बरंचसं खरं

खर्‍यांचं म्हणणं बरंचसं खरं आहे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मोहन on Tue, 04/22/2014 - 15:21

Permalink

नतमस्तक !

आपल्या व आपल्या जोडीदाराच्या धैर्यापुढे केवळ नतमस्तक . अशा लेखांमुळेच मिपावर येण्याचे सार्थक होते.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 04/22/2014 - 15:23

Permalink

च्यायला काय डेरिंग हो तुमचं.

च्यायला काय डेरिंग हो तुमचं. मानलं बॉ _/\_
  • Log in or register to post comments

Submitted by कुसुमिता१ on Tue, 04/22/2014 - 15:33

Permalink

सुरेख

शुचि ताई, खुप खुप कौतुक आणि अभिमान वाटला तुमच्या बद्दल! तुम्ही केवळ या आजाराशीच लढलात अस नाही तर त्याबद्दल लो़कांना सांगण्याच धैर्यही दाखवलत! खरच खुप कमी लोकांच्यात असतात असे गट्स! तुमच्या मिस्टरांचही खुप कौतुक!
  • Log in or register to post comments

Submitted by संपत on Tue, 04/22/2014 - 15:54

Permalink

बाय पोलर बद्दल पहिल्यांदा

बाय पोलर बद्दल पहिल्यांदा ऐकले ते 'homeland' ह्या मालिकेत. कुतूहलाने जालावर अधिक शोध घेतला असता नात्यातील एका 'विक्षिप्त' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या लक्षणांशी साधर्म्य आढळले. आणि त्या व्यक्तीशी त्याकाळी अधिक सहानुभूतीने वागायला पाहिजे होते याची दुखद अपराधी जाणीव झाली. तुमचा लेख हा केवळ हि लक्षणे असणाऱ्या रुग्णासाठीच नव्हे तर आमच्या सारख्या अनेक जणांना जे अशा किंवा इतर मानसिक आजारांनी ग्रस्त लोकांबरोबर कळत नकळत वावरतात त्यांच्यासाठी मोलाचा ठरेल. तुमचे आणि तुमच्या नवऱ्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. स्कीझोफ्रेनिया ह्या आणखीन एका अधिक रुद्र मानसिक आजाराला धैर्याने तोंड देणाऱ्या रुग्णासाठी व त्यांना आधार देणाऱ्या प्रमुख व्यक्तींसाठी आनंद नाडकर्णी यांची संस्था शुभार्थी आणि शुभंकर असे दोन सन्मान दरवर्षी देते. त्यातूनच साथ देणारी व्यक्ती ह्या आजारांवर मात करण्यासाठी किती महत्वाची असते हे अधोरेखित होते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Tue, 04/22/2014 - 16:10

Permalink

काळजी...

एखाद्या मनोव्याधीचे दृष्य परिणाम दिसू लागले की आपण मानसोपचार तज्ञांकडे जातो. (जाणं अपेक्षित असतं) पण शारीरिक आजारांबाबत जशा कांही तपासण्या वरचेवर करून आपण संभाव्य शारीरिक व्याधीला दूर ठेवतो/तसा प्रयत्न करतो तसे मनोव्याधीबाबत करता येते का? म्हणजे आज मला (किंवा माझ्या आजूबाजूच्यांना) माझ्या कुठल्याही मनोव्याधीचे दृष्य परीणाम दिसत नसतील तरी भविष्यात तशी एखादी व्याधी उपटणार नाहीच असे नाही. तर आजच्या तथाकथित आरोग्यपूर्ण मनाने मानसोपचार तज्ञास भेट दिली तर स्वभावातील दोष शोधता येतात का? मुंबईत किंवा पुण्यात चांगले अनुभवी मानसोपचार तज्ञ कोणाच्या माहितीत आहेत का?
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Tue, 04/22/2014 - 16:38

In reply to काळजी... by प्रभाकर पेठकर

Permalink

मुंबईत

डॉ आनंद नाडकर्णी (ठाणे), डॉ.मनोज भाटवडेकर, डॉ.राजेंद्र बर्वे, डॉ पाटकर, डॉ. प्रभू ही मराठी नावे सर्वपरिचित आहेत. इतरही अमराठी डॉक्टर बरेच आहेत. मानसोपचारतज्ज्ञांची मधून मधून भेट घेऊन मानसिक आरोग्य तपासून घेण्यात नुकसान काहीच नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Tue, 04/22/2014 - 16:55

In reply to मुंबईत by राही

Permalink

धन्यवाद.

धन्यवाद राही.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Tue, 04/22/2014 - 18:25

In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर

Permalink

डॉ. शेट्टी

डॉ. ज्योती शेट्टी या एक माहितीतील मनोविकारतज्ञ आहेत. चांगल्या मराठी बोलतात. बर्वे/मोहन आगाशे वगैरे ग्लॅमरस नावांपेक्षा मी यांना नक्कीच रेकमेंड करीन.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com