✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एका गारुड्याची गोष्ट ११: फुरसे: कोकणी धसका !

ज
जॅक डनियल्स यांनी
Sun, 10/13/2013 - 23:38  ·  लेख
लेख
एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद ! एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला ! एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ ! एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे ! एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग. एका गारुड्याची गोष्ट ६: नागपंचमी चे विदारक सत्य ! एका गारुड्याची गोष्ट ७: नाग: अंधश्रद्धेचा बळी ! मनातलं एका गारुड्याची गोष्ट ८: नाग: माझे कॉलचे अनुभव एका गारुड्याची गोष्ट ९: मण्यार: पडद्यामागचे कलाकार ! एका गारुड्याची गोष्ट १०: घोणस: गवतात लपलेला स्नायपर ! निसर्गामध्ये लहान-मोठें कोणी नसते, तो नियम माणसाने बनवला आहे. म्हणजे बघा, गरवारे कॉलेजच्या चहा टपरी वरती जर (इतकुशी)मुंगी जर चावली तर समोरच्या सुंदर मुलीपण विसरल्या जातात. फुरसे हा घोणासाच्या कुटुंबातीलच (viperidae) लहान भाऊ, पण वासेपूरच्या छोट्या फैजल खान सारखा "केहेके लुंगा" म्हणत भल्याभल्यांच्या तोंडाला रक्त आणणारा. फुरसे (विषारी): याचा आढळ अगदी अमेरिकन शस्त्रात्र (वॉरलॉर्ड) व्यापाऱ्यांसारखा मिडल-इस्ट, आफ्रिका ते मध्य आशिया आणि शेवटी भारतीय उपखंडात.(भारत, पाकिस्तान, श्रीलंका इ.) २००९ साली इराक मध्ये तेग्रीस आणि युफ्रेटिस च्या खोऱ्यात दुष्काळ पडला होता, त्या वेळी तिकडच्या हजारो फुरस्यांनी इराकी जनतेची वाट लावून टाकली होती. बहुतेक इराकचे "स" या शब्दाशी वाकडे आहे, आधी सद्दाम-मग अंकल सॅम-शेवटी सॉ-स्केल्ड व्हायपर (फुरसे)! आपल्या इकडे पुण्या-मुंबईच्या (घाटावरच्या) लोकांना फुरसे एवढे माहित नसेल, पण कोंकणात म्हणजे जेवणात चिंच-गुळाची ज्या आमटी चवीने चाखली जाते त्याच चवीने "फुरसे" हा विषय चघळला जातो. "जास्तीत जास्त हातभर लांबी, मातेरी रंग, डोक्यावर बाण" असे सोपे वर्णन फुरस्याचे केले जाते(~लांबी ३८- ८० सेमी). डोक्यावरचा बाण म्हणजे याचे "ट्रेडमार्क शिक्रेट", ते म्हणजे "जर आपल्याला भिडला तर तिकडेच तोडला" हेच चित्रातून सांगायचा निसर्गाचा प्रयत्न. "मातेरी" रंग हा १० वी च्या "डी ग्रुप" च्या प्रश्नासारखा "अर्थ एक पण उत्तरे अनेक"..मातेरी मध्ये "राखाडी, चॉकलेटी, करडा, लालसर करडा, शेवाळी करडा असे अनेक प्रकार. जशी जमिनीवरची माती तसे फुरस्याची रंगसंगती, "आपली माती- आपले फुरसे" असा कार्यक्रम पण आपण त्यावरून काढू शकतो. हा फोटो मिपाकर 'अभिजा'यांनी साताऱ्याला (चाळकेवाडीला ) काढला आहे. हे फुरसे करड्या मातेरी रंगाचे आहे. सातारी फुरसे या फोटो मध्ये फुरस्याच्या डोक्यावरचा "ट्रेडमार्क बाण" नीट दिसतो आहे. बाण हा फोटो आमोद झांबरे यांचा, त्यांनी पुण्याच्या जवळ काढला आहे, रंग संगती मधला फरक बघा. पुणेरी फुरसे लहान असल्यामुळे लपण्यासाठी जागा अनेक: दरवाज्याची कडी, बिजागर; उंबरठ्याच्या, मोरीच्या,पलंगाच्या फटीत, घरातल्या कुंडीच्या खालच्या प्लेट मध्ये, कुंपणाची दगडांची भिंत, अंगणात पसरलेल्या दगडाच्या खाली इ. तसेच या सापाला "हीच-हायकिंग" करायला खूप आवडते, म्हणजे एका भाजीच्या ट्रक मधून दुसऱ्या ट्रक मध्ये असे करून हे साप पुण्यात पोहचतात. मी जी काही फुरशी पुण्यात पकडली ती मार्केट यार्ड परिसरामध्ये भाजीच्या गोडाऊनमध्ये पकडली आहेत. तशी कोथरूडच्या किंवा कोंढवा टेकडी वर मजबूत फुरशी आहेत, पण मला कॉल ला कधी मिळाली नाहीत. असेच एक फुरसे इंग्लंडमध्ये एका आज्जीच्या घरी भाजीच्या कंटेनर मधून पोहचले, "असेल कुठला तरी साप म्हणून", त्यांनी त्याला स्वयंपाकाच्या चिमट्याने उचलून डब्यात टाकले, नंतर ते फुरसे आणि ती आज्जी इंग्लंड मध्ये शेलीब्रिटी झाल्या होत्या, कोणाचे काय...तर कोणाचे काय ! संकटाची जाणीव झाली की फुरसे अंगावरचे खवले घासून करवत घासल्यासारखा आवाज करते,तो आवाज घोणसाच्या शिट्टी एवढा मोठा नसला तरी कचकचीत तीव्र (high frequency) असतो. घोणासाच्याच कुटुंबातील फुरसे असल्यामुळे आधीच्या भागात लिहिलेले वर्णन याला पण लागू होते- "डोळ्याची पापणी लवते न लवते तो पर्यंत जीवा महाला ५ हातावरचे लिंबू पट्ट्याने उडवून जागेवर यायचा,याच कुळीतला फुरसे पण असतो. १/३ सेकंदात: "तोंड उघडून -विषदंत बाहेर काढून -दंश करून -विष सोडून - दात मिटून -परत जागेवर".. या सगळ्या क्रिया होतात.( मला हे वाक्य लिहायला पण ३० सेकंद लागली.) हा बी.बी.सी. चा व्हिडिओ बघा: फुरस्याचा हल्ला. हाय-स्पीड कॅमेरा मध्ये त्यांनी फुरस्याचा हल्ला चित्रित केला आहे. ) वरती लिहिल्याप्रमाणे या जमातीचे विषपण नागापेक्षा वेगळ्या प्रकारचे म्हणजे हिमो-टोक्सिक असते. साधरण पणे १/१० घोणासाच्या विषाच्या मात्रेएवढे म्हणजे २० mg तो २५ mg एवढे विष फुरसे टोचते. हे विष मुख्य करून रक्ताभिसरण संस्थेवर (तर नागाचे मज्जासंस्थेवर) हल्ला करते, थोडक्यात म्हणजे रक्ताचे पाणी करते. रक्ताची गुठळ्या करायची क्षमता गंडल्यामुळे शरीरातून रक्तस्त्राव होऊ लागतो. पहिल्यांदा हिरड्या मधून रक्त चालू होते,नंतर मिळेल त्या भागातून रक्त पडू लागते...रक्त दाब कमी होऊ लागतो आणि शेवटी किडनी फेल होऊन रुग्ण दगावतो. फक्त हे विषाचे प्रमाण(घोणसाच्या तुलनेत) कमी असल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण महाराष्ट्रामध्ये कमी आहे, कारण आपल्याकडे हाफकिनचे प्रती-विष उपलब्ध आहे. पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सर्पदंशाचे रुग्ण हे फुरसे चावल्यामुळे आढळतात, १९९२ ते २००१ या दहा वर्षाच्या काळात २७४ फुरसे दंश तर ७२ नाग दंशाचे रुग्ण फक्त नांदेड भागात आढळले.(डॉ.डी.पी. पुंडे )म्हणजे साधरण पणे नागाच्या चौपट प्रमाणात फुरसे चावण्याचे प्रमाण महाराष्ट्रात आढळते. निसर्गाला कमी लेखायची ही चूक अशी महागात पडते. हा व्हिटेकर साहेबांचा व्हिडिओ बघा- फुरस्याचे विष ! जास्तीत जास्त फुरसे चावण्याचे प्रमाण हे रात्री आढळते, "व्होल वावर इज अवर" हा मनुष्यप्राण्याचा गैरसमज फुरसे रात्री दूर करते, शेतात डबा टाकायला गेला, धार मारायला गेला आणि फुरसे चावले, हे प्रकरण...आज ३१ नंबर ची पी.एम.टी खूप उशिरा आली एवढे कॉमन आहे. माणूस वाचला तरी, ज्या जागी फुरसे चावते तिकडचे टिशू जळून जातात, कधी-कधी बोटे कापायला लागतात.
एका सर्पतज्ञांच्या भाषेत "एकवेळ नाग परवडला पण फुरसे नको,इतका त्रास होतो की बाळंतपण परवडले !"
एका मंगळवारच्या संध्याकाळी (~२००२-२००५ )अनिकेत (माझा सर्पोद्यानचा मित्र)त्याच्या रूमवर (सर्पोद्यान मधली वरची खोली) गप्पा टाकत पडला होता. इतक्यात कोर्पोरेशनचा ड्रायवर, हातात एक साप घेऊन आला. संध्याकाळी कोर्पोरेशनची "दुटी" संपल्यावर त्याने कात्रजच्या गुत्त्यावर पहिल्या धारेची लावली होती. "अरे हा बघ मांजऱ्या धरून आणला बघ !" खालचा फोटो बघा, मांजरऱ्या म्हणजे कॅट स्नेक, बिनविषारी साप, याच्यात पिल्लात आणि फुरस्यामध्ये लोकं, सर्पमित्र नेहमीच गोंधळ घालतात. मांजऱ्या अनिकेत मुरलेला सर्पतज्ञ असल्यामुळे संधीप्रकाशात पण त्याने ते फुरसे आहे हे ओळखले, त्याने तो साप पहिल्यांदा डब्यात टाकला. ड्रायवरचे चालूच होते-" गुत्त्यावर हा मांजऱ्या दिसला, इतकुसा साप, असाच धरला..." अनिकेतने त्याची बोटं चेक केली तर बोटाला, ब्लेड मारावे तसा दात लावला होता. अनिकेतला गंभीर परिस्थीची जाणीव झाली, पण हा आपला तळीराम "फुल ओन" होता, "आपल्याला काय पण होत नाय,लई मोठें मोठें नाग धरले आहेत आपण"..हे चालूच होते. पुढच्या काही क्षणात , अनिकेत ने त्याला स्प्लेंडर वर झाशीच्या राणीसारखा स्वतःला मागून बांधला आणि गाडी ससूनच्या दिशेला तडक सोडली. आत्ता ज्यांना कात्रज ते पुणे स्टेशन रस्ता माहित असेल त्यांना माहित असेल की संध्याकाळच्या वेळी या रस्त्यावर गाडी चालवणे म्हणजे कुष्णा नदीच्या प्रवाहात उडी टाकून उलट्या दिशेने (भोपळा न लावता) पोहोण्यासारखे आहे. कसेबसे करत हा ससूनला पोहचला तर ही मोठी रांग...आता दारूचा अंमल कमी होऊन विषाचा अंमल चालू झाला होता, त्यामुळे ड्रायवर पण बोंबलत होता. लायनी शिवाय फक्त व्हीयपीला एन्ट्री हा तिरुपती-बालाजीचा नियम इकडेपण लागू होता. मोबाईलच्या आधीचा काळ, त्यामुळे अण्णाना फोन(ल्यांड लाईन) लागे पर्यंत त्या छोट्या-इवलुश्या फुरस्यानी ड्रायवरला सात जन्म दाखवले होते. फोन लागल्यानंतर वरून सूत्र हालली, ड्रायवरला प्रतिविष चालू झाले. ससूनच्या आणि अनिकेतच्या कृपेने, नंतर तो (हाल होत होत)वाचला, त्याचे बोट पण वाचले. पण निसर्गातल्या त्या इतकुश्या फुरस्याने, ड्रायवरला त्याची जागा दाखवून दिली होती. (हा वरचा अनुभव माझा स्वतःचा नाही पण तो १००% खरा आहे, फक्त थोडे छोटे तपशील कानगोष्टीमुळे चुकू शकतात.) आत्तापर्यंत मी ४ मुख्य विषारी सापांची (नाग, मण्यार, घोणस, फुरसे) माहिती दिली, हेच साप साधरण करून मानवीवस्ती मध्ये आढळतात. तसे अजून भारतात अजून खूप विषारी साप (साधा,मलबार-चापडा, किंग कोब्रा, पोवळा साप, समुद्र साप इ.) आहेत, पण त्यांचा माझा कॉल वर कधी संबध आला नाही म्हणून मी त्यांची माहिती देणे टाळले.ज्यांना कोणाला अजून त्यांच्या बद्दल माहिती हवी असेल त्यांनी अण्णांचे "साप" (इंग्लिश-स्नेक्स) हे पुस्तक वाचावे.(त्याच्या प्रती सर्पोद्यान मध्ये मिळतात.) पुढच्या भागात बिनविषारी साप.... (अण्णा म्हणजे सर्पोद्यान चे संस्थापक-श्री.निलीमकुमार खैरे.) (या लेखातले सर्व फोटो अंतरजालावरून आणि चिराग रॉय कडून घेतले आहेत.त्यांना कुठल्या पद्धतीने बदलण्यात आले नाही.)

Book traversal links for एका गारुड्याची गोष्ट ११: फुरसे: कोकणी धसका !

  • ‹ एका गारुड्याची गोष्ट १०: घोणस: गवतात लपलेला स्नायपर !
  • Up
  • एका गारुड्याची गोष्ट १२: धामण: जुन्या ओळखीचा साप ! ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
राहणी
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
अनुभव
माहिती

प्रतिक्रिया द्या
78148 वाचन

💬 प्रतिसाद (110)

प्रतिक्रिया

मी पहिला मी पहिला.

प्यारे१
Sun, 10/13/2013 - 23:50 नवीन
मी पहिला मी पहिला. ;) मस्तच! बाकी >>> आज ३१ नंबर ची पी.एम.टी खूप उशिरा आली एवढे कॉमन आहे. प्द्मावती - स्टेशन (व्हाया सारंग, सहकारनगर मार्गे ;) वाली) ही बस म्हणजे खरंच दिव्य आहे. :)
  • Log in or register to post comments

जबरा फोटो आहेत. निसर्गाच्या

मोदक
Mon, 10/14/2013 - 00:04 नवीन
जबरा फोटो आहेत. निसर्गाच्या कलाकुसरीला तोड नाही..!!!! लेख नेहमीप्रमाणी भारी.
  • Log in or register to post comments

ये बात, जेडी!

आदूबाळ
Mon, 10/14/2013 - 01:17 नवीन
ये बात, जेडी! झाशीच्या राणीची स्टोरी आधीही ऐकली होती - आता शिव्यांशिवाय वाचताना कसंसंच झालं :)
  • Log in or register to post comments

उत्तम लेख. सुरेख प्रकाशचित्रे

यशोधरा
Mon, 10/14/2013 - 02:47 नवीन
उत्तम लेख. सुरेख प्रकाशचित्रे.
  • Log in or register to post comments

*****

जेपी
Mon, 10/14/2013 - 07:20 नवीन
तुम्ही मंनोरंजन आणी प्रबोधन एकसाथ करता राव . बाकी लहानपणी शेताकड निघाल की मामा याची भिती घालायचा ,हा साप अंगावर त्याचा श्वास सोडतो ज्यामुळे अंगावर मोठी फोड येत ,म्हणुन फुर्रसे म्हणत असा समज होता
  • Log in or register to post comments

हो, फोड येणारा साप म्हणजे

जॅक डनियल्स
Mon, 10/14/2013 - 08:39 नवीन
हो, फोड येणारा साप म्हणजे फुरसे, तो त्याच्या विषाचा एक परिणाम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

@तुम्ही मंनोरंजन आणी प्रबोधन

अत्रुप्त आत्मा
Tue, 10/15/2013 - 00:08 नवीन
@तुम्ही मंनोरंजन आणी प्रबोधन एकसाथ करता राव .>>> ++++++११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

जबरा लेख....

मुक्त विहारि
Mon, 10/14/2013 - 07:50 नवीन
काय मस्त माहीती दिलीत राव. जमल्यास सापाच्या स्वभाव धर्माविषयी पण लिहिलेत तर जास्त आवडेल..
  • Log in or register to post comments

विषारी सापांचा स्वभाव धर्म

जॅक डनियल्स
Mon, 10/14/2013 - 08:42 नवीन
विषारी सापांचा स्वभाव धर्म म्हणजे "तो साप विषारी आहे " एवढाच धरून चालवा. उगाच कोणी सांगेल एखादा विषारी साप शांत आहे आणि मग अपघात झाला की "ती शांतता खड्यात जाईल."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मस्तच जेडी !

ब़जरबट्टू
Mon, 10/14/2013 - 08:55 नवीन
आवडला हा पण लेख.. जबरा माहिती.. नशिबाने अजुन सापाशी सामना झालेला नाय बा.... :)
  • Log in or register to post comments

जबरदस्त.

प्रचेतस
Mon, 10/14/2013 - 08:56 नवीन
जबरदस्त.
  • Log in or register to post comments

जबरदस्तच!

पैसा
Mon, 10/14/2013 - 10:24 नवीन
कोकणात खरंच नागाला लोक भीत नाहीत पण फुरशाला भितात आणि ती मिळतातही खूप!
  • Log in or register to post comments

एक साथ... नमस्ते!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 10/14/2013 - 10:48 नवीन
एक साथ... नमस्ते!
  • Log in or register to post comments

बाबौ!!! ह्ये बी ड्यान्जरच...

झकासराव
Mon, 10/14/2013 - 11:00 नवीन
बाबौ!!! ह्ये बी ड्यान्जरच...
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणे ...

विटेकर
Mon, 10/14/2013 - 11:01 नवीन
प्रबोधन + मनोरंजन ! वेरी वेरी गूड !
  • Log in or register to post comments

कालच एक साप दिसला. पक्षी

आतिवास
Mon, 10/14/2013 - 11:07 नवीन
कालच एक साप दिसला. पक्षी निरीक्षणासाठी डोळ्यांवर दुर्बिण होती म्हणून दिसला. औषधाच्या बाटल्यांचा ढीग होता - त्यात तोंड घालून काय करत होता देव जाणे! एक बाटली झाली की दुसरी - असा त्याचा खेळ चालू होता. साधारण दहा फूट लांबी असावी त्याची. मधूनच डोके वर काढून जीभ बाहेर काढत होता. मागे थोडं जंगल आहे - माणसांचा वावर नसणारं. नुसते जेडीचे लेख वाचून प्रत्यक्षात साप 'ओळखू' येत नाहीत हे लक्षात आलं :-) दुर्बिणीचा अँगल बदलायला गेले तर तेवढ्यात कुठे गायब झाला कुणास ठाऊक! काही पत्ता लागला नाही :-(
  • Log in or register to post comments

जबरदस्त

अनिरुद्ध प
Mon, 10/14/2013 - 11:30 नवीन
उत्तम माहिती.
  • Log in or register to post comments

कांडर

llपुण्याचे पेशवेll
Mon, 10/14/2013 - 11:34 नवीन
जॅडे, हे कांडर काय असतं हो? फुरशाबरोबर याचीही किर्ती बरीच ऐकली आहे.
  • Log in or register to post comments

आणि दिवड पण

सौंदाळा
Mon, 10/14/2013 - 12:05 नवीन
आणि दिवड काय असतं ते पण सांगा जॅडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

दिवड

पैसा
Tue, 10/15/2013 - 11:03 नवीन
म्हणजे आधेलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

दिवड म्हणजे विरोळा. हा

सुबोध खरे
Tue, 10/15/2013 - 18:41 नवीन
दिवड म्हणजे विरोळा. हा हरणटोळ किंवा नानेटी या जातीतील एक बिनविषारी साप असून तो पाण्यात सहज पोहतो आणि अतिशय चपळ असतो. पहा http://www.indianetzone.com/4/keel_back.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

कांडर

सुमीत भातखंडे
Tue, 10/15/2013 - 10:49 नवीन
म्हणजे मण्यारच असावं बहुतेक. मण्यारीचच अजून एक नाव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

पुढच्या भागात बिनविषारी साप..

बाळ सप्रे
Mon, 10/14/2013 - 11:43 नवीन
पुढच्या भागात बिनविषारी साप....
आता जरा कमी घाबरवतील हे लेख !!!
  • Log in or register to post comments

फुरसे हे त्यामानाने( नाग

सुबोध खरे
Mon, 10/14/2013 - 11:57 नवीन
फुरसे हे त्यामानाने( नाग मण्यार किंवा घोणस यांपेक्षा) फारच लहान असते परंतु मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीप्रमाणे सर्वात जास्त सर्पदंशाचे रुग्ण फुरसे चावल्याचे असतात. एकतर हे भारतात झाडून सर्वत्र दिसतात. आणि फारच लहान असल्याने पटकन नजरेस पडत नाहीत आणि आकार लहान असल्याने लोक पण जर जास्तच चावटपणा करतात. मी २ ० ० ४ साली गोव्यात(वास्को च्या जीवन्ति या नौदलाच्या रुग्णालयात) काम करीत असतानाचे दोन किस्से. पहिला एक किस्सा म्हणजे एक नौसैनिक एक जेमतेम पाच ते साडेपाच इंचाचा "किडा" घेऊन आला होता आणि हा किडा मला चावला आणि आता हाताची आग होते म्हणत होता. तो किडा चावल्याने त्याने त्याचे डोके ठेचले होते. तो हंस या नौदलाच्या विमानतळ येथे सफाई करत होता आणि पाने उचलताना हा "किडा" त्याला चावला होता. हा "किडा" पाहिल्यावर मला लक्षात आले कि हे फुरसे (किंवा पिल्लू) असणार. मी त्याला ताबडतोब भरती करून घेतले. त्यावर त्याची कुरकुर चालली होती, साहेब साधा किडाच आहे उगाच भरती कशाला करता. साहेब मला ओरडतील कि वार्षिक तपासणी आहे काम करायला नको म्हणून नाटके चालली आहेत इ. अर्थात मी आवाज चढवून त्याला गप्प केले आणि सांगितले याची जर एलर्जी आली तर तुला श्वास घ्याला त्रास होऊ शकतो. त्याच्या रक्ताचा नमुना घेऊन तपासणी साठी पाठवून दिला. थोड्या वेळाने त्याचा हात सुजायला लागला मग त्याला पटले कि हि काहीतरी गडबड आहे. तोवर त्याच्या रक्ताचा निकाल आला होता मी आमच्या फिजिशियन ला पाचारण केले त्याने येउन त्याला सर्प विष प्रतीबंधकाचा टेस्ट डोस दिला आणि त्या नौसैनिकाला ताबडतोब त्याची एलर्जी(anaphylaxis) आली. त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्याचा रक्तदाब एकदम कमी झाला आणि त्याला चक्कर येऊ लागली. त्याला ताबडतोब अदरेनालीन(adrenaline), स्टेरोईड(हायड्रो कोरटीसोन)ची इंजेक्शने दिली आणि त्याला अतिदक्षता विभागात हलवले. तसेच त्याला पुढे सर्पविष प्रतीबंधकाचे पुढचे डोसे दिले. या सगळ्या प्रकरणात फिजिशियन चे पाच सहा तास गेले म्हणून तो त्या नौसैनिकाला झाडत होता कि नको तिथे हात कशाला घालत होतास. आणि तो नौसैनिक मला धन्यवाद देत होता कि साहेब तुम्ही मला वाचवले. मी घरी गेलो असतो आणि घरी एलर्जी आली असती तर मेलोच असतो. आता हि एलर्जी खर तर सर्प विष प्रतीबंधकाची होती आणि सापाच्या विषाची नव्हती पण काकतालीय न्यायाने मला फुकटचे क्रेडीट मिळाले होते. असाच एक दिवस एक नौसैनिक वरुणा पुरी(नौसैनिकांची कौटुंबिक वसाहत) येथून एक लहान मुलाला किडा चावला म्हणून घेऊन आला. हा सात आठ वर्षाचा मुलगा तेथे खेळत होता आणि बॉल घ्यायला कोरड्या गटारात गेला तर पानांच्या आडून त्याला एक "किडा" चावला मुलाने डास किंवा मुंगी असेल म्हणून दुर्लक्ष केले. थोड्या वेळाने त्याचा पायाचा अंगठा सुजला आणि आग होऊ लागली म्हणून त्याने बापाला दाखवले तर तेथे एक छोटेसे छिद्र दिसले आणि बाजूचा अंगठा सुजला होता. तो घेऊन आला तेंव्हा मला ते एक छिद्र अंगठ्याच्या नखाच्या थोडेसे बाजूला दिसले आणि अंगठा सुजून आतमध्ये रक्तस्त्राव झाल्यासारखे दिसत होते. मला ते साप चावल्यासारखेच वाटत होते(अगोदरचे फुरसे चावलेले रुग्ण आठवले तर ती जखम तशीच वाटत होती ( माझा तर्क होता कि फुरसे चावले असणार पण एक दात नखावर गेल्याने एकच छिद्र पडले आणि त्यातून विषबाधा झाली असावी) मी त्या मुलाला भरती करून घेतले त्याच्या रक्ताचा नमुना प्रयोगशाळेत पाठवला आणि आमच्या बाल रोग तज्ञाला फोन केला कि संध्याकाळी राउंडला येशील तेंव्हा या मुलाला बघून जा. पंधरा मिनिटात त्या मुलाला उलटी झाली. आता माझ्या लक्षात आले कि माझा तर्क बहुधा खरा होता. त्या मुलावर विषाचा अंमल होऊ लागला होता(systemic envenomation) आणि थोड्या वेळाने रक्ताचा अहवाल आला आणि त्यात त्याला सर्पविष बाधा झाली असल्याचे सिद्ध झाले. बाल रोग तज्ञाने येउन त्याला सर्प विष प्रतीबंधकाचे डोस दिले आणि तो मुलगा यथावकाश ठीक झाला. तिसरी कथा- माझ्या वर्गातील एक डॉक्टर मुलगी रेणुका वायुसेनेत फ्लाईट लेफ्टनंट होती. ती राजस्थानात बाडमेर जवळ उत्तरलाई या ठिकाणी मिग २१ च्या स्क्वाड्रन ची मेडिकल ऑफिसर म्हणून तैनात होती. साडेचार वर्षे झाली तरी तिचे पोस्टिंग झालेले नव्हते.(आमचे मित्र म्हणत होते कि वायुसेना रेणुकाला विसरली आहे.) तेंव्हा एका संध्याकाळी ती खोलीच्या बाहेर आली तेंव्हा एका फुरश्यावर तिचा पाय पडला आणि तिला ते चावले. ती ताबडतोब आपली जीप घेऊन बाडमेरच्या लष्करी रुग्णालयात गेली. प्रथम तेथील फिजिशियन तिच्यावर विश्वास ठेवायला तयारच नव्हता. उगाच किडा चावला असेल असे तो म्हणत होता. अर्थात रेणुका आपल्या म्हणण्यावर ठाम होती त्यामुळे त्याने तिला तेथे अधिकारी वार्ड मध्ये भरती करून घेतले. थोड्यावेळाने तिचा पाय सुजू लागला तेंव्हा त्याचा विश्वास बसला आणि तो टरकला. कारण थोड्या वेळापूर्वी तो तिची टर उडवत होता. आता त्याने तिची रक्त तपासणी इ सुरु केले. तिला सर्प विष प्रतीबंधकाचा टेस्ट डोस दिला आणि तिला त्याची जोरदार एलर्जी आली आणि तिचा रक्तदाब एकदम खाली आला. त्याची अजूनच तंतरली. त्याने तातडीचे उपाय केले पण तिला सर्पविष प्रतिबंधक देणे आवश्यक होते. तेवढ्यात रेणुकाचा कमांडिंग ऑफिसर त्याला म्हणाला डॉक्टर आत्ता आमचे वायुसेनेचे एक विमान (ए एन १ २) पुण्याला जात आहे तुम्हाला तिला पुण्याला हलवायचे आहे काय? त्यावर तो तयार झाला. पुढच्या एक तासात तो स्वतः तिला घेऊन पुण्याच्या कमांड रुग्णालयात गेला तिथे तिचा इलाज झाला आणि तिथून तिला सुट्टीवर पाठवले गेले.तिचे आई वडील पुण्यातच स्थायिक आहेत. शेवटी तिचे तिथून पुण्यालाच(लोहगाव) पोस्टिंग आले. आम्ही तिला थट्टेने बोललो कि पोस्टिंग करण्यासाठी तु सापाला "सुपारी" दिली असशील.
  • Log in or register to post comments

तुमचे अनुभव नेहमी माहितीपुर्ण

सौंदाळा
Mon, 10/14/2013 - 17:51 नवीन
तुमचे अनुभव नेहमी माहितीपुर्ण आणि रंजक असतात. आमच्यासोबत शेयर केल्याबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

+ १

मुक्त विहारि
Mon, 10/14/2013 - 18:26 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

खूप माहितीपूर्ण आणि विलक्षण

जॅक डनियल्स
Mon, 10/14/2013 - 19:07 नवीन
खूप माहितीपूर्ण आणि विलक्षण प्रतिसाद आहे. तुमच्या प्रतिसादामुळे माझ्या लेखांना वैदकीय पाठींबा मिळतो.मी स्वतः वैदकीय क्षेत्रातला नसल्यामुळे मला उपचाराची जास्त माहिती नाही, ती तुमच्या प्रतिसादामधून लोकांपर्यंत पोहचते. (खरा निसर्गातील ) किडा चावल्याला आता मिपाकर तरी थोडे गंभीर पणे घेतील, असे वाटते. ;) धन्यवाद् !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

नेहमी प्रमाणाचे झकास्स्स्स...

मदनबाण
Mon, 10/14/2013 - 12:08 नवीन
नेहमी प्रमाणाचे झकास्स्स्स... :)
  • Log in or register to post comments

जबरदस्त..

चिगो
Mon, 10/14/2013 - 12:40 नवीन
पुलंच्या एका लेखात ' आमच्या कोकणात चुलीवर फुरसे बसलं हे वाक्यदेखील...' वाचलं होतं, तेव्हापासून ह्या सापाबद्दल कूतुहल होतं.. नेहमीप्रमाणेच भारी लेख.. ह्या लेखातले फोटोपण एकदम खतरनाक आहेत..
  • Log in or register to post comments

+१

चाणक्य
Mon, 10/14/2013 - 14:40 नवीन
मला पण त्यामुळेच जे.डी. फुरस्यावर लेख कधी टाकतोय अस झालं होतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

भारी माहिती आणि फोटो

ब्रिज
Mon, 10/14/2013 - 14:26 नवीन
ह्या हातभर सापात माणसाची हातभर टरकवण्याची ताकद, चपळाई असते. लहानपणी आमच्या शेतात उसाच्या मुळाशी हे साहेब त्यांच्या तंद्रीत बसलेले असतील. हातात एका चिपाडावर गरमागरम गुळाचा पाक आणि शेंगदाणे असा "इंस्टंट" चिक्की घेऊन आम्ही भावंडं शेतातल्या गुर्‍हाळाजवळ बागडत होतो. पहाटे सहा-साडेसहाच्या सुमाराला घडलं होतं हे..अगदी सहज..अनावधानाने माझं पाऊल ह्या वेटोळ्या साहेबांच्या शेपटीवर पडला. अनवाणी होतो. अर्धवट ओल्या मातीत पण जाणवलं खरं.. पण तोवर हे साहेब जागचे उसळून हल्लाबोल करुन पुन्हा जणु काही घडलेच नाही, अशा थाटात गप आपल्या जागेवर वेटोळ्यात! निमिषार्धात जे पहायला मिळालं, ते त्या बी.बी.सी.च्या कॅमेर्‍याने बरोबर पकडलंय. केवळ नशीब थोर किंवा ह्या साहेबांचा अंदाज चुकला म्हणा..वाचलो. थिजलो होतो जागीच. बत्ती गूल झालेली आमची तर! त्यानंतर बर्‍याचवेळा भेट झाली, पण आम्ही आपले गपगुमान वाट वाकडी करुन "सरजी तुस्सी ग्रेट हो!" म्हणत कल्टी मारत गेलो. ह्यांना तंद्रीत राहू देणंच सुखाचं.
  • Log in or register to post comments

धन्यवाद...

मुक्त विहारि
Mon, 10/14/2013 - 18:25 नवीन
मी जे.डी,ला फक्त विचारले. तुम्ही तर सापाच्या स्वभावधर्माबद्दल उदाहरण पण देउन टाकलेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिज

खुप धन्यवाद.

अग्निकोल्हा
Mon, 10/14/2013 - 14:39 नवीन
या आधिही ट्रेक वगैरे करताना साप निवांत भ्रमण करताना पाहिले होते वा सळसळत वेगाने जाणार्‍या जनावराशी संबंध फक्त तेंव्हाच आला जेंव्हा ते माझ्यापासुन दुर जाण्याच्या प्रयत्नात असे. त्यामुळे निसर्गात आढळणार्‍या सापांबद्दल मत न्युट्रल होते.. यापुढे मात्र जास्त चौकसता अन सावधता बाळगली जाइल. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

अतिशय उत्तम माहीती रंजकपणे

किसन शिंदे
Mon, 10/14/2013 - 16:45 नवीन
अतिशय उत्तम माहीती रंजकपणे सांगण्याची तुझी हातोटी खासच! आता काय होतं की, तूझा एक भाग आल्यावर तो वाचून मी लगेच पुढच्या भागाची प्रतिक्षा माझ्याही नकळत करतो. आणि त्याचबरोबर अॅनिमल प्लॅनेटवर स्टिव्ह आॅस्टीन एडवेन्चर्स हा सापांच्या माहीतीचा कार्यक्रमही न चूकता पाहतो. :-)
  • Log in or register to post comments

मस्त

अभिजा
Mon, 10/14/2013 - 20:29 नवीन
खास माहिती! पुढील लेखाची वाट पाहतो.
  • Log in or register to post comments

माहितीचा खजिना

हुप्प्या
Mon, 10/14/2013 - 21:12 नवीन
जेडीचा लेख आणि डॉक्टरसाहेबांची भर म्हणजे एक पर्वणी असते. माहितीचा एक नवा खजिना प्रत्येक लेखातून खुला होतो. प्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकरांना फुरसे चावले होते असे ऐकून आहे.
  • Log in or register to post comments

जेडीचा लेख आणि

आदूबाळ
Tue, 10/15/2013 - 00:52 नवीन
जेडीचा लेख आणि डॉक्टरसाहेबांची भर म्हणजे एक पर्वणी
अगदी खरंय. जेडी आम्रिकेत आणि डॉ खरे मुंबईत, पण दोघं मिळून जगभरातल्या मिपाकरांना पर्वणी देतात. आंतरजालाच्या सामर्थ्याची ही प्रचीतीच आहे. जेडी आणि डॉक्टरसाहेबांनी मिपा दिवाळी अंकासाठी एक लेख एकत्र लिहावा असं सुचवतो. (या प्रस्तावाला ज्यांचं अनुमोदन असेल त्यांनी या दोघांना खरडी, व्यनि आणि (शक्य असल्यास) प्रत्यक्ष संपर्क करून त्यांच्यावर मनोवैद्न्यानिक दबाव आणावा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

ह्यो साप कोनचा म्हनायचा हो

अत्रुप्त आत्मा
Tue, 10/15/2013 - 00:38 नवीन
ह्यो साप कोनचा म्हनायचा हो जेडी भाऊ? :) Image removed. आमास्नी बेडशे लेणी उतरताना, आल्ता भेटाया!
  • Log in or register to post comments

आई

सुमीत भातखंडे
Tue, 10/15/2013 - 10:58 नवीन
आई शप्पथ...मला दिसतच नाहिये साप. नुसत्या दगडी पायर्‍याच दिसतायत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हां! अता आला बघा!

अत्रुप्त आत्मा
Tue, 10/15/2013 - 19:21 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

फोटो वरून ओळखणे अवघड जाते आहे

जॅक डनियल्स
Tue, 10/15/2013 - 20:17 नवीन
फोटो वरून ओळखणे अवघड जाते आहे , पण माझ्या अंदाजानुसार प्रमाणे विरोळा किंवा देंडू (पाण्यातला साप) आहे. पण बिनविषारी साप आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आता

सुमीत भातखंडे
Fri, 10/18/2013 - 10:42 नवीन
फोटोच दिसत नाही. घरी जाऊन बघणे आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

लेख आवडला हो जेडीभौ! फोटू

रेवती
Tue, 10/15/2013 - 04:54 नवीन
लेख आवडला हो जेडीभौ! फोटू मात्र दिसत नाहीत्......पण ते बरेच आहे.
  • Log in or register to post comments

मस्त... नेहमीप्रमाणेच

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 10/15/2013 - 11:19 नवीन
मस्त... नेहमीप्रमाणेच खुसखुशित आणि माहितीपूर्ण ! सुचना: जमल्यास चित्रे टाकताना फ्लिकर ऐवजी गुगलफोटोचा उपयोग करावा. फ्लिकरवरची चित्रे बर्‍याच जणांना दिसत नाहीत असे प्रतिसादांतून जाणवते आहे (मीही त्यातला एक :) ). गुगलबाबा सगळीकडे दर्शन देतो ;)
  • Log in or register to post comments

धन्यवाद् !

जॅक डनियल्स
Tue, 10/15/2013 - 20:21 नवीन
धन्यवाद् ! पुढच्या वेळी नक्की तसे फोटो टाकीन, मला हे प्रकरण माहित नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

आमच्याकडे

आनन्दा
Tue, 10/15/2013 - 12:10 नवीन
आमच्याकडे कांडर नावाचा एक प्रकार असतो. तो ह्यातला कोणता म्हणयाचा हो? दिवसा चावला तर माणूस सूर्यास्त बघत नाही म्हणतात, आणि रात्री चावला तर सुर्योदय.
  • Log in or register to post comments

कांडार, कांडर किंवा कान्डोर(

सुबोध खरे
Tue, 10/15/2013 - 18:34 नवीन
कांडार, कांडर किंवा कान्डोर( हा शब्दप्रयोग श्री ना पेंडसेंच्या "तुंबाडचे खोत"या कादंबरीत आहे) म्हणजे मण्यार. हिचे सूर्य कांडार(माणूस सूर्योदयापूर्वी मरतो) किंवा चंद्र कांडार((माणूस चन्द्रोदयापूर्वी मरतो)अशी नवे रायगड जिल्ह्यात ऐकावयास मिळतात हिचे विष इतके घातक असते म्हणून या आख्यायिका आल्या असाव्यात. जे डी चा माण्यारीबद्दल लेख वाचावा म्हणजे त्याबद्दल अधिक माहिती मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

डॉ. बरोबर आहेत.मण्यार म्हणजेच

जॅक डनियल्स
Tue, 10/15/2013 - 20:23 नवीन
डॉ. बरोबर आहेत.मण्यार म्हणजेच सूर्य किंवा चंद्र कांडर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सहीच.... :)

सुहास झेले
Tue, 10/15/2013 - 13:52 नवीन
सहीच.... :) :) पुढच्या भागाची वाट बघतोय....
  • Log in or register to post comments

नेहमी प्रमाणेच रंजक आणि

गणपा
Tue, 10/15/2013 - 14:13 नवीन
नेहमी प्रमाणेच रंजक आणि माहितीपुर्ण लेख. त्यात डॉक्टरांच्या प्रतिसादाची जोड. ही लेखमाला कधी संपूच नये.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा