✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !

ज
जॅक डनियल्स यांनी
Fri, 05/17/2013 - 03:54  ·  लेख
लेख
(मी पुण्यात असताना, सर्पोद्यानचे सहा वर्ष काम केले, तेंव्हाचे अनुभव संघटीत करून लिहित आहे. हा लेख पूर्वी (दोन वर्ष) माझ्याच कट्ट्यावर (ब्लॉग) प्रकाशित झाला होता, त्यानेच मी या अनुभवांची सुरुवात करत आहे.) आत्ता अमेरिकेमध्ये मला कोणी नवीन पुण्याचे भेटले की माझा त्यांना ठरलेला प्रश्न असतो "तुम्ही पुण्यात कुठे राहतात?" तुम्हाला वाटेल काय साधा प्रश्न आहे . पण तसं नाही. ते जेंव्हा उत्तर देतात तेंव्हा मी त्यांच्या शब्दांबरोबर पुण्याच्या रस्यावर फिरत असतो. ती पान टपरी,कोपऱ्यावरचे अमृततुल्य, आतला छोटा बोळ असे सगळे माझ्या डोळ्यासमोर दिसत असते."पुण्यातले पत्ते शोधणे " हा माझा छंद होता . कॉलेज मध्ये असल्या पासून साप पकडायला लागलो तेंव्हा पासून मला हा जोड छंद लागला. सर्पोद्यानात काम करायचो तेंव्हा त्यांच्या बरोबर साप पकडायला जायचो. तेंव्हा "पत्ता शोधणे " हा प्रकार काय आहे याची कल्पना नव्हती. ते काय प्रकरण आहे हे नंतर कळले. तुमच्या माझ्या सारखे ,आपले मित्र,नातेवाईक जास्तीतजास्त ऑफिस मधले मित्र यांच्या सोडून कुठे पत्ता शोधत नाही, किंवा आपल्याला गरज पण नसते. त्यामुळे माझी पण मजल पण सहकारनगर,पर्वती,सिंहगड रस्त्याचे काही भाग एवढ्याच ठिकाणी आणि ते पण मोठ्या सोसायट्या मध्येच होती. अश्या मोठ्या जागांचा पत्ता काय अगदी गुगल नकाशा वर पण सापडतो. आता जरा मुद्यावर येऊयात, लोकांच्या घरातील साप पकडण्यासाठी आधी त्या "घरी" पोचणे ते पण वेळेत हे सगळ्यात महत्वाचे होते. मला घरी फोन यायचा "अहो ते साप वाले आहेत का ? आमच्या घरी/बागेत/रस्त्यावर/गच्चीवर/स्वयंपाकघरात इ.भला मोठा साप आहे...तुम्ही ताबडतोब या":- ही अशी वाक्य ते एका दमात बोलायचे. मी तर जे हातात असेल ते सोडून पूर्ण जीव फोन मध्ये लावायचो. एका हातात पेन आणि मानेत फोन आणि माझा प्रश्न असायचा "साप कशात आहे ,मी पोहचेपर्यंत कोणाला पण जवळ जाऊ देऊ नका आणि सापावर लक्ष ठेवा. आत्ता सांगा पत्ता ?" ती वक्ती चालू व्हायची..."३२,मधुमालती बंगला,अप्पर इंदिरा नगर "..(जसं काय त्याचा बंगला शनिवारवाडा आहे!) मी पण माझा सगळ स्कील लावायचो: "व्ही-आई-टी पासून वरती आलो सरळ...मग उजवीकडे अप्पर इंदिरा ..ते पहिल्या कोपऱ्या वर किराणा तिकडून कुठे ?,डावीकडे का त्या तिरक्या आडव्या गल्लीत,...पण तिकडे तर कचराकुंडी आहे ..ठीक आहे, त्या कचरा कुंडी वरून उजवीकडे का? हा तिकडे एक बोलाईच्या मटणाचे दुकान आहे...आलो मी त्या दुकानापर्यंत मग पुढे..तिकडे तुमचा माणूस उभा करा आणि फक्त १० मिनिटे द्या मला मी आलो!" त्यांचा फक्त फोन नंबर घेऊन मी फोन ठेवायचो. हा पत्ता विचारताना मी स्मरणशक्तीला बेक्कार ताण द्यायचो आणि महत्वाच्या खुणा विचारायचो ( अभियांत्रिकीच्या परीक्षेला पण येवढा ताण कधी दिला नाही ;))पण एकडे सगळा प्रकारच वेगळा, तिकडच्या लोकांच्या डोळ्यासमोरची भीती मला एकडे दिसत असायची. हे सगळ जास्तीत जास्त २-३ मिनिटे चालायचे. माझ्या आईला तर आधी वाटायचे "काय झाल या पोराला ?" आमच्या घरी पाहुणे आले असतील तर अजूनच मजा, त्यांना हा प्रकार नवा असायचा . नंतर जे काय कपडे वरती असतील ते घालून साप पकडायची काठी आणि पिशवी घेऊन मी पुढच्या ५ मिनिटात घर सोडलेले असायचे. माझी सोपी खलाशी-पद्धत होती, की ज्या दिशेचा पत्ता असेल तिकडे गाडी भरदाव सोडायची. त्या साठी डोक्यात गणिते करून मी सिग्नल तोडायचो(डावी कडे वळण्यासाठी सिग्नल हि कवी कल्पना आहे ;)), गल्ल्यामधून जायचो, मामा-मामी चुकवायचो, फुटपाथ वरच्या हलत्याबोलत्या सुंदर गोष्टींकडे दुर्लक्ष करायचो इ. गाडीवर बसून ४ था गिअर पडेपर्यंत माझ्या डोक्यात एक ढोबळ नकाशा झालेला असायचा. माझा ठरलेला भाग म्हणजे एकडे बिबवेवाडी पासून स्वारगेट,लुल्लानगर-कोंढवा,निलायम पुलाखालचा सिंहगड रस्ता,सहकारनगर,पर्वतीपायथा...असा माझ्या घरापासून पासून १० किलोमीटरच्या परिघातील भाग. वरती लिहिल्या प्रमाणे स्वतःला त्या पत्याच्या दिशेला झोकून द्यायचो. कोपऱ्यावरच्या पानवाल्याला-किरणावाल्याला पत्ता विचार, कोणी क्रिकेट खेळत असेल त्यांना विचार, फेरीवाल्याला विचार, असे करून त्या सापपर्यंत मी जास्तीत जास्त १५ मिनिटात पोहोचायचो.(हे करणे लिहिले आहे तेवढे सोपे नाही ज्यांनी पुण्यात घर शोधायचा प्रयत्न केला असेल त्यांना कल्पना असेल.) आणि मग साप पकडून सर्पोद्यान गाठायचो ! (हे कसे करायचो आणि अनुभव दुसऱ्या पोस्ट मध्ये ). आपल्या इकडच्या लोकांना प्रश्न फार म्हणून मी कधीच सांगायचो नाही मी कशाला पत्ता शोधतो आहे. आजी-आजोबांना आणि सोसायटी मधल्या काकूंना कोणी नसलेच तर पत्ता विचारायचो कारण आधीच वेळ कमी असायचा आणि आजी-आजोबांना शंका फार.;) सुरवातीला-सुरवातीला खूप लोकांनी फिरवले नंतर एक लोकांचा ठराविक अंदाज येत गेला आणि मग चुका कमी झाल्या आणि साप जास्त मिळू लागले.(सापापेर्यंत पोचायला लागणारा वेळ आणि तो मिळणे हेय व्यस्त प्रमाण आहे : वेळ = १/साप मिळणे )खूप वेळा मला जनता वसाहत, आंबेडकर वस्ती, तळजाई वस्ती अश्या डोंगरावर असलेल्या वस्त्यामधून फोन यायचा. तिकडे तर सगळाच भुलभुलैय्या! अशा वेळी मग कामी यायच्या त्या जुन्या ओळखी. आधी कधी येऊन गेलो असलो तर तिकडचे खूप लोक ओळख ठेवायचे ते मला त्या वस्ती च्या रस्त्यापासून त्या आतल्या साप असलेल्या घरापर्यंत घेऊन जायचे. काय दृश्य असायचे ते ! माझ्या मागे कोणी तरी वाटाड्या बसलेला आहे आणि माझ्या गाडीच्या मागे १०-१२ चीलीपील्ली "सापवाला सापवाला" ओरडत पळत आहेत. असेच पत्ते शोधत आणि साप पकडत मी ३-४ वर्ष काढली नंतर एकडे आलो अमेरिकेमध्ये . आत्ता पत्ता शोधण्याची मजा राहिली नाही, काही झालं की जीपीएस निघते आणि पत्ता २ मिनिटात मिळतो. पण पुण्यातल्या रस्त्यांसाठी जीपीएस काही कामाचे नाही ... कारण आत्तापण मी डोळे बंद केले तर मी पुण्याच्या रस्त्यांवर पोहोचतो आणि जुने पत्ते शोधत राहतो.
  • एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !
  • एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ !
  • एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !
  • एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग.
  • एका गारुड्याची गोष्ट ६: नागपंचमी चे विदारक सत्य !
  • एका गारुड्याची गोष्ट ७: नाग: अंधश्रद्धेचा बळी !
  • एका गारुड्याची गोष्ट ८: नाग: माझे कॉलचे अनुभव
  • एका गारुड्याची गोष्ट ९: मण्यार: पडद्यामागचे कलाकार !
  • एका गारुड्याची गोष्ट १०: घोणस: गवतात लपलेला स्नायपर !
  • एका गारुड्याची गोष्ट ११: फुरसे: कोकणी धसका !
  • एका गारुड्याची गोष्ट १२: धामण: जुन्या ओळखीचा साप !
  • एका गारुड्याची गोष्ट १३: धामण: उंदराचा कर्दनकाळ !

Book traversal links for एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !

  • एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला ! ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
अनुभव

प्रतिक्रिया द्या
45151 वाचन

💬 प्रतिसाद (64)

प्रतिक्रिया

अहो जेडी

मी-सौरभ
Fri, 05/17/2013 - 18:55 नवीन
आता मिपावरील जालीय साप कसे हाताळायचे याचे प्रशिक्षण घ्या बरं का.... :)
  • Log in or register to post comments

+१ हे एक बाकी बरोबर!

आदूबाळ
Fri, 05/17/2013 - 23:12 नवीन
+१ हे एक बाकी बरोबर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

जैक डैनिअल्स यांनी दोन अवघड

कंजूस
Fri, 05/17/2013 - 19:03 नवीन
जैक डैनिअल्स यांनी दोन अवघड गोष्टी आत्मसात केल्या आहेत पुणेकरांच्या पत्त्यावर वेळेत पोहोचणे आणि सापाला पकडून आणणे . कितीही दूरचा प्रवास करून धडपड करून तुम्ही त्यांच्या दारात उभे राहाता तेंव्हा शेजारी ताक मागायला आल्यासारखे त्याचे थंडे स्वागत होते आणि पाचेक मिनीटात "पुढच्या वेळी वेळ काढून या हं" अशी प्रेमळ सुचना मिळते . मुळात पुणेकर एवढे प्रसिध्द असतात की जवळच्या 'चौकातला' इस्त्रिवालासुध्दा त्यांना नावाने ओळखत असतो ,त्यामुळे त्यांचा पत्ता विचारणे हा शुध्द अपमान आहे .
  • Log in or register to post comments

माझ्या कामासाठी मला

जॅक डनियल्स
Fri, 05/17/2013 - 20:22 नवीन
माझ्या कामासाठी मला 'साग्रसंगीत' आमंत्रण देऊन बोलावल्यामुळे जास्त अवघड प्रसंग माझ्या वर आले नाहीत. पण हे काही आले त्याचे वर्णन पुढच्या लेखांमध्ये येईलच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

जबार लिवलय.

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/17/2013 - 19:15 नवीन
जबार लिवलय. :) ============================================================= पत्ते शोधणार्‍याचा पत्ता कट करणं हे आपण पुणेकर असल्याचं लक्षण आहे. ;)
  • Log in or register to post comments

चिमट्याने साप पकडण्याचे आणि

कंजूस
Fri, 05/17/2013 - 21:40 नवीन
चिमट्याने साप पकडण्याचे आणि फक्त पंचवीस हजार किमिवरून लेख लिहिण्याचे धाडस कौतुकास्पद आहे .केवळ दोन चार विषारी सापांमुळे बाकीच्या सातशे पन्नासांना विनाकारण धोँडे खावे लागतात नाहितर टोपलीची हवा खावी लागते .बिचारे सापु .
  • Log in or register to post comments

लेख आवडला

किलमाऊस्की
Fri, 05/17/2013 - 21:49 नवीन
पुभाप्र.
  • Log in or register to post comments

जबरी !

तर्री
Fri, 05/17/2013 - 23:12 नवीन
आवडला.
  • Log in or register to post comments

मस्त आहे लेख!

अधिराज
Sat, 05/18/2013 - 12:11 नवीन
मस्त आहे लेख!
  • Log in or register to post comments

डावी कडे वळण्यासाठी सिग्नल हि

मालोजीराव
Mon, 05/20/2013 - 18:59 नवीन
डावी कडे वळण्यासाठी सिग्नल हि कवी कल्पना आहे
हि कवी कल्पना नाही असं ट्राफिकवाल्या मामा नि पावती फाडता फाडता सांगितल :P ( स्थळ : मार्केटयार्डपासून सिटीप्राईड कडे वळताना )
  • Log in or register to post comments

रोचक..

उपास
Mon, 05/20/2013 - 19:13 नवीन
साप पकडण्याचे अनुभव वाचण्यास उत्सुक. वरचा लेख 'पुण्यातील पत्ताशोधन' ह्या विषयावर असल्याने (आणि हा विषयाचा चोथा झाला असल्याने), पुढील साप पकडण्याच्या अनुभवांबद्दल उत्सुकतेने वाट बघत आहे.. चिअर्स!
  • Log in or register to post comments

लेखन आवडले लिहित रहा

भ ट क्या खे ड वा ला
Mon, 08/19/2013 - 18:29 नवीन
लेखन आवडले लिहित रहा
  • Log in or register to post comments

ही मालिका पूर्ण झाल्यामुळे

रुपी
Fri, 06/02/2017 - 00:25 नवीन
ही मालिका पूर्ण झाल्यामुळे आता वाचायला सुरुवात केली :) सापांबद्दल वाचायला खरं तर मी टाळत होते. पण आमच्या ऑफिसच्या आजूबाजूला फिरायला जाताना कधीकधी साप दिसलेत लोकांना. एकदा तर सकळी चक्क क्युबिकल्समध्येसुद्धा एक साप होता. त्यामुळे माहिती असलेली बरी ;)
  • Log in or register to post comments

उत्तम मालिका

इज्या
Sun, 06/11/2017 - 14:55 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा