ओह माय गॉड - झणझणीत अंजन
लेखनप्रकार
माझी एक आत्या आहे. वय साधारण ७३ वर्षे! आयुष्याचा बहुतेक काळ एका लहान गावात व्यतित केलेला. घरचे वातावरण कर्मठ! एकदा माझ्या चुलत भावाचे लग्न आटोपून मी आणि माझी ही आत्या पुण्यास परत येत होतो. त्यादिवशी एकादशी होती. भूक लागली म्हणून आम्ही एका ढाब्याजवळ थांबलो. आत्याला म्हटले की आपल्याला पुण्याला पोहोचायला अजून ३-४ तास तरी लागतील; आताच व्यवस्थित जेवून घे. आत्याच्या उत्तराने मी आश्चर्यचकितच नाही तर पुरता हबकलो.
"आत्या, पटकन जेवून घेऊ आणि मग पुन्हा निघू"
"तू जेवून घे; मला जेवता नाही येणार. आज एकादशी आहे."
"अगं आज काही कार्तिकी किंवा आषाढी एकादशी नाही. साधी मंथली एकादशी आहे. एखाद्या वेळेस मोडली तरी हरकत नाही. इथे तुला सबुदाणा खिचडी वगैरे मिळणार नाही."
"नाही नाही, एकादशीच्या दिवशी जेवणे म्हणजे डुकराचे मांस खाण्यासारखे आहे आणि त्याचे पाप खूप जास्त लागते"
मी पुरता थक्क झालो.
"अगं, इतर दिवशी तुम्ही हेच अन्न खाता ना? मग आजच खाल्ले तर डायरेक्ट डुक्कर ठरता? जगात कितीतरी माणसे आजच्या दिवशी हेच अन्न खात असतील. म्हणून काय ते डुक्कर ठरतात? आणि अमेरिकेत कसली आलीये एकादशी? तरी ते लोकं आपल्यापेक्षा शतयोजने पुढे आहेतच की नाही?"
"नाही बाबा, इतकी वर्षे नियम पाळले आहेत; आज मोडून पापाचं धनी का म्हणून व्हायचं?"
सवाल रोकडा होता. डझनभर केळी, बटाट्याचा चिवडा, चिक्की वगैरे घेऊन तिने थोडे अधिक पुण्य कमवले आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.
काय म्हणावे याला? शतकानुशतकांच्या विचारांचा, निरर्थक संस्कारांचा पगडा म्हणावे तरी स्वत:ची अशी बुद्धी असते की नाही? स्वतःची अशी तर्कसंगत विचार करण्याची आणि योग्यायोग्य ठरवण्याची क्षमता असते की नाही? की आपली बुद्धी, आपली विचार करण्याची कुवत अजिबात वापरायची नाही असेच आपली तथाकथित कर्मकांडांवर आधारित संस्कृती शिकवते? मग तर कल्याणच म्हणायचे! साधी पोळी आणि भाजी खाल्ल्याने पाप लागतं? आणि पोट फुटेस्तोवर खिचडी, चिक्की, भगर, केळी, काजू, बदाम, दूध, राजगिर्याच्या लाह्या, बटाटा वेफर्स, बटाट्याची सुकी भाजी, रताळ्याचा पाकात घोळलेला आणि अस्सल तुपात तळलेला कीस खाल्ल्याने अमाप पुण्य लाभतं? कुठल्या गाढवाने हे लिहून ठेवलंय?
कुठल्याही देवपूजेला पोट सुटलेले ब्राह्मण जेवू घातल्याने पुण्य लाभतं असा एक नितांतमूर्ख समज आपल्याकडे प्रचलित आहे. काय सबंध आहे? तुमच्या घरात काम करणार्या बाईच्या लहानग्या, शेंबड्या, चप्पल न घालणार्या मुलाला ५० रुपयांची चप्पल घेऊन देण्याची अक्कल सुचत नाही पण ढेरपोट्या ब्राह्मणांना आणखी खाऊ घालून पुण्य कमवल्याचं समाधान मात्र बरोबर समजतं. हा काय प्रकार आहे?
मुंबईत कोणी राधे माँ म्हणून खूप प्रसिद्ध (?) बाई आहेत. लोकं त्यांना कडेवर घेऊन भजनाच्या तालावर नाचतात. असे केल्याने म्हणे पुण्य लाभते. ही बाई ओठांवर लिपस्टीक लावून नटून थटून बसते आणि तिचे मूर्ख भक्त तिच्या चरणी लाखो रुपयांचा 'चढावा' चढवतात. एखाद्या चित्रपटातली चवचाल बाई शोभावी अशी या राधे माँची राहणी आहे. तिच कथा आसाराम बापूंची आणि अजून कितीतरी कोट्यधीश, महागड्या गाड्यांमधून फिरणार्या बाबा-बुवांची! हे आसाराम बापू तर क्रोधाचे आगर आहेत. स्वतःला परमेश्वर म्हणवून घेतांना हा निर्लज्ज बाबा भक्तांवर चिडतो आणि प्रसंगी शिव्या देखील देतो. तरीही आपले मूर्ख लोकं त्याच्या नादी लागतातच. निर्मल बाबाला पाहिल्यावर तर शेंबडं पोरगं देखील सांगेल की या बाबाला साधं "श्री गणेशाय नमः" देखील धड म्हणता येणार नाही पण भक्तांना लुबाडून या निर्मल बाबाने कोट्यवधी रुपयांची माया जमवलेली आहे. याच्या समागमात उपस्थिती लावण्यासाठी दोन-दोन हजार रुपये मोजावे लागतात आणि हा बाबा फक्त हात वर करून "कृपा बनी रहेगी" असले काहीतरी बडबडतो. तिच कथा नरेंद्र महाराजांची. राजकारण्यांच्या पदरात लपणार्या या भोंदू बाबाला ३०० एकर जागा फुकट मिळालेली आहे. याच्या प्रवचनात हा नरेंद्र महाराज राजकारणाखेरीज क्वचित कुठल्यातरी विषयावर बोलतो. आणि आपल्या देशाचे दुर्दैव असे की आपली बिनडोक जनता या भोंदू आणि स्वतःला देव समजणार्या पाजी लोकांसमोर नतमस्तक होते.
आमच्या गावातल्या घरासमोर एक कुटुंब राहते. ते अनिरुद्ध बापूंचे इतके पराकोटीचे भक्त आहेत की त्यांच्या घरातल्या प्रत्येक भिंतीवर अनिरुद्ध बापूंचे फोटो, स्टिकर्स वगैरे लावलेले आहेत. सतत २४ तास हे कुटुंब त्यांचे गुणगान गात असते. सकाळी पोट व्यवस्थित साफ झाले तरी अनिरुद्ध बापूंची कृपा असे त्यांना वाटते. आता बोला!
"ओह माय गॉड" अशाच निरर्थक प्रथांवर आणि सगळ्या धर्मातल्या किळसवाण्या बुवाबाजीवर कोरडे ओढतो आणि ते ही सगळ्यांना पटेल अशा पद्धतीने.
कानजीभाई मेहता हा देवाच्या मूर्तींचा व्यापार करणारा एक नास्तिक परंतु मध्यमवर्गीय कुटुंबवत्सल गुजराती गृहस्थ असतो. देवादिकांवर, कर्मकांडांवर, बुवाबाजीवर पैसे वाया घालवण्यापेक्षा त्या पैशांचा काहीतरी चांगला उपयोग करावा अशा धरतीची त्याची विचारसरणी असते. त्याच्या शेजारच्या दुकानातला मुस्लीम मालक जेव्हा हज यात्रेला जाण्याचा विचार बोलून दाखवतो तेव्हा कानजीभाई त्याला व्यर्थ पैसे दवडण्यापेक्षा दुकानाची डागडुजी करण्याचा सल्ला देतो. या कानजीभाईचे दुकान भूकंपात जमीनदोस्त होते. विमा कंपनी 'अॅक्ट ऑफ गॉड' या कलमाखाली बोट दाखवून हात वर करते. कानजीभाई रस्त्यावर येतो. मग कानजीभाई सरळ-सरळ देवावर खटला दाखल करतो. देवाचे दलाल म्हणून सगळे धर्मगुरु, पंडित, मौलवी, फादर यांना तो प्रतिवादी करून नुकसान भरपाईची मागणी करतो. राजकारणी आणि धर्म हे समीकरण दृढ असल्याने राजकारणी देखील या युद्धात ओढले जातात. पुढे काय होते? कानजीभाई सगळ्या धर्मातल्या धर्मगुरुंना धडा शिकवतो का? त्याला नुकसान भरपाई मिळते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे चित्रपटात पाहणे श्रेयस्कर ठरेल.
सध्या जे धर्माचे, धार्मिकतेचे, कर्मकांडांचे स्तोम सर्वत्र माजलेले आहे त्यावर हा चित्रपट विचार करायला लावणारे भाष्य करतो. महादेवाच्या पिंडीवर हजारो लीटर दूध अभिषेकाच्या नावाखाली कसे ओतले जाते आणि शेवटी ते कसे गटारात वाहत जाते याचा दाखला देऊन कानजीभाई अभिषेक या संकल्पनेतला फोलपणा अगदी स्पष्टपणे समोर आणतो. गरीबाच्या तोंडी न जाता हे दूध गटारात जाते हे बघून आपल्याला देखील अभिषेक या विधीचा तिटकारा आल्यावाचून राहत नाही. दर्ग्यांवर महागड्या चादरी चढवण्यापेक्षा गरीबाला ते कपडे दिले तर देवाची खरी सेवा करण्याचे पुण्य लाभेल हे ही तो मुस्लीम मौलवींना ठणकावून सांगायला घाबरत नाही.
"धर्म का मनुष्य के जीवन में स्थान क्या हैं?" या प्रश्नावर कानजीभाई खिन्नपणे "या तो धर्म इंन्सान को बेबस बनाता हैं या फिर आतंकवादी!" असे उत्तर देतो. नीट विचार केल्यास आजकालचे चित्र असेच आहे. देवापुढे लाचार होणारे भक्त असोत किंवा मुल्ला-मौलवींच्या तद्दन चुकीच्या शिकवणीमुळे जिहाद सारख्या निरर्थक संकल्पनांना बळी पडून जग अस्थिर करणारे दहशतवादी असोत; धर्माच्या अतिरेकी विचाराने कुणाचे भले झाले आहे? त्यात राजकारणी आपल्या स्वार्थाची पोळी भाजून घेण्यासाठी धर्माचा ज्वर अधिकाधिक पसरवतात. अबू आझमी असो, 'संभाजी ब्रिगेड' असो, बांग्लादेशी मुस्लीमांच्या घुसखोरीच्या समर्थनार्थ जाळपोळ करणार्या धर्मांध आणि माथेफिरू मुस्लीम संघटना असोत, किंवा भाजप असो...धर्माच्या राजकारणाखेरीज आणि आपापसात द्वेष पसरवण्याखेरीज हे राजकारण आणि धर्मकारण अजून काय करते? आपली जनता याचा विचार कधी करेल काय? आपापसात सलोख्याने राहणे म्हणजेच ईश्वराची, अल्लाची, येशूची खरी सेवा हे आपल्या लोकांना कधी कळेल? कानजीभाई आपल्या जनतेला हे सवाल नुसतेच विचारतच नाही तर श्रीमदभगवतगीता, बायबल, कुरान-ए-शरीफ या पवित्र धर्मग्रंथांचे अध्ययन करून श्लोकांसहित आणि आयतींसहित तो खर्या धर्माचा अर्थ समजावून सांगून या सवालांची समर्पक उत्तरे देखील देतो.
इतक्या गंभीर आणि संवेदनशील विषयावर भाष्य करतांना चित्रपट कुठेही रटाळ किंवा उपदेशप्रचूर वाटत नाही. मनोरंजनासोबतच खणखणीत विचार मांडण्याचे काम 'ओह माय गॉड' यशस्वीरीत्या पार पाडतो. परेश रावलने कानजीभाई मेहताच्या भूमिकेत प्राण ओतले आहेत. अक्षय कुमारचे काम, कमी असले तरी एकदम संयत आणि पटण्यासारखे आहे. श्री श्री रविशंकर यांची छाप असलेले गुरु मिथून चक्रवर्तीने छान साकारलेले आहेत. संतापी, लबाड, आणि अहंकारी पंडित गोविंद नामदेव यांनी नेहमीच्या आक्रस्ताळेपणाने साकारले आहेत. बाकी सगळ्यांची कामे व्यवस्थित!
चित्रपटाची पटकथा बरीच चांगली आहे. मूळ मुद्द्यावरून चित्रपट जराही भरकटत नाही. प्रभू देवा आणि सोनाक्षी सिन्हाचे धमाल गाणे अनावश्यक वाटत असले तरी घटकाभर बरे वाटते. चित्रीकरण मात्र थोडे अजून चांगले असू शकले असते पण तेवढी चूक क्षम्य आहे.
शेवटी देव म्हणजे काय, देवाचे खरे अस्तित्व कोणते, पुण्य कमविणे म्हणजे काय, धर्म म्हणजे नक्की काय, माणसाचा देव बनवणे कसे चुकीचे आहे यासारख्या अवघड विषयांचा ऊहापोह कानजीभाई आणि त्याचा मित्र अगदी सोप्या पद्धतीने करतात. आणि विशेष म्हणजे ही चर्चा कुठेही कंटाळवाणी वाटत नाही.
'ओह माय गॉड' म्हणूनच प्रत्येकाने अवश्य बघावा असा चित्रपट आहे. शंभरपैकी एकाला जरी स्वतःच्या बुद्धीचा वापर करून धर्माच्या आणि देवाच्या निरर्थक संकल्पना तपासून बघता आल्या तरी या चित्रपटाचे यश म्हणावे लागेल. आणि हो, भंपक सिनेमे करत असतांना (दे दणादण, हाऊसफूल, जोकर) 'ओह माय गॉड' सारखा विचार करायला लावणारा आणि एक खरा-खुरा चांगला विचार मांडणारा संवेदनशील (ज्वलनशील) आणि धाडसी चित्रपट विचारपूर्वक बनवल्याबद्दल अक्षय कुमारचे अभिनंदन करावेच लागेल.
शक्यतो चुकवू नकाच!
वाचने
21944
वाचनखूण
प्रतिक्रिया
93
परिसंवाद
उत्तम परीक्षण..
राधे मॉ आवडल्या.