-पारिजातक -
-पारिजातक -
तुझ्या अंगणातली ती फुले,
ओंजळ भरून घ्यायचे मी ...
तू मात्र ती मोजून बघायचास ,
आणि त्या खोडावर लिहून ठेवायचास.....
मग रागाने फेकून फुले ती, तुझ्याच अंगावर ..
मी निघून जायचे .. तशीच ..!!
दिवस बदलत गेले,
अल्लडपणा संपत गेला ...
मग चुकून समोर आलोच;
तर अडखळत बोलायचो ...
नाहीतर….एरवी नजरही टाळायचो आपण...
..पारिजातक मात्र बहरत राहिला ...तसाच ..!!
मग बाबांची बदली झाली तेव्हा,
"काहीतरी राहतंय " म्हणून;
सामान भरत बसले होते मी ... "त्या " दिवसभर ..
आणि तुझ्या घरातला एक दिवा
सतत चालू बंद होत होता ... "त्या " रात्रभर ..
निरोप नव्हता द्यायचा तर
स्टेशन वर का आला होतास ...असंच ?..
काही वर्षांनी..तुझे लग्न जमल्याची
बातमी कळली ..
बोचलं नाही काही;पण
सलत राहिलं काहीतरी ...
हुरहूर होती ती,
पण कसली ते कळलंच नाही,
पारिजातकाची आठवण आली ...उगीचंच...!!
काल सगळे तुझ्या घरी भेटलो तेव्हा
जुन्या नजरा नव्याने टाळल्या आपण,
निघतांना...का कुणास ठाऊक ......
पारिजातकाकडे पाहायचं टाळलं मी;
पण नाजुकश्या फुलांनी लक्ष वेधलंच ..
....बहरला होता तो आख्खा ....
फक्त खोडावर कोरलं गेलं होतं काहीतरी...कायमचंच !!!
---फिझा.
छान...
काय आयुष्य असत ना?
सापडतच नाही हातात, बघाव
भन्नाट
तुमच्या कविता छानच असतात!
कविता आवडली.
पारिजातक आवडला
कविता अतिशय आवडली.
बोहोत खूब!!!
पहिलं आणि शेवटचं कडवं आवडलं .