✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आज फिर मरनेका इरादा है ......!!!

ज
जेनी... यांनी
Mon, 04/01/2013 - 04:13  ·  लेख
लेख
आज तो जीने की तमन्ना है........... हा लेख विजुभाऊंना समर्पित ...... ******************************************************************************************************************************************************* आज फिर मरनेका इरादा है! . . . . काल डायवोर्स पेपर वर सह्या करताना तुझा हात एकदा तरी थरथरेल ,नजर बिथरेल असं वाटलं होतं, पण नाही ,एका अर्थी बरंच झालं. तुला मोकळ्या आभाळाखाली मोकळा श्वास हवा होता, आणि तुला श्वास घेताना मला पहायचं होतं. रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये सह्या करुन झाल्यावर परत येताना डोकं सुन्न होतं, एकटक नजर बाहेर भिरभिरत होती. अचानक आलेल्या वादळात आपलं घरट झाडावरनं खाली पडावं, पावसात वाहून जावं, आणि हे सारं आपल्यालाच आपल्या उघड्या डोळ्यानी पहायला लागावं, ह्या इतकं दुर्दैव असू शकतं का? किती विचार करत बसणार होती मी कोण जाणे? खिडकीतनं बाहेर दिसणार्‍या थोटक्या झाडाकडे बघत निदान तास तरी उलटून गेला असेल. चिंध्या झाल्या होत्या डोक्याच्या, पुढचं आयुष्य एकटीने घालवायचंय ह्या गोष्टीची मानसिक तयारी होत नव्हतीं. न राहवून रेडीओची एक दोन बटणं फिरवली, कुठेच काहीच नाही, आज सूर नको होते, पण एकटेपणाही नको होता. वीस वर्ष जे सूर जुळले ...नाही, जुळवले होते ते क्षणात तुटले, बेसूर झालं होतं सगळं. त्याला मी नकोशी होती असं नाही, त्याचं माझ्यावर प्रेम नव्हतं असं नाही .खरतर तू एकदा भांडताना नुसतंच म्हणुन गेला होतास, मी मात्र ते खरं करुन दाखवलं. सेलीब्रेशन करत असशील, आय नो. वीस वर्षांचा आपला सहवास .बघायला आला तेव्हा एकही प्रश्न मला विचारला नाहीस. बघताच क्षणी आवडला होतास मला. शांत स्वभाव भावला मनाला. आठवत असेल तुला अजून, कि नाही माहित नाही, पण मला चांगलच आठवतंय, हॉटेलमध्ये घेवून गेला होतास. माझ्या बिनधास्त बोलण्याने अचंबित व्हायचास, पण बराच इम्प्रेस्स्ड. त्यानंतर जुहूला समुद्रावर नकळत तुझ्या हातांचा झालेला तो पहिला स्पर्श अजूनही मनात मोरपंखी शहारा खुलवतो. माझं बोलणं तुला फार आवडायचं. माझ्यासाठी जमेल तेवढा वेळ श्रोता म्हणून राहाणं पसंत होतं तुला. आपल्या आवडीनिवडी कमालीच्या भिन्न, पण मनांचे सूर जुळले आणि सगळंच सोपं होऊन पुढ्यात आलं. आपलं लग्न झालं. खरतर साध्या पद्धतीने लग्न करायचा तुझा विचार मी माझ्या ह्याच बडबडीने हाणून पाडला होता. लग्न एकदाच होतं . देवाब्राह्मणांसोबत थोरामोठ्यांचे आशिर्वाद मिळाले कि ते उत्तम प्रकारे निभवायला प्रचंड बळ मिळतं अशी माझी समजूत होती. पण आत्ता पटतय तू बरोबर होतास. आयुष्याची वीस वर्ष भरकन गेली, वाटलं आत्ता आत्ताच कुठे सुरुवात होतेय, तोवरच? तुझ्या आवडी निवडी मी स्वत:च्या बनवून जगू लागले, तुझ्यासाठी साधेपणाचं रहाणीमान सोडून, तुला हवी तशी हव्या त्या रंगात स्वत:ला बदलून घेतलं. "अबोली रंग तुझ्यावर खुलून दिसतो" ह्या एका वाक्यासाठी तशाच त्याच रंगाच्या चार चार साड्या खरेदी केल्या होत्या वेड्यासारख्या, पण तुला तुझ्या कामातनं त्यांच्याकडे पाहायलाही जमलं नाही. नोकरी सोडलीस त्यावेळी खरंच वाईट वाटलं होतं, आता हा संसाराचा गाडा ओढताना तुझी दमछाक होइल ह्याची पुरेपूर कल्पना होती, पण खांद्यावर जमेल तितकं ओझं पेलायची तयारी दाखवली, तुझी ओढाताण समजत होती, जाणवत होती. त्यावेळी व्यवसायात उतरण्याचा तुझा निर्णय "चुकलाच तर रे?" हे ओठांवर आलेले शब्द कितीतरी प्रयत्नाने आवंढ्यासकट गिळले होते. तुला कुठेही, कसंही दुखवायचं नाही, बस्स, फक्त एवढ्या हेतूनेच आयुष्यभर मनात बरच साठू दिलं, पण भावनेच्या भरातही मनानं दगा दिला नाही, तुला कधीच माझ्या अंतकरणात दडलेलं काहीच उमजलं नाही. पुढे तुला व्यवसायात मिळणारं अपयश, तुझं शांत बसून रहाणं, तुझं सतत व्यस्त असणं, इतकं टोचू लागलं पण पर्याय नव्हता रे, तू हे सगळं आपल्यासाठी, आपल्या बाळासाठी करतोयस एवढं कळायचं मला. तुझे कष्ट दिसत होते मला. त्याचबरोबर तुझ्या अडचणीही दिसत होत्या, पण त्यावर मार्ग काढायला तू कमी पडत होतास, हेच खटकायचं मला. खचून जायचास, सतत धक्का मारावा लागायचा, हेच नको होतं मला. तू हुशार होतास, कष्टाळू होतास, पण निर्णय घ्यायला घाबरायचास, घटस्फोटाचा निर्णय मात्र तू किती पटकन घेवू शकलास. पुढे व्यवसायातल्या अपयशाला, हो अपयशच. त्याला कंटाळून तू पुन्हा नोकरीचं मनावर घेतलंस, खर सांगू आकाश ठेंगण झालं होतं मला, त्यातही संयम बाळगला मी. कारण अजून नोकरी हातात नव्हती. माझ्या चेहेर्‍यावर नेहेमीच आशेचे किरण पहायची सवय झाली होती तुला. मनात नसतानाही ओठांवरचं हसू ढळू द्यायचे नाही मी. का? तर तुला तोच एक आधार वाटायचा. तुला नोकरी मिळाल्यावर तू उत्साहाच्या भरात मला उचलुन एक गिरकी घेतली होतीस, तो क्षण आयुष्यातल्या काही आनंदी क्षणांपैकी एक. ड्रेसही बदलू दिला नाहीस, लगेच नाक्यावरच्या सायबरकॅफेत नेऊन ऑफरलेटर दाखवलस. खिशात पैसे नसताना दोघात घेतलेलं एक आईस्क्रीम, तुझा आनंदून गेलेला चेहेरा, वाटलं हे सुख पदरातून खाली सांडूच नये कधी. पण पदर झीजत चालला होता ह्याकडे लक्षच गेलं नाही. आठवतंय? मला दिवस गेलेत हि बातमी जेव्हा तुला सांगितली तेव्हा "अरे बापरे" असे भाव तुझ्या चेहेर्‍यावर होते. त्या दिवसात मला तुझ्या सहवासाची फार गरज होती. शक्य होइल तेवढी काळजी घेतलीस माझी. आपल्याला मुलगी झाली. गोंडस बाळ. तिच्याकडे बघून म्हणाला होतास, आता सारं हिच्याचसाठी करायचं. काही कमी पडू देणार नाही तिला, पण साधासा विचार कर आज तिला तिच्या ह्या वयात तुझी किती गरज आहे ते. काही कमी पडू देणार नाहि असं म्हणणारा तू आज तिच्या बाबतीतही कर्तव्य करायला कमीच पडलास. तुझ्या ह्या पावलोपावली कमी पडण्याचाच तिटकारा होता मला. नोकरीनिमित्त तू मग घरापासून लांब रहायला लागलांस .तुझी इतकी सवय होऊन गेली होती कि, तुझं दूर रहाणं लवकर पचलंच नाही. तुझी वाट बघण्यात बर्‍याच रात्री जागवल्या, बरेच दिवस पापण्या आडून पालटवले. कधी तुझी येण्याची तारीख पुढे जायची, तर कधी माझा धीर सुटत जायचा, पण मग स्वत:लाच समजावलं, आता दोघे नाही आपण, आपल्यावर आपल्या मुलीचीही जवाबदारी आहे. तिच्यासाठी आपल्याला बरेच निर्णय स्वतंत्र घेतले पाहिजेत, प्रत्येकवेळी तू जवळ नाही हे कारण दाखवून नाही चालणार. मी स्वतंत्र विचार करु लागले, बरेच निर्णय तुझ्याशिवाय घेऊ लागले. त्याचा अभिमान वाटण्याऐवजी "तुला आता माझी गरजच उरली नाही" असं विधान केलस तू. मला काय वाटलं असेल त्यावेळी हे शब्दात सांगू शकत नाही मी. सगळ्याच बाजूने सारख्याच अपेक्षा करणं चुकीचं असतं. एखाद्या तरी बाजूवर पडतं घ्यावंच लागतं. मान्य आहे मला, माझा स्वभाव चिडखोर झाला होता, तुझ्या जवळ नसण्याने असेल कदाचित. कदाचित नाही, हेच कारण, पण कधी ओठावर येऊच दिलं नाही मी. सुट्टीवर तू इकडे आला होतास, आपल्या मुलीला घेऊन आपण डॉक्टर कडे गेलो होतो. डॉक्टरांनी लास्ट चेकप ची डेट विचारली तुला. तुला नाहि सांगता आली. तिच्या शाळेत भातुकलीचं एक्झिबिशन होतं, तुला यायला जमलं नाही, त्याबद्दल वाद नव्हता, पण एका शब्दानेही तू तिला विचारलं नाहीस, साधी चौकशीहि नाही. सांग ना ...एवढासा जीव तो, मला बिलगुन रडू लागला तेव्हा मला काय वाटलं असेल? तू नोकरीनिमित्त लांब होतास. तुझ्यावर कामाचा ताण होता, सगळं मान्य, पण मनाने लांब कसा काय जाऊ शकलास? सध्या फक्त आपल्या सानुल्याचांच विचार करतेय. तेव्हा मात्र न सांगताच तुझाही विचार मनात, डोक्यात येतोच, काय करणार, तुझे कणाकणात भिनलेले श्वास मी वेगळे करु शकत नाहीय. तुझी लागलेली सवय, तुझा नसूनही असणारा, तरीही जपलेला सहवास, त्याला कशी काय विसरणार होते मी? अजूनही विश्वास बसत नाहीयं, पण हे घडलंय खरं. तरीही वाटतं, माझ्या प्रेमाचे बंध इतके तकलादू नव्हते, इतक्या सहजासहजी तुझ्या हातातून निसटण्याइतकी सैल हाताची पकड नव्हती. हातात हात गुंफून चाललेल्या वाटाही निसरड्या नव्हत्या, कि पापण्यात पाहिलेलं दोघांचं एकच असं ते स्वप्नही भातुकलीच्या खेळाएवढं खोटं नव्हतं. तू परतून येशील ही आशा नाही सुटत, यात दोष कुणाचा? तुझ्यावर जडलेला जीव तुझ्यापासून दूर होईना, ह्यात दोष कुणाचा? सुकलेल्या, गंधहीन फुलांतही नाजुकपणा शोधणारा तू, तुझ्या आठवणींच्या जाळ्यातून बाहेर येण्याची इच्छाच नाही, ह्यात चूक कुणाची? ह्या प्रश्नांची उत्तर नाही मिळाली तरी चालतील ...पण तू तू परत ये .. !!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
कथा
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
17141 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

लेखनाची लय एकदम पक्की आहे.

तर्री
Tue, 04/02/2013 - 15:31 नवीन
काल डायवोर्स पेपर वर सह्या करताना तुझा हात एकदा तरी थरथरेल , हे वाक्य मनावर असे काही आदळते की संपूर्ण लेख ह्याच्या प्रभावाखाली वाचला जातो. लेखनाची लय एकदम पक्की आहे. त्यामुळे तो परिणाम शेवटपर्यंत राहतो. इस्ट्रोजेन , प्रोगेस्टेरॉन आणि ऑक्सीटोसिन हे एक अगम्य रसायन आहे.
  • Log in or register to post comments

जबरा...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 04/02/2013 - 15:52 नवीन
पूजा पवारच आयडी आहे का हे दोनदा तीनदा पाहावं लागलं लेखकावर अजूनही विश्वास बसत नै सॉरी हं पुजाशेठ. खुपच सुंदर. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सुंदर. आवडलं.

चावटमेला
Tue, 04/02/2013 - 16:03 नवीन
सुंदर. आवडलं.
  • Log in or register to post comments

व्वा पूजाकाका मस्त लिहुन

स्पंदना
Tue, 04/02/2013 - 17:10 नवीन
व्वा पूजाकाका मस्त लिहुन गेलात. तसही विजुभाऊ बरेचसे सफल झाले होते या लिखाणात. हे ही सुरेखच.
  • Log in or register to post comments

शी बै सग्गे सग्गे जळ्ळ्तात

जेनी...
Tue, 04/02/2013 - 19:14 नवीन
शी बै :-/ सग्गे सग्गे जळ्ळ्तात माझ्या वांडपणावर :-/ पिडांकाका मलापण वांडपणा करायला खुप ़ खुप खुप मज्जा येते :) अँड थँक्स टू ऑल :) सगळे प्रतिसाद आवडले ...... माझ्याकडुन माझीच एक कविता .... सगळ्या वाचक , प्रतिसादक ... बोले तो सब ़के वास्ते .... . गोठलेला एकच थेंब तासनतास तसाच असतो शिक्षेचा अर्थच कळत नाहि भिजलेला वारा हळुच येऊन त्याला झोंबत असतो थेंबाची समाधीच ढळत नाहि . रोज रोज तीच जागा त्याच खाणाखुणा , वेगळं असं आयुष्यच नाहि तेच ते क्षण , तीच अस्वस्थता पून्हा पून्हा, कसला तो निष्कर्षच नाहि . बहुतेकदा आपलहि जगणं थोडफार असच असतं बदल शक्यतो घडतच नाहि त्याच वाटेवर तीच पाऊलं घेऊन चालत असतं वळण मिळालं तरी , पाऊल तिकडं पडतच नाहि . थँक्स अगेन .
  • Log in or register to post comments

पहिल्याच २ ओळी गोठवून जातायत.

कवितानागेश
Tue, 04/02/2013 - 19:36 नवीन
पहिल्याच २ ओळी गोठवून जातायत.. गोठलेला एकच थेंब तासनतास तसाच असतो शिक्षेचा अर्थच कळत नाहि मस्त लिहिलयस पूजा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

मस्त

अभ्या..
Tue, 04/02/2013 - 19:41 नवीन
+१ माऊ ही कविता खरडफळ्यावर वाचली तेंव्हाच आवडली होती. आज इथे अशी आली. :) छानय गं पूजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

@शी बै smiley सग्गे सग्गे

अत्रुप्त आत्मा
Tue, 04/02/2013 - 22:45 नवीन
@शी बै smiley सग्गे सग्गे जळ्ळ्तात माझ्या वांडपणावर smiley>>> =)) आमि नै जळत...आम्हाला बालिकेचा वांडपणाच जास्त अवडतो. Image removed. वांड बालिका=महान बालिका =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

पुजा

रुमानी
Wed, 04/03/2013 - 09:48 नवीन
पुजा अतिशय भावपूर्ण लेखन. आवडले.... व कविताही छान.
  • Log in or register to post comments

तुझा नेहमीचा वांडपणा बाजूला

सासुरवाडीकर
गुरुवार, 04/04/2013 - 20:47 नवीन
तुझा नेहमीचा वांडपणा बाजूला सारून तू असं लिहिलंयस याचं मला खूप कौतुकवाटतं!!! पुर्ण सहमत. अप्रतिम लेखन
  • Log in or register to post comments

तुझा नेहमीचा वांडपणा बाजूला

सासुरवाडीकर
गुरुवार, 04/04/2013 - 20:50 नवीन
तुझा नेहमीचा वांडपणा बाजूला सारून तू असं लिहिलंयस याचं मला खूप कौतुकवाटतं!!! पुर्ण सहमत. अप्रतिम लेखन
  • Log in or register to post comments

थ्यान्क्स पूजा. मी लेख लिहून

विजुभाऊ
गुरुवार, 04/04/2013 - 23:40 नवीन
थ्यान्क्स पूजा. मी लेख लिहून वर्ष होऊन गेले. तो विषय मला अजूनही हळवा करून जातो.
  • Log in or register to post comments

विजुभाऊ तुमच्या प्रतिसादाची

जेनी...
Fri, 04/05/2013 - 19:30 नवीन
विजुभाऊ तुमच्या प्रतिसादाची खरच वाट बघत होती .... लेख सार्थकी लागला :) तुमच्या एका बाजुमुळे दुसरी बाजु माझ्याकडुन मांडली गेली ... उत्तेजनासाठी पून्हा एकदा थँक्स :) पून्हा एकदा सर्व प्रतिसादकांचे मनापासुन आभार :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

लेख वाचून निशब्द झाले, रात्री

भावना कल्लोळ
Fri, 04/05/2013 - 16:23 नवीन
लेख वाचून निशब्द झाले, रात्री झोप येत नव्हती म्हणून मिपावर आले आणि तुमचा हा लेख वाचला, त्या शांत वातावरणात, तुमचे शब्द वाचताना " ती " ची अनुभूती होत होती, खरेच सुंदर लिहिले आहे, हेट्स ऑफ टू यु ……। प्रतिक्रिया उशिरा देत आहे म्हणून क्षम्स्व्य
  • Log in or register to post comments

भारी गं तायडे..

पिशी अबोली
Fri, 04/05/2013 - 18:55 नवीन
भारी गं तायडे..
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
Fri, 04/05/2013 - 20:51 नवीन
मस्त जमलंय! अजून नाण्याची तिसरी बाजू यायची राहिली आहे. आईवडिलांच्या घटस्फोटामुळे व्यथित आणि हरवलेली मुलं. पूजा किंवा विजुभौ कोणीही लिहा!
  • Log in or register to post comments

प्रॉमिस पैसा ताई. त्या " मनू"

विजुभाऊ
Fri, 04/05/2013 - 23:41 नवीन
प्रॉमिस पैसा ताई. त्या " मनू" चे कथन लिहायचे राहिलय. पूजाच्या लेखामुळे सुरुवात करेन लिहायला. @पूजा : एक शाम आती है हररोज मुझे तनहाई का एअहसास दिलाती है कभी जुगनू तो कभी चांद की कहानिया सुनाती है कहांसे न जाने .. हवा भी चली आती है चुककेसे. कुछ बारीश यादे भी साथ लाती है. वो खामोश पल वो महकते सितारे वो अनकही बाते. वो अनछुए स्पर्श हथेलिया हाथ मे थामे. वो आखों आखोंसे बाते यादे सारी उमडकर आती है. तनहाई मिट जाती है. ये शाम हर रोज आती है मुझसे मुझे ले जाती है.
  • Log in or register to post comments

ये शाम हर रोज आती है मुझसे मुझे ले जाती है.

अत्रुप्त आत्मा
Sat, 04/06/2013 - 17:44 नवीन
___/\____/\____/\___
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

हे घ्या पूजा च्या पूजेतील

विजुभाऊ
Mon, 11/30/2015 - 19:18 नवीन
हे घ्या पूजा च्या पूजेतील आणखी एक सुंदर फूल......
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा