✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सामना ६४ घरांच्या राजेपदाचा!!

च
चतुरंग यांनी
Wed, 05/09/2012 - 03:05  ·  लेख
लेख
येत्या १० तारखेला मॉस्कोच्या त्रेत्याकोव आर्ट गॅलरीमध्ये आनंद विश्वनाथन वि. बोरिस गेलफंड असा सामना सुरु होत आहे. तेव्हा बुद्धीबळप्रेमींनो पुन्हा एकदा जगज्जेतेपदाच्या सामन्याचा सोहळा अनुभवण्याची तयारी करा. आनंद तिसर्‍यांदा विजेतेपद मिळवण्याच्या तयारीत आहे तर बोरिस त्याच्या पहिल्यावहिल्या जेतेपदाच्या इतका जवळ प्रथमच पोचलेला आहे. त्यामुळे बोरिस हा अतिशय उत्साहात आणि कमालीच्या तयारीनिशी स्पर्धेत उतरणार हे नक्की. त्यामानाने आनंदला तिसरे विजेतेपद मिळवणे ही गोष्ट किती चालना देऊ शकेल हा अनेक बुद्धीबळ तज्ञांच्या मते प्रश्न आहे. या सामन्याचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे दोन्ही खेळाडू वयाची चाळीशी पार केलेले आहेत म्हणजे विशीतल्या तरुण खेळाडूंचे पेव बघता 'म्हातारेच' म्हणायला हवेत. ते काहीही असो आपला पाठिंबा तर लाडक्या आनंदलाच आहे हे नक्की! चला, दोन्ही खेळाडूंची ओळख करुन घेऊयात. बोरिस गेलफंड - जन्माने बेलोरशियन आणि नागरिकत्त्वाने इस्रायली असलेला बोरिस असामान्य प्रतिभावान खेळाडू आहे. वयाच्या सतराव्या वर्षी रशियन जेतेपद आणि दोन वर्षांनी जागतिक कनिष्ठ विजेतेपद मिळवणारा बोरिस १९९६ साली कँडिडेट मॅचेसमध्ये उपांत्य सामन्यात अनातोली कार्पोवकडून पराजित झाला. त्यानंतर पुन्हा एकदा २००७ मध्ये व्लादिमीर क्रामनिकने त्याला पराभूत करुन आनंदचा प्रतिस्पर्धी म्हणून नाव निश्चित केले. शेवटी २०११ च्या कँडिडेट्स स्पर्धेत बोरिसने आपल्या अतिशय चिवट खेळाने गाटा काम्स्की आणि अलेक्झांडर ग्रिश्चुकसारख्या तरुण रक्ताच्या खेळाडूंना नमवून बाजी मारली. असा त्याचा २०१२ च्या स्पर्धेपर्यंतचा प्रवास आहे. खेळाच्या भाषेत ज्याला 'नर्व्ज ऑफ स्टील' म्हणतात तशा प्रकारचा कणखरपणा आणि अत्यंत चिवट मनोवृत्ती ही बोरिसची शक्तिस्थाने आहेत. मागल्या आठवड्यातच त्याची एक मुलाखत झाली. त्यावेळी त्याला विचारले "सध्याच्या तरुण खेळाडूंच्या जमान्यात तू किंवा आनंदसारखे जुने खेळाडू टिकून राहण्याचे कारण तुला काय वाटते?" बोरिसने दिलेले उत्तर विचार करायला लावणारे आहे. तो म्हणतो "आम्ही जुन्या पद्धतीने बुद्धीबळ शिकलो. खेळाचा सखोल अभ्यास करण्याचे तंत्र हे स्वतः विचार करुन उत्तरे शोधण्यात आहे. सध्याच्या पिढीतल्या बहुतांश खेळाडूंचे पान संगणकाशिवाय हलत नाही. विशिष्ठ परिस्थितीत संगणक काय चाली करेल हे बघून त्यानुसार डावपेच आखण्याचे धोरण हे त्यांच्या बुद्धीबळाच्या मूलभूत व्यासंगावर परिणाम करते आहे असे मला वाटते. संगणकाचे फायदे जरुर आहेत परंतु त्यांचा वापर हा मर्यादित परिघातच करायला हवा अन्यथा तुम्ही तुमची विचारशक्ती मर्यादित करता." बुद्धीबळाचे डावपेच नुसते माहीत असून उपयोग नाही तर प्रत्यक्ष सामन्याच्या वातावरणात अतिशय तणावाच्या स्थितीत, मनोधैर्य टिकवून चिवटपणाने खेळ करणे हे गरजेचे असते अन्यथा तुम्ही डाव आणि पर्यायाने सामना गमावता. पांढर्‍या मोहोर्‍यानी खेळतांना डी४ ही बोरिसची आवडती खेळी आहे तर काळ्याने खेळताना तो नॅ़जडॉर्फ सिसिलियन, पेट्रॉफ बचाव, स्लाव बचाव आणी राजाचा भारतीय बचाव (किंग्ज इंडीयन डिफेन्स) यावर भर देतो. अत्यंत सशक्त पोझीशनल अवेअरनेस आणि कमितकमी चुका करण्याची प्रवृत्ती ही त्याची वैशिष्ठ्ये आहेत. बोरिस हा वाद निर्माण करणारा खेळाडू नाहीये. पण तो अतिशय नाट्यपूर्ण चेहरे आणि हालचाली करतो. त्याच्या भावना त्याला सहजासहजी लपवता येत नाहीत. वानगीदाखल पहा ही मुद्रा! आनंद त्याच्याबद्दल काय म्हणतो पहा. "बोरिस उच्च दर्जाचा खेळाडू आहे. मी आणि तो १९८९ पासून एकमेकांशी खेळतो आहोत. एकमेकांचा खेळ चांगलाच ओळखून असलो तरी यावेळी बोरिस काही वैशिष्ठ्यपूर्ण तयारीने येणार हे नक्की. बुद्धीबळ रसिकांसाठी एक उत्कंठापूर्ण सामना देण्यात आम्ही दोघेही यशस्वी होऊ अशी आशा आहे." ------------------------------ आनंद विश्वनाथन - २००८ साली व्लादिमीर क्रामनिकला हरवून प्रथम आणि २०१० साली वॅसेलीन टोपालोवला धूळ चारुन द्वितीय जगज्जेतेपद कमावणारा आनंद आता तिसर्‍यांदा स्पर्धेत आहे ही बाबच आनंद देणारी आहे. वयाच्या सहाव्या वर्षी बुद्धीबळातला श्रीगणेशा आपल्या आईकडून गिरवणारा आनंद अत्यंत वेगाने खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. 'ब्लिट्झ किड' म्हणूनच तो ओळखला जायचा. अजूनही जलदगती बुद्धीबळात त्याच्या तोडीला असलेले मोजकेच खेळाडू आहेत. २००३ - २००९ अशी ७ वर्षे तो जलदगती चँपियन होता. अत्यंत वेगवान खेळ्या आणि उच्च दर्जाची टॅक्टिकल समज ही आनंदची शक्तिस्थाने आहेत. घोड्यांचा अतिशय कल्पक वापर हा देखील त्याच्या अनेक डावांचे वैशिष्ठ्य ठरलेला आहे. शांत आणि निगर्वी असलेला आनंद देखील वादात पडत नाही. प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणे त्याची हेटाळणी करणे असले उद्योग तो कधीही करत नाही. संयमी असल्याने फारसा भावनांच्या आहारी जाताना दिसत नाही. चेहेर्‍यावरही चुकीच्या खेळीचा पश्चाताप तो सहजासहजी दिसू देत नाही. जगज्जेतेपदासारख्या सर्वोच्च स्पर्धातून तुमची ही वैशिष्ठ्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाची ठरतात. तो मुलाखतीही अतिशय प्रसन्न चेहेर्‍याने आणि स्पष्ट विचाराने देतो. त्याची उत्तरे सहजासहजी तुमच्या हाती काहीही वादग्रस्त लागू देत नाहीत. बोरिसने केलेले आनंदचे कौतुक "आनंदची स्मरणशक्ती अफाट आहे. अत्यंत वेगाने विचार करुन खेळणे हे त्याचे बलस्थान आहे. आनंदशी खेळणे हे सोपे काम नाही पण मी त्याचे कच्चे दुवे शोधून काढेन आणि त्याचा फायदा उठवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन." ----------------------------- स्पर्धा कशी होणार आहे? १० मे स्पर्धेचे उद्घाटन होईल. ११ व १२ मे डाव १ व २ मग एक विश्रांतीचा दिवस, पुन्हा दोन डाव मग एक विश्रांती अशा प्रकारे २४ मे पर्यंत पहिले १० डाव खेळले जातील. त्यानंतर ११ वा आणि १२ वा डाव हे दोन्ही मधे एकेक दिवस ठेवून खेळले जातील. १२ डावांच्या अखेरीस जर ६-६ गुणांची बरोबरी असेल तर ३० मे रोजी टाय ब्रेकर खेळला जाईल. त्यात २५ मिनिटांचे ४ डाव खेळले जातील प्रत्येक दोन डावांच्या मध्ये १० मिनिटांची विश्रांती असेल. तरीही निर्णय झाला नाही तर ५ मिनिटांचे २ डाव एकूण ५ वेळा (म्हणजे एकूण १० डाव) खेळले जातील, तरीही निर्णय झाला नाही तर 'सडन डेथ' डाव होईल. फिडेच्या संकेतस्थळावर सामन्यासंबंधी सर्व माहिती दिलेली आहे. २८ पानी नियमावली देखील वाचून बघावी. किती गोष्टींचा विचार केला आहे हे बघून मजा वाटते! मॉस्कोच्या स्थानिक वेळेनुसार पहिल्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता उद्घाटन सोहोळा आहे. ११ तारखेला पहिला डाव दुपारी ३ वाजता सुरु होईल. (भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता. चुभूदेघे.) स्पर्धेसाठी नायजेल शॉर्ट, यान टिम्मान, व्लादिमिर क्रामनिक, पीटर स्वीडलर, पीटर लेको असे ग्रँडमास्टर्स कॉमेंटरी करायला हजर असणार आहेत. विजेत्याला १५ लाख डॉलर्स आणि उपविजेत्याला १० लाख डॉलर्स अशा घसघशीत रकमांची बक्षिसे आहेत! पुढील संकेत स्थळांवर सामने थेट प्रक्षेपित केले जातील काही ठिकाणी फक्त पट आणि चाली बघायला मिळतील तर काही ठिकाणी पट आणि प्रत्यक्ष खेळाडू खेळताना बघायला मिळतील. रसिकांनी त्या त्या संकेतस्थळावर जाऊन खात्री करून घ्यावी. अजून इतरही संकेत स्थळे नक्कीच असतील त्यांचाही जालावर शोध घ्यावा. http://www.chessdom.com/news-2011/world-chess-championship-2012 http://www.anand-gelfand.com/ http://moscow2012.fide.com/en/ मला डावांचे विश्लेषण देणे कितपत शक्य होईल माहित नाही परंतु मी थोडेफार लिहिण्याचा जरून प्रयत्न करेन. निदान ज्या डावांचे निकाल लागले आहेत (अनिर्णीत नाहीत) अशांचे तरी विश्लेषण देईन असे म्हणतो. तर अशा रीतीने या महा सोहळ्याला आता दोनच दिवस बाकी आहेत. चला आनंदाला शुभेच्छा देऊयात आणि महासोहळ्याची तयारी करू यात! (आनंदी)चतुरंग सर्व प्रकाशचित्रे आंजावरुन साभार.
  • सामना विश्वविजेतेपदाचा - आनंद वि. बोरिस -भाग २
  • सामना जगज्जेतेपदाचा - आनंद वि. बोरिस - भाग ३
  • सामना जगज्जेतेपदाचा - आनंद वि. बोरिस - भाग ४
  • सामना जगज्जेतेपदाचा - आनंद वि. बोरिस - भाग ५
  • सामना जगज्जेतेपदाचा - आनंद वि. बोरिस - शेवटचा टायब्रेकर - भाग ६

Book traversal links for सामना ६४ घरांच्या राजेपदाचा!!

  • सामना विश्वविजेतेपदाचा - आनंद वि. बोरिस -भाग २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा
लेख
माहिती
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
32271 वाचन

💬 प्रतिसाद (153)

प्रतिक्रिया

आई

रमताराम
Sat, 05/12/2012 - 18:13 नवीन
वापरत असाल तर फ्लॅशचा लोचा असू शकतो. दुसरा ब्राउजर वापरून पहा. वजीरावजीरी झाली आहे. आता मधला पट मोकळा आहे. एनिबडीज गेम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:)

रमताराम
Sat, 05/12/2012 - 18:15 नवीन
करायची असल्याने काळा नेहेमीच एक मूव मागे असतो. आणि ही डावाची खासियत आहे. ते तर झालंच हो. :) 'अजून एक' मूव म्हणायचे होते मला. असो. आता डाव पुढे गेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

डावाच्या सुरुवातीपासून पटावर

चतुरंग
Sat, 05/12/2012 - 17:38 नवीन
डावाच्या सुरुवातीपासून पटावर काही मारामारी होऊन डाव मोकळा झालाय. मटेरिअल समसमान असले तरी बोरिसची मोहरी जास्त विकसित आहेत. हत्तीला सी स्तंभ मोकळा मिळालाय, दोन्ही उंट विकसित आहेत त्यातही पांढरा उंट मुख्य कर्णावर बसलाय. आनंदचा एक हत्ती आणि एक उंट अजूनही मागच्या रांगेत बसून आहेत.
  • Log in or register to post comments

वाचतोय आणि पाहतोय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 05/12/2012 - 17:45 नवीन
आनंदने आता मुसंडी मारायला पाहिजे. अर्थात मला म्हणायला काय लागतं म्हणा. आणि किती वेळ घेतोय हा बोरीस. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

बोरिसला

चतुरंग
Sat, 05/12/2012 - 17:47 नवीन
एका गोष्टीकडे नक्कीच लक्ष द्यायला हवे आहे ते म्हणजे घड्याळ! आतापर्यंतच्या आनंदच्या खेळी एकूण ११ मिनिटात झाल्या आहेत आणि बोरिसने ५५ मिनिटे खर्ची घातलेली आहेत. पहिल्या ४० खेळ्या दोघांनाही प्रत्येकी २ तासात कराव्या लागतात.
  • Log in or register to post comments

हम्म

रमताराम
Sat, 05/12/2012 - 17:57 नवीन
तीन-चार खेळ्या झटपट झाल्या. आता दोघांचे वजीर समोरासमोर आलेत. आनंद विचारात पडलाय. इस्टेट सारखीच असली तरी आनंदचे हत्ती अ‍ॅक्टिव नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

बोरिसला

चतुरंग
Sat, 05/12/2012 - 17:58 नवीन
दोन मुख्य खेळ्या होत्या त्यापैकी प्याद्यंची मारामारी आणि उंटांची मारामरी केली. आता दोघांचे विरुद्ध रंगाचे उंट शिल्लक आहेत ही बाब फारशी चांगली नाही कारण अशा पोझीशनमधे बर्‍याचदा डाव बरोबरीत जाऊ शकतो! :( आता आनंद काय खेळतो ते महत्त्वाचे आहे.
  • Log in or register to post comments

पोझीशन इंटरेस्टिंग आहे. आता

चतुरंग
Sat, 05/12/2012 - 18:07 नवीन
पोझीशन इंटरेस्टिंग आहे. आता बोरिसची थ्रेट उंट सी ५ अशी आहे! वजीर आणि हत्ती पिन करणे!! घोड्याने उंट मारता येत नाही. वजिरा वजिरी केली तरच डाव पुढे जातो. आनंदने उंट एफ ५ मधे आणलाय! बोरिसने वजिरावजिरी केली तर डाव बरोबरीकडे जाणार.
  • Log in or register to post comments

झालीच वजिरावजीरी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 05/12/2012 - 18:11 नवीन
हाही डाव बरोबरीतच जाणार काय ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

वजिरावजिरी झालीच! आता हत्ती

चतुरंग
Sat, 05/12/2012 - 18:14 नवीन
वजिरावजिरी झालीच! आता हत्ती डी१ ही बहुदा पुढची खेळी असेल बोरिसची
  • Log in or register to post comments

बोरिसने त्याचा घोडा डी ४

चतुरंग
Sat, 05/12/2012 - 18:20 नवीन
मध्ये आणला. अनपेक्षित खेळी आहे. बोरिसचा प्लॅन उंटाला हुसकवायचा असावा. आनंद बहुदा उंट जी ६ मधे ठेवून मुख्य कर्ण सोडणार नाही.
  • Log in or register to post comments

+१

रमताराम
Sat, 05/12/2012 - 18:25 नवीन
पुढचा माझा तर्कः २०, उंट एफ-४, घोडा ई-४ (कैच्याकै असावा. कदाचित हत्ती आधी हलतील. पण सध्या हाच असू द्या. ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हत्तीच

रमताराम
Sat, 05/12/2012 - 18:38 नवीन
शेवटी हत्तीच आणला मदतीला. घोड्याला ई-४ ऐवजी डी-४ (पुढे जाऊन हत्तीला बाळबोध पद्धतीने फोर्क मारता येईल. ) ही अधिक चांगली जागा असावी असा आनंदचा होरा दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

डाव

चतुरंग
Sat, 05/12/2012 - 18:25 नवीन
अंतिम टप्प्यात शिरलाय. आनंद आणि बोरिस दोघेही जबरद्स्त एंडगेम खेळाडू आहेत त्यामुळे डाव पुन्हा इंटरेस्टिंग टप्प्यावरती आलाय! उंट कोठे जातो ते बघावे लागेल.
  • Log in or register to post comments

आनंद कधी नव्हे

चतुरंग
Sat, 05/12/2012 - 18:30 नवीन
इतका ताणाखाली वाटतोय. डावाच्या या टप्प्यावरती प्रत्येक खेळी आणि त्याचे डीप वेरिएशन्स महत्त्वाचे ठरतात. बोरिस मागेपुढे हेल्पाटे घालून आनंदची अस्वस्थता वाढवत असावा, बॅटल ऑफ सायकॉलॉजी!!
  • Log in or register to post comments

हम्म

रमताराम
Sat, 05/12/2012 - 18:32 नवीन
बोरिस मागेपुढे हेल्पाटे घालून आनंदची अस्वस्थता वाढवत असावा, बॅटल ऑफ सायकॉलॉजी!! शक्य आहे. किंवा उलट सुद्धा असू शकेल. शारीरिक हालचाल हा मानसिक तणाव दूर करण्याचा प्रयत्नही असू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

त्यांचं मरू दे

रमताराम
Sat, 05/12/2012 - 18:40 नवीन
इथे माझ्या मनावरचा ताण कसा कमी करायचा सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

बोरीस जसा या कोप-यातून त्या

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 05/12/2012 - 18:42 नवीन
बोरीस जसा या कोप-यातून त्या कोपर्‍यात चकरा टाकतोय तसं करा. बाय द वे, आनंदला म्हणावं तो कोपर्‍यातला हत्ती घे आता मैदानात. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

तुमचं ऐकलं बघा

रमताराम
Sat, 05/12/2012 - 18:58 नवीन
आला हत्ती समोर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्या बात है

रमताराम
Sat, 05/12/2012 - 18:41 नवीन
२१ व्या चालीत पांढर्‍या उंटाने काळा घोड्याला जेरबंद केला की.
  • Log in or register to post comments

हो आता अंतिम टप्प्यातली

चतुरंग
Sat, 05/12/2012 - 18:54 नवीन
हो आता अंतिम टप्प्यातली खणाखणी सुरु झाली एच ५ लगेच आर्डी१ बोरिस झटपट खेळतोय! अर्थात बोरिसच्या घड्याळात १८ खेळ्या करायला फक्त अर्धा तास आहे आणि आनंदच्या १ तास!!
  • Log in or register to post comments

कदाचित

रमताराम
Sat, 05/12/2012 - 19:00 नवीन
त्याने बर्‍याच्य शक्यतांचा विचार आधीच करून ठेवला असावा. आनंदच्या खेळीनंतर त्याची खेळी लगेचच येते आहे, जणू त्याला अपेक्षित खेळीच खेळतोय आनंद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

तसाही

पैसा
Sat, 05/12/2012 - 19:03 नवीन
त्याच्याकडे वेळ कमी आहे. आणि आनंद प्यादी पुढे काढत त्याला जास्त विचार करायला भाग पाडतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

हो शक्य आहे.

चतुरंग
Sat, 05/12/2012 - 19:03 नवीन
सामन्याआधीच्या तयारीच्या वेळी कोणती वेरिएशन्स किती खोलवर अभ्यासली गेली आहेत त्यावरही हे ठरते! दोघांनी प्यादी पुढे सरकवून राजे खेळात आणण्याचा चंग बांधलाय. अतिशय इंटरेस्टिंग टप्प्यावर आलाय डाव. निकाली व्हावा असे वाटते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

अखेर

रमताराम
Sat, 05/12/2012 - 19:08 नवीन
आनंदने बोरिसला उंट हटवायला भाग पाडले. आता हत्ती समोरासमोर आहेत. एक्श्चेंजला पर्याय नाही असे दिसते. Draw seems more likely now.
  • Log in or register to post comments

आहा

रमताराम
Sat, 05/12/2012 - 19:12 नवीन
आनंदची अनपेक्षित खेळी. बोरिसला वेळेचे प्रेशर चांगलेच त्रास देणार. फक्त २३ मिनिटे नि १७ खेळ्या अजून बाकी. आनंद थेट खेळी न करता वेळेचे प्रेशर वाढवतोय असे वाटते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

देखेंगे..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 05/12/2012 - 19:09 नवीन
आता हत्ती एकमेकांसमोर आणल्यानंतर जर एकमेकांचे हत्तीच घ्यायचे असतील तर मला नाही वाटत डावाचा निकाल लागेल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

बोरिसने हत्तींच्या टकरीसाठी

चतुरंग
Sat, 05/12/2012 - 19:13 नवीन
बोरिसने हत्तींच्या टकरीसाठी आव्हान दिले. आनंदने राजा एच ७ मध्ये नेला. तुला करायची असेल तर कर मारामारी असा पवित्रा असावा. संभाव्य मारामारीतून राजाला शह येऊ नये ही खबरदारी घेतली.
  • Log in or register to post comments

बोरिसला काही फारशी आशा दिसत

चतुरंग
Sat, 05/12/2012 - 19:18 नवीन
बोरिसला काही फारशी आशा दिसत नसावी पुढे. डावाच्या अंतिम टप्प्यात घोड्याच्या अचूक हालचाली हुडकण्यात आनंद वाकबगार आहे हे बोरिस जाणून असणार! आणि डाव बरोबरीत सुटला!!:(
  • Log in or register to post comments

जिंकणार नसतील तर कै मजा नै.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 05/12/2012 - 19:23 नवीन
>>> डाव बरोबरीत सुटला ! रंगाशेठ, असेच डाव होणार असतील आणि तेही बरोबर सुटणार असतील तर कै मजा नै. कोणीतरी जिंकाव. पुढल्यावेळेस अंतिम टप्प्यातल्याच खेळी बघेन. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

बरोबरी!

रमताराम
Sat, 05/12/2012 - 19:19 नवीन
बरोबरी मान्य करण्यात आली आहे. :( आनंदने का मान्य केले जरा बुचकळ्यात पडलो आहे. सतरा मिनिटात सतरा खेळया करण्याचे आव्हान होते बोरिससमोर.
  • Log in or register to post comments

तसा डावातून

चतुरंग
Sat, 05/12/2012 - 19:29 नवीन
काही निर्णय निघायची शक्यता या टप्प्याला कमी होत जाते. दोन्हीकडे समसमान आणि समोरासमोर प्यादी. दोन दोन हत्ती. कोणाकडेही पाचव्या पट्टीपलीकडे सरकलेली पासपॉन्स नाहीत. अशावेळी कोणी काही चूक करण्याची शक्यता जवळज्वळ नगण्य असते आणि या पातळीच्या खेळात तर नक्कीच नाही. दोघेही बचावात्मक खेळत राहतात कारण हल्ला करण्याजोगे काही नसते. डावात खूप मोहरी शिल्लक असली आणि पोझीशन काँप्लिकेटेड असली तर काही टॅक्टिकल शक्यता उद्भवू शकतात. आनंदने बरोबरी मान्य केली ह्यात नवल नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

ते मान्य हो

रमताराम
Sat, 05/12/2012 - 19:40 नवीन
पण वेळेचे गणित बसवणे जरा अवघड होते ना. की कदाचित पुढच्या खेळी यांत्रिकपणे होऊन आपोआपच बरोबरीची स्थिती निर्माण होईल हे दोघांना उघड दिसले म्हणून आधीच मान्य करून मोकळे झाले असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हो वेळ कमी असला की

चतुरंग
Sat, 05/12/2012 - 20:37 नवीन
राजाच्या/हत्तीच्या पुढे मागे मूव्ज केल्या जातात आणि ४० ची संख्या पूर्ण केली जाते. नंतर विचाराला जास्ती वेळ मिळाला की पुन्हा सामना सुरु होतो. परंतु पोझीशन तशी असायला हवी. आताच्या पोझीशनमध्ये काही राम नव्हता! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

एकूण फारसा रंगतदार झाला नाही

चतुरंग
Sat, 05/12/2012 - 19:23 नवीन
एकूण फारसा रंगतदार झाला नाही हा डाव. मातीच्या कुस्तीत जसे पहिली काही मिनिटे खडाखडी होऊन एकमेकांचा अंदाज घेतला जातो तशा पद्धतीने हे दोन डाव झाले. पुढल्या डावाआधी एक दिवसाची सुट्टी आहे. सोमवारी ताजेतवाने होऊन दोघेही समोरासमोर येतील. तो डाव निकाली होईल याची जाम शक्यता मला वाटते. वार्ताहरपरिषदेसाठी दोघे गेलेत. बघूया काय प्रश्न विचारले जातात.
  • Log in or register to post comments

बोरिस म्हटलाच की

रमताराम
Sat, 05/12/2012 - 19:42 नवीन
ही जरा फ्रेंडली मॅच होती म्हणून. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

नेहमीप्रमाणेच वाचताना मजा

बिपिन कार्यकर्ते
Sat, 05/12/2012 - 20:14 नवीन
नेहमीप्रमाणेच वाचताना मजा आली! मस्तच... आता नियमितपणे याबद्दल लेखन येऊ दे!
  • Log in or register to post comments

नायजेल शॉर्त इतका अडखळत अडखळत

भडकमकर मास्तर
Sun, 05/13/2012 - 04:29 नवीन
नायजेल शॉर्त इतका अडखळत अडखळत बोल्तो की हा लंडनच्या मराठी माध्यमातून इंग्रजी शिकलाय असे वाटावे...
  • Log in or register to post comments

धमाल आली. ! पण मुळ लेखात

जयंत कुलकर्णी
Sun, 05/13/2012 - 06:59 नवीन
धमाल आली. ! पण मुळ लेखात आमच्या आनंदचाही एक चांगला फोटो टाका बुवा.............
  • Log in or register to post comments

आजचा सामना

रमताराम
Mon, 05/14/2012 - 16:52 नवीन
पुन्हा ग्रुनफेल्ड. वेगाने चाली होताहेत. तिसर्‍याच खेळीत पहिला कॅप्चर नि सातव्या खेळीत काळ्याने (बोरिसने) कॅसल्-इन केले. आनंदने लाँग कॅसल मारून हत्ती सक्रिय केला आहे. सामना वेगवान होणार.
  • Log in or register to post comments

अरे हो हो हो! आजचा सामना

चतुरंग
Mon, 05/14/2012 - 17:14 नवीन
अरे हो हो हो! आजचा सामना भलताच वेगाने सुरु झाला. सुरुवातीला मला चुकून दोघे ब्लिट्झ खेळायला लागले की काय असे वाटले! दोघेही वेगाने खेळत आहेत पण बोरिस केवळ पेटलाय! अवघ्या ९ मिनिटात १५ खेळ्या पूर्ण केल्यात. कधी नव्हे ते आनंद वेळाच्या बाबतीत मागे पडलाय. त्याच्या १५ खेळ्यांनी ३५ मिनिटे घेतलीत.
  • Log in or register to post comments

बराच वेळ घेऊन

रमताराम
Mon, 05/14/2012 - 17:26 नवीन
आनंदने (नेहमीप्रमाणे) विश्लेषकांचा तर्क धुडकावून वेगळीच खेळी केली. राजा खोलवर नेला नि घोड्याला मागे येण्याचा मार्ग निर्माण केला. (च्यायचं हे गेलफंड काय आधीच आनंदचं डोक कंट्रोल करतंय की काय. प्रत्येक खेळी काही सेकंदात होते आहे.) मस्त मूव. आनंदला कोंडीत घेतले. पुढे आलेले ई-४ चे प्यादे घेतले तर एक्स्चेंजमधे काळ्याचे दोन्ही हत्ती तर सक्रिय होतीलच वर उंटही थेट राजाकडे नजर रोखून बसेल. मस्त. आनंद बराच वेळ घेतोय.
  • Log in or register to post comments

वर ररांनि म्हटल्याप्रमाणे

चतुरंग
Mon, 05/14/2012 - 17:25 नवीन
वर ररांनि म्हटल्याप्रमाणे आजचा डावही ग्रुन्फेल्डने सुरु झाला. दोघांनी विरुद्ध बाजूला किल्लेकोट करणे ही सर्वसाधारणपणे घनघोर युद्धाची नांदी असते. पहिल्या १५ खेळ्यानंतर आलेली ही एक अतिशय शार्प पोझीशन आहे. काळा आणि पांढरा दोघांनाही भरपूर वाव आहे. पांढर्‍याचा सी३ मधला घोडा, वजीर आणि हत्ती केंद्रातल्या डी५ प्याद्याकरवी केंद्रात मोर्चे बांधणी करुन आहेत. ज्याला जागेचे आणि पोझीशनल अ‍ॅडवांटेज म्हणतात ते आनंदला आहे. त्याच्या बदल्यात त्याचा राजा थोडा असुरक्षित आहे आणि राजाकडच्या उंट, घोडा आणि हत्तीचा विकास थंडावलाय. बोरिसची सर्व मोहरी अ‍ॅक्तीव आहेत. राजा मस्त गुबगुबीत जागा धरुन कोपर्‍यात आहे. काळा उंट मुख्य कर्णात बसलाय. मध्यात दोन्ही घोडी फुर्फुरत डि ५ प्याद्यावर निशाणा साधून आहेत. बोरिस भलताच तयारीने आलेला आहे. आजचा डाव निकाली निघणार बाप्पा!!
  • Log in or register to post comments

ई४ प्याद्याचे एफ३ प्याद्याने

चतुरंग
Mon, 05/14/2012 - 17:45 नवीन
ई४ प्याद्याचे एफ३ प्याद्याने किंवा सी ३ घोड्याने मारणे दोन्ही पांढर्‍यासाठी घातक होते. तेव्हा आनंदने बीडी४ अशी सुरेख खेळी केली आहे. आत्ता पहिल्यांदाच बोरिस इतका विचारात पडालाय. आनंडने त्याच्या मुख्य कर्णातल्या उंटासमोर आपला उंट घेतला. मधे घोडा आहे. सी ६ मधला घोडा ए४ नेला. ऐला! बोरिसने आज हल्लाबोल ठरवलेला आहे हे नक्की.
  • Log in or register to post comments

घोडा जी १ ई२ - आनंदने सी ३

चतुरंग
Mon, 05/14/2012 - 17:48 नवीन
घोडा जी १ ई२ - आनंदने सी ३ मधल्या घोड्यासाठी दुसर्‍या घोड्याची कुमक मागवली. अत्यंत थंड डोक्याने खेळणे हे फार महत्त्वाचे आहे. पोझीशन इतकी स्फोटक आहे की एक चुकीची खेळी आणि डाव बघता बघता कोलम्डू शकतो कुठल्याही बाजूला! जिस पल का इंतजार था वो घडी शायद आ रही है!! (भावना आवरायला रंगाला हिंदीचा आधार घ्यावा लागला! ;) )
  • Log in or register to post comments

ह्म्म

रमताराम
Mon, 05/14/2012 - 17:52 नवीन
दुर्दैवाने आनंदचा राजाचा उंट घोड्याने अडवल्याने नि हत्ती पारच दूर पडल्याने कुमक कमी पडणार त्याला. पण पोजिशनल अ‍ॅडवांटेजची स्थिती तयार करून तो यावर मात करतो का पहायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

बोरिसने सी-३ च्या घोड्यावर

रमताराम
Mon, 05/14/2012 - 17:50 नवीन
बोरिसने सी-३ च्या घोड्यावर हल्ला करण्याने आनंदला राजाकडील घोडा बाहेर आणण्याची संधी मिळाली आहे. सारे लक्ष आता सी-४ च्या घोड्यावर नि ई-४ च्या प्याद्यावर. बोरिस हत्तीचा पाठिंबा आणून या प्याद्याच्या मदतीने आनंदच्या वजीराला शह देऊ शकतो. खाल्ले तरी पंचाईत, सोडले तरी अशी अवस्था होऊ शकते.
  • Log in or register to post comments

बोरीस त्याचा राजाच्या बाजूचा

इस्पिक राजा
Mon, 05/14/2012 - 17:58 नवीन
बोरीस त्याचा राजाच्या बाजूचा हत्ती का बाहेर काढत नाही आहे? त्या प्याद्यालाही सपोर्ट मिळेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

आता गेल्फंड बहुदा वजीर ए ५

चतुरंग
Mon, 05/14/2012 - 17:59 नवीन
आता गेल्फंड बहुदा वजीर ए ५ मधे आणायला बघणार. पांढर्‍याचे डी ५ मधले प्यादे हा कळीचा मुद्दा आहे. ते प्यादे जोवर टिकून आहे तोवर मध्यात वजीर आणि हत्तींची मुसंडी थोपवणे आनंदला शक्य आहे. काळ्याचे ई ५ मधले प्यादे हे पांढर्‍यासाठी डोकेदुखी ठरु शकते. बोरिस डोके धरुन बसलाय. आठव, आठव खेळ्या! डाव आता सखोल थिओरेटिकल वेरिएशन्स मध्ये गेलाय. अनेक खेळ्यांची पूर्वतयारी आणि तीव्र स्मरणशक्ती यांची परीक्षाच सुरु आहे. या पातळीला खेळाडू पुढल्या ७-८ खेळ्यांपर्यंतचा पट विज्युअलाईज करु शकतात!!
  • Log in or register to post comments

:)

रमताराम
Mon, 05/14/2012 - 18:05 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा