ऐन वसंतात ....
ऐन वसंतात बाई का गं उदास कोकिळा
नवी पालवी देहाला अन मनाचा पाचोळा ||धृ ||
भरल्या अंगी भिनला ओल्या व्यथेचा गारवा
कोर्या मनात घुमला तुझ्या प्रीतिचा पारवा
झुले काळीज अंगणी आठवांचा गं हिंदोळा ||१||
मेंधीच्या गं पानामधी जीव गुंतला गुंतला
नवतीचा रंग गोरा कसा खुलला खुलला
हळदीच्या उन्हामंधी सोनचाफा झाला खुळा ||२||
मन कावरं बावरं , मन केवड्याच रान
किती सावरू आवरू आज सुटले हे भान
किती जपून ठेवलं तरी लागल्या गं झळा ||३||
नाही संपला अजुनी सये तुझा वनवास
तुझी भेगाळली धरा तरी अंबराचा ध्यास
उभा पेटला वणवा सारा करपला मळा ||४||
सनईचा सूर का गं असा बेसूर लागला
वेदनेचा हा सोहळा चारचौघात गाजला
किती दाबला हुंदका येती आतूनच कळा ||५ ||
ऐन वसंतात बाई का गं उदास कोकिळा
नवी पालवी देहाला अन मनाचा पाचोळा ||
- मनिषा नाईक (माऊ )
वाचने
1401
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
चांगला प्रयत्न.. पु ले शु.
केवळ क्लास !
चांगली आहे कविता!
मस्त, आवडली कवीता...
माऊ
वा ! फारचं छान