आज घरातील सर्व मंडळी काही कारणास्तव चार दिवसांसाठी बाहेरगावी गेलेली असल्याने मी घरात एकटाच पडलो होतो आणि त्यामुळेच घरातील 'स्व' जेवणाची जबाबदारीसुद्धा सर्वस्वी माझ्यावर पडली होती. तसा मी भात अगदी मस्त करतो (एकट्यापुरताच) परंतु रोज रोज भात खाण्यापेक्षा आज जरा वेगळं करुया असे वाटले. पण वेगळ म्हणजे नेमक काय करायच? कारण ऑम्लेट- भाताच्या पुढे माझी कधीच उडी गेली नव्हती; नव्हे तसं धाडसच मी कधी केलं नव्हत. (त्यात आळस हा घटकही किंचितसा कारणीभूत होताच!) पण आज मात्र काहीतरी असं धाडसी कृत्य करावच अस मनापासून वाटू लागल होतं. त्यात मिपाच्या पाकृ लेखांनी मला चांगलच पछाडून सोडल्यानं शेवटी नाही नाही म्हणता भाताच्या ऐवजी चपात्या हा साधा पदार्थ आणि ऑम्लेटच्या ऐवजी अंड्याचे कालवण करावे असे ठरले.
मग ठरल्या प्रमाणे मी किचनकडे वळलो. पण अचानक किचनच्या दारातच मी चूळबूळत थबकलो, मनात एकप्रकारची बैचेनी वाढून, माझी छाती जोरजोरात धडधडू लागली. का कुणास ठाऊक पण मध्येच लग्न होऊन प्रथमच सासरच्या घरात प्रवेश करणार्या नववधू सारखे मला उगीच भासू लागले. त्यामुळे मनावर एकप्रकारचे दडपण आले. पण मग मी आपल्याच धडधडत्या छातीवर हात ठेवत, रडणार्या मुलीला उगी उगी म्हणणार्या वधूच्या पित्यासारखे सगळं ठिक होईल असे स्वतःला समजावत मनातील भिती आणि नर्व्हसपणा कमी करत हळूच नकळत पायाखाली नजर टाकली आणि तांदळाचा तांब्या पायाखाली नाही याची खात्री करत मग मी किचनमध्ये इंट्री केली. प्रथम टाईम मॅनेजमेंटसाठी मोबाईल पाहीला. सकाळचे बरोब्बर साढे आठ वाजले होते, चला म्हणजे स्वयंपाकाला आपणाकडे भरपूर वेळ आहे असे म्हणत मी गव्हाच्या पिठाचा डबा बाहेर काढला. तसा मला अजूनही गव्हाच्या आणि ज्वारीच्या पिठातला फरक कळत नाही, पण रोज स्वयंपाक करताना दिदिच्या जवळ हाच डबा असतो हे माझ्या चाणाक्ष नेत्रांनी मी पाहीले होते त्यामुळे हा डबा गव्हाच्या पिठाचाच आहे हे मला माहीत होते.
डब्यातले पिठ चाळणीने चाळून मग त्यात थोडे पाणी टाकून ते मी मळू लागलो. काही वेळ माझ काम अगदी सराईतपणे चालू झालं, पण पिठाच्या मनात मात्र माझ्या विरुध्द वेगळच कटकारस्थान शिजत असावं. कारण पिठ व्यवस्थितपणे मळून झालं तरीसुद्धा ते काहीस टणक वाटत होतं. त्यामुळे पुन्हा पाणी टाकून ते मी मळू लागलो पण काही उपयोग झाला नाही, शेवटी मग मळून झालेल्या पिठाला नरमपणा आणण्यासाठी आणि त्यावर मळणीचा शेवटचा हात मारण्यासाठी मी त्यावर थोडे तेल चोपडले आणि तेथेच पिठाने उग्र रुप धारण करण्यास सुरवात केली!
आगीत पेट्रोल टाकावे आणि त्याचवेळी आगीने चवताळून एकच भडका घ्यावा अशी त्यावेळी त्या पिठाची अवस्था झाली. काही क्षणांत त्या पिठाने माझ्या हाताला च्विंगम पेक्षाही भयानक असे चिटकायला सुरवात केली, त्यातून बचावासाठी मी त्यावर काही पाण्याचा शिडकावही केला पण त्याने स्थिती आणखीनच बिघडली. शेवटी कधी पाणी, कधी सुके पिठ, पुन्हा पाणी आणि पुन्हा सुके पिठ अशी क्रमाक्रमाने त्यात भर टाकत गेलो. अर्ध्या तासानंतर छोट्या दोन चपातीच्या पिठाने दुप्पट आकार घेतल्यानंतर पिठाची आग काही अंशी तरी शमली आणि तेथेच मनगट पकडून विव्हळत मी दहा मिनिटांची रेस्ट घेतली! सलग अर्धा तास नॉन स्टॉप पिठ मळत असल्याने हाताची बोटे आणि मनगट ठण्णss ठण्णss ठणकून निघत होते आणि त्यात मी अधिक वेळ रेस्टही घेऊ शकत नव्हतो; कारण ते पिठ अजुनही काहीसे टणकच राहीले होते आणि आणखी अर्धा एक तास जर मी थांबलो तर त्याच्या मला वरवंट्यानेच चपात्या लाटाव्या लागल्या असत्या!
त्यामुळे पुन्हा मी माझ्या कामाला लागलो. काही वेळ पुन्हा तेल चोपडून मी त्या पिठाला चांगले मळून-मळून काही अंशी तरी नरम करण्यात यशस्वी झालोच! पिठ मळणीच्या यशस्वी मोहीमेनंतर ते पुढीलप्रमाणे दिसू लागले. (यापुर्वीचे म्हणजेच, पिठ मळणीचे फोटो अतिशय भयानक असल्याने त्या कार्याचे फोटो काढण्याचे कटाक्षाने टाळलेले आहेत)

मळलेल्या पिठाचे चपात्यांसाठी सम-चार गोळे करण्यात आले. आहाहाss! काय ते पिठाचे गोळे चिकने दिसत होते म्हणून सांगू. ते पिठाचे आकर्षक गोळे पाहून मला तर सातारच्या गोग्गोड कंदी पेढ्यांचीच आठवण आली आणि तोंडाला भरभरुन पाणी सुटले,
पण दुसर्याच क्षणी याच पिठाच्या मळणीचे आत्ताच आलेले भयानक, ताजे अनुभव आणि ते प्रसंग आठवून तोंडचे पाणी आल्या पावली तोंडाला आणि घशाला कोरड पाडून तसेच परत पळाले! आता माझ्या कामाला खरी सुरवात झाली. तवा गॅसवर ठेऊन मी चपाती लाटायला घेतली. पण आता त्या गोळ्याने पोळपाटालाच चिकटण्याचा पावित्रा घेतला. "पिठ पोळपाटाला चिकटायला नको म्हणून त्याला सुके पिठ लावायचे असते." हे बहीणीचे कोणे एके काळी कोणालातरी सांगतानाचे अमृत बोल माझ्या कानांना आठवले आणि मग मी त्याला लग्गेच हाताने पावडर लावतात तसे पिठ लावले. पण तरी सुद्धा ते पिठ पोळपाटाला काहीसे चिकटतच होते. चपाती लाटताना स्त्रियांच्या हातात चपात्या कशा पोळपाटावर गरगर फिरतात, पण माझी चपाती गोल फिरायचे सोडाच पण तिथल्या तिथे सुद्धा हलत नव्हती. शेवटी मग ती चपाती तशीच पोळपाटावर ठेऊन चपातीऐवजी पोळपाट फिरवून मी तिला गोल आकार देऊ लागलो. काही प्रमाणात मी यशस्वी झालोही होतो पण ते पाहून मध्येच नशीबाच्या पोटात खुपलच! त्यामुळे नंतर चपाती लाटल्यानंतर चपातीने गोल आकार तर घेतला पण तो भलताच विचित्र दिसत होता. बरं असू दे असं म्हणून मी ती माझ्या आयुष्यात प्रथमच बनविलेली एकुलती एक चपाती तव्यात अंथरली!

आता चपातीचा आकार चुकला म्हणून काय एवढं पण दात काढायची गरज नाही! ही मी बनवलेली पहीलीच आणि मुख्य म्हणजे तुटून रिमेक न होता यशस्वीपणे तव्यात पडलेली चपाती आहे! ही चपाती भाजून झाल्यावर मात्र तिने अचानक आपले अंग ताठरून का घेतले(?) तेच कळाले नाही. त्यामुळेच की काय; पण म्हणून मला तिच्याकडे बघून उगीच दिवाळीच्या कडाकण्याची आठवण आली! आता बारी होती ती दुसर्या चपातीची. पहीलीचा अनुभव लक्षात घेता मी दुसरी चपाती जास्त पातळ लाटली नाही आणि त्यामुळेच ती पहीली पेक्षा थोडीशी नरम झाली.
पण येथे दोन्ही चपात्या भाजताना त्या पुर्णपणे नरमही झाल्या नव्हत्या की त्यांना पापडचा कुठे लवलेशही आला नव्हता. नाही म्हणायला पहीली चपातीच पुर्णपणे पापड झाली होती ती गोष्ट वेगळी! शेवटी तिसर्या चपातीच्या घडीला मी थोडे तेल लावले व ती लाटून तव्यात टाकली. त्यामुळे ती चपाती पहील्या दोन्हीं चपात्यांपेक्षा अधिक नरम झाली आणि म्हणून खुश होत मीच माझ्या पाठीवर थाप मारुन स्वतःला शाबाशकी दिली. एव्हाना चपातीने चपाती नामक खाद्यपदार्थाच्या गुणधर्मात दिसण्यास सुरवात केली होती.

(हा श्रीलंका नव्हे! तसा प्रश्न कोणीतरी नक्कीच काढेल, म्हणून मी ही चपाती उलटी फिरवलेली आहे)
शेवटची चपाती तव्यात टाकल्यावर मात्र मी आनंदाने टुन्नकन उडीच मारली. चौथी चपाती अक्षरशः फुगली होती! एखादी मुलगी पटल्यावर झाला नसेल एवढा आनंद मला त्यावेळी झाला.

अशा प्रकारे चार चपात्या यशस्वीपणे तयार झाल्या होत्या. म्हणजेच मिशन चपाती कंप्लिट.

सहजपणे म्हणून मी घड्याळात नजर टाकली तर बारा-वीस झाले होते. म्हणजे चार चपात्यांसाठी मला जवळजवळ तिन तास लागले होते! घड्याळाकडे दुर्लक्ष करित मी माझ्या पुढच्या मोहीमेकडे वळलो. मनात म्हटल अजुन दहाच वाजलेत अजुन खुप वेळ आहे!
अंड्याच्या कालवणासाठी प्रथम कांदा आणि टोमॅटो बारीक कापून घेतले. येथेसुद्धा नवीन सुरी तिला काहीच धार नसल्यासारखी करत मला खिजवत होती. पण मी सुद्धा एकाच जाग्यावर पुन्हापुन्हा सुरी फिरवत टोमॅटो कापत होतो, त्यात कांदाही ओला असल्याने पाण्यातील माशासारखा सुरीच्या कचाट्यातून निसटून पळत होता व मिही त्याला वारंवार पकडून बळी घेणार्या कसायासारखा त्याला कापत होतो. कितीही झाले तरी आता मी कोणाकडूनही हार मानून घेणार नव्हतो. त्यामुळेच जिद्धिने आणि चिकाटीने मी माझे काम करत होतो. पंधरा मिनिटांनी कांदा आणि टोमॅटोची धरपकड आणि कापाकापी झाली!

जेवताना कालवणात कोणकोणत्या पदार्थांची चव लागते ते आठवत हळूहळू त्या-त्या पदार्थांची किचनकट्यावर हजेरी लावण्यात आली.

आता येथे श्रीखंडाचे लेबल असलेल्या डब्यात मिठ आहे. त्यामुळे अंड्याच्या कालवणात श्रीखंडही टाकतात का असा उगीच पाणचट प्रश्न कोणीही विचारु नये! (नवशिकाऊ स्वयंपाक कर्ते असा त्यांचा अपमान कदापी सहन करणार नाहीत! जो कोणी असे विनोद करेल त्याला आमच्या याच पाकृचे पोटभर जेवण भरवले जाईल याची गंभीरपणे नोंद घ्यावी!)
तर आता आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळू (सिनेमातला नव्हे!) टोप गॅसवर ठेऊन मी त्यात अनुक्रमे, तेल, जिरे, हळद आणि चटणी टाकली व चांगले परतून घेतले. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो टाकले.

आता पाणी टाकायची वेळ आली. पण अरेरे! पाणी कुठे आहे? मसाल्याच्या गडबडीत कालवणासाठी लागणारा मुख्य पाणी हा घटक घ्यायचा विसरुनच गेला होता. त्यामुळे ऐन वेळी पाण्याने माझी चांगलीच तारांबळ उडाली आणि पाणी घेण्याच्या गडबडीत कांदा हलवण्याचे मला विस्मरण झाले. त्यामुळे मध्येच माझे दुर्लक्ष झाल्याने टोपातील मसाला माझ्यावर कोपला आणि त्याने हळूहळू कोळशाचा रंग धारण केला. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन मी तातडीने त्यात पाणी टाकले आणि पुढचा अनर्थ टळला. तरीही काही बरेच काळे ठिपके वर तरंगू लागले. त्याकडे कानाडोळा करत मी त्यात मिठाची चिमट टाकली. छे! मिठ सुद्धा थोडेच राहीले आहे. नवीन पाकीट फोडून टाकावे लागेल. विचार करत करत मी ते मिश्रण चांगले ढवळून उकळण्यासाठी फास्ट गॅसवर ठेवले.

कालवणाला उकळी फुटल्यानंतर त्यात अख्खे दोन अंडे न ढवळता फोडण्यात आले आणि ते मिश्रण पाच मिनिटांसाठी झाकून ठेवले. पाच मिनिटांनी कालवण खदखदू लागले. सर्व घरभर मॅगीसारखा मंद मोहक सुवास सुटला. आणि पुन्हा पोटात कावळे ओरडू लागले.

घड्याळात आता दुपारचा एक वाजला होता. वेळ न दवडता मी माझी अशी स्पेशल डिश सजवून तयार केली.

कोणाच्याही मदतीशिवाय आपण जेवण बनवले या आनंदात मी जेवायला घेतले आणि चपातीचा एकच घास तोडून तो तोंडात टाकला तोच!......
काहीतरी पाणचाट तोंडात गेल्यासारख वाटल. हे असं का वाटाव हे प्रथम मलाच काही कळाल नाही. मी जास्त लक्ष न देता सरळ टीव्ही ऑन केला आणि टीव्ही बघत पुन्हा जेवणास आरंभ केला. पहीली चपाती तर कडाकण्यासमानच असल्याने तिचा वापर लिज्जत पापड सारखा करावा असे मी ठरवले व त्यानुसार जेवणाचा एक घास घेतल्यानंतर मी ती चपाती तोंडी लावत कडाडूम कुडूडूम अशी करत खाऊ लागलो (चपाती पापडासारखी इतकीही पातळ आणि कुरकुरीत झालेली नव्हती. तर ती जाडसर आणि कडकडीत झालेली होती. त्यामुळे कुर्रम कर्रम असा आवाज न करता ती कडाडूम कुडूडुम असाच आवाज करत होती.)
दोन-तिन घास पोटात गेल्यानंतर मात्र कावळ्याची चलबिचल कायमचीच थांबली. बहुदा असल्या जेवणाने पोटातील कावळे पोटातल्या पोटातच मेले असावेत! पण त्यामुळे परिणाम मात्र वेगळा झाला. पोटातील प्रत्येक आतडे जिवाच्या आकांताने त्या घासाला परतुन लावू लागले. भुकेसाठी पोटाचं तिळ-तिळ तुटणं मी ऐकून आहे पण येथे तर जेवणाच्या घासानेच पोट तिळ-तिळ तुटताना मी पहील्यांदाच पाहत होतो! हिंदी पिक्चरमध्ये एखादी स्त्री कलाकार काही प्रसंगाला जशी भावनाविवश होऊन जिवाच्या आकांताने "नहीsssss.." म्हणून ओरडते तसेच माझे प्रत्येक आतडेसुद्धा अक्षरशः बोंबलत होते. उशीरपर्यंत उपाशी राहील्याने कदाचित असे झाले असेल म्हणून मी शेवटी प्रत्येक घासाला पाण्याचा घोट घेऊ लागलो निदान त्यामुळे तरी असे होणार नाही. पण कशाचे काय! चार-पाच घास घेतल्यानंतरसुद्धा तिच स्थिती. काही वेळानंतर मात्र माझ्या मनानेच त्या जेवणाची धास्ती घेतली. चपातीमुळे कदाचित असे झाले असावे मी दुसरा निष्कर्ष काढला आणि फ्रिजमधील ब्रेडचं पाकिट काढल. आता त्या चपातीला कायमचा रामराम करुन मी ब्रेड आणि कालवणावरच आपला लंच भागवण्याचे ठरवले. पण हे काय! त्या ब्रेडच्या घासालाही तसाच अनुभव येऊ लागला. आता मात्र मला काहीच समजेना, कालवण तरी बरोबर झालं होतं मग हे असं काय होतय?
विचार करण्यात आणि जेवणात माझा उरलेला निम्मा दिवस संपला. यानंतर सलग दोन दिवसांपर्यंत माझ्या अंगात कणकणी भरुन आली व काही प्रमाणात ते तापलेही होते. या घडल्या प्रकारानंतर मात्र मी कानाला खडाच लावला. स्वयंपाकाची आणि स्पेशली माझ्याच हातच्या जेवणाची मी चांगलीच धास्ती घेतली. पुढे घरातील मंडळी येईपर्यंत मग मी ऑम्लेट आणि ब्रेड यावरच भागवले.
पाच दिवसानंतर ज्यावेळी घरातील सर्व मंडळी आली त्यावेळी त्यांना हा माझा सगळा पराक्रम कळाला आणि सगळ्यांनी कपाळावरच हात मारुन घेतला. कशाला अशा उचापती करायच्या म्हणून सर्वांनी जाहीरपणे माझी चांगलीच टर उडवली.
नंतर हळूहळू त्यांच्या बोलण्यातून सहजच माहीती पडले की डब्यातील चटणी तिखट कमी असल्याने अधिक टाकावी लागते, तसेच चपाती या प्रकारात मिठ हा घटकसुद्धा सामाविष्ठ असतो. जो मी टाकलाच नव्हता, नव्हे त्याचा विचारच मी केला नव्हता. सगळ्यात शेवटीची आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या डब्यात मिठ असायचे तो डबा ऐन वेळी बदलून खायच्या सोड्याचा करण्यात आलेला होता! आणि याची सुचना ते सर्वजण बाहेर जाताना मला वारंवार देण्यात आलेली होती, परंतु त्याचवेळी मी झोपेत असल्याने ते बोलणे एका कानाने ऐकून तिथेच दुसर्या कानाने मी सोडून दिले होते. आता घ्या!!!! या सर्व स्पष्टीकरणाने मला मी बनवलेल्या जेवणाच्या भयानकतेचे रहस्य पुर्णपणे उलगडले. सत्य स्थिती कळ्ल्यावर आता यावेळी कपाळावर हात मारुन घेण्याची पाळी माझीच होती.
-सत्यघटित
७ एप्रिल २०१२
मिसळपाव
प्रतिक्रिया
बापरे! बराच सोडा पोटात गेला
बापरे! बराच सोडा पोटात गेला म्हणायचा.;)
असो, चार सोपे पदार्थ सहज शिकता येतील असे वाटते.
सोड्याच्या डब्याचा जो घोळ झाला तसाच माझ्याकडूनही झाला होता.
गाजर हलव्यात साखरेऐवजी मीठ घातले आणि सगळा प्रकार डोळ्यादेखत वाया गेल्याचे अजून वाईट वाटते.
असु दे हो. फार नका वाईट वाटुन
असु दे हो. फार नका वाईट वाटुन घेउ. तुम्ही जीवंत राहिलात हिच फार मोठी गोष्ट नाही का?
पहिला प्रयत्न असला तरी
पहिला प्रयत्न असला तरी बर्यापैकी यशस्वी झालाय. असले उपद्व्याप केलेले दिवस आठवले आणि हसू आलं. पण कधी हट्ट सोडला नाही शिकण्याचा !! त्याचा फायदा हा झाला की कुणी बनवून देईल किंवा विकत आणू हा विचार कधी करावा लागला नाही. मनात आलं की करुन खाता येऊ लागलं. आपल्या पोटाला लागणारं करुन खाण्यात कमीपणा तो कसला ? फारच बोललो राव. असो पुढील रेशिपीसाठी शुभेच्छा !
छान
सहाव्या फोटोतील पापड भाजलेले आहेत ना ;)
हे हे हे ,मलाहि असच वाटलं ते
In reply to छान by इरसाल
हे हे हे ,मलाहि असच वाटलं ते पापड आहेत म्हनुन
पण तस नाहिय ......:P
प्रयत्न आवडला .... :)
पापडांपेक्षा
In reply to हे हे हे ,मलाहि असच वाटलं ते by जेनी...
पापडांपेक्षा होलव्हीट खाकरे जास्त वाटत आहे :P
असो स्वयंपाक करताना चुका ह्या होतचं असतात :)
तुमच्या मेहनतीला दाद :)
हम्म्...कळल ना तुला स्वयंपा़क
हम्म्...कळल ना तुला स्वयंपा़क करणे कीती अवघड असते ते ;)
दिद्दीकडुन शिकुन घे हळुहळु मग पुन्हा अशी वेळ आली तर गोची होणार नाही तुझी ;)
असो ..हा पाक्रु. चा फड्शा पाड्लेला व्रुतांत आवडला गेला आहे :)
हा हा...
माझ्या मित्रानं घरी एकटा असताना, 'वन पॉट मील' मध्ये वराइटी म्हणून भात करताना तांदळातच मीठ, तीखट आणि आंडी फोडून टाकली होती. तो पदार्थ झाल्यावर कसाबसा अर्धा खाउन संपवला. कूकर मध्ये ते अर्धं तसच ठेउन स्वारी लगेच कॉलेजला गेली, त्या दिवशी हॉस्टेल वरच्या मित्राकडे राहून दुसर्या दिवशी संध्याकाळी घरी परितले आणि दार उघडल्या बरोबर दारातच ओकले! :)
होतं असं...
होतं असं कधी कधी. विसेषतः नव्यानेच स्वयंपाक शिकताना. पण हतोत्साहित होऊ नये. अशा अनुभवांमधून शिकतच चांगला स्वयंपाक येऊ शकतो. पियुशाला स्वयंपाक अवघड वाटत असेल तर वाटू दे बापुडा. पण नेटाने शिकल्यास काहीही (स्वयंपाकात तरी) अवघड नाही.
@ पेठकर काका पियुशाला
@ पेठकर काका
पियुशाला स्वयंपाक अवघड वाटत असेल तर वाटू दे बापुडा
अहो मी गंमत केली त्याची !!
अन मला स्वयंपाक अवघड नै वाटत , घरच्याना मला स्वयंपाक करताना पाहुन अवघड वाटत ;)
गंमत..
In reply to @ पेठकर काका पियुशाला by पियुशा
अहो मी गंमत केली त्याची !!
अग, आणि मी गंमत केली तुझी.
हीहीही. मस्त लिहिले आहे एकदम.
हीहीही. मस्त लिहिले आहे एकदम. वरती अपर्णातै म्हणाल्यातसे जिवंत राह्यला त्यातच समाधान माना ;)
लेख मस्तच जमला आहे. एक गोष्ट नक्की की पाकक्रिया येत नसेल तरी लेखनक्रिया व्यवस्थित जमते तुम्हाला :)
अभिनन्दन तुमच्या पाक कौश्यल्याबद्दल
खुप मजा आली वाचताना. पण आता स्वयम्पाक करणे शिकुनच घ्या.
नाराज होवु नका....
स्वयंपाक ही एक कला आहे...नक्की जमेल....
देवा.. जबरदस्त हसू आलेलं
देवा.. जबरदस्त हसू आलेलं आहे.
पहिल्यांदा पोळ्या बनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा शब्दशः आणि स्टेप बाय स्टेप हीच सर्व अघटितं घडली होती.
विनावाटणाचे पाणीदार कालवण बनवण्याचा अनुभवही तंतोतंत जुळला..
लगे रहो.. उत्तम प्रयत्न... तो करावासा वाटला हे विशेष.. पुन्हा नव्याने उचापती चालूच ठेव.
बादवे पुढील वेळी एक डाबर
In reply to देवा.. जबरदस्त हसू आलेलं by गवि
बादवे पुढील वेळी एक डाबर होममेड कोकोनट मिल्कचा छोटा टेट्रापॅक घरी ठेवा. फर्स्ट प्रेसचं घट्ट नारळदूध असतं. पूर्वी वापरलंही असेल तुम्ही म्हणा..
तो कालवणात, करी, रस्सा , खिचडी वगैरेत घातला की दाटपणा येतो. विशेषतः कालवणांना वेगळी ग्रेव्ही, वाटणघाटण करावे लागत नाही.
स्वयंपाकाची क्रुती फसली तरि
स्वयंपाकाची क्रुती फसली तरि लेखनाची छानच जमली आहे बरं का अन्नूभाऊ. (इथे होतकरू तरुणांनी धडा गिरवण्यासारखे आहे. शिकून घ्या मंडळी, उद्या तुमच्या सौं. ना स्वयंपाक येत नसला तर पंचाईत नको ! )
सत्यघटना आवडली.... डोन्ट
सत्यघटना आवडली.... डोन्ट वरी.... लवकरच स्वयम्पाक शिकुन घ्या.. :)
अवान्तर : अनुस्वार कसा द्यायचा हे कोणी सान्गेल का ?
अनुस्वारासाठी शिफ्ट + m
In reply to सत्यघटना आवडली.... डोन्ट by प्रेरणा पित्रे
अनुस्वारासाठी शिफ्ट + m करा.
मग अन्नुचे नाव अंनु असे लिहिता येइल! :P
फार वाईट वाटून घेउ नका. असे
फार वाईट वाटून घेउ नका. असे कुणाचेही होउ शकते.
माझी एक मावशी एकदा पिठीसाखरेऐवजी रांगोळी वापरणार होती.
सहज एक चिमूट तोंडात टाकली आणि पदार्थ वाचला! :)
(चपात्यांप्रमाणेच) कडक
लेख (चपात्यांप्रमाणेच) कडक आहे.
महत्त्वाचे अवांतरः
- या वाक्यांशांवरून या प्रात्यक्षिकाचे लेखक श्री. अन्नु हे उपवधु असून आता थोडाफार स्वयंपाकही करू शकतात असे (आमच्या अंगभूत चाणाक्षपणामुळे) जाणवले. तेव्हा घरातली सर्व मंडळी बाहेर गेल्यास त्यांची काळजी घेण्यास - "जरूरत है, जरूरत है....सख्त जरूरत है"
- या वाक्यावरून ते आयटीतही असावेत असे वाटले.
तेव्हा (ताई, माई, अक्का, आज्जी, काका इ.) समस्त विवाह मंडळांनी त्यांच्या पुढे येणार्या लेखांकडे लक्ष ठेवून त्यांतून त्यांची इत्थंभूत माहिती काढावी आणि एक पुण्यकार्य पदरात (किंवा रुमालात) बांधून घ्यावे ही आग्रहाची विनंती. ;)
अनुस्वारा करिता धन्यवाद..लीमाउजेट..:)
जमलं रे जमलं... :)
मस्त आणि कड्क लेखन आवडले.
मस्त आणि कड्क लेखन आवडले. :)
मला माझा पहिला डोश्याचा अन कुकर मधल्या गाजर (एका कुकरच्या जाहीरातीत पाहिला होता तसा) हलव्याचा प्रयत्न आठवला.
डोश्याला मी कुठलेतरी भलतेच पीठ घेतले होते, त्यामुळे ते तव्यावर ज्वारीच्या पीठासारखे लांब लांब पसरत होते, त्यामुळे आईने वैतागून ज्वारीच्या पीठाच्या भाकरी केल्या अन घेवड्याच्या डाळीची आमटी. ;)
कुकरमधला गाजर हलवा जास्त शिट्यांमुळे करपला होता. ;)
पण आता मात्र हे दोन्ही प्रकार मी चांगले करते बरं का. ;)
तुम्हालाही जमेल हळूहळू स्वयंपाक....असा धीर सोडू नका. :)
कुकर मधला गाजर हलवा हा
In reply to मस्त आणि कड्क लेखन आवडले. by स्वातीविशु
कुकर मधला गाजर हलवा हा गाजराची खिर मह्णून खपवला होता.एकदा पियुषाच्या जिलब्या करताना मजा आली होती.पहिल्या काहि जिलब्या तर पसरुन ताटभर मोठ्या झाल्या होत्या.
अरे वा!
In reply to कुकर मधला गाजर हलवा हा by किचेन
आज इतक्या वर्षानंतर किचु ताईचा आमच्या धाग्यावर फेरफटका???
आज आमचा सुर्य रात्रीचा उगवलेला दिसतोय! :))
☺
In reply to अरे वा! by अन्नू
☺
?
In reply to ☺ by किचेन
हसणारी स्माईली आहे [:)] कि रडणारी? [:(]
आंम्हाला तर कै कळतंच नै ब्वॉ.
हसणारी.खळखळून हसणारी
In reply to ? by अन्नू
हसणारी.खळखळून हसणारी
:)
लेखन आवडले,
स्वाती
उचापती केल्याशिवाय कुठलेच
उचापती केल्याशिवाय कुठलेच कौशल्य येत नाही. तेव्हा पुढच्या उचापत्यांसाठी शुभेच्छा..
- उचापती पिंगू
हम्म्..आता इंडिया स्टोअर्स
हम्म्..आता इंडिया स्टोअर्स मध्ये जाणं आलं
आमचाहि पहिला प्रयोग !
आमचाहि पहिला प्रयोग !
आपल्या सारखाच झाला होता !
जुन्या आठवनिंना उजाळा मिळाला !
मस्त लेख झाला आन्नु ...
हाहाहा!
मस्त लेख! पुढच्या उचापतीनी शुभेच्छा!
मस्त लेख ..
पुढची पाकक्रुतीकरिता शुभेच्छा!
हा हा हा!
मस्त कुरकुरीत लेख आहे. पोळ्या पापडासारख्या दिसत असल्या तरी भिजवलेली कणीक छान दिसतेय ;)
उत्तम, कणकेच्या गोळ्याला उपमा
उत्तम, कणकेच्या गोळ्याला उपमा देताना दाखवलेला संयम वाखाणण्याजोगा आहे.
खुसखुशीत लेखन!
हा हा हा
मस्त खुसखुशीत लेखन! जेवण कसंही होवो त्यानिमित्ताने निखळ करमणूक करणारे लेखन तयार झाले हे काय कमी आहे :)
बाकी काहि वर्षांपूर्वी माझीही हीच गत होती.. साबुदाणा, रविवारची दूपार आणि मी हे त्यावर लिहिलं होतं ते आठवलं
सरावाने आता स्वतःच नव्हे तर इतरही माझ्या जेवणार खुश असतात
ऋ धन्यु रे.
In reply to खुसखुशीत लेखन! by ऋषिकेश
तुझ्या आणि राजेच्या उपदव्यापांच्या लेखाचीच लिंक द्यायला आलो होतो.
स्वयंपाक कसाही होवो, पण लेख मात्र चमचमीत आणि लज्जतदार झाला आहे हो अन्नु शेठ.
बाकी आम्ही एक मोठी पोळी लाटतो आणि त्यावरती डब्याच्या झाकणाची कड दाबतो. छान गोग्गोल पोळी तयार होते. ;)
कॉपीराईट भंग!!!!!
In reply to ऋ धन्यु रे. by परिकथेतील राजकुमार
डब्ब्याच्या झाकणाच्या वापरावर आमचा कॉपीराईट आहे!!!!!
चले चल...
In reply to कॉपीराईट भंग!!!!! by प्रीत-मोहर
मी आधी तुला सांगितले होते. आठव जरा !
लगेच तू म्हणालीस मी पण असेच करते. आता तू खरेच करतेस का माझे ऐकून तसे बोललीस ह्याला पुरावा काय ?
हा हा हा
खूप दिवसांनी निखळ करमणूक करणारा लेख वाचायला मिळाला.
मजा आली. :-)
थांकू-थांकू
सर्वांचे मनापासून आभार तर माझ्या पुढच्या उचापतींसाठी शुभेच्छा देणार्यांचे विशेष आभार.
@ ऋषिकेश तुमचा लेख वाचून जिव परातीतच पडला! आपल्यासारखे आणखी कोणी जोडीला असलेले पाहून जरा बरे वाटते. बाकि तुंम्हाला ती पाकृ खाण्याचा भयंकर योग आला नव्हता हे पाहून आनंद वाटला, पण आंम्ही मात्र स्वतः ची पाकृ स्वतः च खाण्याचे महा-कर्मकठीण काम केले होते आणि ते करताना त्यावेळी मला अक्षरशः दरदरुन घाम फुटला होता! :(
चपाती मध्ये मीठ टाकायचा विचार
चपाती मध्ये मीठ टाकायचा विचार केला नाहीत नशीब... नाही तर सोडा वाली चपाती आणि सोडा वाली भाजी.... बापरे.... विचारच नाहीच करवत...
तिच्यायला त्या सोड्याच्या
तिच्यायला त्या सोड्याच्या आठवणी नको राव! पुण्यात मेसवाल्यांचा परममित्र आहे खायचा सोडा!, चार चपात्या खाऊन पोट भरणार नाही पण एक घास भात खाल्ला का पोट डब्ब होत असे वजन असले सरसर उतरे की बास!
=)) =))
In reply to तिच्यायला त्या सोड्याच्या by कैलासवासी सोन्याबापु
=)) =))
same pinch
इटलीला असताना माझी ही अशीच दैना उडाली होती.