शनिवारवाडा (भाग १) : इतिहास
शनिवारवाडा: अवशेष वर्णन
सध्या दिसणाऱ्या अवशेषांमध्ये पुढील ३ गोष्टींचा समावेश होतो.
१. तटबंदी आणि बुरुज
२. दरवाजे
३. नगारखाना
आता या तिन्ही गोष्टींची थोडक्यात माहिती घेऊयात.
१. तटबंदी आणि बुरुज
शनिवारवाडा हा पुण्याच्या साधारणपणे मध्यावर वसला आहे. वाड्याची तटासह दक्षिणोत्तर लांबी १८४.२५ यार्ड आहे तर पूर्वपश्चिम लांबी १६४.२५ यार्ड आहे. या वाड्याने जवळपास ६.२५ एकर जमीन व्यापली आहे.
वाड्याच्या तटबंदीची उंची ३३ फुट असून खालील १० ते १८ फूट उंचीचा तट हा चिरेबंदी आहे तर वरचे बांधकाम पक्क्या विटांचे आहे. तटाचा माथा ११ फूट रुंद आहे. माथ्याच्या दर्शनी बाजूस बंदुकीतून गोळ्या झाडण्यासाठी जंग्या (भोके) ठेवण्यात आल्या आहेत. तटास एकूण ९ बुरुज आहेत. या सर्वांवर तोफा बसवण्याची व्यवस्था आहे. उत्तर पेशवाई मध्ये वायव्य बुरुजास "तोफेचा बुरुज" तर पश्चिम बुरुजास "पागेचा बुरुज" म्हणत असत. इतर बुरुजना अशी नावे सापडत नाहीत. या बुरुजांपैकी पागेचा बुरुज आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी एक खड्डा आहे. त्याचा तोफगोळे ठेवण्यासाठी वापर होत असावा.
दिल्ली दरवाज्याच्या दोन्ही बाजूचे बुरुज हे बहुकोनी, चिरेबंदी व लंबरूप आहेत. इंत सर्व बुरुज हे पक्क्या विटांचे असून ते Cylindrical आकाराचे आहेत.
तटबंदीमध्ये असणाऱ्या जंग्या
पागेचा बुरुज( हा बुरुज पोकळ असल्याने सध्या दरवाजा लावून बंद करण्यात आला आहे)
दिल्ली दरवाज्याचा अष्टकोनी बुरुज
तट रुंद असल्याकारणाने आत पहारेकऱ्यांच्या खोल्या होत्या. तटावर जाण्यासाठी एकूण नऊ जिने ( १ दिल्ली दरवाज्याजवळ, १ मस्तानी दरवाज्याजवळ, २ खिडकी दरवाज्याजवळ, १ नारायण दरवाज्याजवळ, २ पागेच्या बुरुजाजवळ आणि २ तोफेच्या बुरुजाजवळ) आहेत तर खिडकी दरवाज्याजवळ पाच ओवऱ्या आहेत. तटाच्या पूर्व अंगास अजूनही आठखणी सोपा असल्याची चिन्हे दिसतात.
पहारेकऱ्याची खोली
मस्तानी दरवाज्याजवळील जिना
खिडकी दरवाज्यापाशी असलेल्या ओवऱ्या
आठखणी दुमजली सोपा असल्याचे चिन्ह
२. दरवाजे
तटास एकूण ५ दरवाजे आहेत.
१. दिल्ली दरवाजा : या दरवाज्याची रुंदी १४ फूट तर उंची २१ फूट आहे. हत्तींच्या धड्केपासून दरवाजा सुरक्षित ठेवण्यासाठी अणकुचीदार खिळे आणि जाडजूड पट्ट्या मारल्या आहेत. दक्षिण भारतामध्ये अनेक ठिकाणी, दिल्ली ही उत्तरेला असल्याकारणाने, उत्तर दरवाज्याला दिल्ली दरवाजा असेही म्हणत. तोच प्रकार इथेही दिसतो आहे. हा दरवाजा सर्वात मोठा आहे.
दिल्ली दरवाजा
२. अलीबहादूर दरवाजा / मस्तानी दरवाजा : मस्तानी, समशेरबहादूर व मस्तानीचा नातू ( आणि बांदा संस्थानाचा मूळपुरुष) अलीबहादूर हे वाड्याच्या ईशान्य कोपऱ्यात राहत असत. त्यांचा वावर हा वाड्याच्या ईशान्य बाजूच्या पण उत्तराभिमुख दरवाज्यातून होत असे. म्हणून त्या दरवाज्यास "अलीबहादूर / मस्तानी दरवाजा असे नाव दिले गेले. हा दरवाजा सर्वात लहान आहे.
अलीबहादूर दरवाजा / मस्तानी दरवाजा
३. खिडकी दरवाजा : पूर्व बाजूस असणाऱ्या या दरवाज्याच्या जागी पूर्वी एक लहानसा दरवाजा होता. त्यास खिडकी किंवा दिंडी असे म्हणत असत. पुढे नारायणराव पेशव्यांच्या खुनाच्या वेळी हा दरवाजा काढून दुसरा दरवाजा बसवला पण ते नाव मात्र तसेच चालू राहिले.
खिडकी दरवाजा
४.गणेश दरवाजा : हा दरवाजा आग्नेय बाजूस असून पूर्वाभिमुख आहे. या दरवाज्याच्या बाहेर गणेश मंदिर असल्याकारणाने यास गणेश दरवाजा असे नाव पडले. मजबुतीच्या बाबतीत हा दरवाजा दिल्ली दरवाज्याच्या खालोखाल आहे.
गणेश दरवाजा
५. दक्षिण / नारायण / जांभळीचा / नाटकाशाळांचा दरवाजा : हा दरवाजा दक्षिण दिशेला आहे म्हणून यास "दक्षिण दरवाजा" असे म्हणत. पुढे नारायणरावांच्या खुनानंतर त्यांचे प्रेत याच दरवाज्याने वाड्याबाहेर नेले म्हणून त्यास "नारायण दरवाजा" हे नाव पडले. या दरवाज्याने नाटकशाळांचा येत-जात असत म्हणून त्यास नाटकशाळांचा दरवाजा असेही म्हणत. या दरवाज्याच्या बाहेर एक जांभळीचे झाड होते म्हणून त्यास "जांभळीचा दरवाजा" असेही म्हणत. अर्थात ही सर्व नावे एका एकाच वेळी अस्तित्वात नसणार!
नारायण दरवाजा
३. नगारखाना
दिल्ली दरवाज्यातून आत गेले कि नगारखान्याची दुमजली इमारत लागते. याचा तळमजला हा पूर्णपणे चिरेबंदी असून तो २७ फूट उंच आहे. तळमजल्यामध्ये दिल्ली दरवाज्याच्या दुमजली देवड्या, पहारेकऱ्यांच्या कोठड्या, व पूर्वेस वरच्या मजल्यावर जाण्याचा जिना आहे. देवडीच्या चौकात आल्यावर छताकडे पहिले असता एक साधी लाकडी इमारत दिसते जिचा मूळ इमारतीच्या लाकडी बांधणीशी काहीही संबंध नाही. असे सांगितले जाते कि जर शत्रू येनकेनप्रकारेण दरवाजा तोडून आत आलाच तर ही लाकडी इमारत जाळायची आणि त्याच्या अंगावर पाडायची. तशी वेळ कधी आलीच नाही म्हणून आजही ती लाकडी इमारत आपण पाहू शकतो.
नगारखाना : तळमजल्याचे सामान्य बांधकाम असलेले छत
मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे देवडीच्या भिंतीवर शेषशायी, गणेश इ.ची पुसट चित्रे दिसतात.
भित्तीचित्र : गणेश
नगारखाना : दुसरा मजला
वाड्यात काय चालले आहे हे बाहेरच्या माणसाला कळू नये म्हणून दिल्ली दरवाजा, देवडीचा चौक आणि आतले सर्व चौक हे एका रेषेत न करता नागमोडी केले आहेत.
क्रमशः
******************************************************************************
छायाचित्र सौजन्य : श्री. ओंकार यारगुद्दी
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
8446
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा:!
धन्यवाद पैसाताई..!
In reply to वा:! by पैसा
छान!
शनिवार पेठेच्या बाजूचा कोपरा
In reply to छान! by आदूबाळ
फुटका बुरुज
In reply to शनिवार पेठेच्या बाजूचा कोपरा by मैत्र
नगार खाना
पुभाप्र !!
सव्यसाची,
"पेशवे गणपती" बहुतेक.
In reply to सव्यसाची, by आशु जोग
अहो हिरवे हिरवे झेन्डे लावले
In reply to "पेशवे गणपती" बहुतेक. by आदूबाळ
याच्यापुढे
In reply to अहो हिरवे हिरवे झेन्डे लावले by आशु जोग
मस्त रे सव्यसाची! ते नाना
-
आवडेश!
वाचते
मागचा भाग वाचला आहे,हाही भाग
भित्तीचित्र
In reply to मागचा भाग वाचला आहे,हाही भाग by मदनबाण
एरवी शनिवारवाडा पाहताना काय
माहितीपूर्ण लेख
हा ही भाग छान आहे
उत्तम
झकास आणि माहितीपूर्ण लेख!
धन्यवाद.!
मस्त... पु.भा.प्र.