✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जगज्जेता विशी!

च
चतुरंग यांनी
Tue, 06/05/2012 - 22:22  ·  लेख
लेख
गेल्या १२ वर्षात तो पाच वेळा जागतिक अजिंक्यपदाचा मुकुट डोक्यावरती चढवून आहे (ही 'तपःश्चर्याच' म्हणायला हवी! :)) , जगातले अनेक प्रतिस्पर्धी बुद्धीबळपटू त्याच्या खेळाला वचकून असतात, गॅरी कास्पारोवसारखा त्याचा एकेकाळचा कट्टर प्रतिस्पर्धी आणि नंतरचा सहकारी देखील त्याच्याबद्दल अनुदार उद्गार काढतो तेव्हा तो एका अढळपदाला पोचलाय याची खात्रीच होते! ३१ मे २०१२ ला मॉस्कोतल्या त्रेत्याकोव आर्ट गॅलरीमध्ये 'जन गण मन' वाजलं, आनंदने विजेतेपदाचा चषक उंचावला आणि माझे डोळे भरुन आले! उजवीकडचा सोनेरी आहे तो विश्वजेतेपदाचा चषक आणि डावीकडचा संपूर्ण स्फटिकाचा बनवलेला खास चषक त्रेत्याकोव आर्ट गॅलरीतर्फे. फिडेच्या परंपरेनुसर विजेत्याने गळ्यात ऑलिवच्या पानांचे मोठ्ठे चक्र धारण करुन या सोहोळ्याची सांगता झाली! आनंदच्या उजव्या हाताला फिडेचे अध्यक्ष किर्सान इल्युमझानोव. फिडेने जेव्हा या स्पर्धेसाठी निविदा मागवल्या त्यावेळी कोणी प्रायोजक मिळेनात मग भारताने पुढाकार घेतला, तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिथा यांनी २० कोटी रुपयांची हमी दिली (कधीतरी चांगलं कामही करतात हे लोक! ;) )चेन्नैत स्पर्धा भरणार हे जवळपास निश्चित झालं, फिडेचे अध्यक्ष इल्युमझानोव चेन्नैत येऊनही गेले पण तसं व्हायचं नव्हतं. पोलादी पडद्यामागे हालचाली झाल्या आणि माशी शिंकली ती प्रायोजक आंद्रे फिलातोव यांच्यारुपाने. आंद्रे फिलातोव हा बुद्धीबळवेडा रशियन उद्योगपती बोरिस गेल्फंडचा अगदी जवळचा मित्र आहे. त्याने हरेकप्रकारे प्रयत्न करुन शेवटच्या क्षणी चेन्नैच्या तोंडून घास काढून घेतला आणि स्पर्धा मॉस्कोत होणार हे नक्की झाले. भारतात स्पर्धा झाली असती तर मिळणारे होम पिचचे अ‍ॅडवांटेज आनंदने आता गमावले होते! परंतु आनंद खरोखरंच संयमी आहे. स्पर्धेचे ठिकाण बदलल्यावर तो म्हणाला की "काही हरकत नाही, एकदा स्पर्धा सुरु झाली की तुमच्यासमोर फक्त प्रतिस्पर्धी असतो मग तुम्ही इथे आहात की तिथे याने काहीही फरक पडत नाही!" मला वाटते जेत्यांच्या वाटेतच संकटे जास्त असतात किंबहुना अशा संकटांवर मात करुन जे पुढे सरकतात तेच जेते होतात. हे मी नुसते कविकल्पना म्हणून म्हणत नाहीये. आठवा याआधीची २०१० मधली स्पर्धा. त्यावेळी आईसलँडमधल्या ज्वालामुखीने यूरोपच्या डोक्यावर उधळलेल्या राखेच्या ढगाने बल्गेरियापर्यंत हवाईमार्गाने पोचणे आनंदला अशक्य झाले. पठ्ठ्याने आपल्या टीमसकट सलग ४० तास गाडीने प्रवास करुन, मधे ७-८ देश ओलांडून सोफिया गाठले! या अपघाताने स्पर्धेच्या ठिकाणी पोचायला उशीर झाला. प्रत्यक्ष स्पर्धेआधी तीन दिवसांची विश्रांती मिळावी अशी मागणी आनंदने केली ती धुडकावून लावली गेली आणि फक्त एकच दिवस मधे मिळाला. कोई बात नहीं! एवढे सगळे होऊनही, स्पर्धेआधी वल्गना करणार्‍या आणि विचित्र सोफिया रुल्स लादणार्‍या वेसेलीन टोपालोवला आनंदने व्यवस्थित धूळ चारली! आत्ता झालेल्या स्पर्धेत बोरिस गेल्फंडने टोपालोवसारखा माज केला नसला तरी काही गोष्टी पथ्यावर पडतात. तो इस्राएलचा नागरिक असला तरी जन्माने रशियन आहे, त्याला रशियन भाषा अवगत आहे. शिवाय प्रायोजक आंद्रे फिलातोव त्याचे दोस्त आहेत. नाही म्हंटले तरी या बाबींचा प्रभाव पडतोच. आधीच असलेल्या स्पर्धेच्या दडपणात या गोष्टींनी वाढ होते. शिवाय स्पर्धेच्या दरम्यान सलग ६ डाव बरोबरी झाल्यावर कास्पारोव महाशयांनी स्पर्धेच्या ठिकाणी जाऊन " यावर्षी आनंदचा फॉर्म चांगला नाहीये, त्याची तयारी फारशी दिसत नाहीये, त्याने आता निवृत्त व्हायला हरकत नाही!" वगैरे मुक्ताफळे उधळली होती. आनंदने असल्या टिकेला त्याच्या खेळानेच प्रत्युत्तर देणे पसंत केले. सातव्या डावात धक्कादायक पराभवाला सामोरे जाताच बोरिस समर्थकांमध्ये आनंदाची लाट उसळली. त्यांनी जल्लोष सुरुच केला होता
Play Online ChessPlay Online Chess
PGN Editor Chess Tool
(वरच्या चौकटीत IMPORT PGN FILE असं लिहिलेल्या ठिकाणी टिचकी मारुन तिथे खाली दिलेल्या खेळ्या चिकटवा, तुम्हाला संपूर्ण डाव खेळून बघता येईल. [Event "Anand-Gelfand World Chess Championship"] [Site "Moscow RUS"] [Date "2012.05.20"] [EventDate "2012.05.10"] [Round "7"] [Result "1-0"] [White "Boris Gelfand"] [Black "Viswanathan Anand"] [ECO "D45"] [WhiteElo "?"] [BlackElo "?"] [PlyCount "75"] 1.d4 d5 2.c4 c6 3.Nc3 Nf6 4.e3 e6 5.Nf3 a6 6.c5 Nbd7 7.Qc2 b6 8.cxb6 Nxb6 9.Bd2 c5 10.Rc1 cxd4 11.exd4 Bd6 12.Bg5 O-O 13.Bd3 h6 14.Bh4 Bb7 15.O-O Qb8 16.Bg3 Rc8 17.Qe2 Bxg3 18.hxg3 Qd6 19.Rc2 Nbd7 20.Rfc1 Rab8 21.Na4 Ne4 22.Rxc8+ Bxc8 23.Qc2 g5 24.Qc7 Qxc7 25.Rxc7 f6 26.Bxe4 dxe4 27.Nd2 f5 28.Nc4 Nf6 29.Nc5 Nd5 30.Ra7 Nb4 31.Ne5 Nc2 32.Nc6 Rxb2 33.Rc7 Rb1+ 34.Kh2 e3 35.Rxc8+ Kh7 36.Rc7+ Kh8 37.Ne5 e2 38.Nxe6 1-0 तेवढ्यात पुढल्या आठव्या डावात आनंद इरेला पेटून खेळला, सहाजिकच होते, अन्यथा त्याचा सामना डावागणिक अधिकाधिक कठिण होत गेला असता. फक्त सतरा खेळ्यात बोरिसला नमवून त्याने विश्वविजेतेपदाच्या इतिहासातल्या सगळ्यात कमी खेळ्यांच्या विजयाची नोंद केली! (वरच्याच चौकटीत IMPORT PGN FILE असं लिहिलेल्या ठिकाणी टिचकी मारुन तिथे खाली दिलेल्या खेळ्या चिकटवा, तुम्हाला संपूर्ण डाव खेळून बघता येईल. [Event "Anand-Gelfand World Chess Championship"] [Site "Moscow, Russia"] [Date "2012.05.21"] [EventDate "2012.05.10"] [Round "8"] [Result "1-0"] [White "Viswanathan Anand"] [Black "Boris Gelfand"] [ECO "D70"] [WhiteElo "?"] [BlackElo "?"] [PlyCount "33"] 1.d4 Nf6 2.c4 g6 3.f3 c5 4.d5 d6 5.e4 Bg7 6.Ne2 O-O 7.Nec3 Nh5 8.Bg5 Bf6 9.Bxf6 exf6 10.Qd2 f5 11.exf5 Bxf5 12.g4 Re8+ 13.Kd1 Bxb1 14.Rxb1 Qf6 15.gxh5 Qxf3+ 16.Kc2 Qxh1 17.Qf2 1-0 बोरिसचा प्रयत्न होता की स्पर्धा पहिल्या १२ डावांमध्येच संपवायची कारण आनंद जलदगती स्पर्धेत वरचढ ठरणार याची शक्यता जास्त होती. परंतु १२ डावांच्या मुख्य सामन्यातले पुढले चारही डाव अनिर्णित अवस्थेत संपले आणि स्पर्धा टायब्रेकरमध्ये गेलीच! तिथेही बोरिसने कडवा खेळ केला परंतु क्रमांक दोनच्या डावात त्याला पराभव पत्करावा लागला आणि आनंदने एका गुणाची आघाडी घेतली. आता उरलेल्या दोन डावात एक डाव जरी बोरीसने जिंकला आणि दुसरा अनिर्णित राखला तरी पुढला टायब्रेकर अनिवार्य होता. परंतु आनंदने दोन्ही डाव अनिर्णित राखत बाजी मारली! या सामन्यातले सगळे डाव मी थेट प्रक्षेपणात बघितले. आनंदच्या खेळाचे विश्लेषण करायचे झाले तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की तो एका दडपणाखाली खेळल्यासारखा वाटत होता. आठवा डाव सोडला तर इतर सर्व डावात आनंद बराच बचावात्मक खेळला. किंबहुना अति बचावात्मक खेळामुळेच त्याच्या हातून सातवा डाव गेला होता. आनंदची शैली ही आक्रमक आहे. डावाची सुरुवात, मध्य आणि शेवट तीन्ही बाबी तो उत्तम हाताळू शकतो. अतिशय कमी वेळात उत्तम चाली हुडकण्यात त्याचा हातखंडा आहे. टॅक्टिकल गेम प्लॅन्स बनवण्यात आणि ते अचूकतेने अमलात आणण्यात त्याच्या खेळाची तुलना तालशी होऊ शकेल! वेळप्रसंगी मोहर्‍यांचे बलिदान करुन डाव जिंकण्याचे धाडस करायलाही तो कचरत नाही. असे असल्याने बहुतांश बुद्धीबळ तज्ज्ञांच्यामते बोरिसविरुद्धची लढत जिंकणे आनंदला सोपे जायला हवे होते. प्रत्यक्ष लढत सुरु झाली तेव्हा चित्र वेगळेच दिसू लागल्यावर सगळेच अचंबित झाले. परंतु स्पर्धेनंतर आनंदने स्वतःच याचे उत्तर दिले आहे. तो म्हणतो "बोरिसला हरवणे सोपे जाईल असे लोकांना वाटत होते कारण त्याला अंडरएस्टिमेट केले गेले! त्यामुळे सलग सहा डाव बरोबरीत सुटल्यानंतर सगळ्यांना असे वाटायला लागले की मी नेहेमीसारखा खेळत नाहीये. पण मी हे ओळखून होतो की तो पूर्ण जिद्दीने स्पर्धेत उतरतो आहे आणि हा सामना अतिशय निकराचाच होणार. त्यामुळे मी नीट खेळूनही त्याच्या प्रचंड तयारीपुढे माझी डाळ शिजेना!" २०११ च्या कँडिडेट स्पर्धेत बोरिस ज्याप्रकारे खेळला त्यावरुन कोणीही अंदाज लावू शकेल की तो किती जिगरबाजपणे जगज्जेतेपदाकडे बघतो आहे. शिवाय त्याच्या टीमने इतकी जबरदस्त तयारी केलेली होती की आनंदच्या प्रत्येक डावपेचाला त्याच्याकडे प्रत्युत्तर होते. त्यामुळे कोणते डावपेच लढवावेत याचा अंदाज लावणे 'टीम आनंदला' मुश्किल झाले होते. संधीची वाट बघत चिवट खेळ करत राहणे याखेरीज ते काही करु शकत नव्हते. अर्थात याचा परिणाम आनंदचा खेळ अधिकाधिक बचावात्मक होण्यात झाला असावा. सातव्या डावातला पराभव आनंदला इतका लागला की तो रात्रभर झोपू शकला नाही. संपूर्ण रात्र तो डावपेचांची आखणी करत होता आणि दुसर्‍या दिवशी तसाच सामन्याला गेला! त्याने नेहेमीचा आक्रमक खेळ केला आणि संधी मिळताच बोरिसचा वजीर अडकवून काम फत्ते केले. माझ्या मते खेळाच्या शैलीत बदल होत जाणे नैसर्गिक आहे. वयानुसार प्रगल्भता येत जाते. आपल्या पूर्वीच्या सामन्यातल्या चुका कोणत्या कारणाने झाल्या याचा शोध घेताना शैलीत थोडेफर बदल करुन काही फायदे होतात का याचीही चाचपणी केली जाते. अत्त्युच्च दर्जाच्या सामन्यात खेळाडूंच्या क्षमतेतला, आणि खेळाच्या पातळीतला फरक इतक कणभर असतो की सहजासहजी निकाल लागणे अवघड असते. मानसिक आणि शारीरिक ताणांचा सामना जो कोणी अधिक चांगल्याप्रकारे करु शकेल तो सरस ठरतो. ही स्पर्धा सुरु होण्याआधी गेले वर्षभर आनंद इतर स्पर्धांमधे ज्याप्रकारे खेळत होता ते बघता त्याचा फॉर्म ढेपाळलेला होता की जाणूनबुजून तो जास्त शक्ती त्या सामन्यात खर्च करत नव्हता हे सांगणे अवघड आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धात खेळत राहून त्या दबावाचा आणि खेळण्याचा सराव ठेवायचा परंतु विजेतेपदासाठी फार प्रयत्न न करता स्पर्धेत सहभागी व्हायचे. हा लांबवरच्या डावपेचांचा भाग असू शकतो. शिवाय त्या सामन्यांच्या निकालामधून प्रतिस्पर्ध्याची (बोरिसची) मानसिकता नकळत तयार होत जाण्याची शक्यता असतेच. शिवाय माझ्यामते आणखीही एक कारण असावे. गेल्या वर्षी २०११ मधे आनंद-अरुणाला पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव अखिल. मूल झाल्यानंतर आणि ते लहान असताना एकप्रकारचा हळवेपणा स्वभावात निसर्गतः येतो असे मला वाटते. तुमच्या खेळाच्या आक्रमक शैलीवर त्या हळवेपणाचा (हार्मोन्सचा) प्रभाव पडणार नाही असे मला वाटत नाही. कदाचित त्यामुळेही आनंद थोडा बचावात्मक खेळू लागला असावा. कारण शेवटच्या टायब्रेकर नंतर जी पत्रकार परिषद झाली त्यात आनंद म्हणाला "दुसरा सामना जिंकल्यानंतर उरलेले दोन्ही सामने जिंकण्यासाठीच खेळायचे हे मी मनाने घेतले होते. कारण तुम्ही बरोबरीसाठी खेळलात की हरण्याची शक्यता हमखास. असे असूनही प्रत्यक्ष डावात मी पुन्हा बचावात्मक खेळलो. मला समजत होते की असे करुन चालणार नाही परंतु मी तसा खेळलो खरा. मी डाव वाचवू शकलो यातच समाधानी आहे." सचिनने आता निवृत्त व्हावे म्हणून सल्ले देणारे जसे अनेक असतात तसेच आनंदनेही करावे असे वाटणारे बरेच जण आहेत. लोकशाहीत कोणालाही मत व्यक्त करता येते याचा गैरफायदा किती घ्यावा म्हणतो मी! परवा चेन्नैत झालेल्या पत्रकारपरिषदेत आनंदने खणखणीतरीत्या जाहीर केले आहे की २०१४ च्या विजेतेपदासाठी तो स्पर्धेत आहे! याचवेळी कास्पारोवचा समाचार घेताना तो म्हणाला "मी आणि बोरिस दोघेही चाळीशी पार केलेले खेळाडू स्पर्धेत बघून बहुदा कास्पारोवला तो लवकर निवृत्त झाल्याचा पश्चात्ताप होत असावा आणि निवृत्तीनंतर त्याच्याकडे प्रसिद्धीमाध्यमांचे तितकेसे लक्ष नाहीये ही बाब त्याला खटकत असावी!" ;) विश्वविजेतेपदाचे साडेसात कोटी रुपयांचे बक्षीस मिळवल्यानंतर तामिळनाडू सरकारने त्याच्यासाठी दोन कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. धोनी निवृत्तीनंतर सैन्यात जाणार का नाही याची चवीने चर्चा करणार्‍या माध्यमांनी अजूनही या विजयाची म्हणावी तशी दखल घेतली नाही याचे वैषम्य वाटते. राष्ट्रीय पातळीवरही सरकार कडून बुद्धीबळासाठी अधिक प्रयत्न व्हायला हवेत असे वाटते. एक पीटी उषा मग सगळा दुष्काळ, एक प्रकाश पदुकोण मग सगळा रखरखाट ही आपली परंपरा एक आनंद त्यानंतर सगळाच 'आनंद' अशा प्रकारे चालू राहू नये असे मनापासून वाटते. सध्याच्या तरुण खेळाडूत हरेकृष्ण पेंद्याला, कोनेरु हंपी, तानिया सचदेव, सहज ग्रोवर, परिमार्जन नेगी असे अनेक खेळाडू आहेत परंतु जगज्जेतेपदाकडे झेप घेण्यासाठी लागणारे सरावाचे, आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्याच्या संधीचे वावडे असल्याने हे खेळाडू ग्रँडमास्टरपदाच्या पलीकडे जाणे मुष्किल होऊन बसते हे खरे दु:ख आहे! फिडेच्या पहिल्या शंभर खेळाडूंच्या यादीत फक्त आनंद, कृष्णन शशिकिरण आणि हरेकृष्ण पेंद्याला आहेत. चीनची याही क्षेत्रात जबर मुसंडी आहे. त्यांचे सहा खेळाडू या यादीत आहेत. आणि रशियाचे अर्थात पंचवीस आहेत! महिलांच्या यादीत आपल्या ५, चीनच्या १२ आणि रशियाच्या १७ असा हा नंबरांचा सामना आहे. जागतिक स्तरावर रशिया आणि इतर देश यातला फरक झपाट्याने कमी होत चालला आहे. तसा तो होत जाणारही. परंतु भारताची मान याही स्पर्धेत उंच राहिली तर तीच आनंदसाठी आणि आपल्यासाठी समाधानाची बाब असणार आहे! -चतुरंग (सर्व छायाचित्रे जालावरून साभार.)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
राहणी
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
अभिनंदन
आस्वाद
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
10996 वाचन

💬 प्रतिसाद (50)

प्रतिक्रिया

चतुरंगचा नेहमीप्रमाणे

बॅटमॅन
Tue, 06/05/2012 - 23:12 नवीन
चतुरंगचा नेहमीप्रमाणे बुद्धिबळावर एक चतुरस्त्र लेख. सर्वांगीण माहितीने आणि विशीबद्दलच्या आत्मीयतेने भरलेल्या लेखाचे धावते वाचन करून अस्मादिकपण भरून पावले. ( त्या बुद्धिबळाच्या खेळ्या लावून बघण्याइतपत ना पेशन्स आहे ना डोके)
  • Log in or register to post comments

हेच बोलतो. जबरी लेख.

प्रचेतस
Wed, 06/06/2012 - 08:48 नवीन
हेच बोलतो. जबरी लेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+१

छोटा डॉन
Wed, 06/06/2012 - 22:17 नवीन
बॅटमॅनशी सहमत. अत्यंत समयोचित आणि सुरेख लेख. रंगाशेठ ह्यांच्या बुद्धिबळप्रेमाला सलाम ! परवा झालेली विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा आणि त्यातल्या विजेत्यावरचा आजचा लेख हे वाचून भरुन पावलो हीच भावना आहे. रंगाशेठ ह्यांना ह्यावर इथेच न थांबता ह्याच क्षेत्रातले काही गंमतशीर, रंजक, रोचक किस्से ह्यावर आधारित असणारे लेख लिहावेत अशी त्यांना सादर विनंती - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

रंगा! रंगा!! रंगा!!! _/\_

बिपिन कार्यकर्ते
Tue, 06/05/2012 - 23:15 नवीन
रंगा! रंगा!! रंगा!!! _/\_
  • Log in or register to post comments

चतुरंग, धन्यवाद!

संजय क्षीरसागर
Tue, 06/05/2012 - 23:29 नवीन
आणि या लेखाबद्दल विषेश आभार!
  • Log in or register to post comments

ये खेलोका बादशहा है हुजुर...

अर्धवटराव
Tue, 06/05/2012 - 23:58 नवीन
और बादशाहोका खेल है. या बादशाहीला साजेसा लेख. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

ये खेलोका बादशहा है हुजुर...

अर्धवटराव
Tue, 06/05/2012 - 23:58 नवीन
और बादशाहोका खेल है. या बादशाहीला साजेसा लेख. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेख

श्रीरंग_जोशी
Wed, 06/06/2012 - 00:21 नवीन
विश्वनाथन आनंदच्या कामगिरीला पुरेपूर न्याय देणारा लेख!!
  • Log in or register to post comments

मस्त लेख!

बहुगुणी
Wed, 06/06/2012 - 01:42 नवीन
चतुरंगः तुमच्यासारख्या बुद्धीबळात 'मुरलेल्या' विश्लेषकाचं समालोचन आणि 'आनंद'च्या कारकीर्दीचा धावता 'लेखाजोखा' आवडला. मनःपूर्वक धन्यवाद! 'आनंद'च्या 'टीम'मध्ये कोण लोक आहेत? ही टीम नेमकी केंव्हा मदत करू शकते; फक्त सामन्याआधी पूर्वतयारी करतांनाच, की सामना चालू असतांना 'ब्रेक' मध्ये? आनंदच्या विजयात थोडासा तरी वाटा असलेली ही मंडळी त्याचं मनोधैर्य उंचावलेलं रहावं म्हणून (विशेषतः परदेशात आणि प्रतिस्पर्ध्यांच्या घरच्या गल्लीत!) नक्कीच महत्वाचं कार्य करीत असतील. या टीम मेंबर्सचा स्वतःचा राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये किती सहभाग आहे/होता, हेही वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

सेकंड्स!

चतुरंग
गुरुवार, 06/07/2012 - 18:43 नवीन
ही टीम खेळाडूसाठी बरंच काही करते. आनंदची टीम पहा - डॅनिश ग्रँडमास्टर पीटर नील्सन, उझबेक ग्रँडमास्टर रुस्तम कासिमझानोव, भारतीय ग्रँडमास्टर सूर्यशेखर गांगुली आणि पोलिश ग्रँडमास्टर रादोस्लाव वोज्ताझेक हे खेळाडू म्हणून काम करतातच शिवाय अरुणा आनंदची मॅनेजर म्हणून असलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ही सगळी टीम २००८ पासून आनंदबरोबर काम करते आहे. या टीमने २००८ ला व्लादिमीर क्रामनिक विरुद्ध, २०१० ला वेसेलीन टोपालोव विरुद्ध आणि २०१२ ला बोरिस गेल्फंड विरुद्ध आनंदला मदत केली. २०१२ चे सामने सुरु होण्याआधी सहा महिने टीम एकत्र आली. गेमप्लॅम बनवला. कसून सरावाला सुरुवात चार महिने आधी झाली. तयारीत कायकाय अंतर्भूत असते ते बघा. यात बोरिसने खेळलेले सगळे आधीचे डाव तपासले जातात. त्यात त्याने वापरलेली ओपनिंग्ज, कॉपीबुकपेक्षा वेगळ्या केलेल्या चाली, त्याने जिंकलेले आणि हरलेले डाव तसे का झाले याचा अभ्यास, इतकेच नव्हे तर मोठ्या स्पर्धातून तो ज्या ग्रँडमास्टर्स विरुद्ध खेळलाय त्यांचे डाव त्यांची शैली हे सगळे तपासले जाते. एवढा सगळा अभ्यास झाल्यावर त्याची शक्तिस्थाने आणि कच्चे दुवे यांचा ताळमेळ घातला जातो. त्यानुसार आनंद पांढर्‍या मोहोर्‍यांनी खेळताना काय काय ओपनिंग वापरणार आणि काळ्यांनी खेळताना काय काय प्रत्युत्तर देणार हे ठरवले जाते. प्रतिस्पर्ध्याला धक्का देण्यासाठी कॉपीबुकपेक्षा अनोख्या चाली सुचवताना त्या डावात कंटीन्युएशन कसे होणार आहे याची वेगवगळी काँबीनेशन्स तपासली जातात. आणि हे सगळे आनंदला लक्षात असते! :) प्रत्यक्ष डाव सुरु असताना खेळाडूंना कोणीही मदत करु शकत नाही. डाव सुरु असताना ही सगळी टीम एकीकडे संगणकावर डावाची चीरफाड करत बसलेली असते. डाव संपून खेळाडू हॉटेलवर येताक्षणी त्यांचा ताबा घेतला जातो आणि तडकाफडकी डावाचे विश्लेषण होते. डाव हरला असल्यास कसा हरला? जिंकला असल्यास कसाकाय जिंकला? बरोबरी झाली असल्यास जिंकण्याची संधी होती का? हे सगळे तपासले जाते. हा फक्त घरचा अभ्यास झाला. प्रत्यक्ष सामन्यात पटावर उद्भवणार्‍या स्थितीला तोंड देताना खेळाडूला त्याची स्मरणशक्ती, प्रतिभा, इंट्यूशन, टेंपरामेंट यांच्या बळावरच चाली खेळाव्या लागतात. याखेरीज शारीरिक स्वास्थ टिकवण्याच्या दृष्टीने नियमित व्यायाम करणे, योग्य आहार आणि विश्रांतीचा समावेश दिनचर्येत महत्त्वाचा असतो. सामना सुरु असताना होणार्‍या टीकेचा किंवा स्तुतीचा परिणाम होऊ नये म्हणून माध्यमांपासून शक्य तेवढी फारकत घेतलेली असते. खेळादरम्यान येणार्‍या मानसिक ताणाचा निचरा करण्याकरता टीमचा संवाद अत्युत्तम असणे गरजेचे असते. सूर्यशेखर गांगुली आनंदबद्दल काय म्हणतो बघा "आनंद इतका साधा आहे की त्याच्याबरोबर काम करताना एका जगज्जेत्याबरोबर आपण काम करतोय याचा ताण येत नाही. तुमच्या सगळ्या सूचनांचे तो मोकळेपणाने स्वागत करतो. तो आमचा मित्रच बनला आहे." सगळी टीम ही अतिशय उच्च दर्जाचे बुद्धीबळ खेळणारी असते. पै़की रुस्तम कासिमझानोव तर २००४ चा वर्ल्ड चँपिअन आहे. गांगुलीने वयाच्या ११ व्या वर्षी ग्रँडमास्टरला हरवण्याचा जागतिक विक्रम केलेला आहे. ------------------------- बोरिसच्या टीममध्ये इस्राएली ग्रँमा. अलेक्ष्झांडर हझमन, युक्रेनिअन ग्रँमा पावेल एल्जानोव आणि अजून एक इस्रएली ग्रँमा मॅक्सिम रॉडस्टीन यांचा समावेश आहे. या टीमने केलेली तयारी जबरदस्त होती आणि त्यामुळेच टीम आनंदला हा सामना कठिण गेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

लेख छानच आहे. मनात एक बारीक

शिल्पा ब
Wed, 06/06/2012 - 04:13 नवीन
लेख छानच आहे. मनात एक बारीक विचार आला : तुम्ही म्हणताय की हंपी वगैरे ग्रँडमास्टर खेळाडुंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळायला मिळत नाही. ते का? आनंद या नव्या खेळाडुंना काही मदत नाही करु शकत का? जयललिता २० कोटी द्यायला तयार झाली होती तर ते पैसे या खेळाडुंच्या प्रशिक्षणासाठी वापरावे म्हणुन आनंद दबाव आणु शकतो का? एक आपलं सहज मनात आलं म्हणुन विचारतेय इतकंच!
  • Log in or register to post comments

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत

चतुरंग
गुरुवार, 06/07/2012 - 19:38 नवीन
खेळण्यासाठी लागणारी तयारी जबर असते. शरीरिक, मानसिक अणि मुख्यतः आर्थिक तयारीचा यात फार मोठा सहभाग असतो. स्पर्धेआधी बराच काळ योग्य प्रशिक्षण घेणे, त्यासाठी घरच्या व्यक्तींचा पाठिंबा आणि सहभाग असणे अत्यंत गरजेचे असते. आपल्या देशात खेळासाठी खर्‍या अर्थाने पोषक वातावरण नाहीये. खेळ हीच करिअर म्हणून बघणे हे तसे जोखमीचे काम असते त्यामुळे अभ्यास आणि खेळ यातले संतुलन राखताना तारांबळ उडते. शिवाय प्रायोजक मिळवणेही अवघडच असते. आनंद बुद्धीबळप्रेमी संघटनांना, उद्योगांना, सरकारला मदतीसाठी आवाहन करु शकतो परंतु दबाव टाकून होणार्‍या या गोष्टी नव्हेत, त्यात स्वयंस्फूर्तीचा वाटा जास्त असतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

क्या बात है, _/\_ _/\_ तुमचं

मराठमोळा
Wed, 06/06/2012 - 04:21 नवीन
क्या बात है, _/\_ _/\_ तुमचं बुद्धीबळावरचं प्रेम, ज्ञान आणि हा लेख.. मस्तच. :)
  • Log in or register to post comments

वाट पाहातंच होतो याची, उत्तम

५० फक्त
Wed, 06/06/2012 - 08:37 नवीन
वाट पाहातंच होतो याची, उत्तम लेख. थोडं थोडक्यात आटपल्यासारखं वाटलं, या स्पर्धेतल्या काही विशिष्ट डावांबद्दल किंवा खेळ्यांबद्दल लिहाल का ? आणि वर बहुगुणी म्हणतात तसंच, बुद्धीबळातली टिम म्हणजे नक्की काय असतं, ते कसं काम करतात, यावर सुद्धा एखादा लेख वाचायला खुप आवडेल.
  • Log in or register to post comments

रंगाकाका! __/\__

प्रीत-मोहर
Wed, 06/06/2012 - 09:24 नवीन
रंगाकाका! __/\__
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

प्रभाकर पेठकर
Wed, 06/06/2012 - 09:25 नवीन
भरकटणार्‍या मिपाचा कंटाळा यायला लागला की 'असा' एखादा लेख येतो आणि पुन्हा विचार बदलतो. अशा एखाद्या लेखासाठी कित्येक रटाळ लेख वाचायची तयारी आहे. अभिनंदन - दोघांचेही...... श्री. विश्वनाथन आनंद आणि श्री. चतुरंग.
  • Log in or register to post comments

६४

सुमीत भातखंडे
Wed, 06/06/2012 - 09:51 नवीन
६४ घरांच्या बादशहाला सलाम.... आणि तुम्हालाही .... ह्या खेळाविषयी उत्तमोत्तम लेख लिहिल्याबद्दल. एक रिक्वेश्ट.....कॅस्परॉव जगातला आतापर्यंतचा सर्वाधिक यशस्वी खेळाडू मानला जातो (considered by many to be the greatest chess player of all time - विकीपिडिया)....तर आनंद आणि इतर खेळांडूंच्या तुलनेत, कॅस्परॉव कसा खेळाडू होता, त्याच्याबद्दल पण लिहाल का एकदा? (चेसचा गंध नसलेला, पण चतुरंग सरांचे लेख आवडीने वाचणारा) सुमीत भातखंडे
  • Log in or register to post comments

सुमित भातखंडेंशी बाडिस

jaypal
Wed, 06/06/2012 - 10:52 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमीत भातखंडे

एक चित्र हजार शब्दांचे काम करते

संदीप चित्रे
Wed, 06/06/2012 - 21:11 नवीन
हे वाक्य हा बुद्धिबळाचा पट पाहिला की लगेच पटते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

हेच्च बोल्तो, आनंद व्हर्सेस

बॅटमॅन
Wed, 06/06/2012 - 13:05 नवीन
हेच्च बोल्तो, आनंद व्हर्सेस कास्पारोव असा लेख येऊंद्या लौकर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमीत भातखंडे

परिपूर्ण लेख

विसुनाना
Wed, 06/06/2012 - 11:30 नवीन
सांगोपांग माहिती आणि डोळस आत्मियता दोहोंनी ओतप्रोत भरलेला परिपूर्ण लेख.
  • Log in or register to post comments

उत्तम लेख. चतुरंगाकडुन नाही

मृत्युन्जय
Wed, 06/06/2012 - 11:59 नवीन
उत्तम लेख. चतुरंगाकडुन नाही येणार तर अजुन कोणाकडुन. बाकी तुम्ही दिलेल्या यादीतील तानिया सचदेव आम्हाला खुप आवडते. :)
  • Log in or register to post comments

मस्त

रमताराम
Wed, 06/06/2012 - 12:05 नवीन
पण थोडक्यात आवरलं राव. जरा मस्त अघळपघळ ल्ह्यायचं की. मिटक्या मारत पुन्हा जगलो असतो ते क्षण. २०१० च्या स्पर्धेत 'टिव्ही राईट्स नि धंदेवाईक इन्ट्रेस्ट' चे कारण पुढे करून स्पर्धा पुढे ढकलण्यास दिलेला नकार हा हलकटपणाचा कळस होता. जिथे कित्येक दिवस फ्लाईट्स नाहीतच तिथे आनंदने काय करणे अपेक्षित होते. हा उघडपणे नैसर्गिक संकटाचा गैरफायदा घेण्याचा अश्लाघ्य प्रयत्न होता. आनंद पोहोचू शकलाच नसता तर सामना झालाच नसता मग तसेही टेलेकास्ट काय घंटा करणार होते? आर्थिक नुकसान व्हायचे ते होणारच होते की. आणि आनंदच्या एखादा गोरा खेळाडू असता तर निर्णय हाच राहिला असता का... एनिबडिज गेस (येस आय अ‍ॅम रेसिस्ट... फॉर दोज हू जम्प टू ब्लेम मी ऑन दिस) तरीदेखील आनंदने टोपालोवला झोपवलाच. माझ्या मते खेळाच्या शैलीत बदल होत जाणे नैसर्गिक आहे. वयानुसार प्रगल्भता येत जाते. आपल्या पूर्वीच्या सामन्यातल्या चुका कोणत्या कारणाने झाल्या याचा शोध घेताना शैलीत थोडेफर बदल करुन काही फायदे होतात का याचीही चाचपणी केली जाते. एकदम सहमत गेल्या वर्षी २०११ मधे आनंद-अरुणाला पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव अखिल. मूल झाल्यानंतर आणि ते लहान असताना एकप्रकारचा हळवेपणा स्वभावात निसर्गतः येतो असे मला वाटते. तुमच्या खेळाच्या आक्रमक शैलीवर त्या हळवेपणाचा (हार्मोन्सचा) प्रभाव पडणार नाही असे मला वाटत नाही. कसं बोललात. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, प्राधान्यक्रम बदलतात, खेळ कितीही आवडता, सर्वोच्च प्राधान्य असलेला वगैरे असला तरी तुमच्या वेळेमधे, भावनिक विश्वात आता वाटेकरी येतो, त्यामुळे खेळाकडे थोडे दुर्लक्ष होणे स्वाभाविकच आहे. शिवाय आनंदच्या आयुष्यातील प्राधान्यक्रम त्याने ठरवावेत. व्यावसायिकतेच्या नावाखाली कौटुंबिक बंध दुय्यम तो मानणार नसेल तर ती त्याची निवड आहे त्यावर टीका करण्याचा अधिकार कोणालाही नाही. लोकशाहीत कोणालाही मत व्यक्त करता येते याचा गैरफायदा किती घ्यावा म्हणतो मी! अगदी अगदी. असे लोक पाहिले की मला कणेकरांच्या फटकेबाजी'मधल्या 'पुलाखालच्या तज्ञाची' हटकून आठवण होते. पण त्याचबरोबर त्यांचे हे वाक्यही पटते की 'राजकारण नि क्रिकेट या दोन विषयातलं या हर्षद मेहताच्या देशात सग्गळ्यांना सग्गळं कळतं'. अर्थात हे विधान खूप जुनं आहे. आता ही यादी दोन विषयांपुरती मर्यादित न राहता 'या गुगलच्या जमान्यात' बरीच विस्तारली आहे. आपला नेहमीचा जेंटलमन अवतार सोडून कास्पारोवला आनंदने फटकावलेला पाहून खूप आनंद झाला. हल्ली क्रिकेट पासून बुद्धिबळापर्यंत सगळे खेळ मिडीयातच जास्त पैसा मिळवतात. कॉमेंटेटर म्हणून निखिल चोप्रा नि तज्ञ म्हणून चेतन शर्मा पाहिला की आपणही एखाद्या च्यानेलवर ट्राय मारायला हरकत नाही असे वाटून जाते. सचिननेही आता मैदानाबाहेरच्या या 'टिळेधारी' तज्ञांना फटकावण्याची वेळ आली आहे. पी. हरिकृष्ण, शशिकिरण, हंपीच काय गेलाबाजार महाराष्ट्राचा अभिजीत कुंटे यांनी एक काळ चांगलाच गाजवला. आज अभिजीत कुंटेचे तर नावही ऐकू येत नाही. हरिकृष्ण तेवढा आनंदच्या टीमचा भाग असल्याने बहुधा बर्‍यापैकी नाव राखून आहे. अर्थात हे सारे गेल्या दशकातले खेळाडू. त्यानंतर एकही नवे नाव समोर आलेले नाही हे दुर्दैव म्हणायचे. (अचानक आलेली तथाकथित समृद्धी नि त्यामुळे यशापयशाचे बदललेले निकष हे तर याला जबाबदार नाहीत ना असा अनेकदा संशय येतो.)
  • Log in or register to post comments

निवांत सवडीने वाचावासा

गणपा
Wed, 06/06/2012 - 12:52 नवीन
निवांत सवडीने वाचावासा लेख. तुर्तास ही केवळ पोच.
  • Log in or register to post comments

मस्त ...

दिपोटी
Wed, 06/06/2012 - 14:22 नवीन
चतुरंग, निव्वळ सुरेख आणि वाचनीय लेख! - दिपोटी
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेख.

अमितसांगली
Wed, 06/06/2012 - 14:42 नवीन
वाचनखूण साठवत आहे..
  • Log in or register to post comments

अप्रतिम

स्मिता.
Wed, 06/06/2012 - 15:15 नवीन
अप्रतिम लेख आहे. सर्व बाजूंनी विचार करून लिहिलेला हा माहितीपूर्ण लेख अतिशय आवडला. बुद्धिबळ आणि माझा तसा फारसा संबंध नाही ;) पण रंगाभाऊजींचे लेख वाचून थोडं फार समजायला लागलंय. विश्वनाथन आनंद आणि त्याचा खेळ ही तर शेवटपर्यंत आपल्याकरता अभिमानाची बाब आहे.
  • Log in or register to post comments

च्यामारी

श्रावण मोडक
Wed, 06/06/2012 - 15:29 नवीन
बुद्धिबळ आणि माझा तसा फारसा संबंध नाही Wink पण रंगाभाऊजींचे लेख वाचून थोडं फार समजायला लागलंय. विश्वनाथन आनंद आणि त्याचा खेळ ही तर शेवटपर्यंत आपल्याकरता अभिमानाची बाब आहे.
च्यामारी, हे लिहायला पाहिजेच होतं का? वर रमतारामांचा प्रतिसाद वाचला. त्यातला तो गुगल, कणेकर वगैरे मजकूर डोक्यात असतानाच हे वाचायला लागलं... ;) (खातोय आता मार...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

(खातोय आता मार...) तथास्तु!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 06/06/2012 - 15:30 नवीन
(खातोय आता मार...)
तथास्तु!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

अपेक्षीत

श्रावण मोडक
Wed, 06/06/2012 - 16:01 नवीन
अपेक्षीत. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

च्यामारी

रमताराम
Wed, 06/06/2012 - 16:47 नवीन
हे म्हातारं बी हल्ली क्रिप्टिक बोलून र्‍हायलंय. :angry:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

सत्यानाश

श्रावण मोडक
Wed, 06/06/2012 - 17:00 नवीन
सत्यानाश. थांब जरा. स्मिता.ला येऊ दे. तिला कळेल मला काय म्हणायचं आहे ते. मग ती तुला सांगेल समजावून. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

च्यामारी

स्मिता.
Wed, 06/06/2012 - 16:58 नवीन
माझ्या बुद्धी-दुर्बळतेची एवढी जाहिर कबुली देवूनही हे मोडक सतत असे बाऊंसर टाकून काय बुद्धिबळ दाखवत असतात देव जाणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

ररा

श्रावण मोडक
Wed, 06/06/2012 - 17:02 नवीन
कळ्ळं आता? मी जे लिहिलं ते तिला उद्देशून होतं. तुला नाही. पण तुम्हा हुच्चभ्रूंना सगळं उलगडून सांगावं लागतं. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

होतं काय

स्मिता.
Wed, 06/06/2012 - 17:13 नवीन
होतं काय, तुम्ही जरा जास्त विचार करता आणि इतरांना विचारात पाडता :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

बरं

श्रावण मोडक
गुरुवार, 06/07/2012 - 18:04 नवीन
बरं... आता विचार बंद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

नकोऽऽ

रमताराम
गुरुवार, 06/07/2012 - 18:38 नवीन
अहो गुर्जी तुम्ही विचार बंद केलात तर आमची शिकवणी अर्धवट राहील ना. ती संपू द्या आधी, नि मग काय तो विचार-संन्यास घ्यायचा तो घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

मस्त

sneharani
Wed, 06/06/2012 - 15:31 नवीन
वाचनीय लेख! :)
  • Log in or register to post comments

मस्तच! आनंदचे अभिनंदन

ऋषिकेश
Wed, 06/06/2012 - 16:31 नवीन
मस्तच! आनंदचे अभिनंदन आहेच! बाकी भारताकडेही आता बरेच ग्रँडमास्टर्स आहेत असे ऐकले होते. त्यांचे काय झाले? ती कोनेरू हम्पीवगैरे नावे हल्ली ऐकू येत नाहीत :( अवांतर स्वगतः
आनंदच्या उजव्या हाताला फिडेचे अध्यक्ष किर्सान इल्युमझानोव.
या रंगाशेटला नेमकी उलट्या दिशेची माहिती द्यायची आठवण का व्हावी? ;)
  • Log in or register to post comments

भारताकडचे ग्रँमा

चतुरंग
गुरुवार, 06/07/2012 - 19:41 नवीन
चांगले आहेत आणि नियमित खेळताहेत. अवांतर - या रंगाशेटला नेमकी उलट्या दिशेची माहिती द्यायची आठवण का व्हावी? काही नाही रे बाबा, तुझ्यासारखे तडफदार, होतकरु तरुण 'वाम'मार्गाला लागू नयेत एवढीच इच्छा आहे म्हणून असे सांगितले बघ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

एकदम झकास लेख

जे.पी.मॉर्गन
Wed, 06/06/2012 - 16:36 नवीन
रंगाकाका... ब्येष्ट जमलाय बघा! आमची बुद्धिबळातली गती तुम्हाला ठाऊक आहेच! पण एक क्रीडाप्रेमी म्हणून आनंद ह्या इसमाविषयी अतीव कौतुक आणि आदर आहे जो तुमचा लेख वाचून वाढला. तुम्ही, र रा आणि प्रा डाँ नी ह्या सामन्याचं वर्णन करून माझ्यासारख्या चेस निरक्षराला तो सामना "फॉलो" करायला भाग पाडलंत. आणि आता हा लेख. माझ्या मते खेळाच्या शैलीत बदल होत जाणे नैसर्गिक आहे. वयानुसार प्रगल्भता येत जाते. आपल्या पूर्वीच्या सामन्यातल्या चुका कोणत्या कारणाने झाल्या याचा शोध घेताना शैलीत थोडेफर बदल करुन काही फायदे होतात का याचीही चाचपणी केली जाते. १००% सहमत. उगाच नाही हो लोकं २० - २० वर्षं त्या खेळाच्या शिखरावर राहात! आणि पुन्हा आपले अडाणी पब्लिक म्हणायला मोकळे की "तो पूर्वीसारखा खेळत नाही". अरे खुळ्यांनो तो पूर्वीसारखाच खेळत राहिला असता तर कधीच पालापाचोळ्यासारखा उडून गेला असता. अतिशय संयत शब्दांत केलेलं आपल्या आयडलचं कौतुक खूप आवडलं! आनंदच्या longevity ला सलाम आणि तुमच्या त्याच्याबद्दलच्या प्रेमालाही! जे पी
  • Log in or register to post comments

उचित ओळख!

पैसा
Wed, 06/06/2012 - 17:55 नवीन
विश्वविजेत्याला साजेशी ओळख करून देणारा लेख आणि तोही चतुरंगकडून! क्या बात है! मिपासाठी कोणत्यातरी चांगल्या मुहुर्तावर बुद्धिबळाच्या विश्वविजेतेपदाच्या मॅचेस सुरू झाल्या होत्या हे नक्कीच! रंगा, आता थांबू नका. वर वर विक्षिप्त वाट्णार्‍या इतर बुद्धिबळ चॅम्पियन्सबद्दलही असेच लेख येऊ द्यात!
  • Log in or register to post comments

+१००. येऊ द्या रंगाशेट.

प्यारे१
Wed, 06/06/2012 - 20:40 नवीन
+१००. येऊ द्या रंगाशेट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मस्त लिहलंय रे मित्रा!

संदीप चित्रे
Wed, 06/06/2012 - 21:22 नवीन
बुद्धिबळाच्या सामन्याबद्दल तू प्रचंड उत्सुकता निर्माण करतोस. विशेषतः आनंदबद्दल वाचताना तुला त्याच्याबद्दल असलेला सार्थ अभिमान जागोजागी जाणवतो आणि आपल्यालाही तोच अभिमान आहे हे ही जाणवतं :) >> माझ्या मते खेळाच्या शैलीत बदल होत जाणे नैसर्गिक आहे. वयानुसार प्रगल्भता येत जाते. आपल्या पूर्वीच्या सामन्यातल्या चुका कोणत्या कारणाने झाल्या याचा शोध घेताना शैलीत थोडेफर बदल करुन काही फायदे होतात का याचीही चाचपणी केली जाते. अत्त्युच्च दर्जाच्या सामन्यात खेळाडूंच्या क्षमतेतला, आणि खेळाच्या पातळीतला फरक इतक कणभर असतो की सहजासहजी निकाल लागणे अवघड असते. मानसिक आणि शारीरिक ताणांचा सामना जो कोणी अधिक चांगल्याप्रकारे करु शकेल तो सरस ठरतो. >> अगदी सहमत.. सचिनने एक मस्त विधान करून ठेवलंय की -- तुम्ही जेव्हा तरूण असता तेव्हा शरीर चपळ असतं पण बुद्धीही प्रगल्भ नसते. वय झाल्यावर हालचाली मंदावतात पण अनुभवामुळे डोकं जास्त चांगल्या प्रकाराने चालतं. त्यामुळे तरूण शरीरात अपरिपक्व मन आणि हालचाली मंदावलेल्या शरीरात परिपक्व मन असा तो 'ट्रेड ऑफ' असतो. -- जो खेळाडू ह्या 'ट्रेड ऑफ'चा योग्य वापर करून घेतो त्यांनाच जग सचिन, आनंद, बोरिस गेल्फंड अशा नावांनी ओळखतं!
  • Log in or register to post comments

बुद्धीपेक्षा आमचा कल बळाकडेच

भरत कुलकर्णी
गुरुवार, 06/07/2012 - 01:27 नवीन
बुद्धीपेक्षा आमचा कल बळाकडेच जास्त असल्याने लेखातले बारकावे समजले नाहीत तरीपण जो काही लेख आहे तो चांगलाच आहे हे नक्की.
  • Log in or register to post comments

समयोचित चांगला लेख

धनंजय
गुरुवार, 06/07/2012 - 02:15 नवीन
समयोचित चांगला लेख - धन्यवाद चतुरंग
  • Log in or register to post comments

स्सही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/07/2012 - 08:47 नवीन
लेख आवडला. धन्स. टाय ब्रेकरच्या एका लढतीत बोरीस एच पट्टीत प्यांदी पुढे सरकवत वजीर जीवंत करतो की काय आणि आनंदवर मात करतो की काय अशी भीती वाटत होती. क्रिकेट सारखीच प्रचंड अस्वस्थता आणि धडधड वाढलेली होती आणि अचानक आनंदच्या खेळीनं बोरीसला पराभव मान्य करावा लागली. ही लढत अतिउच्च आनंद देणारी होती. असो. >>>>>सचिनने आता निवृत्त व्हावे म्हणून सल्ले देणारे जसे अनेक असतात तसेच आनंदनेही करावे असे वाटणारे बरेच जण आहेत. मिपावरही या स्पर्धेदरम्यान असं कोणीतरीबोलल्याचं मला चक्क आठवतंय. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

नाय हो

रमताराम
गुरुवार, 06/07/2012 - 11:09 नवीन
आधीच बोललंय कोणीतरी. त्यानंतर इनोला अचानक मागणी वाढल्याची बातमी होती फेफ्रात. (डाक्तरसायबांनी प्राध्यापकी बळ दाखवायच्या आत पळा........................................)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्वा..

स्वाती दिनेश
गुरुवार, 06/07/2012 - 12:11 नवीन
सुरेखच लेख.. वाचायला अंमळ उशिरच झाला पण निवांतपणे आस्वाद घेत वाचला. फार छान लिहिले आहे चतुरंग. स्वाती
  • Log in or register to post comments

वा छान लेख. ह्या खेळाच्या

गोंधळी
गुरुवार, 06/07/2012 - 15:02 नवीन
वा छान लेख. ह्या खेळाच्या प्रसारासाठी येथील लोकांच्या बुध्दी ला बळ मिळु दे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा