मेघा रे... मेघालय !
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रेरणा: धमु आणि माझी खवखव
च्यायला, तू एक काम का नाही रे करत. ते लाईन आणि फोन वरुन आठवलं. इशान्य भारताबद्दल एकुणच लोकांचं अज्ञान अगाऽढ असतंय. तिथल्या पध्दती, जिवनमान, जगण्याची धडपड आणि सरकारी प्रयत्न ह्यावर का नाही लिहित काही? खूप चांगली आणि माहितीपुर्ण लेखमाला होईल...शिवाय पुर्णतः दुर्लक्षित म्हणवल्या जाणार्या भागाची माहितीही होईल लोकांना.
**************************************************************
तर आमच्या ह्या दोस्ताच्या विनंतीवजा ऑर्डरीने मी हा लेख लिहतोय.. (विजुभाऊंनी पण सुचवलं होतं..)
इशान्य भारताबद्दल एकुणच लोकांचं अज्ञान अगाऽढ असतंय. हे मान्य केलं तरी खरं हे आहे की इकडच्या लोकांचं आपल्या भागाबद्दलही अज्ञान तितकंच अगाऽढ असतं. मी महाराष्ट्रातला आहे म्हटल्यावर इकडची शिकली-सवरली लोकं म्हणतात, "बॉम्बे के ना, सर?" मी "नाही, नागपुरचा" म्हटले की "पास में ही तो है" म्हणतात.. (च्यायची, दुरांतोनी पण १० तास लागतात की, लेकहो..) So, Ignorance is a bliss universally..
असो.. मला प्रश्न हा पडला की लेखाची रचना कशी करावी? मग इचार केला की जरा अभ्यासपुर्ण-बिर्ण स्टायलीत वाटला पाहीजे, म्हणून हेडींग्स वगैरे टाकून लिहीतोय..
इतिहास :
आता खरं तर मेघालयच्या ऐतिहासिक ज्ञानाबद्दल आपली बोंबच आहे.. अहोम काळात ह्याचा काही भाग त्यांच्या राज्यात येत असावा. मात्र इथे मुख्यत्वेकरुन वेगवेगळ्या जाती-जमातींचे अधिपत्य राहीले आहे. ब्रिटीश काळात शिलाँग ही आसामची राजधानी होती. (म्हणजे त्यावेळी जवळजवळ पुर्ण इशान्य भारत.. त्रिपुरा आणि मणीपुर ही राज्ये सोडली तर) स्वातंत्र्योत्तर काळातही आसामची सुत्रे इथूनच हालायची.. २१ जानेवारी, १९७१ मध्ये मेघालय ह्या वेगळ्या राज्याची स्थापना झाली. "मेघालय" हा शब्द ह्या भागासाठी गुरुदेव टागोरांनी वापरला होता..
भुगोल :
मेघालय मुख्यत: तीन भागात विभागले आहे. गारो हील्स, खासी हील्स आणि जैंतिया हील्स. भौगोलिक दृष्ट्या हा भाग "छोटा नागपुर"चं एक्स्टेंशन आहे, हे वाचल्याचं आठवतंय.. असेलही, कारण की ह्या भागात कोळसा, चुनखडी इ. आढळतात.. काही भागात युरेनियमही सापडलेय. तसेच बहूतांश भाग हा लाल मातीचा आहे. गारो हील्सच्या भागात मुख्य पिक हे भाताचे आहे. तसेच हॉर्टीकल्चर (मराठी शब्द?) बर्यापैकी केल्या जाते. माझ्या सबडिव्हीजनमध्ये हॉर्टीकल्चर विभागाने हॉर्टी-हब स्थापिले आहे, जिथे अत्यंत चांगल्या प्रतीच्या ऑर्कीड्सची पैदास केल्या जाते. सध्या फक्त इनहाऊस प्रोडक्शन असलं तरी लवकरच ते शेतकर्यांमार्फत केल्या जाईल.
गारो हील्सच्या भागात चांगल्या प्रतीचे अद्रक, तेजपान ह्यांचे उत्पादन होते. (माझ्या घराच्या कंपाऊंड मध्येच तेजपानची दोन झाडे आहेत.) तसेच काजुचीही चांगलीच पैदास होते. खासी हील्स तिथल्या अननसांसाठी प्रसिद्ध आहे. अगदी साखरेचा कणही वरतून न घालता रसाळ, गोड लागतात ही.. आणि मुख्य म्हणजे जवळजवळ सगळ्यात गोष्टी "ऑर्गॅनिक" असतात.. :-)
मात्र, ह्या सगळ्या उत्पादनाला चांगल्या मार्केटींगची आणि लिंकेजेसची गरज आहे आणि इथेच घोडं पेंड खातयं. अजूनपर्यंत तरी गारो हील्स मधून शिलाँगकडे जायचं म्हटलं तर आसामातूनच जायला लागतं. रोड्स हळूहळू सुधारत असले तरी अजूनही मेघालय रेल्वेद्वारे जोडलेले नाही ! आता मात्र रेल्वे इकडे एक्स्टेंड होतेय.. सो, द फिंगर्स आर क्रॉस्ड..
समाज आणि संस्कृती :
हा पार्ट लै इंट्रेस्टींग आहे.. मेघालयात गारो, खासी आणि जेंतिया ह्या तीन मुख्य आदिवासी जमाती. मी ज्या भागात आहे तो गारो हील्सचा भाग असल्याने इथे मुख्यतः गारोच आहेत. गारोंमध्ये गावाचा/ वस्तीचा प्रमुख "नोकमा" म्हणून ओळखल्या जातो, आणि त्याला बर्यापैकी मानही असतो. ह्या मुख्य जमातींमध्ये "मातृसत्ताक"पद्धती आहे. म्हणजे आईची इस्टेट मुलीला जाते, नवरा लग्न करुन बायकोच्या घरी जातो वगैरे.. ह्यापायी, माझ्यासारख्या बाहेरुन आलेल्या माणसाला थोडा त्रास होतो. म्हणजे मतदाता रजिस्ट्रेशनच्या वेळी सुरुवातीला फॉर्मवर वडीलांचे नाव लिहून सोबत एपिक आईचं किंवा सासुचं जोडायचं, तसेच पुरुषाने बायकोच्या पत्त्यावर नाव बदलून देण्यासाठी अर्ज करायचा, ह्याने गोंधळ उडायचा.. त्यातही गोम अशी, की माझ्या भागात कोच, हजाँग ह्या पितृसत्ताक जमातीही असल्याने सॉलिड खिचडा व्हायचा डोक्याचा ;-)
गारो आणि खासी ह्या जमाती बहुतांश ( जवळपास १००%च) ख्रिश्चन आहेत. कोच, हजाँग ह्या जमाती हिंदु धर्म पाळतात. आणि जैंतिया जमातीत अजूनही "अॅनिमिझ्म"चे अंश आहेत. गारो लोकांचा "वंगाला" हा प्रमुख उत्सव आहे. हा नोव्हेंबर मध्ये असतो आणि त्यातील नृत्यात गारो जीवनातील वेगवेगळ्या समारंभाचे वगैरे प्रतिबिंब असते. तुरा (म्हणजे माझ्या जिल्ह्याचे शहर) ह्याच्या जवळ "असनांग" ह्या जागी वंगालाच्या वेळी "हंड्रेड ड्रम्स फेस्टीव्हल" असतो, ज्यात वेगवेगळ्या गावातील गारो एकत्र होऊन उत्सव साजरा करतात. लोकल दारु पाण्यासारखी वाहते.. दारु पिणे हा अजिबात टॅबू नाहीये, पण त्यामुळेच म्हातारपणी बर्याच लोकांना "लिव्हर सिरॉसिस" वगैरे त्रास होतो..
कोच लोकांच्या नृत्यावरुन ही जात लढवय्यी असावी, असा माझा अंदाज आहे. कारण की ह्यांचे नृत्य हातात ढाल-तलवारी घेऊन आक्रामक मुद्रांमधे होते. हजाँग नृत्यामधे मात्र शेतीशी निगडीत जीवन दाखवण्याकडे जास्त कल असतो..
ह्याव्यतिरीक्त गारो हील्समध्ये बंगाली आणि मुस्लिम लोकांची संख्याही बर्यापैकी आहे, खासकरुन सिमावर्ती भागांमधे. ह्यातील बहूतेकांचे संबंध आधीचा पुर्व बंगाल आणि आताचा बांग्लादेश ह्याच्याशी आहे..
जैतिया आणि खासी लोकांमध्ये पुर्वी पुर्वज-पूजेची प्रथा होती, कारण की ह्या भागामध्ये "मेगालिथ्स" सापडतात जे पुर्वजांच्या स्मृतीत उभारल्या जायचे. गारो हील्स मधल्या रेसिबुलपारा इथे "फॅलस वर्शिप" अर्थात लिंगपुजा होत असावी, असे तेथील काही फोटोज पाहून मला वाटले. हे म्हणजे शिवलिंगासारखे नसून पुरेपुर पुरुष व स्त्री जननांगाचे शिल्प आहेत. अर्थात, आता त्याला शेंदुर वगैरे फासल्या गेलाय.. :p
राजकीय :
मेघालय म्हटलं की लोकांना फक्त शिलाँग आणि चेरापुंजीच माहीत आहे.. त्यामुळे, त्याच्या व्यतिरीक्त असलेल्या मेघालयाबद्दल आणि तिथल्या राजकीय परिस्थितीबद्दल माहितीपण शुन्यच.. आणि हे सर्व थरांमध्ये आहे. माझे इतर काडर्समधले मित्र मला फोन करतात तेव्हा, "काय सुंदर ठीकाणी आहेस रे तू? टेंशन नाही काही.." इ. इ. सुरु असतं त्यांचं.. ह्याउलट, आसामात अजूनही "उल्फा/ अल्फा"चं थैमान सुरु आहे असंच त्यांना वाटतं..
मेघालयात स्टुडंट्स पॉलिटीक्स लै कडक आहे.. इथे विद्यार्थी युनियन हा एक ताकतवर प्रेशर ग्रुप आहे.. विसेक वर्षांआधी खासी हिल्समध्ये झालेल्या उलाढाली (मिलिटंट अॅक्टीव्हिटीज) मधे "खासी स्टुडंट्स युनियन" (के. एस. यु.) चा मोठा वाटा होता. मागच्या वर्षी इथे होऊ घातलेल्या मुन्सिपल इलेक्शन्सच्या विरोधात गोंधळ घालण्यामध्ये ह्या विद्यार्थी संघटना पुढेच होत्या.. (बादवे, वेगळं झाल्यापासून आजतायागत मेघालयमध्ये मुन्सिपल इलेक्शन झालेली नाहीत. म्हणजे, तीनवेळा प्रयत्न केला तसा सरकारने.. पण तिन्हीवेळा रद्द करावी लागली.)
आमच्या एरीयात म्हणजे अख्ख्या गारो हील्समध्येच, जी. एन. एल. ए. (गारो नॅशनल लिबरेशन आर्मी) चे बर्यापैकी थैमान आहे. ही संघटना चॅम्पियन नावाच्या एका मेघालय पोलिसातील अधिकार्याने स्थापन केली. (ह्यामागे तो आणि त्याची संघटना जरी "गारो फ्युचर"च्या बढाया मारत असली तरी खरे कारण हे आहे की त्याच्या वागणूकीमुळे त्याचा पोलिसांतून काढून टाकण्यात येणार होते. त्यानी मग "हुतात्मा" होण्याचा चान्स घेतला.) बेसिकली, हा एक "एक्स्टॉर्शनिस्ट ग्रुप" आहे. ह्या भागात बेरोजगारी भरपुर असल्याने त्याला काडर पण मिळतंय.. दोन-अडीच महीन्यांआधी त्यांनी माझ्या बाजूच्या सब-डिव्हीजनमधून एका बीडीओला त्याच्या ऑफीसातून उचलून नेले. एका महीन्यानी (ख्रिसमसच्या पुर्वसंध्येला) त्याला सोडून दिल्या गेले.. तसेच १५ दिवसांआधी इलेक्ट्रीसिटी बोर्डच्या दोन इंजिनिअर्सला पळवले, ते अजून त्यांच्या ताब्यात आहेत.. आता मी "मेरा नंबर कब आयेगा" ह्याची वाट बघतोय झालं.. ;-)
इथल्या समाजाचे आणि राजकारणाचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे "प्रचंड मोकळेपणा".. इथे मुख्यमंत्र्याला भेटायला कुठलाही मतदार एकदम बिनधास्तपणे जाऊ शकतो. मुळातच इथल्या आमदाराचा मतदारसंघ हा आपल्याकडच्या मोठ्या ग्रामपंचायतीइतका किंवा नगरपरीषदेइतका असतो.. (२५००० मतदार म्हणजे अबब..) त्यामुळे बाहेरून आलेल्या अधिकार्याला त्याने पाहीलेल्या/ अनुभवलेल्या साहेबीपणामुळे सुरुवातीला लै जड जाते. लोक तुमच्या ऑफीसात येवून तुमच्या टेबलाला टेकून किंवा रेलून उभे राहत आरामात तुमच्याशी बोलताहेत, हे आपल्याकडे कुठल्याही "पटवारी साहेबांचा तोरा" पाहिलेल्या माणसाला कठीणच जाणार के हो.. ;-)
भाषा :
हा एक मोठा लोचा आहे.. मेघालयात तीन मुख्य भाषा पुन्हा त्याच.. गारो, खासी आणि जैंतिया.. आता मी प्रोबेशनमध्ये "अहोमिया" शिकलोय. पण गारो भाषा वेगळीच आहे. वरुन रोमन लिपी.. त्यामुळे ही वाचतांना इंग्रजीत मराठी वाचतांना जसं डोकं फिरतं तसं होतं.. आधी ह्या भाषेची लिपी बंगाली / अहोमिया सारखी होती, पण आता ख्रिश्चन प्रभावाने ती रोमन लिपी झालीय. मी गारो शिके-शिकेपर्यंत मला कदाचित खासी / जैंतिया भागात पाठवतील, म्हणजे तीही एक कटकट. आणि कोच आणि हजाँग आहेतच.. पण कोच आणि हजाँग लोकांना अहोमिया कळते. गारो लोकही (कमीत कमी ऑफीसातले वगैरे) हिंदी बर्यापैकी जाणतात.. ह्या प्रॉब्लेममुळेच मेघालयची आधिकारीक भाषा इंग्रजी आहे.
भाषेचा प्रश्न हा इथल्या शिक्षणात एक मोठा अडसर आहे. महाराष्ट्रात जसं प्राथमिक शिक्षण मराठीत होतं, तसं इथे होऊ शकत नाही. कारण तीन मुख्य भाषा.. गारोत शिकवायचं म्हटलं, तर शिक्षक-निवडीचं क्क्षेत्र मर्यादीत होतं. इंग्रजीत शिकवायचं म्हटलं, तर मुलांना पडणार्या प्रश्नांची उत्तरे घरी कोण देणार? आणि मुळात शिक्षकांनाही इंग्रजी चांगल्यानी येतंय कुठं? म्हणून मग मुलांचा शिक्षणातला रस हळू-हळू कमी होऊन ड्रॉप-आउटचं प्रमाण भरपुर आहे.. मी माझ्यापुरतं तरी शिक्षकांशी बोलतांना "गारो फ्युचर म्हणजे तुमची सशक्त, सुशिक्षीत मुले" हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो.. आता १५ फेब्रुवारी नंतर शाळा सुरु होतील, तेव्हा सगळ्यांना भेटून, मुलांच्या आई-वडीलांच्या आणि वडीलधार्या माणसांच्या मनात पाल्याच्या शिक्षणात जास्त रस घेण्यासाठी बोलायचा विचार आहे.. बघूया..
नाही नाही म्हणता म्हणता बराच मोठा लेख झालाय.. एक-दोन किस्से टाकतो आणि संपवतो.
# माझ्या ऑफीसात "जन्म नोंदणी कोर्ट ऑर्डर" देण्याचं काम असतं.. आतापर्यंत मी तीन-चार "अशक्य" जन्मतारखा असलेल्या ऑर्डर्स फेटाळल्याहेत आणि "कारणे दाखवा" हाणल्याहेत.. तारखा अश्या : २९ फेब्रु. १९९८, ३० फेब्रु. १९८८ आणि ३१ फेब्रु. १९८३
# मतदार-नोंदणीच्या वेळी एकाजणाने फॉर्मवर वडीलांचे नाव अबक असे लिहीले. सोबत प्रमाण म्हणून इलेक्शन कार्ड मात्र "यरल" असे दुसर्याचेच होते.. मी त्याला विचारलं, " बाबा रे, तुझ्या वडीलांचे नाव काय?" ( आईने दुसरं लग्न केले असेल म्हणून) तो म्हणाला, "सर, फॉर्मवर लिहीलंय ना?" मी म्हटलं, "हो पण कार्ड दुसर्याचंच आहे म्हणून.." तो उद्गारला, " थांबा सर, विचारुन येतो." आणि बाहेर गेला.. मी गपकिनी वारलोच..:D
भेटुयात पुन्हा...
प्रतिक्रिया
सही .........
+१
पुढचे भाग पटापट येऊंद्या
तुझी भाषा शैली अत्यंत झक्कास
मस्त
छान! भाषाशैली चांगली आहे.
फुडच्या भागात....
लेख आवडला. फोटो हवे होते.
लै भारी... माहिती..........
मेघालया बद्दल जाणुन घेण्याची
चक्क तुझ्या कडून फोटोची मागणी
माझेपण
मस्त!
पैसातै...
कळ्ळं बरं.
जवळजवळ सगळ्यात गोष्टी
मस्त आवडलं, बरेच दिवस तिकडं
हॉर्टीकल्चर
वपाडाव, बिका, इरसाल यांच्याशी
खुपच छान माहिती .... संपुर्ण
लेख माहितीपूर्ण आहे. आवडला.
धन्यवाद...
प्रामाणिक उत्तराबद्दल
अरे बापरे..
चिगो एक विचारायचे
नाही...
धन्यवाद चिगो, त्या टेम्प्याला
धन्यवाद हा लेख
धन्यवाद मालक धन्यवाद!
आमचेही धन्यवाद..
मस्त!
छान आणि माहितीपुर्ण लेख.
धन्यवाद चिगो
सुंदर परिचय !! अजुन येवु देत
नमस्कार..
ग्रेट.
+१
+२
एकदम खास.... आणि शांतीपूर्ण
खल्लास !
हा धागा कसा काय वाचला नै
धन्यवाद..
फोटो टाका रे! मस्त लिहिले