✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ठाणे खादाडी - क्षणचित्रे..

ग
गवि यांनी
Mon, 04/11/2011 - 14:19  ·  लेख
लेख
आमच्या कट्ट्याचा जीव छोटा आहे हे माहीत असल्याने पुरेपूर कोल्हापूरमधे असलेलं चोवीस जणांची व्यवस्था असलेलं छोटंसंच ए.सी. कंपार्टमेंट आम्ही अडवून ठेवलं होतं. मी आणि स्पावड्या साडेसातालाच तिथे पोचलो. स्पावड्यासोबत सुधांशू आणि वपाडाव आलेले होते. नंतर बराच काळ डोक्यांचा काउंट चारवरच स्थिर होता. सगळेजण जमेपर्यंत म्हणजे साडेआठपर्यंत आम्ही चौघे तिथेच खड्या पारश्यासारखे पण गप्प न राहता गप्पा हाणत उभे राहिलो. आम्ही सर्वच जण (स्पावड्या धरुन) एकमेकांना पहिल्यांदाच बघत होतो. मग "ओळखा पाहू" चा मस्त राउंड झाला. आपापल्या टोपणनावांविषयी प्रत्येकाने (खरे काय त्याचा थांग लागू न देता) डीटेलवार सांगितलं. तेवढ्यात मदनबाण तिथे येऊन रुतला. पुन्हा "ओळखा पाहू"चा मजेदार सोहळा आणि "मदनबाण" या नावाची चिरफाड झाली. विश्वनाथ मेहेंदळे असे नाव सांगत एक तरुण हजर होताच आम्ही सर्व अचंबित झालो. मेहेंदळे यायचे बाकी आहेत हे माहीत असल्याने मलमलीचा सदरा लेंगा घातलेले, हातात भाजीची पिशवी असे एखादे नुकतेच रिटायर्ड गृहस्थ पाहण्याच्या तयारीत आम्ही उभे होतो आणि हे काहीतरी वेगळेच. मग लीमाउजेट आली. तिचे नाव "लीमाउजेट" का आहे? याचा पत्ता मात्र अज्जिबात लागला नाही बॉ. त्याच सुमारास मिसळलेला काव्यप्रेमी हजर झाला. मग मात्र आम्ही आपली रिझर्व केलेली जागा हातची जाऊ नये म्हणून हॉटेलात घुसलो. स्थानापन्न होऊन ऊर्दू वाचनपद्धतीने मेन्यूकार्डावर नजर टाकताक्षणीच उजव्या बाजूचे आकडे वाढलेले आहेत हे लक्षात आलं. धाग्यात आम्ही टाकलेलं मेन्यूकार्ड नोव्हेंबर वीसशेदहातलं होतं. त्यानंतर ही वाढ झालेली दिसून गोंधळाने सुरुवात होण्याची प्राचीन परंपरा आपण पार पाडणार हा समाधानकारक विचार माझ्या आणि स्पावड्याच्या मनात आला. पण उपस्थित मिपामित्रगणांनी त्यावरून मनात आलेले स्वल्पगालिप्रदान मनातच ठेवले आणि चेहर्‍यावर येऊ दिले नाही. उदाहरणार्थ हे पहा: सुधांशू, वपाडाव, लीमाउजेट आणि विश्वनाथ मेहेंदळे यांनी मेन्यू पाहूनही चेहर्‍यावर ठेवलेलं हसू.. तदनंतर हात्तेच्या म्हणायची वेळ मजवर आली. कारण स्पावड्या धरुन पाच सहा जण आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत असे म्हणू लागले. रे देवा..आधी माहीत असते तर "पुरेपूर कोल्हापूर" ऐवजी कर्व्यांच्या "स्वाद थाळी"तच गेलो असतो की.. असो.. पण व्हेज थाळीचा मेनू पाहून मजसारखे "पोहणारे, धावणारे आणि सरपटणारे जीव पोटात घालण्यास उत्सुक (आभार: शिरीष कणेकर)" सामिषाहारी मेंबर्सही व्हेज खाण्याचा विचार करु लागले. आम्ही तासभर उभ्याने वाट पाहून अखेरीस लाभलेले विजुभाऊ मात्र "रामदासकाका आल्याशिवाय आणि त्यांच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय मी अन्नाला स्पर्श करणार नाही", असं म्हणू लागले. (त्यामुळे बहुधा समोर बसलेल्या मदनबाण आणि मिसळलेल्या काव्यप्रेमींनाही काही मागवता येईना.) शेवटी मदनबाणांनी नुसतीच सोलकढी मागवली. आणि मिसळलेल्या काव्यप्रेमींची शाकाहारी थाळी समोर येऊन हजर झाली तरी एकट्यानेच कुठे खायचे म्हणून उगीच पापड कुरडया खाऊन त्यांनी भागवाभागवी करायला सुरुवात केली. पण तेवढ्यात अखेर रामदासकाका आले.. त्यांच्या सोबत गुलाबी पानांची डायरी होती. (मी फक्त निरिक्षण नोंदवले..). त्यांनी आल्या आल्याच आपण जेवणार नाही असे जाहीर केले. मी आणि मेहेंदळे हे दोघेच मांसाहारी उरलो होतो. त्यामुळे विजुभाऊंना मांसाहाराच्या गळास लावून आपली संख्या वाढवण्यासाठी तातडीने धनगरी मटणताट मागवून आम्ही दोघे त्यांच्यासमोर चापू लागलो. अखेरीस विजुभाऊ आमच्या क्लबात आले. मधेच जयपालही येऊन थोडावेळ गप्पा मारुन गेले. तेवढ्यातच खादाड अमिता स्वहस्ते घरी बनवलेले चॉकलेट मार्बल केक्स घेऊन घटनास्थळी पोहोचली. (एव्हाना ठ्ठोठ्ठो हसण्याच्या आवाजाने आणि एकूण गप्पागोंधळ घालून मिपाकरांनी त्या लहानशा खोलीचे "घटनास्थळ" बनवले होते..) हे केक जेमतेम फोटो काढेपर्यंत टिकून राहिले. नंतर दहावीस सेकंदात रिकामा डबा उरला. केकची चटणी नावाची उत्स्फूर्त पाकृ समस्त उपस्थितांनी बनवली. मग मात्र गप्पा आणि बडबडीने थकलेले सर्वजण गपागप खाण्यात गुंगले. तेवढावेळ एकदम शांतता झाली. रामदासकाका उपास सोडायला तयार नाहीत हे लक्षात आल्यावर बाजूला बसलेल्या स्पावड्याने त्यांचा नाद सोडून आपली थाळी रिकामी केली आणि हात वाळवत बसला..मागे खादाडताईही उगीच मला जेवायचं नाही म्हणत पोळीभाजी घ्यावी तशी काहीतरी थोडंसं घेऊन बसली. अशा अल्पाहारी मेंबरांना आधी चोवीस तास उपास ठेवण्याची वेगळी सूचना यापुढे सर्व कट्टा करणार्‍यांनी द्यावी अशी विनंती. शेवटी साग्रसंगीत जेवण झाल्यावर आणि बाहेर वेटिंगलिस्ट वाढतेय असं दिसल्यावर अत्यंत नाईलाजाने कट्टेकरी हात धुवून रस्त्यावर आले. मदनबाण "निघतो" म्हणून गायब झाले. अमिताताईलाही निघावे लागले. सर्वसाक्षी, विजुभाऊ आणि रामदासकाकांनी गप्पांना पुन्हा तोंड फोडले. फोटो काढण्यासाठी अनेकदा सर्वांचे कोंडाळे फोडून चेहरे कॅमेर्‍याकडे वळवावे लागत होते, इतका गप्पांना जोर चढला होता. तुमच्या जीवनातले तुमचे प्रियकर / प्रेयसी यांच्या बाबतीत दोन गोष्टी होतात : "एकतर तुमचं त्यांच्याशी लग्न होतं, किंवा ते तुमचे आयडी, पासवर्ड होतात..", इति विजुभाऊ.. वगैरे अशी उपयुक्त वचने ऐकताना धमाल येत होती. कट्टा सार्थकी लागत होता आणि पाय मात्र दुखायला लागले होते. तरीही दर दहा मिनिटांनी कोणीतरी म्हणायचं, "चला.निघूया आता..मजा आली..वगैरे.." आणि तरीही कोणीच तिथून न हलता परत गप्पा पुढे सुरु व्हायच्या. असाच तास सव्वा तास गेला. मग नाईलाजाने एकेक गडी गळायला लागला. स्पावड्या, वपाडाव, सुधांशू वगैरे सांसारिक वेसणीत न अडकलेली मंडळी मध्यरात्र उलटून गेली तरी कट्ट्यात आणि गप्पांत रंगली होती. (त्यांनी नंतर एकट्याने आइस्क्रीम खाल्ले असे ऐकतो.. नोंद घेतली आहे. योग्य वेळी कारवाई करण्यात येईल.) एकूण कट्टा आनंदात पार पडला. खूप मोठा कट्टा नव्हता, अगदी छोटासाच. पण जवळजवळ सर्वच जण एकमेकांना पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटत होते. रोजच्या नोकरी आणि घर अशा साच्यात अडकून गेलेल्या लाईफमधे नवीन मित्र मिळणं ही किती गरजेची गोष्ट होती हे या कट्ट्यामुळे जाणवलं. कॉलेज संपल्यापासून अशा मनसोक्त गप्पा कोणाशीच कधी झाल्या नव्हत्या. तात्यांची अगदी निघण्याच्या वेळेपर्यंत वाट पाहूनही ते आलेच नाहीत याचं मात्र खूप वाईट वाटलं.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
प्रतिसाद
प्रतिक्रिया
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
37664 वाचन

💬 प्रतिसाद (119)

प्रतिक्रिया

हार्दीक अभिनंदन.

प्रभाकर पेठकर
Mon, 10/28/2013 - 17:18 नवीन
भारतापासून दूर असल्याने आणि मनाला लागेल तेंव्हा येऊ शकत नसल्याने भारतातला, मिपाचा, कुठलाही कट्टा मनाला उदास करतो. ठाणे कट्टा सदस्य संख्येने लहान असला तरी आनंदी क्षणांनी उजळून निघाला आहे. विजूभाऊ डिसेंबर/जानेवारीत येणार म्हणताहेत. पाहूया शब्द पाळतात का... गविंचे खास अभिनंदन. प्रसिद्ध व्हायोलीन वादक श्री. प्रभाकर जोग ह्यांचा 'गाणारे व्हायोलीन' नांवाचा एक सुंदर कार्यक्रम व्हायचा. तद्वत, गविंनी, 'खाणारे' सदस्य गोळाकरून एक कट्टा कार्यक्रम करावा असे सुचवितो. (खाणारे-पिणारे असतिल तर क्या बात है।)
  • Log in or register to post comments

विजूभाऊ डिसेंबर/जानेवारीत

विजुभाऊ
Mon, 10/28/2013 - 17:35 नवीन
विजूभाऊ डिसेंबर/जानेवारीत येणार म्हणताहेत. पाहूया शब्द पाळतात का...
जरूर.... जरूर...... कट्ट्यासाठी का होईना मी नक्की येईन. काय पेठकर काका प्रॉमिस म्हणजे प्रॉमिस. वायदा करून पळून जायला मी म्हणजे काय "ज्यांच्या नावाची सुरुवात छो या अक्षराने होते आणि शेवट न या अक्षराने होते, व मधली दोन अक्षरे ट आणि ड च्या बाराखाडीत येतात " असा सदस्य वाटलो की काय तुम्हाला.
  • Log in or register to post comments

ड डा डि डी डु डू डे डै डो डौ

प्यारे१
Mon, 10/28/2013 - 18:12 नवीन
ड डा डि डी डु डू डे डै डो डौ डं डः काय पण विजुभाऊ... डॉ कुठं येतं बाराखडीमध्ये? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

अर्र प्यारे१

विजुभाऊ
Mon, 10/28/2013 - 18:20 नवीन
अर्र प्यारे१ माताय बाराखडीत अ‍ॅ आणि ऑ येत नाही हे वायदेआझमानी अगोदरच पाहून ठेवले होते. बघा किती दूरदृष्टी चे नेतृत्व आहे आपले.......
  • Log in or register to post comments

गवि मनावर घ्या आता.

विजुभाऊ
Fri, 08/11/2023 - 14:56 नवीन
गवि मनावर घ्या आता. असाच एखादा कट्टा होऊन जाउ दे. ठाणे तर ठाणे. पार्ल्यामधे आता पुरेपूर कोल्हापूर च्या जागी " कायस्थ सुरू झाले आहे. तेथे कायस्थी स्टाईलचे खिमा नाहीतर सोड्याची खिचडी हाणूया.
  • Log in or register to post comments

फोटोतले मिपाकर कोणते?

कंजूस
Fri, 08/11/2023 - 18:26 नवीन
फोटोतले मिपाकर कोणते? फोटोंना क्रमांक दिले असते तर विचारायला सोपं झालं असतं. बाकी असे कट्टे आता होत नाहीत कारण वाटसपमुळे मिपाकर पझेसिव्ह झाले आहेत. ठराविक गाळीव लोकांना बोलावतात आणि कट्टा उरकतात. असो.
  • Log in or register to post comments

सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 08/12/2023 - 10:21 नवीन
वाटसपमुळे मिपाकर पझेसिव्ह झाले आहेत. ठराविक गाळीव लोकांना बोलावतात आणि कट्टा उरकतात.
सहमत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

गवि

हणमंतअण्णा शंक…
Fri, 08/11/2023 - 20:09 नवीन
गविंचा फोटो पाहून असे वाटले : गवि निगोशिएशन करू शकतात कसलेही. गविंसारखी माणसे गव्हर्नमेंट मध्ये असायला हवीत. थेट यु. एन. मटेरियल वाटतात गवि. (ह. घ्या.) गवि दोन कोटींचा फ्लॅट सव्वा कोटीत फायनल करू शकतात.
  • Log in or register to post comments

:)

चौथा कोनाडा
Fri, 08/11/2023 - 20:17 नवीन
:) हणमंतअण्णा, तुमाला आता त्यांच्या तर्फे षेपरेट पार्टी ! ... हाय का नाय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर

युएन?

सुरिया
Fri, 08/11/2023 - 20:56 नवीन
गवि दोन कोटींचा फ्लॅट सव्वा कोटीत फायनल करू शकतात.
करतील पण. फक्त कोकण, खादाडी आणि इमायन हे तीन विषय टाळायचे निगोसेशनला. नायतर फ्लॅटच्या चाव्या न घेता पैसे देऊन येतील गप्पांच्या नादात. . (गविकाकावळकापाहुम्याकोन)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर

गविकाकावळकापाहुम्याकोन

महिरावण
Fri, 08/11/2023 - 23:06 नवीन
गविकाकावळकापाहुम्याकोन © अभ्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरिया

घावली

सुरिया
Sat, 08/12/2023 - 16:53 नवीन
गेसचा प्रेत्न चांगलाय पण लंका उघडी पडली बर्का. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महिरावण

कट्ट्याचे वर्णन आवडले.बाकी

विवेकपटाईत
Sat, 08/12/2023 - 09:45 नवीन
कट्ट्याचे वर्णन आवडले.बाकी आम्ही दिल्लीकयांना घरी जरी पार्टी केली तरी पनीर आणि मा की दाल, नान, रायता हे पाहिजे. शेवटी आईस्क्रीम ही.
  • Log in or register to post comments

बारा वर्षांपूर्वीचे विजुभौंनी

गवि
Sat, 08/12/2023 - 09:53 नवीन
बारा वर्षांपूर्वीचे विजुभौंनी वर आणलेले दिसते. विजुभाऊ नॉस्टॅल्जिक झालेले दिसतात. आता यातले सर्व लोक बऱ्यापैकी वयस्क झाले असतील. ;-) मिपाची पुढची पिढी आली आहे. कट्टे होत राहोत.. मिपा वाढत राहो.
  • Log in or register to post comments

अहो खरेच.... मिपा कट्टा लैच

विजुभाऊ
Sat, 08/12/2023 - 16:49 नवीन
अहो खरेच.... मिपा कट्टा लैच मिस करतोय. गेली चार एक वर्षे एकाही मिपाकराला भेटलेलो नाहिय्ये. परवा धम्याला फोन केला होता त्यामुळे जरा जास्तच नॉस्टॅल्जिक व्हायला झाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अहो खरेच.... मिपा कट्टा लैच

विजुभाऊ
Sat, 08/12/2023 - 16:58 नवीन
अहो खरेच.... मिपा कट्टा लैच मिस करतोय. गेली चार एक वर्षे एकाही मिपाकराला भेटलेलो नाहिय्ये. परवा धम्याला फोन केला होता त्यामुळे जरा जास्तच नॉस्टॅल्जिक व्हायला झाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

फोटोतला कोण सांगा सांगा.

कंजूस
Sat, 08/12/2023 - 11:31 नवीन
फोटोतला कोण सांगा सांगा.
  • Log in or register to post comments

एका प्रतिसादात ऑलरेडी आहे की

गवि
Sat, 08/12/2023 - 12:00 नवीन
एका प्रतिसादात ऑलरेडी आहे की वर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

सापडलं. फोटो मोहन गोखलेच

कंजूस
Sat, 08/12/2023 - 14:26 नवीन
सापडलं. फोटो मोहन गोखलेच काढणार.दुसरं कोण. स्पावड्याला ओळखतो,गाववाला आहे,एकत्र भटकंती झाली आहे. हल्ली स्पावड्याने राजसंन्यास घेतला आहे. चित्र काढतो स्क्रीनवर पोटासाठी, मिपासाईटवर लिहीत नाही.ती बॅन आहे. विजुभाऊ घारापुरी कट्ट्याला आले होते आठवतंय. पण तेव्हा मी मिपावर नवीन होतो. मला कट्टे आवडतात पण बंदिस्त जागेतले नाही. मोकळे रान भटकत बोलणे आवडते. पाच सहा केले आहेत मर्यादित. शिवाय तीन महाकट्ट्याला होतो. तीन झाडाखालचे पाताळेश्र्वरला त्यापैकी एकाला मालक नीलकांत होते. .एक वल्ली,सगासह अर्थातच भाजेलेणी. ठाण्यात दोन - एक टकासह,दुसरा वरुणमोहितेसह. डोंबोलीत दोनतीन नंदी हाटिलात . कट्टा हा बुद्धिबळ किंवा टेनिस खेळासारखा नसतो. आपल्यापेक्षा चांगल्या खेळणाऱ्याशीच खेळायचं तर कुणालाच भिडू मिळणार नाही. म्हणून जाहीर कट्टे. मिपा सर्वांसाठी.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा