Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आदूबाळ on Sun, 01/27/2013 - 22:24
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विरंगुळा
तुम्हाला शास्त्रीय संगीताची आवड आहे. तुम्हाला मैफिलींना जाण्यासाठी वेळ आणि संधी आहे. पण त्या मैफिलीचा आनंद तुम्ही किती प्रमाणात घेऊ शकणार आहात, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. गायक, राग, ध्वनिव्यवस्था वगैरे वगैरे. अजून एक महत्त्वाचा घटक त्यात आहे - तुमचा शेजारी. मैफिलीत तुमच्या शेजारी बसणारा इसम. मैफिली ऐकण्याच्या १५ वर्षांच्या कारकीर्दीत मला अनेक शेजारी लाभले. म्हणजे काही 'लाभले' आणि काही 'भोगावे लागले'. त्यांच्या जातकुळ्याही लक्षात यायला लागल्या. मैफलप्रेमी मिपाकरांसाठी हे "रेडी रेकनर". १. अं.ज.जे. (अर्थात 'अंग्रेज के जमाने के जेलर'): हे लोक म्हणजे खानदानी शास्त्रीय संगीत श्रोते. वर्षानुवर्ष मैफिलींना येतात. सवाई गंधर्वसारख्या मैफिलीत त्यांची जागा ठरलेली असते. आजूबाजूला त्यांच्यासारखेच अं.ज.जे. असतात. त्यांना ते एरवी ओळखत असतील असं नाही. फक्त सवाई-ते-सवाई भेट होते. सवाईचे सगळे अलिखित नियम त्यांना माहीत असतात आणि स्वतः मनापासून पाळतात. गाण्यातून मधूनच उठून जाणार नाहीत. सतरंजीवर यायच्या आधी चपला हातात काढून घेतील. गाणं चालू असताना आपापसात बोलणार नाहीत. वेफर्ससारखे 'नादमय' पदार्थ गाणं सुरू असताना खाणार नाहीत. मधल्या वेळेत उठून गेले तर पिशवी, पर्स बिनधास्त तिथेच ठेवून जातील - कारण आजूबाजूचे अं.ज.जे. लक्ष ठेवतील अशी खात्री असते म्हणून नाही, तर सवाईमध्ये चोरी होणारच नाही याचा विश्वास असतो म्हणून! गाण्यांच्या मधल्या वेळेत "हा बागेश्री जमला नाही - कोमल निषाद नीट लागला नाही" वगैरे चर्चा करतात. रात्रीच्या सवाईच्या आठवणी काढून रमतात. (नाचाची आवड नसेल तर) शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमाला हमखास झोपतात. 'सकाळ'मध्ये 'रात्रभर रांग लावून तिकीट मिळवलं' असले जे फोटो येतात ते हेच ते. कुठलाही नवीन प्रकार त्यांच्या पचनी पटकन पडत नाही. त्यामुळे हे लोक तुम्हाला वसंतोत्सवामध्ये दिसणार नाहीत. काही जुन्या प्रकारांना सुध्दा नाकं मुरडतात. ("सुंद्रीवादन नाही यंदा ते बरंय" असा एक कुजकट शेरा एका अं.ज.जे.ने उगाचच मारला होता.) एखाद्या गायक/गायिकेने नाट्यसंगीत, भजन असं भरताड लावलं तर "ओंकारेश्वर मंदिर नाही हे" असं सुद्धा म्हणतात. थोड्या गोष्टी सहन केल्या तर त्यांचा शेजार आनंददायी असतो. पडली तर ज्ञानात भरच पडते. पण कायम शहाण्या बाळासारखं वागायचं (मला तरी बुवा) दडपण येतं. म्हणून शक्यतोवर हा शेजार मी टाळतो. २. टिपणीस: टिपणीस हे रेकॉर्डिंग करणारे लोक. आता मैफिलीला आलोय तर छान गाणं ऐकायचं सोडून जवळचा रेकॉर्डर काढतील आणि सगळं टिपून घेतील. स्पीकरच्या जवळची जागा पटकावतात. काही मैफिलीत मांडवाबाहेर स्पीकर लावलेले असतात त्याच्यासमोर रेकॉर्डर "नाझी सॅल्यूट" पद्धतीने धरून उभे असतात. आजूबाजूच्या लोकांनी मुडद्यासारखं गप पडून रहावं अशी त्यांची अपेक्षा असते. एखाद्या जागेला "क्या बात है" वगैरे दाद शेजार्याने दिली तर त्याच्याकडे खाऊ का गिळू अशा नजरेने पहातात. पण एखादं गाणं खूप रंगलं आणि संपूर्ण प्रेक्षागार दाद देत असेल, तर चक्क उभे राहून रेकोर्डर गोल गोल फिरवून ती दादही टिपून घेतात! पूर्वी टिपणीस लोक जरा दुर्मिळ होते - कारण फार खटपटी कराव्या लागायच्या (मोठ्ठा रेकॉर्डर संभाळणे, विजेचा पॉईंट शोधणे, वेळोवेळी कॅसेटी बदलणे वगैरे). पण तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे टिपणीसांची वीण वाढली आहे. गाणं कसं झालं यापेक्षा ते नीट 'टिपलं' गेलं आहे की नाही याचीच चिंता त्यांना जास्त! एखाद्या टिपणीस काकांशी तुमची दोस्ती झाली तर रेकॉर्डर कुठल्या बनावटीचा आहे, सिंगापूर किंवा दुबईहून चिरंजीवांनी/सुकन्येने कसा पाठवला, पूर्वी ग्रुंडिगचे रेकॉर्डर यायचे तेव्हापासून कसं काका टिपणीसगिरी करायचे, वगैरे सगळं ऐकून घ्यावं लागेल. टिपणीसांच्या शेजारी बसणं शक्यतोवर टाळा. चुकूनमाकून बसलातच तर आवंढा गिळण्याचा आवाजही येऊ देऊ नका. ३. कोठावळे: हे टिपणीसांचे भाऊ. टिपणीस टिपतात आणि कोठावळे साठवतात. हे लोक पट्कन लक्षात येत नाहीत. पण दोन गाण्यांच्या मधल्या वेळात गाठून "माझ्याकडे अमुक इतके जी बी गाणी आहेत" वगैरे पकवतात. मल्लिकार्जुनचा १९५६ सालचा भीमपलास आपल्याकडे कसा आला याच्या ष्टोर्या लावतात. कॅसेटींच्या सीडी कशा करून घेतल्या वगैरे सांगतात. कुठल्या ना कुठल्या टिपणीस काकांशी यांचं संधान असतं. कोठावळ्यांचा एक उपप्रकार म्हणजे "विशिष्ट कोठावळे". हे सरसकट कशाचाही साठा करत नाहीत. मला भेटलेले एक विशिष्ट कोठावळे "फक्त मालिनी ऐकतात" आणि साठवतात. एका विशिष्ट कोठावळ्यांची स्पेशालिटी "मल्हारचे प्रकार" अशी आहे. कोठावळे भेटले तर त्यांच्याशी जरूर गप्पा मारा. तुमची आणि त्यांची आवड जुळली तर न जाणो तुम्हाला खजिना सापडून जाईल. माझ्या लहानपणी रेडिओवर माणिक वर्मांचा भटियार लागायचा. तो बहुदा फक्त ऑल इंडिया रेडिओ कडेच उपलब्ध असावा. एका कोठावळे काकांनी मला तो सप्रेम भेट दिला! ४. हवाबाण: हे म्हणजे शास्त्रीय संगीताची शष्प आवड नसूनही स्टेटस सिम्बॉल म्हणून मैफिलीला हजेरी लावणारे लोक. वर त्यांना आपली रसिकता सारखी सिद्ध करायची असते. हे लोक ओळखायला एकदम सोप्पे. सिल्कचा नाहीतर फॅब इंडियाचा कुर्ता घालून वर परफ्यूम वगैरे मारून येतील. स्त्री असेल तर मेक अप वगैरे सुध्दा. सरगमच्या लयीत हात वगैरे हलवायचा प्रयत्न करतील. दर पाच मिनिटांत एकदा "क्या बात है" किंवा "वाह" सारखी दाद कंपल्सरी असते असा यांचा समज असतो. उगाचच "नाही नाही" सारखं डोकं हलवतात. एक डोळा कायम आजूबाजूच्या श्रोत्यांवर असतो. त्यात समजा कोणी हाताने सम दाखवली किंवा बोटाने ताल धरला तर लग्गेच ती लकब उचलतात! वसंतोत्सवासारख्या कार्यक्रमात हवाबाणांचा "स्वयंसेवक" असाही अवतार पहायला मिळतो. अत्यंत तापदायक शेजारी. भेटलेल्या हवाबाणांचे किस्से नंतर आठवून हसू येतं, पण त्या क्षणी त्यांना ठोसा मारावासा वाटतो. एका हवाबाणाने माझ्या एका तबला शिकणार्या मित्राला "दोनदा सम आली, नाही?" असा प्रश्न विचारला होता. मी मित्राला घेऊन काढता पाय घेतला नाहीतर तिथे रक्तपात झाला असता. ५. वाती: आपल्या भागात शास्त्रीय संगीताची मैफल 'लागली' आहे, तर तिथे जाणं हे आपलं कर्तव्य आहे अशा विचाराचे लोक. मुद्दाम उठून "तालचक्र" ऐकायला जाणार नाहीत, पण आलाच आहे तौफिक कुरेशी तर सोडायला नको, असं. मैफिलीत जाऊन आपापली कामं करतील - वाती वळायच्या असतील तर वाती वळतील, भाजी निवडतील, मोबाईलवर मेसेज मेसेज खेळतील. प्रथम मागे जरी बसायला लागलं तरी पुढच्या चांगल्या जागेकडे डोळा ठेवून असतील. थोड्या वेळाने (गाणं सुरु असतानाच) उठून बाहेर जातील आणि मित्रांशी गप्पा छाटतील. फिरायला जायची वेळ झाली की फिरायला जातील. आठ वाजले की उशीर नको म्हणून उठून जातील. गाणं रंगल्याचं सुख नाही आणि पडल्याचं दुःख नाही. वर्गातली काही मुलं असतात ना - नवनीत गाईड वाचून घोकंपट्टी करून चांगले मार्क मिळवतात, पण कुठल्याच विषयाचा धड आनंद घेत नाहीत - त्यातला प्रकार. आणि.... शेवटचा प्रकार म्हणजे खरा श्रोता हे फक्त ऐकायला येतात, आनंद घ्यायला येतात. कामधंद्यातून वेळ काढून, त्याच वेषात. दिवसभराच्या वापराने बाहेर आलेला शर्ट. हातात हेल्मेट. त्यांच्या मोबाईलवर शास्त्रीय संगीत सोडून इतर फारसं काही नसतं. "काहीतरी कला असायला हवी होती अंगात, मग या नोकरी/व्यवसायाचे नाव> मध्ये पडलोच नसतो" असं त्यांना मनापासून वाटत असतं. आवडीनिवडी असतात, तीव्र नसतात, पण कलाकाराशी एक घट्ट भावनिक नातं असतं. भीमसेन जोशींना सरळ "अण्णा" म्हणतात. त्यांचा वारसा कोण चालवणार याची उगीचच चिंता करतात. गाणं आवडलं तर खुली दाद देतात. मनाला स्पर्शून गेलं तर डोळ्यातल्या पाण्याची लाज वाटून घेत नाहीत. कोणी हसेल का, याची पर्वाही करत नाहीत. तुम्हाला असा खरा श्रोता भेटला, तर त्याच्या शेजारी जरूर बसा! आणि माझा नमस्कार सांगा त्याला!
  • Log in or register to post comments
  • 30495 views

प्रतिक्रिया

Submitted by स्वाती दिनेश on Tue, 02/12/2013 - 13:40

Permalink

व्वा..

लेख फार आवडला. हा अप्रतिम लेख नजरेतून कसा बरे सुटला होता?(तो नजरेस मुसु मुळे पडला, त्याबद्दल मुसुला जाहीर थँक्यु.) स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Tue, 02/12/2013 - 13:43

Permalink

मस्त लिहिलं आहे!

मस्त लिहिलं आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Tue, 02/12/2013 - 13:50

Permalink

'हसविका'

=)) छ्या! यावरची एक 'हसविका' अर्धी लिहून पडलीये आता देऊन काही उपेगाची न्हय! तुमी एकदमच मस्त लिवलंय!
  • Log in or register to post comments

Submitted by दत्ता काळे on Tue, 02/12/2013 - 14:00

Permalink

मस्तं ..

वर्गीकरण भारी झालंय.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Tue, 02/12/2013 - 23:43

Permalink

वाचनखूण 'टिपल्या' गेली आहे. ;)

मिपाच्या मैफिलीतला 'टिपणीस' :)
  • Log in or register to post comments

Submitted by बांवरे on Wed, 02/13/2013 - 04:44

Permalink

टिपणीस

फक्कड लेख झाला आहे. (टिपणीस) बांवरे.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Wed, 02/13/2013 - 12:30

Permalink

मस्त

एक नंबर निरीक्षणे आहेत. कोठावळे भेटले तर त्यांच्याशी जरूर गप्पा मारा. तुमची आणि त्यांची आवड जुळली तर न जाणो तुम्हाला खजिना सापडून जाईल. इथे आपली लै वेळा असहमती. आवड जुळली तरी त्यांचा तथाकथित खजिना तुम्हाला दुरून सुद्धा पहायला मिळत नाही, देणे तर सोडाच. सतत 'त्या अमक्याने दिले मला ते रेकॉर्डिंग त्याने इतर कोणाला देऊ नकोस म्हणून निक्षून सांगितले आहे.' असा धोषा लावतात. पण त्यांच्याकडे कायकाय आहे हे तुम्हाला इत्थंभूत सांगितल्याशिवाय तुम्हाला सोडत नाहीत. मुख्य उद्देश तुम्हाला जळवणे, 'माझा कडे आहे नि तुझ्याकडे नाही' हे ठसवणे. त्या गाण्याला इतर महत्त्वाच्या कारणांपेक्षा 'एक्स्लुजिव वॅल्यू' असणे यांना अधिक महत्त्वाचे वाटते. एखादा फारच उदार झाला तर 'घरी ये केव्हाही. ऐकवीन एकदा मस्त कुमारांचा चैती भूप.' वगैरे मिरचीच्या खळ्यावरचा वायदा करतात. तुम्ही त्यांना हवे ते बरेच काही देऊन उपकृत केलेच तर उपकार केल्यासारखे एखाद-दुसरे रेकॉर्डिंग तुमच्या पदरात पडते. ते ही ' इतर कोणाला देऊ नकोस म्हणून निक्षून सांगत.' नि अशा आविर्भावात की जणू साला हाच लेकाचा तो जगप्रसिद्ध गायक नि केवढा मोठ्ठा अनमोल ठेवा तो काळजावर दगड ठेवून तो तुम्हाला देतो आहे, जणू काय तुम्हाला जावईच करून घेतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Wed, 02/13/2013 - 20:42

Permalink

"चला आज गंधर्व खाद्य

"चला आज गंधर्व खाद्य महोत्सवाला जाउया ! आज गाणे आहे तेथे.........." असे काही वर्षांनी ऐकू येईल की काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by स्वरांगी on Fri, 09/11/2015 - 13:07

Permalink

खूप भारी लिहलंय !

कसलं भारी निरीक्षण आहे ! फारच छान..
  • Log in or register to post comments

Submitted by नया है वह on Fri, 09/11/2015 - 17:47

Permalink

फारच छान..

एक नंबर निरीक्षणे आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Fri, 09/11/2015 - 19:24

Permalink

ब्रिलीयंट अ‍ॅनालीसीस

आदुबाळ तुम्ही फार मार्मिक निरीक्षण नोंदवलीत. ग्रेट
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Fri, 09/11/2015 - 20:57

Permalink

वाह, खुपच छान लिहिलाय.

वाह, खुपच छान लिहिलाय. जबरदस्त निरीक्षणे. पु.ल. देशपांडे यांच्यासारखी हलकी फुलकी, प्रसन्न विनोदी लेखन शैली आहे तुमची. मस्तं मजा आली लेख वाचून.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Sat, 09/12/2015 - 11:15

Permalink

मस्त लेख!

आम्ही सवाई गंधर्व संगीतमहोत्सवाऐवजी सवाई एकांकिकावाले जास्त आहोत आणि तिथेही अशा क्याटेगरीचे लोक येतात. अजून दोन क्याटेग-या जास्त असतात - आपल्या टीमला प्रोत्साहन देणारे - एकांकिका announce झाली की यांना जो चेव येतो की ज्याचं नाव ते आणि सलीम अली - पक्षीनिरीक्षण करायला आलेले - हे तर गळ टाकूनच बसलेले असतात.
  • Log in or register to post comments

Submitted by सविता००१ on Sat, 09/12/2015 - 13:12

Permalink

अफाट

कसलं भन्नाट लिहिलंय हो तुम्ही? आईशप्पत. सगळा सवाई माहोल तरळून गेला डोळ्यांसमोरून झरझर. भयानक पटलंय. हे कसं राहून गेलं वाचायचं?????????????????????? खूप खूप आवडलं लिखाण. त्यापेक्षा लै म्हणजे लैच्च पटलंय. मजा आलीये वाचायला.धन्स
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on Sat, 09/12/2015 - 15:35

Permalink

जबराट लिहिले आहे. मजा आली

जबराट लिहिले आहे. मजा आली वाचताना. लिहित राहा
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 09/13/2015 - 10:02

Permalink

झकास्स्स्स... :)

झकास्स्स्स... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Manali Trance... ;) :- The Shaukeens
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on गुरुवार, 12/08/2016 - 20:07

Permalink

यंदा दोन तीन नवीन प्रकार

यंदा दोन तीन नवीन प्रकार आढळलेट ते टाकायला हवेत. १. फेसबुके : हे आपण सवाईला आल्याचं स्टेट्स अपडेट करून आपण कसे अभिरुची संपन्न आहोत हे दाखवतात. यातल्या फार कमी जणांना गाण्याची घेणं देणं असतं. २. शेळफी वाले : यांना फक्त स्टेज बॅक ग्राउंडला ठेवून सेल्फी काढून पोस्ट करायचा असतो. बाकी मग मागे कोणीही गात असो त्याचं काही नसतं. ३. फोटोग्राफर : DSLR स्वस्त झाल्यापासून हि लोक काँग्रेस गवताप्रमाणे वाढली आहेत. हे सर्वात मागे भारतीय बैठकीवर बसणार, तुम्ही एका ठिकाणी बसले असला तिथूनच यांना नेमका अँगल घ्यायचा असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on गुरुवार, 12/08/2016 - 20:09

Permalink

मस्त लिहिलंय रे

हा लेख वाचला नव्हता. खूपच आवडला. (अजून खूप काही लिहिणार होतो पण कुठल्या तरी कॅटेगरीत फिट केला जाईन म्हणून थांबतो) :)
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 12/08/2016 - 20:21

Permalink

तिसर्‍यांदा माझी प्रतिक्रिया,

तिसर्‍यांदा माझी प्रतिक्रिया, एकदम सुरेख लिहिलंय! आम्ही जायचो सवाई ऐकायला. फार शास्त्रशुद्ध कळत होतं असं अजिबात नव्हतं पण खूप आवडायचं, अजूनही आवडतंच पण आता काही वर्षं महोत्सवाची वेळही बदललीये. (ज्याचा तीव्र निषेध.) नाही जात आता.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 12/08/2016 - 20:38

Permalink

अरेच्या, इतका छान लेख मिसला!

एकदम मार्मिक निरीक्षणं! =)) एक कोठावळे जरा लांबच्या नात्यातले होते. त्यांच्याकडे खरोखरंच भरपूर खजिना होता. बर्‍याच टिपणीसांकडून त्यांनी बार्टर तत्त्वावर माल जमवला होता. कधीकधी ते स्वतः देखील टिपणीस असत! :) मी काही वर्षे बघू शकलो हा कार्यक्रम. तबला आवडायचा त्यामुळे ते चुकवायचो नाही. भजी, बटाटेवडा, चहा असा माफक आधार मध्यंतरात लागायचाच त्याशिवाय उरलेली रात्र जागणार कशी! (संपूर्ण रात्रीनंतर अभंगवाणी आवडणारा) सवाई चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 12/08/2016 - 20:43

Permalink

हे खोदकाम आवडले. लेख आवडला.

हे खोदकाम आवडले. लेख आवडला. काही नमूने आठवले. जसे, माझ्या कधीही, चुकूनही शा. सं. न ऐकणार्‍या वडिलांना अमकी तमकी चीज हवी होती. नवर्‍याने "मी मिळवून देतो" असे सांगितले. मक्काय, ती लवकर सापडेना. माझ्या सासर्‍यांच्या मामेभावाकडे आहे असे समजले. त्यांनी कॉपी मारून देण्याचेही मान्य केले, फक्त घरी येऊन घेऊन जावा असे म्हणणे होते ते आम्ही आनंदाने मान्य केले. त्यांच्याघरी अर्धा पाऊण तास ते सगळे ऐकावे लागले. त्यातही ते मामेसासरे दाद देत होते, अमकी जागा चांगली घेतलीये वगैरे. मला ओ की ठो कळेना. जेंव्हा तेथून निघालो तेंव्हा फार आनंद झाला.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 12/08/2016 - 20:52

In reply to हे खोदकाम आवडले. लेख आवडला. by रेवती

Permalink

पण चीज मिळवलीत का, ते सांग

पण चीज मिळवलीत का, ते सांग आधी.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 12/09/2016 - 03:42

In reply to पण चीज मिळवलीत का, ते सांग by यशोधरा

Permalink

हो, ते सांगायचं राहिलं नाही

हो, ते सांगायचं राहिलं नाही का! अगं इतके अत्याचार झाल्यावर मिळाली व माझ्या वडिलांनी एक अदोनदा सोडता कधी ऐकली असेल असेही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Wed, 12/14/2016 - 18:55

In reply to हो, ते सांगायचं राहिलं नाही by रेवती

Permalink

माझ्या वडिलांनी एक अदोनदा

माझ्या वडिलांनी एक अदोनदा सोडता कधी ऐकली असेल असेही नाही.
"क्षण एक पुरे प्रेमाचा...."
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on गुरुवार, 12/08/2016 - 23:57

In reply to हे खोदकाम आवडले. लेख आवडला. by रेवती

Permalink

शेवटचं वाक्य

अगदी मनापासून लिहिलेलं दिसतंय! :)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 12/09/2016 - 03:46

In reply to शेवटचं वाक्य by संदीप चित्रे

Permalink

येस्स! तेच महत्वाचे आहे. अरे

येस्स! तेच महत्वाचे आहे. अरे त्या मामेसासर्‍यांना मी आधी कधी भेटले नव्हते. तरी त्यांनी गाणं ऐकायला लावलं. मला तर पळून यावसं वाटत होतं पण काय करणार? वर विचारलं की तुझे वडील फारच दर्दी दिसतायत. आता काय बोलणार?
  • Log in or register to post comments

Submitted by रमेश आठवले on गुरुवार, 12/08/2016 - 21:35

Permalink

मार्मिक लेख

लेख आवडला . छान निरीक्षण आणि विश्लेषण .
  • Log in or register to post comments

Submitted by स्पार्टाकस on Fri, 12/09/2016 - 06:10

Permalink

धमाल!

टिपणीस.. कोठावळे ...कहर! एकदम जबरी जमलं आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by सिरुसेरि on Fri, 12/09/2016 - 10:59

Permalink

मस्त

मस्त +१
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Fri, 12/09/2016 - 11:39

Permalink

पुनरेकवार लेख वाचल्या गेला

पुनरेकवार लेख वाचल्या गेला आहे. ठाण्यातल्या परवाच्या वसंतोत्सवात एक टिपणीस पाहायला मिळाली, रेकॉर्ड करताना ऐनवेळी मोबाईल बंद पडू नये म्हणून त्याला भली मोठी पॉवर बँक जोडली होती, आणि तो सगळा जामानिमा सांभाळत 'नाझी सॅल्यूट' तर होताच. =))
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Fri, 12/09/2016 - 12:55

Permalink

अतिशय सुंदर अवलोकन ! आवडलंच..

अतिशय सुंदर अवलोकन ! आवडलंच... पुण्यात होतो तोवर जमेल तसं जायचो. पण मुद्दामहून ठरवून वगैरे कधीच नाही जमलं.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वीट टॉकर on Fri, 12/09/2016 - 13:32

Permalink

अरे वा! बरं झालं मंदारभाऊंनी

अरे वा! बरं झालं मंदारभाऊंनी लेख वर काढला! अचूक निरीक्षण आणि अगदी बेरकी वर्णन! मजा आली वाचायला.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Wed, 12/14/2016 - 18:56

Permalink

काय कहर लिहिलंय दादा! मजा आली

काय कहर लिहिलंय दादा! मजा आली!! (शेवट फार म्हणजे फारच भारी...!)
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Wed, 12/14/2016 - 21:21

Permalink

!!!

!!!
  • Log in or register to post comments

Submitted by मनिमौ on Wed, 12/14/2016 - 22:02

Permalink

मस्त लेख

आवडेश एकदम
  • Log in or register to post comments

Submitted by खिलजि on Wed, 08/22/2018 - 20:27

Permalink

आज बर्याच दिवसांनी बराच वेळ

आज बर्याच दिवसांनी बराच वेळ काही लेख वाचून काढले .. त्यामधील दाद देण्याजोगा हा वाटला .. निव्वळ अप्रतिम .
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com