✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एका गारुड्याची गोष्ट ११: फुरसे: कोकणी धसका !

ज
जॅक डनियल्स यांनी
Sun, 10/13/2013 - 23:38  ·  लेख
लेख
एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद ! एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला ! एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ ! एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे ! एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग. एका गारुड्याची गोष्ट ६: नागपंचमी चे विदारक सत्य ! एका गारुड्याची गोष्ट ७: नाग: अंधश्रद्धेचा बळी ! मनातलं एका गारुड्याची गोष्ट ८: नाग: माझे कॉलचे अनुभव एका गारुड्याची गोष्ट ९: मण्यार: पडद्यामागचे कलाकार ! एका गारुड्याची गोष्ट १०: घोणस: गवतात लपलेला स्नायपर ! निसर्गामध्ये लहान-मोठें कोणी नसते, तो नियम माणसाने बनवला आहे. म्हणजे बघा, गरवारे कॉलेजच्या चहा टपरी वरती जर (इतकुशी)मुंगी जर चावली तर समोरच्या सुंदर मुलीपण विसरल्या जातात. फुरसे हा घोणासाच्या कुटुंबातीलच (viperidae) लहान भाऊ, पण वासेपूरच्या छोट्या फैजल खान सारखा "केहेके लुंगा" म्हणत भल्याभल्यांच्या तोंडाला रक्त आणणारा. फुरसे (विषारी): याचा आढळ अगदी अमेरिकन शस्त्रात्र (वॉरलॉर्ड) व्यापाऱ्यांसारखा मिडल-इस्ट, आफ्रिका ते मध्य आशिया आणि शेवटी भारतीय उपखंडात.(भारत, पाकिस्तान, श्रीलंका इ.) २००९ साली इराक मध्ये तेग्रीस आणि युफ्रेटिस च्या खोऱ्यात दुष्काळ पडला होता, त्या वेळी तिकडच्या हजारो फुरस्यांनी इराकी जनतेची वाट लावून टाकली होती. बहुतेक इराकचे "स" या शब्दाशी वाकडे आहे, आधी सद्दाम-मग अंकल सॅम-शेवटी सॉ-स्केल्ड व्हायपर (फुरसे)! आपल्या इकडे पुण्या-मुंबईच्या (घाटावरच्या) लोकांना फुरसे एवढे माहित नसेल, पण कोंकणात म्हणजे जेवणात चिंच-गुळाची ज्या आमटी चवीने चाखली जाते त्याच चवीने "फुरसे" हा विषय चघळला जातो. "जास्तीत जास्त हातभर लांबी, मातेरी रंग, डोक्यावर बाण" असे सोपे वर्णन फुरस्याचे केले जाते(~लांबी ३८- ८० सेमी). डोक्यावरचा बाण म्हणजे याचे "ट्रेडमार्क शिक्रेट", ते म्हणजे "जर आपल्याला भिडला तर तिकडेच तोडला" हेच चित्रातून सांगायचा निसर्गाचा प्रयत्न. "मातेरी" रंग हा १० वी च्या "डी ग्रुप" च्या प्रश्नासारखा "अर्थ एक पण उत्तरे अनेक"..मातेरी मध्ये "राखाडी, चॉकलेटी, करडा, लालसर करडा, शेवाळी करडा असे अनेक प्रकार. जशी जमिनीवरची माती तसे फुरस्याची रंगसंगती, "आपली माती- आपले फुरसे" असा कार्यक्रम पण आपण त्यावरून काढू शकतो. हा फोटो मिपाकर 'अभिजा'यांनी साताऱ्याला (चाळकेवाडीला ) काढला आहे. हे फुरसे करड्या मातेरी रंगाचे आहे. सातारी फुरसे या फोटो मध्ये फुरस्याच्या डोक्यावरचा "ट्रेडमार्क बाण" नीट दिसतो आहे. बाण हा फोटो आमोद झांबरे यांचा, त्यांनी पुण्याच्या जवळ काढला आहे, रंग संगती मधला फरक बघा. पुणेरी फुरसे लहान असल्यामुळे लपण्यासाठी जागा अनेक: दरवाज्याची कडी, बिजागर; उंबरठ्याच्या, मोरीच्या,पलंगाच्या फटीत, घरातल्या कुंडीच्या खालच्या प्लेट मध्ये, कुंपणाची दगडांची भिंत, अंगणात पसरलेल्या दगडाच्या खाली इ. तसेच या सापाला "हीच-हायकिंग" करायला खूप आवडते, म्हणजे एका भाजीच्या ट्रक मधून दुसऱ्या ट्रक मध्ये असे करून हे साप पुण्यात पोहचतात. मी जी काही फुरशी पुण्यात पकडली ती मार्केट यार्ड परिसरामध्ये भाजीच्या गोडाऊनमध्ये पकडली आहेत. तशी कोथरूडच्या किंवा कोंढवा टेकडी वर मजबूत फुरशी आहेत, पण मला कॉल ला कधी मिळाली नाहीत. असेच एक फुरसे इंग्लंडमध्ये एका आज्जीच्या घरी भाजीच्या कंटेनर मधून पोहचले, "असेल कुठला तरी साप म्हणून", त्यांनी त्याला स्वयंपाकाच्या चिमट्याने उचलून डब्यात टाकले, नंतर ते फुरसे आणि ती आज्जी इंग्लंड मध्ये शेलीब्रिटी झाल्या होत्या, कोणाचे काय...तर कोणाचे काय ! संकटाची जाणीव झाली की फुरसे अंगावरचे खवले घासून करवत घासल्यासारखा आवाज करते,तो आवाज घोणसाच्या शिट्टी एवढा मोठा नसला तरी कचकचीत तीव्र (high frequency) असतो. घोणासाच्याच कुटुंबातील फुरसे असल्यामुळे आधीच्या भागात लिहिलेले वर्णन याला पण लागू होते- "डोळ्याची पापणी लवते न लवते तो पर्यंत जीवा महाला ५ हातावरचे लिंबू पट्ट्याने उडवून जागेवर यायचा,याच कुळीतला फुरसे पण असतो. १/३ सेकंदात: "तोंड उघडून -विषदंत बाहेर काढून -दंश करून -विष सोडून - दात मिटून -परत जागेवर".. या सगळ्या क्रिया होतात.( मला हे वाक्य लिहायला पण ३० सेकंद लागली.) हा बी.बी.सी. चा व्हिडिओ बघा: फुरस्याचा हल्ला. हाय-स्पीड कॅमेरा मध्ये त्यांनी फुरस्याचा हल्ला चित्रित केला आहे. ) वरती लिहिल्याप्रमाणे या जमातीचे विषपण नागापेक्षा वेगळ्या प्रकारचे म्हणजे हिमो-टोक्सिक असते. साधरण पणे १/१० घोणासाच्या विषाच्या मात्रेएवढे म्हणजे २० mg तो २५ mg एवढे विष फुरसे टोचते. हे विष मुख्य करून रक्ताभिसरण संस्थेवर (तर नागाचे मज्जासंस्थेवर) हल्ला करते, थोडक्यात म्हणजे रक्ताचे पाणी करते. रक्ताची गुठळ्या करायची क्षमता गंडल्यामुळे शरीरातून रक्तस्त्राव होऊ लागतो. पहिल्यांदा हिरड्या मधून रक्त चालू होते,नंतर मिळेल त्या भागातून रक्त पडू लागते...रक्त दाब कमी होऊ लागतो आणि शेवटी किडनी फेल होऊन रुग्ण दगावतो. फक्त हे विषाचे प्रमाण(घोणसाच्या तुलनेत) कमी असल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण महाराष्ट्रामध्ये कमी आहे, कारण आपल्याकडे हाफकिनचे प्रती-विष उपलब्ध आहे. पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सर्पदंशाचे रुग्ण हे फुरसे चावल्यामुळे आढळतात, १९९२ ते २००१ या दहा वर्षाच्या काळात २७४ फुरसे दंश तर ७२ नाग दंशाचे रुग्ण फक्त नांदेड भागात आढळले.(डॉ.डी.पी. पुंडे )म्हणजे साधरण पणे नागाच्या चौपट प्रमाणात फुरसे चावण्याचे प्रमाण महाराष्ट्रात आढळते. निसर्गाला कमी लेखायची ही चूक अशी महागात पडते. हा व्हिटेकर साहेबांचा व्हिडिओ बघा- फुरस्याचे विष ! जास्तीत जास्त फुरसे चावण्याचे प्रमाण हे रात्री आढळते, "व्होल वावर इज अवर" हा मनुष्यप्राण्याचा गैरसमज फुरसे रात्री दूर करते, शेतात डबा टाकायला गेला, धार मारायला गेला आणि फुरसे चावले, हे प्रकरण...आज ३१ नंबर ची पी.एम.टी खूप उशिरा आली एवढे कॉमन आहे. माणूस वाचला तरी, ज्या जागी फुरसे चावते तिकडचे टिशू जळून जातात, कधी-कधी बोटे कापायला लागतात.
एका सर्पतज्ञांच्या भाषेत "एकवेळ नाग परवडला पण फुरसे नको,इतका त्रास होतो की बाळंतपण परवडले !"
एका मंगळवारच्या संध्याकाळी (~२००२-२००५ )अनिकेत (माझा सर्पोद्यानचा मित्र)त्याच्या रूमवर (सर्पोद्यान मधली वरची खोली) गप्पा टाकत पडला होता. इतक्यात कोर्पोरेशनचा ड्रायवर, हातात एक साप घेऊन आला. संध्याकाळी कोर्पोरेशनची "दुटी" संपल्यावर त्याने कात्रजच्या गुत्त्यावर पहिल्या धारेची लावली होती. "अरे हा बघ मांजऱ्या धरून आणला बघ !" खालचा फोटो बघा, मांजरऱ्या म्हणजे कॅट स्नेक, बिनविषारी साप, याच्यात पिल्लात आणि फुरस्यामध्ये लोकं, सर्पमित्र नेहमीच गोंधळ घालतात. मांजऱ्या अनिकेत मुरलेला सर्पतज्ञ असल्यामुळे संधीप्रकाशात पण त्याने ते फुरसे आहे हे ओळखले, त्याने तो साप पहिल्यांदा डब्यात टाकला. ड्रायवरचे चालूच होते-" गुत्त्यावर हा मांजऱ्या दिसला, इतकुसा साप, असाच धरला..." अनिकेतने त्याची बोटं चेक केली तर बोटाला, ब्लेड मारावे तसा दात लावला होता. अनिकेतला गंभीर परिस्थीची जाणीव झाली, पण हा आपला तळीराम "फुल ओन" होता, "आपल्याला काय पण होत नाय,लई मोठें मोठें नाग धरले आहेत आपण"..हे चालूच होते. पुढच्या काही क्षणात , अनिकेत ने त्याला स्प्लेंडर वर झाशीच्या राणीसारखा स्वतःला मागून बांधला आणि गाडी ससूनच्या दिशेला तडक सोडली. आत्ता ज्यांना कात्रज ते पुणे स्टेशन रस्ता माहित असेल त्यांना माहित असेल की संध्याकाळच्या वेळी या रस्त्यावर गाडी चालवणे म्हणजे कुष्णा नदीच्या प्रवाहात उडी टाकून उलट्या दिशेने (भोपळा न लावता) पोहोण्यासारखे आहे. कसेबसे करत हा ससूनला पोहचला तर ही मोठी रांग...आता दारूचा अंमल कमी होऊन विषाचा अंमल चालू झाला होता, त्यामुळे ड्रायवर पण बोंबलत होता. लायनी शिवाय फक्त व्हीयपीला एन्ट्री हा तिरुपती-बालाजीचा नियम इकडेपण लागू होता. मोबाईलच्या आधीचा काळ, त्यामुळे अण्णाना फोन(ल्यांड लाईन) लागे पर्यंत त्या छोट्या-इवलुश्या फुरस्यानी ड्रायवरला सात जन्म दाखवले होते. फोन लागल्यानंतर वरून सूत्र हालली, ड्रायवरला प्रतिविष चालू झाले. ससूनच्या आणि अनिकेतच्या कृपेने, नंतर तो (हाल होत होत)वाचला, त्याचे बोट पण वाचले. पण निसर्गातल्या त्या इतकुश्या फुरस्याने, ड्रायवरला त्याची जागा दाखवून दिली होती. (हा वरचा अनुभव माझा स्वतःचा नाही पण तो १००% खरा आहे, फक्त थोडे छोटे तपशील कानगोष्टीमुळे चुकू शकतात.) आत्तापर्यंत मी ४ मुख्य विषारी सापांची (नाग, मण्यार, घोणस, फुरसे) माहिती दिली, हेच साप साधरण करून मानवीवस्ती मध्ये आढळतात. तसे अजून भारतात अजून खूप विषारी साप (साधा,मलबार-चापडा, किंग कोब्रा, पोवळा साप, समुद्र साप इ.) आहेत, पण त्यांचा माझा कॉल वर कधी संबध आला नाही म्हणून मी त्यांची माहिती देणे टाळले.ज्यांना कोणाला अजून त्यांच्या बद्दल माहिती हवी असेल त्यांनी अण्णांचे "साप" (इंग्लिश-स्नेक्स) हे पुस्तक वाचावे.(त्याच्या प्रती सर्पोद्यान मध्ये मिळतात.) पुढच्या भागात बिनविषारी साप.... (अण्णा म्हणजे सर्पोद्यान चे संस्थापक-श्री.निलीमकुमार खैरे.) (या लेखातले सर्व फोटो अंतरजालावरून आणि चिराग रॉय कडून घेतले आहेत.त्यांना कुठल्या पद्धतीने बदलण्यात आले नाही.)

Book traversal links for एका गारुड्याची गोष्ट ११: फुरसे: कोकणी धसका !

  • ‹ एका गारुड्याची गोष्ट १०: घोणस: गवतात लपलेला स्नायपर !
  • Up
  • एका गारुड्याची गोष्ट १२: धामण: जुन्या ओळखीचा साप ! ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
राहणी
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
अनुभव
माहिती

प्रतिक्रिया द्या
78129 वाचन

💬 प्रतिसाद (110)

प्रतिक्रिया

+१

मुक्त विहारि
Tue, 10/15/2013 - 14:21 नवीन
ही लेखमाला कधी संपूच नये. थोडी भर घालून आणि ज्या दिवशी समारोप होईल त्या नंतर मिपा तर्फे दोघांचाही सत्कार करू या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

माय्ला

मी-सौरभ
Tue, 10/15/2013 - 18:43 नवीन
सरकारनामा मधे दिलिप प्रभावळकरांच्या तोंडी फुर्श्याचा उल्लेख आहे तो पण अंगावर काटा आण्तो आता तर अजुण जास्त. पु. भा. प्र.
  • Log in or register to post comments

जे डी, "अत्यंत खळबळजनक

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 10/15/2013 - 18:50 नवीन
जे डी, "अत्यंत खळबळजनक लेखमाला" अशी बातमी टिव्हीवर आली तरी आश्चर्य वाटणार नाही ! खूप माहितीपूर्ण आणि तेवढेच खुसखुशीत लेख असतात तुमचे. पुभाप्र !
  • Log in or register to post comments

जे डी भौ

संतोषएकांडे
Tue, 10/15/2013 - 19:55 नवीन
फोटो काही दिसले नाहीत ब्वा....
  • Log in or register to post comments

छान लेख..

शरभ
Wed, 10/16/2013 - 13:55 नवीन
छान लेख नेहेमीप्रमाणे हे. वे. सां. न. ल. आमचेही काही अनुभव... Image removed. Image removed. एकदा पेठच्या ट्रेकला हे साहेब काहीबाही खाऊन आरामात पडले होते. आजूबाजूच्या जवळपास ५० लोकांची कसलीही चिंता न करता. आम्हाला बर्‍यापैकी पोझेस देखील दिल्या. अर्थात आम्ही हे सर्व फोटोसेशन लांबूनच केले. खाली उतरताना एका जागी विश्रांती घेत असताना एका दुसर्या ग्रूपने आम्हाला सांगितले की, कोणी एका महाभागाने त्याला हातात घेतले. झाल. सापाने त्याच्या मनगटाचा मुका घेतला. तो मुलगा लगेच खाली उतरून गेला, त्याचे नंतर काय झाले कळले नाही. पण न राहवून घरी जाऊन आधी साप शोधून काढला फोटोवरुन. बांबू पीट वाइपर होता अस वाटल. जे डी नक्की सांगू शकतील. एक माहीती अशी कळली होती की, साप चावल्यावर त्या मुलाच्या मनगटातुन रक्त उडाले. अशा वेळी, विष बाहेर पडून, त्याचा प्रभाव कमी होईल का? खरे काका सांगू शकतील. Image removed. असाच एकदा नाणेघाटात अगदी गुहेच्या बाहेर हे पिल्लू दिसलं. एवढ्या छोट्याश्या त्या पिल्लाच्या नजरेत सुद्धा एक प्रकारची जरब होती ! त्याचा अतिशय आक्रमक पवित्रा बघण्यासारखा होता. जे डी हाही बांबू पीट वायपर आहे काय ?
  • Log in or register to post comments

मस्त अनुभव आणि फोटो सुद्धा !

जॅक डनियल्स
Wed, 10/16/2013 - 21:19 नवीन
मस्त अनुभव आणि फोटो सुद्धा ! खालच्या फोटो मधला साप "मलबार पिट व्हायपर" (मलबार चापडा )आहे. तो साध्या पिट व्हायपरचाच भाऊ असतो पण अंगावर सुंदर नक्षी असते. सगळे पिट व्हायपर हे घोणस-फुरसे च्या कुटुंबातीलच असतात. त्यामुळे त्यांचे विष हिमो-टोक्सिकच असते. "रक्त उडाले" थोडी अतिशोयोक्ती वाटते, जास्त करून व्हायपर ब्लेड मारल्या सारखा दात घासतो. आणि ते दात घासणे पण महागात पडू शकते त्यात पण माणूस ढगात जाऊ शकतो. पण चापड्याच्या चावण्याच्या केसेस कमी ऐकल्या आहेत, कारण तो जंगलात राहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरभ

ओ जे.डी. साहेब.....

मुक्त विहारि
Wed, 10/16/2013 - 21:43 नवीन
आपण कधी येताय भारतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

मी डिसेंबरमध्ये येतो आहे. पण

जॅक डनियल्स
Sat, 10/19/2013 - 22:05 नवीन
मी डिसेंबरमध्ये येतो आहे. पण अजून शिकत असल्यामुळे गुरुजींनी जास्त सुट्टी दिली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

जे डी साहेब

सुबोध खरे
Mon, 10/21/2013 - 11:03 नवीन
जे डी साहेब भारतात आल्यावर आपल्याला भेटायला आवडेल केंव्हा आणि कधी येताय म्हणजे आपल्या सवडीनुसार कट्टा सुद्धा ठरविता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

+ १....

मुक्त विहारि
Tue, 10/22/2013 - 23:06 नवीन
मिपा प्रेमी आणि कट्टा प्रेमी....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

नक्की ! मी ७ डिसेंबर ला

जॅक डनियल्स
Tue, 10/22/2013 - 23:21 नवीन
नक्की ! मी ७ डिसेंबर ला पुण्यात येतो आहे. फक्त डिसेंबर चा शेवटचा आठवडा मित्राच्या लग्नाला जात आहे, बाकी वेळ पुणे(पर्वती)- ठाणे(तलावपाळी) मध्येच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ठाणे(तलावपाळी) मध्ये

सुबोध खरे
Wed, 10/23/2013 - 10:53 नवीन
वा आपण हि आमच्या मैफिलीतील दिसता (ठाणे(तलावपाळी) वर संध्याकाळी पडीक असणाऱ्या लोकांची मैफिल.) मग आपले जमलेच. येण्यापूर्वी जाहीर करा. व्यनि करतोच आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

नक्की, माझे घरच तलावपाळी वर

जॅक डनियल्स
Wed, 10/23/2013 - 23:13 नवीन
नक्की, माझे घरच तलावपाळी वर साई-कृपा च्या बाजूला आहे. त्यामुळे सगळ्या शाळेच्या आणि कॉलेज च्या सुट्ट्या तिकडेच पडीक असायचो. मी साधरण पणे १ एक आठवडा तरी ठाण्यात येईन, तेंव्हा नक्की भेटू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अरे वा..आम्हीही पर्वतीलाच

डॉ.प्रसाद दाढे
Wed, 10/23/2013 - 13:03 नवीन
अरे वा..आम्हीही पर्वतीलाच राहतो, जरूर येऊ कट्ट्याला (फक्त खिशात तेव्हढा सापबिप आणू नका)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

कॉलवर शेवटचा साप पकडून मला

जॅक डनियल्स
Wed, 10/23/2013 - 23:15 नवीन
कॉलवर शेवटचा साप पकडून मला आत्ता ५ वर्ष झाली आणि कॉल सोडून मी जंगलात साप पकडत नाही. त्यांमुळे काळजी नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे

मस्त.. नेहमी प्रमाणेच पुभाप्र

कोमल
गुरुवार, 10/17/2013 - 11:11 नवीन
मस्त.. नेहमी प्रमाणेच पुभाप्र
  • Log in or register to post comments

हे असं का करताय तुम्ही?

सुहासदवन
गुरुवार, 10/17/2013 - 11:57 नवीन
दर वर्षी किती प्रेमाने आणि ओढीने आम्ही आमच्या कोकणात जायचो - अगदी बिनधास्त. आणि हे लेख टाकून तुम्ही आम्हाला जाम टरकवलेत……. आता ह्या सुट्टीत जायचे कुठे……मोठ्ठा आ! जोक्स अपार्ट… लेखमाला खरंच अप्रतिम झाली आहे. इतकी सचित्र आणि योग्य माहिती कोणीही कधीही दिली नव्हती. एक भाबडा प्रश्न - समजा मी रानात उभा आहे आणि अचानक माझ्या लक्षात आले की पायाला काहीतरी घासत आहे. समजा तो एक साप आहे. तर मी स्वस्थ उभं राहावं की ताडदिशी उडी मारून त्यापासून लांब जावं?
  • Log in or register to post comments

जेडी प्रश्नाचं उत्तर द्याच.

शिल्पा ब
गुरुवार, 10/17/2013 - 21:54 नवीन
जेडी प्रश्नाचं उत्तर द्याच. माहिती असलेली बरी. बाकी लेखमाला उत्तम आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहासदवन

समजा मी रानात उभा आहे आणि

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 10/18/2013 - 11:12 नवीन
समजा मी रानात उभा आहे आणि अचानक माझ्या लक्षात आले की पायाला काहीतरी घासत आहे. समजा तो एक साप आहे. तर मी स्वस्थ उभं राहावं की ताडदिशी उडी मारून त्यापासून लांब जावं? अशा परिथितित होणारी क्रिया प्रतिक्षिप्त (reflex action) असते... विचार करून काही करण्याएवढा वेळ नसतो. तुम्ही गोठून जावून स्तब्ध उभे राहणार की घाबरून ताडदिशी उडी मारून लांब जाणार हे तुमच्या मूळ मानसिक ताकदीप्रमाणे "होईल", तुम्ही "करणार नाही".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहासदवन

इस्पीकचा एक्का बरोबर आहेत,

जॅक डनियल्स
Fri, 10/18/2013 - 21:02 नवीन
इस्पीकचा एक्का बरोबर आहेत, रिफ्लेक्स वरती सगळे अवलंबून आहे. साप हा जिवंत प्राणी असल्यामुळे तो शेवटच्या क्षणी कसे वागेल हे सांगता येत नाही. तसेच घोणस सारखा साप असेल तर उडी मारून पण उपयोग नाही. त्यामुळे "परिस्थितीत जे योग्य वाटेल ते करा" हेच माझे उत्तर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

एक प्रश्न

सुमीत भातखंडे
Fri, 10/18/2013 - 10:52 नवीन
सापांच्या (खासकरून भारतातले बिग फोर) दातांची भेदन क्षमता किती असते? म्हणजे पायात फॉर्मल पँट घातली असेल किंवा जीन्स घातली असेल तर ते कापड भेदून साप चावू शकतो का? पायात जाड पायमोजे आणि शूज घातले असतील तर एवढा सरंजाम पावलांचं सर्पदंशापासून रक्षण करायला पुरेसा आहे का?
  • Log in or register to post comments

माझा भाग ८ मधला प्रतिसाद वाचा

जॅक डनियल्स
Fri, 10/18/2013 - 21:05 नवीन
माझा भाग ८ मधला प्रतिसाद वाचा त्यात मी याचे उत्तर दिले आहे. साप आणि बूट !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमीत भातखंडे

ओजस..

निशदे
Fri, 10/18/2013 - 22:27 नवीन
ओजस.. आज बर्‍याच दिवसांनी वाचायला जरा वेळ मिळाला आणि हा लेख वाचून काढला.... मस्तच लिहित आहेस. आता लेखमाला सुद्धा वाचून काढतो वेळ मिळाला की. :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद् ! तुमची कृपा राहूदे

जॅक डनियल्स
Fri, 10/18/2013 - 22:43 नवीन
धन्यवाद् ! तुमची कृपा राहूदे अशीच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निशदे

सहिच्च !

पियुशा
Sun, 10/20/2013 - 15:21 नवीन
सहिच्च ! जॅक डनियल्स तुमची लेखनशैली जबरदस्त आहे , "साप" म्हटला तरी माझ्या अंगावर काटा येतो तुमचे लिखाण खुप विनोदी अन माहीतीपुर्ण आहे ,त्यावरुन एक किस्सा आठवला मागच्या दिवाळीतला मी अन माझा भाउ बाइकवरुन जात होतो तर एका ठीकाणी बरीच गर्दी जमा झालेली होती कुतुहलापोटी गाडी थांबवली समोर एक टपरिवजा दुकान होते लाकडी फळ्यांचे , काय आहे बघु तरा जरी म्हणुन भाउ गर्दित शिरला मी थोडी बाजुलाच उभी होते नंतर गर्दीतुन आवाज आला पळा पळा चावेल चावेल तशी मी जरा गर्दीत घुसुन पाहिले तर आम्चे बंधु दोन फळ्यामध्ये अडकलेल्या किमान ४-५ फुट लांबी अन चांगला जाडजुड नागाला त्या फटीतुन बाहेर काढ्ण्याचा प्रयत्न करत होते ते बघुन मला घेरी यायचीच बाकि राहीली होती बाकिच्या लोकंचा आरडाओरडा चालुच होता " अस करा न तस करा / डोक ठेचा नाहीतर चावेल असे एक एक सल्ले लोकांचे , मी जीव खाउन माझ्या भावाला ओराडत होते कि तु सोड त्याला चावेल तो ,त्याला आइ बाबांना नाव सांगेन अशा धम्क्याही चालु होत्या शेवटी मह्त्प्रयासाने त्याने तो नाग शेपटीला पकडुन बाहेर काढला त्याचे ते अव्याढ्व्य रुप अन त्याचे फुत्कार पाहुन बर्याच जणांची माझ्यासर्खी बोलती बंद झाली होत्ती , तो पर्यन्त एकाने एक गोणी आणुन दीली त्यात त्याने तो व्यवस्थित घालुन गोणीचे तोंड बांधुन एका कॉलवर आलेल्या सर्प्मित्राच्या स्वाधीन केला ,इतर लोकांनी माझ्या भावचे अभिनंदन केले त्या सर्प्मित्राने सुद्धा, पण माझी जी भीतीने गाळन उडाली होती ती मलाच माहीती त्या रात्री मला झोप आली नाही आपल्या बिछण्यात नाग तर नसेल ना म्हणुन मी १० वेळा अंथरुन झटकुन घेतले असेल ;)
  • Log in or register to post comments

मस्तच लेख.

एस
Tue, 10/22/2013 - 00:02 नवीन
बाकीच्या विषारी सापांना वाकुली दाखवून ही लेखमाला आता बिनविषारी भाऊबंदांकडे वळते आहे ह्यामुळे किंचित भ्रमनिरास झालाय पण जेडी म्हणतायत तसं अनुभव नसताना माहिती देणं हेही चुकीचेच. याचे कारण असे, की केवळ माहिती तशी गुगल करूनही मिळते. पण तुमच्या लेखांसारखे लेख विरळाच. नव्हे, इतर कुठेही पाहिले नाहीत. (थोडे आशाळभूतपणे - लिहा हो. तुमचे नसतील तर इतरांचे अनुभव सांगा. पण तुम्ही आवर्जून लिहा. :| ) 'साप' हे खरंच छोटेखानी पण आवर्जून संग्रही असावे असे पुस्तक आहे. डोंगरयात्रेला जाताना जसे मॅक्रो छायाचित्रणासाठी 'फ्लॉवर्स ऑफ् सह्याद्री' घेऊन जावे तसेच खैरेसाहेबांचे 'साप' सुद्धा न्यावेच न्यावे. अभिजांची प्रतिमा खल्लास करणारी - कलेजा हो... त्याबद्दल छाचिंना अगोदरच (प्रेमाने) खडसावण्यात आले आहेच... ;) आता फुरशांचा किस्सा. एका प्रसिद्ध तीर्थक्षेत्राच्या गावी अण्णांनी शाळकरी मुलांसाठी (तसे सर्वांसाठीच) सापांची माहिती देण्यासाठी प्रदर्शन भरवले होते. तो काळ तुमच्या त्या दूध का कर्ज, नागिन सारख्या शिनेमांच्या दुधावर पोसलेल्या पब्लिकचा. प्रथमच असे प्रदर्शन लोक पहात होते, त्यामुळे झुंबडच झुंबड. मैदानात टेबल, टेबलावर सापांच्या काचपेट्या, अण्णा एकेका सापाची माहिती देताहेत. सोबतच कळकळीने विविध अंधश्रद्धांचीही चिरफाड करताहेत. असे दृश्य. अण्णांनी फुरशाची काचपेटी समोर ठेवली आणि माहिती द्यायला सुरुवात केली. लोकांचा बेशिस्तपणा, गलका, याने नीट काही ऐकू येतच नव्हते. अण्णा सांगू लागले, "हा फुरसे. महाराष्ट्रातल्या प्रमुख चार विषारी सापांपैकी एक आहे. लहान आहे, पण धोक्याच्या इशारा देण्यासाठी हा साप जो आवाज काढतो तो चांगलाच घाबरगुंडी उडवणारा असतो." समोरच्यांच्यापैकी कुणीतरी शंका काढली - "मग आत्ता का आवाज काढत नाही? आम्हांला दाखवा ना कसा आवाज असतो ते." "आत्ता शांत पडून आहे, पण चांगलाच मोठा आवाज असतो." - अण्णांचे शांत उत्तर. तेवढ्यात मागून कुणीतरी एक आवाज टाकला, "एक फटका द्या त्याला म्हणजे काढेल आवाज." खीः खीः खीः खीः. पब्लिकच ते. लागलं खिदळायला. अण्णांनी जमेल तेवढं डोकं शांत ठेवत मोठ्याने विचारले, "कोण बोललं रे? जरा पुढे येता का. बक्षीस देतो." आमचा हा शूरवीर टग्या निर्लज्जपणे बसलेल्या गर्दीतून वाट काढत खिदळत आणि आजूबाजूच्यांना आपण कसे लय भारी असे जणू दाखवत पुढे आला. अण्णा - "हं, काय म्हणता?" शूरवीर - "त्याला एक फटका द्या." एकवेळ फुरश्याने उसळून घेतलेला चावा त्याला कळला असता, पण अण्णांचा हात कधी त्याच्या गालावर सण्णकन् पडला हे त्यालाही कळलं नाही. त्याच गर्दीतून आता शरमेने मान खाली घालून आणि गाल चोळत तो परत गेला. नंतरचा सर्व कार्यक्रम अगदी पिनड्रॉप सायलेन्समध्ये पार पडला. पण हे सर्व पाहिलेल्या मला पर्यावरणाबद्दलच्या लोकांच्या अनास्थेवर खूप अंतर्मुख करून गेला. :(
  • Log in or register to post comments

अत्यंत माहितीपूर्ण आणि रोचक

चतुरंग
Tue, 10/22/2013 - 10:54 नवीन
लेखमाला. लिहिण्याची पद्धतसुद्धा अगदी गोष्ट सांगितल्यासारखी. मला स्वतःला सापाची भीती वाटली नाही तरी आवर्जून जाऊन पकडणार नाही. लहानपणी गारुड्याने एकदा त्याच्याजवळचा नाग हातात दिलेला त्यावेळचा थंड, बुळबुळीत स्पर्श मेंदूत कुठेतरी कोरला गेलाय त्यामुळे असेल कदाचित पण या प्राण्याबद्दल तितकी जवळीक नाही होऊ शकली (अर्थातच कुठेतरी वाईट वाटतं). पण सळसळत जाणारे हे जनावर दिसते मात्र अशक्य सुंदर यात वाद नाही. -रंगा
  • Log in or register to post comments

लेखमाला छान आहेच

दिपक.कुवेत
Tue, 10/22/2013 - 12:04 नवीन
माझाहि एक प्रश्न: वर पियुशा जो अनुभव आहे त्या प्रमाणे साप/नाग माग काढत येतात का?
  • Log in or register to post comments

भाग ७ मध्ये मी नागाबद्दल

जॅक डनियल्स
Tue, 10/22/2013 - 21:14 नवीन
भाग ७ मध्ये मी नागाबद्दल लिहिले आहे ते वाचा. ती एक अंधश्रद्धा आहे.
डूख धरणे ही भावना आहे, नागाचा मेंदू डूख धरण्यासाठी विकसित झाला नसून खाणे कसे शोधायचे यासाठी विकसत झाला आहे. आपल्या घरी बायको- आई ने स्वयंपाक नाही बनवला तर नाक्यावर जाऊन आपण भाजी-पाव खाऊ शकतो पण नागाला मात्र उंदीर (२ आठवड्यातून एकदा का होईना ) स्वतः शोधायचा असतो. जो काही नंतर वेळ उरतो त्यामध्ये स्वतः चे इतर भक्षकापासून (गरुड, घार, माणूस इ.) रक्षण करायचे असते. त्यांची वधूवर सूचक मंडळे नसल्याने दरवर्षी नवीन नागीण (:)) स्वतः शोधून आपली प्रजा वाढवायची असते. त्यामुळे त्याला डूख धरणे वगैरे अश्या फालतू कामांसाठी वेळच नसतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

पीएचडीतला अर्धा वेळ क्रॉस

आदूबाळ
Sat, 10/26/2013 - 23:41 नवीन
पीएचडीतला अर्धा वेळ क्रॉस रेफरन्सेस देण्यात जातो असं ऐकून आहे ते काही खोटं नाही तर :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

सही जवाब ! पीएचडीच्या

जॅक डनियल्स
Sat, 10/26/2013 - 23:45 नवीन
सही जवाब ! पीएचडीच्या शेवटच्या डिफेन्स मध्ये मिपा चा उल्लेख मी जरूर करणार आहे. इकडच्या दक्षिण-गोऱ्याना पण कळू दे मिसळपाव काय आहे ते...;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

अवांतर

बॅटमॅन
Sat, 10/26/2013 - 23:48 नवीन
तुम्ही पीयेच्चडी करताहात? _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

डिग्रीला आले की डिग्री मिळते,

जॅक डनियल्स
Sat, 10/26/2013 - 23:52 नवीन
डिग्रीला आले की डिग्री मिळते, या नियमाने ती होते आहे.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

स्टिल येक कडक सॅल्यूट. पीएचडी

बॅटमॅन
Sat, 10/26/2013 - 23:55 नवीन
स्टिल येक कडक सॅल्यूट. पीएचडी म्हञ्जे दुसरे लग्नच असते. ते निभावायला जबरी स्टॅमिना लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

पी एच डी

सुबोध खरे
Sun, 10/27/2013 - 00:00 नवीन
अरे वा, मी पण एम डी (पी एच डी )आहे. एम डी (पास्ड विथ हेवी डिफिकल्टी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

पास्ड विथ हेवी डिफिकल्टी..

जॅक डनियल्स
Sun, 10/27/2013 - 00:04 नवीन
पास्ड विथ हेवी डिफिकल्टी...तेच आहे सगळे ! शिक्षण फुकट मिळत असेल तर घ्यावे, त्यामुळेच मी पीएचडी करतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

शुभेच्छा जेडीशेठ

एस
Tue, 10/29/2013 - 00:16 नवीन
इकडे शक्यतो परत या नंतर. राहेजमाने पे कदम रख तो कोई भी मंजिल पा लेता है। राही तो वो है जो मंजिल भी खुद चुनता है और राह भी खुद बनाता है।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

जे डी साहेब.

शरभ
Sun, 10/27/2013 - 15:25 नवीन
तरीही जे डी साहेब, वास घेण्याच्या तीव्र शक्तीमुळे सापाना हे माग ठेवणे शक्य होत असेल ? खर खोट माहीत नाही पण बर्‍याच कथा ऐकल्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

डूख

एस
Tue, 10/29/2013 - 00:19 नवीन
डूख धरणारा एकमेव प्राणी माणूस. आणि माणसांचे घ्राणेंद्रिय सुबोध खरेसाहेबांनी आधीच सांगितल्याप्रमाणे खूपसे बधीर झाले आहेच उत्क्रांतीच्या ओघात. तरीही सापांवरचा संशय अजूनही गेला नसल्यास त्याला इलाज नाही..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरभ

हा पण भाग आवडला

किलमाऊस्की
Tue, 10/22/2013 - 23:34 नवीन
पुभाप्र.
  • Log in or register to post comments

बिनविषारी साप...

बाप्पू
Fri, 10/25/2013 - 21:56 नवीन
जॅक-डी साहेब आता बिनविषारी साप आणि त्यान्चे आनुभव येउदेत....!! वाट पहतोय....!!
  • Log in or register to post comments

भन्नाट

मन१
Sun, 10/27/2013 - 00:27 नवीन
लेखमालिका उत्तम सुरु आहे. फक्त दरवेळी येउन प्रतिसद द्यायला जमतेच असे नाही.
  • Log in or register to post comments

+१

शिद
Wed, 10/30/2013 - 16:27 नवीन
असेच म्हणतो...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

उपचार

vijayraj
Mon, 11/04/2013 - 15:40 नवीन
उत्कृष्ट लेखमालिका लिहल्याबद्दल खूप खूप धन्यवाद…. कृपया इथे मी दिलेल्या तू नळी अरील उपचाराबद्दल आपले मत व्यक्त करावे … http://www.youtube.com/watch?v=3rFlNu-ze3s
  • Log in or register to post comments

धन्यवाद् !

जॅक डनियल्स
Mon, 11/04/2013 - 21:30 नवीन
धन्यवाद् ! मी डॉक्टर नाही, पण जे काही अनुभवले आहे आणि पहिले आहे त्या वरून सांगू शकतो की अश्या व्हिडीओ मुळेच खूप नुकसान होते आणि अंधश्रद्धा पसरल्या जातात. पहिली गोष्ट म्हणजे सापाचे विष शरीरात क्षणार्धात पसरते, ३ तास वगैरे लागत नाही, जर कधी नसे वर चावला असेल तर ३ तासात तो माणूस तिरडी वर पण असतो. जे काही दाखवले आहे, ते त्यामुळे काही कामाचे नाही, एकतर सुरवातीलाच सापांची चुकीची माहिती दिली आहे. मण्यार-नाग आणि घोणस -फुरस असे दोन वेगळे ग्रुप आहेत, मागच्या लेखात लिहिले आहे ही त्यांचे कुटुंब वेगळे असल्याने विष पण वेगळे असते. शेवटी जे औषध सागितले आहे, ते तर काय असेल मला माहित नाही, पण सापाचे विष हे व्हेनोम असते, त्यामुळे रक्तात औषध द्यावे लागते , तोंडाने १० लिटर औषध ओतून पण काही उपयोग नाही. साप चावला तर (जीव वाचवायचा असेल तर)सरकारी दवाखान्यात जावे. लिंक बघून खूप करमणूक झाली !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vijayraj

संपूर्ण भंपक

सुबोध खरे
Tue, 11/05/2013 - 10:50 नवीन
संपूर्ण भंपक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vijayraj

...

vijayraj
Tue, 11/05/2013 - 17:23 नवीन
जेडी साहेब व खरे साहेब,शंकेचे समाधान केल्याबद्दल धन्यावाद …. आपण दोघांनीही प्रतिक्रिया दिल्याने हि उपचार पध्दत व्यर्थ आहे हेच सिद्ध झाले आहे…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सगळेच थरारक

होबासराव
Tue, 11/05/2013 - 14:00 नवीन
जेडी पुर्ण ले़खमाला वाचुन थक्क व्हायला होत..खुपच अभ्यासपुर्ण माहिति तुम्हि आणि डॉ.खरे साहेबानि दिलि. काल निखिल वागले ह्याचा ग्रेट भेट बघत होतो..डॉ. प्रकाश आमटे मुलाखत होति त्यानि सरळ मण्यार उचलुन आपल्या ५ वर्षाच्या नातवाच्या हातात दिलि....पण ते बघताना मला मात्र तुमचे लेख आठवले आणि त्या लहान मुलाविषयी काळजी वाटायला लागली.
  • Log in or register to post comments

शंभरावा प्रतिसाद

सुबोध खरे
Wed, 11/06/2013 - 14:16 नवीन
वाट पाहत होतो. शंभरावा प्रतिसाद माझा. असो मण्यार तुम्ही हाताळता तेंव्हा ती कोणत्याही तर्हेने उद्दीपित झालेली नसली तरच ती हाताळतात आणी दिवसा मण्यार तशी मंदबुद्धीच असते. तशा स्थितीत ती मुळीच चावत नाही. डॉक्टर आमटे ना हे माहित आहे त्यामुळे ते अशाच वेळी तिला मुलांच्या हातात देतात. शिवाय तिचे पोट भरलेले असले तर ती उगाच कष्ट करीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

सापाची भिती

खटासि खट
Wed, 11/06/2013 - 13:29 नवीन
थोडा अवांतर आहे प्रतिसाद. मला सापाची भिती बसलेली आहे. भूत, मगर, वाघ, सिंह यांचं काहीच वाटत नाही हे विशेष. सापाचा फोटो, व्हिडीओ पहायचंही टाळतो नाहीतर स्वप्नात साप येतात. सापाची स्कीन देखणी असल्याचं म्हटलं जातं पण याबाबतीत माझ्याकडून सपशेल पास असतो. त्यातून फुरसं कडकडून चावतं हे माहीत असल्याने हा साप आवडत नाही. भितीयुक्त उत्सुकतेतून धागा उघडला गेला..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा