Skip to main content

इंटरव्हेन्शन

लेखक राजेश घासकडवी यांनी शनिवार, 02/06/2012 08:33 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच लोक दारू पितात. दारू पिण्यात काहीच गैर नाही. मित्रांबरोबर दोनचार पेग घेतले, थोडी दंगामस्ती केली, अधूनमधून जरा जास्त देखील घेतली. आपणही कधी कधी असं करतो. प्रत्येकाचीच एक मर्यादा असते. बहुतांश वेळी बहुतेक लोक त्या रेषेच्या आत रहातात. कधी कधी एखादवेळी ती ओलांडलीही जाते. असं चालतंच. 'काहीतरी यडपटासारखं बरळेल. मग थोड्या वेळाने उलटी काढेल. उद्या दुखेल प्रचंड डोकं. पण नंतर येईल ताळ्यावर.' हे आपल्याला आपल्या अनेक मित्रांविषयी माहीत असतं. पण एखाद्या कोणाचीतरी कथा थोडी वेगळी व्हायला लागते. मित्रांबरोबरच नव्हे, तर सदासर्वकाळ दारू पिणं सुरू होतं. मैफिलीसाठी दारू न होता दारूसाठी मैफिली होतात. आणि नाहीत मैफिली तर नाहीत, पण दारू हवी. दारू हीच मैफील होते. मग तो त्या व्यसनाच्या गर्तेत बुडून जातो. सोन्यासारखं आयुष्य त्या खोल खोल गर्तेत बुडवून टाकतो. आपण त्याला अधूनमधून 'जरा बेताने बरं का' असा सल्ला दिलेला असतो. त्यावर 'अरे काही नाही रे. आपला कंट्रोल आहे.' असं जड जिभेने ऐकलेलंही असतं. आपल्याप्रमाणेच इतर मित्रही अधूनमधून सांगतात. पण सुधारणा होत नाही. आणि अचानक तो एकेकाळी धट्टाकट्टा दिसणारा, रोडावलेला दिसतो. आपण त्याला पुन्हा सांगून बघतो. पण नंतर संबंध तुटतो. आणि काही वर्षांनी अचानक तो दारूपायी गेल्याची बातमी येते. साला काय फास्ट बॉलिंग करायचा... डोळ्यात चमक होती त्याच्या, मी दोन वर्षांपूर्वी पाहिलं तेव्हा सगळी रया गेली होती... मी सांगण्याचा प्रयत्न केला, पण आपण किती करणार? नुसती हळहळ शिल्लक राहाते. दारूचं व्यसन ही फक्त एक प्रकारची गर्ता आहे. इतरही खोल खोल विहिरी, दऱ्या आहेत, ज्यात माणूस हळूहळू खेचला जातो. दलदलीत पाय रुतल्यावर शरीर सावकाश आत आत शिरत जावं तसा. कधी ही दलदल खूप उबदार असते. आत शिरण्याचा मोह आवरत नाही. बाहेरच्या कोरड्या शुष्क जगापेक्षा हीच ओल मनाला भावते. आत जाताना आधी पायांना, मग गुढग्यांना, त्यानंतर कंबरेला अतीव सुखदायक वाटतं. बाहेर पडायची इच्छाच होत नाही. कुठेतरी यात काहीतरी धोका आहे असं वाटत असलं तरी मन सांगत राहातं 'अजून थोडा वेळ. मला हवं तेव्हा मला बाहेर येता येईलच...' हीच खरी धोकादायक परिस्थिती असते. आतमध्ये कुठेतरी घण् घण् घण् धोक्याची घंटा वाजत असते. पण तिच्याकडे लक्ष देण्यापलिकडे कान बधीर झालेले असतात. अशा व्यक्तीकडून 'मला काही प्रॉब्लेम नाही' हे विधान अतिशय ठामपणे येताना दिसतं. अशा गर्तेत बुडताना कधीकधी बाहेरून एखादा प्रचंड धक्का बसतो. आणि मग आत जाण्याचा वेग वाढतो. नोकरी जाणं, प्रेमभंग, प्रिय व्यक्तीचं निधन... अशी कुठचीही गोष्ट परिस्थितीवरचा ताबा घालवायला कारणीभूत ठरू शकते. बुडत्याचा काडीचाही आधार जातो. आणि गटांगळ्या सुरू होतात. बाहेर डोकं काढून हपापल्यासारखा श्वास घ्यायचा... मदतीसाठी हाक मारायची. कधी हे होतं, तर काही वेळा तेही होत नाही. प्रवाहाला शरण जाऊन भोवऱ्यात जाणं होतं. आणि आपण किनाऱ्यावर बसून बघत राहातो. पण अशा वेळी नक्की करायचं तरी काय? 'मी माझ्या मित्राला माझ्या परीने सांगून पाहिलं. उपयोग झाला नाही. याच्यापलिकडे मी काय करणार?' असं म्हणता येतं खरं. पण मी अजून काहीतरी करायला हवं होतं ही मनाला चुकचुक लागून राहाते. इंटरव्हेन्शन हा त्यावरचा एक उपाय आहे. जेव्हा एखाद्या रोग्याला त्याचा रोग इतका वेढून टाकतो की आपल्याला मदत हवी आहे याचीही जाणीव नाहीशी होते तेव्हा ती मदत पुरवण्याची जबाबदारी इतरांवर येते. आपल्या समोर कोणी गाडीखाली येऊन बेशुद्ध पडला असेल तर त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी आपली. 'त्याच्या इच्छेवर अवलंबून राहून तो स्वतःला हवे तेव्हा हवे तसे उपचार करून घेईल', असा विचार करण्याची चैन परवडण्यासारखी नसते. वाहातं रक्त डोळ्यासमोर दिसत नसेल, हात-पाय मोडलेले दिसत नसतील तर प्रत्यक्ष उचलून हॉस्पिटलमध्ये टाकायची गरज तितक्या तीव्रतेने जाणवत नाही. पण मानसिक विकार किंवा व्यसन किंवा दुःख तितक्या पराकोटीला पोचतच नाही असं नाही. जेव्हा ते तसं झालेलं दिसतं तेव्हा तितक्याच तीव्रतेने आपल्याला त्यात सामील व्हावं लागतं. तितकीच जबाबदारी आपल्यावर येऊन पडते. 'तुला मदतीची गरज आहे. आणि ती तू घ्यावीस यासाठी आम्ही पडेल ते करू' असं अनेक मित्र, सुहृद, आप्तेष्ट यांनी एकत्र येऊन सांगणं हा एक मार्ग असतो. यालाच इंटरव्हेन्शन असं म्हणतात. एखादा मित्र जेव्हा कळकळीने सांगतो तेव्हा त्याचा थोडा परिणाम होतो, नाही असं नाही. पण तो कदाचित पुरेसा नसतो. त्याऐवजी जर त्याचे जमतील तितके मित्र, नातेवाईक, त्याच्यावर प्रेम करणारे आणि त्याचं ज्यांच्यावर प्रेम आहे असे सगळेजण एकत्र येऊन त्यांनी ठामपणे सांगितलं तर त्याचा परिणाम त्या व्यक्तीचं जीवन बदलण्यास कारणीभूत ठरू शकतो. मरण टाळण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. विकीपिडियावर http://en.wikipedia.org/wiki/Intervention_%28counseling%29 इंटरव्हेन्शनची व्याख्या अशी दिली आहे An intervention is an orchestrated attempt by one or many, people – usually family and friends – to get someone to seek professional help with an addiction or some kind of traumatic event or crisis, or other serious problem. The term intervention is most often used when the traumatic event involves addiction to drugs or other items. हे घडण्यासाठी त्या व्यक्तीला आडून आडून, गोड शब्दांत सल्ला देण्यापलिकडे जाऊन स्पष्ट, काहीशा कठोर शब्दांतच 'तुला मदतीची गरज आहे असं आम्हा सगळ्यांना वाटतं. ती तू घेण्यासाठी आम्ही पडेल ते करू. ती घेण्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ती घेताना जे अडथळे येतील त्यात आम्ही तुला मदत करू. पण तू ज्या मार्गावरून चालला आहेस त्यात तुझं भलं नाही.' असं सांगण्याची गरज असते. दलदलीत फसत जाणाऱ्याला, त्याच्या मनाविरुद्ध का होईना, दोऱ्या बांधून, सगळ्यांनी मिळून खेचून बाहेर काढण्याचा हा प्रयत्न असतो. या प्रयत्नांत अर्थातच दोरी गळ्याला लागून फास बसणार नाही याची काळजी घ्यायची असतेच - पण दोरी कंबरेला काचून जखमा होतील त्याची काळजी करायची नसते. सर्वसाधारणपणे लेख लिहिताना मी बराच जास्त अभ्यास करतो. पण हा लेख अपुऱ्या माहितीवर लिहितो आहे. तो चांगला झाला आहे की वाईट झाला आहे याची मला पर्वा नाही. हा लेख लिहिण्यामागे मला माझ्या मनातली कळकळ पोचवायची आहे. तुम्हाला तुमच्या आसपास कोणी जर दिसत असेल, ज्यांना मदतीची गरज आहे तर जरूर धावा. तुमचं मन शुद्ध असेल की या माणसाला मी, आम्ही, सगळ्यांनी मदत करण्याची गरज आहे तर कोणाच्या भावनांची कदर करण्याच्या भानगडीत पडू नका. तात्काळ कृती करा. पण एकटे जाऊ नका. शक्य तितके सुहृद, मित्र, आप्तेष्ट, हितचिंतक गोळा करा. आणि सगळ्यांनी मिळून एकदिलाने त्या दलदलीत खचणाऱ्याला त्याच्या मनाविरुद्ध का होईना, बाहेर काढा. नंतर नुसती हळहळ शिल्लक ठेवायची की आत्ताच प्रयत्न करायचा हे आपणच ठरवायचं असतं.

वाचने 26822
प्रतिक्रिया 94

प्रतिक्रिया

>>>>> हा लेख लिहिण्यामागे मला माझ्या मनातली कळकळ पोचवायची आहे. कळकळ जवळ जवळ पोहचली आहे. >>>>>>>तुम्हाला तुमच्या आसपास कोणी जर दिसत असेल, मला माझ्या आजूबाजूला असं कोणीही दिसत नाही. विनाकारण कोणाच्या आयुष्यात कोणत्याही अधिकारिक विदांशिवाय कोणत्याही किरकोळ गोष्टीवरुन एखादा व्यक्ती मला व्यसनी- आजारी वाटते अशा गोष्टींमधे कोणी कितीही जवळचा असला तरी कोणी मत विचारल्याशिवाय आणि मी एखाद्याच्या आयुष्यात माझ्या सल्ल्याने खरंच काही बदल होऊ शकतो अशी खात्री वाटली तर मी एखाद्याला सल्ला देईन, नसता कोणाच्या आयुष्यात मला दखल देणे गरजेचे वाटत नाही. तसंही कोणाच्याही सल्ल्याला काहीच किंमत नसते असं माझं मत आहे. जालावरील अशी प्रबोधन किती प्रामाणिक असतात त्यावर विश्वास नसल्यामुळे (आपल्याबद्दल नाही) अशा मताला-विचारांना काहीच किंमत नसते. '' स्वतःची कुठलीही शारीरिक, मानसिक , वैचारिक बैठक बदलण्याची इच्छाच मूळात कुणालाही नसते. ज्यांना असते ते आपापला मार्ग बरोबर शोधतात. अस कुणाचाही सल्ला वगरै ऐकत बसत नाहीत. लीमाउजेट च्या वरील दोन ओळीतून बरंच काही सांगितल्या गेलं आहे. दारु या व्यसनाच्या निमित्तानं लेखनातला पूर्वार्ध एकदम उत्तम होता पण पुढे तो घसरल्यासारखा वाटतो. आता हे असं का वाटतं हे मला कोणी कितीही खोदून खोदून विचारलं तरी ते मला कोणालाही सांगायचं नाही. मेरी मर्जी. बाकी, चालू द्या. -दिलीप बिरुटे

लेखातील आदर्शवादी विचार आणि उदात्त हेतू मनाला पटतो पण प्रत्यक्षात कितपत अमलात आणता येईल ह्या बद्दल साशंकता आहे. माणसे दोन प्रकारात जर विभागली, १) त्रयस्थाच्या दृष्टीकोनातून विचार करू शकणारी आणि २) स्वतःच्याच विचारात वाहून जाणारी तर पहिल्या प्रकारातील माणसे शक्यतो व्यसनाच्या आहारी जात नाहीत पण काही तात्कालिक कारणाने (जसे कोणा प्रिय व्यक्तिचा मृत्यू, व्यावसायिक अपयश तसेच अपरंपार यश, इप्सित ध्येयप्राप्ती इ.इ.) जरी व्यसनाकडे झुकली तरी त्यांचे योग्य ते समुपदेशन करून त्यांना पुन्हा मार्गावर आणता येते. पण दुसर्‍या प्रकारातील व्यक्ती स्वतःच्याच विचारांमध्ये वाहून जायच्या प्रवृत्तीच्या असल्याने दूसर्‍यांच्या विचारांना त्यांच्या जीवनात काही महत्त्व नसते. त्या आपल्या कृतीचे सोयिस्कर असे समर्थन शोधून स्वतःच्या व्यसनाला गोंजारत बसतात. अशी माणसे कोणाच्या सल्ल्याने (अगदी डॉक्टरच्याही) बदलत नाहीत तर व्यसनातून उद्भवणार्‍या शारीरिक क्लेषांना झाकण्यासाठी पुन्हा व्यसानाचाच आधार घेतात. ते स्वतःला जगापासून वेगळे करतात. त्यांची सुटका फक्त मृत्यूच करू शकतो. अशी माणसेही व्यसनमुक्त होऊ शकतात. पण फार फार विरळा. त्यांची स्वतःची योग्य विचार करण्याची यंत्रणा सुरू झाली (चमत्कार), आपलं चुकतंय हे जाणवलं आणि चुक सुधारण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली तर आणि तरच अशी माणसे व्यसनमुक्त होऊ शकतात. पण पुन्हा, तीही स्वतःच्या विचारांनी. कोणाच्या सल्ल्याने नाही. स्वभावावर औषध नाही असे म्हणतात.'चिंता' आणि 'संशयाचे भूत' ह्या दोन मानसिक व्याधीही कुटुंबाचा सत्यानाश करू शकतात. ह्यासाठीही त्यांची स्वतःची योग्य विचार करण्याची यंत्रणा सुरू झाली (चमत्कार), आपलं चुकतंय हे जाणवलं आणि चुक सुधारण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली तर आणि तरच ती बदलू शकतात. मानसोपचार तज्ज्ञ कदाचित मदत करू शकत असतीलही. पण त्यासाठी मानसोपचार तज्ज्ञाची भेट घेणं, औषधोपचार करून घेणं ह्यासाठी मानसिक तयारी त्या 'रुग्णा'लाच करावी लागते. त्यासाठी आपण 'रुग्ण' आहोत हे स्विकारावे लागते. तेच स्विकारले नाही तर बाहेरचे सल्ले फोल ठरतात उलट 'मला वेडा समजतात' ह्या विचारांनी माणूस अजून कोषात जाऊन इतरांशी त्याचा संवाद संपर्क तुटतो. मनाला महासागराची उपमा दिली आहे. त्याच्या तळाशी काय चाललेलं असतं ते कधी कधी त्या व्यक्तिलाही कळत नाही. महासागरात मोती असतात तसेच अक्राळ विक्राळ जलचर प्राणीही असतात. त्याप्रमाणेच मनांत दडलेले स्वभाव सौंदर्याचे नमुने असतात तसेच अनेक जीवघेण्या व्याधीही असतात. कधी उपाय करता येतात तर कधी कधी त्या व्याधी त्या व्यक्तीला संपवून टाकतात. इतरांच्या हाती त्या व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न करणं एवढंच असतं. तो प्रयत्न आपण नेहमीच करत असतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

फारच छान..अगदी मनातलं बोल्लात...पण शेवटी एकच म्हणावसं वाटतय...उम्मेद पे दुनिया कायम है..शेवटी व्यसन कुठलंही( काही अपवाद वगळतां) वाईटच...पण कोणाला त्यातुन बाहेर काढण्याची हौस सोडु नये... - वाट्या

चिंता पोचली. स्पष्ट लिहिल्याबद्दल कौतुक वाटलं.

दारू पिणे आणि त्याचे व्यसन असणे ह्यातही दोन प्रकार आहेत मान्य की दारू नियमितपणे पोटभरून पिणे हे शरीराला अपायकारक आहे. पण समाजातील प्रतिष्टीत मंडळी अगदी सिनेजगतातील अनेक मान्यवर अनेक वर्ष दारूची साथ लाभून सुद्धा आपल्या सामाजिक आर्थिक व व आरोग्याची स्थिती संभाळून समाजात वावरत असतात. तर एखद्या गरीब गरीब घरातील मनुष्य परिस्थितीला हार जाऊन दारूला शरण जातो. त्याचा मात्र दारू निकाल लावते. दारू आपण कोणत्या उद्देशाने आणि कशी पीत आहोत ह्यावर सुद्धा बरेच काही अवलंबून असते. उदा सिने सृष्टीतील कुत्ते कमीने असे पडद्यावर म्हणणारा ७० वर्षीय तरणाबांड म्हातारा आजही मदिरा नित्यनियमाने भरपेट पितो. मात्र कसरत व आहार व जीवनाकडे व दारूकडे पाहण्याचा निकोप दृष्टीकोन त्याला अजूनही ह्या वयात गब्रू जवान ठेवतात. आपला आहार व शारीरिक व्यायाम असेल तर दारू शरीराला सोसते. नियमित पिणाऱ्या लोकांचे सामाजिक , सार्वजनिक जीवन पाहून माझे हे मत बनले आहे. पण दारू कडे आयुष्याकडे पळवाट किंवा निराशावादी जीवनाला दारूची साथ लाभली की दारू ही गरज बनते. माणूस दारू पितो इथपर्यंत ठीक आहे पण दारूने माणसाला प्यायला सुरवात केली की आयुष्य खडतर बनते. चाळ नावाची वाचाळ वस्ती मध्ये चंदू पारखी ची दारू सोडवण्यासाठी सर्व चाळकरी माणसे त्यांच्या आयुष्यात इंटरव्हेन्शन करतात. आणि त्याची दारू सुटते. भारतीय समाज हा जास्त एकसंघ व कुटुंब प्रधान व समाजाला विशेतः आपल्या कम्युनिटी मधील लोक काय विचार करतील ह्याचा विचार करून आपले सामाजिक वर्तन ठरवतो. उदा मुलाने शिक्षण कोणते घ्यावे असे अनेक निर्णय तो आपल्या कम्युनिटी चा ट्रेंड पाहून ठरवतो. तेव्हा दारू पिण्याच्या समस्येवर गुर्जीचा उपाय निदान भारतात तरी चांगाच कारगीर ठरेल सोनाराने कान टोचलेले चांगले असतात भारतात काय नि मिपावर सोनारांना तोटा नाही. वानगीदाखल यक्कू ला पहा त्याच्या गुप्तकाशी च्या धाग्यावर त्याचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कितीतरी सोनारांनी कान टोचले आहेत.

व्यसनांच्या आहारी गेलेल्यांसाठी उपाय - विश्रांतवाडी पुणे येथे 'मुक्तांगण' व्यसनमुक्ती केंद्र आहे. तिथे आपलेपणाने सिगरेट, दारू, ड्रग्ज ते इंटरनेट अशा सर्व प्रकारच्या व्यसनांवर उपचार केला जातो. पण या संपूर्ण प्रोसेस मध्ये रूग्णाची व्यसन सोडायची इच्छाशक्ती खूप महत्वाची असते........अधिक माहितीसाठी मोदक यांना व्यनी करा.

काहिंना दारु न पिण्याचही व्यसन असतं की काय?

गुर्जी, कळकळ पोहोचली. फायदा किती होईल हे माहित नाही. पण लेख लिहीला नसतास तर फायदा होण्याची शक्यताही शून्याच्या जवळ जाते.

"यकुला वेळीच मदत मिळाली असती तर..." असा विचार आजचा संपूर्ण दिवस खाणार. एक आयुष्य अकाली संपलं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे खरं आहे. पण आपण बरेचजण एकमेकांना जालावरच ओळखत असतो म्हणून सहसा पोहोचण्याचा प्रयत्न केला जात नाही. शी! काहीतरी विचित्र वाटतय. जे शक्य होतं पण झालं नाही हा विचार फार त्रासदायक आहे.

In reply to by रेवती

ओळखत नसतो, आपला तेवढा अधिकार नाही असं आपण मानतो, हे काही खोटं आहे असं नाही. अशा परिस्थितीत आपण आपल्याच अखत्यारित अधिकारांचं उल्लंघन करावं का? शारीरिक व्याधी असणार्‍यांकडे आपण सहानुभूतीने पहातो, मानसिक व्याधी असणार्‍यांना अशीच वागणूक देत नाही. मानसोपचार आणि ते घेणार्‍यांकडे बघण्याची आपली दृष्टी मधुमेहाबद्दल आहे, तशी होणार का? यकु गेला. आपण त्याबद्दल आता काहीही करू शकत नाही. निदान पुढच्या वेळेस तरी ...

In reply to by रेवती

ओळखत नसतो, आपला तेवढा अधिकार नाही असं आपण मानतो, हे काही खोटं आहे असं नाही. अशा परिस्थितीत आपण आपल्याच अखत्यारित अधिकारांचं उल्लंघन करावं का? शारीरिक व्याधी असणार्‍यांकडे आपण सहानुभूतीने पहातो, मानसिक व्याधी असणार्‍यांना अशीच वागणूक देत नाही. मानसोपचार आणि ते घेणार्‍यांकडे बघण्याची आपली दृष्टी मधुमेहाबद्दल आहे, तशी होणार का? यकु गेला. आपण त्याबद्दल आता काहीही करू शकत नाही. निदान पुढच्या वेळेस तरी ...

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

झोप उडाली. सगळी रात्र जागावे लागणार ह्या विचाराने आता. त्या आत्मशुन्याशी संपर्क झाला का. त्याचीही अशीच भिती वाटते आता.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी समहत.. हाच विचार सारखा डोक्यात येतोय.. ही बोच घेऊनच सगळ्यांनाच पुढे जावं लागणार आहे :(

पूर्वीची चर्चा येथे पूर्ण दिसत नाही. त्यामुळे संदर्भहीन ठरणारे असे धागे अभिव्यक्ती स्वातंत्र्य फाट्यावर मारून मागे टाकले जावेत. ते वर येणार नाहीत अशी व्यवस्था करावी, ही विनंती.

In reply to by श्रावण मोडक

हा धागा वर काढण्याची विनंती अदितीकडून झाली होती. धागा पूर्ववत, म्हणजेच पूर्ण दिसणारा करण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतोय. सदयांनी एकमेकाला नावे न ठेवण्याचे ठरवले तर असे धागे चालून जावेत. निदान गेलेल्या माणसाच्या बाबतीत तरी हे ठरवण्यास हरकत नसावी.

वेळ निघुन गेल्यानंतर दु:ख व्यक्त करत बसण्यापेक्षा आवश्यक तिथे असे इंटर्व्हेन्शनचे प्रयत्न नक्कीच फलदायी असतात. गुर्जी झिंदाबाद. अर्धवटराव

लेखातील विचार आज मनापासून पटले. आणि त्यावेळी ह्या लेखामागील कळकळ मला समजली नव्हती हे देखील येथे नमूद करतो. खूप वाईट आणि विचित्र वाटत आहे.

आणि हा लेख वाचता वाचता यकुंसंबंधीचेच विचार डोक्यात घोळत होते. मनोरुग्णांशी (ह्यात अनेक प्रकार येतात) अगदी निकटचा कौटुंबिक संबंध. यांची मानसिक तडफड अत्यंत जवळून पाहिलेली. द्विमनस्कत्व,निराशागर्तापतन,समाजभीती अथवा तिटकारा. अनेक रूपे. या निमित्ताने मानसिक व्याधी,उपचार,आसरा,ते देणार्‍या संस्था/व्यक्ती यांची माहिती. पण इथे माहिती आणि ज्ञान फारसे उपयोगाचे नाही हे लगेच लक्षात आले. हवी असते प्रदर्शन न करता दिलेली सहानुभूती,कमालीचा धीर(पेशन्स्),प्रेमळपणा आणि समजूतदारपणा. रुग्णाला सांभाळताना संबंधितांच्या, विशेषतः आईच्या माणूसपणाची कसोटी लागते. कुटुंबियांकडून योग्य इंटरवेन्शन हे अतिशय हवेहवेसे असते. मात्र फक्त सल्ले आणि उपदेश अगदी नकोनकोसे असतात.पीडिताशी मैत्री करणे (नुसते चॉकलेट्स किंवा भेटवस्तू देणे नव्हे),त्याचा विश्वास कमावणे,त्याची गार्‍हाणी शांतपणे ऐकून घेणे पण प्रसंगी त्याच्या चुकीच्या वागण्याला ठामपणे विरोध करणे, आठवड्यातले एक दोन तास त्याच्या सोबत घालवणे,(या मुळे रुग्णाच्या आईवडिलांना थोडा मोकळा वेळ मिळू शकतो)मंदबुद्धी असेल तर हस्तकला, चिकणमातीतून आकार घडवण्यासारखे छंद शिकवणे अशा गोष्टी करता येण्याजोग्या असतात.मुख्य म्हणजे जग वाईट आहे,ते आपल्यावर जाणूनबुजून अन्याय करतेय,ही भावना काढून टाकून मनाला सकारात्मक दिशा देणे महत्त्वाचे. असो. यकुंच्या जाण्याने,ते अनपेक्षित नव्हते तरी,अतिशय दु:ख झाले. सोन्यासारखा जीव हकनाक(असे म्हणता येईल का?त्यांच्या दृष्टीने काहीतरी कारण असणारच.)गेला. त्यांना श्रद्धांजली.

तुम्ही तुमच्याकडून पुरेशे प्रयत्न केले.. आभार. यश-अपयश दैवाधीन असते.. पण तरीही यकु वाचायला हवा होता. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नाला सलाम !

हा लेख प्रसिद्ध झाला तेव्हापासून कैकवेळा वाचलाय. या तंत्राचा वापर एकेकाळच्या जवळच्या, पण गेल्या काही वर्षात दूर गेलेल्या एका मित्रासाठी करता येईल असे पटले होते. पण तशी ठोस पावले योग्य वेळी उचलली गेली नाहीत, आणि आता लेखात म्हटले आहे तशी फक्त हळहळ उरली आहे. तुमच्या ओळखीत कुणासाठी हे तंत्र वापरायला हवे असे तुमच्या मनात वाटून गेले असेल तर कृपया उशीर करू नका. योग्य वेळी मदत पोचवा , हे कळकळीने सांगण्यासाठी हा प्रतिसाद.