मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ऐन वसंतात ....

मनिषा_माऊ · · जे न देखे रवी...
ऐन वसंतात बाई का गं उदास कोकिळा नवी पालवी देहाला अन मनाचा पाचोळा ||धृ || भरल्या अंगी भिनला ओल्या व्यथेचा गारवा कोर्या मनात घुमला तुझ्या प्रीतिचा पारवा झुले काळीज अंगणी आठवांचा गं हिंदोळा ||१|| मेंधीच्या गं पानामधी जीव गुंतला गुंतला नवतीचा रंग गोरा कसा खुलला खुलला हळदीच्या उन्हामंधी सोनचाफा झाला खुळा ||२|| मन कावरं बावरं , मन केवड्याच रान किती सावरू आवरू आज सुटले हे भान किती जपून ठेवलं तरी लागल्या गं झळा ||३|| नाही संपला अजुनी सये तुझा वनवास तुझी भेगाळली धरा तरी अंबराचा ध्यास उभा पेटला वणवा सारा करपला मळा ||४|| सनईचा सूर का गं असा बेसूर लागला वेदनेचा हा सोहळा चारचौघात गाजला किती दाबला हुंदका येती आतूनच कळा ||५ || ऐन वसंतात बाई का गं उदास कोकिळा नवी पालवी देहाला अन मनाचा पाचोळा || - मनिषा नाईक (माऊ )

वाचने 1401 वाचनखूण प्रतिक्रिया 6

चौकटराजा 28/05/2012 - 17:21
आपली ही कविता वाचून तृप्त झालो. सलग प्रवाही व अर्थपूर्ण कसे लिहावे याचा उच्चतम नमूना ! आपल्या या कविते वरून माझे आवडते गवई पं. कुमार गंधर्व यांची एक बंदिश आठवली ही बहार रागात आहे. ऐसो कैसो आयो रिता रे अंबुवा पे मोर ( मोहर) ना आयो करे ना गुंजार ए भवरारे पीर बजो कोयलकी रंग ना खिलो ....... "नवी पालवी देहाला अन मनाचा पाचोळा" हा तर कहर आहे . म्ह्णणजे या " सार्‍यांच्या गर्दीत मी एकटा एकटा " अशा सारखा विरोधाभास ! आणखी कविता लिहाच !

रघु सावंत 04/06/2012 - 00:03
नाही संपला अजुनी सये तुझा वनवास तुझी भेगाळली धरा तरी अंबराचा ध्यास उभा पेटला वणवा सारा करपला मळा ||४|| सनईचा सूर का गं असा बेसूर लागला वेदनेचा हा सोहळा चारचौघात गाजला किती दाबला हुंदका येती आतूनच कळा ||५ || माऊ मस्त जमलीय की कविता रघू