मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गपगार

आतिवास · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
बामनाची ईदद्या ग्येली. म्हंजे म्येली. शेताला गेल्ती सक्काळी. हा-या धावत आला सांगाया. मोटी माणसं ग्येली पळत. म्याबी चाल्ली व्हती. आयनं पायलं, म्हन्ली, “मुकाट्याने निमीकडं जा. तिथं दिसलीस तर लाथ घालीन.” आमच्या घरातली मान्सं सूद्द बोल्तेत. म्या येकलीच खेडवळ. ईदद्या माज्याशी चांगली व्हती. बोलायची न्हाई जास्ती, पण कायबाय द्यायची मला. गजगं; फुटकी काकणं; चिचोके; गूळश्यांगदाणं; आवळं; जांभळं; – समदं फुकाट. म्याबी तिला मोराचं पीस दिल्त येकडाव. हसली व्हती. “आता ईदद्याचं भूत व्हनार,” जग्या म्हन्ला. “हाडळ”, भान्या म्हन्ला. “हाडळ कशापायी? तिला कुटं लेकरू व्हतं?” अंक्याने इचारलं. “पोटुशी व्हती म्हनं ती,” निम्मी म्हन्ली. “ह्या! लगीन कुटं झालतं तिचं?” म्या इचारलं. समदी गपगार बसली. मेल्यागत. (शतशब्दकथा)* * हा शब्द सुचवल्याबद्दल चिगो यांचे आभार.

वाचने 14487 वाचनखूण प्रतिक्रिया 38

भीडस्त Fri, 03/22/2013 - 11:10
नेटक्या,अल्प शब्दात दाहक वस्तुस्थिती उभी केलीत

चिगो Fri, 03/22/2013 - 16:33
स्साला... कमाल आहात राव! जबराट. मानलं तुम्हाला. आम्हाला सालं हातभर लिहून प्रभाव पाडायला येत नाही, तुम्ही शब्द मोजून झटका देता.. :-) सह्ही जमतोय हा प्रकार तुम्हाला..

प्यारे१ Fri, 03/22/2013 - 16:40
दोन मिन्टं गप हुबारतो. सरदांजली इद्द्याला. वर्सा दोन वर्सानं आशीच त्येल्याची नायतं न्हाव्याची सुलबा मरंन. तवाबी समद्ये आशेच आस्त्याल.... गपगार!

स्वाती दिनेश Sat, 03/23/2013 - 12:55
शतशब्दकथा! एकदम मस्त संकल्पना आहे. अंगावर काटा आला मात्र वाचून सुवर्णमयीसारखेच, स्वाती

अभ्या.. Sat, 03/23/2013 - 13:22
अप्रतिम लिहिता तुम्ही. ही शतशब्दकथेची कन्सेप्ट तर लै अपील झाली. अशी एक सेपरेट कॅटेगरी पण करायला हरकत नाही मिपावर. अर्थात या कथाप्रकारातील तुमचे प्रभुत्व वादातीत आहे. :)

पैसा Sat, 03/23/2013 - 21:01
शंभर शब्दात हजारों शब्दांचं सार सांगितलंत. आणि तेही लहान मुलीच्या नजरेतून. वाचून आम्ही गपगार.

आतिवास Sun, 03/24/2013 - 09:06
आभार बिपिन कार्यकर्ते, भीडस्त, नगरी निरंजन, इनिगोय, श्रावण मोडक, आदूबाळ, वल्ली, मन१, अत्रुप्त आत्मा, बॅटमॅन, ५० फक्त, गणपा, किसन शिंदे, चिगो, प्यारे१, इन्दुसुता, मिहिर, अपर्णा अक्षय, सुवर्णमयी, स्वाती दिनेश, अभ्या, पैसा, लीमाउजेट. सर्व वाचकांचेही आभार.

धमाल मुलगा Sun, 03/24/2013 - 09:34
इच्चिभनं! डेंजरफुल लिहिलंय राव, गाप्पकन हालवण्याची ताकद है तुमच्या लेखनात.

In reply to by तुमचा अभिषेक

पिलीयन रायडर गुरुवार, 03/28/2013 - 13:30
ताई? बायकांना कधी एवढं टू द पॉईंट बोलताना पाहिलच नाहिये हो!! मी स्वतः नमनाला घडाभर तेल घालुनच बोलते. हलके घ्यालच...!!

नक्शत्त्रा Wed, 03/27/2013 - 14:36
आतिवास........."शंभर शब्दात हजारों शब्दांचं सार सांगितलंत. आणि तेही लहान मुलीच्या नजरेतून. वाचून आम्ही गपगार". पैसा यांच्याशी एकदम सहमत!!!!!!!! पकड जबर्दस्त आहे!!!

आतिवास गुरुवार, 03/28/2013 - 09:08
आभार स्नेहांकिता, धमाल मुलगा, पिलीयन रायडर, ऋषिकेश, नाना चेंगट, नक्शत्त्रा.

वामन देशमुख गुरुवार, 03/28/2013 - 16:13
बामनाची हे विशेषण न लावता सुद्धा कथा उभी करता आली असती. बामनाची हा शब्द प्रयोग वापरण्याचे काही खास कारण?
मलाही हेच विचारायचं होतं.