✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

दुर्गे दुर्घट भारी... एक विचार.

प
प्यारे१ यांनी
Fri, 10/11/2013 - 03:45  ·  लेख
लेख
गणेश विसर्जन झालं की पितृपक्ष येतो. तो संपला की लगेच प्रतिपदेला घटस्थापना होते नि आपण देवीची उपासना सुरु करतो. देवीच्या उपासनेची सुरुवात कधी झाली, का झाली, कशी झाली ह्याबाबत मला माहिती नाही. इतिहासकारांचा विषय आहे तो. असो. पुराणांमध्ये कुठंतरी सांगितल्याप्रमाणं महिषासुर नावाचा राक्षस प्रचंड मातला होता नि त्यानं सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. तेव्हा देवी नऊ दिवस अनुष्ठानाला बसली नि विजयादशमीदिवशी ह्या महिषासुराचा वध केला (चूकभूल द्या घ्या.) जास्त प्रस्तावना न करता ह्या दुर्गोत्सवाच्या निमित्तानं मागे गणपती आरतीचा आपण विचार केला तसा देवीच्या आरतीचा विचार करण्याचा प्रयत्न करुया. सुखकर्ता दु:खहर्ता लेखामध्ये म्हटल्याप्रमाणंच आरती प्रेम असे पर्यंत, अंतःकरणपूर्वक, एकाग्र होऊन, आर्ततेनं आळवली जावी. आरतीचा विचार करुया. दुर्गे दुर्घट भारी तुज विण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी| वारि वारि जन्ममरणाते वारि, हारि पडलो आता संकट निवारी ||१|| जयदेवी जयदेवी महिषा सुरमर्दिनी, सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी जयदेवी || धृ|| त्रिभुवनभुवनी पाहता तुज ऐसे नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही| साहि विवाद करिता पडिले प्रवाही, ते तू भक्तालागि पावसी लवलाही ||२|| जयदेवी जयदेवी .... प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा, क्लेषापासुनि सोडी, तोडी भवपाशा| अंबे तुजवाचोनि कोण पुरविल आशा, नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा ||३|| जयदेवी जयदेवी .... आरती कुणी रचली ह्याबाबत थोडा प्रवाद असावा. नरहरी हे नाव आरतीत येतं. नरहरी सोनार खरंतर शिवाचे भक्त. विठठलाच्या कमरेचा हार बनवण्याचं निमित्त होऊन दोन दैवतामधलं अद्वैत उमजलं अशी कथा आपल्याला परिचित आहे. कदाचित अशी अनुभूति आल्यानंतर त्यांनी ती आरती रचली असावी. कुणी म्हणतं रामदासस्वामींनी रचलेली आरती आहे. रचनाकार कुणीही असला तरी मुळातच दोघेही अत्यंत श्रेष्ठ प्रतीचे भक्त व तत्त्वज्ञ असल्यानं आपण त्याबाबत जास्त विचार न करता ‘आम खाने के पीछे’ जाऊया. आरती कोणी रचली ह्याबाबत न करता कुणाची आरती केलेली आहे ह्याचा विचार करता आरती देवीची आहे हे मात्र नक्की समजून येतं. मात्र ह्याबाबत थोडा सूक्ष्म विचार करण्याची गरज आहे. नेमकी आरती कुणाची केली आहे? हल्ली दहा दिवस बाजारात येणार्‍या आठभुजा असलेल्या, देखण्या, प्रमाणबद्ध मूर्तीची, देवळात असलेल्या सोन्याच्या दागिन्यांनी मढवलेल्या मूर्तीची की आणखी कशाची? कधीकधी शब्द थोडे पुढंमागं करुन बघितले की आपल्याला नेमकं विषयाचा गाभा काय ते कळतं. 'जयदेवी जयदेवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी' असं म्हटलेलं आढळतं. इथं एक विशेषण दिसतं... सुरवरईश्वरवरदा. सुरवरांनाच काय म्हणजे देवतांनाच काय तर ईश्वरालाही वर देणारी, शक्ती प्रदान करणारी अशी जी कुणी ती ही शक्ती आहे. तिची ही आरती आहे. असं काही असतं का हो? थोडं मागं जाऊ. कुठंच काहीच्च नव्हतं तेव्हा! कधीतरी काहीतरी हालचाल झाली नि सृष्टी निर्माण झाली. चराचराची व्यवस्था अत्यंत पारदर्शकपणं चालवली जाणारी व्यवस्था म्हणजे ईश्वर. तो सृष्टीबरोबर उत्पन्न होतो नि तिच्याबरोबरच लय देखील पावतो. मानवी आयुष्याच्या तुलनेत अत्यंत प्रचंड मोठ्या 'स्केल'वर हे सगळं सुरु असतं. त्यामुळं मानवी मनाला त्याचा विचार तेवढ्या मोठ्या पातळीवर करताना तसाच व्यापक विचार करावा लागतो. अद्वैत तत्त्वज्ञानामध्ये काहीच नाही म्हणताना देखील त्या नाहीमध्ये असणारं अस्तित्व (काहीच नाही म्हणजे निर्वात पोकळी तरी 'आहे' ना?) म्हणजे ब्रह्म तत्त्व नि त्या खालोखाल वर म्हटलेली हालचाल ती मूळमाया. तिच्यातून उत्पन्न गुणमाया मग जडमाया नंतर त्रिविधा प्रकृती, पंचमहाभूते असा क्रम आहे. खरंच थोडा विचार केला तर विज्ञानाला समांतर असा हा विचार आहे. (बाकी मतांतराला वाव आहेच.) ज्या शक्तीमुळे ईश्वराला कार्य करण्याचं बळ मिळतं, त्या त्या अनुरुप कार्य करणार्‍या देवतांना (कार्यानुसार नाव ब्रह्मा, विष्णू, महेश नि इतर ) ताकद मिळते (उत्पत्ती- निर्माण करणं, स्थिती- सांभाळणं नि लय- संहार करणं) त्या सगळ्याचा विचार आपल्याला एका 'सुरवरईश्वरवरदा' ह्या शब्दातून करता येतो. तिला आपण मानवानंच माऊलीरुप, मातारुप मानून तिची पूजा करता यावी म्हणून सगुणात आणली. इतकं सगळं कार्य दोन हातातून करता येणं शक्य थोडीच आहे असा विचार करुन तिला अष्टभुजा बनवली नि तिच्या प्रत्येक हातात एक एक वस्तू दिली. पाकिटात असलेला कागदाचा फोटो जसा आपल्या आईवडलांची आठवण करुन देतो तसं ही मूर्ती मला त्या भगवद्शक्तीची आठवण करुन देणारी असली पाहिजे. आणखी एक शब्द आहे महिषासुरमर्दिनी. वर म्हटल्याप्रमाणं पुराणात कधीतरी एक महिषासुर नावाचा राक्षस सगळ्यांना त्रास देत होता नि त्याला देवीनं मारलं. आपण देवीचा जयजयकार म्हणून गप्प बसावं का? की ह्या महिषासुराचा नि माझा काही संबंध आहे का? तर ह्याचं उत्तर आहे असं आहे. महिष म्हणजे रेडा. रेडा हे घोर अज्ञानाचं प्रतिक आहे. अज्ञान म्हणजे अशिक्षितपण, अक्षरओळख नसणे. शालेय अभ्यास नसणं ह्या अर्थानं अज्ञान नाही. तर मी कोण? माझं जन्माचं प्रयोजन काय? ध्येय काय? ते समजण्यासाठी काय करावं लागतं? ह्या सगळ्याबद्दलची जाणीव नसणे म्हणजे अज्ञान. त्या दृष्टीकोनातून बरेच लोक अज्ञानी ठरतात. इथं आपण त्रागा करु शकण्याची दाट शक्यता आहे. मात्र ही वस्तुस्थिती आहे. जगण्याची उद्दिष्टं अनेक असू शकतात, ती वेळेनुसार, कालानुरुप बदलू शकतात, बदलावीत. मात्र ध्येय एकच असावं ते म्हणजे आत्मशोध. मी नक्की कोण आहे नि काय मिळवायचंय ह्याचा विचार करुन त्याचा पाठपुरावा करणं हे माणसाच्या आयुष्याचं ध्येय आहे. (शब्दांची अदलाबदल केली 'एक्स' ला वाय नि वाय ला एक्स म्हटलं तरी चालू शकेलच. अर्थ बदलत नाही) तर अशा ह्या अज्ञानरुपी रेड्याला मारुन आपल्यामध्येच आत असणारी ही दुर्गामाता आपल्याला प्रसन्न होऊ शकते. त्या दृष्टीनं 'महिषासुरमर्दिनी' ह्या नावाचा विचार करण्याची गरज आहे. वरच्या शब्दांचा पुरेपूर अर्थ समजला की पुढची आरती समजायला मदत होते. देवीला दुर्गा म्हणताना ह्या प्रपंचाला, संसाराला दुर्घट असं म्हटलेलं आहे. दुर्ग म्हणजे किल्ला नि दुर्गा म्हणजे त्याची किल्लेदार अशा अर्थानंही विचार होतो. ज्याप्रमाणं एखाद्या कारागृहाचा प्रमुख असतो तशी जणू ही दुर्गा आहे नि हा जो संसार रगाडा आहे तो म्हणजे कारागृह आहे. बाहेर पडायचं तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे किल्लेदारालाच पटवणे, त्याच्या मर्जीतलं बनणे. म्ह्णून म्हणतात, दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ... तुझ्या कृपेशिवाय हा संसाराचा भार खूप अवघड आहे. अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी... इथं पुन्हा थांबायची गरज आहे. काय आहेत हे शब्द? अनाथनाथ अंबा म्हणजे कुणी अनाथाश्रम उघडलेली एन जी ओ नाही! खरंतर, कोण अनाथ आहे? करुणा म्हणजे काय? विस्तारी म्हणजे? आहे का मुळात करुणा? विस्तारी म्हणजे विस्तार कर, वाढव म्हणजे काय? इथं थोडा पारमार्थिक विचार आहे. 'तुझिया वियोगे जीवित्व आले' असं समर्थ रामदास म्हणतात. अत्यंत आनंदाचा, सुखाचा अनुभव हेच ज्याचं स्वरुप आहे असा मी, मूळस्वरुपाला विसरलो नि जीवभाव घेऊन जन्म पावलो. एखाद्या अत्यंत श्रीमंत, यशस्वी माणसाचा मुलगा अपघातात स्मृती घालवून बसल्यानं भीक मागू लागतो तसा मी खरा आतमध्ये आनंदरुपच असताना सुखासाठी बाहेरच्या सुखांच्या मागं लागतो नि 'अनाथ' बनतो. काल सचिन रिटायर झाला. क्रिकेट तेच, खेळ तोच, नियम तेच पण मला आता आनंद वाटेना. सुख खेळात आहे की माझ्या बघण्यात? मी रानावनात अडकून बसलोय, मला प्रचंड भूक लागलीये नि समोर एक सुंदर स्त्री मला आलिंगन द्यायला येतेय. सुख वाटेल? तीच गोष्ट दुसरीकडून. एका अत्यंत गरीब नि ओबड्धोबड दिसणार्‍या झोपडीत मला शिळी भाकरी नि चटणी मिळाली तर मला ती अत्यंत चांगली वाटेल. सुख नक्की कुठं आहे नि ते कसं मिळेल हे न समजल्यानं मी अनाथ, पोरका, दीनवाणा झालो आहे. अशा अनाथांची नाथ अशी ही अंबा आपली करुणा विस्तारुन मला पदरात घेऊ दे. करुणा उत्पन्न करुन का नाहीत म्हणत हो? कारण करुणा आधीपासूनच आहे आपल्या लक्षात येत नाहीये. एका बीजापोटी उत्पन्न होणारी अनेक कणसं माणसाच्या आवाक्यातलं काम नाहीये ना? हीच ती करुणा. जगण्याला आवश्यक प्रत्येक गोष्ट ह्याच पृथ्वीवरुन आपण हजारो वर्षांपासून घेत आलेलो आहोत. आजचं चकचकीतपण आपल्याला ते विसरायला भाग पाडतंय एवढंच. ह्या 'एकोऽहम बहुस्याम' च्या प्रक्रियेमागं नक्की काय दडलंय हे रुक्षपणे जाणून घेण्यातून साध्य काय होणार आहे? त्यापेक्षा त्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली तर आपला अहंकार तरी कमी होईल. पुढं जाऊन 'वारि वारि जन्ममरणाते वारि हारि पडलो आता संकट निवारी' असं म्हणतात. पुन्हा तेच आहे. वारि वारि म्हणजे हे माते तू ह्याचं निवारण कर. हारि पडलोय- कंटाळलोय. संकटाचं निवारण कर. जन्माला आल्यापासून आपण काय किंमत देऊन काय कमावतो ह्याचा विचार करता 'सुख कमी नि दु:ख जास्त' असाच विचार पक्का होतो. मिळणार्‍या सुखामागे देखील किती कष्ट असतात ह्याचा विचार करता हे कधीतरी संपावं हा 'वास्तववादी' विचार डोकावल्यावाचून राहत नाही. त्यामुळंच ह्या जन्ममरणाच्या फेर्‍यातून सोडव ही विनंती करावी लागते. मात्र जेव्हा विनंतीच्या मागे; काय विनंती, कुठं करायची, नि कशी करायची हा नेमका विचार असेल, तेव्हा त्या विनंतीचा निश्चितच पाठपुरावा होतो नि जे मिळवायचं ते मिळवलं जातं. गणपतीच्या आरतीत म्हटल्याप्रमाणं अशी भगवंताच्यी, शक्तीच्या निश्चित रुपाची मांडणी समोर आली की माणूस निर्भय बनतो नि त्याला संकट हे संकट ह्या स्वरुपात न वाटल्यानं ते आपोआप निवारलं जातं. दृष्टीकोनच बदलून जातो. पुढच्या कडव्यांमध्ये बरीचशी वस्तुस्थिती, थोडासा अर्थवाद नि स्तुती आहे. 'त्रिभुवनी पाहता तुज ऐसी नाही, चारी (वेद) श्रमले परंतु (त्यांना तुझ्याबद्दल) न बोलवे काही, साही (शास्त्रं) विचार करुन करुन (जणू प्रवाह)पतित झाले , (अशी) ते तू भक्तालागि पावसी लवलाही.' आज देखील 'विज्ञान' (तंत्रज्ञान नव्हे) सृष्टीच्या उत्पत्तीचा, त्या मूळ शक्तीचा मूलगामी विचार करत आहे. थांगपत्ता लागायला अजूनही तयार नाही. त्याच अनुषंगानं चारी वेद, साही शास्त्रे वर्णन करु शकत नाहीत असं मानलं गेलं आहे. मात्र अशी तू भक्तासाठी मात्र तातडीनं धावून येतेस. अट 'भक्त' असण्याची आहे. प्रसन्न वदन अशा हे देवी तू आम्हाला प्रसन्न हो. संसारक्लेषापासून सोडवून, भवपाश तोड. इथं परत थांबावं लागतं. त्रागा करुन सोडव म्हणणं आहे की मोकळं कर? भवपाश तोड म्हणजे एखादा दोर कुर्‍हाडीने तोडल्यासारखं तोड असं आहे का? तर ह्या भवपाशाचं स्वरुप जेव्हा समजेल तेव्हा त्याचक्षणी गळून पडणारा अशा स्वरुपाचं आहे. समजायला थोडं अवघड वाटतं मात्र उदाहरणानं समजेल. एखाद्या बैलाला अथवा गाढवाला लहानपणापासून एखाद्या खुंटीला दोरीनं बांधलं तर तो सुटून जाण्याचा प्रयत्न सुरुवातीला करत करत नंतर दोरी नि खुंटी दिसली की शांत उभं राहून प्रयत्न टाळतो. तसं सातत्यानं 'माझेपणा' नि 'मी' पणाच्या दोरांनी माणूस इतका अडकला जातो की ते बंधन, तो पाश सुटता सुटत नाही. एक घर आगीत भस्म झाल्याची बातमी येते, आपण शांत असतो, शहराचं नाव ऐकलं की कान टवकारतात, विभाग ऐकला की चौकशी सुरु होते नि माझाच पत्ता ऐकला की धक्का बसतो, अन्नपाणी सुटतं. माझेपणा आला की प्रतिक्रिया येते नि ती तशी आली की बंधन आलंच. बातमी तीच, मात्र प्रतिक्रिया बदलली. प्रतिकूलसंवेदनात दु:खम. पश्चातबुद्धीनं परिस्थिती नियंत्रणाबाहेर जायला आपण जास्तच कारणीभूत ठरतो. मात्र देवीच्या भक्त म्हणवणारानं असं असून चालत नाही. सगळ्या सृष्टीच्या निर्मात्याला निर्माण करणारी अंबा, दुर्गा, भवानी माता ही जर माझं आराध्य दैवत असेल तर एका घराच्या जाण्यानं असं काय हळहळ करायची? ते तसं माझ्याच बाबतीत का होतं ह्याचा विचार कर्माचा सिद्धांत ह्या एका 'अझम्शन' ने सुटतो. इथं लक्षात घ्यावं की दुसर्‍याच्या नावानं खडे फोडण्यात आपला मनस्ताप वाढतो, तसं न करता'योग्य निर्णय घेऊन आपल्यावर आलेला कुठलाही प्रसंग आपल्या कर्माच्या फळाच्या स्वरुपात आला असं मानणं व्यावहारिक शहाणपणाचं ठरतं. इथं कुठलाही निराशावाद नाही. हा कर्माचा विचार नि बरोबरच मी आनंदरुप असल्याचा विचार हे 'गणितं' सोडवण्यापुरते वापरावेत नि नंतर अलगद बाजूला सारावेत. असं हळूहळू करत गेलं की आपोआप पाश सुटतात. भव म्हणजे संसार. नि अशा प्रकारे भवपाश सोडवायला अंबा मदत करते. अशा ह्या जगद्जननी अंबेच्या चरणी तद-लीन,तल्लीन होण्यामध्ये खरं भूषण आहे. १. हे असं नेमकं कसं होतं त्याबद्दल सर्व संतांचे पाय पकडावे लागतात. २. ऋणनिर्देश : डॉ. श्री. द. देशमुख ह्यांचे प्रवचन.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
संस्कृती
धर्म
मुक्तक
व्युत्पत्ती
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
शुभेच्छा
मत
संदर्भ

प्रतिक्रिया द्या
45501 वाचन

💬 प्रतिसाद (123)

प्रतिक्रिया

मला प्राण्यांची नावे आवडत

निराकार गाढव
Sat, 10/12/2013 - 01:06 नवीन
मला प्राण्यांची नावे आवडत नाहीत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

भारी....

मुक्त विहारि
Sat, 10/12/2013 - 13:27 नवीन
ह ह लो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निराकार गाढव

काय हे

अनिरुद्ध प
Fri, 10/11/2013 - 17:14 नवीन
प्यारे काका, आता तुम्हीच असे हतोत्साहित होउन पुढील लिखाण बन्द करणार का? हे काही बरे नव्हे अहो आम्च्यासार्खे सामन्य लोकाना हा विषय एव्हड्या सोप्या भाषेत सान्गणे हे अत्यन्त कठीण काम आपण खूप उत्तम करत आहात तेव्हा कोणाच्या प्रतिक्रीया काहिही असोत्,आमच्यासाठी तुम्हाला लेखन हे करावेच लागेल्,वर कोणी सान्गितले आहे ती श्री दत्त महाराजन्ची आरती आता श्रीदत्त जयन्तीच्या मुहुर्तावर धागा होउन जाउदे,अशी तुम्हास नम्र विनन्ती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

साहेब,

प्यारे१
Fri, 10/11/2013 - 19:17 नवीन
साहेब, मी माझं लिखाण बंद केलेले नाही, इतक्यात करेन असं वाटत नाही. वरील लेखात आपल्याला काही अडचण वाटत असेल तर जरुर सांगा. माझ्या कुवतीनुसार उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. दत्तात्रेयांच्या आरतीबद्दल निश्चितच लिखाण करण्याचा प्रयत्न करेन. अवांतरः काय ना मी अल्जिरियाला असतो. (जाहिरात नाही) निघताना कधी मुंबईवरुन निघतो कधी पुण्याहून. कधी दुबईमार्गे, कधी कतार मार्गे, कधी जॉर्डन, इस्तंबूल, इजिप्त असे बरेच मार्ग आहेत. कधी थेट, कधी व्हाया. समुद्रमार्गे आलो नाही कधी पण कुणास ठाऊक कधी वेळ पडलीच तर ते ही होईल. तसाही मार्ग आहे. सगळे मार्ग पोचवतात हो! मागच्या वेळी मुंबईमध्ये एकजण भेटला. म्हणाला दुबईमार्ग हाच बेस्ट मार्ग. दुसरा मार्ग चुकीचाच आहे. अल्जिरियाला पोचतच नाही. प्लेन भारी, सुविधा भारी, एअर होस्टेस भारी सगळं भारी नि हे सगळं दुबईमार्गेच भारी. मी म्हणालो 'बरं'. नंतर समजलं तो कधी असा प्रवास केलेला प्रवासी नव्हताच मुळी. कधीतरी स्वप्न पडलेलं म्हणतात! मी त्याला देखील 'बरंच' म्हणालो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

हा हा हा

अनिरुद्ध प
Fri, 10/11/2013 - 19:33 नवीन
पु ले शु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

देव कोपतो अथवा रागावतो ह्या

प्यारे१
Fri, 10/11/2013 - 19:47 नवीन
देव कोपतो अथवा रागावतो ह्या कल्पनेसारखी खुळचट कल्पना नाही. वर लेखामध्ये असं काहीही म्ह्टलेलं नसताना संजय क्षीरसागरांनी कसं काय हे विधान ह्यामध्ये आणलं ते समजत नाही. महिषासुरमर्दिनीचा देवता म्हणून हात असू शकत नाही कारण कधीतरी सुरु झालेल्या कर्माच्या चक्रामध्ये आपण अपरिहार्यपणे अडकलेलो असतो नि वासनांनुसार कर्म नि पुन्हा कर्माचं फळ म्हणून नवीन वासना असं चक्र सुरुच राहतं. इथे ही ईश्वर म्हणून कार्य करणारी एक व्यवस्था म्हणून बघावी लागते. दुसरीकडं देवता म्हणून बघताना त्या देवतांना एकेका शक्तीचं उपास्य म्हणून बघितलं जातं नि त्या दृष्टीतून देवीला आठ हात दिलेले आपल्याला दिसून येतात. इथं देवीचा सगुणावतार अपेक्षित आहे. प्रतिमा, सगुणावतार, ईश्वर नि ब्रह्म असे चार प्रकार मानले आहेत. संजयजी उपलब्ध लोकशाहीतल्या विचारस्वातंत्र्याचा तरी आदर बाळगावा माणसानं. थोडा जरी वेगळा विचार केला तरी अगदीच गाढव समजू नये माणसाला. नाई का? थोडक्यात पण महत्त्वाचं. ही उपासनापद्धत असो की आणखी कुठलीही. तिचा वापर करुन जर माणसाला 'रिझल्ट' हाती येत नसेल तर तिचा काडीमात्र उपयोग नाही. सुख, समाधान, शांती, तृप्ती ही त्या प्राप्तव्याची चिन्हं आहेत, लक्षणं आहेत. ह्यातलं एक जरी नसेल तरी काही मिळायचं , मिळवायचं बाकी आहे असं मानावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

देव कोपतो अथवा रागावतो?

संजय क्षीरसागर
Sat, 10/12/2013 - 10:47 नवीन
>देव कोपतो अथवा रागावतो ह्या कल्पनेसारखी खुळचट कल्पना नाही. वर लेखामध्ये असं काहीही म्ह्टलेलं नसताना संजय क्षीरसागरांनी कसं काय हे विधान ह्यामध्ये आणलं ते समजत नाही. = तुम्ही काय लिहीलंय ते वाचलंत बरं होईल :
एक घर आगीत भस्म झाल्याची बातमी येते, आपण शांत असतो, शहराचं नाव ऐकलं की कान टवकारतात, विभाग ऐकला की चौकशी सुरु होते नि माझाच पत्ता ऐकला की धक्का बसतो, अन्नपाणी सुटतं. माझेपणा आला की प्रतिक्रिया येते नि ती तशी आली की बंधन आलंच. बातमी तीच, मात्र प्रतिक्रिया बदलली. प्रतिकूलसंवेदनात दु:खम. पश्चातबुद्धीनं परिस्थिती नियंत्रणाबाहेर जायला आपण जास्तच कारणीभूत ठरतो. मात्र देवीच्या भक्त म्हणवणारानं असं असून चालत नाही. सगळ्या सृष्टीच्या निर्मात्याला निर्माण करणारी अंबा, दुर्गा, भवानी माता ही जर माझं आराध्य दैवत असेल तर एका घराच्या जाण्यानं असं काय हळहळ करायची? ते तसं माझ्याच बाबतीत का होतं ह्याचा विचार कर्माचा सिद्धांत ह्या एका 'अझम्शन' ने सुटतो. इथं लक्षात घ्यावं की दुसर्‍याच्या नावानं खडे फोडण्यात आपला मनस्ताप वाढतो, तसं न करता'योग्य निर्णय घेऊन आपल्यावर आलेला कुठलाही प्रसंग आपल्या कर्माच्या फळाच्या स्वरुपात आला असं मानणं व्यावहारिक शहाणपणाचं ठरतं. इथं कुठलाही निराशावाद नाही. हा कर्माचा विचार नि बरोबरच मी आनंदरुप असल्याचा विचार हे 'गणितं' सोडवण्यापुरते वापरावेत नि नंतर अलगद बाजूला सारावेत.
= तुम्ही कुणाला उल्लू बनवतायं? एकीकडे म्हणायचं देव सगळ्याचं कारण आहे आणि फटका बसला की ती आपल्या कर्माची फळं?
महिषासुरमर्दिनीचा देवता म्हणून हात असू शकत नाही कारण कधीतरी सुरु झालेल्या कर्माच्या चक्रामध्ये आपण अपरिहार्यपणे अडकलेलो असतो नि वासनांनुसार कर्म नि पुन्हा कर्माचं फळ म्हणून नवीन वासना असं चक्र सुरुच राहतं. इथे ही ईश्वर म्हणून कार्य करणारी एक व्यवस्था म्हणून बघावी लागते.
= म्हणजे मग कर्मप्रक्रिया नक्की कुणी सुरु केली? तुम्ही की महिषासुरमर्दिनीनी? आणि मूर्ख कुणाला बनवतायं? वासना? कसली वासना? कुणी निर्माण केली वासना? घर बांधलं किंवा घेतलं ही वासना? आणि ते भस्म झालं तर आपल्या वासना चक्राचं फळ? मग काय करायचं? उघड्यावर राहायचं? तुम्हाला तुम्ही काय लिहीतायं ते समजतंय का? एकीकडे म्हणायचं ईश्वर ही कार्य करणारी व्यवस्था आहे आणि स्वत:चं घर भस्मीभूत झाल्यावर म्हणायचं ते आपल्या कर्माच फळ आहे.
दुसरीकडं देवता म्हणून बघताना त्या देवतांना एकेका शक्तीचं उपास्य म्हणून बघितलं जातं नि त्या दृष्टीतून देवीला आठ हात दिलेले आपल्याला दिसून येतात. इथं देवीचा सगुणावतार अपेक्षित आहे. प्रतिमा, सगुणावतार, ईश्वर नि ब्रह्म असे चार प्रकार मानले आहेत.
= कल्पनेला अंत कुठे आहे? आठ काय आठरा हात द्या आणि सगुणाचे चार काय चारशे प्रकार माना. शब्द तुमचे आणि कल्पनाही तुमच्या!
संजयजी उपलब्ध लोकशाहीतल्या विचारस्वातंत्र्याचा तरी आदर बाळगावा माणसानं. थोडा जरी वेगळा विचार केला तरी अगदीच गाढव समजू नये माणसाला. नाई का?
= तुम्ही माझ्या लेखांवर इतके भंपक प्रतिसाद दिलेत तरीही केवळ तुमच्या पहिल्या प्रतिसादाला मान देऊन मी लिहायचा थांबलो होतो याची दखल घ्या. माझ्याबाजूनं विषय मिटला होता. आता तुम्ही पुन्हा सुरुवात केली आहे.
थोडक्यात पण महत्त्वाचं. ही उपासनापद्धत असो की आणखी कुठलीही. तिचा वापर करुन जर माणसाला 'रिझल्ट' हाती येत नसेल तर तिचा काडीमात्र उपयोग नाही. सुख, समाधान, शांती, तृप्ती ही त्या प्राप्तव्याची चिन्हं आहेत, लक्षणं आहेत. ह्यातलं एक जरी नसेल तरी काही मिळायचं , मिळवायचं बाकी आहे असं मानावं.
= काय ज्योक मारतायं? तुमची स्वत:ला उल्लू बनवण्याची मेथड आणि ही प्रक्रिया :
असं हळूहळू करत गेलं की आपोआप पाश सुटतात. भव म्हणजे संसार. नि अशा प्रकारे भवपाश सोडवायला अंबा मदत करते. अशा ह्या जगद्जननी अंबेच्या चरणी तद-लीन,तल्लीन होण्यामध्ये खरं भूषण आहे.
जर शांती आणि समाधान देईल असा भ्रम असेल तर तो महिषासुरमर्दिनी या भ्रामक कल्पनेनी तुम्ही स्वत: भोवती विणलेला कोष आहे. अशी कुणीही देवी नाही आणि कोणत्याही प्रसंगात ती काहीही मदत करत नाही. या आरत्या वगैरे करुन फक्त वेळ जातो आणि भ्रम सघन होण्यापलिकडे काहीही होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

जाऊ द्या हो संजयजी.

प्रचेतस
Sat, 10/12/2013 - 11:06 नवीन
जाऊ द्या हो संजयजी. ही घ्या तुम्हाला पण अजून एक महिषासुरमर्दिनी Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मस्तच!

पैसा
Sat, 10/12/2013 - 11:41 नवीन
तो सिंह कोणाला चावतो आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सिंव्ह चावत नस्तो

अभ्या..
Sat, 10/12/2013 - 11:54 नवीन
मण्यार, फुरसे आणि घोणस चा प्रभाव उतरला नाही का अजुन? सिंव्ह चावत नस्तो, फाडून खातो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अबे

पैसा
Sat, 10/12/2013 - 11:56 नवीन
आधी चावल्याशिवाय फाडून खाणार कसा डायरेक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

महिषा सुराच्या एका रक्षकाला .

प्रचेतस
Sat, 10/12/2013 - 11:56 नवीन
महिषा सुराच्या एका रक्षकाला .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

@ वल्ली : जाऊ द्या हो संजयजी....

संजय क्षीरसागर
Sat, 10/12/2013 - 14:04 नवीन
चला सोडून देऊ! पण तुम्हा भक्तीमार्गीयांशी संवाद साधताना एक ज्योक आठवतो त्यानं सांगता करतो : एकदा पंडित जवाहरलाल नेहरु एका मेंटल हॉस्पिटलला भेट द्यायला जातात. तिथला अधिकारी सर्वांना ओळख करुन देतो : " आज भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आपल्या हॉस्पिटलला भेट द्यायला आलेत." एक त्यातल्या त्यात समंजस पेशंट शांतपणे उठून पंडितजींजवळ जातो आणि विचारतो " नांव काय म्हणालात सर आपलं?" नेहरू चकित होतात आणि म्हणतात " मी पंडित जवाहरलाल नेहरु!" यावर तो अत्यंत समजावणीच्या सुरात म्हणतो : " काही हरकत नाही, मी पण सुरुवातीला असंच म्हणायचो.... आता आलात ना इथे, व्हाल बरे हळूहळू!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हाहा.

प्रचेतस
Sat, 10/12/2013 - 15:23 नवीन
हाहा. बाकी मी भक्तिमार्गी असे तुम्हांस कोणी सांगितले ब्वा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

नाही का? उत्तम!

संजय क्षीरसागर
Sat, 10/12/2013 - 15:54 नवीन
मग माझ्या मार्गला
`मी' मार्ग असे म्हणतात
हा गैरसमज काढून टाका. तो `मी' व्यक्तिगत नाही सार्वत्रिक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अहो ते मी तुमच्याबद्दल कुठे

प्रचेतस
Sat, 10/12/2013 - 16:22 नवीन
अहो ते मी तुमच्याबद्दल कुठे म्हटलंय??? साक्षात भगवंतानं गीतेत सांगितलय ते. त्याचं झालं काय की त्याने अर्जुनाला आधी सांख्य योग सांगितला, त्याने काही विचार्‍या अर्जुनाचं समाधान होईना, मग सांगितला कर्मयोग तरी अर्जुनाच्या शंका आल्याच परत. मग त्या बिचार्‍याने त्याला ज्ञानकर्मसंन्यासयोग समजावून सांगितला तरी त्या अर्जुनाला कैच समजेना. अहो मग त्या कृष्णाने एकेक करत त्याला ध्यान योग, ज्ञान विज्ञान योग, अक्षर ब्रह्म योग, राजविद्या-राजगुह्य योग असे अजूनही कितीक योग समजावून सांगितले पण त्या अर्जुनाच्या टकुर्‍यात कायबी शिरंना. मग विश्वरूप दाखवून झालं तरी ह्याच्या शंका अजूनही आहेतच. तरी अजूनही तग धरून त्या भगवंताने मग भक्तीयोग, पुरुषोत्तम योग वैग्रे समजावून सांगितले तरी अर्जुन आपला ठोकळयासारखा तसाच. मग वैतागला तो विचारा कृष्ण, तो तरी किती अजून सहन करणार. मग शेवटी दाखवलान् त्याला 'मी' मार्ग. तेव्हा कुठे समाधान झालं त्याचं. मग तो अर्जुन म्हणाला बघा नष्टो मोह: स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत । स्थितोऽस्मि गतसन्देह: करिष्ये वचनं तव ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

बिच्चारा!

पैसा
Sat, 10/12/2013 - 16:39 नवीन
त्या कृष्णाला हातपाय गाळून बसलेल्या अर्जुनाला कसाही युद्धाला उभा करायचा होता, म्हणून "सगळं माझ्यावर सोडून दे" म्हणाला. त्याला जर माहिती असतं की काही हजार वर्षांनी मिसळपाव नामक संस्थळावर त्याचा असा उपयोग होईल, तर तोच म्हणाला असता ना,
पार्थ म्हणे 'गा हृषीकेशी | या युद्धाची ऐशीतैशी बेहेत्तर आहे मेलो उपाशी | पण लढणार नाही ! धोंड्यात जावो ही लढाई | आपल्या बाच्याने होणार नाही समोर सारेच बेटे जावाई | बाप, दादे, काके काखे झोळी, हाती भोपळा | भीक मागूनि खाईन आपला पण हा वाह्यातपणा कुठला | आपसात लट्ठालठ्ठी या बेट्यांना नाही उद्योग | जमले सारे सोळभोग लेकांनो! होऊनिया रोग | मराना का! लढाई का असते सोपी? मारे चालते कापाकापी कित्येक लेकाचे संतापी | मुंडकीहि छाटती.'
http://www.misalpav.com/node/6610
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

(No subject)

प्रचेतस
Sat, 10/12/2013 - 16:40 नवीन
Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

भारी!

यशोधरा
Sat, 10/12/2013 - 17:00 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सर्व, ज्याच्या मर्जीविना

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 10/12/2013 - 17:28 नवीन
Image removed. सर्व, ज्याच्या मर्जीविना झाडाचे पानही हलत नाही त्याला ही चर्चा मिपावर २०१३ साली होणार याची गंधवार्ताही नाय म्हनल्याबद्द्ल तुमचा टीव्र णिशेढ ! उलट अश्या चर्चेने मिपाकराची पापे धुवून निघाली नाही (कारण त्याबाबत शंका आहे) तरी त्यांना खळखळून हसवून एकदोन क्षण त्या पापांच्याबद्दल होणार्‍या शिक्षेची आठवण विसरायला लावण्याची ही व्यवस्था खुद्द भगवंतांनीच केली आहे... (असे नारदमुनी मिपावर टंकताना स्वप्नात पाहिल्याचे अंधुकसे आठवते आहे).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अरे देवा!

पैसा
Sat, 10/12/2013 - 18:20 नवीन
तुम्ही पण भक्तीमार्गी का? छे: छे: कसं होणार या जगाचं........ *shok* *scratch_one-s_head*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

आम्हाला कोणताही सुमार्ग

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 10/13/2013 - 11:31 नवीन
आम्हाला कोणताही सुमार्ग वर्ज्य नाही... हॅ हॅ हॅ ... म्हणजे असं आहे की प्रत्येक मार्गाबद्दल आम्हाला येवढे यक्षप्रश्न पडतात की आमची अल्पबुद्धी त्यांची उत्तरे देऊ शकत नाही. पण तरीसुद्धा माझ्या मार्गाने न येणारे सगळेच चुकलेले वाटसरू आहेत असे नक्कीच वाटत नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

एक नक्की

पैसा
Sun, 10/13/2013 - 15:54 नवीन
तुम्ही आध्यात्मिक गुरू कधीच होऊ शकणार नाही. म्हणजे रिटायर झाल्यावर साईड बिझिनेसचा तो एक मार्ग बंद झालाय असं समजा! :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

छे, छे !!! आम्ही कसले गुरू...

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 10/13/2013 - 18:43 नवीन
छे, छे !!! आम्ही कसले गुरू... प्रश्नांची उत्तरे शोधतानाच रिटायर्ड व्हायच्या अगोदर टायर्ड व्हायला होतंय ! म्हणतातच ना की, "शास्त्रिय संशोधनाने मिळालेले प्रत्येक उत्तर १०० नवे प्रश्न बरोबर घेऊन येते." आमच्या नशिबी शेवटपर्यंत विद्यार्थी राहणेच आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अगदि अगदि

अनिरुद्ध प
Mon, 10/14/2013 - 11:55 नवीन
+१११ सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

काय रे

पैसा
Sat, 10/12/2013 - 16:18 नवीन
मूर्त्यांचे ढीगभर फोटो काढतोस आणि इथे आणून ओततोस, तेव्हा एक बारीकसा ढिस्क्लेमर टाकायला काय झाले रे तुला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

(No subject)

प्रचेतस
Sat, 10/12/2013 - 16:27 नवीन
:D Image removed. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

भगवदगीता इतक्या शॉर्ट अँड

धन्या
Sat, 10/12/2013 - 21:58 नवीन
भगवदगीता इतक्या शॉर्ट अँड स्वीट फॉर्ममध्ये कुण्णी म्हणजे कुण्णीच सांगितली नसेल. इस बातपे मी तुझ्यासोबत शाजीत पराठे खायला तयार आहे किंवा अगदी भुलेश्वरलाही यायला तयार आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कधी जायचे बे?

प्रचेतस
Sat, 10/12/2013 - 23:08 नवीन
कधी जायचे बे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

सांभाळून ! बिल कोण भरणार याचा

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 10/13/2013 - 11:33 नवीन
सांभाळून ! बिल कोण भरणार याचा उल्लेख नाहीय !!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

@संजय क्षीरसागर

अग्निकोल्हा
Sat, 10/12/2013 - 16:08 नवीन
Remembering such a joke while communicating with Bhakti-Maargi lokaa, is like sitting on a clock, to be on time...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

पांडुरंग पांडुरंग!

प्यारे१
Sat, 10/12/2013 - 12:55 नवीन
पांडुरंग पांडुरंग!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

प्यारेकाका तुमचाही वेळ जात

धन्या
Fri, 10/11/2013 - 19:51 नवीन
प्यारेकाका तुमचाही वेळ जात नाही का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आजचाच दिवस रे.

प्यारे१
Fri, 10/11/2013 - 20:02 नवीन
:) आजचाच दिवस रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

कल जुम्मा है ।

अभ्या..
Fri, 10/11/2013 - 20:08 नवीन
कल जुम्मा है । प्यारे का वीकेंड है । चुम्मेका वादा है । तो आजा आजा आजा आजा। . . प्यारे काकाचे टायमिंग जबरा . हाँय. :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

संजय,

अग्निकोल्हा
Fri, 10/11/2013 - 15:35 नवीन
"
आपल्यावर आलेला कुठलाही प्रसंग आपल्या कर्माच्या फळाच्या स्वरुपात आला असं मानणं व्यावहारिक शहाणपणाचं ठरतं.
व्हॉट इज कर्मा ? अ कॉझ दॅट हॅज नॉट फाउंड इट्स एफ्फेक्ट येट. आता हे कळालं असेल तर
म्हणजे यात महिषासुरमर्दिनीचा काहीएक हात नाही!
वोव, हे म्हणजे वस्तुमानाच्या वजनात गुरुत्वाकर्षणाचा काहीएक हात नाही मानण्याइतके अवैज्ञानीक आहे. हा शहाणपणा न्हवे, हे बघा तुम्हि शहाणे आहात.
इतकं सगळं कार्य दोन हातातून करता येणं शक्य थोडीच आहे असा विचार करुन तिला अष्टभुजा बनवली नि तिच्या प्रत्येक हातात एक एक वस्तू दिली.
या हातातिल विवीध वस्तुंमुळेच तिची कार्यओळख चटकन मनामधे स्थापित होते. फार सुरेख लिहलय.
याला म्हणतात गोलमाल लॉजिक. ते स्वचा उलगडाही होऊ देत नाही आणि भोंगळ विनम्रतेला निरहंकारिता म्हणून मिरवायला मदत करतं.
बोंबला! अनुभव घेण्याची क्षमता असलेली प्रणाली या पलिकडे "स्वतः" चा आणखि काही कोठे उलगडा अस्तित्वात आहे काय ? आता तो अनुभव काय असावा हे जाउदेना दुनियादारीत. तुम्हाला कशाला अनुभव अमुक अमुकच असावा तरच तो सत्य वगैरे वगैरे वर नियंत्रण हवय ? तुम्हि शहाणे आहात विसरु नका, हे फार महत्वाच आहे.
अर्थात, अशांचाच भरणा भारंभार असल्यानं पब्लिक भावभोळ्या आरत्या करून भवसागर पार होईल अशी आशा करतं.
पुन्हा सांगतो तुम्ही अनुभवाची सक्ति रेटु शकत नाही.. केवळ उदाहरण म्हणून म्हटलं तुम्हाला गाढवपणात आनंद आहे तर कोणाला मद्यपानात आहे, लता मंगेशकरला गाणे म्हणन्यात आहे तर कोणाला समागमामधे आहे कोणाला परिक्रमेमधे आहे कोणाला विपश्यनेमधे आहे कोणला कशाचे अन तुम्हाला शहाणपणाचे असे विवीध अनुभव हे उपभोगण्याची क्षमता असणे यालाच "मी" म्हणतात. थोडक्यात हा "मी" सक्तिरुप कधिही असता कामा नये. डों फर्गेट य आर जिनीअस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मान गये...

धन्या
Fri, 10/11/2013 - 15:45 नवीन
तुमचे प्रतिसाद वाचल्यानंतर आमचा सख्खा शेजारी आत्मशून्यची आठवण येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

हम्म!

अग्निकोल्हा
Fri, 10/11/2013 - 16:08 नवीन
कधि पुण्यात आलो तर मग त्याला नक्किच भेटेन. फारच मिजासखोर, घमंडी कार्ट आहे ते, असं कानावर आलयं, तो काय म्हणतोय हे म्हणे इतरांना कळतच नाही, अन त्यावेळी तर तो म्हणे त्याचे म्हणने/मानणे तर कधिच बदलत नाही, आता भेटला तर देतोच दोन टप्पू ठेवुन अन समजावतो त्याला सगळ्यासमोर गीता वाचलिच पाहिजे असा अट्टहास धरु नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

तुमचे प्रतिसाद वाचल्यानंतर आमचा सख्खा शेजारी आत्मशून्यची

संजय क्षीरसागर
Fri, 10/11/2013 - 16:22 नवीन
आठवण येते.
करेक्ट! झुली बदलल्या तरी बैल बदलत नाही!! आता हे वाक्य पाहा:
व्हॉट इज कर्मा ? अ कॉझ दॅट हॅज नॉट फाउंड इट्स एफ्फेक्ट येट.
इफेक्ट झालाच नसेल तर तो जाणीवेच्या कक्षेत कसा येईल? आणि ज्या गोष्टीची जाणीव नाही त्यासाठी करुणेची आरती कशाला करायची? स्वतःच्याच काय वाट्टेल तश्या व्याख्या करायच्या आणि काथ्या कुटत राहायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

करेक्ट! झुली बदलल्या तरी बैल

अग्निकोल्हा
Fri, 10/11/2013 - 16:33 नवीन
करेक्ट! झुली बदलल्या तरी बैल बदलत नाही!! आता हे वाक्य पाहा:
हा हा हा ! तुम्ही म्हणे एकेकेकाळी समान झुल बाळगणार्‍या दोन वेगवेगळ्या बैलांना चक्क एकच बैल समजुन बराच काळ जगत होता.. सरपंच व अख्या पंचायतीसमोरही हा दावा केला होता पण सत्य समोर आल्यावर पंचायत तुमची झाली होती हे कधि आलं नाही तुमच्या लिखाणात ? जगता तेच लिहता ना ?
इफेक्ट झालाच नसेल तर तो जाणीवेच्या कक्षेत कसा येईल? आणि ज्या गोष्टीची जाणीव नाही त्यासाठी करुणेची आरती कशाला करायची?
जाणिवेच्या कक्षेतील परिणामांकडे निव्वळ प्रक्रिया आहे म्हणून दुर्लक्ष करायला सांगुन स्वतः ३१ जुलैच्या भ्रामक कामात गुटुंन जाणार्‍यांना इफेक्ट झालाय हेच लक्षात येत नाही त्याला इफेक्ट झाला नाही कसे म्हणनार ?
स्वतःच्याच काय वाट्टेल तश्या व्याख्या करायच्या आणि काथ्या कुटत राहायचा.
तुम्ही शहाणे आहात, विसरु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

सन्जयजी

अनिरुद्ध प
Fri, 10/11/2013 - 18:18 नवीन
एक प्रष्ण आहे,आपल्या म्हनण्या प्रमाणे समजा असे मान्य करुया की भक्तिमार्ग भोन्गळ आहे,कर्म मार्ग सुद्धा त्याच तोडीचा आहे,योग मार्ग त्या बद्दल मी पूर्ण अज्ञानी आहे,मग आपला मार्ग कुठला आहे जो सहजसुन्दर आणि सर्वसमावेषक आहे?जो माझ्या सारख्या अतिसामान्य व्यक्तीने अवलम्बला म्हणजे त्याला 'स्व'चा बोध होइल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

त्याला 'मी' मार्ग असे म्हणतात

प्रचेतस
Fri, 10/11/2013 - 18:30 नवीन
त्याला 'मी' मार्ग असे म्हणतात. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच: ॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

वल्लीजी

अनिरुद्ध प
Fri, 10/11/2013 - 18:42 नवीन
असे एखाद्याला अडवुन त्यान्ची मते लाटण्याचा प्रयत्न करु नये,हा जर त्यानी आपल्याला वकिलपत्र (प्राणी तसेच पक्षीनामक आयडीला घाबरुन्)तर मात्र बोलणेच खुन्टले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

(No subject)

प्रचेतस
Fri, 10/11/2013 - 18:44 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

उत्तम

अनिरुद्ध प
Fri, 10/11/2013 - 12:25 नवीन
तसेच समयोचित विवेचन, एक प्रष्ण,हारी पडणे = कन्टाळणे का हार (पराजीत अवस्था) मानणे?
  • Log in or register to post comments

आपला अर्थ अधिक सयुक्तिक आहे.

प्यारे१
Fri, 10/11/2013 - 12:30 नवीन
आपला अर्थ अधिक सयुक्तिक आहे. कदाचित हरुन हरुन कंटाळलो असं म्हणू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

साष्टांग दंडवत.

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 10/11/2013 - 12:40 नवीन
प्यारे बुवा, साष्टांग दंडवत. आरती म्हणताना अर्थाकडे लक्ष द्यायला कुठे वेळ असतो? निम्म लक्ष प्रसादावर आणि बाकिचे..... जाउदे या पुढे निदान सुखकर्ता दुखहर्ता आणि दुर्गे दुर्गट या दोन आरत्या म्हणताना तरी तुम्ही शिकवलेला अर्थ लक्षात घेउन आरती म्हणु. अजुन एक आरती सुचवावीशी वाटते " त्रिगुणात्मक त्रैमुर्ती दत्त हा जाणा" बघा कधी जमेल तेव्हा.
  • Log in or register to post comments

मस्त...

पिशी अबोली
Fri, 10/11/2013 - 12:51 नवीन
मस्त... :) बाकी दुर्गेचे 'प्रसनावदना' रुप ऐकून मला आमच्या गोव्यातील 'शांतादुर्गे'चीच आठवण येते. शिव आणि विष्णू यांच्या युद्धात मध्यस्थी करणारी, त्यांना शांत करणारी शांतादुर्गा हे खरोखर मनोहर रुप आहे दुर्गेचे.
  • Log in or register to post comments

आई राजा उदे उदे

अभ्या..
Fri, 10/11/2013 - 13:07 नवीन
आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे येळकोट येळकोट घे. . . (सध्या फक्त तुळजापुरातील आईसमोरील दानपेटी घोटाळ्याने व्यथित) अभ्या :(
  • Log in or register to post comments

(सध्या फक्त तुळजापुरातील

बॅटमॅन
Fri, 10/11/2013 - 14:45 नवीन
(सध्या फक्त तुळजापुरातील आईसमोरील दानपेटी घोटाळ्याने व्यथित)
नक्की काय झालं रे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा