मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ओह माय गॉड - झणझणीत अंजन

समीरसूर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
माझी एक आत्या आहे. वय साधारण ७३ वर्षे! आयुष्याचा बहुतेक काळ एका लहान गावात व्यतित केलेला. घरचे वातावरण कर्मठ! एकदा माझ्या चुलत भावाचे लग्न आटोपून मी आणि माझी ही आत्या पुण्यास परत येत होतो. त्यादिवशी एकादशी होती. भूक लागली म्हणून आम्ही एका ढाब्याजवळ थांबलो. आत्याला म्हटले की आपल्याला पुण्याला पोहोचायला अजून ३-४ तास तरी लागतील; आताच व्यवस्थित जेवून घे. आत्याच्या उत्तराने मी आश्चर्यचकितच नाही तर पुरता हबकलो. "आत्या, पटकन जेवून घेऊ आणि मग पुन्हा निघू" "तू जेवून घे; मला जेवता नाही येणार. आज एकादशी आहे." "अगं आज काही कार्तिकी किंवा आषाढी एकादशी नाही. साधी मंथली एकादशी आहे. एखाद्या वेळेस मोडली तरी हरकत नाही. इथे तुला सबुदाणा खिचडी वगैरे मिळणार नाही." "नाही नाही, एकादशीच्या दिवशी जेवणे म्हणजे डुकराचे मांस खाण्यासारखे आहे आणि त्याचे पाप खूप जास्त लागते" मी पुरता थक्क झालो. "अगं, इतर दिवशी तुम्ही हेच अन्न खाता ना? मग आजच खाल्ले तर डायरेक्ट डुक्कर ठरता? जगात कितीतरी माणसे आजच्या दिवशी हेच अन्न खात असतील. म्हणून काय ते डुक्कर ठरतात? आणि अमेरिकेत कसली आलीये एकादशी? तरी ते लोकं आपल्यापेक्षा शतयोजने पुढे आहेतच की नाही?" "नाही बाबा, इतकी वर्षे नियम पाळले आहेत; आज मोडून पापाचं धनी का म्हणून व्हायचं?" सवाल रोकडा होता. डझनभर केळी, बटाट्याचा चिवडा, चिक्की वगैरे घेऊन तिने थोडे अधिक पुण्य कमवले आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. काय म्हणावे याला? शतकानुशतकांच्या विचारांचा, निरर्थक संस्कारांचा पगडा म्हणावे तरी स्वत:ची अशी बुद्धी असते की नाही? स्वतःची अशी तर्कसंगत विचार करण्याची आणि योग्यायोग्य ठरवण्याची क्षमता असते की नाही? की आपली बुद्धी, आपली विचार करण्याची कुवत अजिबात वापरायची नाही असेच आपली तथाकथित कर्मकांडांवर आधारित संस्कृती शिकवते? मग तर कल्याणच म्हणायचे! साधी पोळी आणि भाजी खाल्ल्याने पाप लागतं? आणि पोट फुटेस्तोवर खिचडी, चिक्की, भगर, केळी, काजू, बदाम, दूध, राजगिर्‍याच्या लाह्या, बटाटा वेफर्स, बटाट्याची सुकी भाजी, रताळ्याचा पाकात घोळलेला आणि अस्सल तुपात तळलेला कीस खाल्ल्याने अमाप पुण्य लाभतं? कुठल्या गाढवाने हे लिहून ठेवलंय? कुठल्याही देवपूजेला पोट सुटलेले ब्राह्मण जेवू घातल्याने पुण्य लाभतं असा एक नितांतमूर्ख समज आपल्याकडे प्रचलित आहे. काय सबंध आहे? तुमच्या घरात काम करणार्‍या बाईच्या लहानग्या, शेंबड्या, चप्पल न घालणार्‍या मुलाला ५० रुपयांची चप्पल घेऊन देण्याची अक्कल सुचत नाही पण ढेरपोट्या ब्राह्मणांना आणखी खाऊ घालून पुण्य कमवल्याचं समाधान मात्र बरोबर समजतं. हा काय प्रकार आहे? मुंबईत कोणी राधे माँ म्हणून खूप प्रसिद्ध (?) बाई आहेत. लोकं त्यांना कडेवर घेऊन भजनाच्या तालावर नाचतात. असे केल्याने म्हणे पुण्य लाभते. ही बाई ओठांवर लिपस्टीक लावून नटून थटून बसते आणि तिचे मूर्ख भक्त तिच्या चरणी लाखो रुपयांचा 'चढावा' चढवतात. एखाद्या चित्रपटातली चवचाल बाई शोभावी अशी या राधे माँची राहणी आहे. तिच कथा आसाराम बापूंची आणि अजून कितीतरी कोट्यधीश, महागड्या गाड्यांमधून फिरणार्‍या बाबा-बुवांची! हे आसाराम बापू तर क्रोधाचे आगर आहेत. स्वतःला परमेश्वर म्हणवून घेतांना हा निर्लज्ज बाबा भक्तांवर चिडतो आणि प्रसंगी शिव्या देखील देतो. तरीही आपले मूर्ख लोकं त्याच्या नादी लागतातच. निर्मल बाबाला पाहिल्यावर तर शेंबडं पोरगं देखील सांगेल की या बाबाला साधं "श्री गणेशाय नमः" देखील धड म्हणता येणार नाही पण भक्तांना लुबाडून या निर्मल बाबाने कोट्यवधी रुपयांची माया जमवलेली आहे. याच्या समागमात उपस्थिती लावण्यासाठी दोन-दोन हजार रुपये मोजावे लागतात आणि हा बाबा फक्त हात वर करून "कृपा बनी रहेगी" असले काहीतरी बडबडतो. तिच कथा नरेंद्र महाराजांची. राजकारण्यांच्या पदरात लपणार्‍या या भोंदू बाबाला ३०० एकर जागा फुकट मिळालेली आहे. याच्या प्रवचनात हा नरेंद्र महाराज राजकारणाखेरीज क्वचित कुठल्यातरी विषयावर बोलतो. आणि आपल्या देशाचे दुर्दैव असे की आपली बिनडोक जनता या भोंदू आणि स्वतःला देव समजणार्‍या पाजी लोकांसमोर नतमस्तक होते. आमच्या गावातल्या घरासमोर एक कुटुंब राहते. ते अनिरुद्ध बापूंचे इतके पराकोटीचे भक्त आहेत की त्यांच्या घरातल्या प्रत्येक भिंतीवर अनिरुद्ध बापूंचे फोटो, स्टिकर्स वगैरे लावलेले आहेत. सतत २४ तास हे कुटुंब त्यांचे गुणगान गात असते. सकाळी पोट व्यवस्थित साफ झाले तरी अनिरुद्ध बापूंची कृपा असे त्यांना वाटते. आता बोला! "ओह माय गॉड" अशाच निरर्थक प्रथांवर आणि सगळ्या धर्मातल्या किळसवाण्या बुवाबाजीवर कोरडे ओढतो आणि ते ही सगळ्यांना पटेल अशा पद्धतीने. कानजीभाई मेहता हा देवाच्या मूर्तींचा व्यापार करणारा एक नास्तिक परंतु मध्यमवर्गीय कुटुंबवत्सल गुजराती गृहस्थ असतो. देवादिकांवर, कर्मकांडांवर, बुवाबाजीवर पैसे वाया घालवण्यापेक्षा त्या पैशांचा काहीतरी चांगला उपयोग करावा अशा धरतीची त्याची विचारसरणी असते. त्याच्या शेजारच्या दुकानातला मुस्लीम मालक जेव्हा हज यात्रेला जाण्याचा विचार बोलून दाखवतो तेव्हा कानजीभाई त्याला व्यर्थ पैसे दवडण्यापेक्षा दुकानाची डागडुजी करण्याचा सल्ला देतो. या कानजीभाईचे दुकान भूकंपात जमीनदोस्त होते. विमा कंपनी 'अ‍ॅक्ट ऑफ गॉड' या कलमाखाली बोट दाखवून हात वर करते. कानजीभाई रस्त्यावर येतो. मग कानजीभाई सरळ-सरळ देवावर खटला दाखल करतो. देवाचे दलाल म्हणून सगळे धर्मगुरु, पंडित, मौलवी, फादर यांना तो प्रतिवादी करून नुकसान भरपाईची मागणी करतो. राजकारणी आणि धर्म हे समीकरण दृढ असल्याने राजकारणी देखील या युद्धात ओढले जातात. पुढे काय होते? कानजीभाई सगळ्या धर्मातल्या धर्मगुरुंना धडा शिकवतो का? त्याला नुकसान भरपाई मिळते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे चित्रपटात पाहणे श्रेयस्कर ठरेल. सध्या जे धर्माचे, धार्मिकतेचे, कर्मकांडांचे स्तोम सर्वत्र माजलेले आहे त्यावर हा चित्रपट विचार करायला लावणारे भाष्य करतो. महादेवाच्या पिंडीवर हजारो लीटर दूध अभिषेकाच्या नावाखाली कसे ओतले जाते आणि शेवटी ते कसे गटारात वाहत जाते याचा दाखला देऊन कानजीभाई अभिषेक या संकल्पनेतला फोलपणा अगदी स्पष्टपणे समोर आणतो. गरीबाच्या तोंडी न जाता हे दूध गटारात जाते हे बघून आपल्याला देखील अभिषेक या विधीचा तिटकारा आल्यावाचून राहत नाही. दर्ग्यांवर महागड्या चादरी चढवण्यापेक्षा गरीबाला ते कपडे दिले तर देवाची खरी सेवा करण्याचे पुण्य लाभेल हे ही तो मुस्लीम मौलवींना ठणकावून सांगायला घाबरत नाही. "धर्म का मनुष्य के जीवन में स्थान क्या हैं?" या प्रश्नावर कानजीभाई खिन्नपणे "या तो धर्म इंन्सान को बेबस बनाता हैं या फिर आतंकवादी!" असे उत्तर देतो. नीट विचार केल्यास आजकालचे चित्र असेच आहे. देवापुढे लाचार होणारे भक्त असोत किंवा मुल्ला-मौलवींच्या तद्दन चुकीच्या शिकवणीमुळे जिहाद सारख्या निरर्थक संकल्पनांना बळी पडून जग अस्थिर करणारे दहशतवादी असोत; धर्माच्या अतिरेकी विचाराने कुणाचे भले झाले आहे? त्यात राजकारणी आपल्या स्वार्थाची पोळी भाजून घेण्यासाठी धर्माचा ज्वर अधिकाधिक पसरवतात. अबू आझमी असो, 'संभाजी ब्रिगेड' असो, बांग्लादेशी मुस्लीमांच्या घुसखोरीच्या समर्थनार्थ जाळपोळ करणार्‍या धर्मांध आणि माथेफिरू मुस्लीम संघटना असोत, किंवा भाजप असो...धर्माच्या राजकारणाखेरीज आणि आपापसात द्वेष पसरवण्याखेरीज हे राजकारण आणि धर्मकारण अजून काय करते? आपली जनता याचा विचार कधी करेल काय? आपापसात सलोख्याने राहणे म्हणजेच ईश्वराची, अल्लाची, येशूची खरी सेवा हे आपल्या लोकांना कधी कळेल? कानजीभाई आपल्या जनतेला हे सवाल नुसतेच विचारतच नाही तर श्रीमदभगवतगीता, बायबल, कुरान-ए-शरीफ या पवित्र धर्मग्रंथांचे अध्ययन करून श्लोकांसहित आणि आयतींसहित तो खर्‍या धर्माचा अर्थ समजावून सांगून या सवालांची समर्पक उत्तरे देखील देतो. इतक्या गंभीर आणि संवेदनशील विषयावर भाष्य करतांना चित्रपट कुठेही रटाळ किंवा उपदेशप्रचूर वाटत नाही. मनोरंजनासोबतच खणखणीत विचार मांडण्याचे काम 'ओह माय गॉड' यशस्वीरीत्या पार पाडतो. परेश रावलने कानजीभाई मेहताच्या भूमिकेत प्राण ओतले आहेत. अक्षय कुमारचे काम, कमी असले तरी एकदम संयत आणि पटण्यासारखे आहे. श्री श्री रविशंकर यांची छाप असलेले गुरु मिथून चक्रवर्तीने छान साकारलेले आहेत. संतापी, लबाड, आणि अहंकारी पंडित गोविंद नामदेव यांनी नेहमीच्या आक्रस्ताळेपणाने साकारले आहेत. बाकी सगळ्यांची कामे व्यवस्थित! चित्रपटाची पटकथा बरीच चांगली आहे. मूळ मुद्द्यावरून चित्रपट जराही भरकटत नाही. प्रभू देवा आणि सोनाक्षी सिन्हाचे धमाल गाणे अनावश्यक वाटत असले तरी घटकाभर बरे वाटते. चित्रीकरण मात्र थोडे अजून चांगले असू शकले असते पण तेवढी चूक क्षम्य आहे. शेवटी देव म्हणजे काय, देवाचे खरे अस्तित्व कोणते, पुण्य कमविणे म्हणजे काय, धर्म म्हणजे नक्की काय, माणसाचा देव बनवणे कसे चुकीचे आहे यासारख्या अवघड विषयांचा ऊहापोह कानजीभाई आणि त्याचा मित्र अगदी सोप्या पद्धतीने करतात. आणि विशेष म्हणजे ही चर्चा कुठेही कंटाळवाणी वाटत नाही. 'ओह माय गॉड' म्हणूनच प्रत्येकाने अवश्य बघावा असा चित्रपट आहे. शंभरपैकी एकाला जरी स्वतःच्या बुद्धीचा वापर करून धर्माच्या आणि देवाच्या निरर्थक संकल्पना तपासून बघता आल्या तरी या चित्रपटाचे यश म्हणावे लागेल. आणि हो, भंपक सिनेमे करत असतांना (दे दणादण, हाऊसफूल, जोकर) 'ओह माय गॉड' सारखा विचार करायला लावणारा आणि एक खरा-खुरा चांगला विचार मांडणारा संवेदनशील (ज्वलनशील) आणि धाडसी चित्रपट विचारपूर्वक बनवल्याबद्दल अक्षय कुमारचे अभिनंदन करावेच लागेल. शक्यतो चुकवू नकाच!

वाचने 21944 वाचनखूण प्रतिक्रिया 93

सहज Tue, 10/02/2012 - 15:12
१८५९ मधे चार्ल्स डार्वीन यांनी मांडलेला उत्क्रांतीवाद जगासमोर आला. अजुन ५० एक वर्ष द्या. मी तरी आशावादी आहे की तोवर देव - धर्म ही संस्था बरीच खिळखिळी झाली असेल. सध्या जो पगडा आहे असे वाटतेय तो जास्त करुन पैशाचा खेळ आहे. त्यामुळे नगदनारायणापुढे सध्या कोणाचे फारसे चालणार नाही. राहीला प्रश्न भोळ्या भाविकांचा, ती मंडळी काय देव- बुवाबाजी नाही तर अजुन कशात तरी फसतीलच कारण ते भोळे भाबडे आहेत. जे लोक डोळस असुन श्रद्धाळू भाविक आहेत, ती मात्र ज्याची त्याची निवड/चॉइस आहे. कोणाला वाचनाची आवड/ व्यसन, खेळाची आवड/ व्यसन, खायची प्यायची आवड / व्यसन तसे देवभक्तीची आवड/ व्यसन. आवड असलेला प्रत्येक इसम त्याच्या छंदापायी बुडतोच असे नाही, इतर आवड्/छंद/व्यसनाप्रमाणे हेही एक. देव-देश-धर्म-अस्मिता या पलीकडे मानवाचा प्रवास सुरु झाला आहे हे नक्की!

In reply to by सहज

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 10/04/2012 - 13:28
>> मी तरी आशावादी आहे की तोवर देव - धर्म ही संस्था बरीच खिळखिळी झाली असेल. छान छान .. भाबडा आशावाद. आमचा एक मित्र म्हणत असे "बाहेर चेचल्या गेल्या म्हणजे माणूस बरोबर देवाकडे वळतो" :)

प्रभाकर पेठकर Tue, 10/02/2012 - 15:14
>>>>याच्या समागमात उपस्थिती लावण्यासाठी दोन-दोन हजार रुपये मोजावे लागतात.... ओह माय गॉड..! 'समागमात'? हे काही कळले नाही. 'समागमा'चा अर्थ वेगळा आहे असे वाटते.

In reply to by प्रभाकर पेठकर

इरसाल Tue, 10/02/2012 - 15:30
हिंदी/पंजाबी मधे "समागम" हाच शब्द आहे. जसे संत समागम = संत भेट = सत्संग = भक्तिमेळा =प्रवचन सभा वगैरे वगैरे. तुम्हाला अभिप्रेत असणाराही बरोबर आहेच

In reply to by इरसाल

प्रभाकर पेठकर Tue, 10/02/2012 - 17:31
हम्म्म्म! तुमचे म्हणणे आणि लेखातील शब्दप्रयोग योग्य दिसतो आहे. आमचेच ज्ञान तोकडे किंवा आवडत्या अर्थाभोवती संकुचित आहे असा विचार मनी आला. धन्यवाद.

चित्रपटाची चांगली ओळख करुन दिली आहे, चित्रपट पाहण्याची उत्सुकता चाळवली आहे. '' ओह माय गॉड '' एक हजार एक टक्का पाहीनच. धन्स. -दिलीप बिरुटे

नितिन थत्ते Tue, 10/02/2012 - 15:43
परीक्षण आणि लेखाची सुरुवात मस्तच. अवांतर: या राधे मां ( http://www.mobiletoones.com/downloads/wallpapers/people_wallpapers/preview/44/66013-shree-radhe-guru-maa.jpg ) आम्हाला सल्लूच्या कॅरॅक्टर ढीला वाल्या व्हैणींसारख्या ( http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/9a/Zarine_khan_iijw_2012.jpg/220px-Zarine_khan_iijw_2012.jpg ) वाटल्या. त्यांना कडेवर घेऊन नाचायला भक्त तयार असतील यात आश्चर्य नाही.

In reply to by नितिन थत्ते

नितिन थत्ते Tue, 10/02/2012 - 15:55
>>आम्हाला सल्लूच्या कॅरॅक्टर ढीला वाल्या व्हैणींसारख्या आम्हाला सल्लूच्या कॅरॅक्टर ढीला वाल्या आमच्या व्हैणींसारख्या असं वाचावं... सल्लूच्या व्हैणी नाहीत.

In reply to by ५० फक्त

मालोजीराव Fri, 10/05/2012 - 12:59
असू शकेल, भक्तांना नाई म्हणता येत नसेल, अनेक भक्तांना प्रसाद दिल्यावर शेवटी काय होणार ? पण आम्ही तुमचा सल्ला ऐकून,आमचा आपला तमाशाचा फड जास्त बरा असं म्हणून तिकडे फिरकणार नाही आता ;)

मस्त कलंदर Tue, 10/02/2012 - 17:15
छान चित्रपट ओळख.. सगळ्या बाबा-बुवा-बायांबद्दलच्या मताबद्दल सहमत. स्वतःच्याच तोंडाने मीच कसा देव आहे हे सांगायला या लोकांना काहीच वाटत नाही. आणि त्यांना देव देव म्हणून डोक्यावर घेणार्‍यांबद्दल तर काय बोलायलाच नको..

रेवती Tue, 10/02/2012 - 18:18
परिक्षण आवडले. हा सिनेमा बघणार. त्याशिवाय हिरवीन, बर्फी, इंग्लीश विंग्लीश, असे शिनेमे येत्या चार सहा म्हैन्यात पाहून टाकते. धन्यवाद हो समीरजी.

प्राध्यापक Tue, 10/02/2012 - 19:29
परिक्षण आवडले, समीर , चित्रपट परीक्षण तर आवडलेच ,परंतु त्याच्या बरॉबरच तथाकथीत देवधर्माच्या नावाखाली चाललेल्या कर्मकांडावर अतिशय अचुक भाष्य केलेत्. चित्रपट बघीतलाच पाहीजे,धन्यवाद.

शिल्पा ब Tue, 10/02/2012 - 21:44
या विषयावरचा हा पहीलाच पिच्चर नाही. मराठीत अशोक सराफ, लक्ष्या अन रविंद्र महाजनी यांचा असाच एक पिच्चर येउन गेला. नाव आठवत नाही. हा पण जमले तर पाहुच. बाकी ते राधा माँ वगैरे वाचुन - दुनिया झुकती है आठवलं अन अशा अंधविश्वासु लोकांची किव आली. वाईट वेळ आली तशीच जाईल..आपण आपले प्रयत्न अन सकारात्मक विचार करणे सोडले नाही तर जगणे सोपे होते.

मराठे Tue, 10/02/2012 - 22:04
चित्रपट नक्कीच बघण्यासारखा आणि विषेशतः ओ़ळखीच्या काही व्यक्तींना दाखवण्यासारखा दिसतोय. मानसिक दुबळेपणा अधिक अज्ञान याच्यामुळेच बुवाबाजी बोकाळते. बरेचदा आपण करतोय त्यात काहीतरी चुकीचं आहे हे कळत असतं पण वळत नाही. एकदा 'देवा-धर्माचं काम' म्हटलं की लोकंही डोळे बंद करून आणि डोकं गहाण टाकून करायला तयार होतात. तिथे अपिल नाही.

Pearl Tue, 10/02/2012 - 23:10
परिक्षण आवडले. तुम्ही केलेले चित्रपट परिक्षण नेहमीच वाचण्यासारखे असते :) आणि लेखही छान आहे.

अहो कसले डोंबलाचा झणझणीत घेऊन बसलात देऊळ पाहून सुद्धा ह्या वेळी गणेश मंडळाच्या बाहेरील गर्दी किंवा सिद्धी विनायक च्या बाहेरील गर्दी कमी झाली नाही. व्यक्ती पूजा व अवतार ह्या दोन संकल्पना समाजात खोलवर रुजल्या आहेत. ह्या धर्तीवर अनेक सिनेमे येऊन गेले आहे. मिथुन चा डबल रोल असलेला सिनेमा परमात्मा हा त्याच जातकुळीतला

तुमच्या आत्याला दोष देण्यात काय अर्थ आहे. लहानपणी कोवळ्या मनावर जे सामाजिक संस्कार होतात. तेव्हा ज्या समजुती, गृहीतक त्यांच्या मी रुजतात तीच पुढे कायम राहतात. ह्या देशात पुरुष प्रधान संस्कृती पुरुषांच्या बालपणी एवढी अंगवळणी पडली असते की पुढे चार बुक शिकून समानतेची संकल्पना मनाला पटली तरी प्रत्यक्ष कृतीत एवढ्या सहजासहजी येत नाही. ढेरपोट्या भटजींना दक्षिणा देण्याचा प्रसंग असो किंवा ढेरपोट्या राजकारण्यांना परत परत निवडून देण्याचा विषय असो शेवटी आपली जनता हि अशीच आहे. आणि ही वस्तू स्थिती एकदा मान्य केली की मनात इतर प्रश्न येत नाही. तुमच्या आत्यांची पिढी इतिहास जमा झाली तरी नवी तरुण पिढी मंगळवारी सिद्धी विनायकाच्या रांगेत तुम्हाला दिसेन. काळजी नसावी. सध्याचा धकाधकीच्या आयुष्यात प्रगत देशात व भारतातील काही प्रगत समाज मन शांती मिळवण्यासाठी मद्य , सिगरेट व अमली पदार्थांच्या आहारी जातात. त्यापेक्षा देवाच्या आहारी गेलेले केव्हाही परवडेल. माझ्या पाठीशी कोणी उभा आहे ही भावना प्रत्यक्ष आयुष्यात माणसाकडून कार्य सिद्धीस नेते, भारतातून अनेक आध्यात्मिक गुरु परदेशात येतात. व त्यांचा परदेशात परदेशी शिष्य शिष्यगण वाढत चालला आहे. अगदी पाकिस्तान मध्ये सुद्धा लाहोर , कराची येथे http://www.youtube.com/watch?v=zqKYVsupmkA http://www.youtube.com/watch?v=Lo-b4BlmYwc&feature=relmfu

In reply to by निनाद मुक्काम …

बाळ सप्रे Wed, 10/03/2012 - 15:07
>>>> मन शांती मिळवण्यासाठी मद्य , सिगरेट व अमली पदार्थांच्या आहारी जातात. त्यापेक्षा देवाच्या आहारी गेलेले केव्हाही परवडेल. मनःशांतीसाठी कशाच्यातरी आहारीच जाव लागत हेच मुळात पटत नाही..

राही Tue, 10/02/2012 - 23:54
सिनेमा पाहिला.खूप ग्रेट काही नाही, ठीक वाटला. एकदोन वाक्ये आणि सीन्स (उदा.कृष्णमूर्तीवर गलोलीने नेम धरणे वगैरे) भावना दुखवादुखवीबाबतीत बोल्ड वाटले. म्हणजे एखाद्या संघटनेने मोर्चा का आणला नाही इत्यादि वाटून गेले. पण अक्खा सिनेमाभर देव नाही,देवाचा बाजार मांडलाय वगैरे टाळ्याखाऊ डाय्लॉग नंतर शेवटी गोलमालच आहे. परेश रावल बच्चेकंपनीला खूपच आवडलेला दिसला. त्याची अ‍ॅक्टिंगही बरी झालीय. पण काहीही म्हणा, देऊळ्ची सर नाही. देऊळ सटल होता. ओएम्जी ढोबळ आहे. देऊळची बदलत्या ग्रामीण जीवनाची पार्श्वभूमी अधिक उपरोधिक आणि रियलिस्टिक होती. एका चित्रपटाच्या परीक्षणात दुसर्‍या सिनेमाची तुलना वा उल्लेख येऊ नये हे खरं, पण विषयाच्या सारखेपणामुळे निदान मनात तरी असा विचार येतोच. ओएम्जी मधली फँटसी मुन्नाभाई एम्बीबीएस मधल्या गांधीबाबा इतकीही मॅचुअर नाही. एकच आहे, नास्तिक नायक हा एक गुजराती दाखवलाय. मला तर हीच एक फँटसी वाटली. शिवाय मारवाड्यांवरचे एकदोन कॉमेंट्स तिखट वाटले. जो समाज जास्तीतजास्त (अंध)श्रद्धाळू गणला जातो त्यालाच टार्गेट ऑडिअन्स बनवण्यातलं धाडस वाखाणण्याजोगं. एका श्री. श्री. बाबांचं विडंबनही ग्रेट आहे आणि थोडं (ज्यांच्या असतील त्यांच्या) श्रद्धा दुखवणारंही. वेळ असेल तर बघावा.पैसे अगदीच मोफत जाणार नाहीत.

In reply to by राही

समीरसूर गुरुवार, 10/04/2012 - 10:51
पिटातल्या आणि बर्‍याच लोकांना थोडा बटबटीतपणा आवडतो किंबहुना व्यवस्थित समजतो. सटल मेसेज फक्त पुण्या-मुंबईमधल्या काही प्रेक्षकांना कळतो. त्यामुळे देऊळसारख्या चित्रपटांवर असंख्य मर्यादा येतात. मला व्यक्तीशः 'देऊळ' खूप संथ आणि रटाळ वाटला. भारतातल्या ८०% जनतेला असे चित्रपट कळत नाहीत त्यामुळे आवडण्याचा प्रश्नच येत नाही. पुण्या-मुंबईबाहेर 'देऊळ'चा व्यवसाय अगदीच नगण्य आहे. कित्येक ठिकाणी हा सिनेमा रीलीजच नाही झाला कारण चित्रपटगृहचालकांची नुकसान सहन करण्याची तयारी नसते. एखादा चांगला संदेश जर आपण आपल्या चित्रपटाद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तर तो चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचेल हे आधी बघीतले पाहिजे. चित्रपट महोत्सव ही दुसरी प्रायोरिटी असली पाहिजे. 'ओह माय गॉड' म्हणूनच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना आपल्या तकलादू परंपरांचे भान येईल. म्हणूनच थोडा मसाला, थोडे मनोरंजन आणि लोकांना कळण्यास सोपे जावे म्हणून थोडा ढोबळपणा हे मिश्रण चालून जाऊ शकते. बाकी उपरोध, शालजोडीतले वगैरे सामान्य प्रेक्षकांना फारसे कळत नाही असा अनुभव आहे. कदाचित म्हणूनच 'ओह माय गॉड' थोडा लाऊड वाटत असावा. असो. हे झाले माझे मत! खरे खोटे गॉडच जाणे. :-)

In reply to by समीरसूर

सुहास.. गुरुवार, 10/04/2012 - 11:07
मला व्यक्तीशः 'देऊळ' खूप संथ आणि रटाळ वाटला. >> व्यक्तीशः ना ! मग ठीक आहे .. OMG हा एन्टरटेन करण्यासाठी बनविला असावा बहुधा , कारण कानजीभाई वि कानजीभाई नाटक देखील संथ होतं, रटाळ नव्हे , आणि ईग्रंजीत तर ....डेयर यु विल लव्ह द डॉयलॉग्ज !! तरी ही एकदा पाहु ...सिडी वर ;)

In reply to by सुहास..

समीरसूर गुरुवार, 10/04/2012 - 11:32
:-) चित्रपट (निदान आपल्या देशात तरी) एंटरटेन करण्यासाठीच असावा. एंटरटेन करता-करता जर एखाद्या चांगल्या विषयावर भाष्य केले तर ते अधिक परिणाम साधते. लोकांपर्यंत पोहोचणे महत्वाचे; लोकांपर्यंतच पोहोचू शकले नाहीत तर चित्रपट बनवण्याचा हेतू साध्यच होत नाही. आपल्या इथे संथ आणि रटाळ चित्रपट (ओंकारा, हुतुतु, स्वदेस, मिर्च मसाला...असे शेकडो आहेत) चालत नाहीत या एका सत्यावरून बोध घेऊन तरी मनोरंजक चित्रपटांचे महत्व लक्षात घेतले पाहिजे. सिनेमा बहुजनांना आवडायला हवा तर तो सिनेमा..नाहीतर 'दिमाग का दही' करून घेण्याची फारशी कुणाची इच्छा नसते. :-) 'देऊळ'चा थोडा (फक्त पुण्या-मुंबईकडे) बोलबाला झाला कारण विषयातले वेगळेपण, कलाकारांचा अभिनय, आणि उत्तम तंत्र! बाकी लोकांना रुचणारा, आवडणारा, पुन्हा-पुन्हा बघावसा वाटणारा, मनोरंजन करणारा असा चित्रपट तो खचितच नव्हता. म्हणूनच बर्‍याच ठिकाणी रीलीजच नाही झाला, लोकांनी पाहण्याचा प्रश्नच येत नाही. :-)

In reply to by समीरसूर

सुहास.. गुरुवार, 10/04/2012 - 12:01
संमातर सिनेमा याचमुळे बंद पडले , कारण प्रेक्षकांची नजर बदलली आहे असे यावरून साबित होते ( थोडेसे आंजासारखे ....टवाळ धागा शंभरी गाठतो आणि क्वालिटी ला...असो ... ! ) एंटरटेन करता-करता जर एखाद्या चांगल्या विषयावर भाष्य केले तर ते अधिक परिणाम साधते. >>>> अरे रे !

In reply to by समीरसूर

बर्फी सिनेमाने १०० करोड चा गल्ला जमवतांना पिटा मधील प्रेक्षकांना खुश करण्यासाठी कोणत्या क्लुप्त्या वापरल्या.

In reply to by निनाद मुक्काम …

समीरसूर Fri, 10/05/2012 - 09:30
१. बर्फीचे बजेट ओएमजी पेक्षा खूप जास्त होते त्यामुळे नफा तसा कमीच असणार आहे. त्यामुळे बर्फी धोधो चालला (रणवीर कपूर असून देखील) किंवा ब्लॉकबस्टर हिट झाला असे म्हणता येणार नाही. ओएमजीचे बजेट कमी असल्याने नफ्याचे प्रमाण जास्त असणार आहे. बर्फी अगदी दबंग (मुन्नी बदनाम हुई...), बॉडीगार्ड (आ गया है देखो...), रेडी (धिंक चिका..), वाँटेड, राऊडी राठोड असा चालला असता तर कुछ बात थी. २. रणवीर कपूर हीच सगळ्यात मोठी क्लृप्ती होती. तो बायकांना आणि मुलींना प्रचंड आवडतो. ३. बर्फी हा बर्‍यापैकी इमोशनल चित्रपट होता. बर्फी डोळ्यांच्या कडा ओलावणारा वगैरे चित्रपट होता. ही दुसरी क्लृप्ती. कथाच (ज्यात रणवीर कपूर सारखा नायक मूकबधिर आहे) एक मोठी क्लृप्ती होती. ४. ओएमजीचा नायक परेश रावल आहे जो खरं म्हणजे रूढार्थाने नायक नाही. असे असूनही पहिल्या आठवड्याचे ओएमजीचे कलेक्शन बर्फीपेक्षा बर्‍याच ठिकाणी चांगले आहे. ५. ओएमजी युएई मध्ये रीलीज केला गेला नाही. ओएमजीचे ओवर्सीज कलेक्शन बर्फीच्या तोडीचे आहे. ६. बर्फीसारखे चित्रपट अपवाद असू शकतात. पण अशा चित्रपटांना भव्य यश मिळत नाही हे खरे. 'जॉनी गद्दार' एक चांगला सिनेमा होता. नाही चालला. 'शोर इन द सिटी' चांगला होता, नाही चालला. 'शैतान' चांगला होता, नाही चालला. 'साहेब बीबी और गँगस्टर' चांगला होता, नाही चालला...यादी खूप मोठी आहे. बर्फी मध्ये रणवीर कपूरच्या ऐवजी सोनू सूद असता तर काळं कुत्रं तरी गेलं असतं काय बर्फी बघायला? नाही! हीच ती खरी क्लृप्ती. :-)

In reply to by समीरसूर

मैत्र Sun, 10/07/2012 - 18:45
हुतूतू आणि मिर्च मसाला बरोबर स्वदेस आणि ओंकारा -- ज्यात गाणी आहेत गर्दी खेचणारी.. इतर काही कथानक आहे थोडे मसाला पद्धतीचे, काहीशा व्यावसायिक आणि बहुधा बर्‍यापैकी पैसा मिळवलेले चित्रपट हे मिर्च मसाला सारख्या समांतर चित्रपटाबरोबर धरणं थोडे ओढून ताणून आहे आणि ते इतकेही काही संथ आणि रटाळ नव्हते... देऊळ इतके.. देऊळ विनाकारण लांबला शेवटी. चित्रपट तसा रटाळ नव्हता.

अनुरोध Wed, 10/03/2012 - 14:52
>>>नास्तिक नायक हा एक गुजराती दाखवलाय सिनेमा हा मुळ कानजि व्हर्सेस कानजि या गाजलेल्या गुजरथि नाटकावर (परेश रावल याचेच) बेतलेला असल्याने असाव....

तिमा Wed, 10/03/2012 - 18:44
परीक्षणापेक्षा आधीचं मनोगतच जास्त आवडलं. सिनेमा पहाण्यात येईल. बाकी अंधश्रद्धा कमी होण्याची अपेक्षा कोणी ठेवू नये. ती वाढतच जाणार आहे कारण त्यांत कित्येकांचे अर्थकारण गुंतलेले आहे.

In reply to by तिमा

समीरसूर गुरुवार, 10/04/2012 - 11:19
@ तिरशिंगराव माणूसघाणे, >> परीक्षणापेक्षा आधीचं मनोगतच जास्त आवडलं. सिनेमा पहाण्यात येईल. बाकी अंधश्रद्धा कमी होण्याची अपेक्षा कोणी ठेवू नये. ती वाढतच जाणार आहे कारण त्यांत कित्येकांचे अर्थकारण गुंतलेले आहे. दुर्दैवाने तुमचे हे म्हणणे काही अंशी खरे आहे. परंतु जशा सती, केशवपन यासारख्या प्रथा बंद पडल्या तशाच काही दशकांनंतर/शतकांनंतर अंधश्रद्धा कदाचित कमी होईल असे वाटते. त्यासाठी नेटाने प्रयत्न मात्र करतच रहावे लागतील...आपोआप होणार नाही ते.

दादा कोंडके Wed, 10/03/2012 - 21:52
आत्ताच पाहिला. साई संस्थान आणि तिरुपतीवर अतिशय बोल्ड स्टेटमेंट केली आहेत. पण अक्षकुमारचं पात्र थोडसं अनावश्यक वाटलं. पण हा विषय मांडायचं धैर्य दाखवलं हे ही नसे थोडके.

चित्रगुप्त Wed, 10/03/2012 - 22:51
@तिमा:....अंधश्रद्धा कमी होण्याची अपेक्षा कोणी ठेवू नये. ती वाढतच जाणार आहे कारण त्यांत कित्येकांचे अर्थकारण गुंतलेले आहे...अगदी खरे. 'ऑमागॉ' सिनेमा घरचेघरी बघायला मिळाल्यास जरूर बघणार आहे. लेखाच्या सुरुवातीला लिहिलेल्या प्रसंगात आमची सहानुभूती आत्याकडून. ७३ वर्षांच्या व्यक्तीला आपले विचार पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात अर्थ नाही, योग्यही नाही. वडीलधार्‍या मंडळींच्या उपासाच्या पदार्थांची हेटाळणी करायची, आणि मुलांच्या वाढदिवसाला केक, पिझा, बर्गर, कोक वगैरें कचराहाराची लयलूट करायची, असा प्रकार हल्ली सर्रास दिसतो. कुणी बुवा-स्वामींना भुलतो, तर कुणी पिझा-हट, मॅक्डोनाल्ड्ला. आता वृद्ध असलेल्या बहुतांश मंडळींनी आपले आयुष्य संसारासाठी तडजोडी करत व्यतीत केलेले असते, त्यातून अनेक लहान-सहान हौशी पूर्ण करायला मिळालेल्या नसतात. म्हातारपणी मुला - सुनांकडे मागणी करायला संकोच वाटतो, हेटाळणी होण्याची भिती वाटते. अश्या वेळी धार्मिक रूढींच्या निमित्ताने आवडीचे चमचमीत पदार्थ खाणे वा अन्य हौशी पूर्ण करणे शक्य होत असते. दिवंगत आईची लहानशी हौस पूर्ण न केल्याची बोच इतक्या वर्षांनंतरही कायम असल्याने असे लिहावेसे, सांगवेसे वाटले.

In reply to by चित्रगुप्त

समीरसूर गुरुवार, 10/04/2012 - 11:13
@चित्रगुप्त, कुणाची हेटाळणी करू नये हे बरोबरच आहे पण चुकीच्या प्रथांवर घाला घातला गेलाच पाहिजे असे माझे मत आहे. कदाचित त्यामुळेच सती, केशवपन, आजन्म विधवा राहणे यासारख्या तद्दन फालतू आणि जीवघेण्या प्रथा बंद झाल्या. "एकादशीच्या दिवशी रोजचे अन्न खाणे म्हणजे डुकराचे मास खाण्यासारखे आहे" हे जरा अतिच होते. आणि मी पाहिलेले आहे, माझ्या आईला साबुदाण्याचा आणि शेंगदाण्याचा खूप त्रास होतो, उपवासाचे हे पदार्थ अजिबात सहन होत नाहीत तरीही अट्टहासाने उपवास करून त्रास सहन करायचा यात कुठली हौस-मौज पूर्ण होत असेल असे वाटत नाही. कित्येक बायकांना डॉक्टर उपवासाचे दुष्परिणाम समजावून सांगतात आणि उपवास ताबडतोब बंदही करायला सांगतात. उपवास आणि उपवासाचे पदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्याचे खूप दुष्परिणाम होतात असे माझ्या पाहण्यात अनेकदा आले आहे. माझी आत्या खाण्याची हौस-मौज व्हावी म्हणून खचितच उपवास करत नाही. इतर वेळी खाणे-पिणे जोरदारच आणि वैविध्यपूर्ण असतेच की! खरे म्हणजे या सगळ्या भाकडकथांवर तिची खरोखर नितांत श्रद्धा आहे. नाहीतर नुसती केळी आणि हॉटेलात मिळणारा बटाट्याचा तेलकट आणि कळाहीन निष्प्राण चिवडा खाऊन काय भूक भागणार आहे? उलट लागलेली भूक मारण्याचाच हा प्रकार आहे; यात हौस-मौज कसली? हे व्यर्थ जीवाला जाळणे झाले. पिझ्झा, बर्गर बद्दल बोलायचे तर लोकं चैन करायची म्हणून खातात; त्यामागे अतर्क्य आणि अचाट गोष्टी दडवलेल्या नसतात; कुठल्याच प्रकारची अंधश्रद्धा नसते किंवा कुठल्यातरी बाबा-बुवाच्या नादी लागून या गोष्टी खाल्ल्या जात नाहीत. त्यामुळे पिझ्झा, बर्गर आणि आपल्या निरर्थक प्रथा यात काही संबंध नाही असे वाटते. बाबा-बुवांचे हल्लीचे प्रताप बघता बाबा-बुवांच्या नादी लागणे किती हास्यास्पद आणि निरर्थक आहे हे बहुतेक सगळेच जाणतात. हे बाबा बुवा स्वतःची तुंबडी भरून घेतात आणि कोट्यवधींची माया गोळा करून बिनडोक जनतेच्या कष्टाच्या पैशावर ऐश करतात असाच सार्वत्रिक अनुभव आहे. कुठलाही बाबा-बुवा घ्या; तो स्वत:ला देव समजतो. यातच त्या बाबा-बुवाचा भोंदूपणा समोर येतो. असल्या फालतू बाबा-बुवांच्या नादी लागण्यापेक्षा मनोभावे देवाची नुसती प्रार्थना जरी केली आणि सगळ्यांशी व्यवस्थित वागण्याचा प्रयत्न जरी केला तरी पुष्कळ आहे. शिवाय आयुष्यात करण्यासारख्या बर्‍याच गोष्टी आहेत; त्या करून देखील मनःशांती मिळवता येते. त्यासाठी या देवाच्या लबाड दलालांची गरज नाही.

In reply to by समीरसूर

रेवती गुरुवार, 10/04/2012 - 19:29
हे व्यर्थ जीवाला जाळणे झाले. अगदी सहमत. हे झाले आपले (तुमचे आमचे) मत. माझी आजी असेच उपास करायची पण पोटभरीचे. कारण माझ्या वडीलांचा एक नियम होता. ते रोज हापिसातून आल्यावर आजी आजोबांशी निदान अर्धातास तरी बसून गप्पा मारायचे. उपास असेल त्या दिवशी जरा जास्त विचारपूस आणि अमूक खायला हवे तमूक एक गोष्ट तू खा असे जास्तीचे विचारणे तिला आवडायचे आणि ती आनंदाने खायची. म्हणून हे उपास! एकादशीचा उपास झाला की प्रदोश वगैरे. कारण एकच, आपली मुले, सुना येता जाता जास्तीची विचारपूस करत रहावीत म्हणून. मग एखाद्या प्रवासाच्या दिवशी जरा त्रास व्हायचा पण एरवीच्या फायद्यांसाठी तेवढे चालायचे. तसेच काही घरांमध्ये "आज आज्जी / आई / आत्याचा उपास आहे बरं का." एवढ्यानेही बरे वाटते. तसेही म्हातारपणी 'जीव जाळणे' याचे फारसे काही उरत नाही. त्यांना त्रास होईल म्हणून तुम्ही काळजीपोटी काही म्हणू जाल तरे तेच तुम्हाला ऐकवतील की माझे आता काय राहिले आहे? कधितरी बोलावणे यायचेच अश्या अर्थाचे. त्यापेक्षा त्यांचे त्यांना काय ते करू द्यावे. माझे आजोबा निर्जळी एकादशी वगैरे करायचे तेंव्हा बाबा रागवायचे पण आता माझे बाबाच निर्जळी करतात आणि आम्ही रागावतो. ते म्हणतात की आजोबांची आठवण आली ते करतात. मग आम्हीच गप्प बसतो. त्यांना बरे वाटते (मनाला) तर वाटू दे म्हणून.

In reply to by रेवती

समीरसूर गुरुवार, 10/04/2012 - 20:18
@ रेवती जी तुम्ही म्हणता असे असेलही कदाचित पण त्यामुळे उपवासाचे दुष्परिणाम टळत नाहीत. डॉक्टर म्हणूनच पोटतिडकीने उपवास टाळायला सांगतात. विशेषतः ज्यांना मधुमेह आणि रक्तदाब हे विकार आहेत (जे बहुतांशी उतारवयात येऊन छळतात) त्यांच्यासाठी उपवास खूपच त्रासदायक असतो. आणि साबुदाणा खिचडी खाल्ल्याने देव प्रसन्न होतो हा समज किती हास्यास्पद आहे हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे उपवास टाळलेलेच बरे असे वाटते. :-)

In reply to by समीरसूर

रेवती गुरुवार, 10/04/2012 - 20:24
हो, ते आहेच. मी एकतर उपास करायचे विसरते पण लक्षात राहिलेच तर भरपूर खाऊन करते म्हणजे माझी काळजी कोणाला वाटायला नको. ;)

In reply to by समीरसूर

नेत्रेश Fri, 10/05/2012 - 11:38
पिझ्झा, बर्गर, कोक हे उपासाच्या पदार्थांपेक्षाही शरीराला हानीकारक असुन सुद्धा हे पदार्थ चैन म्हणुन खायची "प्रथा" असल्यामुळे लोक खातात. तसेच तुमच्या आत्याच्या वेळेपासुन उपासाला साबुदाणे वगैरे खायची प्रथा होती, म्हणुन ती खाते. मुलांच्या वाढदीवसाला पौष्टीक भोजन, शीरा, मोदक, वगैरे पदार्थ जसे चालणार नाहीत, तसेच उपासालाही ईतर पदार्थ चालणार नाहीत. तेव्हा आधी पिझ्झा, बर्गर, कोक या प्रथा बंद करुन मगच उपासाच्या पदार्थांवर घसरायला हवे.

In reply to by नेत्रेश

मुलांच्या वाढदीवसाला पौष्टीक भोजन, शीरा, मोदक, वगैरे पदार्थ जसे चालणार नाहीत, तसेच उपासालाही ईतर पदार्थ चालणार नाहीत. आणि हो वाढदिवसाला केक कापणे, मेणबत्त्या फुंकणे अशी कर्मकांडे पण केल्याशिवाय मन भरत नाही.

नन्दादीप गुरुवार, 10/04/2012 - 11:30
बहुतेक "कानजि व्हर्सेस कानजि" चे मराठीकरण म्हणजेच आपल्या मक्याचे "केशवा माधवा" असाव. ते आधीच पाहून झाल्याने पिक्चर पहाण्यात इंटरेस्ट नाही. आता सुरुवातिच्या भागाबद्दल - नरेंद्र महाराज, बाकी कसाही असला, काहीही चाळे केले तरी तो बाटलेल्यांना परत हिंदू धर्मात घेतो, त्यामुळे ईतर सर्व गुन्हे माफ. आता राधे मॉ - तिला एकदा कडेवर घेऊन नाचाव म्हणतोय. काय काय कराव लागेल त्यासाठी????

In reply to by नन्दादीप

बाळ सप्रे गुरुवार, 10/04/2012 - 13:41
>>>>काहीही चाळे केले तरी तो बाटलेल्यांना परत हिंदू धर्मात घेतो, म्हणजे नक्की काय करतो ?

In reply to by बाळ सप्रे

नन्दादीप गुरुवार, 10/04/2012 - 14:06
>>राजकारण्यांच्या पदरात लपणार्‍या या भोंदू बाबाला ३०० एकर जागा फुकट मिळालेली आहे. याच्या प्रवचनात हा नरेंद्र महाराज राजकारणाखेरीज क्वचित कुठल्यातरी विषयावर बोल>>>> हेच हो. बाकी काही नव्हे. तसल काही समजल की सांगेन लगेच...

दिपक गुरुवार, 10/04/2012 - 12:01
मस्त झालेय परिक्षण. खुप लोकांनी सुचविला आहे लवकरच पाह्यला हवा. बाकी ’राधे मा’ चे हे नृत्य बघुन डोळे दिपले होते. ;-) कडेवर घेऊन नाचताना १.१० http://www.youtube.com/watch?v=yCaHiUjgssY

In reply to by स्मिता.

इरसाल Fri, 10/05/2012 - 09:21
तुमचं बर बारीक लक्ष हो. एका स्कुटरवाल्या बाईला एक कारवाली बाई टक्कर मारुन निघुन जाते. पोलीसांकडे तक्रार केल्यावर पोलीस विचारतो की गाडीचा नं. पाहीला काय तर म्हणे नाही ती लगेच पळुन गेली पण..... तिने गुलाबी साडी नेसली होती, गळा डीप होता, कानात हिर्‍याच्या कुड्या होत्या, टिकली चंद्रकोरीच्या आकाराची होती, केसांच्या दोन बटा काढल्या होत्या, गडद तपकिरी रंगाची लिपस्टिक लावली होती आणी ती तिला बिलकुल शोभत नव्हती.

In reply to by दिपक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/04/2012 - 14:01
व्वा....! गिरक्या घेणार्‍या राधेमा समोर डोळे बंद करुन नमस्कार करु पाहणारे भक्तांना पाहुन काय बोलावे काही सुचत नाही. राधा मा वर एक नवा काथ्याकुट घ्या रे कोणीतरी ? मागे एका वाहिनीवर बराच भंडाफोड झाला होता. राधा मा चे. बरेच व्हिडो पाहता आले. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/04/2012 - 15:41
इजिप्तच्या सहलीत एका इजिप्शियन कलाकाराला ह्या राधेमाँपेक्षा कितीतरी जास्त वेळ आणि वेगाने गिरक्या घेत नृत्याचे विविध प्रकार करताना पाहिले होते. तो कलाकार स्वतःला नृत्य कलाकार म्हणवून घेतो. कोणी बाबा-माँ वगैरे नाही. इस दुनियाँमें पागलोंकी कमी नही। एक ढुँडने जाओ तो हजार मिल जाते है।

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 10/04/2012 - 17:38
कदाचित सिनेमा चांगला असेलही. परंतु धाग्यात व्यक्त झालेले विचार अत्यंत फालतू आहेत असे जाता जाता नमूद करून जातो. विचार अत्यंत अपरिपक्व वाटले (अर्थात आहेतच) बा द वे सदर लेखकाचा आक्रस्ताळे पणा अन्य धाग्यावर पाहीला असल्याने इथे अधिक लिहीत नाही.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

समीरसूर गुरुवार, 10/04/2012 - 20:04
@ llपुण्याचे पेशवेll लेखातले सगळे विचार बरोबरच आहेत असे वाटते. कदाचित त्यामुळेच सहमतीचे इतके प्रतिसाद आले आहेत. सगळे विचार बरोबर असल्याने अपरिपक्व असण्याचा दुरान्वयेही संबंध येत नाही, असे वाटते. आक्रस्ताळेपणा म्हणजे कळले नाही. सत्य परिस्थिती परखडपणे आणि निर्भीडपणे मांडणे याला आक्रस्ताळेपणा म्हणत असतील तर असेल बुवा आक्रस्ताळेपणा! :-) तो सुरुच राहणार. कुणी अधिक लिहिले काय किंवा उणे लिहिले काय! कसे? ;-) आपल्या स्पष्ट प्रतिसादाबद्दल शतशः धन्यवाद! :-)

In reply to by समीरसूर

लेखातले सगळे विचार बरोबरच आहेत असे वाटते. कदाचित त्यामुळेच सहमतीचे इतके प्रतिसाद आले आहेत. सगळे विचार बरोबर असल्याने अपरिपक्व असण्याचा दुरान्वयेही संबंध येत नाही, असे वाटते. तुमच्या मते असतील. आणि तुम्हाला हो ला हो करणाराही भेटतील. :) आणि हो तुम्ही लिहीलेत म्हणजे तुम्हाला बरोबरच वाटले पाहीजेत. आक्रस्ताळेपणा म्हणजे कळले नाही. सत्य परिस्थिती परखडपणे आणि निर्भीडपणे मांडणे याला आक्रस्ताळेपणा म्हणत असतील तर असेल बुवा आक्रस्ताळेपणा! तो सुरुच राहणार. कुणी अधिक लिहिले काय किंवा उणे लिहिले काय! कसे? मग चालूदे चालूदे. :) असे समाजसुधार म्हणवणारे आले आणि गेले.

अर्धवटराव गुरुवार, 10/04/2012 - 18:27
आपल्याला काय हवय, कसं मिळवायचं आणि ते मिळवण्यासाठी आवश्यक ति किंमत द्यायची/मेहनत करायची तयारी ठेवायची - हि एक पद्धत. जन्मापासुन मरेपर्यंत आयुष्य हे अनिश्चिततेचं/अज्ञानाचं मोहोळ आहे असं वाटुन काहितरी तरि तुक्के मारुन समस्या सोडवायची - हि दुसरी पद्धत या दोन्ही पद्धतींनी समस्या सुटतात हा सर्वसाधरण अनुभव, पण दुसरी पद्धत जास्त सोपी असल्यामुळे त्याकडे कल जाणे हे चुकीचे वाटत असले तरिही ते सहाजीक आहे. लेख तसा ठीकठाक... पण बराचसा अतीरंजीत. >>आपापसात सलोख्याने राहणे म्हणजेच ईश्वराची, अल्लाची, येशूची खरी सेवा हे आपल्या लोकांना कधी कळेल? -- सलोख्याने, सुखाने राहाणे हि माणासाची गरज आहे... तिथे ईश्वराच्या सेवेचा अनावश्यक भाव का आणावा? धार्मीक कर्मकांड, दानपेट्यांवर पैसा खर्च करण्यापेक्षा गरीबाला / गरजवंताला ते धन द्यावे हे ही चुक... कुणा गरजवंताला मदत करणे हि माणसाच्या कारुण्य / सहानुभुती भावनेची अभिव्यक्ती आहे... त्या भावनेला उगाच कर्मकांडाशी कशाला जोडायचे?? अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

समीरसूर गुरुवार, 10/04/2012 - 20:11
@ अर्धवटराव लेखात कुठेच अतिरंजन नाही. जे आहे ते निव्वळ सत्य आहे. बाकी कर्मकांडे कशालच जोडणे बरोबर नाही कारण कर्मकांडे मुळातच अर्थहीन असतात असा एक कयास आहे. इतरांशी चांगले वागणे, मदत करणे यातूनच मानवी मनाची स्वच्छता होते, जीवनाचा खरा अर्थ कळतो आणि माणूस त्या ईश्वरी तत्वाच्या अधिक जवळ पोहोचतो असे वाटते. माणूस नीट विचार करायला शिकतो आणि सदसदविवेकबुद्धीचा उपयोग करायला शिकतो. पिंडीवर दूध ओतायचे आणि बाहेर मात्र वाट्टेल तसे वागायचे यातून ईश्वरी तत्वाजवळ पोहोचणे अशक्यच आहे. असो. गहन विषय आहे हा...

In reply to by समीरसूर

अर्धवटराव गुरुवार, 10/04/2012 - 21:12
>>लेखात कुठेच अतिरंजन नाही. जे आहे ते निव्वळ सत्य आहे. -- अतीरंजनाचा हा आणखी एक नमुना. >>चांगले वागणे, मदत करणे यातूनच मानवी मनाची स्वच्छता होते, जीवनाचा खरा अर्थ कळतो आणि माणूस त्या ईश्वरी तत्वाच्या अधिक जवळ पोहोचतो असे वाटते. -- परत तेच. मनाची स्वच्छता, जीवनाचा खरा अर्थ, ईश्वरी तत्वाच्या जवळ पोचणे.. छ्या छ्या छ्या... मानवी मदतीला या भानगडी कशाला जोडायच्या ? या सगळ्या स्व्यापसव्यातुन तुम्ही कळत नकळत एक नवीन पंथ जन्माला घालताय असं नाहि वाटत तुम्हाला? मानवी मदत निसर्गाच्या सिम्बोयोसीस, कॉमन्सिलीझम तत्वांपलीकडे काहि नसावी. >>गहन विषय आहे हा... -- याच गहनतेच्या पोटी बाबा लोकांच्या मठांची, पोथीनिष्ठतेची, कर्मकांडाची बुनीयाद असते. रोज एक नवा बाबा आपलं दुकान कसं काय उघडतो याचं हे चपखल उदाहरण.

In reply to by अर्धवटराव

समीरसूर Fri, 10/05/2012 - 09:14
जाऊ द्या हो अर्धवटराव, जास्त लोड नका घेऊ. मी आणि तुम्ही इथे कंठशोष करून काही फायदा नाही मग कशाला काथ्याकूट करत बसायचा? त्यामुळे जाने दो...भेटलो तर बोलू. आपण समजतो तितके हे कॉम्प्लिकेटेड नाहीये. आपल्या इथे सगळ्याच गोष्टींवर पुटे चढतात (मारुतीच्या मूर्तीवर शेंदराची चढतात त्याप्रमाणे) त्यातला प्रकार आहे हा. त्यात आपल्या प्रथा, कर्मकांडे आणखी काँप्म्लिकेशन्स वाढवून ठेवतात. आपण कुठल्याही गोष्टींचे कसेही अवाजवी पृथ्थकरण करत बसतो आणि त्यामुळे आपली बस चुकते. 'स्पिरिच्युअ‍ॅलिटी मॅनेजमेंट' नाहीये आपल्याकडे. जे आहे ते सगळे भावनांचे व्यर्थ खेळ आहेत बाकी काही नाही. त्यामुळे नो टेंशन! हसा बघू आता... ;-) --समीर

In reply to by समीरसूर

अर्धवटराव Fri, 10/05/2012 - 09:56
>>मी आणि तुम्ही इथे कंठशोष करून काही फायदा नाही मग कशाला काथ्याकूट करत बसायचा? -- हौस, बाकि काहि नाहि >>आपण समजतो तितके हे कॉम्प्लिकेटेड नाहीये. -- आम्हा अर्धवटांकरता तसही कुठलीच गोष्ट कॉम्प्लिकेटेड नसते :) >>आपल्या इथे सगळ्याच गोष्टींवर पुटे चढतात (मारुतीच्या मूर्तीवर शेंदराची चढतात त्याप्रमाणे) त्यातला प्रकार आहे हा. -- अहो हे सगळीकडे आहे. माणसाची जित्याची खोड आणि काय. >>त्यात आपल्या प्रथा, कर्मकांडे आणखी काँप्म्लिकेशन्स वाढवून ठेवतात. -- कुठल्याही गोष्टीतलं मनोरंजन मुल्य हरवलं कि कॉम्प्लिकेशन्स शिवाय तसही काय हाती लागणार म्हणा. >>आपण कुठल्याही गोष्टींचे कसेही अवाजवी पृथ्थकरण करत बसतो आणि त्यामुळे आपली बस चुकते. -- हि देखील हौस. >>'स्पिरिच्युअ‍ॅलिटी मॅनेजमेंट' नाहीये आपल्याकडे. जे आहे ते सगळे भावनांचे व्यर्थ खेळ आहेत बाकी काही नाही. -- बघा, मी म्हणतोय ना.. एक उत्कृष्ट बाबा बनण्याचे सर्व गुण दिसतात तुमच्या लेखणीत. करायचा का धंदा सुरु? सायकल स्टॅण्ड, हार-फुलं-प्रसादाच कॉण्ट्रॅक्ट मात्र आमच्या द्यायचं हां. >>त्यामुळे नो टेंशन! हसा बघू आता... -- समीरसूर बाबा कि जय हो :) ( कृ.ह.घ्यावे ) अर्धवटराव

छोटा डॉन गुरुवार, 10/04/2012 - 21:48
ह्या चर्चेमुळे प्रेरित होऊन काल अगदी अपेक्षेने वगैरे हा चित्रपट पाहिला. चित्रपट अगदीच 'बरा आहे' ह्या क्याटेगरितला आहे, खास वगैरे अजिबात नाही. नक्की कुठल्या मुद्द्यावर भाष्य करायचे आहे हे प्रस्तुत दिग्दर्शकाला समजले असले तरी ते पेलणे मात्र जमले नाही. चित्रपट हा बटबटीत म्हणावा इतका भडक झाला आहे, आक्रस्ताळे संवाद, अनावश्य्क सिन्स, अतर्क्य सिन्स ह्यामुळे चित्रपटातली मजा कमी होते. परेश रावल सोडला तर बाकी पात्रे अगदीच बालीश किंवा अभिनिवेशपुर्ण दाखवली आहेत, परेश रावलही नॉट अप टु मार्क. कास्टिंग चुकले म्हणावे इतकी काही पात्रे अस्थानी आहेत. संपुर्ण चित्रपटात टाळ्या वाजवाव्यात असा एकही सीन नाही. काही विडंबने करण्याचा प्रयत्न छान आहे पण केवळ तसे कपडे घातले व केशभुषा वगैरे केली म्हणुन विडंबन होत नसते, त्यात जीव ओतावा लागतो, अन्यथा त्याच्या कचकड्याच्या बाहुल्या होतात. ह्या चित्रपटातुन मेस्सेज वगैरे दिला असल्याचे मला तरी समजले नाही, उत्तरार्धात किंवा शेवटात चित्रपट पुर्ण गंडला आहे, त्यापेक्षा देऊळ कित्येक पटीने सरस होता. चित्रपटातली एक स्पेशल चीज 'गो गो गो गोविंदा' हे गाणे, मस्त आहे एकदम, सोनाक्षी आणि प्रभुदेवा अफाट नाचले आहेत. बाकी सर्व ठिकठाक म्हणावे इतकेच. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

रेवती गुरुवार, 10/04/2012 - 22:17
अरेच्च्या! असं आहे काय! बरं झालं सांगितलस. पैसे वाचवलेस असं म्हणता येणार नाही कारण दोनच डॉलरला डिव्हिडी मिळते पण आणून ती घरीच ठेवावी लागते त्याचा वैताग येतो.माझा वरचा प्रतिसाद आता बदलावा लागेल. ;)

In reply to by छोटा डॉन

अर्धवटराव गुरुवार, 10/04/2012 - 23:18
>>चित्रपटातली एक स्पेशल चीज 'गो गो गो गोविंदा' हे गाणे, मस्त आहे एकदम, सोनाक्षी आणि प्रभुदेवा अफाट नाचले आहेत. -- सोनाक्षीचा व्यायाम/दंडबैठका म्हणायचं आहे का तुम्हाला डॉनराव??

In reply to by अर्धवटराव

छोटा डॉन गुरुवार, 10/04/2012 - 23:58
हो हो, आम्हाला तेच म्हणायचे आहे, जे काही असेल ते पण तो प्रकार भारी होता. असो, दहिहंडीका उत्सव शुरु किया जाय. - छोटा डॉन

अवतार Sun, 10/07/2012 - 16:07
म्हणाला होता "Religion is what keeps the poor from murdering the rich". जिथे भय आणि दहशतीचे साम्राज्य असते तिथे प्रस्थापितांचे हितसंबंध जपणाऱ्या कोणत्याही कृत्याला अधिकृत मान्यता मिळवून देणारी एक विचारप्रणाली असावीच लागते. मग त्यासाठी कुठलाही "इझम" चालू शकतो. नेपोलियनचे वाक्य हे थोड्याफार फरकाने कोणत्याही विचारप्रणालीला लागू पडते. याचे कारण म्हणजे विचार किती चांगले आहेत याला फारसे महत्व नसते. ते विचार राबवण्याची शक्ती ज्यांच्याकडे आहे त्यांचे हेतू काय आहेत हे अधिक महत्वाचे असते. आपण देवांना सलाम ठोकला नाही तर आपले काहीतरी तळपट होईल आणि सलाम ठोकला तर आपला फायदा होईल या भावनेतून जी कर्मकांडे केली जातात त्यांना भक्तीचा मुलामा देणे ही आपली सामाजिक आणि वैयक्तिक गरज आहे. मोक्ष मिळाला नाही तर या संसाराच्या भवसागरात आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागेल आणि यातना भोगाव्या लागतील म्हणून देवाचे नाव घ्या; असल्या नकारात्मक भावनेतून जी भक्ती, साधना केली जाते त्यातून आत्मिक, नैतिक, मानसिक कोणतीही उन्नती होण्याची शक्यता फारच कमी असते. म्हणूनच संतांनी "भाव तसा देव" असे म्हटले आहे. "नाव तसा देव" असे म्हटले नाही. भयभीत जनता ही गोंधळलेली असते आणि गोंधळलेली जनता एकत्र येऊन अत्याचारी व्यवस्थेविरोधात बंड करू शकत नाही. जनतेला निर्भय बनवणारा कोणताही विचार आणि त्या विचारांचे प्रतीक म्हणून समाजाला दिशा दाखवणाऱ्या व्यक्ती यांचा त्या त्या व्यवस्थेतील प्रस्थापितांनी नेहमीच द्वेष केलेला आहे. ज्यांनी कोणी जगाला शांततेची शिकवण दिली आणि निर्भय होऊन आत्मनिर्भर व्हायला शिकवले त्यांची प्रस्थापित वर्गाकडून नेहमीच कत्तल झाली आहे. ही अस्तित्वाची लढाई आहे याचे नेमके भान प्रस्थापितांना असते. तेच भान सर्व सामान्य जनतेला येऊ नये म्हणूनच वेळोवेळी नवनवीन "इझम" जन्माला घालत राहणे ही त्यांची गरज आहे.

In reply to by अवतार

''भयभीत जनता... पासून ते ''....."इझम" जन्माला घालत राहणे ही त्यांची गरज आहे'' इथपर्यंतचा प्रतिसाद विशेष आवडला. -दिलीप बिरुटे

समीरसूर Mon, 10/08/2012 - 09:47
कालच लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) प्रफुल्ल जोशी यांनी त्यांच्या अनुभवांवर लिहिलेले 'कर्नल नावाचा माणूस' हे पुस्तक (पद्मगंधा प्रकाशन) वाचले. धर्म, जात, देव, कर्मकांडे, वर्ण, वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सीमेवर आणि संरक्षण क्षेत्रात कशा आपोआप गळून पडतात हे या पुस्तकात खूप चांगल्या पद्धतीने दाखवले आहे. आणि या निरुपयोगी गोष्टींची पुटे गळून पडल्यामुळेच माणूस एकमेकांच्या जास्त जवळ जातो आणि अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतो हे देखील त्यांच्या अनुभवांवरून प्रकर्षाने जाणवले. केवळ मनुष्यधर्म पाळणार्‍या या क्षेत्राला मनापासून सलाम! हे सगळे त्यांचे त्यांच्या ३२ वर्षातल्या कारकीर्दीतले अनुभव आहेत; त्यामुळे शंका घ्यायला वावच नाही. जिथे जातीधर्माचे कुंपण जमीनदोस्त झाले तिथे शांतता आणि स्थैर्य आले हा नियम अनेकदा सिद्ध झालेला आहे. 'गप्पांगण' हे द. मा. मिरासदारांचे पुस्तक (मेहता पब्लिशिंग हाऊस) देखील याच शनिवार-रविवारी वाचनात आले. त्यात 'जेवण व जेवणावळी' या लेखात पंढरपुरातल्या त्यांच्या काळातल्या जेवणावळींचे वर्णन आहे. ब्राह्मणभोजन घातल्याने पुण्य लाभते या गैरसमजाचा लाभ घेऊन कित्येक ब्राह्मण दुपारी हात जोडून "दुपारची वेळ आहे; ब्राह्मण उपाशी आहे; जेऊ घातल्यास पुण्य लाभेल" असे अल्मोस्ट भीक मागून पुख्खा झोडत असत आणि वरून तांब्यामध्ये शिरा वगैरे चोरून नेत असत. कुणाला कळू नये म्हणून मान खाली घालून जेवत असत. मिळालेल्या दोन-चार आणे दक्षिणेत अकबर टॉकीजमध्ये जाऊन सिनेमा बघत असत. हे वर्णन द. मा. मिरासदारांनी केलेले आहे. मला वाटते यात भूषणावह असे काहीच नाही. आणि आपल्या बुरसटलेल्या विचारसरणीसोबतच आपण धर्माला देतो त्या अवास्तव महत्वाचा इथे खूप जबरदस्त संबंध आहे. त्यामुळे धर्म, जात या संकल्पना जितक्या वैयक्तिक पातळीवर राहतील (अगदीच नाही राहिल्या तर उत्तमच) तितक्या चांगल्या. वेळ मिळाल्यास नक्की वाचा ही पुस्तके. बाकी सिनेमा कसा होता यापेक्षा त्याने काय सांगायचा प्रयत्न केला हे अधोरेखित करण्याचा माझा प्रयत्न होता. त्या सिनेमाची चित्रपटीय मुल्ये उणे-अधिक असतीलही (ढोबळ, बटबटीत, वगैरे) पण त्यांनी ज्या प्रामाणिकपणे संदेश पोहोचविण्याची धडपड केली आहे ती जास्त महत्वाची आहे असे वाटते. सिनेमा आपल्याला कसा वाटतो यापेक्षा अधिकाधिक प्रेक्षकांना कसा वाटेल हे महत्वाचे! ताजा खबरः ओएमजीचा पहिल्या आठवड्यातला गल्ला ३५ कोटी आहे. परेश रावल हीरो असलेला चित्रपट आणि पहिल्या आठवड्यात ३५ कोटी? इंप्रेसिव्ह! :-) जास्तीत जास्त लोकांना बघायला मिळतोय हे खरे समाधान. :-) माहिती: मी स्वत: ब्राह्मणच आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

समीरसूर Mon, 10/08/2012 - 11:29
आपले दोष उघड करणे, खुल्या दिलाने ते मान्य करणे, आणि सुधारण्याचा प्रयत्न करणे यात कसली आलीये hypocrisy? असे म्हणायचे झाले तर महादेव गोविंद रानडे, सावरकर, गाडगे बाबा, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. आंबेडकर यांनी जे आपल्या समाजात परिवर्तन घडवून आणायचे कष्ट उपसले ते व्यर्थच म्हणायचे. :-) मी फक्त ब्राह्मणांमधले दोष दाखवत नाहीये. असे मोठे मोठे दोष आपल्या देशात प्रत्येक धर्मात आणि जातीत आहेत. 'सिमी', 'संभाजी ब्रिगेड', मुस्लीम मूलतत्ववाद, जिहाद, जाट हॉनर किलिंग हे सगळे अत्यंत घातक असे धर्मिक दोषांचे मूर्तरूप आहेत. या दोषंमुळे हिंसा वाढते. समाजाचा तोल बिघडतो. खलिस्तान, प्रलोभने दाखवून केलेला ख्रिस्ती धर्मप्रचार ही त्याचीच उदाहरणे. असे प्रत्येकच जाती-धर्मात त्या-त्या जाती-धर्माच्या अवास्तव आणि किळसवाण्या घमेंडीमुळे शिरलेले प्रचंड हानीकारक असे दोष आहेत. ते आपणच शोधून गाडून टाकायला हवेल; किमान प्रयत्न तरी करायला हवेत. आमचे सगळेच भारी असे म्हणून स्वत:च स्वत:च्या पाठीवर शाबासकी मारून घेणारे फारसे पुढे जात नाहीत हा इतिहास आहे. वैयक्तिक पातळीवरही आपण आपले दोष शोधून काढतोच आणि त्यांना सुधारायचा प्रयत्न करतोच की नाही? त्यामुळेच प्रगती होते. स्वतःच्या व्यक्तीमत्वातले, समाजातले, जातीतले, वागण्या-बोलण्यातले दोष शोधून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करणे या कसली आलीये hypocrisy? हे म्हणजे कुठल्याही चांगल्या कामात प्रोत्साहन देण्याऐवजी कुजके बोलून पाय खेचणे झाले. अशी बरीच माणसे होती/असतात. कुणी काही चांगले केले किंवा करायचे म्हटले किंवा कुणाचे काही बरे होत असले तर उगीच जाऊन काहीतरी कुजकट बोलायचे, वागायचे आणि समोरच्याला यातना झाल्या किंवा त्याचे काम बिघडले की आनंद मानायचा अशी माणसे खूप पाहिली आहेत. मूळ मुद्दा बाजूला सारून निरर्थक गोष्टींवर वितंडवाद घालायचा ही आपली जुनी खोड म्हणूनच मराठी माणूस मागे पडतो. म्हणूनच म. फुल्यांना जोडे आणि शेणाचे गोळे सहन करावे लागले. असो. चालायचेच. hypocrisy? काहीतरीच... :-) :-)

In reply to by समीरसूर

अहो तुम्ही समाजाला इतके प्रबोधित करण्याचे बोलत आहात आणि त्यातही "त्यामुळे धर्म, जात या संकल्पना जितक्या वैयक्तिक पातळीवर राहतील (अगदीच नाही राहिल्या तर उत्तमच) तितक्या चांगल्या." असे व्हावे असे म्हणता आहात परंतु तुम्ही स्वतः जात वैयक्तीक जीवनातून काय सामाजिक जीवनात देखील मिरवताना दिसत आहात त्याला दुसरे काय म्हणायचे? परत पुढे जाऊन "स्वतःच्या व्यक्तीमत्वातले, समाजातले, जातीतले, वागण्या-बोलण्यातले दोष शोधून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करणे या कसली आलीये hypocrisy?" जातीतले दोष सुधारण्या बद्दल बोलत आहात. म्हणजे त्यासाठी जात तुम्ही ठेवत आहातच ना! आम्ही जालावरतरी सहज आणि थत्तेच्चाच्चा ही दोनच (आणि आमचा म्हातारं पण काय!) मंडळी जात सोडण्यास उत्सुक असलेली किंवा अदनुषंगाने लिहीलेली पाहीली. चूभूदेघे. म्हणूनच म. फुल्यांना जोडे आणि शेणाचे गोळे सहन करावे लागले. तसेही महात्मा फुलेंबद्द्ल माझे मत फारसे अनुकूल नसल्यामुळे त्याबद्दल मी अधिक काही बोलत नाही.

इतकं पर्फेक्ट लॉजिक, इतक्या उघडपणे मांडणं अवघड आहे आणि चित्रपटात ते यशस्वीपणे केलय. परेश रावलनं भूमिका अफलातून केलीये. पिक्चरचं एडिटींग जबरदस्त आहे. डायलॉग्ज तर इतके सुसंबद्ध आहेत की कुठेही तोल जात नाही. देव या माणसाच्या कल्पनेपायी किती अनागोंदी चालूये हे झकास दाखवलय. `देव नाही' ही कल्पना असह्य आहे म्हणून अक्षयचे दिलासा देणारे संवाद देखील उत्तम आहेत. अक्षयची जादूई `की चेन' जीनं स्वतःला मृत्यूतनं बाहेर काढलं ती परेश रावलं ताईत म्हणून जपेल असं वाटतं तेव्हा फेकून द्यायला सांगणं आणि फेकल्यावर ती निराकारात विलीन होणं हा क्लायमॅक्स अप्रतिम आहे देव जशी कल्पना आहे तशीच जात पण कल्पना आहे. ती देव या कल्पनेचाच परिणाम आहे. तुम्ही ज्याला देव मानता त्या समूहाची जात ती तुमची जात. तुमचे विचार योग्य आहेत. तुमच्या वरच्या प्रतिसादामुळे मात्र तुम्ही लॉजिक शेवटापर्यंत नेऊ शकणार नाही.जात देखील अव्हेरा आणखी एका धारणेतून मुक्त व्हाल.

क्लिंटन Tue, 10/16/2012 - 17:54
मला हा चित्रपट बहुतांशी आवडला. चित्रपटपरिक्षणही आवडले.तरीही काही मुद्दे पटले नाहीत (माझा स्वतःचा कर्मकांडांना अजिबात पाठिंबा नाही आणि धर्मबिर्म या भानगडींमध्ये मला फारसा इंटरेस्टही नाही हे आधीच स्पष्ट करतो).
"अगं, इतर दिवशी तुम्ही हेच अन्न खाता ना? मग आजच खाल्ले तर डायरेक्ट डुक्कर ठरता? जगात कितीतरी माणसे आजच्या दिवशी हेच अन्न खात असतील. म्हणून काय ते डुक्कर ठरतात? आणि अमेरिकेत कसली आलीये एकादशी? तरी ते लोकं आपल्यापेक्षा शतयोजने पुढे आहेतच की नाही?"
वैयक्तिक पातळीवर इतरांवर सक्ती न करता पाळलेले नियम माणसाला शिस्तबध्द बनवितात.मी काही वाटेल ते झाले तरी सकाळी सहाच्या आतच उठेन अशा प्रकारचे स्वतःला बंधन घालणे आणि ते काटेकोरपणे पाळणे माणसाला शिस्त नक्कीच लावेल. तसेच काहीही झाले तरी मी तळलेले चमचमित पदार्थ खाणार नाही किंवा आठवड्याचा एक दिवस लंघन करेन अशा प्रकारची बंधने स्वतःलाच घालणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे हे नक्कीच. असे चांगले परिणाम धर्माच्या नावावर झाले तर त्यात टिका करण्यासारखे काय आहे हे समजले नाही. समजा मी ठरविले की पोटाला आराम द्यावा म्हणून मी दर महिन्याच्या १० तारखेला रात्रीचे जेवणार नाही आणि इतर कोणी एकादशीला निर्जळी उपास करायचे ठरविले तर या दोन गोष्टींमध्ये फारसा फरक नाही. पण धर्मात (म्हणजे नक्की कशात?) एकादशीला उपास करा असे सांगितले म्हणून कोणी उपास करत असेल त्याचा उपहास करणे अयोग्य आहे असे मला वाटते.कारण कोणतेही असेना की कोणीही सांगितले असेना जर कोणी आपल्या आरोग्यासाठी कळत-नकळत चांगली पावले उचलत असेल तर केवळ धर्मात सांगितले म्हणून ते केल्याबद्दल त्याचा उपहास का? आता कोणी एकादशीच्या उपासाच्या नावावर एकादशी आणि दुप्पट खाशी असे करत असेल तर तो मुळातल्या मुद्द्याचाच पराभव झाला. तसे केले तरीही जोपर्यंत ती व्यक्ती इतरांवर सक्ती करत नाही, कोणताही त्रास देत नाही आणि स्वतःपुरते नियम पाळत असेल तोपर्यंत त्या गोष्टीचा उपहास करणे अयोग्य आहे असे मला वाटते.
अमेरिकेत कसली आलीये एकादशी? तरी ते लोकं आपल्यापेक्षा शतयोजने पुढे आहेतच की नाही?"
अमेरिकेतले लोक एकादशा न पाळल्यामुळे नव्हे तर इतर अनेक कारणांमुळे आपल्यापुढे आहेत.त्यातील एक महत्वाचे कारण म्हणजे तिथल्या समाजातील शिस्त. अगदी एकादशीच्या कारणाने का होईना कोणी व्यक्ती अधिक शिस्तबध्द आयुष्य जगत असेल तर त्यात काय बिघडले? आणि हो मी स्वतः कुठल्याच एकादशा/पौर्णिमा/अमावास्या पाळत नाही.किंबहुना आजची तिथी कोणती हे पण मला माहित नसते हे पण सांगतो. बाकी तुमच्या परिक्षणातील मते पटली. उदाहरणार्थ अनेक तथाकथित साधू/बाबा लोकांना शेंड्या लावून आपला कार्यभाग उरकतात याला तुम्ही केलेला विरोध पटला.

In reply to by क्लिंटन

विकास Tue, 10/16/2012 - 23:45
आत्ता हा धागा वाचला आणि प्रतिसाद लिहीणार त्या आधी लक्षात आले की क्लिंटन यांनी आधीच माझ्या मनातले लिहीले आहे. :-) हा चित्रपट मला देखील आवडला. म्हणूनच डॉनरावांचा प्रतिसाद वाचून "ओएमजी" असेच उद्गार आले! कारण हिंदी बॉलिवूड चित्रपट डॉनरावांनी एखादी सत्यजीत रे ची आर्ट फिल्म असल्यासारखी बघितली का काय असे वाटले! ;) मात्र देव नाही हे बिंबवताना देव आहे असे देखील का दाखवले हे समजले नाही. God is nowhere चे God is now here अशी शब्दफोड झाली का काय असे वाटले. त्यातील काही सटलीटी पब्लीकला समजेल असे वाटत नाही. उगाच सर्वधर्मसमभाव वगैरे वाटून राहायचे...पण तरी देखील एकंदरीत जनतेला समजेल अशा भाषेत मेसेज दिला आहे असे वाटले. तसेच सगळ्याच प्रमुख धर्मांना आणून देखील कुणाच्याही "धार्मिक भावना" न दुखावण्याची कसरत चांगली निभावली आहे. (मला माहीत आहे काही अपवाद आहेत त्याला, पण दुर्लक्ष करायचे अशांकडे!). या संदर्भात मला राहींचा प्रतिसाद आवडला. सहजरावांना डार्विन आठवला तो बरोबरच आहे. पण आजही अमेरीकेसारख्या देशात शाळेमधे विश्व निर्मिती शिकवताना ती उत्क्रांती (evolution) म्हणून झाली की ईश्वरनिर्मित (intellectual design) म्हणून सांगावे यावरून गंभीर वाद होतात... तेंव्हा आपल्याला दिल्ली खूपच दूर आहे. :-)

In reply to by क्लिंटन

कारण कोणतेही असेना की कोणीही सांगितले असेना जर कोणी आपल्या आरोग्यासाठी कळत-नकळत चांगली पावले उचलत असेल तर केवळ धर्मात सांगितले म्हणून ते केल्याबद्दल त्याचा उपहास का?
मुद्दा बरोबर आहे. एखादा देवावरील श्रद्धेपोटी चार चांगली कामे करीत असेल तर दुसरा आपल्या सदसदविवेकबुद्धीला पटते म्हणून करत असेल. या बाबत अंनिस ची भुमिका अशीच आहे कि सश्रद्ध माणसाशी आमचे भांडण नाही. देव धर्माबाबत आम्ही तटस्थ आहोत. आम्ही देव धर्मातल्या शोषणाविरुद्ध आहोत. प्रत्यक्षात अश्रद्ध माणसाकडून सश्रद्ध माणसाचा बर्‍याचदा उपहास होतो हे मात्र खरे आहे. कदाचित मानवी स्वभावाचा तो भाग असावा. आपल्या उपहासातुन तरी तो विचार करायला लागेल ही एक आशा (कदाचित भाबडी) अश्रद्ध माणसाला असते. त्याला दुखवायचे हा मूळ हेतु नसतो. असो चित्रपटा निमित्त व धाग्यानिमित्त आम्हाला पुर्वी आम्ही मिपावर घेतलेल्या कौलाची आठवण आली. 'बिअर उपवासाला चालते का?' आता त्याचा दुवा देता येत नाही. उडालेला दिसतो.

In reply to by प्रकाश घाटपांडे

विकास Wed, 10/17/2012 - 17:02
या बाबत अंनिस ची भुमिका अशीच आहे कि सश्रद्ध माणसाशी आमचे भांडण नाही. देव धर्माबाबत आम्ही तटस्थ आहोत. आम्ही देव धर्मातल्या शोषणाविरुद्ध आहोत.
असे असले तर चांगलेच आहे आणि प्रकाशराव म्हणतात म्हणजे ते तसेच असेल असे मी समजेन. मात्र म्हणूनच असे वाटते की अनिस ज्या पद्धतीने लोकांसमोर येते त्यावरून त्यांचे प्रेझेंटेशन चुकते असे म्हणेन. अर्थात हे केवळ अनिसच्या संदर्भातच म्हणेन असे नाही... बर्‍याचदा भारतीयांच्या (किमान मराठी नक्की!) संदर्भात असेच होते असे वाटते.