✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

इंटरव्हेन्शन

र
राजेश घासकडवी यांनी
Sat, 06/02/2012 - 08:33  ·  लेख
लेख
बरेच लोक दारू पितात. दारू पिण्यात काहीच गैर नाही. मित्रांबरोबर दोनचार पेग घेतले, थोडी दंगामस्ती केली, अधूनमधून जरा जास्त देखील घेतली. आपणही कधी कधी असं करतो. प्रत्येकाचीच एक मर्यादा असते. बहुतांश वेळी बहुतेक लोक त्या रेषेच्या आत रहातात. कधी कधी एखादवेळी ती ओलांडलीही जाते. असं चालतंच. 'काहीतरी यडपटासारखं बरळेल. मग थोड्या वेळाने उलटी काढेल. उद्या दुखेल प्रचंड डोकं. पण नंतर येईल ताळ्यावर.' हे आपल्याला आपल्या अनेक मित्रांविषयी माहीत असतं. पण एखाद्या कोणाचीतरी कथा थोडी वेगळी व्हायला लागते. मित्रांबरोबरच नव्हे, तर सदासर्वकाळ दारू पिणं सुरू होतं. मैफिलीसाठी दारू न होता दारूसाठी मैफिली होतात. आणि नाहीत मैफिली तर नाहीत, पण दारू हवी. दारू हीच मैफील होते. मग तो त्या व्यसनाच्या गर्तेत बुडून जातो. सोन्यासारखं आयुष्य त्या खोल खोल गर्तेत बुडवून टाकतो. आपण त्याला अधूनमधून 'जरा बेताने बरं का' असा सल्ला दिलेला असतो. त्यावर 'अरे काही नाही रे. आपला कंट्रोल आहे.' असं जड जिभेने ऐकलेलंही असतं. आपल्याप्रमाणेच इतर मित्रही अधूनमधून सांगतात. पण सुधारणा होत नाही. आणि अचानक तो एकेकाळी धट्टाकट्टा दिसणारा, रोडावलेला दिसतो. आपण त्याला पुन्हा सांगून बघतो. पण नंतर संबंध तुटतो. आणि काही वर्षांनी अचानक तो दारूपायी गेल्याची बातमी येते. साला काय फास्ट बॉलिंग करायचा... डोळ्यात चमक होती त्याच्या, मी दोन वर्षांपूर्वी पाहिलं तेव्हा सगळी रया गेली होती... मी सांगण्याचा प्रयत्न केला, पण आपण किती करणार? नुसती हळहळ शिल्लक राहाते. दारूचं व्यसन ही फक्त एक प्रकारची गर्ता आहे. इतरही खोल खोल विहिरी, दऱ्या आहेत, ज्यात माणूस हळूहळू खेचला जातो. दलदलीत पाय रुतल्यावर शरीर सावकाश आत आत शिरत जावं तसा. कधी ही दलदल खूप उबदार असते. आत शिरण्याचा मोह आवरत नाही. बाहेरच्या कोरड्या शुष्क जगापेक्षा हीच ओल मनाला भावते. आत जाताना आधी पायांना, मग गुढग्यांना, त्यानंतर कंबरेला अतीव सुखदायक वाटतं. बाहेर पडायची इच्छाच होत नाही. कुठेतरी यात काहीतरी धोका आहे असं वाटत असलं तरी मन सांगत राहातं 'अजून थोडा वेळ. मला हवं तेव्हा मला बाहेर येता येईलच...' हीच खरी धोकादायक परिस्थिती असते. आतमध्ये कुठेतरी घण् घण् घण् धोक्याची घंटा वाजत असते. पण तिच्याकडे लक्ष देण्यापलिकडे कान बधीर झालेले असतात. अशा व्यक्तीकडून 'मला काही प्रॉब्लेम नाही' हे विधान अतिशय ठामपणे येताना दिसतं. अशा गर्तेत बुडताना कधीकधी बाहेरून एखादा प्रचंड धक्का बसतो. आणि मग आत जाण्याचा वेग वाढतो. नोकरी जाणं, प्रेमभंग, प्रिय व्यक्तीचं निधन... अशी कुठचीही गोष्ट परिस्थितीवरचा ताबा घालवायला कारणीभूत ठरू शकते. बुडत्याचा काडीचाही आधार जातो. आणि गटांगळ्या सुरू होतात. बाहेर डोकं काढून हपापल्यासारखा श्वास घ्यायचा... मदतीसाठी हाक मारायची. कधी हे होतं, तर काही वेळा तेही होत नाही. प्रवाहाला शरण जाऊन भोवऱ्यात जाणं होतं. आणि आपण किनाऱ्यावर बसून बघत राहातो. पण अशा वेळी नक्की करायचं तरी काय? 'मी माझ्या मित्राला माझ्या परीने सांगून पाहिलं. उपयोग झाला नाही. याच्यापलिकडे मी काय करणार?' असं म्हणता येतं खरं. पण मी अजून काहीतरी करायला हवं होतं ही मनाला चुकचुक लागून राहाते. इंटरव्हेन्शन हा त्यावरचा एक उपाय आहे. जेव्हा एखाद्या रोग्याला त्याचा रोग इतका वेढून टाकतो की आपल्याला मदत हवी आहे याचीही जाणीव नाहीशी होते तेव्हा ती मदत पुरवण्याची जबाबदारी इतरांवर येते. आपल्या समोर कोणी गाडीखाली येऊन बेशुद्ध पडला असेल तर त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी आपली. 'त्याच्या इच्छेवर अवलंबून राहून तो स्वतःला हवे तेव्हा हवे तसे उपचार करून घेईल', असा विचार करण्याची चैन परवडण्यासारखी नसते. वाहातं रक्त डोळ्यासमोर दिसत नसेल, हात-पाय मोडलेले दिसत नसतील तर प्रत्यक्ष उचलून हॉस्पिटलमध्ये टाकायची गरज तितक्या तीव्रतेने जाणवत नाही. पण मानसिक विकार किंवा व्यसन किंवा दुःख तितक्या पराकोटीला पोचतच नाही असं नाही. जेव्हा ते तसं झालेलं दिसतं तेव्हा तितक्याच तीव्रतेने आपल्याला त्यात सामील व्हावं लागतं. तितकीच जबाबदारी आपल्यावर येऊन पडते. 'तुला मदतीची गरज आहे. आणि ती तू घ्यावीस यासाठी आम्ही पडेल ते करू' असं अनेक मित्र, सुहृद, आप्तेष्ट यांनी एकत्र येऊन सांगणं हा एक मार्ग असतो. यालाच इंटरव्हेन्शन असं म्हणतात. एखादा मित्र जेव्हा कळकळीने सांगतो तेव्हा त्याचा थोडा परिणाम होतो, नाही असं नाही. पण तो कदाचित पुरेसा नसतो. त्याऐवजी जर त्याचे जमतील तितके मित्र, नातेवाईक, त्याच्यावर प्रेम करणारे आणि त्याचं ज्यांच्यावर प्रेम आहे असे सगळेजण एकत्र येऊन त्यांनी ठामपणे सांगितलं तर त्याचा परिणाम त्या व्यक्तीचं जीवन बदलण्यास कारणीभूत ठरू शकतो. मरण टाळण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. विकीपिडियावर http://en.wikipedia.org/wiki/Intervention_%28counseling%29 इंटरव्हेन्शनची व्याख्या अशी दिली आहे An intervention is an orchestrated attempt by one or many, people – usually family and friends – to get someone to seek professional help with an addiction or some kind of traumatic event or crisis, or other serious problem. The term intervention is most often used when the traumatic event involves addiction to drugs or other items. हे घडण्यासाठी त्या व्यक्तीला आडून आडून, गोड शब्दांत सल्ला देण्यापलिकडे जाऊन स्पष्ट, काहीशा कठोर शब्दांतच 'तुला मदतीची गरज आहे असं आम्हा सगळ्यांना वाटतं. ती तू घेण्यासाठी आम्ही पडेल ते करू. ती घेण्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ती घेताना जे अडथळे येतील त्यात आम्ही तुला मदत करू. पण तू ज्या मार्गावरून चालला आहेस त्यात तुझं भलं नाही.' असं सांगण्याची गरज असते. दलदलीत फसत जाणाऱ्याला, त्याच्या मनाविरुद्ध का होईना, दोऱ्या बांधून, सगळ्यांनी मिळून खेचून बाहेर काढण्याचा हा प्रयत्न असतो. या प्रयत्नांत अर्थातच दोरी गळ्याला लागून फास बसणार नाही याची काळजी घ्यायची असतेच - पण दोरी कंबरेला काचून जखमा होतील त्याची काळजी करायची नसते. सर्वसाधारणपणे लेख लिहिताना मी बराच जास्त अभ्यास करतो. पण हा लेख अपुऱ्या माहितीवर लिहितो आहे. तो चांगला झाला आहे की वाईट झाला आहे याची मला पर्वा नाही. हा लेख लिहिण्यामागे मला माझ्या मनातली कळकळ पोचवायची आहे. तुम्हाला तुमच्या आसपास कोणी जर दिसत असेल, ज्यांना मदतीची गरज आहे तर जरूर धावा. तुमचं मन शुद्ध असेल की या माणसाला मी, आम्ही, सगळ्यांनी मदत करण्याची गरज आहे तर कोणाच्या भावनांची कदर करण्याच्या भानगडीत पडू नका. तात्काळ कृती करा. पण एकटे जाऊ नका. शक्य तितके सुहृद, मित्र, आप्तेष्ट, हितचिंतक गोळा करा. आणि सगळ्यांनी मिळून एकदिलाने त्या दलदलीत खचणाऱ्याला त्याच्या मनाविरुद्ध का होईना, बाहेर काढा. नंतर नुसती हळहळ शिल्लक ठेवायची की आत्ताच प्रयत्न करायचा हे आपणच ठरवायचं असतं.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
सल्ला
माहिती
मदत

प्रतिक्रिया द्या
26716 वाचन

💬 प्रतिसाद (94)

प्रतिक्रिया

कधी ही दलदल खूप उबदार असते.

यकु
Sat, 06/02/2012 - 09:10 नवीन
कधी ही दलदल खूप उबदार असते. आत शिरण्याचा मोह आवरत नाही. बाहेरच्या कोरड्या शुष्क जगापेक्षा हीच ओल मनाला भावते. आत जाताना आधी पायांना, मग गुढग्यांना, त्यानंतर कंबरेला अतीव सुखदायक वाटतं. बाहेर पडायची इच्छाच होत नाही. कुठेतरी यात काहीतरी धोका आहे असं वाटत असलं तरी मन सांगत राहातं 'अजून थोडा वेळ. मला हवं तेव्हा मला बाहेर येता येईलच...' हीच खरी धोकादायक परिस्थिती असते. आतमध्ये कुठेतरी घण् घण् घण् धोक्याची घंटा वाजत असते.
नाथ, संदेश पावला.
  • Log in or register to post comments

+

नितिन थत्ते
Sat, 06/02/2012 - 09:13 नवीन
आवडलं.
  • Log in or register to post comments

खुपच छान!आवडले.नाथ, संदेश

आंबोळी
Sat, 06/02/2012 - 09:42 नवीन
खुपच छान! आवडले. नाथ, संदेश पावला. घासकडवी साहेब, तुम्ही वाचवायला टाकलेल्या दोर्‍यांच्या धक्क्याने हे आजुनच बुडायला लागल का काय? ;)
  • Log in or register to post comments

खरोखर उत्तम लिहिलं आहे, आता

५० फक्त
Sat, 06/02/2012 - 09:52 नवीन
खरोखर उत्तम लिहिलं आहे, आता यापुढं हा ईंटर्व्हेंशनचा प्रयत्न करुन पाहेन, बराच वेळ दारु न पिता दारुच्या मैफिलिला बसणं म्हणजे उत्तम लाईव्ह करमणुक आहे असं मानतो, आता थोडा विचार बदलायला हवा.
  • Log in or register to post comments

घासकडवी साहेब, तुम्ही

यकु
Sat, 06/02/2012 - 10:04 नवीन
घासकडवी साहेब, तुम्ही वाचवायला टाकलेल्या दोर्‍यांच्या धक्क्याने हे आजुनच बुडायला लागल का काय?
पुरुषाने पुरुषाला उर्ध्वरेतन शिकवून पुरुषाला स्‍त्री च्या संगाची गरजच न ठेवणारा संप्रदाय 'नाथ' संप्रदाय म्हणून ओळखला जातो. म्हणून त्यांना नाथच म्हणायचं. वर कुमार गंधर्व गात असलेलं ऐकलं नाही का? नाद बिंदू से पिछे जमया पानी - मूलाधार चक्राच्या जवळच वीर्य कोशिका आहेत, गगन में आवाज हो रही झिनी - झिनी - हा अनाहत नाद आहे. माखन माखन संतो ने खाया - हे वीर्य सहस्रारात जाण्याचा संकेत आहे. पृथ्‍वीवरच्या अख्‍ख्‍या मानव वंशात कदाचित भारतातच उर्ध्वरेतनाद्वारे वीर्य स्वत:च्या सहस्रारात नेऊन योग सामर्थ्याच्या बळावर योगाभ्यासक हव्या त्या स्त्री च्या पोटी संतान उत्पन्न करु शकत. छाछ जगत बभ्राणी रे - सहस्रारात न जाता बाहेर पडलेल्या वीर्यातूनच जग फोफावतं.
  • Log in or register to post comments

याचे लेख आणि प्रतिसाद फक्त

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 06/02/2012 - 13:25 नवीन
याचे लेख आणि प्रतिसाद फक्त मलाच कळत नाहीत की इतरांना पण कळत नाहीत ? प्लीज सांगा कुणीतरी, मला जाम न्यूनगंड येऊन राहिला आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

ऑ ?

परिकथेतील राजकुमार
Sat, 06/02/2012 - 13:30 नवीन
यक्कुचे प्रतिसाद आणि लेख हे 'कळणारे' असतात, हे तुम्हाला कोणत्या महाभागाने सांगीतले ते आधी सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

सर, `कपाळात जाणे' ही (मेन्स ओन्ली) म्हण तुम्हाला माहितीये ना?

संजय क्षीरसागर
Sat, 06/02/2012 - 14:53 नवीन
बहुदा ती तो `एक्सप्लेन' करतोय म्हणजे त्यासाठी नक्की काय करायच ती प्रोसिजर सांगतोय (म्हणून `पुरुषाने पुरुषाला' असं स्पेसिफिक लिहिलय) ... असा आपला माझा समज आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

छे, काहीतरीच.तसला काहीही

भरत कुलकर्णी
Sat, 06/02/2012 - 18:42 नवीन
छे, काहीतरीच. तसला काहीही अर्थ मग "करी स्वजन उपाधि भस्मलेप अंगा झोळीत भरीत तज्जन्ममरण पिंगा" याचाही लावता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

काय अर्थ लावता येईल?

संजय क्षीरसागर
Sun, 06/03/2012 - 23:45 नवीन
कळवाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भरत कुलकर्णी

अर्थ: हा परमसनातन विश्वभरूनी

यकु
Mon, 06/04/2012 - 11:10 नवीन
अर्थ: हा परमसनातन विश्वभरूनी उरलाऽऽऽ भरूनी उरला गुरू दत्तराज ऋषिकुळात अवतरला स्मित रम्यवदन काषाय वसन धारी पियुषयुक्त करी रत्नजडीत झारी निज भक्त कारणेऽऽऽऽ दंड त्रिशुळ धरिला बांधीला टोप मुरडून जटा मुकुटीऽऽऽऽ मुकुटी घातली गुरूने वनमाला कंठी ऽऽऽऽ कंठीऽऽऽ करिघृतडमरूतुनी उपजति ज्ञान कला मृगचर्म पांघरे माला कमंडलू हाती, कमंडलू हाती ऽऽऽ श्रुति श्वानरूप होऊनी पुढे पळती भूधेनू कली भये चाटीत चरणाला करिस्वजन उपाधि भस्मलेप अंगा ऽऽऽ झोळीत भरीत तज्जजन्ममरण पिंगा ऽऽ नारायण हृदयी रंग भरूनी गेलाऽऽऽ भरूनी गेलाऽऽऽ गुरू दत्तराज ऋषिकुळात अवतरला आणि कथा इथे: http://www.misalpav.com/node/15543
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

पियुषयुक्त करी रत्नजडीत झारी

५० फक्त
Mon, 06/04/2012 - 17:06 नवीन
पियुषयुक्त करी रत्नजडीत झारी - आयला ते जनसेवा मधल्या पियुषचा संदर्भ इथपासुन आहे का, बरं झालं कळालं ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

हाहाहा..पियूशयुक्त करी

यकु
Mon, 06/04/2012 - 17:11 नवीन
हाहाहा.. पियूशयुक्त करी रत्नजडीत धारी ;-) बरोबर, जनसेवा :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

-१

मन१
Sun, 06/03/2012 - 19:20 नवीन
लोकांना यकुचं म्हणणं कळतय की नाही ह्याचा विचार केलात; पण लोकांचं म्हणणं यकुला समजतय की नाही ह्याचा कुणी विचार करतय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

यक्या

राजघराणं
Sat, 06/02/2012 - 16:53 नवीन
बाबा सावर रे ...........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

??

मन१
Sun, 06/03/2012 - 19:19 नवीन
??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

यापेक्षा रोशशची कविता

किचेन
Mon, 06/04/2012 - 16:07 नवीन
यापेक्षा रोशशची कविता परवडली.. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

हं...

श्रावण मोडक
Sat, 06/02/2012 - 10:20 नवीन
सर्वसाधारणपणे लेख लिहिताना मी बराच जास्त अभ्यास करतो.
हं...
पण हा लेख अपुऱ्या माहितीवर लिहितो आहे.
पटलं. :-)
तो चांगला झाला आहे की वाईट झाला आहे याची मला पर्वा नाही.
हे उत्तम. निर्गुण, निराकार व्हावं माणसानं. भाव निर्माण होणं थांबवावं असं योगी-ऋषी सांगून गेले आहेतच. तेच तुम्ही सांगताहात वेगळ्या रीतीनं. :-)
हा लेख लिहिण्यामागे मला माझ्या मनातली कळकळ पोचवायची आहे.
पोचली.
तुम्हाला तुमच्या आसपास कोणी जर दिसत असेल, ज्यांना मदतीची गरज आहे तर जरूर धावा.
धावतोच आहे. थांबता येईल अशी चिन्हं दिसत नाहीत. :-(
तुमचं मन शुद्ध असेल की या माणसाला मी, आम्ही, सगळ्यांनी मदत करण्याची गरज आहे तर कोणाच्या भावनांची कदर करण्याच्या भानगडीत पडू नका.
करत नाहीच. एरवीही आणि इथंही. :-)
तात्काळ कृती करा.
केली. करतो आहेच. वर म्हटलं तसं, धावणं थांबवता येईल अशी चिन्हं नाहीत. :-(
पण एकटे जाऊ नका. शक्य तितके सुहृद, मित्र, आप्तेष्ट, हितचिंतक गोळा करा. आणि सगळ्यांनी मिळून एकदिलाने त्या दलदलीत खचणाऱ्याला त्याच्या मनाविरुद्ध का होईना, बाहेर काढा.
अगदी, अगदी. सहमत होण्याशिवाय पर्यायच नाही. माणूस हा शेवटी 'समाजशील' प्राणीच आहे, असं म्हणतात. :-)
नंतर नुसती हळहळ शिल्लक ठेवायची की आत्ताच प्रयत्न करायचा हे आपणच ठरवायचं असतं.
अगदी खरंय. कमीतकमी अभ्यासातूनही कमाल सत्य मांडलं आहे तुम्ही. म्हणूनच वरच्या थत्तेचाचांच्या प्रतिसादाशी सहमत. :-) आता विकीच्या त्या व्याख्येकडं येतो.
An intervention is an orchestrated attempt by one or many, people – usually family and friends – to get someone to seek professional help with an addiction or some kind of traumatic event or crisis, or other serious problem. The term intervention is most often used when the traumatic event involves addiction to drugs or other items.
दोन कळीचे शब्द जाड ठशात टाकले आहेत. त्याच्यासंदर्भात तुमचे "पण हा लेख अपुऱ्या माहितीवर लिहितो आहे" हे वाक्य वाचता येते हे महत्त्वाचे. काय म्हणता?
  • Log in or register to post comments

श्रामो, तुम्ही फारच बारकावे काढता राव!

संजय क्षीरसागर
Sat, 06/02/2012 - 14:14 नवीन
त्यांच्या भावना पाहा आणि इथे पब्लिकचे लगेच मनावर घेऊन (म्हणजे आपल्याला उद्देशूनच लेख असल्यासारखे) स्वजागृती करण्याचे प्रयत्न पाहा; व्याख्येपेक्षा भावना महत्त्वाची, काय बोलता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

धन्यवाद.

परिकथेतील राजकुमार
Sat, 06/02/2012 - 12:06 नवीन
हा लेख लिहिण्यामागे मला माझ्या मनातली कळकळ पोचवायची आहे.
एकदम पोचली. :) सध्या स्वतःच स्वतः वरती इलाज करत आहे. लक्षणीय वाटावे इतके दारुपान कमी झालेले आहे.
  • Log in or register to post comments

परिकथेतील राजकुमार साहेब, माझ्या कडुनही धन्यवाद

निश
Sat, 06/02/2012 - 12:31 नवीन
परिकथेतील राजकुमार साहेब, माझ्या कडुनही धन्यवाद तुम्ही करत असलेल्या दारु कमी करण्याच्या प्रयत्नासाठी. मस्त प्रयत्न करत आहात व त्यात यशस्वी पण होत आहात तर दारू प्यावीशीच वाटणार नाही ह्यासाठी पण जरुर प्रयत्न करा. माझ्या कडुन तुम्हाला धन्यवाद व तुमच्या प्रयत्नाना माझा सलाम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

थान्कू

परिकथेतील राजकुमार
Sat, 06/02/2012 - 12:36 नवीन
मस्त प्रयत्न करत आहात व त्यात यशस्वी पण होत आहात तर दारू प्यावीशीच वाटणार नाही ह्यासाठी पण जरुर प्रयत्न करा.
हे अंमळ अवघड आहे. दारुवरती आमचे नितांत प्रेम आहे बघा. पण तुमच्या सुचनेचा नक्की विचार केल्या जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

परिकथेतील राजकुमार साहेब, अहो दारु पेक्षा जीवनाचे आयुष्याचे ..

निश
Sat, 06/02/2012 - 12:41 नवीन
परिकथेतील राजकुमार साहेब, अहो दारु पेक्षा जीवनाचे आयुष्याचे तुमच्या वर जास्त प्रेम आहे. मग त्या देवाने दिलेल्या सुंदर आयुष्यासाठी तरि प्रयत्न करुन बघा. तुम्ही नक्कि यशस्वी व्हाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

परा, डिसिजन घ्यायचा तर मन तरल पायजेल, हो किनई?

संजय क्षीरसागर
Sat, 06/02/2012 - 14:35 नवीन
आणि "दारू प्यावीशीच वाटणार नाही " असला भारी डिसिजन घ्यायचा तर केवढी तरलता पायजेल काही हिशेब आहे का? काय करायच? घ्यायची का रिस्क, का चाललय ते बरंय ? जरा विचार कर, तू आपला लगेच ` थँक्यू' म्हणून मोकळा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

दारुवरती आमचे नितांत प्रेम

कवितानागेश
Sat, 06/02/2012 - 18:02 नवीन
दारुवरती आमचे नितांत प्रेम आहे बघा.>> If you love her, set her free. If she comes back, she is yours! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

दारू च प्रेम हे फक्त एकावरच असत. ते दोघही येतात बहुतेक जोडीनेच..

निश
Sat, 06/02/2012 - 18:17 नवीन
दारू च प्रेम हे फक्त एकावरच असत. ते दोघही येतात बहुतेक जोडीनेच.. दारुच खर प्रेम असत फक्त आणी फक्त मरणा बरोबर. ति येते आणी सतत येतच राहते तेव्हा समजावा तिचा प्रियकर यायची वेळ आली म्हणुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

खिक्

श्रावण मोडक
Sat, 06/02/2012 - 12:36 नवीन
लक्षणीय वाटावे इतके दारुपान कमी झालेले आहे.
खिक्... आज सकाळीच का? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

च्यायला !

परिकथेतील राजकुमार
Sat, 06/02/2012 - 12:39 नवीन
आजकाल संध्याकाळी पण माझा फोन लागतो ह्यावरुन तरी ठरवा की हो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

लोकेशन

श्रावण मोडक
Sat, 06/02/2012 - 12:50 नवीन
लोकेशन मॅटर्स. आजकाल त्यातच बदल झालाय ना! रेंज असते म्हटल्यावर फोन लागतोच. त्यानंतर जे घडतं ते... जाऊ द्या... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

विनंती

राजेश घासकडवी
Sat, 06/02/2012 - 18:41 नवीन
श्रामो, परा, एकंदरीत ही चर्चा टाइमपासकडे झुकत चाललेली दिसते आहे. हे सगळं करण्याचा तुम्हाला अधिकार आहे हे मला माहीत आहे. पण लेखाचा विषय गंभीर आहे. तेव्हा इथे भंकस करू नये अशी विनंती करतो. त्यासाठी इतर अनेक धागे आहेतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

गंमतीशीर प्रतिसाद आणि विनंती

नाना चेंगट
Sat, 06/02/2012 - 18:46 नवीन
गंमतीशीर प्रतिसाद आणि विनंती विशेषतः लेखकाचाच पूर्वेतिहास पहाता :) असो. चालायचेच... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

हॅ हॅ हॅ

परिकथेतील राजकुमार
Mon, 06/04/2012 - 11:50 नवीन
कसे आहे नानबा, आपण करतो ती चर्चा आणि लोकं करतात ती भंकस.
तेव्हा इथे भंकस करू नये अशी विनंती करतो.
आंतरजालावरती लेख टाकणे म्हणजे खिडकीत बसणे. अशावेळी खालून कोणी इशारे केल्यावरती पतीव्रतेचा आव आणू नये अशी विनंती. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

>>>आपण करतो ती चर्चा आणि लोकं

नाना चेंगट
Mon, 06/04/2012 - 13:09 नवीन
>>>आपण करतो ती चर्चा आणि लोकं करतात ती भंकस. हा हा हा अरे कधी मोठा होणार तु... सहस्त्रेषु पंडित: नाही नाही परार्धेषु विचारवंतः असते विसरु नकोस... :) तेव्हा विचारवंतांना आपण सोडून बाकीचे सगळे भंकस करतात असेच वाटते. तु नको मनावर घेऊस ! जे चालले आहे ते तसेच चालू ठेवायचे :) >>>आंतरजालावरती लेख टाकणे म्हणजे खिडकीत बसणे. अशावेळी खालून कोणी इशारे केल्यावरती पतीव्रतेचा आव आणू नये अशी विनंती. अगदी खरे. तसेच आम्ही मागे म्हणालो होतो तसेच लेख लिहिला की गंगार्पणमस्तु !! लोकांनी डोक्यावर घ्यावा, पायदळी तुडवावा, मखरात बसवावा वा फाट्यावर मारावा. लेखकाने अमुकच पद्धतीचे प्रतिसाद हवे नाहीतर आम्ही नाही लिहिणार जा असे म्हणू नये, तशीच इच्छा असली तर अक्षरांची टंकखाज भागवण्यासाठी वेगळी संकेतस्थळे आहेतच तिथे जाऊन शष्प कर्तन केंद्र चालू ठेवावे. कसे !! :) बाकी खालती पुपे म्हटला ते खरेच असावे असे वाटत आहे :) असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

खंग्री

कपिलमुनी
Fri, 06/08/2012 - 14:56 नवीन
>>आंतरजालावरती लेख टाकणे म्हणजे खिडकीत बसणे. अशावेळी खालून कोणी इशारे केल्यावरती पतीव्रतेचा आव आणू नये .. ह ह पु वा ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

नाही

श्रावण मोडक
Sat, 06/02/2012 - 19:42 नवीन
नाही, हे माहितीचे संकलन आहे. इंटरव्हेन्शन कसे असावे याचा अभ्यास चालू आहे. सहा तास मी शांत आहे तो त्यामुळेच. तेंव्हा याला टाइमपास म्हणू नये ही नम्र विनंती. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

>>सध्या स्वतःच स्वतः वरती

नाना चेंगट
Sat, 06/02/2012 - 14:38 नवीन
>>सध्या स्वतःच स्वतः वरती इलाज करत आहे. लक्षणीय वाटावे इतके दारुपान कमी झालेले आहे. अच्छा ! कुणाच्या दृष्टीने लक्षणीय? ;) @लेखक'राव लेख चांगला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

राजेश घासकडवी साहेब, अतिशय कळकळीने लिहिला आहेत हा लेख.

निश
Sat, 06/02/2012 - 12:37 नवीन
राजेश घासकडवी साहेब, अतिशय कळकळीने लिहिला आहेत हा लेख. लेख अतिशय विचार करायला लावणारा झाला आहे,
  • Log in or register to post comments

लेख फार आवडला.

शुचि
Sat, 06/02/2012 - 12:40 नवीन
लेख फार आवडला.
  • Log in or register to post comments

हम्म...

दादा कोंडके
Sat, 06/02/2012 - 13:17 नवीन
'त्याच्या इच्छेवर अवलंबून राहून तो स्वतःला हवे तेव्हा हवे तसे उपचार करून घेईल', असा विचार करण्याची चैन परवडण्यासारखी नसते.
बरोबर
पण मानसिक विकार किंवा व्यसन किंवा दुःख तितक्या पराकोटीला पोचतच नाही असं नाही. जेव्हा ते तसं झालेलं दिसतं तेव्हा तितक्याच तीव्रतेने आपल्याला त्यात सामील व्हावं लागतं. तितकीच जबाबदारी आपल्यावर येऊन पडते.
तितकीच नाही तर त्यापेक्षा जास्त जबाबदारी येते. महत्वाचा फरक म्हणजे, त्या व्यक्तीचा विश्वास संपादन करायला हवा. त्याला आपण खरोखरच मदत करीत आहोत असा त्याला विश्वास वाटायला हवा. त्याला जबरदस्तीनं पकडून वेड्यांच्या इस्पितळात दाखल करू नये. त्यासाठी आपलं इंटेशन चांगलं हवं. फक्त त्या व्यक्तीशी संवाद साधायला हवा. एकदा चार-चौघांसमोर त्या व्यक्तीला वेडं ठरवल्यावर ती व्यक्ती डिफेन्स मोडमध्ये जाते, आणि मग उपचार अवघड होउन बसतो. आणि महत्वाचं म्हणजे मानसिक विकार ओळखणं. एखादी व्यक्ती चार चौघांसारखं आयुष्य जगत नाही. पोरं पैदा करत नाही म्हणून त्याला मानसिक आजारी ठरवू नये. असो.
  • Log in or register to post comments

कॉलींग......... माननिय मदिना

गोंधळी
Sat, 06/02/2012 - 13:53 नवीन
कॉलींग......... माननिय मदिना गुरु -सोत्रि.
  • Log in or register to post comments

मेंबर

विनायक प्रभू
Sat, 06/02/2012 - 15:23 नवीन
चला लेखानिमित्त एक गोष्ट नक्की. राजेश अल्कोहोल अनॉनिमस ला दोन मेंबर नक्की.
  • Log in or register to post comments

असले काहीही करु नका....

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 06/02/2012 - 15:31 नवीन
दारुचे फायदे तोटे दारु पिणार्‍याला चांगलेच माहीत असतात. दारु पिउन आपण आपले स्वतःचे आपल्या कुटुंबाचे नुकसान करतो आहोत हे दारुड्याला चांगले माहीत असते. तरी सुध्दा तो दारु पिणे सोडत नाही. त्यामुळे असल्या निर्बुध्द, कोडग्या आणि भिकारचोट लोकांच्या उगाच नादाला लागु नये. काहीसुध्दा फायदा होत नाही. लाखात एखादा दारु सोडु शकतो. बाकीचे प्रवचन ऐकुन तडक दारुचा अड्डा गाठतात आणि दारु पिउन आपलाच उध्दार करतात. कुटुंबातील एखादी व्यक्ती जर दारुडी असेल तर बाकिच्या कुटुंबाच्या मनःशांतीवर नक्कीच परीणाम होतो. रोजची कटकट, भांडणे, वादविवाद यात ते अकारण भरडले जातात. एखादा दारुडा / दारुडी जर मेला / मेली तर त्याचे कुटुंब अधिक सुखी होते. त्यांना निदान शांतपणे बाकी आयुष्य जगता येते. त्यामुळे असला भोचकपणा न करता त्या दारुड्याला जर दारु साठी पैसे कमी पडत असतील तर ते पुरवावे. विलायती पित असेल तर देशी पी असा आग्रह करावा. देशी पित असेल तर गावठीने कशी लवकर किक बसते हे सांगावे. ज्या मुळे तो जास्तीजास्त दारु पीउन लवकरात लवकर मरेल आणि त्याचे कुटुंबिय सुखी होतील. असला भोचकपणा करणे म्हणजे फार मोठी समाजसेवा जर कोणाला वाटत असेल तर देव त्याचे भले करो. स्वतःची लाल करुन घेण्याची खाज असलेले लोकच असले वांझोटे उद्योग करतात. त्यापेक्षा एखादा दारुडा लवकरात लवकर कसा मरेल हे पहाणे हीच खरी समाजसेवा आहे. एखादा दारुडा मेला तर त्याचे अजिबात वाईट वाटुन घेउ नये (तो आपला कितीही जवळचा असला तरी) मग असले काहीबाही मनात येत नाही. (ऱोखठोक)
  • Log in or register to post comments

याच न्यायाने

तिमा
Sat, 06/02/2012 - 16:46 नवीन
बाईलवेड्यांना मदत करावी का ? म्हणजे ते रोग होऊन लौकर मरतील. इंटरनेट वेड्यांना आणखी संगणक घेऊन द्यावे का ? म्हणजे ते पूर्ण अ‍ॅडिक्ट होतील. भ्रष्टाचार्‍यांना पैसा पुरवावा का ? म्हणजे ते हा रोग पसरवून आपल्या देशाचे वाटोळे करतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

जरुर,

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 06/02/2012 - 17:19 नवीन
बाईलवेड्यांना पण जरुर रोग होउन मरु द्यावे. हाच न्याय ईतर व्यसने करणार्‍यांनाही लावावा जसे चरस गांजा सिगारेट इत्यादी. असल्या लोकांना जगवुन तरी काय फायदा? एखादा विजय मल्ल्या किंवा आयटीसी यांना श्रीमंत करण्याशिवाय आणि कुटुंबियांना मनस्ताप देण्या पलीकडे हे लोक काय करतात? आम्ही दारु का पितो याचे मुर्खा सारखे समर्थन, दारु न पिणारा बावळट आणि मी कसा महान आहे या पलिकडे त्यांना बोलता देखील येत नाही. अशांना मरु द्यावे असे माझे स्पष्ट मत आहे. ईतर दोन उदाहरणे अप्रस्तुत वाटल्यामुळे त्या बद्दल कोणतीही टीपण्णी टाळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

फारच निष्ठूर दृष्टिकोन !

जयंत कुलकर्णी
Sat, 06/02/2012 - 22:45 नवीन
फारच निष्ठूर दृष्टिकोन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

?

विनायक प्रभू
Sat, 06/02/2012 - 15:38 नवीन
ह्याला आउटर्वेन्शन म्हणावे काय?
  • Log in or register to post comments

लेख चांगला

पैसा
Sat, 06/02/2012 - 16:59 नवीन
पण हे आपण सगळेच जण करतोच की!
  • Log in or register to post comments

इंटरव्हेन्शन करुन दारु सुटते

कवितानागेश
Sat, 06/02/2012 - 18:00 नवीन
इंटरव्हेन्शन करुन दारु सुटते हे सिद्ध करणारा काही विदा आहे का? :P
  • Log in or register to post comments

हा लेख फक्त दारूविषयी नाही.

राजेश घासकडवी
Sat, 06/02/2012 - 18:35 नवीन
हा लेख फक्त दारूविषयी नाही. कुठचंही व्यसन, वागणूक, विचार यांच्या चक्रात अडकून पडायला होऊ शकतं. त्यात अडकल्यावर स्वतः होऊन त्यांना त्यांतून बाहेर येण्याची मानसिक शक्ती नसते. जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती तशी अडकलेली दिसते तेव्हा आपण काय करावं, याविषयी हा लेख आहे. एकंदरीत इंटरव्हेन्शन या प्रकाराची परिणामकारकता किती याचा एक अभ्यास इथे सापडेल. http://www.biomedcentral.com/1471-2458/10/538 विदा मागताना जीभ दाखवण्याचं कारण कळलं नाही. हा चेष्टेचा विषय नाही. तुम्हाला टाइमपासच करायचा असेल तर त्यासाठी इतर अनेक धागे उघडलेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

हा लेख फक्त दारूविषयी नाही.

कवितानागेश
Sun, 06/03/2012 - 00:01 नवीन
हा लेख फक्त दारूविषयी नाही. कुठचंही व्यसन, वागणूक, विचार यांच्या चक्रात अडकून पडायला होऊ शकतं. त्यात अडकल्यावर स्वतः होऊन त्यांना त्यांतून बाहेर येण्याची मानसिक शक्ती नसते. जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती तशी अडकलेली दिसते तेव्हा आपण काय करावं, याविषयी हा लेख आहे.> हा लेख फक्त दारूविषयी नाही हे नविन कळलं. दारु, सिगरेट शिवाय इतर कुठल्या व्यसनांनी/वागणूकीनी/विचारांनी (?) लिव्हर, फुप्फुस, हृद्य किंवा इतर महत्वाचे अवयव निकामी होतात? स्वतःची कुठलीही शरीरिक, मानसिक, वैचारिक बैठक बदलण्याची इच्छाच मूळात कुणालाही नसते. ज्यांना असते ते आपापला मार्ग बरोबर शोधतात. अस कुणाचाही सल्ला वगरै ऐकत बसत नाहीत. विशेषतः जे त्यांच्या 'बैठकीत' नाहीत अणि उलट अशी 'बैठक मांडणे' हानीकारक आहे असे सांगणार्‍यांचे तर बिल्कुलच नाही. मग तुमचे ते इन्टरव्हेन्शन करणार कसे? म्हणून मी विदा मागितला. आता बघते. तुम्ही नेहमी देता असा काहितरी विदा वगरै. मला वाटले यावेळी विसरलात. म्हणून मला गंमत वाटली तुमच्या विसरभोळेपणाची. आपोआपच जीभ बाहेर निघाली. ( यापुढे तुमच्यासमोर खेचरी मुद्रा करुन वर अडकवून ठेवेन जीभ) एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीत अडकलेली दिसली तर खरोखरच सांगून त्या व्यक्तीला ते पटते का, याबद्दल मला शंका आहे. आता मी तुम्हाला सांगितले, की, 'प्लीज गुर्जी, या सल्ला द्यायच्या चक्रातून बाहेर पडा. आम्हाला तुम्ही परत पुर्वीसारखे हवे आहात. आम्हाला तुमची गरज आही.... ब्ला ब्ला ब्ला ब्ला....'. तुम्ही ऐकाल का? तुम्हाला पटेल का? इथे वैयक्तिक रोख नाही. कुणालाही कुणाचीही कुठलीही गोष्ट चुकीची वाटू शकते याचे एक साधेसे उदाहरण आहे. हा पुर्वीप्रमाणेच अत्यंत गंभीर प्रतिसाद आहे. अवांतरः मी इतर धाग्यांपैकी फक्त प्रॉन्स बिर्याणीतल्या गुलकंदावर चेष्टा करु शकतेय. बाकी टाईमपास सारखे मला काही दिसले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा