Skip to main content

महानंदा चित्रपटातील अस्वस्थ करणारा प्रसंग

लेखक शुचि यांनी शनिवार, 09/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
आर्ट इज नॉट आर्ट टिल इट डिस्टर्ब्स यु.
हे वाक्य म्हणून वाचायला बरे आहे. पण खरच अशी कला जेव्हा सामोरी येते, तेव्हा भयंकर वाटते. खूप वर्षांपूर्वी, खरं तर लहानपणी "महानंदा" हा चित्रपट पाहीला होता. दूरदर्शनवर लागला होता. अर्थातच सेन्सॉर केलेला होता. आज परत आपलीमराठी वर पाहीला. व्यक्तीचित्रण अतिशय प्रभावी आहे. जयवंत दळवींसारख्या सिद्धहस्त लेखकाची कथा असल्याने चित्रपट उत्तम असणार यात वादच नव्हता. हा चित्रपट "बेंचमार्क" चित्रपट म्हणून नावाजलेला असल्याने आता कळत्या वयात पहायची उत्सुकता होतीच. गोव्याच्या पार्श्वभूमीवर एका भावीणीची मुलगी व एक मराठीचा प्राध्यापक यांच्यामध्ये फुललेली प्रेमकथा आहे. जयवंत दळवी लिखीत असल्याने एक तरी वेडसर पात्र असणे जरुरीचे आहे. पण या कथेत २ वेडी पात्रे आहेत. हे स्फुट चित्रपटाचे परीक्षण नाही तर एका प्रसंगाबद्दलचे मनोगत आहे. सुदैवाने आतापर्यंत कधीच इतका अस्वस्थ करणारा प्रसंग कोणत्याही चित्रपटात मी पाहीला नाही. हा जो सीन (प्रसंग) मी लिहीते आहे तोदेखील इतका सखोल अस्वस्थ करणारा होता की मी तो पूर्ण पाहूच शकले नाही. गावात एक वेडसर भावीण आहे, जी लक्तरे ल्यालेल्या अवस्थेत, मांड्या कराकरा खाजवत फिरते. ती सदैव अन्न-पाण्याकरता भुकेली, वखवखलेली अशी चित्रीत केलेली आहे. याच गावात एक पोस्ट्मास्तर आहे जो सर्वांची खाजगी पत्रे चोरुन वाचतो. प्रसंग असा होता की ही वेडसर मुलगी रस्त्यावर एका रिकाम्या खोलीच्या कडेला काहीबाही खात बसलेली आहे, मध्येच हसते आहे, कराकरा अंग खाजवते आहे. आणि पोस्टमास्तर तिचे अन्न हिसकावून घेऊन, तिच्या तोंडापाशी नेत पण तिला न देता तिला त्या रिकाम्या खोलीकडे भुलवत नेतो. कधी गडव्यातील पाण्याची धार तिच्या समोर ओतत, पण पाणी न देत तिला "ये ये" असे म्हणत तिला त्या खोलीत घेऊन जातो. आणि एखाद्या पशुसारखी ही मुलगी अन्न-पाण्याला भुलून, त्याचा कावा न ओळखता त्याच्या मागे मागे जाते. मला हा प्रसंग बघवला नाही. खूप म्हणजे प्रचंड अस्वस्थता दाटून आली. अन्न-लैंगिकता- वेडसरपणा या तीनही प्रभावी (पोटंट) गोष्टींतून साकार झालेला, पोस्टमास्तरच्या विकृतीचे दर्शन घडवणारा तो प्रसंग मनावर अतिशय ओरखडे उठवून गेला. जबरदस्त डिस्टरबींग सीन आहे. जयवंत दळवी लिखीत हा प्रसंग दिग्दर्शकाने फार ताकदीने चित्रित केलेला आहे एवढेच म्हणेन. खरं तर चांगल्या गोष्टी नेहमी दुसर्‍यांबरोबर शेअर कराव्या पण आज ही अस्वस्थता शेअर करावीशी वाटली म्हणून हे स्फुट्/मुक्तक. तो सीन पाहील्यावर अगदी १००% असे वाटून गेले की जगात देव असावा आणि तो न्यायी असावा आणि त्या पोस्टमास्तरसारख्या हीडीस नरधमांन शिक्षा व्हावी. खरं तर काय काय वाटले हे शब्दात न मांडता गेणारा अनुभव चित्रपटातील तो प्रसंग देऊन गेला. दाटून आलेल्या अस्वस्थेला बद्ध करणारे शब्दच खरोखर नाहीत. जयवंत दळवींचे सामर्थ्य पुन्हा माझ्या साठी निर्विवाद अधोरेखित झाले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 13452
प्रतिक्रिया 47

प्रतिक्रिया

नाटक पण छान होते आशा काळे व काशिनाथ घाणेकार यांची अप्रतिम कामे झाली होति. आईचा रोल पद्मा चव्हाण यानी केला होता..शेवटी आई वेडी होते तो सिन पद्मा ताईनी अप्रतिम वटवला होता फय्याज शोभत नाहित त्या भुमिकेत. थोराड वाटतात

हे वाचून एक घटणा आठवली. मागच एका प्रतिसादात लिहलं होतं. इथं पुन्हा चिकटवतोय.
एक आठवणः २००४ साली एक वेडसर भिकारी बाई सेनापती बापट रस्त्याच्या (ज्यावरून रोज लाखो लोकं जायची) कडेला उकिरड्यावर बसलेली दिसायची. दोन-तीन महिन्यानंतर बघितलं तर ती चक्क गरोदर होती. मग १-२ दिवस ती काहीच हलचाल न करता पडलेली दिसली आणि दुसर्‍या दिवशी ती तशीच दिसली तेंव्हा तीसर्‍या दिवशी तिला (बहुतेक) म्युनिसीपाल्टीनं उचलून नेलं. मी दोन्-तीनदा कुठल्याश्या संस्थेत फोन करून कळवलं होतं पण काहीच झाल नाही. आणि जास्त काही केलं नसल्याची टोचणी नाही.
तुमचा हेवा वाटतो. अस्वस्थ होण्यासाठी तुम्हाला चित्रपट बघावा लागतो. कधिकधी शोषीत लोकांना त्यांच्या सोबत काय होतय हे देखिल त्यांना कळत नसतं ते बरच आहे असं वाटत. :(

हेच खरं. जागात अशा कितीतरी गोष्टी घडत असतात. त्या वाचून बघून ऐकून फक्त आपल्या हतबलतेची जाणीव होते. मी तर हल्ली असे सिनेमे बघणेच सोडून दिले आहे. अक्षयकुमार नाहीतर सल्लू आपले बरे. :(

In reply to by पैसा

अक्षयकुमार नाहीतर सल्लू आपले बरे.
असेच वाटते. :(
मी तर हल्ली असे सिनेमे बघणेच सोडून दिले आहे.
मला वाटते समाजातील विकृती आणि तत्सम वाईट गोष्टींचे भेदक शब्दांकन/चित्रांकन करणे वेगळे आणि भडक शब्दांकन/चित्रांकन करणे वेगळे. सध्या तेंडूलकर, दळवी आदींचा काळ राहीलेला नाही... हल्ली बर्‍याचदा भडकपणा असतो, त्यामुळे नेहमीच अस्वस्थता आली अथवा नाही तरी ते बघायला नको वाटते.

त्या प्रसंगानंतर मच्छिंद्र काम्ब्लींचे पात्र निलाजर्या सारखे विचारते "काय मास्तर झाला सगळे नी"??"... फार नाही...तो आपल्या समाजाचाच एक मुख्य भाग रीप्रेझेंत करत होता

अंगावर येणारे चित्रपट, त्यातले प्रसंग एवढे उघडेवाघडे आणि बीभत्सच असतात असंही नाही. दोन चित्रपट, प्रसंगांबद्दल लिहावंसं वाटलं. एक म्हणजे अलिकडेच पाहिलेला, सबीहा सुमर या पाकीस्तानी दिग्दर्शिकेचा 'खामोश पानी', किरोन खेर त्यात आयेशाच्या प्रमुख भूमिकेत आहे. आयेशाला विहीरीबद्दल भीती असते, ती कधीच तिथे पाणी भरायला जात नाही. त्याला फाळणीच्या वेळी तिच्या घरच्यांनी, गावातल्या इतर लोकांनी संपूर्ण गावातल्या शीख मुलींना विहीरीत ढकलण्याचा भूतकाळ असतो. चित्रपटाच्या शेवटी डीफोकस्ड विहीर आणि विहीरीच्या भिंतीवर उभी असलेली किरोन खेर हे दृष्य अतिशय अंगावर येणारं आहे. दुसरा द. आफ्रिकन-ब्रिटीश चित्रपट 'स्किन'. गोर्‍या आई-वडलांची सावळी मुलगी सांद्रा या चित्रपटाची नायिका आहे. आई-वडलांच्या इच्छेविरोधात ती कृष्णवर्णीय तरूणाशी पळून जाऊन लग्न करते. नवरा आणि तिचं भांडण होतं तेव्हा तो तिला मारतो. चेहेर्‍यावरचं रक्त ती उपलब्ध असलेल्या एका घमेल्यातल्या पाण्यात धुते आणि तिची बारकी पोरं ते पाणी पुढे घरासमोरच्या बागेतल्या झाडांना घालतात. मुलं-आई हे वेगवेगळ्या लोकांचं नातं या चित्रपटात खूप सुंदर दाखवलेलं आहे; पण हा प्रसंगही फार अंगावर आला. या चित्रपटाबद्दल तपशीलात इथे लिहीलेलं आहे. (दुवा ऐसी अक्षरेवर जातो.)
आर्ट इज नॉट आर्ट टिल इट डिस्टर्ब्स यु.
हे मात्र मला अजिबात मान्य नाही. कलेसाठी कला असते, आणि अशी अनेक चित्रं, फोटो मला आवडतात. उदाहरणार्थ चित्रकार जयंत जोशी यांनी फेसबुकावर टाकलेला हा फोटो: jayant joshi - photo

जयवंत दळवींच्या 'महानंदा' ह्या कादंबरीचं शंनांनी केलेले नाट्यरुपांतर म्हणजे 'गुंतता हृदय हे'. मी पाहिले तेंव्हा डॉ. काशिनाथ घाणेकर, आशालता वाबगावकर, राजा मयेकर आदी दिग्गज कलावंत होते. अत्यंत प्रभावी आणि खिळवून ठेवणारे नाटक फिरत्या आणि सरकत्या रंगमंचाच्या साहाय्याने सादर केले जायचे. वरील लेखात उल्लेख असलेला प्रसंग त्यात नव्हता. पण नाटक फार सुंदर होते.

मानवप्राण्याच्या आदीम प्रेरणा आणि सभ्य समाजाची कृत्रीमता... अति प्राचीन संघर्ष. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

सभ्य समाजाची कृत्रिमता की कारुण्य, वात्सल्य, माणुसकी, दया, सहवेदना आदि मानवाला पशूतुल्य पातळीवरुन उंच नेऊन ठेवणार्‍या गोष्टींची अपेक्षा?

In reply to by शुचि

कारुण्य, वात्सल्य वगैरे देखील आदीम प्रेरणाच आहेत. या प्रेरणांचा कृत्रीमतेशी होणारा संघर्ष कधि अंगावर येतो तर कधि गोड शहारे वगैरे येतात. माणुस कितीही "उंच" गेला तरी तो पशूपातळीच्या "वर" जाऊ शकत नाहि... जसं आपण कधिच स्वतःच्या खांद्यावर बसु शकत नाहि. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

पशूपातळीच्या "वर" जाऊ शकत नाहि..
म्हणजे? पशु आजारी मादीवर अत्याचार करतात? माजावर न आलेल्या मादीकडे अश्या मागण्या वा जबरदस्ती करतात? काय म्हणौन पशुंची नावं खराब करताय राव?

In reply to by स्पंदना

>> पशु आजारी मादीवर अत्याचार करतात? माजावर न आलेल्या मादीकडे अश्या मागण्या वा जबरदस्ती करतात? -- हो. पशु आजारी मादिवर अत्याचार करतात, माजावर आलेल्या मादीवर जबरदस्ती तर नाहि माहित, पण मागण्या अवश्य करतात. एव्हढच कशाला... कळपाच्या नव्या नायकाची फेव्हरेट व्हायला गर्भार माकडीण देखील त्याच्या मागण्या पुरवते. पशुंमध्ये कृत्रीमतेला अजीबात थारा नाहि. पशु नेहमीच इन्स्टीक्ट बेस्ड आचरण करतात. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

पशूंमधे नैसर्गिकतः आजारी, अपंग पिल्लांकडे दुर्लक्ष करणे इ. प्रकार होतात (survival of the fittest). शहरीकरण, आधुनिकीकरण झालेल्या (आणि आर्थिक ऐपत असणार्‍या) कोणत्याही मानवसमाजात अपंग, आजारी मुलं, वयस्कांकडे दुर्लक्ष होत नाही. पशूंच्या वर आपण कधीच पोहोचलो आहोत. (काही मनुष्यसमाजांमधेही survival of the fittest असा प्रकार दिसतो. कलाहारी वाळवंटात आजही अप्रगत टोळ्या सतत स्थलांतर करून रहातात. त्यांच्यात म्हणे, स्थलांतर करण्याची वेळ आली तर कोणीही गरोदर माता, तिचा प्रसववेणा, दूध पिणारी मुलं वगैरेंवर दयामाया दाखवत नाही. यातून जे जगतात ते तिथे तशा प्रकारच्या जगण्यासाठी योग्य असतात.) "नॉट विदाऊट माय डॉटर" असे प्रकार पशूंमधे कितपत होतात मला माहित नाही; मनुष्यांमधे सर्रास होताना दिसतात. पिलाला पायाखाली घेणारी माकडीण असते, मनुष्य नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नॉट विदाऊट माय डॉटर प्रेरणेमुळे शक्य होते कृत्रीमतेने नाहि. मणुस पशु बनुनच तसं वागु शकतो. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

पशू आणि माणसातला फरक सांगणारे एक चाणक्याचे वचन आठवले: येषां न विद्या न तपो न दानं, ज्ञानं न शीलं न गुणो न धर्मः । ते मृत्युलोके भुवि भारभूता, मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति। प्राण्यांमध्ये पण भूतदया (माणूसकी?) असते याचे म्हणले तर विचित्र उदाहरण हे खालील नॅशनल जिओग्राफिकच्या चित्रफितीत बघता येईल. बिबट्या वाघाने एका माकडीणीस मारले. त्यावेळेस तिच्या पायाला चिकटून तिचे पिल्लू बसले होते. त्याला मात्र नुसते सोडून दिले नाही तर त्याची काळजी घेतली...

In reply to by स्पंदना

http://en.wikipedia.org/wiki/Animal_sexual_behaviour#Rape आपल्या ओळखीच्या बदकं, गीस आणि white-fronted bee-eaters या प्राण्यांमधे मादीने नराचं लक्ष वेधून घेतल्यास तिच्याशी जबरदस्तीने संभोग होतो. विशेषतः अशा प्रकारचा संभोग, अंडी घालण्यासाठी तयार मादीवर अधिक प्रमाणात होतो. (विकीपीडीया आणि त्यात उल्लेख केलेले अन्य संदर्भ)

In reply to by स्पंदना

http://yaledailynews.com/blog/2005/09/20/evolution-not-culture-deserves… Indeed, rape is common in the animal kingdom, and is observed in insects, 39 species of birds, reptiles, fish, marine mammals and the great apes मराठीतः बलात्कार ही प्राणीजगतात सामान्यपणे होणारी गोष्ट आहे. किडे, पक्ष्यांच्या ३९ जाती, सरपटणारे प्राणी, मासे, जलचर सस्तन प्राणी आणि एप्सच्या काही प्रजातींमधे बलात्कार होतात असं दिसून आलेलं आहे. (या लिंकच्या खालीही अन्य संदर्भांचे तपशील आहेत.)

In reply to by अर्धवटराव

माणुस कितीही "उंच" गेला तरी तो पशूपातळीच्या "वर" जाऊ शकत नाहि... जसं आपण कधिच स्वतःच्या खांद्यावर बसु शकत नाहि. अर्धवटराव, तुम्ही नेहमीच रेडि टु थिंक असता हो, आम्हाला का कामाला लावता असलं काहीतरी लिहुन..

In reply to by ५० फक्त

माणूस पशूपातळीच्या वर जाऊ शकला असता तर जगातील समस्या निम्म्याने तरी कमी झाल्या असत्या. जे व्यक्तीगत पातळीवर पशूपातळीच्या वर गेले त्यांनी मानवजातीच्या ईतिहासात आपले नांव कोरुन ठेवले आहे.

In reply to by ५० फक्त

५० राव, एका झटक्यात आमचं विमान खाली उतरवलत :) त्याचं काय आहे, आमचे विचार थोडे जुनाट पद्धतीचे आहेत. म्हणुन थोडं कन्फ्युजन होतंच. कुठल्याही वासनाकांडाला शरीरात कामुकतेचे उफाळणाअरे घुमारे कारणीभूत असतात. त्याचं सिंपल कारण म्हणजे माणसाचं काम इन्स्टीक्ट्ला शरण गेलं असतं... आणि त्यावर एकमेव उपाय म्हणजे कामाच्या ऐवजी रामाला शरण जाणे. शिवाजीच्या राज्यात वासनानंधांना किती कठोर शिक्षा व्हायची वगैरे गप्पा खुप ऐकतो आपण. पण शिवाजी "हृदयस्थ नारायणे प्रेरणा केली" या तत्वावर जगला हे आपण साफ विसरतो. हा हृदयस्थ सर्वांभूती अव्हेलेबल आहेच. त्या राम इन्स्टीक्ट्ला शरण जाऊन कल्याण साधुन घेण्याऐवजी काम इन्स्टीक्टच्या कच्छपी लागलो तर सत्यानाश नाहि तर आणखी काय होणार. माणसाला हे डीसीजन पशुपातळीवरुनच घ्यायचे असते...आत्मसमर्पण हा पशुचाच गुण आहे. (शुचे, तुझ्या धाग्याला शंभरी गाठायचे इंधन पुरवलेय गो... पॉपकॉर्ण, कोल्डड्रीक्न वगैरे तयार ठेव) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

नाही हो, असं नका म्हणु. तुम्ही जे विधान लिहिलंत ना त्यामुळं संवेदनाशुन्य झालेल्या मेंदुला पुन्हा एक झटका बसला, म्हणुन तसं लिहिलं होतं.

In reply to by अर्धवटराव

आणि त्यावर एकमेव उपाय म्हणजे कामाच्या ऐवजी रामाला शरण जाणे. शिवाजीच्या राज्यात वासनानंधांना किती कठोर शिक्षा व्हायची वगैरे गप्पा खुप ऐकतो आपण. पण शिवाजी "हृदयस्थ नारायणे प्रेरणा केली" या तत्वावर जगला हे आपण साफ विसरतो. हा हृदयस्थ सर्वांभूती अव्हेलेबल आहेच. त्या राम इन्स्टीक्ट्ला शरण जाऊन कल्याण साधुन घेण्याऐवजी काम इन्स्टीक्टच्या कच्छपी लागलो तर सत्यानाश नाहि तर आणखी काय होणार.
काम इन्स्टीन्क्टवर मात करण्यासाठी राम इन्स्टीन्क्टला शरण जायलाच हवे असे काही नाही. ज्याचे डोकं ठिकाणावर आहे, ज्याची विवेकबुद्धी जागृत आहे तो राम इन्स्टिन्क्टला शरण न जाताही स्वतःवर नियंत्रण मिळवू शकतो. आणि ज्याची विवेकवृत्ती गंडली आहे तो एकाच वेळी राम आणि कृष्ण इन्स्टीन्क्टला शरण गेला तरी तो दिवे लावणारच.

In reply to by धन्या

"काम इन्स्टीन्क्टवर मात करण्यासाठी राम इन्स्टीन्क्टला शरण जायलाच हवे असे काही नाही" -- विवेक बुद्धीचे घरचे दार उघडण्यापुर्वी प्रेरणेचे फाटक उघडणे आवश्यक आहे. विवेकाचा वृक्ष प्रेरणेच्या खत-पाण्यानेच तग धरु शकतो, बहरु शकतो. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

सगुणाचेनि आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे, सार असार विचारे, संतसंगे! ह्यात विवेक म्हणजे सार व असार विचार. सार म्हणजे टिकणारे, असार म्हणजे न टिकणारे. हल्लीची पिढी सगुण रामाचा विचार न करता देखील(कारण बुद्धीभेदामुळे भक्तीचा भाव निर्माण होत नाही)नकळतच विवेकी असू शकते. 'साध्य' साध्य झाल्यावर असा राम नसला तरी चालून जावं.

In reply to by प्यारे१

रामइन्स्टीक्टमधे "राम" वा "रामायण" शब्दाचा संबंध नाहि. सारासार विचार करायला तयार होणे व सार स्विकारायला मान्यता देणे हिच ती नारायणी प्रेरणा. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

+१०० धनाजीरावांच्या प्रतिसादाला उत्तर देताना अगदी हेच लिहीण्यासाठी आलो खाली तर अर्धवटरावांनी माझे कष्ट वाचवलेले दिसले. रामइन्स्टीक्ट मधला राम हा Metaphor, रूपक, आहे. - (राम इन्स्टीक्ट आचरणात आणण्याचा सदैव प्रयत्न करणारा) सोकाजी

In reply to by अर्धवटराव

बरोबर आहे. त्यासाठीच साध्य झाल्यावर 'राम' असला काय नि नसला काय असं म्हणालो. 'नर का नारायण' म्हणताना नारायण म्हणजे त्याचे गुण लक्षात घेणं नि त्या गुणांची माझ्याकडून जोपासना होत आहे का ते पाहणं जास्त आवश्यक आहे. रामराज्यामध्ये देखील पूर्ण व्यवस्था कुणावरही अन्याय न होता चालणं अपेक्षित आहे. त्यात राजा राम नसला तरी ते रामराज्यच. आपण एकच बोलतोय बहुतेक. :)

दळवी तेंडुलकर आजच्या काळात आहेत कोठे नाही म्हणायला राजन खान व कविता महाजन लिहितात. आजकाल जमाना बेगड्या डेलीसोप चा आहे , समाजात घडणाऱ्या गोष्टी दृष्टिआड करून आपल्या परंपरांचे गोडवे गाण्याचा आहे, लहानपणी दूरदर्शन वर तेंडुलकरांची नाटके लागायची , लालन सारंग ह्यांचा जीव ओतून केलेला अभिनय , त्यांची उच्चारलेले एक एक वाक्य त्यांची संतप्त देहबोली , समस्त पुरुष जातीवर आसूड ओढत , १० वर्षाच्या वयात असा प्रसंग अंगावर यायचा. महिलांवर अत्याचार म्हणजे भयंकर असेच मनात ठाम ठसले , भेंडे ह्यांची आव्हान मालिका त्यात निशिगंधा वाड चे हुंड्या साठी हाल करणारी दया डोंगरे चा प्रसंग पाहून ह्याच वयात आयुष्यात कधी हुंडा घेणार नाही असा निर्धार केला होता , आता हे सर्व आठवले तर त्या पोर वयात मनावर कधी न पुसणारं संस्कार ह्या प्रसंगातून घडला. मनोरंजनात प्रबोधन असेच काहीतरी ह्या प्रकाराला म्हणतात. सध्या टीव्हीवर मनोरंजनाचा पत्ता नसतो , प्रबोधन दूर राहिले.

भेंडे ह्यांची आव्हान मालिका त्यात निशिगंधा वाड चे हुंड्या साठी हाल करणारी दया डोंगरे चा प्रसंग पाहून ह्याच वयात आयुष्यात कधी हुंडा घेणार नाही असा निर्धार केला होता या मालिकेचे नाव आव्हान होते. जाता जाता :--- बॉलिवूड मधे खलनायकाची भुमिका करणारे रणजित यांनी चित्रपटात सगळ्यात जास्त वेळा रेप सीन साकारला आहे म्हणे !असे सीन लोक आवडीने कसे बघु शकतात हेच मला कळत नाही ! :( हल्लीच असाच एका चित्रपटातला सीन पाहिला होता,सयाजी शिंदे हे एका गरिब स्त्रीवर बलात्कार करतात,ते दॄष्य पाहुन लयं वाईट वाटलं होतं. :(

In reply to by मदनबाण

सयाजी शिंदे हे एका गरिब स्त्रीवर बलात्कार करतात,ते दॄष्य पाहुन लयं वाईट वाटलं होतं. :(
हा हा. तो ज्वागींगवाला का? :)
असे सीन लोक आवडीने कसे बघु शकतात हेच मला कळत नाही!
राजूचा मद्रासी अंन्ना आठवला. तो एका बिहार्‍याला म्हणतो, आय डोन्ट लाइक, इंदी फिलम. हमारा कन्नड मुवीमे दो-दो रेप. और रेपमे स्ट्रगल दिकाताय. वो भागातय, फिर छोडताय, इदर आताय, उदर जाताय. हमभी इदर स्ट्रगल करके आया. तो स्ट्रगल दिकातातो हमकू बौत अच्चा लगताय. :)) शेवटी पडद्यावरचं खोटंच असतं. त्यामुळे त्याचं काही विशेष नाही. पण पेपरमधल्या घडलेल्या बलात्काच्या बातम्या देखिल चवीचवीने वाचणारी लोकं आहेतच म्हणा. :(

In reply to by मदनबाण

या मालिकेचे नाव आव्हान होते. माझ्या हायलाईट केलेल्या प्रतिसादात मी ह्या मालिकेच्या नावाचा स्पष्ट उल्लेख केला आहे त्यासंबंधी वेगळे विधान का बरे केले.:) असो ही मालिका आत्माराम भेंडे ह्यांनी हुंडा बळी ह्या समाजातील तत्कालीन रूढीवर प्रहार करण्याकरिता निर्माण केली होती , ह्याच कथानकावर आधारीत सिनेमा सुद्धा होता , त्याचे नाव आठवत नाही , त्याबद्दल विधान मदनबाण ह्यांनी केले तर आवडेल;) .

In reply to by निनाद मुक्काम …

ह्याच कथानकावर आधारीत सिनेमा सुद्धा होता पुढचं पाउल त्यातले एक सुरेल पण करूण गाणे आठवले... ही मालिका आत्माराम भेंडे ह्यांनी हुंडा बळी मला आठवत नाही पण आत्माराम भेंडे नक्की का? जरा साशंक आहे.

In reply to by विकास

आपल्या बायकोला, मुलाला शेण खायला सांगणारा राजदत्त, राग गिळत बोटं मोजत बसणारा मुलीचा अगतीक बाप निळु फुले... कसलं काम केलय जबरी. अर्धवटराव

In reply to by निनाद मुक्काम …

माझ्या हायलाईट केलेल्या प्रतिसादात मी ह्या मालिकेच्या नावाचा स्पष्ट उल्लेख केला आहे त्यासंबंधी वेगळे विधान का बरे केले. हापिसातुन घाईने प्रतिसाद देण्याचा परिणाम हाय ह्यो. स्वारी बरं का. :)

In reply to by मदनबाण

बाणा चलता हे. You're Welcome घाई घाईत लिहितांना मी पूर्वी शुद्धलेखनाच्या अक्षम्य चुका करायचो. जुने दिवस विसरून कसे चालेल. विकासराव , असे काय करता भेंड्यांची मालिका ,आव्हान त्यात दया डोंगरे सासू , उदय टिकेकर नवरा व सून म्हणून निशिगंधा व सासरा म्हणून भेंडे जीव ओतून काम केली होती त्यांनी , पुढे भेंडे आपले राहते घर हुंडाबळीच्या विरोधात कार्य करणाऱ्या संस्थेला दान करतात. तर टिकेकर वेडा होतो , त्याचे नाव श्री असते. त्यात निशिगंधा चे होणारे हाल ,दया डोंगरे ची खाष्ट ,कजाग सासू . सारे कसे लख्ख आठवते , हुंडा बळी व जळून मरणे अशी अघोरी प्रथा आपल्या सुशिक्षित समाजात निर्माण झाली होती , ह्या मालिकेने तिचा गवगवा झाला , अपेक्षित परिणाम साधल्या गेला. व हुंडा बळीचे प्रमाण बरेच कमी झाले. आव्हान पुरे आव्हान अश्या आशयाचे टायटल ट्रेक अजून लक्षात आहे. सिनेमाच्या नावासाठी धन्यवाद Animated Thanks

In reply to by निनाद मुक्काम …

भेंड्यांची मालिका ,आव्हान... त्यात दया डोंगरे सासू , उदय टिकेकर नवरा व सून म्हणून निशिगंधा व सासरा म्हणून भेंडे जीव ओतून काम केली होती त्यांनी ,
मालीका आणि त्याचे शिर्षकगीत अर्थातच चांगले लक्षात आहे.. आत्माराम भेंडे हे त्यात सासरे होते हे माहीत आहे पण तुम्ही आधी म्हणल्याप्रमाणे, "ही मालिका आत्माराम भेंडे ह्यांनी हुंडा बळी ह्या समाजातील तत्कालीन रूढीवर प्रहार करण्याकरिता निर्माण केली होती ," अर्थात भेंडे दिग्दर्शक आहेत का असे विचारत होतो कारण तसे आठवत नाही. त्याही आधी त्याच विषयावरचे आणि दळवींच्या कादंबरीवरचेच "पर्याय" हे नाटक देखील आले होते.

In reply to by विकास

नंदू भेंडे त्यांचे सुपुत्र आणि त्यांच्या गाण्याचा मी पंखा मुंबईत त्यांचे अनेक कार्यक्रम पहिले आहेत, त्यांच्यावर एकदा आंजा वर फावल्या वेळात शोधाशोध करत होतो तेव्हा आत्माराम ह्यांच्या विषयी ही माहिती मिळाली , व लहानपणी पाहिलेल्या त्या मालिकेच्या सर्व आठवणी ताज्या झाल्या. व त्यांच्या विषयी आदर दुणावला.

In reply to by मदनबाण

नायकापेक्षा खलनायकी भूमिका वठवताना अधिक कसब लागते असं माझं वैयक्तिक मत आहे. जर प्रेक्षकवर्गाचं प्रातिनिधिक मत म्हणून सयाजी शिंदेंच्या त्या भूमिकेबद्दलचं तुझं मत ग्राह्य धरलं तर सयाजी शिंदे कसोटीवर पुरेपूर खरे उतरले आहेत. ऐकिव माहितीनुसार नाना पाटेकर जेव्हा पुरुष करत असे, तेव्हा एका प्रयोगावेळी प्रेक्षकांमधून एका बाईनं "मेल्या..हलकटा" असं म्हणून आपली पायची चप्पल फेकून स्टेजावर फेकून मारली होती नानास. प्रयोग क्षणभर थांबवून नाना पाटेकरांनी ती चप्पल उचलून नमस्कार केला अन पुढे प्रयोग चालू ठेवला. ती केल्या गेलेल्या अभिनयास सर्वोत्कृष्ट दाद होती असं नाना पाटेकरांचं म्हणणं होतं असं ऐकून आहे. (खरंखोटं नाना जाणे!) एके काळी जेव्हा आमचे निळूभाऊ फुल्ल फार्मात होते, त्यावेळी कोणाकडे ते गेले तर त्यांच्याकडे चहा वगैरे माजघरातून पुरुषांनाच आणावा लागे कारण घरच्या बायका घाबरत. हे त्या त्या कलाकाराचं यश आहे. बाकी ह्या संदर्भात वैचारिक वगैरे बाबींवर बोलणाची माझी अर्थातच लायकी शून्य आहे त्यामुळे त्याबाबत काही बोलत नाही. मुळ धाग्यासंदर्भात - पुन्हा तेच मत. जर प्रेक्षकाला अमुक एका गोष्टीची चीड आली, तिडीक आली, किळस वाटली....तर त्या त्या संदर्भात ते अभिनेता, दिग्दर्शक, कॅमेरामन आणि अर्थातच लेखक्/पटकथालेखक ह्यांचं ते यश आहे असं नि:संशय मानावं असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण.....अहो, त्यांना जे तुम्हाला दाखवायचं होतं ते इतकं प्रभावी जमून गेलंय, की तुमच्या मनावरचा त्याचा पगडा (भला/बुरा कसा का असेना) हटायला तयार नाही!

In reply to by धमाल मुलगा

नायकापेक्षा खलनायकी भूमिका वठवताना अधिक कसब लागते
"पाखरू नवीन दिसतंय गावात" किंवा "सांच्याला वाड्यावर या " हे आपले एकदम फेव्हरेट !

In reply to by मालोजीराव

पण..काय है ना, ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी! द्या टाळी सरदार :)

In reply to by धमाल मुलगा

पारुबाई पारुबाई माडीवर ये...नाशिवतो तुला ( आणि ति खुंखर नजर ) अर्धवटराव

"आर्ट इज नॉट आर्ट टिल इट डिस्टर्ब्स यु. .." हे वाक्य काही विशिष्ट संदर्भांत खरं आहे -पण सार्वकालिक नाही. चित्रपटातलं दृष्य पाहून अस्वस्थता येते त्याच्या कैक पट अस्वस्थता प्रत्यक्षात अशा स्त्रियांशी आपण बोलतो तेव्हा येते. चित्रपट एखादं "उदाहरण" दाखवतो - प्रत्यक्षात ते जगणं अनेकींच्या वाट्याला आलेलं पाहताना सुन्न होऊन जातो आपण.

ह्युमन इज जस्ट अनदर अ‍ॅनिमल ऑन प्लॅनेट अर्थ. त्यामुळे त्याने कितीही माणसाळायचा प्रयत्न केला तरी कधी ना कधी आपले "अ‍ॅनिमल इन्स्टिन्क्ट" दाखवणारच.