Skip to main content

इवलेसे रोप लावियले द्वारी...

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 18/05/2010 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मायबाप मिपाकरहो, 'इवलेसे रोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी...' हे असं झालंय बघा मिसळपावचं. मला आठवतंय, तीन वर्षापूर्वी मी आणि नीलकांतने या संकेतस्थळाच्या उभारणीस प्रारंभ केला. तेव्हा आम्ही दोघे आणि आमचे काही हितचिंतक एवढेच लोक होतो. नीलकांत तेव्हा उमेदवारीच्या दिवसांत होता. स्वतःचा संगणकही नाही अशी त्याची अवस्था. त्या काळात या मुलाने अक्षरशः नेट कॅफेत बसून या संस्थळाच्या उभारणीचे काम केले. यशस्विरीत्या संस्थळ चालू झाले. 'लोग मिलते गये कांरवा बनता गया' अशी मिपाची वाढ उत्तरोत्तर होत गेली. या सर्व काळात तो माझ्याबरोबर होता, अक्षरशः रात्रीचा दिवस करून मिपा सतत चालू राहिल याची काळजी त्याने घेतली आहे. आज मिसळपाव हा एक छोटासा मित्रांचा समूह न राहता एक विशाल परिवार झाला आहे. इथे आता असे अनेक समूह आहेत, जे गुण्यागोविंद्याने इथे नांदताहेत. इथे अनेक लेखक/लेखिका आहेत कवी/कवयत्री आहेत, इथे उत्तम विडंबक आहेत, उत्तम विश्लेषक आहेत, उत्तम प्रतिसादक आहेत. या सगळ्या लोकांनी निर्मिलेले अमूल्य असे साहित्य इथे आहे. ते वैविध्यपूर्ण आहे, ते अनुभवसंपन्न लोकांचे असल्याने ज्ञानदायक आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इथे खूप मोठा वाचकवर्ग आहे. तो समाजाच्या सगळ्या स्तरातून येणारा आहे. आज साधारण १०००० च्या वर सदस्यसंख्या आहे. सदस्यत्व न घेता वाचन करणारे अगणित आहेत. अशी घडी जमून येणे विरळाच. या सगळ्याचा आढावा घेतांना मला कोण आनंद होतोय हे सांगायला माझ्याकडे शब्द नाहीत. या सर्व गोष्टींमुळे आता यापुढे हे संस्थळ मी खासगी म्हणून चालवणे मला माझ्या वैयक्तिक प्राधान्यक्रमामुळे शक्य होत नाहीये. खरं तर मी मिसळपावला पुरेसा न्याय देऊ शकत नाहीये अशी माझी भावना होते आहे. मी नाही तर कोण? या प्रश्नाला अर्थातच 'नीलकांत' हे उत्तर आहे. किंबहुना हा त्याचा हक्कच आहे. यापुढे माझा बराचसा वेळ माझ्यासमोर असलेल्या अनेक अडचणींना तोंड देण्यात जाणार आहे. उरलाच काही वेळ तर तो मी माझ्या ललित लेखनावर आणि सांगीतिक लेखनावर खर्च करणार आहे. या मोठ्या आनंदाला मी मुकलो आहे. आणि म्हणूनच यापुढे मिपा व्यवस्थापनाकरता यापुढे माझ्याकडे वेळ नाही.. मध्यंतरीच्या काही काळात मी अडचणीत असल्यामुळे , 'मिपा परस्पर हडप कर', 'आपण मिपा चालवू..', 'मिपा आमच्या हातात दे..!' अश्या प्रकारच्या अनेक मानसिक त्रासांना नीलकांत सामोरा गेला..परंतु त्याचा मोठेपणा हा, की मिपाशी निगडीत कोणतीही गोष्ट त्याने मला न विचारता, माझ्याशी चर्चा न करता कधीही केली नाही व हितशत्रूंपासून मिपाला आजतागायत सुखरूप ठेवले.. आणि म्हणूनच या छोटेखानी लेखाद्वारे मिसळपावचे यापुढचे सर्व हक्कं मी नीलकांतच्या हातात सोपवीत आहे. मिसळपाव सर्वाधिकाराने मी त्याला देत आहे. मिसळपावशी माझे नाते संस्थापक म्हणून अर्थातच कायम राहिल, आणि तितकेच मला पुरेसे आहे, आनंददायक आहे. त्याच्याशी चर्चा करताना मिपाच्या ध्येयधोरणांविषयी, संपादन प्रक्रियेविषयी, भविष्यात मिपाचा ट्रस्ट स्थापन करण्याविषयी अनेकविध कल्पना त्याने मला बोलून दाखवल्या..या सर्व गोष्टी तो उत्तम रितीने पार पाडेल अशी मला खात्री आहे आणि त्याकरता त्याला माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद! सुजाण संपादकवर्ग हा आजवरची मिपाची अजून एक मोठी ताकद आहे. आपण नेहमीच मला मोलाचे सहकार्य केले आहे. त्याबाबद मी आपला ऋणी आहे. आपण असेच सहकार्य यापुढे नीलकांतला करावे ही नम्र विनंती. मी सुध्दा कायमच नीलकांतच्या मागे उभा राहिलो आहे तसाच यापुढे सुध्दा कायम असेन यात शंकाच नाही. मिपाच्या मालकीहक्काबाबतचे हे निवेदन शेवटचे. सदस्यांनी कृपया तारतम्याने या विषयावर चर्चा करावी. तात्या अभ्यंकर या व्यक्तीच्या व्यक्तिगत बाबींमुळे मिसळपाव या विशाल परिवाराच्या अस्तित्वाबद्दल अकारण चर्चा केली जाऊ नयेत असे मनापासून वाटते. हे निवेदन देतांना शब्दशः उर भरून येत आहे. मिसळपाव मोठे करत रहा त्याची काळजी घ्या, फार कष्टाने इथवर आले आहे हो ! 'मिपाधर्म वाढवा, मिपाधर्म जगवा!' इतकेच सांगणे! - आपलाच विश्वासू तात्या अभ्यंकर संस्थापक मिसळपाव डॉट कॉम
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 25690
प्रतिक्रिया 72

प्रतिक्रिया

In reply to by पक्या

एक सूचवावेसे वाटले - तात्यांनी संपादक मंडळात यावे.
अनेक धन्यवाद.. परंतु जमणार नाही असे नम्रपणे सांगू इच्छितो..एकदा एखाद्या गोष्टीवर पाणी सोडलं की सोडलं! तात्या.