Skip to main content

गहाणात ७/१२.....

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 13/02/2013 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
गहाणात ७/१२.....

गहाणात हा सातबारा वगैरे
तरी वाढतो शेतसारा वगैरे

कुठे राहिली आज ही गाय माझी?
घरी खात नाहीच चारा वगैरे

रुबाबात लक्ष्मी पुसे शारदेला
हवी काय खुर्ची, निवारा वगैरे?

मला अन्य काहीच पर्याय नाही
करावाच लागेल ’मारा’ वगैरे

बढाई असूदे तुझी तूजपाशी
कुणी ना इथे ऐकणारा वगैरे

कशाला अशी सांग दर्पोक्तवाणी?
तुला कोण येथे भिणारा वगैरे?

खुले नेत्र ठेऊन गिळतो नशेला
खरा तोच असतो पिणारा वगैरे

कधी झोप मोडेल सुस्तावल्यांची?
किती वाजवावा नगारा वगैरे

इथे पावलोपावली लाचखोरी
कुणाचाच नाही दरारा वगैरे

’अभय’ भोवती घे लपेटून धारा
प्रवाहास नसतो किनारा वगैरे

                                  - गंगाधर मुटे
------------------------------------------
(धन्यवाद वैभव जोशी)
लेखनविषय:

वाचने 4924
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

कृपया मला अन्य काही पर्याय नाही ही ओळ मला अन्य काहीच पर्याय नाही अशी वाचावी.

खुले नेत्र ठेऊन गिळतो नशेला खरा तोच असतो पिणारा वगैरे

रुबाबात लक्ष्मी पुसे शारदेला हवी काय खुर्ची, निवारा वगैरे? मुजरा मुटेसरकार!

मतला आणि निवारा खूप खूप खास!

विशालभौ, अमेयजी धन्यवाद. कुठे राहिली आज ही गाय माझी? घरी खात नाहीच चारा वगैरे हा शेर जिथे ढेप-सरकी तिथे थांबते ही घरी खात नाहीच चारा वगैरे असा वाचून पहावा.

काही कडवी छान जमली आहेत. खुले नेत्र ठेऊन गिळतो नशेला खरा तोच असतो पिणारा वगैरे ’अभय’ भोवती घे लपेटून धारा प्रवाहास नसतो किनारा वगैरे व्वा!

कविता आवडली आणि पटलीही..

छान