अजिंठा
अजिंठा झाडांचा...झाडांच्या झुलत्या प्रवाही पाण्यातला...
लेनापूर फर्दापूरच्या गावंढळ गर्दीतला...
बंजारा वस्तीच्या होळीच्या थाळीवर थिरकत गेलेला...अजिंठा
नितीन चंद्र्कांत देसाई अजिंठ्यावर चित्रपट काढताहेत म्हणजेच काहीतरी भव्यदिव्य असणार असे अजिंठाचे ट्रेलर पाहिल्या पासुन वाटायला लागले होते. त्यामुळे हा चित्रपट पहावा असे मनात होतेच. पारो आणि मे.रॉबर्ट गिल यांची प्रेमकहाणी. ना. धो महानोरांचे अजिंठा हे महाकाव्य आणि डोक्यात बसलेले अजिंठा. या सगळ्या गोष्टींमुळे चित्रपट पाहायची हिंमत आज केली.
चित्रपटाची सुरूवात आम्ही चुकवली त्यामुळे अजिंठ्याचा शोध ब्रिटींशांना कसा लागला वगैरे दाखवले आहे का हे माहीत नाही. सुरवातीलाच एक ब्रिटिश अधिकारी हैद्राबादला, बहुधा निझामासमोर अजिंठ्याच्या लेण्याची महती सांगून रस्ता बांधण्याची परवानगी मागतो. हातोहात एक दुभाष्याही त्याला या कामी दिला जातो. १८२४ ते १८४४ या काळात हे काम पूर्ण होतं आणि या स्थळाचं अनन्यसाधारण महत्व ध्यानी घेऊन ते जतन व्हावं, संवर्धित व्हावं यादृष्टीनं कलेची जाण असलेल्या आणि तरीही मूळ सोजीर असलेल्या मेजर रॉबर्ट गिलची इकडे रवानगी होते. रॉबर्ट इथली लेणी पाहून वेडापिसा होतो. एक संस्कृत-पाली-अर्धमागधी चे जाणकार पंडित आणि निझामाने दिलेला दुभाषा ही चित्रे त्याला अधिक समजाऊन घेण्यासाठी मदत करतात. हे सर्व करताना रॉबर्ट गिलची अजिंठ्याची, इथल्या संस्कृतीशी, त्याद्वारे बुद्धाशी होणारी ओळख आणि या सर्वात त्याची मोलाची साथ देणारी, तसेच प्रेरणास्थान पारो यांची प्रेमकहाणी म्हणजे अजिंठा!
इथं पारोची भूमिका सोनाली कुलकर्णीने केलीय हे सर्वांना ठाऊक आहेच. तिला आदिवासी दाखवताना काळा रंग फासण्याची केलेली कसरत अगदी दिसून येते. तिने अभिनयाचा प्रयत्न बरा केलाय, पण तिच्या मूळ व्यक्तिरेखेतच काहीतरी उणीव असल्याचं जाणवतं. मेजर गिल, फिलीप स्कॉट वॉलेस हा अगदी त्या भूमिकेत फिट वाटतो. आपली भूमिका नीट समजून उमजून केलीय हे चांगलं जाणवतं. दुभाषी झालेल्या मनोज कोल्हटकरने आणि मेजर गिलनेच काय तो मनापासून अभिनय केलाय असं चित्रपटभर वाटत राहतं. आणि हो, आपले अविनाश नारकर राह्यलेच. मेजर गिलला बुद्धाच्या जातक कथा सांगणार्या पंडिताची भूमिका त्यांच्या वाट्याला आलीय. तिथे त्यांनी ओव्हरअॅक्टिंग न करून त्यांचा वावर बर्यापैकी सुसह्य केलाय. यावेळी नारकर बाबांची ही उणीव उभ्या आयुष्यात केसाला फणी न लावलेल्या मकरंद देशपांडेंनी इतकी भरून काढलीय की जणू हा त्यांना मिळालेला पहिलाच रोल की काय असं वाटावं.
आपलं आर्ट डायरेक्शन, सेट, स्टुडिओ यासगळ्याच्या माध्यमातून आपली निर्मिती ही भव्यदिव्यच होईल असं वाटून बहुधा नितीन देसाईंनी दिग्दर्शनाकडे दुर्लक्ष केलंय असं हा चित्रपट पाह्यल्यावर वाटतं. चित्रपटाकडे एकूणच पॅकेज म्हणून पाहताना, त्यातल्या अनेक त्रुटी प्रकर्षाने जाणवतात. मी इथे वानगीदाखल काही देतोय, जाणकार राहिलेला प्रकाश टाकतीलच.
१. चित्रपटाच्या सुरवातीस एक होळीचं गाणं दाखवण्यात येतं. त्यात ते गहू-हरभरा मुबलक प्रमाणात पिकल्याचं सांगतात. शब्द अर्थात महानोरांचेच आहेत. पण १८४५ साली अजिंठ्यातल्या आदिवासी/बंजारा समाजातले लोक गहू पिकवत असतील का असा प्रश्न येतोच येतो.
२. लगोलग मेजर गिलला एक शेतकरी एक मोठ्ठासा कॉलीफ्लॉवरचा गड्डा भेट म्हणून देताना आणि तेव्हा त्यांच्याकडे फ्लॉवरचं पीक यायचं याचा पुरावा म्हणून कॉलीफ्लॉवरचे शेतही दाखवून टाकलंय.
३. गावात लोहार आहेत, पण गावातले आदिवासी मात्र बांबूपासून तयार केलेली शस्त्रे वापरतात.
४. १८४५ साली बोगनवेलीची झाडे भारतात होती का? इथे बघावं त्या फ्रेममध्ये फुलं आहेतच, त्यात जिकडेतिकडे बोगनवेलिया बघून हा प्रश्न आल्यावाचून राहात नाही.
५. मध्येच कुठेतरी एक फुलपाखरू गिलकडून पारोकडे आणि पारोकडून गिलकडे फिरतं. हे अॅनिमेशन अक्षरश: अगदीच हास्यास्पद झालं आहे.
असो. चित्रपट बघताना डोके बाजुला ठेवायचे मान्य. पण कोणी जर आम्ही खुप रिसर्च करुन हा पिक्चर तयार करतोय असे क्लेम करत असेल तर अशा गोष्टी मला खटकतात आणि उरलेल्या पिक्चरची मजा घालवतात. सिनेमा पाहून मनात बरेचसे प्रश्न उद्भवले आणि थोडा गुगल सर्च केला असता रॉबर्ट गिलबद्दल रोचक माहिती मिळाली. त्याचा पणतू की खापरपणतू आयर्लंडमध्ये राहतो आणि २००२ मध्ये तो आपल्या पणजोबांबद्दल माहिती शोधत फिरत होता. त्या बिचार्याने हा चित्रपट पाहावा. अर्थात मी महानोरांचे काव्य वाचलं नाहीय, त्यामुळे मूळ कथा काय, त्यावर महाकाव्यात त्यांनी घेतलेलं काव्यात्मक स्वातंत्र्य किती आणि त्यानंतर नितीन देसाईंनी घेतलेली सिनेमॅटिक लिबर्टी कितपत हे मला माहित नाही, तरीही फारशा अपेक्षा ठेवून चित्रपट पाहायला जाऊ नये. रिसर्च म्हणजे काय केले असा प्रश्न विचारावा वाटतो. कदाचित फ्लॉवर खेडोपाडी पोहचवण्याचा रिसर्च केलेला दिसतो.
असा चित्रपट पाहिला की "मराठी चित्रपटांना बरे दिवस आलेत का?" अशा वागळे छाप चर्चांना मोठ्याने ओरडून नाही म्हणून उत्तर द्यावे वाटते. मराठी चित्रपटांची विषय निवड नक्कीच वेगळी असते पण एक्झीक्युशन मधे आपण कुठे तरी मागे पडतो. आपले चित्रपट बरे असतात पण त्यात अजून सुधारणांना वाव असतो. भव्यदिव्यतेच्या मागे लागून आपण चित्रपटाच्या बेसिक डीटेलिंग कडे दुर्लक्ष केलं जात आहे. गेल्या काही दिवसात पाहिलेल्या, देउळ, बालगंधर्व, शाळा, गोळाबेरीज, या चित्रपटातून हेच जाणवत आहे. चित्रपट म्हणजे छानशा लोकेशनचा लाँग शॉट, किंवा भव्य दिव्य सेट, दागिने यांचा भडिमारा असा तर आपला गैरसमज होत चाललेला नाही ना?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कॉस्मेटिक
मायला ! एवढा बोगस सिनेमा
असा चित्रपट पाहिला की "मराठी
सोनाली कुलकर्णी(ज्यु.) बाईंना
ना.धो.महानोरांच अजिंठा दीर्घ
>>>>>>>>>>>>>>सालं या अजिंठा
अज्याबात
सालं या अजिंठा काव्यसंग्रहावर
सालं या अजिंठा काव्यसंग्रहावर
मस्त हो प्रा डॉ
हम्म्म्म..... बघणार नव्हतोच
एकदम सहमत, नितीन देसाइ एक
अगदी खरं आहे.
+१०००००००००, जैत रे जैत आणि
परिक्षण
सोनाली ज्यु. ह्यांना अशा
ट्रेलर पाहिला आत्ताच
(बहुतांश सर्वच बॉलीवूडी मेन
ह्म्म्म्म...
एकुण
+१
जेव्हा निर्माता-दिग्दर्शक
अगागागागा! जबरी! देसाईंनी
छे!
हो ना!
माझ्या मते अति झालं आणि हसूही
आजूबाजूला