✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

महाभारतातील व्यक्तिचित्रे-४ महारथी कर्ण

श
शरद यांनी
गुरुवार, 04/26/2012 - 07:37  ·  लेख
लेख
महारथी कर्ण महाभारत कोणामुळे घडले ? बरेच जण द्रौपदीचे नाव घेतील पण तो मान जातो कर्णाकडेच. उत्तुंग प्रतिभेच्या भगवान व्यासांनी प्रथम आपल्या डोळ्यासमोर श्रीकृष्ण व कर्ण यांची व्यक्तिचित्रे उभी केली, त्यांचे गुणावगुण ठरविले व मगच महाभारताची रचना केली. पाच सज्जन पांडव व शंभर दुर्जन कौरव यांच्यातील भांडणाकरिता महाभारताची गरज नव्हती ; जय नावाचा इतिहास त्याला पुरेसा होता. श्रीकृष्ण निर्माण करतांना त्यांनी कृष्णाला दैवी गुण दिले पण द्रौपदीला वस्त्रे पुरवणे, विश्वरूपदर्शन , जयद्रथवध व मृत अभिमन्युपुत्राला जिवित करणे एवढे सोडले तर महाभारतात कृष्ण दैवी चमत्कार दाखवत नाही. तो शूर आहे, अस्त्रज्ञ आहे, नीतीनिपुण आहे, धार्मिक आहे,,, पण सर्वात जास्त महत्वाचे तो फार "लवचिक" आहे. इथे सत्याचा विजय होण्यासाठी कपटाचा वापर करावा लागतो हे त्याला उत्तम माहीत आहे व तसे करण्याचा सल्ला तो देतोही. भीष्म, कर्ण जशी टोकाची भुमिका घेतात तशी घेणे त्याला मंजूर नाही. त्याचे लक्ष "अंतिम साध्या" कडे असते. जरासंधाशी सतरा वेळा युद्ध करूनही तो संपत नाही म्हटल्यावर लोकसंहार टाळण्यासाठी त्याने द्वारकेची वाट धरली व पुढे भीमाकडून द्वंदयुद्धात जरासंधाला मारवले. कर्णाचे रेखाचित्र उभे करतांना व्यासांनी हात सैल सोडला. भरपूर सद्गुण दिले, तसेच दुर्गुणही, अगदी टोकाचे. बरे हे करतांना नियतीचे फासे असे टाकले की तुम्ही त्याच्याकडे नायक म्हणून बघू शकता, खलनायक म्हणूनही ! कौंतेय कर्ण वाढला राधेय म्हणून. अंतापर्यंत तो सूतपुत्र म्हणूनच ओळखला गेला. त्याची खरी ओळख त्याच्या आईला झाली तेव्हा उशीर झाला होता. रूढीचे चटके त्याला लहानपणापासूनच बसले असावेत. असावेत असे म्हणावयाचे कारण तसा उल्लेख महाभारतात सापडत नाही. सूत हे ब्राह्मण-क्षत्रियांएवढे उच्च वर्णाचे नव्हते तरी फार खालचे असेही नव्हते व आर्थिक दृष्ट्या कर्णाचे दिवस कष्टप्रद नक्कीच नसावेत. त्याचे युद्धकलेचे शिक्षण इतर सर्वसामान्य मुलांसारखेच झाले व त्याने आपल्या नैसर्गिक गुणांनी व अपार कष्टाने त्यात प्राविण्य मिळवले. पण ते इतरांच्या नजरेस आलेले दिसत नाही. शिष्यांच्या गुणप्रदर्शनाच्या कार्यक्रमात त्याने आपले कौशल्य दाखविले व अर्जुनाला आव्हान दिले तेव्हा त्याला कोणीही ओळखत नाही. ( कुंती ओळखते ते आपला मुलगा म्हणून, चमकदार योद्धा महणून नव्हे) शक्य आहे की त्याने या क्षणासाठी ते इतरांपासून मुद्दाम दडवून ठेवले होते. कर्णाने अर्जुनाला आव्हान दिल्यावर तो योग्य द्वंद्वी आहे की नाही हा मुद्दा निघतो. दुर्योधन कर्णाला अंग देशाचा राजा घोषित करतो व दोघांची आमरण गाढ मैत्री होते. अर्जुन-कर्ण यांचे युद्ध सुरू होणार तेव्हड्यात अधिरथ सूत तेथे येतो व कर्ण त्याला बाप म्हणून अभिवादन करतो. तो सूतपुत्र आहे हे कळल्यावर युद्ध होतच नाही. हा एक नियतीचा खेळ. जरा वेळ टळली असती तर कर्ण मेलाच असता कारण त्यावेळी अर्जुनाकडे ब्रह्मास्त्र होते, कर्णाकडे नव्हते. आता आपण प्रथम त्याचे गुणावगुण पाहू. तो तेजस्वी, स्वकीयांवर प्रेम करणारा, परकीयांचा नाश करणारा, बुद्धिवान,बलवान, कर्तृत्ववान व सुंदर होता. तो जन्मजात कवचकुंडले घेऊनच आला.तो महान अस्त्रसंपन्न होता. त्याच्याकडे ब्रह्मास्त्र, भार्गवास्त्र, परशुरामाने दिलेले माहेश्वर धनुष्य होते. असामान्य शौर्य, अलौकिक दानप्रियता, सहनशीलता, समयज्ञता, दूरदर्शीपणा, गूणग्राहकता हे त्याचे इतर काही गुण. त्याचे अवगुणही पराकोटीचे होते. आत्मकेंद्रियता, अहंकार, अमर्याद महत्वाकांक्षा, भांडखोरपणा, मत्सर, विशेषत: अर्जुनाचा व त्यामुळे अर्जुनाच्या गुणग्राहक लोकांबद्दल,( भीष्म, द्रोण,कृप, अश्वत्थामा इ.) तिटकारा हे त्याचे महत्वाचे दोष. स्वत:बद्दल सारखे प्रौढीने बोलणे हे त्याच्या पाचवीला पुजले होते. यामुळे इतरांची समजुत घालत बसणे हे दुर्योधनाचे एक कामच होऊन बसले होते ! या दोषांचा परिपाक म्हणजे त्याच्या मनाचा हलकेपणा. द्युताच्या वेळी हा नीचपणा त्याला नराधम म्हणावे या टोकाला पोचला . हे गुणदोष पुढील माहित्तीत स्पष्ट होतीलच. अर्जुनाकडे ब्रह्मास्त्र आहे, ते आपल्याकडे नाही व त्यामुळे तो आपल्यापेक्षा वरचढच राहणार हे ध्यानात घेऊन कर्णाने द्रोणांकडे जाऊन ते शिकवावयाची विनंती केली. त्याच वेळी अर्जुनाचा पराभव करण्यासाठी ते पाहिजे हेही सांगितले. द्रोणांनी त्याची इच्छा कळल्यावर त्याला ते देण्याचे नाकारले. कारण मात्र दिले की मी फक्त क्षत्रिय व ब्राह्मणालाच ते देतो. भडकलेल्या कर्णाने आता थेट परशुरामांकडेच जावयाचे ठरविले. मात्र इथेही आपली जात आडवी येऊ नये म्हणून त्याने परशुरामांना सांगितले की मी भार्गवगोत्री ब्राह्मण आहे.त्याची सेवावृत्ती, अपार गुरुनिष्ठा, कष्ट करावयाची तयारी पाहून परशुराम प्रसन्न झाले. त्यांनी कर्णाला सर्व अस्त्रे व आपले माहेश्वर धनुष्यही दिले. याच काळात धनुर्विद्येचा सराव करत असतांना कर्णाच्या हातून एका ब्राह्मणाच्या गाईची हत्या झाली. ब्राह्मणाने त्याला शाप दिला की " ज्याच्याशी तू स्पर्धा करत आहेस, त्याच्याशी युद्ध करत असतांना तुझ्या रथाचे चाक पृथ्वी गिळून टाकील व तुझा शत्रु तुझ्या अडचणीचा फायदा घेऊन तुझा शिरच्छेद करील ". एवढ्याने कर्णाचे दुर्दैव संपले नाही. एके दिवशी तो व परशुराम हिंडत असतांना राम थकून जाऊन कर्णाच्या मांडीवर डोके ठेऊन झोपले. तेव्हढ्यात एका किड्याने कर्णाच्या मांडीला दंश केला. गुरुजींची झोप मोडू नये म्हणून कर्णाने किडा हाकलला नाही. किड्याने कर्णाच्या मांडीला भोक पाडले व त्यातून रक्त वाहू लागले. तरीही अपार वेदना सहन करित कर्ण स्तब्धच राहिला. रक्त वहात वहात परशुरामांपर्यंत पोचले व ते जागे झाले. झाला प्रकार पाहून त्यांना संशय आला. ते म्हणाले " ब्राह्मण इतक्या वेदना सहन करणे शक्य नाही, तू कोण आहेस ?" कर्ण म्हणाला " मी सूतपुत्र आहे. पण वेद देणारा गुरु बापच असतो. तुम्ही मला धनुर्वेद दिला म्हणून तुम्ही माझे पिताच आहात. म्हणून मी तुम्हाला मी भार्गवगोत्री ब्राह्मण असल्याचे सांगितले. " परशुराम रागावले पण कर्णाच्या असीम गुरुनिष्ठेने प्रसन्नही झाले. ते म्हणाले " कपटाने मिळवलेले ब्रह्मास्त्र मरणघटकेपर्यंत जवळ राहणे शक्य नाही. तेव्हा अंतिम काळी तू ते विसरशील. पण तोवर तुला त्याचा उपयोग करता येईल." शापित अस्त्रे घेऊन कर्ण परतला. कलिंग राजाच्या मुलीच्या स्वयंवारात कर्णाने दुर्योधनाकरिता जमलेल्या राजांचा पराभव केला. त्या वेळी त्याने मल्लयुद्धात सम्राट जरासंधाचा पराभव केला. सर्व भारतात कर्णाचे नाव गाजवावयास हा एक विजय पुरेसा होता. राजसूय यज्ञाच्या वेळी भीमाला त्याने करभार देऊन बचाव केला. तो तसे न करता तर यादवांसमवेत भारतातील सर्व राजे युधिष्ठिराबरोबर त्याच्याशी लढावयास आले असते . तो भांडण न उकरता समयसुचकता दाखवितो. तसेच दुर्योधनासाठी केलेया दिग्विजयाच्या वेळी तो यादवांशी सामोपचाराने वागतो. नच तर त्याच वेळी पांडवांवरील अन्यायाने रागावलेल्या यादवांनी त्याला नाहिसे केले असते. ही त्याची राजकीय सुजाणता. कर्ण आणि अर्जुन कादंबर्‍या वाचून अशी समजुत होण्याची शक्यता आहे की कर्ण अर्जुनापेक्षा जास्त शूर होता व केवळ कृष्णाच्या सहाय्याने अर्जुनाने कपटाने कर्णाला मारले. साफ चूक. अर्जुन एकाही युद्धात हरलेला नाही.( भगवान शंकरांबरोबरचे युद्ध सोडा, तो एक रडीचा डाव होता. आता तुम्ही टाकलेले प्रत्येक शस्त्र, अस्त्र समोरचा गिळूनच टाकू लागला तर त्याला काय युद्ध म्हणावयाचे ? तरीही अर्जुन धनुष्यही उरले नाही तेव्हा नि:शस्त्र युद्ध, मल्लयुद्ध करू लागला.) कृष्ण नसतांनाही आणि कर्णाकडे कवचकुंडले असतांनाही अर्जुनाने कर्णाला दोन्दा हरवले आहे. आता आपण कर्णाने लढलेली युद्धे पाहू. शिकावू काळात द्रुपदाबरोबरची लढाई. कौरवांबरोबर कर्णालाही पळून जावे लागले. द्रौपदी स्वयंवराच्या वेळी ब्राह्मण वेषातील अर्जुनाबरोबर झालेली लढाई. कर्णाला माघार घ्यावी लागते. घोषयात्रेच्यावेळी चित्रसेन गंधर्वा बरोबर झालेली लढाई. चित्रसेनाच्या दैविक अस्त्रांपुढे कर्णाची मानुष अस्त्रे टिकाव धरू शकली नाहीत.( असे दिसते की एकाच अस्त्राचा प्रभाव सारखा नसावा. नाही तर अर्जुन सर्व अस्त्रे पृथ्वीवर माहीत झाली असतांना परत तीच शिकण्यासाठी स्वर्गात गेला नसता.माणसाकडून शिकले ते मानुष अस्त्र, देवाकडून शिकले की तेच दैविक अस्त्र. दैविक अस्त्र जास्त पावरबाज !) कर्ण पळून जातो. गोग्रहणाच्यावेळी अर्जुनाशी झालेली लढाई. कर्णाला तीन वेळा माघार घ्यावी लागते. शेवटी संमोहन अस्त्रामुळे बेशुद्ध झाल्यावर उत्तर त्याचेही वस्त्र काढून नेतो. शेवटच्या युद्धात कर्ण एकूण सात दिवस लढतो. तेवढ्यात तो सात्यकी, भीम, अभिमन्यु एवढ्यांबरोबरच्या लढायांमध्ये हरतो, इन्द्राने दिलेली वासवी शक्ति नसती तर तो घटोत्कचाबरोबरच्या लढाईत हरल्यातच जमा होता. दु:शासन वधाच्या वेळी भीम सर्वांना आव्हान देतो की "या दुष्टाला मारून मी त्याचे रक्त पिणार आहे, शक्य असेल तर याला वाचवा !" कर्ण समोर होता पण तो भीमाला आवरू शकला नाही.तीच गोष्ट जयद्रथवधाच्या वेळी घडली. अर्जुनाने कर्णाला सांगितले " मी नसतांना तुम्ही सर्वांनी अभिमन्यूला मारलेत. कर्णा, आज तुझ्यासमोर मी तुझ्या पुत्राला ठार मारणार आहे, शक्य असेल तर त्याला वाचव." कर्ण आपल्या पुत्राला वाचवू शकला नाही. यावरून कर्णाच्या शौर्याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. वर दोन उदाहरणे दिली आहेत. तो अर्जुनाच्या बरोबरीचा योद्धा आहे अशी कबूली त्याव्या दोन कट्टर विरोधकांनी दिली आहे. श्रीकृष्ण व भीष्म यांनी. तेव्हा त्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. त्याने भीम, युधिष्ठिर, नकुल व सहदेव यांना जिंकून जिवंत सोडून दिले आहे. घटोत्कचासारख्या केवळ अजिंक्य राक्षसाला तोच मारू शकला. त्याचे व अर्जुनाचे युद्ध म्हणजे इन्द्र-वृत्राचेच युद्ध असे कृष्ण म्हणतो. या सगळ्याचा अर्थ लावणे थोडे अवघडच वाटते. व्यासांनी गणपतीला कोडी घातली, तसेच वाचकांना घातलेले हे एक कोडे. दानशूरता जसा "रामबाण", जशी " भीष्मप्रतिज्ञा " तशी कर्णासारखी " दानशूरता " ! भारतीय इतिहासात दान देणे हा एक रक्तात रुजलेला भाग आहे. सर्वस्व देणारे राजे कितीतरी सापडतील. परशुरामांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून ती कश्यपाला दान दिली. आणि मग कश्यपाने जेव्हा सांगितले " आता फूट, माझ्या पृथ्वीवर तुला जागा नाही " तेव्हा निमुटपणे समुद्राला हटवून आपल्या आश्रमापुरती जागा मिळवली. पण नाव झाले ते एका कर्णाचेच. सकाळी सूर्याची आराधना करतांना येणार्‍या याचकाने काहीही मागितले तरी ते देण्याची कर्णाची प्रतिज्ञा. इन्द्राने याचा फायदा घ्यावयाचे ठरवून त्याची कवचकुंडले मागावयाचे ठरविले. सूर्याला याचा पत्ता लागल्यावर त्याने रात्री कर्णाच्या स्वप्नात येऊन त्याची कल्पना दिली व इन्द्राला हाकलून दे असे सांगितले. कवचकुंडले दिल्यावर आपल्या जीवाला धोका आहे हे माहीत असूनही कर्ण सूर्याला सांगतो की "मरण पत्करले, पण मी वचन मोडले ही अपकीर्ती मला मान्य नाही ". शेवटी मिनतवारीने कर्णाने कबूल केले की मी इन्द्राकडे अमोघ शक्ती मागेन. प्राणाची पर्वा न करता दिलेले हे दान एकमेव. आत्मप्रौढी व भांडकुदळपणा पहिल्यापासून पराकाष्टेची आत्मकेंद्रियता हा कर्णाचा मोठा दुर्गुण दिसून येतो. त्यामुळे आत्मप्रौढी वाढली. तो कायमच मी किती श्रेष्ठ, अर्जुनाला मी एकटाच संपवून टाकतो, अशा वल्गना करीत असतो. त्यामुळे दुर्योधनाला व सामान्य सैनिकांना तो खरेच तसे करून दाखवेल अशी खात्री वाटत होती. प्रत्यक्षात तसे जरी घडून आले नाही तरी त्याच्या वल्गना चालूच असत. भीष्म-द्रोण-कृप यांना त्याची कल्पना असल्याने ते नेहमीच त्याचा फुगा फोडत. कर्ण त्यांचावर तोंडसुख घेई व दुर्योधनाला निस्तारत बसावयाची पाळी येई. ऐन युद्धाच्यावेळी अशा प्रसंगी अश्वत्थामा इतका भडकला की तो कर्णाला मारावयासच निघाला होता ! भीष्मांनी त्याला अर्धरथी ठरवल्यावर त्याने भीष्म मरेपर्यंत मी लढणारच नाही असे सांगितले व कौरवांचे नुकसानच केले. समयसुचितपणा भीष्मपतनानंतर सर्व सैनिक कर्णाला सेनापति हो म्हणत होते व दुर्योधनाचीही तशीच इच्छा होती. पण बरोबरीच्या इतर राजांना ते पटणार नाही व ते मनापासून युद्ध करणार नाहीत याची जाणिव असल्याने कर्णाने द्रोणांना सेनापति करावयास सांगितले. तो म्हणतो " सर्व समान राजांपैकी एकाला सेनापती केले तर असंतोष निर्माण होईल. त्या ऐवजी सर्वांचे गुरु असलेल्या द्रोणाचार्यांना सेनापती करा." नेहमी द्रोणांचा अधिक्षेप करणार्‍या कर्णाने यावेळी योग्य राजकीय खेळी केली. गुणग्राहकता भीष्मपतनानंतर कर्ण त्यांना वंदन करावयास गेला व ढसाढसा रडत त्याने शोक व्यक्त केला. अखेरीस त्याने युधिष्ठिराची धर्मप्रियता व अर्जुनाचे युद्धकौशल्यही मान्य केले आहे. मित्रप्रेम युद्धाच्या आधी श्रीकृष्णाने त्याला एकांतात तो कुंतीचा पुत्र आहे व तो राज्याचा अधिकारी असून तो सिंहासनावर बसेल व पांडव त्याची सेवा करतील असे सांगितले. पण कर्णाने त्याला स्पष्ट नकार दिला. दुर्योधना्ला सोडून सम्राट होणे त्याने नाकारले. कुंतीला तो म्हणतो, " मला लहानपणीच मारून टाकले असतेस तर बरे झाले असते. आता फार उशीर झाला आहे. " तरीही आईला शेवटी वचन देतो की धर्म, भी, नकुल व सहदेव यांनी मी मारणार नाही, तुझे पाच पुत्र जिवंत राहतील." मनाचा हीनपणा द्युतप्रसंगी तो इतका नीचपणे वागतो की चांडाळचौकडीत सर्वात हीन कोण हे ठरवणे कठीण जावे. दु:शासनाच्या अधमपणाला प्रत्येक वेळी त्याचीच फूस आहे. बटकीशी बोलतांनाही शरम वाटावी असे उद्गार तो काढतो. केवळ या एका प्रसंगामुळे त्याचा करूण शेवटही कमीच झाला असे म्हणावे लागते. "वनात पांडव असतांना तेरा वर्षे कशास थांबावयाचे ? आताच जाऊन कृष्णाला कळावयाच्या आधीच ते असहाय्य आहेत तोवर त्यांचा निकाल लावून टाकू " असा मनाचा हलकेपणा तो दाखवितो. कर्णाबद्दल शोक व्यक्त करणार्‍या युधिष्टिराला नारद काय सांगतात ते पाहून इथे थांबू . " राजा, शोक आवर. तुझा भाऊ दुर्दैवी होता. कोणा एका व्यक्तीला (कुंतीला) दोष देण्यात अर्थ नाही. सर्व क्षत्रियांना युद्धात मृत्यु येऊन स्वर्ग मिळावा म्हणूनच दैवाने त्याची योजना केली होती." शेवटचा अर्जुनावरचा लेख लिहून आपण महाभारतावरील लेखमाला थांबवू. शरद

Book traversal links for महाभारतातील व्यक्तिचित्रे-४ महारथी कर्ण

  • ‹ महाभारतातील व्यक्तिचित्रे-३ राजर्षि भीष्म
  • Up
  • महाभारतातील व्यक्तिचित्रे-५ अर्जुन ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
33865 वाचन

💬 प्रतिसाद (82)

प्रतिक्रिया

बुद्ध आणी महावीरांनी ते

इस्पिक राजा
Fri, 04/27/2012 - 12:52 नवीन
बुद्ध आणी महावीरांनी ते कंठ्शोष करुन सांगितले पण त्याचा परिणाम उलटाच झाला. भारतीय समाज युद्धविरोधी झाला पण बाकी जगाचे काय? त्यांनी भारतावर आक्रमण केलेच. आणि मग त्यातुन परत ते चक्र सुरुच राहिले. त्यामुळे हे चर्क सुरुच राहणार आहे. कोणी एका गालावर मारली तर तुम्ही दुसरा पुढे करा हे तत्वज्ञान छान वाटते पण ते प्रत्यक्षात शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

भारत आणि इतर असा प्रश्न नाहीये, `माणूस' ही सेंट्रल थीम आहे

संजय क्षीरसागर
Fri, 04/27/2012 - 13:04 नवीन
आणि त्याही पेक्षा तुम्ही आणि मी हा फोकस एरिया आहे. माझं मत तुम्हाला पटलं तर आपण दोघं युद्धविरोधी झालो मग असे समविचारी दोनाचे चार आणि मग अनंत होतील. जर सैन्यात भरती व्हायला सैनिकच नसतील तर युद्ध कशी होतील?
  • Log in or register to post comments

हे विचार तुम्हाला जेथून

यकु
Fri, 04/27/2012 - 13:09 नवीन
हे विचार तुम्हाला जेथून मिळाले आहेत त्याच माणसाने स्वत:च्या अव‍तीभवती रायफलधारी लोक ठेवले होते. आता बोला! विचार नुसते ताणायला ठिक असतात, पण प्रॅक्टीकली माणुस ही हरामखोर जात आहे असे मला माझ्यावरुन वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

यशवंत, दुसरा काय करतो हा प्रश्न गौण आहे

संजय क्षीरसागर
Fri, 04/27/2012 - 13:16 नवीन
आपण काय करतो हे महत्त्वाचंय असं नाही का वाटत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

>>>>आपण काय करतो हे

यकु
Fri, 04/27/2012 - 13:22 नवीन
>>>>आपण काय करतो हे महत्त्वाचंय असं नाही का वाटत? --- कदाचित आपल्या स्वत:वर वेळ येईपर्यंतच हे बरोबर असेल. तुम्ही रस्त्यावरुन जाताना कुणी तुमचा गळा पकडला आणि प्राणघातक मारठोक करायला सुरुवात केली तर तुम्ही काय कराल? मी तरी जेवढ्या जोरात प्रतिहल्ला करता येईल तेवढ्या जोरात करील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

कुणी तुमचा गळा पकडला

इस्पिक राजा
Fri, 04/27/2012 - 13:23 नवीन
कुणी तुमचा गळा पकडला आणि बरोबरच आहे. कोणी एक गळा दाबला तर तुम्ही दूसरा द्या असे म्हणण्याचा चान्स नसतो ना ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

एक सिंपल अंडरस्टँडिंग आहे, जे युद्धशून्य स्थितीतच शक्य आहे

संजय क्षीरसागर
Fri, 04/27/2012 - 14:24 नवीन
युद्ध व्यर्थ आहे हा विचार मनात रूजवणं, स्वतःच्या आणि जमेल तितक्या सर्वांच्या. `भविष्यकालीन किंवा काल्पनिक प्रसंगातून युद्धप्रवृतीला दुजोरा' की `युद्धविराम (या काल्पनिक असला तरी) शांततेची शक्यता निर्माण करू शकणार्‍या विचाराचा अंगीकार आणि प्रसार' असा अप्रोच विधायक ठरेल. त्यात तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला पटला तर तुम्ही अनेक लोकांपर्यंत हा विचार पोहोचवू शकाल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

>>>एक सिंपल अंडरस्टँडिंग आहे,

यकु
Fri, 04/27/2012 - 14:36 नवीन
>>>एक सिंपल अंडरस्टँडिंग आहे, जे युद्धशून्य स्थितीतच शक्य आहे >>>युद्ध व्यर्थ आहे हा विचार मनात रूजवणं, स्वतःच्या आणि जमेल तितक्या सर्वांच्या. ---- मला हा विचार अत्यंत अनावश्‍यक विचार वाटतो. आत्ता युद्धशून्य स्थिती आहे असे मानू (फक्त आपल्या घरचं कुणी काश्मिरमध्‍ये मेलेलं नाही/तिकडे नाही म्हणून ), मग युद्धशून्य स्थितीत युद्ध व्यर्थ आहे असे म्हणत बसण्‍यात काय हशील? >>>`भविष्यकालीन किंवा काल्पनिक प्रसंगातून युद्धप्रवृतीला दुजोरा' की `युद्धविराम (या काल्पनिक असला तरी) शांततेची शक्यता निर्माण करू शकणार्‍या विचाराचा अंगीकार आणि प्रसार' असा अप्रोच विधायक ठरेल. ---- अहो, जी गोष्‍ट सध्‍या नाहीच तिच्याबद्दल कशाला कसल्या अप्रोचचा अंगीकार आणि प्रसार करायचा? >>>त्यात तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला पटला तर तुम्ही अनेक लोकांपर्यंत हा विचार पोहोचवू शकाल ---- मी अजाबात पत्रकार नाही, फक्ते कधीकाळी पेपरमध्‍ये भाषांतरकार होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

>जी गोष्‍ट सध्‍या नाहीच

संजय क्षीरसागर
Fri, 04/27/2012 - 15:48 नवीन
तिच्याबद्दल कशाला कसल्या अप्रोचचा अंगीकार आणि प्रसार करायचा? युद्धशून्य स्थिती आहे म्हणून विचार करण्याचं स्वास्थ्य आहे आणि... `युद्धप्रवण प्रवृती' जी आता, या क्षणी मनात आहे तिचा निरास `युद्ध व्यर्थ आहे' या बोधातून करता येईल आणि एकदा तो झाला की युद्धाची शक्यता मावळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

>>>तिच्याबद्दल कशाला कसल्या

यकु
Fri, 04/27/2012 - 16:06 नवीन
>>>तिच्याबद्दल कशाला कसल्या अप्रोचचा अंगीकार आणि प्रसार करायचा? >>>युद्धशून्य स्थिती आहे म्हणून विचार करण्याचं स्वास्थ्य आहे आणि... --- विचार करण्‍याचं स्वास्थ्य जरुर असेल, पण जी गोष्‍ट या क्षणी नाहीच तिच्याबद्दल, तिच्या निराकरणाच्या दिशेनेही असो, अगदी अचूक विचार करणेदेखील उगाच अस्वस्‍थ असल्याचे लक्षण आहे. >>>`युद्धप्रवण प्रवृती' जी आता, या क्षणी मनात आहे तिचा निरास `युद्ध व्यर्थ आहे' या बोधातून करता येईल आणि एकदा तो झाला की युद्धाची शक्यता मावळेल. --- सर्व प्रकारचे 'बोध' हे स्वत:च्या मनाने ‍अस्तित्वात नसलेल्या गोष्‍टीबद्दल, त्या गोष्‍टींची कल्पना करुन बांधलेले पत्त्यांचे बंगले आहेत. बोध नावाचं जे काही असेल ती प्रत्येकासाठीच अत्यंत वैयक्तिक गोष्‍ट आहे, ते हस्तांतरणीय, Negotiable Instrument कदापिही नाही, त्यामुळे ना बोधाचा अंगीकार होऊ शकतो, ना प्रसार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

`युद्धप्रवण प्रवृती' जी आता, या क्षणी मनात आहे

संजय क्षीरसागर
Fri, 04/27/2012 - 17:04 नवीन
त्यामुळेच तर युद्ध कथात रस आहे आणि `युद्धस्य कथा रम्य:' म्हटलय >सर्व प्रकारचे 'बोध' हे स्वत:च्या मनाने ‍अस्तित्वात नसलेल्या गोष्‍टीबद्दल, त्या गोष्‍टींची कल्पना करुन बांधलेले पत्त्यांचे बंगले आहेत. `युद्धप्रवण प्रवृती' आहे म्हणून तर युद्धाचं समर्थन, घटनांचा उहापोह आणि जमल्यास उदात्तिकरण आहे. >बोध नावाचं जे काही असेल ती प्रत्येकासाठीच अत्यंत वैयक्तिक गोष्‍ट आहे, ते हस्तांतरणीय, Negotiable Instrument कदापिही नाही, त्यामुळे ना बोधाचा अंगीकार होऊ शकतो, ना प्रसार! बोधाचा अर्थ `अंडरस्टँडिंग'किंवा `आकलन' असा आहे. युद्ध व्यर्थ आहे हा बोध कुणालाही होऊ शकतो आणि त्याचा प्रसारही होऊ शकतो. वास्तविकात युद्ध ही राजकिय चाल आहे आणि त्यात सामान्य माणूस ओढला जातो. जर सामान्य माणूस युद्धविन्मुख झाला तर सत्ताधार्‍यांकडे सेनाबलच राहणार नाही आणि प्रत्येक सूज्ञाला युद्धापेक्षा शांतताच प्रिय आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

संजय यांचं म्हणणं पटतंय आणि

गवि
Fri, 04/27/2012 - 17:10 नवीन
संजय यांचं म्हणणं पटतंय आणि यकुचेही मुद्दे दुसर्‍या बाजूने विचार केला तर बरोबरच वाटतात. थोडक्यात आमचा बेंबट्या झाला आहे.. मुद्दाम प्रतिसाद अशासाठी की अनिष्ट वळणावर जाणारा वाद, गुद्दागुद्दी, व्यक्तिगत ऑफेन्स-डिफेन्स असे काही न होता उचितरित्या उत्तम चर्चा चालली आहे. मुद्दे मांडले खोडले जरुर जाताहेत पण ग्रेसफुली आणि रिस्पेक्टफुली.. चर्चा / वाद कसे चालावेत याचे उत्तम उदाहरण. ( विशेषतः यकु नामक आरडीएक्सचा समावेश असताना.. ;))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

गवि,

संजय क्षीरसागर
Fri, 04/27/2012 - 18:33 नवीन
प्रतिसादाबद्दल थँक्स!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

संजय यांचं म्हणणं पटतंय आणि

यकु
Sat, 04/28/2012 - 01:46 नवीन
संजय यांचं म्हणणं पटतंय आणि यकुचेही मुद्दे दुसर्‍या बाजूने विचार केला तर बरोबरच वाटतात. थोडक्यात आमचा बेंबट्या झाला आहे.. मुद्दाम प्रतिसाद अशासाठी की अनिष्ट वळणावर जाणारा वाद, गुद्दागुद्दी, व्यक्तिगत ऑफेन्स-डिफेन्स असे काही न होता उचितरित्या उत्तम चर्चा चालली आहे. मुद्दे मांडले खोडले जरुर जाताहेत पण ग्रेसफुली आणि रिस्पेक्टफुली.. चर्चा / वाद कसे चालावेत याचे उत्तम उदाहरण. ( विशेषतः यकु नामक आरडीएक्सचा समावेश असताना..
हॅहॅहॅ थँक्यू हो गवि, पण आता जे आहे ते सांगतो.. संजय क्षीरसागर यांच्याशी कदाचित पुढे होऊ शकणार्‍या चर्चांमध्ये मी तुम्हाला अपरिहार्यपणे नाराज करणार आहे. १. संजय क्षीरसागर हे आत्मज्ञान झालेले, किमान तसं माझ्या वाचनात आलेले आंतर्जालावरील एकमेव सक्रिय सदस्य आहेत, So I assume there must be something rare about Sanjayji, so I will leave no stone unturned ;-)
अनिष्ट वळणावर जाणारा वाद, गुद्दागुद्दी, व्यक्तिगत ऑफेन्स-डिफेन्स
2. कितीही मर्यादा ओलांडायची नाही म्हटलं तरी संजयजींच्या बाबतीत मात्र अपरिहार्यपणे 'व्यक्तीगत' व्हावं लागणार आहे; आत्मज्ञान झालेला माणूस व्यक्तिमत्त्वाच्या पार असतो असं म्हणतात त्यामुळं मी शिवीगाळ करीत नसेन तर संजयजींची यासाठी काहीच हरकत नसेल असं मी मानतो. 3. संजयजींचे जालावरील म्हणणे समजावून घेण्यासाठी त्यांच्या 'व्यक्तीत्वासंबंधातील' पैलुंना जाणून घेण्‍यासाठी/ कदाचित पुढे जाऊन म्हणेन की त्याबद्दल माझे अंदाज/निरीक्षणे/ मे बी निष्कर्ष सुद्धा सांगण्याकामी मला 'व्यक्तीत्वा'ला अपरिहार्यपणे स्पर्श करावा लागणार आहे. यावर तुमचा 'गविकाकांचा सल्ला' हवाय ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हॅ हॅ हॅ.. यक्कू तू रे मेल्या

गवि
Sat, 04/28/2012 - 04:09 नवीन
हॅ हॅ हॅ.. यक्कू तू रे मेल्या कधी पासून कोणाचे सल्ले मानायला लागलास.. तू काय कमी सिद्ध पुरुष आहेस की काय? तू आंजा वरचा भटकता मुक्त आत्माच की रे.. तुला कसला सल्ला देणार गविकाका..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

प्रतिसाद खाली दिला आहे

संजय क्षीरसागर
Sat, 04/28/2012 - 12:25 नवीन
इथून पुढे काही विषय असेल तर कृपया वेगळी पोस्ट असावी किंवा व्यक्तिगत संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

>>>युद्धप्रवण प्रवृती' जी

यकु
Fri, 04/27/2012 - 17:41 नवीन
>>>युद्धप्रवण प्रवृती' जी आता, या क्षणी मनात आहे >>>त्यामुळेच तर युद्ध कथात रस आहे आणि `युद्धस्य कथा रम्य:' म्हटलय ---- :) मला वाटते जगातल्या कुठल्याही गोष्‍टीचा कुठेही संबंध लावणं सहज शक्य आहे, कारण सगळं ओपन एंडेड आहे. त्यामुळे विचार, तर्काला/विचाराला कुठल्याही दिशेने जाण्यास वाव मिळाला म्हणून अर्थवहनाची ती एकच दिशा अस्तित्त्वात आहे असं मी म्हणणार नाही >>>`युद्धप्रवण प्रवृती' आहे म्हणून तर युद्धाचं समर्थन, घटनांचा उहापोह आणि जमल्यास उदात्तिकरण आहे. ---- महाभारतातील युद्धाच्या विषयावर वर चर्चा आहे म्हणून चर्चा करणारे सगळे युद्धाचे समर्थक किंवा उदात्तीकरण करणारे लोक आहेत असं मला वाटत नाही, आणि असा अंदाजही मी लावणार नाही. >>>बोधाचा अर्थ `अंडरस्टँडिंग'किंवा `आकलन' असा आहे. युद्ध व्यर्थ आहे हा बोध कुणालाही होऊ शकतो आणि त्याचा प्रसारही होऊ शकतो. ----- पटत नाही! बुद्ध झाले, महावीर झाले - यांना बरेच मोठे बोध झाले होते म्हणे, आणि त्यांचा प्रसारही त्यांनी केला होता. पण बुद्धाचा जन्मदेश भारतही हजारो वेळा युद्धाला बळी पडला, त्यानंही युद्‍धे केली आणि बुद्धाची शिकवण ज्या देशात गेली तो जपानसारखा देशही जगातल्या पहिल्या अणुबॉम्बला बळी पडला. त्यामुळं अंडरस्टॅडींग, आकलन, बोध या संकल्पना मला अत्यंत अनाकर्षक वाटतात. >>>वास्तविकात युद्ध ही राजकिय चाल आहे आणि त्यात सामान्य माणूस ओढला जातो. जर सामान्य माणूस युद्धविन्मुख झाला तर सत्ताधार्‍यांकडे सेनाबलच राहणार नाही आणि प्रत्येक सूज्ञाला युद्धापेक्षा शांतताच प्रिय आहे ----- :) सरळसोट ‍दुनियादारीकडे पाहून मांडलं गेलेलं हे फार सहज सोपं तत्त्वज्ञान आहे, पण त्याचा प्रॅक्टीकली काडीचाही उपयोग होताना दिसत नाही, कारण तो तसा होऊ शकत नाहीच. त्यामुळं कितीही चांगल्या असल्या तरी उपयुक्तता नसलेल्या (आणि हजारो वर्षांपासून रंगीत तालीम होऊन गेलेल्या) गोष्‍टींचं ओझं अंगीकारणे किंवा प्रसारित करणे अत्यंत रखरखीत गोष्‍ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

द्विरुक्ती प्रकाटाआ

यकु
Fri, 04/27/2012 - 14:37 नवीन
द्विरुक्ती प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

>>>प्रॅक्टीकली माणुस ही

प्यारे१
Fri, 04/27/2012 - 13:16 नवीन
>>>प्रॅक्टीकली माणुस ही हरामखोर जात आहे असे मला माझ्यावरुन वाटते. डिट्टो! मिलाओ हाथ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

उपप्रतिसाद नॅरो होऊन वाचायला आणि लिहायला त्रासदायक

संजय क्षीरसागर
Fri, 04/27/2012 - 18:21 नवीन
होतात म्हणून संदर्भ तोच ठेऊन इथे प्रतिसाद दिला आहे. >महाभारतातील युद्धाच्या विषयावर वर चर्चा आहे म्हणून चर्चा करणारे सगळे युद्धाचे समर्थक किंवा उदात्तीकरण करणारे लोक आहेत असं मला वाटत नाही निदान त्यांना युद्धकथेत रस आहे हे उघड आहे >पण बुद्धाचा जन्मदेश भारतही हजारो वेळा युद्धाला बळी पडला, त्यानंही युद्धे केली आणि बुद्धाची शिकवण ज्या देशात गेली तो जपानसारखा देशही जगातल्या पहिल्या अणुबॉम्बला बळी पडला. यानं युद्धाचं समर्थन होत नाही, खरं तर प्रत्येक युद्धाची निष्पत्ती "युद्ध व्यर्थ होतं" हेच दाखवते .....वास्तविकात युद्ध ही राजकिय चाल आहे आणि त्यात सामान्य माणूस ओढला जातो. जर सामान्य माणूस युद्धविन्मुख झाला तर सत्ताधार्‍यांकडे सेनाबलच राहणार नाही >सरळसोट ‍दुनियादारीकडे पाहून मांडलं गेलेलं हे फार सहज सोपं तत्त्वज्ञान आहे, पण त्याचा प्रॅक्टीकली काडीचाही उपयोग होताना दिसत नाही = जर सामान्य माणसानं साथ दिली नाही तर कोणतीही विचारप्रणाली मूळच धरू शकत नाही. प्रत्येक प्रणालीवर दोन्ही बाजूनं बोलता येईल आणि त्यात व्यक्तिगत हेतू दर्शवता येईल पण शांतता ही एकमेव चिज अशीये की ती सर्वांसाठी विधायक आहे, मग ते सजीव असोत, पर्यावरण असो की पुढची पिढी असो. माझं फक्त एकच सांगणंय की तुम्ही युद्धविन्मुख व्हा आणि इतरांना तो विचार देण्याचा प्रयत्न करा. युद्ध हे सामुहिक द्वंद्व आहे आणि जर समुहाची इच्छा नसेल तर युद्ध अशक्य आहे. युद्धोत्तेजकता हा जसा राजकिय मताप्रणाली जनमानसावर बिंबवण्याचा प्रयत्न आहे तसाच युद्धविन्मुखता हा जागतिक शांततेसाठी केलेला प्रयत्न आहे
  • Log in or register to post comments

युद्ध हे सामुहिक द्वंद्व आहे

गवि
Fri, 04/27/2012 - 18:34 नवीन
युद्ध हे सामुहिक द्वंद्व आहे आणि जर समुहाची इच्छा नसेल तर युद्ध अशक्य आहे.
इज इट? आत्तापर्यंतच्या प्रमुख युद्धांमधे दोन्ही बाजूंच्या सामान्य जनतेपैकी (मासेस / समूह) किती जणांची इच्छा "युद्ध योग्य आहे" ,"युद्ध व्हावं" अशी होती? युद्ध हा पॉवर गेम आहे आणि पॉवरमधे आलेल्या मूठभरांच्या महत्वाकांक्षेपोटी जन्म घेतो आणि चालतो असं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

>युद्ध हा पॉवर गेम आहे आणि

संजय क्षीरसागर
Fri, 04/27/2012 - 19:15 नवीन
पॉवरमधे आलेल्या मूठभरांच्या महत्वाकांक्षेपोटी जन्म घेतो आणि चालतो असं वाटतं. येस, पण तो खेळायला सामान्य लोक लागतात! आणि मजा म्हणजे ते सर्व युद्धप्रेरित असायला लागतात.. आणि त्यांना उद्युक्त करण्यात राजकारणी माहिर असतात. युद्ध हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही किंवा प्रश्न कोणताही असो, युद्धानी त्याची सोडवणूक होणार नाही हे जर समूहानं सर्वथा मान्य केलं तर राजकारणी कसं युद्ध करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

>>>>निदान त्यांना युद्धकथेत

यकु
Fri, 04/27/2012 - 18:57 नवीन
>>>>निदान त्यांना युद्धकथेत रस आहे हे उघड आहे ---- वावगे काहीही नाही. युद्धकथेत रस आहे म्हणून खरोखरचं युद्ध करुन पाहु असं कुणी म्हणणार नाही. >>>>>पण बुद्धाचा जन्मदेश भारतही हजारो वेळा युद्धाला बळी पडला, त्यानंही युद्धे केली आणि बुद्धाची शिकवण ज्या देशात गेली तो जपानसारखा देशही जगातल्या पहिल्या अणुबॉम्बला बळी पडला. >>>>यानं युद्धाचं समर्थन होत नाही, खरं तर प्रत्येक युद्धाची निष्पत्ती "युद्ध व्यर्थ होतं" हेच दाखवते ---- मुळात युद्धाच्या समर्थनार्थ ‍भूमिका घेऊन मी चर्चा करीत नाहीय. Nothing is new under the sun. युद्धे व्यर्थ आहेत असंही म्हणता येईल, युद्धे सार्थक ठरली असेही म्हणता येईल. मग दोन्ही प्रकारच्या घिस्यापिट्‍या कॅसेटी वाजवण्‍यात काय अर्थ? >>>>जर सामान्य माणसानं साथ दिली नाही तर कोणतीही विचारप्रणाली मूळच धरू शकत नाही. ----- मी सामान्य माणूस आहे आणि बुद्ध, महावीर आणि आता संजय ‍क्षीरसागर यांची 'युद्धे व्यर्थ आहेत' या विचारप्रणालीला युद्धाचे समर्थन न करताही माझ्यात मूळ धरु देत नाहीय! मूळ धरु न शकणार्‍या विचारप्रणालींना (युद्धे व्यर्थ आहेत, पण तीच सगळीकडे चालू आहेत) सामान्य माणसाची साथ हवी असणे हे ती विचारसरणीच मूळात अप्रासंगीक असल्याचे लक्षण आहे. >>>>प्रत्येक प्रणालीवर दोन्ही बाजूनं बोलता येईल आणि त्यात व्यक्तिगत हेतू दर्शवता येईल पण शांतता ही एकमेव चिज अशीये की ती सर्वांसाठी विधायक आहे, मग ते सजीव असोत, पर्यावरण असो की पुढची पिढी असो. ----- हे केवळ एक 'इश्वर अल्ला तेरे नाम' टाइप विधान आहे. युद्धांमध्‍ये तोफांचे आवाज चालू असताना आणि सैनिकांच्या शरीरांच्या चिंधड्‍या उडत असतानाही (ही वेगळी गोष्‍ट) तिथे मध्‍येमध्‍ये शांतता असतेच. शांततेतच युद्ध होतं. तुम्ही युद्धादरम्यानही असणार्‍या आणि त्या शांततेतच युद्ध सुरु असणार्‍या शांततेला शांतता मानत नाही काय? >>>>माझं फक्त एकच सांगणंय की तुम्ही युद्धविन्मुख व्हा आणि इतरांना तो विचार देण्याचा प्रयत्न करा. युद्ध हे सामुहिक द्वंद्व आहे आणि जर समुहाची इच्छा नसेल तर युद्ध अशक्य आहे. ----- ज्या दिवशी ट्वीन टॉवरवर विमानं धडकली किंवा मुंबईत अतिरेकी घुसले त्या दिवशी अफगणिस्तान मधल्या लोकांची आणि अनुक्रमे पाकिस्तानमधल्या लोकांची सामुहिक युद्धाची इच्छा होती काय? काही युद्धखोर गट असतील, ते मात्र ' तुम्ही युद्धविन्मुख व्हा' हे ऐकून घेऊ शकणार नाहीत, आणि युद्ध शक्य झाल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. >>>>युद्धोत्तेजकता हा जसा राजकिय मताप्रणाली जनमानसावर बिंबवण्याचा प्रयत्न आहे तसाच युद्धविन्मुखता हा जागतिक शांततेसाठी केलेला प्रयत्न आहे ----- अत्यंत भाबडा, 'हे असं करु नका' एवढंच सांगणं असलेला हा प्रयत्न यशस्वी होवो अशा शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

>मुळात युद्धाच्या समर्थनार्थ ‍भूमिका घेऊन मी चर्चा करीत नाहीये

संजय क्षीरसागर
Fri, 04/27/2012 - 19:55 नवीन
तुम्ही युद्धाचं समर्थन करत नाही म्हटल्यावर माझा हेतू साध्य झालाय! >युद्धे व्यर्थ आहेत असंही म्हणता येईल, युद्धे सार्थक ठरली असेही म्हणता येईल. मला युद्धमिमांसेत रस नाही, मला फक्त इतकंच सांगायचंय की "मानवी प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध हा आदिमानवी पर्याय आहे" >मूळ धरु न शकणार्‍या विचारप्रणालींना (युद्धे व्यर्थ आहेत, पण तीच सगळीकडे चालू आहेत) सामान्य माणसाची साथ हवी असणे हे ती विचारसरणीच मूळात अप्रासंगीक असल्याचे लक्षण आहे प्रत्यक्ष युद्ध खेळणारे सामन्यजनच असतात. >शांततेतच युद्ध होतं. तुम्ही युद्धादरम्यानही असणार्‍या आणि त्या शांततेतच युद्ध सुरु असणार्‍या शांततेला शांतता मानत नाही काय? अजिबात नाही, मी युद्धशून्य शांततेचा पुरस्कर्ता आहे >ज्या दिवशी ट्वीन टॉवरवर विमानं धडकली किंवा मुंबईत अतिरेकी घुसले त्या दिवशी अफगणिस्तान मधल्या लोकांची आणि अनुक्रमे पाकिस्तानमधल्या लोकांची सामुहिक युद्धाची इच्छा होती काय? काही युद्धखोर गट असतील, ते मात्र ' तुम्ही युद्धविन्मुख व्हा' हे ऐकून घेऊ शकणार नाहीत, आणि युद्ध शक्य झाल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे हा युद्धाचाच सिलसिला आहे आणि मला तेच सांगायचंय की युद्ध मग ते खुलं असो की छुपं गैर आहे. आणि परत एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की माझा फोकस एरिया तुम्ही आहात, हा तुमच्या-माझ्यातला संवाद आहे. "तुम्ही युद्धविन्मुख व्हा" मग ती लाट हळूहळू पसरत जाईल. >अत्यंत भाबडा, 'हे असं करु नका' एवढंच सांगणं असलेला हा प्रयत्न यशस्वी होवो अशा शुभेच्छा परवा अर्धवटरावनी स्वतःच्या मुलाचा एक किस्सा लिहीला होता. तो मुलाला खेळवत होता, त्याच्या एका हातात वाघाचं चित्र आणि दुसर्‍या हातात हरिण आहे, वाघ हरणाच्या पाठीमागे लागलाय आणि तो झडप घालणार इतक्यात त्याच्या मुलानी हरणाचं तोंड वाघाकडे वळवलं आणि म्हणाला "पप्पी, पप्पी"! माझा विश्वास तितकाच भाबडा आहे आणि प्रत्येकाला शांतताच हवीये हे मला माहितीये कारण ते त्याच स्वरूप आहे .
  • Log in or register to post comments

>>>>तुम्ही युद्धाचं समर्थन

यकु
Fri, 04/27/2012 - 20:19 नवीन
>>>>तुम्ही युद्धाचं समर्थन करत नाही म्हटल्यावर माझा हेतू साध्य झालाय! ------ नाही. युद्धे होण्याचं समर्थन करीत नसलो तरी, 'युद्धे व्यर्थ आहेत' या घोषाचीही निरर्थकता मी मला दिसते, त्यामुळंच एवढे प्रतिसाद दिले आहे. >>>>मला युद्धमिमांसेत रस नाही, मला फक्त इतकंच सांगायचंय की "मानवी प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध हा आदिमानवी पर्याय आहे" ---- एवढंच सांगून चालणार नाही, ते लोकांनी ऐकायला आणि मानायला हवं अशी इच्छा आहे की फक्त बोलतच रहाण्‍याची इच्छा आहे? >>>>मूळ धरु न शकणार्‍या विचारप्रणालींना (युद्धे व्यर्थ आहेत, पण तीच सगळीकडे चालू आहेत) सामान्य माणसाची साथ हवी असणे हे ती विचारसरणीच मूळात अप्रासंगीक असल्याचे लक्षण आहे >>>>प्रत्यक्ष युद्ध खेळणारे सामन्यजनच असतात. ----- आणि ते 'युद्धे व्यर्थ आहेत' असं ते मानत नाहीत, आणि 'युद्धे व्यर्थ आहेत' हे नुसतं सांगण्‍यावेगळा काही उपाय असल्याचं बहुधा तुम्ही मानत नाही. >>>शांततेतच युद्ध होतं. तुम्ही युद्धादरम्यानही असणार्‍या आणि त्या शांततेतच युद्ध सुरु असणार्‍या शांततेला शांतता मानत नाही काय? >>>>>अजिबात नाही, मी युद्धशून्य शांततेचा पुरस्कर्ता आहे ----- अशी युद्धशून्य शांतता ना कधी अस्तित्त्वात होती, ना आता सध्‍या आहे ना पुढेही कधी असेल. >>>>>हा युद्धाचाच सिलसिला आहे आणि मला तेच सांगायचंय की युद्ध मग ते खुलं असो की छुपं गैर आहे. ----- नुसतं सांगत रहाण्‍यापेक्षा काही वेगळा उपाय तुमच्याकडे आहे काय? सांगायला काय बरेच लोक बर्‍याच गोष्‍टी सांगत रहातात, पण आपण सांगत असलेल्या या गोष्‍टी पूर्वीही सांगून झाल्या आहेत, आणि ही लागू पडणारी उत्तरे नव्हेत हे काळानं दाखवून दिलं आहे, आता नवी उत्तरं शोधावी लागणार आणि जे उत्तर प्रॅक्टीकली लागू पडत नाही ते सरळ कचर्‍यात फेकून द्यायला हवं असं मला वाटतं. >>>>>आणि परत एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की माझा फोकस एरिया तुम्ही आहात, हा तुमच्या-माझ्यातला संवाद आहे. "तुम्ही युद्धविन्मुख व्हा" मग ती लाट हळूहळू पसरत जाईल. ------ मुळात तुमची इथे भेट होण्‍याआधीही मी युद्धावर जाण्‍याची शक्यता नव्हतीच. त्यामुळं या संवादातील तुमच्या म्हणण्‍यावरुन युद्धविन्मुख होण्‍याचा प्रश्न नाही. लाट वगैरेबद्दल मी काही सांगू शकत नाही. >>>>>अत्यंत भाबडा, 'हे असं करु नका' एवढंच सांगणं असलेला हा प्रयत्न यशस्वी होवो अशा शुभेच्छा >>>>>माझा विश्वास तितकाच भाबडा आहे आणि प्रत्येकाला शांतताच हवीये हे मला माहितीये कारण ते त्याच स्वरूप आहे . ------- पुन्हा एकदा शुभेच्छा. :)
  • Log in or register to post comments

आता सगळं एकदम सोपं झालं!

संजय क्षीरसागर
Fri, 04/27/2012 - 21:33 नवीन
>युद्धे होण्याचं समर्थन करीत नसलो तरी, 'युद्धे व्यर्थ आहेत' या घोषाचीही निरर्थकता मी मला दिसते, त्यामुळंच एवढे प्रतिसाद दिले आहे. >एवढंच सांगून चालणार नाही, ते लोकांनी ऐकायला आणि मानायला हवं अशी इच्छा आहे की फक्त बोलतच रहाण्‍याची इच्छा आहे? >आणि ते 'युद्धे व्यर्थ आहेत' असं ते मानत नाहीत, आणि 'युद्धे व्यर्थ आहेत' हे नुसतं सांगण्‍यावेगळा काही उपाय असल्याचं बहुधा तुम्ही मानत नाही. >अशी युद्धशून्य शांतता ना कधी अस्तित्त्वात होती, ना आता सध्‍या आहे ना पुढेही कधी असेल. >नुसतं सांगत रहाण्‍यापेक्षा काही वेगळा उपाय तुमच्याकडे आहे काय? सांगायला काय बरेच लोक बर्‍याच गोष्‍टी सांगत रहातात, पण आपण सांगत असलेल्या या गोष्‍टी पूर्वीही सांगून झाल्या आहेत, आणि ही लागू पडणारी उत्तरे नव्हेत हे काळानं दाखवून दिलं आहे, आता नवी उत्तरं शोधावी लागणार आणि जे उत्तर प्रॅक्टीकली लागू पडत नाही ते सरळ कचर्‍यात फेकून द्यायला हवं असं मला वाटतं. >मुळात तुमची इथे भेट होण्‍याआधीही मी युद्धावर जाण्‍याची शक्यता नव्हतीच. त्यामुळं या संवादातील तुमच्या म्हणण्‍यावरुन युद्धविन्मुख होण्‍याचा प्रश्न नाही. लाट वगैरेबद्दल मी काही सांगू शकत नाही. >पुन्हा एकदा शुभेच्छा = इंटरनेटवर मी फक्त सांगू शकतो आणि विचार हा एच्छिक कृत्याचा स्त्रोत आहे हे सर्वज्ञात आहे. युद्धाला प्रवृत्त करणं असो की युद्धापासून विन्मुख करणं असो शेवटी सर्व संवादावर अवलंबून आहे. एखादं वक्तव्य आणि रूजवलेली धारणा युद्धाला प्रवृत्त करते तर मग युद्ध व्यर्थ आहे ही धारणाच ते पटलेल्या प्रत्येकाला युद्धविन्मुख करेल हे निर्विवाद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

उत्तरच नसलेल्या प्रश्नांना

यकु
Fri, 04/27/2012 - 22:09 नवीन
उत्तरच नसलेल्या प्रश्नांना खरोखर सार्थक, प्रॅक्टीकल उत्तर नाही हे मान्य न करता खूबीने दिलेली बगल आवडली नाही. उलट युद्धावर जाण्याविषयी मी वर पुरेशा प्रमाणात भूमिका मांडलेली असूनही पुन्हा युद्धाला प्रवृत्त किंवा विन्मुख करण्यात संवादाचा तकलादू दुवा कायम ठेवण्याच्या इच्छेतून तर तुम्हीही रजनीशांप्रमाणेच (कदाचित त्यांच्या विचारांच्या छायेत तुम्हाला तथाकथित आत्मज्ञान झाल्यामुळे असेल ) फक्त प्राप्त आयुष्यात 'टाईम कंज्युम' करुन मागे गबाळ सोडण्यावरच भर देणार आहात काय असा प्रश्न पडला आहे. तूर्तास रजा घेतो. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

>उत्तरच नसलेल्या प्रश्नांना खरोखर सार्थक, प्रॅक्टीकल उत्तर नाही

संजय क्षीरसागर
Fri, 04/27/2012 - 22:28 नवीन
हे मान्य न करता खूबीने दिलेली बगल आवडली नाही. = युद्ध हे कोणत्याही मानवी प्रश्नाचं उत्तर नाही हे विधानच उत्तर आहे आणि मी सर्व विवाद इथे संपवलेलाय.
  • Log in or register to post comments

अग आई ग! मुळ विषय सोडुन चर्चा

स्पंदना
Sat, 04/28/2012 - 04:38 नवीन
अग आई ग! मुळ विषय सोडुन चर्चा कुठलया कुठ्ठ पोहोचली, मी तर वाचता वाचता कर्ण विसरुनच गेले. हां तर काय सांगत होते, शरद यांचा लेख परिक्षेच्या पेपरमध्ये कस मुद्देसुद लिहितात तसा झालाय. म्हणजे आवरुन लिहिल्या सारखा. घे मुद्दा , थोडासा विस्तार, अन मग पुर्ण विराम. त्यातला रस आटत चाललाय. नुसत विवेचन, निरस. वल्ली अन मृत्युंजयांच्या चर्चा विस्ताराने बरीच भर पडते , कारण महाभारत हे फक्त एका व्यक्ती विषयी नाही, तर एका कुटुंबा विषयी आहे. अन त्या कुटुंबातल्या कलहाचे पर्यवसान एका महायुद्धात झालेले आपण पहातो. त्यामुळे अस कोरडे पणान न लिहिता अनुषांगिक लिहिण जास्त संयुक्तिक ठरेल.
  • Log in or register to post comments

कृष्णाचं राजकारण भलतंच लवचिक

शिल्पा ब
Sat, 04/28/2012 - 10:38 नवीन
कृष्णाचं राजकारण भलतंच लवचिक होतं नै का!!
  • Log in or register to post comments

यशवंत,

संजय क्षीरसागर
Sat, 04/28/2012 - 14:04 नवीन
>संजय क्षीरसागर यांच्याशी कदाचित पुढे होऊ शकणार्‍या चर्चांमध्ये मी तुम्हाला अपरिहार्यपणे नाराज करणार आहे. = कुणीच नाराज होऊ नये अशी अपेक्षा आहे कारण उद्विग्नतेतून उद्विग्नताच निर्माण होते. मी लिहीन ती खुली आणि मोकळी चर्चा असू द्या, तो "सहप्रवास" झाला तर सर्वांना उपयोगी आणि आनंदाचा होईल >१. संजय क्षीरसागर हे आत्मज्ञान झालेले, किमान तसं माझ्या वाचनात आलेले आंतर्जालावरील एकमेव सक्रिय सदस्य आहेत, So I assume there must be something rare about Sanjayji, so I will leave no stone unturned = मी स्वत:ला कोणत्याही प्रकारे विषेश समजत नाही. माझं आकलन तुमच्याशी शेअर करून "तुम्ही सत्य आहात" हे सांगण्याचा माझा प्रयत्न राहिल >अनिष्ट वळणावर जाणारा वाद, गुद्दागुद्दी, व्यक्तिगत ऑफेन्स-डिफेन्स 2. कितीही मर्यादा ओलांडायची नाही म्हटलं तरी संजयजींच्या बाबतीत मात्र अपरिहार्यपणे 'व्यक्तीगत' व्हावं लागणार आहे; आत्मज्ञान झालेला माणूस व्यक्तिमत्त्वाच्या पार असतो असं म्हणतात त्यामुळं मी शिवीगाळ करीत नसेन तर संजयजींची यासाठी काहीच हरकत नसेल असं मी मानतो. = सत्य समजलेल्या व्यक्तीनं आपण "केवळ व्यक्ती नाही" हे जाणलेलं असलं तरी रोजच्या जगण्यात त्याला व्यक्ती म्हणूनच जगावं लागतं. संसारिक आणि शारीरिक विवंचना, वादविवाद, जवाबदार्‍या, नातेसंबंध, मित्रमैत्रिणी हे सर्व काही इतरांसारखच असतं फक्त सत्य गवसल्यानं तो स्वच्छंद जगतो आणि त्याचा मूड लाईट असतो इतकंच >3. संजयजींचे जालावरील म्हणणे समजावून घेण्यासाठी त्यांच्या 'व्यक्तीत्वासंबंधातील' पैलुंना जाणून घेण्‍यासाठी/ कदाचित पुढे जाऊन म्हणेन की त्याबद्दल माझे अंदाज/निरीक्षणे/ मे बी निष्कर्ष सुद्धा सांगण्याकामी मला 'व्यक्तीत्वा'ला अपरिहार्यपणे स्पर्श करावा लागणार आहे. = कुणाही सत्याप्रत पोहोचलेल्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वाचा अ‍ॅनॅलिसिस, त्याचं प्रसंगोत्पात वागणं, त्याची शैली, यांचा उहापोह किंवा अनुसरण करून तुम्ही सत्याप्रत पोहोचू शकत नाही; तर त्या व्यक्तीचा निराकाराचा बोध आणि त्यानं त्याचा हरप्रसंगी कौशल्यानं केलेला उपयोग तुम्हाला सत्याची (किंवा स्वत:ची) उकल घडवू शकतो. असो, हा प्रतिसाद शरदच्या पोस्टशी विसंगत आहे पण तो दुसरीकडे देता येणं शक्य नसल्यानं इथे दिला गेलायं त्याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो.
  • Log in or register to post comments

इन्द्राने कवच का मागितले

सुजित पवार
गुरुवार, 05/03/2012 - 20:46 नवीन
ईन्द्राने कवच का मागितले? दुसरे द्युत खेलताना स्वताचि पत्नि पान्द्वनि का पनास लावलि? द्युतात पत्निला लाव्ननारे पाडव काय किवा तिचे वस्त्र हरन करनारे कौरव काय सर्व सार्खेच.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा