- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
इथेच पॅथोलॉजी या चित्रपटाचं वेगळेपण आहे. या चित्रपटात अनेक खून आहेत, पण त्याची कारणं अतिशय वेगळी, अगदी आपण कल्पनाही करु शकणार नाही इतकी वेगळी आहेत. इथे तोंडी लावण्यापुरती माफक मारामारीही आहे, शेवटी चित्रपटाच्या नायकाने घेतलेला सूड आहे, आणि ज्याला 'लव्ह, सेक्स और धोखा" म्हणतात ते सुद्धा आहे, पण हे सगळं हा चित्रपट अतिशय वेगळ्या पद्धतीने मांडतो.
आधीच सांगतो. ज्यांना बिभत्स रसाचं वावडं आहे, किंवा ज्यांची हृदयं कमकुवत आहेत, अशा दोन्ही प्रकारच्या लोकांनी ह्या सिनेमाच्या वाट्याला जाऊ नये. कारण हा चित्रपट अतिशय अंगावर येणारा असा आहे. मेंदूला झिणझिण्या येणं म्हणजे काय याचा अनुभव हा सिनेमा देतो.
चित्रपट सुरु होतो ते मृतदेहांची तोंडं एका इस्पितळातील निवासी विद्यार्थ्यांनी हलवण्याच्या दृश्याने. एखाद्या पपेट शो मध्ये जसं दोर्यांच्या सहाय्याने बाहुल्यांचे अवयव हलवले जातात तसंच, पण इथे दोर्यांशिवाय, फक्त हातमोजे घातलेल्या हातांनी. काल्पनिक संवाद त्या मृतदेहांच्या तोंडी घालून त्यातला आनंद लुटणे हा उद्देश. इथेच आपल्याला शिसारी येते. पण वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर म्हणून काम करताना, विशेषकरून शवविच्छदनाचं काम करताना संवेदनशील होऊन चालत नाही. किंबहुना असलेला संवेदनशीलपणा दाबून टाकावा लागतो, आणि मग त्यासाठी असली कृत्य जन्म घेतात.
या चित्रपटाचा नायक टेडी ग्रे (Milo Ventimiglia) हार्वर्ड मेडिकल स्कूलमधून अत्युच्च गुण मिळवून देशातल्या सर्वात प्रतिष्ठीत पॅथोलॉजी अभ्यासक्रमात दाखल होतो. यात त्याच्या बुद्धिमत्तेबरोबरच त्याच्या भावी सासर्याचाही वशीला असावा अशा अर्थाचं दृश्य त्याचं स्वागत करणार्या त्याच्या वरिष्ठांशी झालेल्या त्याच्या संवादातून आपल्याला समजतं. हे वरिष्ट त्याची ओळख इस्पितळातील अतिशय हुशार (की चलाख?) समजल्या जाणार्या गटातील डॉक्टर जेक गॅलो (Michael Weston) याच्याशी करुन देतात. डॉ. टेडीची हुशारी ओळखलेला जेक हा लवकरच डॉक्टर टेडी याला आपल्या गटात (की कंपूत?) सामील करुन घेतो.
या गटाच्या गूढ आणि विचित्र वागण्यामुळे डॉक्टर टेडीच्या मनात त्यांच्याविषयी सुरवातीपासूनच संशय निर्माण होतो. एके दिवशी पब मध्ये मौजमजा करत असताना डॉक्टर जेक मी तुम्हाला लेखाच्या सुरवतीला विचारलेला प्रश्न टेडीला विचारतो त्यावर डॉ. टेडी जे उत्तर देतो त्यात तो म्हणतो "आपण (माणसं) म्हणजे जनावरं आहोत. दुसर्याचा जीव घेण्याची वृत्ती आपल्यात उपजतच असते. तुम्हाला हे एव्हाना कळलं असेल असं मला वाटत होतं. हां, आता आपण सुधारलेले, पुढारलेले, वगैरे आहोत, त्यामुळे आपण याविषयी बीअर पिता पिता चर्चा करतो, प्रत्यक्ष कृती करत नाही इतकंच." या प्रसंगामुळे डॉ. टेडी हा इतरांपेक्षा वेगळा आहे आणि तो 'आपल्यातला' होऊ शकतो हे त्या कंपूच्या लक्षात येतं.
टेडी अर्थातच चिडतो, मात्र तोही या खेळात गुंतल्यानं उघडपणे काहीही बोलू शकत नाही. ग्वेनचं पोस्ट मॉर्टम दुसर्या एखाद्या (हुशार) डॉक्टराच्या हातात गेलं तर आपलं बिंग फुटेल ह्या भीतीने तो स्वत:च ग्वेनचं शवविच्छेदन करतो आणि मायट्रल व्हॉल्व प्रोलॅप्स्ने हृदय अचानक बंद पडल्याची नोंद मृत्युचे कारण म्हणून करतो.
आपण अत्यंत हुशारीने केलेल्या खुनाची नोंद ही नैसर्गिक मृत्यू अशी झाल्याने संतप्त झालेला डॉ. जेक एक दिवस टेडीवर इस्पितळातच हल्ला करून त्याला बांधून ठेवतो आणि जाब विचारतो. टेडी त्याला "मला माहित होत..." अशा अर्थाचं बोलत असतानाच या खूनसत्राचा मूक साक्षीदार असलेला आणि जेकच्या गटाने 'बावळट' असं लेबल लावलेल्या टेडीचा सहकारी डॉ. बेन स्ट्रॅविन्स्की (Keir O'Donnell) हा ऐन वेळी मदतीला धावून येतो आणि औषध टाकलेल्या रुमालाने जेकला बेशुद्ध करून टेडीची सुटका करतो. मग हे दोघं जेकने ज्या पद्धतीनं ग्वेनला मारलेलं असतं त्याच पद्धतीनं जेकची इहलोकीची यात्रा संपवतात.
डॉ. जेक गॅलो हा ग्वेनला कसं मारतो आणि डॉ. टेडी आणि डॉ. बेन त्याच पद्धतीनं जेकला नक्की कसं संपवतात हे मात्र इथे सांगण्यात मजा नाही. अर्थातच तुम्हाला हे आंतरजालावर अनेक ठिकाणी वाचायला मिळेलच, पण माझं ऐकाल तर ते वाचू नका. हा लेख वाचून हा चित्रपट बघायचं ठरवलंच असेल तर ते तुम्ही प्रत्यक्ष छोट्या पडद्यावर बघा. हा सिनेमा स्टार मूव्ही किंवा एच.बी.ओ. वर काही महिन्यांपूर्वी लागून गेला आहे, कदाचित पुढेही लागेल. नाहीतर डी.व्ही.डी. विकत घेऊन बघता येईल.
ह्या चित्रपटातले बहुतेक नट आपल्याकडे फारसे माहित नाहीत. तसंच हा सिनेमा भारतात आला नाही त्याला यासारखी अनेक कारणं आहेत. अर्थात, काही सणसणीत अपवाद सोडले तर चांगल्या परकीय कल्पनेचं मातेरं कसं करावं यात नैपुण्य प्राप्त केलेले हिंदी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक बरेच आहेत, त्यामुळे यांपैकी एखादा महाभाग इम्रान हाश्मी, जॉन अॅब्राहिम, डिनो मोरिया किंवा तत्सम ठोकळ्यांना घेऊन एखादा मल्लिकापट किंवा बिपाशापट काढण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही. (आठवा: टॉम क्रूझचा कोलॅटरल आणि त्याची भ्रष्ट नक्कल असलेला इम्रान हाश्मीचा द किलर.) तेव्हा तो अत्याचार होण्याआधी मूळ इंग्रजी चित्रपट बघून घ्या.
चित्रपटातल्या सगळ्यांची कामं विलक्षण ताकदीची झाली आहेत. रूढ अर्थाने अनुक्रमे नायक आणि खलनायक असलेल्या टेडी आणि जेक यांचे काम केलेल्या मायलो वेंटिमिग्लिया (Milo Ventimiglia) आणि मायकल वेस्टन (Michael Weston) यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. अनेक भयपट आणि बीभत्स रसाने ओतप्रोत सिनेमे बघूनही हा सिनेमा माझ्यासाठी अंगावर येणारा अनुभव होता, यात या दोघांच्या सशक्त अभिनयाचा मुख्य वाटा आहे. तेव्हा पुन्हा एकदा सांगतो, हा चित्रपट डोक्याला झिणझिण्या आणणारा आहे, तेव्हा तुम्हाला बीभत्स रसाची अॅलर्जी असेल किंवा रक्तदाबाचा किंवा हृदयविकाराचा त्रास असेल तर ह्या सिनेमा न बघणं श्रेयस्कर.
तर, माणूस खून का करतो याला काही ठोस कारण असावंच लागतं असं नाही. निव्व्ळ मजा म्हणून माणसं मारली जाऊ शकतात किंवा माणसातलं जनावर बळावलं की हे सुप्त स्वभावविशेष उफाळून बाहेर येतात म्हणूनही माणसांना संपवलं जाऊ शकतं. कदाचित म्हणूनच कारण (motive) असो किंवा नसो, पोलीस सगळ्यांवरच संशय घेत असावेत. अर्थात हे विचार नेणिवेच्या पातळीवर (subconsciously) होत असावेत. काहीही असो, शेवटी आपण जनावरं आहोत, नाही का?
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
संदर्भ:
(२) कलाकारांच्या नावांसाठी: विकिपिडिया.
(३) सर्व छायाचित्रे: आंतरजालावरून साभार.
दीपोज्योती दिवाळी अंकयेथे पूर्वप्रकाशित.
मिसळपाव


प्रतिक्रिया
परीक्षण आवडले . चित्रपट
परीक्षण आवडले . चित्रपट पाहिला जाईल .
परीक्षण चांगले लिहिले आहे.
परीक्षण चांगले लिहिले आहे. सिनेमा चांगला असावा असे वाटतेय पण बघेनच असे नाही.
खून वगैरे बघायला नको वाटते..
परीक्षण चांगले आहे. पण
परीक्षण चांगले आहे. पण बिल्कुल बघणार नाही.
मी जरा जास्तच वर्णन केले
In reply to परीक्षण चांगले आहे. पण by कवितानागेश
मी जरा जास्तच वर्णन केले बहुतेक. :D
चित्रपटात प्रत्यक्ष रक्तपात कमी आहे, पण वातावरणनिर्मिती आणि अभिनयातून परिणाम साधला जातो. :)
बालमनावर विपरीत परिणाम होइल असे
चित्रपट शक्यतो टाळा. :) त्यातही होलीवुड म्हटल्यावर हे पहायला मन खरच दगड हवे.
ईंग्रजी चित्रपट आवडतात पण अती
ईंग्रजी चित्रपट आवडतात पण अती जास्त खुन मारामार्या शक्यतो पाहात नाही.
विकृत चित्रपट पहायचेच असतील तर सॉ सिरिज पहा. किंवा एक काळा-पांढरा पिक्चर आहे ब्लड २ द चोसन नावाचा तो पाहा. ह्याच्यावर पुढे गेम पण आली होती.
मला व माझ्या बायकोला असे
मला व माझ्या बायकोला असे सिनेमे जाम आवडतात.
आता हा सिनेमा नक्कीच पहिला जाईल ,
तुमचे परीक्षण आवडले,
उगाच इनोद करायचा ह्या हेतूने एखाद्या शिनेमाची पांचट
चिरफाड करण्यापेक्ष्या एका वेगळ्या विषयावरील तुम्हाला भावलेल्या सिनेमाची तुम्ही आम्हास माहिती दिली.
त्याबद्दल आभार
परीक्षण आवडले....
बघावासा वाटत आहे.
छान लेख...
धन्यवाद...
छान
सहसा मी इंग्रजी चित्रपट पाहत नाही. परंतु मला त्यामध्ये काही वेगळे आणि रहस्यमय असेल तर पाहायला आवडतात...
आपण सांगितलेला चित्रपट रहस्यमय असल्याचे जाणवते आहे त्यामुळे शक्यता आहे कि मी पाहीन.
अशाच वेग वेगळ्या आणि आवर्जून पहाव्यात अश्या चित्रपटांचे परीक्षण आपण करावे ही विनंती.
धन्यवाद.
आभार...
पाहिला बर का.. मस्त आहे..
नक्कीच बघणार
मला वेग-वेगळ्या विषयांतील चांगले इंग्रजी सिनेमे बघायला फार आवडतात. सॉ, अमेरीकन सायको, सेव्हन, टॅक्सी ड्रायव्हर, दी रेसीडंट, फेटल अट्रॅक्शन एक ना अनेक चित्रपट आहेत त्यामुळे हा सिनेमा नक्कीच बघणार.
चित्रपट परीक्षण आवडले.
धन्यवाद.