Skip to main content

पाऊली यांचा वगळ सिद्धांत

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 25/04/2012 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊली यांचा वगळ सिद्धांत (अर्थात पाऊलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल) त्या काळी एन्रिको फर्मी, वुल्फगँग पाऊली ह्या ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञाच्या, अलीकडील एका संशोधनाबाबत विचार करत होते. पाऊली एकेकाळी मॅक्स बॉर्न ह्यांचे सहकारी होते. केंद्रकाभोवती फिरणाऱ्या आण्विक विजकांच्या हालचालींचा अभ्यास करत असतांना, पाऊलींनी असे निरीक्षण केलेले होते की, एका कक्षेत केवळ एकच विजक असतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, कुठलेही दोन विजक एकाच कक्षेचा अवलंब करत नाहीत. फर्मींना हे समजले की, ही घटना प्रत्येक अणूत, याआधी लक्षात न आलेली आणखी एखादी व्यवस्था अस्तित्वात असल्याचे सूचित करत आहे. वायूतील अणू हे घनातील अणूच्या मानाने अभ्यासास जास्त सोपे असतात, म्हणून त्यांनी वायूतील अणू आणि त्यांतील कणांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले. फार फार पूर्वी त्यांनी "परिपूर्ण" वायूची कल्पना केलेली होती. खरेखुरे वायू अनिश्चित स्वरूपाच्या बाह्य बलांनी बाधित होतात. त्याउलट "परिपूर्ण" वायू स्थिरपद राहत असावेत अशी त्यांची कल्पना होती. अशाप्रकारचा "परिपूर्ण" वायू, अणू आणि विजकांच्या वर्तनांचा अभ्यास करण्यासाठी आदर्श पर्यावरण ठरू शकतो. प्रारणांनी उत्सर्जित ऊर्जेचे त्यात निरीक्षण करता येते आणि ती मोजताही येते. पण अशा वायूचे नियमन कुठल्या नियमांनी होत असावे? त्या नियमांत आणि पाऊलींच्या संशोधनात काय संबंध असावा? गप्पा मारत मारत, फर्मी आणि त्यांचे मित्र फ्रँको रासेट्टी एव्हाना डबक्यापाशी पोहोचलेले होते. त्यांनी त्यांचे सोबत दोन लांब दांडे आणलेले होते. प्रत्येकाच्या टोकाशी रेशमी दोरीचा सरफास बांधलेला होता आणि त्याच्या टोकाशी मासेमार लोक बांधतात तशा पद्धतीने लहान सहान किटकांचे आमिषही बांधलेले होते. ते डबक्याच्या कडेला भुकेल्या सरड्यांनी आमिषांवर झडप घालण्याची वाट पाहत बसून राहिले. "सरडा अगदी समोरच आहे," रासेट्टी कुजबुजले. "ईशान्येकडे सरकत आहे. वेग शून्य दशांश एक सात नॉटस्." फर्मींनी तेवढ्यात असे काही पाहिले होते, ज्याकडे रासेट्टींचे लक्षच गेलेले नव्हते. दुसरा एक लहान सरडा, त्याच आमिषाकडे समांतरपणे सरकत होता. त्यांनी एकाच वेळी झेप घेतली. मोठ्या सरड्याने आमिष पकडले. रासेट्टींनी दोऱ्याला झटका दिला, फास आवळला आणि मोठा सरडा गिरफ्तार झाला. मात्र झेपावणारा लहान सरडा थोडा कमी पडला. आणि मागे वळून पळून गेला. हो! खरेच आहे!! कुठलेही दोन विजक एकाच कक्षेत राहू शकत नाहीत. कारण कुठल्याही दोन विजकांची पुंज स्थिती सारखीच नसते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, ते एकाच आकाराचे नसतात. किंवा त्यांचे तापमान सारखेच नसते, किंवा त्यांचेवरील विद्युत अधिभार सारखाच नसतो, अथवा ह्या तीन्ही गोष्टी असतात. हेच काही मुद्दे विजकांची कक्षा ठरवत असतात. फर्मींचे मन धावत होते. आधीच ते त्या "परिपूर्ण" वायूच्या संदर्भात विचार करत होते, जो त्यांनी एकल अणूचा मानला होता. त्याच्या अणूतील विजक कसे वागत असावेत. मग फायरेंझमध्ये परतल्यावर पुन्हा, त्यांनी लगेचच "परिपूर्ण एकल वायूच्या पुंजीकरणाबाबत" नावाचा शोधनिबंध लिहायला घेतला. त्या शोधनिबंधात काढलेले निष्कर्ष आजही धातुवैज्ञानिक आणि अभियंते अनुसरत आहेत. इतर गोष्टींसोबतच, त्यात विविध धातू किती चांगल्या वा वाईट प्रकारे उष्मा वा विद्युत वहन करतात ते निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत. फर्मींचे निष्कर्ष वैध होते आणि आजही आहेत. एवढेच नव्हे तर आणखीही एका शास्त्रज्ञांनी -पॉल डिरॅक ह्यांनी- स्वतंत्रपणे तेच आकडे शोधून काढले होते. ह्याच सूत्रांना अजूनही "फर्मी-डिरॅक संख्यांकने -Fermi-Dirac Statistics-" म्हणून ओळखले जाते आणि त्यांच्या नियमांचे अनुसरण करणाऱ्या वायूकणांना "फर्मिओन्स" म्हटले जाते. हा लेख, “एन्रिको फर्मी: अणुयुगाचा प्रणेता [१]” ह्या पुस्तकातील एका उतार्‍याचा मराठी अनुवाद आहे. पूर्वप्रसिद्धीः मनोगत डॉट कॉम ०६-०२-२००८ [१] एन्रिको फर्मी: अणुयुगाचा प्रणेता (Enrico Fermi: Pioneer of Atomic Age), मूळ इंग्रजी लेखक: टेड गॉटफ्रीड, मालिका: आधुनिक युगाचे कर्ते (Makers of the Modern Age), प्रकाशक: युनिव्हर्सिटी प्रेस, प्रकाशन काल: १९९९, वितरक: ओरिएंट लाँगमन लिमिटेड, किंमत: रु.१२५/- फक्त.

वाचने 16171
प्रतिक्रिया 96

प्रतिक्रिया

In reply to by परिकथेतील राजकुमार

खरच मोठे होण्याची गरज आहे. मुळात माणसाने काय लिहिले आहे ते वाचावे, माणासावरुन लिखाणाची पारख करू नये. लपून वारकर्ते

In reply to by परिकथेतील राजकुमार

लेख मलादेखी बोजड आणि कंटळवाणा वाटला. अर्थात तो हेटस्टोरीचे परिक्षण नाही या करणाने नाही, तर त्यात काही विदा उपलब्ध करून दिला नसल्याने तो रटाळ वाटला. वाचता वाचता 'सिद्धांत ज्वलन' असे विडंबन देखील सुचले. व्यर्थेश कळबडवी

In reply to by परिकथेतील राजकुमार

सरड्याचे ठिक आहे पण हा सिद्धांत विहिरीतले बेडूक आणि समुद्रातले देव माशे ह्यांच्या बाबतीत काय सांगतो ? खारे दाणे

In reply to by परिकथेतील राजकुमार

पण माझा मुद्दा वेगळाच आहे. संपादित कृपया स्वत:च्या लेखनावरती एका मागोमाग एक प्रतिसाद देऊन आपले भिकार लिखाण उगीच गाजवून सोडू नये अशी परा ह्यांना तंबी देण्यात येत आहे. चंपादक

In reply to by परिकथेतील राजकुमार

काय पराषेठ, महाभारतातलं कोणतं पात्र संचारलंय अंगात? पार सगळ्यांच्याच रथाचे घोडे उधळून लावलेत.. =)) =) =)) =)) =) =)) =)) =) =)) =)) =) =)) =) =)) =)) =) =)) =)) सिद्धांत ज्वलन वर जीव जाई पर्यंत हसलो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

येवढ्या गंभीर सिद्धांताच्या धाग्यावरती भिक्कुला दात काढायला काय झाले ते समजले नाही "काय" नाही हो.. "कै" लिहावं.. "नाय" नाही हो .. "नै" लिहावं.. षुद्धलेखनाकडे लक्ष द्या..

In reply to by गवि

श्री. गवि असे म्हणतात की “सौ सोनार की एक लोहार की” त्यानुसार आपला प्रतिसाद मला मोलाचा वाटतो आहे.

In reply to by गवि

मायला, गविंचं एक बारीक लक्ष हो ' लोकां'च्या लिखाणाच्या ष्टाईल कडं???? बाकी , पर्‍याचा 'या' विषयावरचा 'तो' अभ्यास दांडगा असल्यानं नि त्याचा 'ह्या'त हातखंडा असल्यानं परानं अधिकाराचा वापर केला एवढंच! च्यामारी धरुन फट्याक! ___/\___ :)

उत्तम प्रकारे समजावून दिले. आताशा बहुसंख्य मराठी शब्द विसरले गेले आहेत असे मला स्वतःला जाणवत आहे.

In reply to by इरसाल

आताशा बहुसंख्य मराठी शब्द विसरले गेले आहेत असे मला स्वतःला जाणवत आहे.>>>> खरंय! लोकांना आपल्या भाषेतले साधेच शब्द बोजड वाटत आहेत आणि इंग्रजीतले सज्जड भारी शब्द सहजसुंदर वाटत आहेत. ही आपल्या मायबोलीची प्रगती समजायची की अधोगती?

In reply to by रामदास

रामदासजी, हो. खरंय! २५ ला पाऊली ह्यांचा जन्मदिवस होता. हे शोधून काढून इथे जाहीर केल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद.

In reply to by जयंत कुलकर्णी

या शब्दाचे अर्थ, डिक्शनरी.कॉमवर दिल्याप्रमाणे
1. an act or instance of excluding. 2. the state of being excluded. 3. Physiology . a keeping apart; blocking of an entrance.
मेरियम-वेबस्टरवर exclude या क्रियापदाचा अर्थ हा आहे:
transitive verb 1
a : to prevent or restrict the entrance of b : to bar from participation, consideration, or inclusion
2 : to expel or bar especially from a place or position previously occupied
मुळात विज्ञान लक्षात घेता वगळणे अथवा वर्ज असणे यात जी अर्थछटा आहे, त्याने योग्य अर्थबोध होत नाही. डिक्शनरीवरचा तिसरा अर्थ आणि मेरियम वेबस्टरवरचा दुसरा अर्थ इथे चपखल लागू आहे. आधीपासून उपयोगात आल्यामुळे वगळणे, निरूपयोगी ठरणे अशा काही अर्थाचा मराठी शब्द (मला सुचलेला नाही) इथे आवश्यक आहे. 'वगळ' या क्रियापदापेक्षा 'वर्ज' हे नाम अधिक चपखल वाटले. पारिभाषिक कोषात exclusion साठी अपवर्जन (हे उगाच up-version असं वाटलं.) हा शब्द वापरलेला आहे. अपवर्जन हा शब्द मला माहित नव्हता. मूळ शब्द/क्रियापद वर्ज यावरून तो आला असावा. इतर अर्थाने वापरात असलेली अर्थछटा या शब्दातून व्यक्त होत नाही, त्यामुळे तो प्रथमदर्शनी पटण्यासारखा वाटतो. Pauli exclusion principle याचं भाषांतर पॉली अपवर्जन तत्त्व (अपवर्जन तत्त्व) असे केले आहे. (यापेक्षा Pauli's किंवा पॉलीचे अपवर्जन तत्त्व अधिक ग्राह्य वाटते. किंवा Heigenberg's uncertainty principle) मुळात पॉली/पावलीचे तत्त्व हे फक्त इलेक्ट्रॉनसंदर्भात नसून संपूर्ण फर्मिऑन या कणांच्या गटासंदर्भात आहे. त्यामुळे नावात इलेक्ट्रॉन्सचा उल्लेख करणे अशास्त्रीय वाटते. करायचाच असल्यास फर्मिऑन्स किंवा spin-half/अर्ध-आभ्रामी कणांचा करता येईल.
===
इतरत्र electron spin यातल्या spin साठी आभ्राम अशा (पुन्हा माहित/प्रचलित नसलेला) शब्द वापरलेला आहे. तो रसायनशास्त्राच्या गटात टाकलेला आहे, पण मुळात antiparallel spin असा शब्दप्रयोग अणूरचनेत, इलेक्ट्रॉनच्या संदर्भातच वापरला जातो. अणूरचनेसंदर्भात मिळालेले काही नोबेल पुरस्कारही रसायनशास्त्राचे म्हणून दिलेले आहेत. हे शास्त्रज्ञ स्वतःला भौतिकशास्त्रज्ञ म्हणवत. तेव्हा रसायनशास्त्र का भौतिकशास्त्र या वादात न शिरणंच इष्ट. याच पारिभाषिक कोषात इलेक्ट्रॉन हा शब्द इलेक्ट्रॉन असाच वापरलेला आहे. "bunches of electrons" याचे भाषांतर इलेक्ट्रॉनांचे गुच्छ असे करताना इलेक्ट्रॉन या शब्दाचे इलेक्ट्रॉनां असे सामान्य रूप करून इलेक्ट्रॉनला "आपला" बनवून टाकला आहे. तीच गोष्ट प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची. इतरत्र काही चर्चेत पारिभाषिक कोषाची लिंक दिल्याबद्दल धनंजय यांचे आभार.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदिती, जाणीवपूर्वक आणि सातत्याने, सविस्तर प्रतिसाद देऊन मोलाच्या चर्चेत महत्त्वाचे योगदान दिल्याखातर अनेकानेक धन्यवाद. प्रिन्सिपलला तत्त्व आणि थिअरीला सिद्धांत म्हणावे हे आपले म्हणणे सयुक्तिक असून मला पटलेले आहे. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे शब्द मराठी नाहीत. त्यांना सशक्त पर्याय असायलाच हवेत. मी त्यांकरता विजक, धनक आणि विरक्तक हे पर्याय सुचवले आहेत. यात ऑन करता क हा उपसर्ग शब्दाशेवटी वापरलेला असल्याने फर्मिऑन्स करता फर्मिक हा शब्द मी सुचवत आहे. क्रिटिकल म्हणजे क्रांतिक ह्या शब्दाला उप आणि अप हे उपसर्ग लावून सब-क्रिटिकल म्हणजे उप-क्रांतिक आणि सुपर-क्रिटिकल म्हणजे अप-क्रांतिक (अति-क्रांतिक) हे शब्द वापरात आहेत. यात अप चा अर्थ अति अशासारखा होत असल्याने अपवर्जन ऐवजी नुसताच वर्जन शब्द सयुक्तिक ठरेल. सबब अवस्था-वर्जन-तत्त्व असा एक्सक्लुजन प्रिन्सिपलचा उल्लेख करता येऊ शकेल. आपण काय म्हणता? भ्रम भ्रामयति क्रियापदावरून आभ्राम शब्द आला असावा. आभ्राम शब्दाची आणखी चिकित्सा व्हायला हवी. फिरत हा मी सुचवलेला शब्द आपल्या कसा वाटतो? पारिभाषिक कोष प्राथमिक आणि नवा आहे. त्यापाठी पुरेसा अभ्यास असावा अशी स्थिती दिसत नाही. त्याचा या बाबतीत विशेष विचार करण्याची आवश्यकता नाही.

In reply to by नरेंद्र गोळे

सुचवलेला शब्द आपल्या कसा वाटतो?
आभ्राम आणि फिरत हे दोन्ही शब्द मला समजत नाहीत. भाषांच्या शब्दखेळात हरवण्यापेक्षा मला त्यातलं विज्ञान अधिक महत्त्वाचं वाटतं. भाषा काल होती तशी आज नाही, आज आहे तशी उद्या रहाणार नाही. पावलीचं एक्सक्लूजन प्रिन्सिपल होतं तसंच रहाणार. शाश्वत गोष्टींबद्दल मला ममत्व आहे. व्यवहारात, मी फार जास्त मराठी लोकांशी भौतिकशास्त्राबद्दल बोलत नाही; किंबहुना भाषेमुळे मला माझी कोणत्याच विषयातली समज, जाणीव मर्यादित ठेवायची इच्छा नाही. टेबल, बटाटा, अननस, पेन वगैरे शब्दांप्रमाणे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉनचा स्पिन, वगैरे शब्द मराठीतही आहेत. गुरू, पक्का, जंगल, वोक, लिची, जिनसेंग, फेंगशुई, टायफून, त्सुनामी असे अनेक शब्द स्वीकारले जातात म्हणूनही मला इंग्लिश भाषा आवडते. "मला बी जत्रंला येऊ द्या की रं" किंवा "आंगळू धवूला गेला आहा" ही बोलीभाषा माझ्या वापरातली नसली तरीही मराठीची शुद्ध बोलीभाषा म्हणून मला मान्य आहे. माझी आणि इतर अनेकांची बोलीभाषा इतरांनी अशुद्ध किंवा अमराठी मानली तरी पर्वा इल्ले. नवीन शब्द शब्दकोषातून लोकांच्या वापरात येत नाहीत; लोकांच्या वापरातून शब्दकोषात जातात. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉनचा स्पिन, वगैरे शब्द मराठी मानून वापरणार्‍यांचं प्रमाण माझ्या माहितीत प्रचंड जास्त आहे. आजूबाजूला पहाता भविष्यातल्या शब्दकोषांमधे हेच शब्द रूजणार. 'सही' या मराठी शब्दाचा आज शब्दकोषातला अर्थ फक्त स्वाक्षरी, हस्ताक्षर (हिंदी), signature असा असेल तर अद्ययावत शब्दकोषात बोलीभाषेतला वापर या अर्थाने झकास, उत्तम, इ. असेही अर्थ असायला हवेत. नसतील तर मराठी शब्दकोष काळाच्या मागे पडले आहेत. मराठीतली अर्बन डिक्शनरी सुरू करण्यास चिक्कार वाव आहे.

In reply to by जयंत कुलकर्णी

जयंतराव, आपणही ह्या चर्चेत रस घेत असल्याचे पाहून आनंद झाला. पाऊली ह्यांचे तत्त्व विजकांना विवक्षित अवस्था धारण करण्यापासून वर्जित ठरवत असल्याने अवस्था-वर्जन-तत्त्व असे ह्या तत्त्वास म्हणावे असे मी आपल्या सूचनेचा वापर करून सुचवित आहे. आपले काय मत आहे?

In reply to by नरेंद्र गोळे

मलाही वर्जीत या शब्दापासून हा शब्द सुचला पण काय वर्ज? म्हणून मी त्याला अगोदर विजक लावले. असो. आपण म्हणत आहात व अदिती म्हणत आहे ते योग्य आहे.

लेख आवडला .. पाउली होता म्हणून.. नाहीतर आमचे पाउलो पाउली अडले असते हो... :)

In reply to by भडकमकर मास्तर

पाउली होता म्हणून.. नाहीतर आमचे पाउलो पाउली अडले असते हो...
हा पाउलो कोलो तर नव्हे? -- पाऊले लावती भाषेची वाट

मी एक पुस्तक वाचले होते. त्याचे नाव होते 'विज्ञानातील क्रान्त्या.' लेखक होते डो. वसंत चिपळोणकर . त्यात सापेक्शता, क्वांटम थिअरी, लिनियर लॉजिक वगैरे चा उल्ल्लेख होता. त्यावर काही प्रकाश टाकणारे लिहाल का ? आप्ला चौ रा.

प्रयत्न खूप आवडला. पारिभाषिक मराठी शब्द वापरण्याची/ घडवण्याची भूमिका पटली आणि आवडली. श्री. विश्वनाथ खैरे ह्यांनी आपल्या 'युगाणी' ह्या कुमार-कवितांच्या संग्रहात अणूची रचना समजावून देताना काही सुरेख शब्द वापरले आहेत. अणू हा एक कण असतो. पण त्याच्या पोटात लहानलहान 'कणुले' असतात. हे कणुले ३ प्रकारचे असतात. काही 'धनुले' असतात. काही 'उणुले' असतात आणि काही 'बिनुले' असतात. विजक ह्या अर्थी त्यांनी उणुला हा पर्याय सुचवलेला दिसतो. नव्या शब्दांनी सामान्यतः बिचकायला होतं हे खरं आहे. त्यामुळे काही वेळी स्पष्टीकरणात्मक टीपा देणं उपयोगी ठरतं. निदान सुरवातीला असं करायला हवं असं मला वाटतं. 'वगळ' हा शब्द अपवर्जनपेक्षा सोपाच आणि चपखल वाटला.

हा धागा वर आणण्यासोबतच एक महत्वाची गोष्ट म्हणजे मिपाकर श्री. नरेंद्र गोळे यांचा ब्लॉग "स्टार माझा" स्पर्धेत विजेता ठरला आहे. त्यांचं अभिनंदन करण्याच्या उद्देशाने हा प्रतिसाद.. !!