✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझं गाव-हरिहरेश्वर.-२

अ
अत्रुप्त आत्मा यांनी
Wed, 05/23/2012 - 16:55  ·  लेख
लेख
भाग-१ http://www.misalpav.com/node/21739# दुपार झाली की आमचा मोर्चा वाडिकडे वळायचा.... मग आधि सुरु व्हायचं ते देऊळ बांधणं.हा आमचा दर चारेक दिवसांनंतरचा कार्यक्रम होता. (कारण शेजारचा दुसरा मोठ्ठा कंपू येऊन देऊळ उध्वस्त करायचा,मग आंम्ही त्यांच्या बांधलेल्या किल्ल्यांना भूसुरुंग लाऊन यायचो ;-) ) ही आमची देऊळ करायची परमनंट जागा आंम्ही खास गवंडीकाम केल्यासारख्या विटा वगैरे पाडून भिंती बांधायचो,चार बाजुनी भिंती बांधुन झाल्या की मग वहिच्या पुठ्याचं मातिच्या पल्पमधे लडबडवुन वाळवलेलं चौकोनी छप्पर,नंतर त्याच पल्पमधे लडबडवलेली नारळाची शेंडीच्या भागाकडची करवंटी कळस म्हणुन लावायची..आणी तयार व्हायचं देऊळ,मग त्यात आत एखादा गणपतिचा लहानसा फोटू लावायचा आणी रात्री उजेडासाठी भुतलपांड्या केशराच्या छोट्या डबिची पणती...ही पणती संध्याकाळी लाऊन आल्यावर रात्री जर का कुणी तिथुन गेलं,तर लांबुनच त्या छोट्याश्या देवळाच्या भिंतिंच्या होलातुन आणी छताच्या पुठ्याच्या फटितून येणारा पणतिचा प्रकाश लांबुन असा दिसायचा,की भुतभूत भुताटकी म्हणत तो पळून यावा! तोपर्यंत मामा वाडिला शिपण लावायला यायचा,मग आजुबाजुच्या नारळपोफळीच्या आळ्यांमधे त्याचं पाणी साठायला लागलं,की आंम्ही त्यात सुपारिच्या विरि पासुन ही अशी होडी करुन वहात सोडायचो. मग एकामेकाच्या होड्यांमधे दगड टाकुन आरमार बुडवण्याचं युद्ध चालायचं,त्यात आळंबिळं तुटलं की मामा ''थांबा हो तुमच्या अता..'' म्हणुन काठी घेऊन मागे लागायचा.त्याला चुकवुन परत शेजारच्या वाडित जायचो.मग तिथे पहिली होडि कुणी बुडवली? यावरुन थोरल्या भावंडांची कमिटि बसून बरेचदा माझा व माझा तसल्या कारवायंमधला तेंव्हाचा राइट हँड,मामेभाऊ-धन्या असं दोघांच्या शिक्षेचं फर्मान निघायचं.मग थोरली भावंड आमच्या कपाळावर पिचकि ची फळं फोडायची...शिक्षा म्हणुन! हे आतलं मऊ फळं...ते कपाळावर फोडलं की त्यातला चिकट गर पचकन सगळिकडे तोंडावर उडायचा मग ४ वाजत आले की घरी जाऊन चहा बट्रर/टोश्टं खाऊन पुन्हा वाडित यायचो कधि पत्ते खेळले जायचे,तर कधी मागच्या शेतातल्या वडावर सूरपारंब्या..हो पण अजुन एक दोन मज्जा दाखवायच्या र्‍हातील... वाडितल्या मातित हे शंकूच्या आकाराचे छोटेसे खळगे पडलेले असायचे त्यात काडी गोल गोल फिरवत ''मोरा मोरा मुंबैची वाट दाखव ना..!'' असा मंत्र म्हटला की त्यातुन एक ढेकणा सारखा बारिक किटक बाहेर यायचा,पकडायला जाईपर्यंत परत मातित गाडुन घ्यायचा... त्याला मोर का म्हणायचे मला आजही माहित नाही,काडीनी गोल गोल फिरवत वन्स-मोर दिल्यावर बाहेर येतो...म्हणुन असेल कदाचित..! ---''मोरा मोरा मुंबैची वाट दाखव ना..!'' बाहेर आलेला वन्स-मोर... ;-) मग मी कधी कधी मूड आला तर त्याच माझ्या राइटहँडला,धन्याला घेऊन वाडित पानाचं दुकान लावायचो, पुना बनारस आणी कलकत्ता असे तिनही ब्रँड अ‍ॅव्हलेबल असायचे. त्या पानातले जिन्नस म्हणुन- भिंतिला फासायच्या चुनखडीतला चुना/मातिच्या पल्पचा कात/लाकडाच्या भुग्याची सुपारी/आणी पानपाचोळ्याच्या चुर्‍याचा तंबाखू..अशी अजोड तयारी असायची. पूना सादा हे कलकत्ता.. आणी हे बनारस.. हे दुकान अवरता अवरता...म्हणजे मावशीच्या कश्टमची-नरवेलाची लय बेक्कार लागणारी शिमटी घेऊन दुकानावर धाड पडली की मुद्देमाल तस्साच सोडून,आंम्ही समुद्रावर धूम ठोकायचो... हरेश्वरला आमच्या घरामागेच समुद्र आहे... चला जाऊ तिकडे--- मग तिथे तर काय...आहाहा...पाण्यात पार संध्याकाळ होईपर्यंत अशी काही चंगळ चालायची की त्याला जगातल्या कुठल्याही पार्क-केलेल्या-वॉटरची सर येणार नाही..त्यातच वाळुचे किल्ले,बीच क्रिकेट हे ओल्या कपड्यांनीच चालायचं...वाळलं,,,की पुन्हा पाण्यात! हरेश्वरचा समुद्र किनारा... हा समोर मोरेश्वराचा डोंगर केवड्याचं बन आणी अता या दोन पूर्ण नॅचरल स्मायल्या---ओळखा पाहू...? समुद्रावरनं कपडे वाळवुन गपचुप घरी यायचो...(वाटेत कुणाच्यातरी व्हिरी वर ते धुतलेले असायचे,पण दुसर्‍या दिवशी अंघोळीच्या वेळी केसात अडकलेली समिंदराची वाळू -घाण- करायची. किंवा प्यांटिच्या खिशात अडकलेली कपडे धुताना कळायची..आणी ते मावशिला कळ्ळं की पुन्हा बुकलले जायचो..) घरी आलो की मग झोपाळ्यावरची सवारी सुरु व्हायची... -झोपाळा हा कोकणच्या घरांचा आत्मा आहे.आजही एखाद्या माणसानी कोकणात,भलंमोठ्ठं घर बांधुन ते अख्खं एसी केलं.तरी जर त्याच्या घरात ओटिवर झोपाळा नसेल तर तो माणुस कोकण संस्कृतीच्या हिशोबी ''बाद खात्यात'' लागेल. अश्या घराच्या वास्तुशांतीला गावातली लोकं आली तर ती घरमालकाला,काय ह्हो... झोपाळा नाय बांधलात---एवढं घर बांधून..!? असं जागेवर प्रेझेंट देतील.नंतर मागुन गावभर,''हा बंss..असांss कांssय तोंss...!झोपाळाच नाय केलान, येवढं घर बांदुन!'' असा त्याच्या नावानी गुलाल उधळत फिरतील ते वेगळच. ''झोपाळा''.. याच झोपाळ्यावर मी.. सुट्टीत आलेल्या माझ्या मावस/मामे भावंडांबरोबर मराठी/हिंदितली यच्चयावत गाणी म्हणत जवळ जवळ सुट्टितली प्रत्येक संध्याकाळ घालवलेली आहे. साधारण संध्याकाळी ६नंतर ,बाहेरून गाव उंडारुन आल्यावर-''हातपाय धुवुन,जरा देवापुढे बसा रे...रामरक्षा म्हणत(नस्ता व्याप तो सुट्टितला) '' असं झालं ,की कशिबशी ती रामरक्षा म्हणुन सगळेजणं ह्या झोपाळ्यावर झाशिची राणी जशी घोड्यावर बसली तसे आरुढ व्हायचो..आणी झोपाळा अख्खा फ्रंट-बॅक लोड झालेला असायचा. मग आम्ची पायानी झोके काढत गाणी सुरु व्हायची. प्रांत कोकण असल्यामुळे सुरवात नेहमी नाट्यसंगितानी व्हायची,''रम्य ही स्वर्गाहुनी लंकाss'' नंतर पुढच्या गाण्याला, ''शंकर डमरुडम बोलेss...आss आss'' असा मधेच कोरस लागायचा आणी नंतर लगेच गाडी,'' माझे माहेर पंढरी''वर यायची..त्यातच अचानक कुणितरी''पर्बतों से आज मै टकराss गया--हे झोपाळा वर जाताना--आणी खाली येऊन परत वर मागे जाई पर्यंत मागुन कोरस--''तुमने दी आवाज लो मै आss गयाss...'' हे गाणं म्हणायचा.पण का कोण जाणे या गाण्याचं एकही कडवं त्यावेळी कधिही कुणालाही अठवायच नाही... मग विसरल्या सारखं झालं कि लगेच ''शूर आम्ही-सरदाssर आंम्हाला काय कुणाची भीssती'' हे चालु व्हायचं... तो पर्यंत ''एss,बास झाले तुमचे झोपाळे, जे(य*)वाला चला रेss'' अशी मामाची करडी हाक यायची. (*या हकेतलं वैशिष्ठ्य म्हण्जे जेवाला हा उच्चारी शब्द.! संपूर्ण रायगड जिल्ह्याला य हे अक्षर बर्‍याचश्या ठिकाणी सायलंट आहे...म्हणजे-कराला,मराला, असं तिकडे सगळ चालत... ) मग आंम्ही दिवसभर कारवाया करुन दमलेले वीर, समोर आलेल्या जेवणावर अडवा हात मारुन,बाकिच्यांची जेवणं होइपर्यंत,कुणी अंगणातल्या बाजेवर,कुणी झोपाळ्यावर ,कुणी तसेच जमिनीवर,असे अंथरुणं लागेपर्यंत धाराशाई व्हायचो...मग मामा/आई/मावशी असे आंम्हाला तिथुन ओढत...''उट..उट..उट..चल हातरुणावर..'' ''बापरे काय मख्ख गोळा झालाय या पल्ल्याचा..!'' असे उद्गार काढत अंथरुणावर आणुन टाकायचे.... आणी रात्रीच्या सरत्या वेळेत मी आई आणी मावशीच्या मधे,गावातल्या उलाढालीं विषयी चाललेल्या दबक्या अवाजातल्या गप्पा ऐकत ऐकत कधी गाढ झोपायचो ते मला कळायचंही नाही... ही आईच्या कुशितली गप्पांच्या नादात मिळणारी झोपेची गोळी दुसरिकडे कुठ्ठेही मिळणार नाही... यावेळी हरेश्वरला माझ्या जवळ ही गोळी नव्हती,पण आठवणींच्या गोळिने ते माझं काम बरचसं सुकर केलं,असं मात्र मला खात्रिने म्हणता येइल...

Book traversal links for माझं गाव-हरिहरेश्वर.-२

  • ‹ माझं गाव-हरिहरेश्वर.-१
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
संस्कृती
समाज
जीवनमान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
आस्वाद
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
21413 वाचन

💬 प्रतिसाद (56)

प्रतिक्रिया

आवडेश ,आवडेश अगदी त्रिवार

पियुशा
Wed, 05/23/2012 - 17:07 नवीन
आवडेश ,आवडेश अगदी त्रिवार आवडेश मस्त सफर घडवुन आणली तुमच्या गावाची :)
  • Log in or register to post comments

मस्त मस्त मस्त!!.. लयी भारी

मृगनयनी
Sat, 05/26/2012 - 21:34 नवीन
मस्त मस्त मस्त!!.. लयी भारी फोटो!!!!..... झोपाळा मस्त आहे... आणि दिलेल्या माहितीमुळे आमच्या ज्ञानात अधिक भर पडली!!! :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

पहिला भाग सुंदर होताच पण हा

प्रचेतस
Wed, 05/23/2012 - 17:29 नवीन
पहिला भाग सुंदर होताच पण हा भाग अप्रतिम झालाय. लहानपणच्या रम्य आठवणींची सफर एकदम मस्त घडवलीत. लेखाचा समारोप एकदम भावुक करणारा.
  • Log in or register to post comments

सुपर लाईक हो भटजी!

प्यारे१
Wed, 05/23/2012 - 17:31 नवीन
सुपर लाईक हो भटजी!
  • Log in or register to post comments

अत्रुप्त आत्मा साहेब , निव्वळ लाजवाब, अप्रतिम, सुंदर, मस्त...

निश
Wed, 05/23/2012 - 17:45 नवीन
अत्रुप्त आत्मा साहेब , निव्वळ लाजवाब, अप्रतिम, सुंदर, मस्त, वा, छान, सुरेख, झकास, भन्नाट, लय भारी, फक्कड, एकदम सही.... अहो कौतुकाचे शब्ब्द पण अपुरे आहेत कौतुक करायला एवढा चांगला लेख झाला आहे.
  • Log in or register to post comments

डोळ्यासमोर जसंच्या तसं चित्र

मोहनराव
Wed, 05/23/2012 - 17:49 नवीन
डोळ्यासमोर जसंच्या तसं चित्र उभे केलंत तुमच्या बालपणीचे! लाजवाब!!
  • Log in or register to post comments

लय भारी भटजीबुवा.. आता एकदा

पिंगू
Wed, 05/23/2012 - 18:06 नवीन
लय भारी भटजीबुवा.. आता एकदा तरी हरिहरेश्वरला जायलाच पाहिजे. - (कधीही हरिहरेश्वरला न गेलेला) पिंगू
  • Log in or register to post comments

\m/

वपाडाव
Wed, 05/23/2012 - 18:13 नवीन
१. उभ्या सळयांच्या खिडक्या, २. बैठकीतील बांधलेली बंगइ (झोपाळा), ३. शहाबादी फरशा, ४. माळवदाचं छत, ५. चौकट असलेले दोन पटांचे दार, ६. एवढं मोठ्ठं अंगण हे सगळं पाहुन ऊर लै भरुन आला... अन त्यावर तुमचं मुक्तपणे बागडणं... अन सोबत आम्हालाही उडवणं... भटजीबुवा, यु इज रियल्ली रॉक्स !!!
  • Log in or register to post comments

व्वा भटजीबुवा लै भारी. यु इज

भीमाईचा पिपळ्या.
Wed, 05/23/2012 - 18:23 नवीन
व्वा भटजीबुवा लै भारी. :)
यु इज रियल्ली रॉक्स !!!
हे खूप म्हणजे खूपच आवडले. किती सोस इंग्लीसचा. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

लय भारी भटजीबुवा.. आता एकदा तरी हरिहरेश्वरला जायलाच पाहिजे.

राजघराणं
Wed, 05/23/2012 - 18:15 नवीन
लय भारी भटजीबुवा.. आता एकदा तरी हरिहरेश्वरला जायलाच पाहिजे. .. मुक्काम तुमच्याकडेच
  • Log in or register to post comments

वा भटजी!

पैसा
Wed, 05/23/2012 - 19:08 नवीन
हरिहरेश्वरची आणि तुमच्या बालपणाची मस्त सफर घडवलीत. त्यामुळे मला पण लहानपणचे बरेच उपद्व्याप आठवले. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

+१

मोदक
गुरुवार, 05/24/2012 - 02:10 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तुमचं लेखन आणि फोटू बघून तिथे

रेवती
Wed, 05/23/2012 - 20:05 नवीन
तुमचं लेखन आणि फोटू बघून तिथे जाऊन आल्यासारखं वाटलं. आम्हीही दर उन्हाळी सुट्टीत कोकणात काकांकडे जायचो. तुम्ही देऊळ बांधायचात तसं आम्ही घर बांधायचो. काकांनी तिथल्या वाचनालयाला बरीच देणगी दिल्याने आम्हाला ते प्रत्येकी ५ पुस्तके नेऊ देत असत. रोज सायकली भाड्याने घेऊन चालवणे, लाल मातीत व समुद्रावर खेळणे, आंबे उतरवायला माणसे आली की त्यांचे काम पहाणे, देवळात गारव्याला गप्पा मारत बसणे यात दिवस संपायचा. सुट्टीतले वापरलेले कपडे पुन्हा घेऊन जाण्याची गरज पडत नसे इतके मळायचे, लाल व्हायचे. जायचे दिवस जवळ आले की आंब्याच्या पेट्या बांधल्या जायच्या. आजकाल बॉक्सेस असतात पण त्यावेळी लाकडी पट्ट्यांना खोळे ठोकून बनवलेल्या. धान्य पाखडायची सुपे, आमसुले, रातांब्याच्या सरबताचं घरगुती कॉन्सन्ट्रेट, आवळ्याचं लोणचं, आंबापोळी, फणसपोळी अशा वस्तूंनी भरलेल्या सुटकेसा घेऊन घरी यायचो त्यामुळे आठवणी खूप दिवस पुरत असत.
  • Log in or register to post comments

गुर्जि ..खरच सुंदर आहे

जेनी...
Wed, 05/23/2012 - 21:03 नवीन
गुर्जि ..खरच सुंदर आहे गाव. मामाच्या गावाला जाऊया . हे गान आठवल... छान छान :)
  • Log in or register to post comments

झकास...

स्वच्छंदी_मनोज
Wed, 05/23/2012 - 21:17 नवीन
व्वा.... खम्प्लीट नॉस्टॅल्जीक केलेत राव... एवढच म्हणतो...
  • Log in or register to post comments

छान आहे आजोळ तुमचं, फोटो

सूड
Wed, 05/23/2012 - 21:40 नवीन
छान आहे आजोळ तुमचं, फोटो मस्तच !! वर्णन वाचून नॉस्टॅल्जिक झालो, अर्थात आमचं आजोळ तुमच्यासारखं कोकणातलं नसलं तरी आजोळच्या आठवणी हळवं करुन जातात. झालेले लाड, केलेला दंगा सगळंच. सुट्टी मग ती कसलीही असो दिवाळीची की उन्हाळ्याची चार दिवस तरी माझा मुक्काम आजोळी असे. आमच्या घरी लहानपणी काही खाताना असं खावं तसं खाऊ नये असा प्रकार नसायचा. पोळीभाजी एका हाताने खायची सवय लावली ती आजीने. लहानपणी मला जेवताना डाव्या हातावर जोर देवून तो जमिनीवर टेकून बसायची सवय होती. किती केलं तरी मी काही माझी सवय सोडायला तयार नव्हतो, मग आजीने काय सांगावं ? म्हणे, 'अरे असं जमिनीवर हात टेकून बसलास की जे खाशील ते सगळं जमिनीत जातं, पोटात जात नाही' त्या क्षणी जो जेवताना नीट बसायला लागलो तो आजपर्यंत. आता आजीचं हे उत्तर आठवलं की हसू येतं. लहानपणी कडक शिस्तीचे वाटणारे आजोबा नंतर आठवडाभरात फोन केला केला नाही की 'पोरांनो फोन करत चला रे, काळजी वाटते' असं म्हणायचे तेव्हा कसंसं व्हायचं. म्हणजे ते दम देणारे आजोबा कुठे गेले हा प्रश्न पडायचा. असो...बरंच काही मनात आलं. एवढ्यावरच थांबतो. :)
  • Log in or register to post comments

मस्त मस्त मस्त

मी-सौरभ
Wed, 05/23/2012 - 22:43 नवीन
हरिहरेश्वरला मी बर्‍याच वेळा गेलोय पण आता जाईन तेव्हा ही नविन ओळख सोबत असेल :) (कोकणात असचं टुमदार आजोळ असलेला)
  • Log in or register to post comments

फारच सुंदर लिखाण, खूप धन्यवाद :)

इष्टुर फाकडा
गुरुवार, 05/24/2012 - 00:20 नवीन
तुमच्या आत्मिक अशांततेमुळे तुमचा नॉस्टॅल्जिया इतका सुंदर उतरलाय कि गोनीदांच्या 'पडघवली' ची जोर्रात आठवण झाली. आता पुन्हा वाचणे आले.
  • Log in or register to post comments

@तुमच्या आत्मिक अशांततेमुळे

अत्रुप्त आत्मा
Sat, 05/26/2012 - 23:17 नवीन
@तुमच्या आत्मिक अशांततेमुळे >>> फारच मन-कवडेबुवा-तुंम्ही ;-) आंम्ही जाम खुष तुमच्या या संशोधनावर Image removed.
  • Log in or register to post comments

बालपणीचा काळ सुखाचा.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 05/24/2012 - 03:47 नवीन
लहानपणी खुप खुप मोठ्ठ व्हावसं वाटतं तर मोठ्ठे झाल्यावर लहानपणच्या आठवणी 'त्या' रम्य काळात ओढून नेतात. आता तुमचे हे दोन्ही लेख वाचल्यावर मन भूतकाळातून वर्तमानात यायला तयारच नाही. फार हटवादी आहे ते. पण सुख दिलेत तुम्ही. शेवटच्या दोन वाक्यांनी बाकी मन हेलावून गेले.
  • Log in or register to post comments

व्वा व्वा बुवा व्वा काय बोलू ......

लीलाधर
गुरुवार, 05/24/2012 - 08:01 नवीन
मस्त मज्जा केलीस राव :) पार अगदी आपल्या मामाच्या घरी घेऊन गेलास हो. आता मनाला हुरहुर लागली बघ पार कधी एकदा मामाकडे जातोय असं झालय रे.......... ''बापरे काय मख्ख गोळा झालाय या पल्ल्याचा..!'' हा हा हा हे वाक्य वाचून ह. ह. पु वाट लागली बघ रे :) बाकी पुढल्या खेपेस मलाही आगाउ सांग म्हणजे आणखी मज्जा येईल मामाकडे गेल्यावर. निव्वळ अप्रतिम सुंदर सुरेख लय भारी बघ...
  • Log in or register to post comments

काय लिहु? काय वाचु काय बघु?

स्पंदना
गुरुवार, 05/24/2012 - 08:04 नवीन
काय लिहु? काय वाचु काय बघु? अस झाल नुसत . भिंगरी फिरल्यागत आठवणी फिरव्ल्या तुम्ही अतृप्त! वर वपा म्हंटल्या सारख( हा एव्हढ चाम्गल कस काय लिहुन गेला भाउ? खोडाळ कुठल! मे बी तुमच्या लिखाणाचा परिणाम असावा) उर भरुन आल. नशिबवान आहात अतृप्त. ती मंदिर, पानाची दुकान, त्या खोड्या अन तो मार. ती गाणी तर कानात भिनली बघा!
  • Log in or register to post comments

चांगलं लिहिलं आहे. खूप छान

Pearl
गुरुवार, 05/24/2012 - 08:22 नवीन
चांगलं लिहिलं आहे. खूप छान झालेत दोन्ही भाग. आवडले. आणि फोटोमुळे आमची पण सफर झाली हरिहरेश्वरची. खरचं नशीबवान आहात.
  • Log in or register to post comments

ज ळ व णे, बाकी काही नाही,

५० फक्त
गुरुवार, 05/24/2012 - 08:44 नवीन
ज ळ व णे, बाकी काही नाही, भेटा आता, आणि भटो भटो को़कणात गेला होता, हे फोटो आणि रिपोर्ट सोडुन अजुन काय घेउन आला आहात, खोब-याच्या वड्या वगैरे, कधी देणार आहात.
  • Log in or register to post comments

झोपाळ्यावर बसुन झोका खाण्याची

मदनबाण
गुरुवार, 05/24/2012 - 08:48 नवीन
झोपाळ्यावर बसुन झोका खाण्याची मजा काही औरच असते :) मस्त लेखन... :)
  • Log in or register to post comments

हुच्च आणी हुच्च....

नाखु
गुरुवार, 05/24/2012 - 08:57 नवीन
लिखाण आणि स्मरण रंजन... माणुस वर्तमान काळ हा भुत काळातल्या रम्य आठवणींच्या शिदोरीवर जगतो. गुरु तुम्ही भग्य्वान हीच शिदोरी नव्याने चाखत आहात (आणि आम्हाल वाटत आहात) दंडवत देवा..
  • Log in or register to post comments

गुरूजी

अमृत
गुरुवार, 05/24/2012 - 09:19 नवीन
एक्दम झाक... मस्त वाटलं वाचून आणि फोटो पण झकास्स्स्स्स.. काल एकपण दिसत न्हवता पण आज समदे येवस्थीत दिसत्यात... अमृत
  • Log in or register to post comments

सुरेख!!

सुप्रिया
गुरुवार, 05/24/2012 - 10:47 नवीन
सुरेख!!
  • Log in or register to post comments

खुपच छान लेख!!मला माझ्या

Maharani
गुरुवार, 05/24/2012 - 12:37 नवीन
खुपच छान लेख!!मला माझ्या बालपणीचे दिवस आठवले!!!!
  • Log in or register to post comments

वा!!!

चावटमेला
गुरुवार, 05/24/2012 - 14:07 नवीन
वा!! मजा आली. आपल्या ह्रदयात दोन नाजूक कोपरे कायमचे घर करून राहतात, एक म्हणजे आपले मूळ गाव जिथे आपण लहानाचे मोठे होतो, शिकतो आणि दुसरे म्हणजे आपले आजोळ जिथे आपण कायमच लहान राहतो. ह्यातला एकही कोपरा थोडा हलवून पाहिला ना तर नकळत स्मित करणारे ओठ आणि तितक्याच नकळतपणे हलकेच पाणावणारे डोळे ह्या दोन्ही अनुभूती एकत्रच मिळतात..
  • Log in or register to post comments

वा छानच लिहीले आहे. तुम्ही

जागु
गुरुवार, 05/24/2012 - 14:18 नवीन
वा छानच लिहीले आहे. तुम्ही ज्याला पिचकीची फळे म्हणता त्याला आम्ही डवचाणे म्हणतो. आमचाही पुर्वी तोच खेळ असायचा. स्माईली एक खेकड्याची आहे एक माखलीची असावी.
  • Log in or register to post comments

@स्माईली एक खेकड्याची आहे एक

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/24/2012 - 14:26 नवीन
@स्माईली एक खेकड्याची आहे एक माखलीची असावी.>>> येस येस.. करेक्ट :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु

मूळ धाग्यात गर्दी झाली

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/24/2012 - 14:21 नवीन
मूळ धाग्यात गर्दी झाली असती,म्हणुन काहि इतर फोटो इथे देतो आहे. :-) पडवी मागचा शंकर आणी नंदी Image removed. वळचणीच्याच चणीची माऊ... हाय का नाय वाघाची मावशिबाय ;-) Image removed. अता गाई गेल्या पण मामाच्या गोठ्यात म्हैशी हायेतच.. Image removed. फोटू घेतोय म्हटल्यावर तिनीच परत ''पोज'' दिलिन ;-) Image removed. अता ही व्हिर..मे मुळे तळाला गेलीये... पण भर पावसात यात ,धबाधब उड्या मारायला काय मज्जा यायची.. Image removed. हे त्या पत्ते खेळायचो त्या विठोबाच्या देवळातले --विठ्ठल रखुमाई... या उभयतांवर माझ्या आईची अशी निस्सिम श्रद्धा होती की तिचं ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झाल्यावर तीला पहिले ६ महिने बाकि काहिच बोलता यायचं नाही..पण हॉस्पिटल मधे डॉक्टरला ''रखुमाईsss'' अशी हाक मात्र ती बरोब्बर मारायची Image removed. हे गावातलं जुनं (अता नविन झालेलं) गणपति मंदिर... Image removed. आणी ह्यो आतला बाप्पा.. Image removed. आणी हे त्याच्याच जवळ बांधलेला ''हरिहरेश्वर कला-प्रसारक मंडळाचा''... म्हणजेच गावतल्या ''नाटकं'' करणार्‍या ;-) कंपूचा हा स्टेज :-) .. अता गावातलं ''नाटक'' (हनुमान जयंतीला होणारं) हाच एक स्वतंत्र नाटकाचा विषय असल्यानी इथे तो भय कारक विस्तार करत नाही... ;-) Image removed. आणी हा त्या स्टेजच्या बरोब्बर समोरचा बीच कडे जाणारा रस्ता... ह्याचा फायदा म्हणजे,कित्तीही माणसं आली,तरी बसायला जागा फुल्ल.. ;-) Image removed.
  • Log in or register to post comments

अप्रतिम !!! कोकण आणि आजोळ

धुमकेतू
गुरुवार, 05/24/2012 - 15:09 नवीन
अप्रतिम !!! कोकण आणि आजोळ ह्या दोन्ही गोष्टी मनाला हळव्या करून जातात ! धन्यवाद अतृप्त आत्मा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मस्त! गावातल्या नाटकांबद्दल

मेघवेडा
गुरुवार, 05/24/2012 - 16:50 नवीन
मस्त! गावातल्या नाटकांबद्दल लिहाच आता. :)
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर!

समीरसूर
गुरुवार, 05/24/2012 - 17:34 नवीन
दोन्ही भाग अत्यंत सुंदर आणि खरोखर 'प्रेक्षणीय' झाले आहेत. लिखाण इतकं छान आहे की स्वतः मीच हे सगळं करतोय की काय असा भास व्हावा. वाचून खूप मजा आली. हा भाग तर खूपच जमून आलाय. अजून येऊ द्या... --समीर
  • Log in or register to post comments

लेख आणि सग्गळे फोटू क्लास्स !

यकु
गुरुवार, 05/24/2012 - 17:35 नवीन
लेख आणि सग्गळे फोटू क्लास्स !
  • Log in or register to post comments

मस्त मस्त!

पिवळा डांबिस
गुरुवार, 05/24/2012 - 22:20 नवीन
का कुणास ठाऊक पण ही लेखमाला नजरेतून सुटली होती.... आज दोनही भाग वाचले, सुरेख आहेत.... विशेषतः या भागातील पहिला आणि तुमच्या प्रतिसादातील शेवटला फोटो! एकदम आमच्या आजोळाची आठवण आली!!! जियो!!!
  • Log in or register to post comments

हम्म , आ आ सुटलेयत भन्नाट

चौकटराजा
Fri, 05/25/2012 - 12:20 नवीन
अ आ, एकच शब्द- लाजवाब ! तुम्ही ते मोरा चे घर (?) दाखवले ना ! खरंच बालपणात घेऊन गेलात. मी हरिहरेश्वर व रामेश्वर इथे समुद्रात मांडी घालून स्नान केले आहे. यासाठी व खडकातील गुहांच्या कोरीव लेण्यासाठी आपले गाव लक्षात कायमच राहील. आता परत गेलो तर रहायचा खर्च वाचला आमचा ! आ चौ रा.
  • Log in or register to post comments

निखालस निरागस आणि अतीव सुंदर.

मृत्युन्जय
Fri, 05/25/2012 - 13:52 नवीन
निखालस निरागस आणि अतीव सुंदर. झक्कास.
  • Log in or register to post comments

छान

JAGOMOHANPYARE
Sat, 05/26/2012 - 15:28 नवीन
छान
  • Log in or register to post comments

म्हणवता अत्रुप्त पण केलेत

बॅटमॅन
Sat, 05/26/2012 - 23:44 नवीन
म्हणवता अत्रुप्त पण केलेत आत्यंतिक त्रुप्त :) ढेकर दिला वाचून एक समाधानाचा :)
  • Log in or register to post comments

सुंदर लेख आणि फोटोसुद्धा!

भरत कुलकर्णी
Sun, 05/27/2012 - 22:27 नवीन
सुंदर लेख आणि फोटोसुद्धा!
  • Log in or register to post comments

अप्रतिम - लेख आणि फोटो

राजहंस
Mon, 06/04/2012 - 00:42 नवीन
अप्रतिम लेख आणि फोटो पण कमाल च काढलेत.
  • Log in or register to post comments

आत्मु, संपवू नका हो. अजून

खटपट्या
Wed, 10/29/2014 - 04:58 नवीन
आत्मु, संपवू नका हो. अजून लिवा ना... फोटो टाका
  • Log in or register to post comments

गुरुजी ,

प्रमोद देर्देकर
Sun, 06/18/2017 - 08:26 नवीन
गुरुजी , हा लेख पुन्हा वाचला कारण पुढच्या विकांतला हरिहरेश्वर श्रीवर्धन असा बेत आहे.
  • Log in or register to post comments

गुरुजी ,

प्रमोद देर्देकर
Sun, 06/18/2017 - 08:29 नवीन
गुरुजी , हा लेख पुन्हा वाचला कारण पुढच्या विकांतला हरिहरेश्वर श्रीवर्धन असा बेत आहे. जेवणाची सोय कुठे होईल ते ठिकाण सांगा तसेच तो समुद्राच्या काठाने कुठे तरी रोड जातो ते ठिकाण सांगा.
  • Log in or register to post comments

(No subject)

सतिश गावडे
Sun, 06/18/2017 - 10:27 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

हा तो रस्ता

सतिश गावडे
Sun, 06/18/2017 - 10:37 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

अजून एक फोटो या रस्त्याचा...

सतिश गावडे
Sun, 06/18/2017 - 10:43 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा