Skip to main content

कोंकणी माणूस असा का?

लेखक Madhavi_Bhave यांनी गुरुवार, 12/04/2012 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
मला खालील प्रश्न खूप वर्षांपासून पडलेला आहे. इतकी वर्षे मनातच ठेवला होता. मिपाकर नक्की उत्तर देतील असा विश्वास आहे. मी बऱ्याचदा कोकणात फिरायला जाते. माझा एक मामा भालावली (राजापूर जवळ) मध्ये राहतो. एक दोन वर्षांनी त्याच्याकडे पण चक्कर होते. कधी सावंतवाडी, मालवण इत्यादी ठिकाणी देखील फिरणे होते. मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे "कोकणातील माणूस हा अतिक्शय आळशी माणूस वाटतो. म्हणजे आपली परिस्थिती सुधारायला हात पाय हलवायला पाहिजे ह्या गोष्टी वर विश्वासच नसावा वाटते. एक प्रकारचा भकासपणा म्हणा किंवा उदासपणा हा अगदी रक्तातच भिनलेला आहे. घरा भोवतीचा परिसर हा स्वच्छ ठेवणे म्हणजे काही पाप करतो असे वाटत असावे. मला आठवते ४ - ५ वर्षांपूर्वी मी काश्मीरला गेले होते. (येथे एक उल्लेख करावासा वाटतो. केसरी च्या भूलथापाना बळी पडून मुंबईतील उन्हाळा पासून थंड हवेच्या ठिकाणी जावे म्हणून गेलो होतो. श्रीनगरला गेलो तेव्हा आपण काश्मीर मध्ये आहोत कि मुंबई मध्ये असा प्रश्न पडला होता. लहानपणी अभ्यासाच्या पुस्तकात वाचले म्हणून गुलमर्गला मोठ्या अपेक्षेने गेलो तर तिकडे एक फुल सुध्धा दिसले नाही आणि पहलगाम ला जो काही थोडासा बर्फ शिल्लक राहिला होता त्यात घोड्यांनी केलेल्या प्रातर्विधी शिवाय काही नव्हते. तेव्हा तुम्ही केसरी किंवा तत्सम tour operators ने केलेल्या भूलथापाना शक्यतो बळी पडू नका. माफ करा थोडे विषयांतर झाले. सांगायचा मुद्दा हा होता कि सर्वसामान्य काश्मिरी माणूस हा त्याच्यावर आलेल्या संकटांमुळे मुळातच पिचलेला होते. कधी काय होईल ह्याचा नेम नाही. उद्याची कसलीच शाश्वती नाही. फिरायला आलेल्या माणसांनी काही खरेदी केली तर दोन घास खायला मिळतील अशी परिस्थिती. अश्या परीस्थितदेखील ह्या सर्वसामान्य लोकांची घरे स्वच्छ, आजूबाजूचा परिसर साफ आणि कोकणात आढळून येणारा उदासपणा नसणे हे एक वैशिष्ट जाणवले मला. ह्या उलट आपल्या कोकणात कितीतरी करण्यासारखे आहे पण काही ना करता गोष्टी होत आहेत ना तर होऊ दे हा स्थायीभाव आहे आपल्या कोकणी माणसाचा असे वाटायला लागले आहे. कितीतरी गुजराथी किंवा साउथ इंडिअनस किंवा अगदी भय्यानि आपला मोर्चा कधीच वळवला आहे कोकणाकडे आणि उद्या आपला कोकणी माणूस काही ना करता आपल्या पोटा पानाच्या साधनांवर इतरांनी कब्जा केला आहे हे एखाद्या स्थितः प्रतन्या सारखा पाहत बसेल. माझ्या मामाच्या घरासमोर मोठी वाडी आहे. सर्वत्र नुसता कचराच कचरा. मी समजू शकते कि प्रत्येक वेळी साफ सफाई शक्य नसते पण जेथे जेथे आणि जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा थोडा आपला परिसर स्वच्छ ठेवायला काय हरकत आहे. मी मामला जेव्हा विचारले तेव्हा तो म्हणाला कि ह्या कचर्याचे पुढे मागे आपोआप खत बनेल. कदाचित खरे असेलही पण त्यामुळे सर्व भकास वातावरण निर्मिती होते त्याचे काय. देवळात पूल टाकले तर सर्वत्र काळोख आणि एक प्रकारचा डोक्यात जाणारा विचित्र वास. कधी बाहेर पडतो असे वाटते. कधी कोणत्या हॉटेल मध्ये जाऊन राहायचे म्हटले तर छानसे हॉटेल मिळेलच ह्याची guarantee नाही". ह्या लेख बद्दल माफ करा. माझा हा पहिलाच लेख आहे आणि तो साहित्य मध्ये पोस्ट करायचा कि चर्चा मध्ये हे देखील माहित नाही आहे. तसेच काहीना हा लेख एकांगी किंवा पूर्व ग्रह दुषित वाटू शकेल. किंवा अगदी negative वाटू शकेल पण खरेच हा प्रश्न मला गेले काही वरचे खूप छळत आहे. येवा कोंकण आपलाच असा किंवा कोंकणाचा कॅलीफोर्णिया वगैरे राजकीय घोषणा ठीक आहेत पण मला वाटते जो पर्यंत कोंकणी माणसाची मानसिकता जो पर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपण असेच मागासलेले राहणार. मला कोणालाही दुखवायचे नव्हते आणि कदाचित आपल्याला आलेला अनुभव वेगळा असू शकेल. आणि लेख खूप लांबला आहे ह्या बद्दल देखील क्षमस्व.

वाचने 27417
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

कोंकण आणि अस्वच्छ..? विशेषतः मूळ कोंकणी माणसांच्या स्वभावात अस्वच्छपणा? प्र..चं..ड.. गैरसमज.. आळशीपणा म्हणून जे काही दिसलं असेल तो आळशीपणा नसतो.. ती एक लाईफस्टाईल आहे. छ्या छ्या छ्या छ्या... (कदाचित) प्रचंड प्रतिसादासाठी जागा राखीव..

In reply to by गवि

सहमत !! कोकणी आणि अस्वच्छ ?? गैरसमज आहे. आळशी असेल कदाचित पण अस्वच्छ ?? बिल्कुल नाही. एका माणसावरुन सगळ्यांना नका जोखू .

एक दुसर्‍या अनुभवावरून निष्कर्श काढणे चुकीचे आहे असे वाटते. कोकणातला माणूस आळशी आहे यावर पण विश्वास नाहीये माझा.. डॉ बाळ. जयगड का कुठेतरी प्रायवेट डॉक बांधणारे भटकळ / भाटकर.. ते दिवसेंदिवस मासेमारीकरता समुद्रात जाणारी बरीच मंडळी खूप कष्टाचे जीवन जगतात. लेखाचा नीट उद्देश कळाला नाही. :-(

लेख काय पटला नाही ! प्रत्येक शहराची, गावाची, पेठेची, वाडीची आपापली एक जीवनशैली असते, आणि तीच त्यांची खासियत असते. उगाच दुसर्‍याचे बघून ते बदलायला जाऊ नये. अन्यथा 'घर का न घाट का' अशी अवस्था होते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

परा शी सहमत आहे. लोक जेंव्हा पुण्याला , मुळा मुठेला नावे ठेवतात तेंव्हा असेच वाटते. नागझरी ते संगम असा एक जलवाहतूक पर्यटन मार्ग काढायचा नवा क्रांतीकारी विचार पुण्यात जोर धरतोय

खरे आहे. कष्टमय जीवन आहे आणि काही सन्माननीय अपवाद देखील नक्कीच आहेत. मी सर्व साधारणपाने आढळून येणार्या स्थितीबद्दल मत मांडले आहे. कोंकणी माणूस हा फणसा सारखा आहे असे म्हणतात म्हणजे बाहेरून काटेरी पण आतून गोड. मला थोडे वाईट वाटते एकंदरीत सर्वसामान्य माणसाच्या मानसिकतेबद्दल आणि ह्या गोष्टीवर नितांत विश्वास आहे कि हि परिस्थिती बदलू शकते. फक्त ते होत नाही हे शल्य आहे मनात म्हणून हा लेख लिहिला आहे.

In reply to by Madhavi_Bhave

परिस्थिती बदलू शकते
पण का ? परिस्थीती येवढी हालाखीची वा वाईट आहे का ? की ती बदलायलाच पाहिजे ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

परिस्थिती हलाखीची वयाच्या आतच बदलली गेली पाहिजे.त्यांना ज्याअर्थी हा प्रश्न अनेक वर्ष छळतोय त्यार्थी त्यांना मामाच्या जमिनीव्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टी खटकल्या असणार.उगीचच आपण 'राज'करण्यांना निवडणुकीसाठी 'कोकणातून भय्ये आणि उडपी बाहेर गेलेच पाहिजेत ' असे विषय देण्यापेक्षा निसर्गरम्य कोकणचा एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा अशी मागणी केली पाहिजे.

In reply to by कुंदन

काहीही काय. आमचा एक कोकणी मित्र आहे आणि तो प्रचंड उद्योगी आहे; इतका की आताशा जालावरही दिसत नाही तो.
हम्म! कुंद्या, अजून तुझा मूळचा भिकारचोट स्वभाव गेला नाही म्हणायचा! :)

In reply to by कुंदन

अरे तो तुला दिसत नसेल.... पण आजदेखील जालावरदेखील 'उद्योग' सुरु आहेत असे ऐकिवात आहे!

कुणीतरी विदा जमवा रे, 'जालावरचे कोकणी माणसाचे प्रमाण' यावरचा. त्यावरुनच ठरेल कोण किती उद्योगी आहे ते! ;)

येथे एक उल्लेख करावासा वाटतो. केसरी च्या भूलथापाना बळी पडून मुंबईतील उन्हाळा पासून थंड हवेच्या ठिकाणी जावे म्हणून गेलो होतो. श्रीनगरला गेलो तेव्हा आपण काश्मीर मध्ये आहोत कि मुंबई मध्ये असा प्रश्न पडला होता. लहानपणी अभ्यासाच्या पुस्तकात वाचले म्हणून गुलमर्गला मोठ्या अपेक्षेने गेलो तर तिकडे एक फुल सुध्धा दिसले नाही आणि पहलगाम ला जो काही थोडासा बर्फ शिल्लक राहिला होता त्यात घोड्यांनी केलेल्या प्रातर्विधी शिवाय काही नव्हते. तेव्हा तुम्ही केसरी किंवा तत्सम tour operators ने केलेल्या भूलथापाना शक्यतो बळी पडू नका. तुमचे नशीब प्रचंड वाईट होते म्हणायचे. मी १ ते ७ मे मध्ये गेलो होतो काश्मीरात. प्रचंड बर्फ होता आणि श्रीनगरातदेखील १३-१४ तापमान होते. पुण्यापेक्षा प्रचंडच सुसह्य. पहलगाम मध्ये तर ३-४ होते आणि सोनमर्ग आणि गुलमर्ग बर्फाने वेढलेले होते :)

In reply to by कुंदन

>>केसरी वाल्यानी गायब केला असेल बरफ तर ? हो हो, तैंना विचारा त्यांना बर्फाचे गोळे दिले होते का कॉम्लिमेंटरी आहे असं सांगून !! ;)

In reply to by मृत्युन्जय

गुलमर्गला मोठ्या अपेक्षेने गेलो तर तिकडे एक फुल सुध्धा दिसले नाही आणि पहलगाम ला जो काही थोडासा बर्फ शिल्लक राहिला होता त्यात घोड्यांनी केलेल्या प्रातर्विधी शिवाय काही नव्हते.
ऑफ सिझनला किंवा सिझन संपता संपता गेल्यावर काय हाती लागणार म्हणा. बहुतेक घोड्यांच आणि तुमच 'टायमिंग' जुळल असाव. :)
एक प्रकारचा भकासपणा म्हणा किंवा उदासपणा हा अगदी रक्तातच भिनलेला आहे.
या वाक्याने तर एकदम भाईकाकांची आठवण झाली. ;) बाकी अलिकडेच कुणी तरी पुणेकरांवर धागा काढला होता. हा लेख त्या लेखाची 'उत्तर'पुजा म्हणुन बांधलाय का ? ;)

In reply to by गणपा

बहुतेक घोड्यांच आणि तुमच 'टायमिंग' जुळल असाव. मेलो. =)) बाकी अलिकडेच कुणी तरी पुणेकरांवर धागा काढला होता. हा लेख त्या लेखाची 'उत्तर'पुजा म्हणुन बांधलाय का ? अलिकडे???? अरे पलिकडे , डावीकडे, उजवीकडे, मागे, पुढे सगळीकडे आहेत असे धागे. नवी ब्रिगेड जशी स्थापन होताक्षणी प्रसिद्ध होणारी पुस्तके बारकाइने वाचून वादग्रस्त लिखाण शोधायला एखाद्या स्वतःला तज्ञ म्हणवू इच्छिणार्‍याला कामाला लावते, तसा संस्थळावर आलेला नवा सदस्य टीआरपीसाठी डोळे झाकून पुण्यावर वा पुणेरी पाट्यांवर चारोळी धागा टाकतो नि पदार्पणातच शतक काढतो. एरवी कुठेही न दिसणारे जुनेपुराणे सदस्यही तिथे आपली चिरकी 'बासरी' वाजवून जातात. आहेस कुठं. अवांतर: 'उत्तर'पूजा की 'छट' पूजा म्हणायचंय तुला?

प्रचंड असहमत.. इतर कोणत्याही बाबीवर चर्चा होवु शकते पण कोकन आणी अस्वच्छ? मि सगळा भारत फिरलोय, पण कोकणात जी नैसर्गीक स्वच्छता दिसते, ती पश्चीम किनारपट्टीचा अपवाद वगळता कुठेच आढळत नाही, ओरीसा, बंगाल इथले किणारपट्टीचे लोक मला तरी अस्वछ वाटले.. बाकी आळशीपणावर सविस्तर प्रतिसाद देतो नंतर..

1. गावाकडे दिसणार्‍या काडीकचर्‍यातून भकासपणा, अस्वच्छपणा जाणवतो. 2. आणि हा भकासपणा, अस्वच्छपणा 'गावाकडचे' लोक दूर करीत नाहीत त्याबद्दल लेखिकेला वाइट वाटले एवढेच कळले. पण 3. लेखिका कोकणात गेली असल्याने 'कोकणी माणूस अस्वच्छ' असे काहीतरी ‍झाले आणि सगळा गेमच फिसकटला असावा.

कोकणी माणूस आळशी आहे इतपत ठीक आहे.. पण अस्वच्छ.. नाही पटतं.. कोकणातली गावं घाटावरच्या (घाटावरचा हा कोकणीच्या विरुद्धअर्थी शब्द आहे त्याला भौगोलिक सीमा नाहीत :-) ) गावांपेक्षा खूपच स्वच्छ आहेत .. त्यात खास सावंतवाडीचं म्हणाल तर हे मत अजिबातच पटतं नाही.. आणि केसरीच्या भूलथापा ??? नाही हो.. आमचा केसरीचा अनुभव तर एकदम पंचतारांकीत आहे!!

काय सांगता कोकणी माणूस अस्वच्छ ?? एक रुममेट होता माझा, माझा तर समज असा झाला आहे की लोक जितके घारे आणि गोरे तितका स्वच्छतेकडे कल अधिक. तो महाभाग वीकेंड आला रे आला की झाडू घेऊन घर झाडायला निघायचा, जनाची नाही पण मनाची तरी बाळगून आम्हाला झकत मदत करावी लागायची. किचनमध्ये इकडचा चमचा तिकडे नको. कहर म्हणजे खाताना जमिनीवर जरा काही सांडता कामा नये. एक ना दोन, तुमचा समज गंडलेला आहे.

कोकणी माणसे आळशीही नाहीत आणि अस्वच्छ तर अज्जिबात नाहीत. तिथले जीवन संथ आहे. मुंबई सारखी धावपळ त्यांच्या स्वभावात नाही. आता, मुंबईच्या माणसाला एखाद्या खेड्यात ठेवा १५-२० दिवस तो भयंकर अस्वस्थ होईल. कारण, मुंबईची धावपळ, घड्यालाशी बांधिलकी अनुभवास न मिळाल्याने तो चुळबुळ करीत राहतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

कोकणी माणसे आळशीही नाहीत आणि अस्वच्छ तर अज्जिबात नाहीत. तिथले जीवन संथ आहे.
अत्यंत अचूक शब्दात नेमका प्रतिसाद.. अनेक धन्यवाद.. आमचे पानभर टंकन खर्ची पडले असते. कोंकणी माणूस आहे त्यात सुखी असतो. बाहेरुन तिथे येऊन ईर्षा, स्पर्धा, उभी करणार्‍यांना ते आळशी वाटतात.. पण ती त्यांची मूळ सुशेगाद वृत्ती आहे. पोफळीच्या वाडीत बनियन वर करुन पोटाला गार वारा देत आरामखुर्चीत पडलेला कोंकणी मनुष्य पाहताना सुखी माणसाचा बनियन काय असतो तो असंख्य वेळा पाहिला आहे. आपल्या आवारात उगवणारे लाल भात आणि वरी / नाचणी ..शिवाय एखादी आंबी, फणस, पोफळी, माड यांच्या आधारे तेवढ्यात चरितार्थ बसवून कोणत्याही रॅटरेसमधे न पडता भरपूर मोकळा वेळ मिळवणारी कोंकणी माणसं माझी आदर्श आहेत. कोंकणात मी जन्मून मोठा झालो. कोंकण पुरेपूर अंतर्बाह्य पाहिलेलं आहे. कोंकणात मुळात गरीब (खाऊन पिऊन सुखी पण श्रीमंत नसलेले) बहुसंख्य आहेत.. पण.. त्याचवेळी मूलतः भिकारी नगण्य आहेत ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आपल्या नशिबी इतरांचे आर्थिक मिंधेपण येणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट मानली जाते. कोंकणातला मनुष्य रेज द बार तत्वाने उंच उड्या मारत आयुष्यात वरवर चढत जाईलच असं नाही.. पण तो याला स्वतःचा नाकर्तेपणा समजून कुरतडत कुरकुरत बसणार नाही.. तो "साफल्य" नावाचं छोटं घर बांधून कृतार्थ असेल. यातली मजा पैशात मोजता येणार नाही.. स्वच्छतेबाबत : मी अस्वच्छता हा प्रकार कोंकण सोडल्यावर पहिल्यांदा पाहिला एवढंच म्हणतो. "पालापाचोळा" याला अस्वच्छता म्हटले असावे बहुधा लेखिकेने. आमच्या कोंकणातल्या गावी बाहेरुन आलेल्या एका कुटुंबाने एकदा रस्त्यावर मूल शी करायला बसवलं तेव्हा आख्खी आळी एक होऊन त्यांच्याविरुद्ध गेली होती. पहिल्याच प्रसंगानंतर ही पद्धत हाणून पाडण्यात आली.. हे फक्त एक उदाहरण. मी कोंकण सोडून देशावर आलो तर हागणदारी हा नॉर्म होता.. आणि न हगलेले रस्ते ही दुर्मिळ गोष्ट. कोंकणात रस्त्याबाजूला वाहणार्‍या पावसाच्या पाण्यात ओंजळ बुडवून प्यायची इच्छा होईल इतकं स्वच्छ ते असायचं.. कसलाच कचरा, गाळही नाही..

In reply to by गवि

सहमत. अतिशय उत्तम आणि चोख प्रतिसाद.
कोंकणात मी जन्मून मोठा झालो. कोंकण पुरेपूर अंतर्बाह्य पाहिलेलं आहे. कोंकणात मुळात गरीब (खाऊन पिऊन सुखी पण श्रीमंत नसलेले) बहुसंख्य आहेत.. पण.. त्याचवेळी मूलतः भिकारी नगण्य आहेत ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आपल्या नशिबी इतरांचे आर्थिक मिंधेपण येणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट मानली जाते.
अगदी सोळा आणे सत्य!
कोकणी माणसे आळशीही नाहीत आणि अस्वच्छ तर अज्जिबात नाहीत. तिथले जीवन संथ आहे.
१००% करेक्ट!!!

In reply to by अस्मी

मी कोकणातल जीवन सुशेगात आहे म्हणेन :)

In reply to by गवि

पेठकर काका आणि गवि दोघांच्याही प्रतिसादांना अनुमोदन. कोकण अस्वच्छ आहे हे म्हणणारी पहिलीच व्यक्ती पाहिली.

In reply to by यशोधरा

तंतोतंत.

कोकणी माणसावर अस्वच्छतेचा डाग ? तुमचे काहीतरी चुकताय. गरीबीत सुद्धा स्वच्छ रहाणारा माणूस म्हणजे कोकणी !

मी तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया समजू शकते आणि appreciate हि करत आहे. मुळात माझी पण पाळेमुळे कोंकणातच रोवलेली आहेत. आयुष्याची सुरवातीची दहा वर्षे मी वेंगुर्ल्यात काढलेली आहेत आणि वयाच्या अकराव्या वर्षी (मी सातवीला असताना) मुंबईला आले व गावाला कायमची पारखी झाले. जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा शैक्षणिक जीवनातील इयःत्ता पाचवी आणि सहावी (जी मी वेंगुर्ला शाळेत काढली) हि दोन वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर वर्षे होती. एखादाच दिवस असा गेला असेल जेव्हा मी शाळेत मार खाल्ला नसेन. सुट्टीत फक्त हुंदडणे आणि रान मेवा खाणे (म्हणजे कुदने) ह्या शिवाय दुसरे काही केले नाही. पावसाळ्यातील कोंकण पूर्णपणे अनुभवले आहे. रात्री कौलांवर पडणाऱ्या मुसळधार पावसांमुळे होणारा तो आवाज, कडाडणाऱ्या विजा ह्यामुळे घाबरून गेलेली मी आईच्या कुशीत स्वताला घट्ट सामावून घ्याची आणि झोपून जात असे. इतक्या वर्षांनतर देखील ती दहा वर्षे आठवली कि मन अलगद हळवे होऊन जाते. वेन्गुर्लाच्या तो समुद्र किनारा, सातेरी आणि रामेश्वारचे देऊळ मनात घर करून आहेत. त्यामुळे मुळात मी कोकणचीच. कदाचित मला लेखात काय म्हणायचे ते नीट मांडता आले नसेल. जेव्हा मी लेख लिहायला घेतला तेव्हा माझ्या मनातील दुख फक्त मांडले. लहानपणी काही कळत नव्हते पण आज जेव्हा मी कोकणात जाते तेव्हा वातावरणातील एकंदर असणारा तो उदासपणा आणि एकंदरीतच काही प्रमाणातील निष्क्रियता ह्यामुळे मला नेहमी वाईट वाटते. नैसर्गिकरीत्या कोकण खूप सुंदर आहे ह्याबद्दल दुमत नाही किंवा वादही नाही. आपण आपले पहिले प्रेम कधी विसरू शकत नाही त्याप्रमाणे माझे आयुष्यच जेथे सुरु झाले ते कोकण मी कसे विसरेन. पण आज इतक्या वर्षांनी देखील कोकणातील माणूस आहे तिथेच आहे (अर्थात सन्माननीय अपवाद आहेतच) म्हणून वाईट वाटते. आपले कोकण मुळात इतके सुंदर आहे कि नीट infrastructure जर पुरवले तर खूप प्रगती होईल पण तसे होत नाही आणि त्याची जाणीव पण नाही असे दृश्य उभे रहाते. मी जेव्हा अस्वच्छते बद्दल लिहिले आहे ते आपला परिसर स्वच्छ ठेवण्याबद्दल असलेल्या अनास्थेबद्दल. प्रत्येकाचे घर आतून सारवलेले असते आणि बऱ्यापैकी स्वच्छ असते हे मान्य आहेच मला. आणि मी काही एकदा दोनदा गेले नाही कोकणात. दर एक दोन वर्षांनी माझी चक्कर असतेच. इतक्या वर्षांनी माझे झालेले हे मत आहे जे अगदीच खोटे आहे किंवा चुकीचे आहे असे मला तरी वाटत नाही. तरी देखील जर कोण दुखावले गेले असेल तर क्षमस्व. बाकी आपल्या सर्वांच्या लाल मातीबद्दल असणाऱ्या अस्मितेला मनापासून दाद. मी पण कोकणवर मनापासून प्रेम करते ह्याबद्दल कोणीही शंका घेवू नये. धन्यवाद. आणि शेवटचे म्हणजे श्री गणपा ह्याच्यासाठी - गुलमर्गला मोठ्या अपेक्षेने प्रेषक गणपा गुरुवार, 12/04/2012 - 13:46. गुलमर्गला मोठ्या अपेक्षेने गेलो तर तिकडे एक फुल सुध्धा दिसले नाही आणि पहलगाम ला जो काही थोडासा बर्फ शिल्लक राहिला होता त्यात घोड्यांनी केलेल्या प्रातर्विधी शिवाय काही नव्हते. ऑफ सिझनला किंवा सिझन संपता संपता गेल्यावर काय हाती लागणार म्हणा. बहुतेक घोड्यांच आणि तुमच 'टायमिंग' जुळल असाव. Smile श्री गणपा. बहुतेक घोड्यांच आणि तुमच 'टायमिंग' जुळल असाव. Smile आपली हि कॉमेंट रुचली नाही. It was not in a good spirit.

In reply to by Madhavi_Bhave

"आपले कोकण मुळात इतके सुंदर आहे कि नीट infrastructure जर पुरवले तर खूप प्रगती होईल पण तसे होत नाही आणि त्याची जाणीव पण नाही असे दृश्य उभे रहाते." कशाला हो वाट लावता कोकणाची.. मी कोकणातला नाही, पण कोकणच्या प्रेमात आहे.. इंफ्रास्ट्रक्चरने लवासा आनी आंबी व्हॅली बांधता येत.. कोकण कसं घडवणार? कोकण आहे तसच राहुद्या..

In reply to by Madhavi_Bhave

आपली हि कॉमेंट रुचली नाही. It was not in a good spirit.
नाही हो अगदी स्वच्छ मनाने दिला होता प्रतिसाद. अधिक स्पष्टिकरण दिले असते पण मग सारवा सारव करतोय असा आरोप झाला असता म्हणुन माझे शब्द मागे घेतो. आय एम स्वारी. :)

प्रचंड मोठा गैरसमज. तुम्ही कोकणात जाऊन काय फक्त अस्वच्छताच पाहिली? कोकणात जे दिसले, त्या पालापाचोळ्याला तुम्ही जर अस्वच्छता म्हणत असाल, तर मात्र कमालच झाली.. बाकी स्वच्छतेचे धिंडवडे काढलेले बघायचे असतील तर जरा सोलापूर, बीड अशा ठिकाणी जाऊन बघा. - पिंगू

मुळात कोकणातील माणुस हा ठेवीले अनंते तैसेची रहावे ह्या विचारसरणीचा आहे. मी खुद्द वेंगुर्ला दाभोली ह्या गावचा आहे. आजही मी वर्षांतुन ३ ते ४ वेळा तिथे जातो पण मला कुठेही घाण व अस्वच्छता दिसत नाही. उलट गावाला गेल्यावर कामाचा जो ताण असतो तो एकदम निघुन जातो. तुम्हाला स्वच्छतेच एक उदाहरण देतो.... दाभोली मठ येथे कुडाळदेशकर गौड ब्राम्हण लोकांचा मठ आहे. तिथे आजही वेदाभ्यास चालतो तो बघुन या अतिशय स्वच्छ व देखणा आहे तो मठ.. किंवा कुडाळ पिंगुळि येथिल राऊळ महाराजांचा मठ आहे. तो बघा निवळ्ळ अप्रतिम आहे.

अजिबात पटले नाही

माणसाने तिथे येऊन घाण करून ठेवली असली तर कृपा करुन त्यावरनं तिथल्या कोकण्याला उल्लेखू नका. गेल्याच नोव्हेंबरात रत्नागिरीत पांढर्‍या समुद्रावर जाताना मी याचं क्लेशदायक उदाहरण बघितलं आहे. शैलेंद्र, तुझ्या वाक्यात थोडा बदल करून १००००००००% सहमत; "कशाला हो वाट लावता कोकणाची.. मी नशिबाने कोकणातला आहे आणि कोकणच्या प्रेमात आहे.. इंफ्रास्ट्रक्चरने लवासा आनी आंबी व्हॅली बांधता येत.. कोकण कसं घडवणार? कोकण आहे तसच राहुद्या.."

कोकण नैसर्गिक रित्या सुंदर असणे हा एक भाग झाला. दुसरा भाग एखाद्याने आपला परिसर स्वच्छ ठेवणे हा दुसरा भाग झाला. खालील बाबतीत मात्र दुमत होउ नये. १.देशावरची खेडी इनवेरिबली अस्वच्छ आहेत. त्यामानाने कोकणातील गावे अधिक स्वच्छ. २, काश्मीरी लोक आपला परिसर चांगला ठेवतात. केसरीवाले नैसर्गिक बाग व बाब नियंत्रित करू शकत नाहीत. ३.भारतात दक्षिणेतील गावात दिसणारी टापटीप उत्तरेकडे जावे तशी कमी होत जाते. ( अपवाद हिमालयीन भाग व काश्मीर)

अजिबात म्हणजे अजिबातच नाही पटले.

मला वाटत तुम्ही कोकणात फक्त पर्यटनापुरतेच फिरत असाव्यात.... कारण तिथलं रहाणीमान जरका जवळून पाहीलत तर ते अजिबात अस्वच्छ नाही. हां हाटेलांच्या बाबतीत म्हणाल तर हे थोडफार खर आहे.....कारण कोकणी माणुस अजून त्या बाबतीत पुढारलेला नाही किंवा थोडा अनुत्साही आहे.(एका अथीर्‍ ते बरच आहे...कारण त्यामुळेच तिथलं नैसगिक सौंदर्य टिकुन आहे.) मात्र कोकणी माणुस अत्यंत स्वच्छ आणि कष्टाळू आहे........आणि हे अकालाबाधित सत्य आहे. कोकणकन्या...प्रीती

पण आज जेव्हा मी कोकणात जाते तेव्हा वातावरणातील एकंदर असणारा तो उदासपणा आणि एकंदरीतच काही प्रमाणातील निष्क्रियता ह्यामुळे मला नेहमी वाईट वाटते
हे केवळ कोकणच नाही तर सर्वत्र लागू होते- मोठी शहरे आणि खेडी,जिल्हा शहरे ह्यांच्या राहणीमानात तफावत असल्याने तसे आपल्याला वाटते. उ.दा.मोठ्या शहरांमध्ये दुकाने ९.३० -१० पर्यंत चालु असतात तर ईतरत्र भारतात ८ वाजले की आवरते घ्यायला चालू होते. मल्याळी,उडपी लोकांचा कष्टाळू म्हणून मुंबईत उल्लेख केला जातो. पण दक्षिण कर्नाटकातली,उत्तर केरळातील गावे पाहिलीत तर ती "उदासपणात्,निष्क्रियतेत' कोकणाला मागे टाकतील.

चला कोकणातले-बाहेरचे-देशावरचे-मराठवाडी-खानदेशी-वैदर्भी असे वेगवेगळे गट करुन उभे राहा बघू मुलांनो. मुंबईकर-नागपूरकर-कोल्हापूरकर-पुणेकर असेही गट चालतील. तुम्हाला हवा तो गट निवडा. समोरासमोर उभे राहा आणि शिव्यागाळी सुरु करा. (त्वेषाने शेजारी जमिनीवर थुंकायला परवानगी आहे.) अंगावर धाऊन जाणारा गडी बाद. हा खेळ खेळल्यावर मग शांत बसा. प्रमुख पाहुणे आल्यावर तुम्हाला सगळ्यांना एका सुरात 'प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा' हे गीत गायचे आहे. आजचे प्रमुख पाहुणे श्री. कचरे हे आपल्याला 'हागणदारीमुक्त गाव मोहिमेचे यश' या विषयावर दोन शब्द सांगतील. नंतर प्रत्येकाने तीन टाळ्या वाजवायच्या आहेत. शेवटी फक्त क्लास मॉनिटर सुकुमार दांडगे आणि गर्ल्स मॉनिटर कु. सुनयना तिरळे हे दोघेच 'जय हिंद' अशी घोषणा देतील. तुम्ही सर्वांनी 'जय महाराष्ट्र' असे मागोमाग म्हणायचे आहे. यात काही बेशिस्त दिसली तर याद राखा. उद्यापासून सर्वांची रवानगी माळावर (गुरं राखण्यासाठी) -तुमचा प्रेम्मळ- ज. रा. शौचे गुरुजी

In reply to by योगप्रभू

आयशपथ , भाण्णं हा आमच्या म्हारास्ट्र देशाचा प्रानच हाय ! लातूरकर , नांदेडकर, बारामतीकर, मालवणकर, ठाणेकर , कलानगरकर , दादरकर आन आनखी कंची यादी पायज्यल हाय ? म्हून शान मुक्यमंतरी तिकाडन येतुया ! त्ये बर, त्ये झालं राजकारनाचं ! हिकडं बी सुबोधवाले, दुर्बोधवाले, प्रसादगुनवाले, यांची बी भांडानं हायतच की ! तवा कयाला कुनी कुनाचं त्वांड दाबायचं म्हन्तो म्या ! आप्ला खौ रा.

कोकण हे अतिशय सुंदर आहे. गावी गेल्यावर खरच refresh व्हायला होते. कोकणातली माणस अतिशय मेहनति असतात. पण कोकणाचा जेवढा विकास व्हायला हवा होता तेवढा होत नाहि आहे.याला फक्त आपले राजकारणी जबाबदार आहेत.

In reply to by गोंधळी

कोकणातली माणस अतिशय मेहनति असतात.
प्रचंड सहमत आहे. घरं कशी पोराबाळांनी बहरलेली असतात.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मुळातच व्यवसायिकतेचा अभाव कोकणी(मराठी)माणसात असल्याने पर्यटनाच्या बाबतीत मागे आहे.याचि खंत वाटते.

वरच्या काही प्रतिक्रिया मध्ये कोकण स्वच्छ असुन देशावरच घाण आहे असे म्हटले आहे , मग ती स्वच्छता सोडुन एव्हढे लोक देशावरच्या घाणीत का बरे आले

कोंकणी माणूस आळशी का आहे? एक कामसू माणूस(घाटावरचा असेल बहुदा) कोंकणात आला. माडाखाली पंचा टाकून भरदुपारी निजलेल्या कोंकण्यास म्हणाला- "अरे आळशी कोंकण्या,उठ. भर दुपारी काय झोपलास?" "उठून काय करू?" "काई कामधंदा कर" "मग काय होइल?" "पैसे मिळतील." "मग?" "ते गुंतवून मोठा उद्योग काढ." "मग?" "आणखी पैसे मिळतील" "मग?" "शहरात राहा,घर घे,गाडी घे" "मग" "आणखी कष्ट कर्,आणखी पैसे कमव" "मग?" "कुठल्यातरी निसर्गरम्य खेड्यात फार्म हाऊस बांध" "मग?" "सुट्टीच्या दिवशी मस्त निवांत तिथे जाऊन झाडांच्या सावलीत आराम कर" "मग,आत्ता काय करतोय वेगळे,शिंच्या? " असं आमचा कोंकणी म्हणतो. मिपावर आज बर्वेबाई,गणपा सगळे या ना त्या प्रकारे कोंकणाचीच आठवण करून देतायत. आज रात्रभर स्वम्नात माड,पोफळी नी आंबेच दिसणार बहुदा.

आवडले नाही :( अजिबातच पटले नाही कोकणातली माणसं खूपचं प्रेमळ व कष्टाळू असतात

कोकन सुरगाना सटाना नाहि का? फक्त कोकन रत्नागिरि ....आपन म्हनता ...ते ....कोकन ..आहे का ? आंम्हि सर्वानां कोकनि समझतो ! आपन कोनते कोकनि ???????????????/

भावेबाई, तुम्ही फारच थोडं कोकण आणि कोकणी माणूस पाहिला असावा. लहान असताना वेंगुर्ल्याला रहात होता हे लक्षात घेतलं तरीही हेच म्हणते. कोकण स्वच्छ करायची गरजच पडत नाही, कारण पावसाळ्यात सगळं पार धुऊन निघतं! कोकणी माणसं पण स्वच्छताप्रेमीच. तुम्ही झाडाखालचा पातेरा खत म्हणून वापरण्याबद्दल लिहिलंय , तेही अगदी व्यवहार्य आहे. शिवाय खताचे पैसेही वाचले ना! अगदी गावातली लोकं सुद्धा नीटनेटकी असतात. मी लहान असताना रत्नागिरीजवळच्या खेड्यात रहात होते, पण तिथेही लोकांकडे संडास असायचे. रस्त्याच्या कडेला पोरांनी हगून ठेवलंय असं मी कोकणात कधीच पाहिलं नाही. उदासीनता म्हणताय त्याला एक कारण कदाचित असू शकेल की बहुतेकांची मुलंबाळं मुंबईत नाहीतर परदेशात सुद्धा जातात, कोकणात लागवड करण्यासारखी जमीन फार कमी आहे. देशावर जसं थोड्या श्रमात भरपूर पीक घेता येतं ते कोकणात शक्य नाही. कोकणातली सगळी पिकं फार मेहनतीने घ्यावी लागतात, मग ते आंबे असोत, नारळ असो, की भातशेती. कोकणी माणूस आळशी हे मला प्रचंड विनोदी विधान वाटतं. इतके कष्ट करून हातात पैसेही फार येत नाहीत. आणि कोकणी माणूस सतत उद्योगात राहिल्यामुळे तमाशा वगैरे अवांतर गोष्टी कोकणात बघायलासुद्धा मिळणार नाहीत. ती सगळी घाटावरच्या पैसेवाल्या आणि भरपूर वेळ हाताशी असलेल्या लोकांची मिरासदारी. कोकणात पर्यटन उद्योग फार वाढला नाही तर बरं, कारण मग सगळी झाडी तोडून रिसॉर्ट बांधायच्या मागे लोक लागतील आणि गोव्यातल्यासारख्या सगळ्या गोष्टी कमर्शियल होऊन बसतील. कोकणचा विकास म्हणजे तरी काय हो? शिक्षणाचं प्रमाण देशावरच्यापेक्षा जास्तच आहे. पुरेसे पैसे कष्ट करून मिळतायत. फुकटचा बडेजाव आणि पैशांची उधळमाधळ फार दिसणार नाही. कोणीही भीक मागत फिरत नाही. आणखी काय हवं?

लेख वाचून आश्चर्य वाटले. कदाचित "अस्वच्छ" ह्या शब्दाच्या व्याखेबाबतच काही गैरसमज असावा. राहिलेले, खरकटे अन्न, मानवी मल-मूत्र आदी गोष्टी मी तरी कुठल्याही कोकणातील घराजवळ किंवा गावातील रस्यांवर पाहिलेल्या नाहीत. झाडाखाली जमलेल्या पालापचोळ्याला अस्वच्छता म्हणायचे असेल तर गोष्ट वेगळी! खाजगी घरे तर सोडाच पण कोकणातील सार्वजनिक देवळे पहावीत. परीसर तर स्वच्छ असतोच शिवाय देवळाबाहेर भिकारी-कुष्टरोग्यांची गर्दीदेखिल नसते. आणि हे काही फक्त आडगावातील देवळांबाबतीतच नव्हे तर जिथे भक्त आणि पर्यटकांचा सतत राबता असतो अशा प्रसिद्ध देवळांबाबतीतदेखिल खरे आहे. देशातील अन्य भागातील प्रसिद्ध देवळाशी तुलना केलीत तर, कोकणातील देवळांची स्वच्छता आणि भिकारीमुक्त परिसर डोळ्यांना सुखावतो. उरला भाग आळशीपणाचा. कोकणच्या लोकसंख्येत तरुणांचे प्रमाण किती याची काही कल्पना आहे? कोकणची जमीन सुपीक नाही. भात हे काही नगदी पिक नाही. निर्यातयोग्य आंबा सर्वत्र होत नाही. तरुण रक्ताचा अभाव. मनि-ऑर्डर इकॉनॉमी वर भर. असे असूनही कोकणातील किती शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात? पर्यटन - आपल्या घरातील एखाद-दुसरी खोली पर्यटकांना राहण्यासाठी द्यायची. त्यांच्या खाण्या-पिण्याची घरगुती सोय करायची. ही संकल्पना अत्यंत यशस्वीपणे कोकणात राबवलेली दिसेल. आज अक्षरशः हजारो कुटुंबे अशा पद्धतीने - फार नाही पण चार पैसे - जास्तीचे कमावीत आहेत. असो, बरेच काही लिहिता येईल. पण तूर्तास इतकेच पुरे.

मा_भा ना नमस्कार..!!! मिपावर कोकण आणल्याबद्दल. मी मुम्बईत जन्मलेला माणुस आजोळ कोकणातले आणी मुळ गाव सुद्धा त्यामुळे अगदी लहानपणापासुन कोकणात जाणारा व तिकडे रमणारा. आजही नियमीतपणे कोकणात जाणारा. # कोकणी माणुस ह आळशी अजिबात नसुन तो उद्योगीच आहे, बरीच मेहनत केल्याशीवय त्याला सुखासुखी काही मिळत नाही. कोकणचा एकन्दरीत भूगोल , शेती व उद्योग्धन्दे पाहीले म्हणजे लक्षात येते. ज्यान्ची मनीओर्डेरची सुद्धा सोय नाही त्यान काबाड्कष्टाशिवाय दुसरा पर्याय नसतोच तो आळ्शी कसा ??..देश स्वतन्त्र होउन ६५ वर्षे झाली कोकणात किती विकास झाला. हा, तो तुम्च्या आम्च्यासारखा नाइलाजाने घड्याळाशी बान्धलेला शहरी माणसासारखा घाईगडबडीत दिसत नसेल कदाचीत. म्हणून तो आळशी नव्हे. # राहता राहीला प्रश्ण स्वछतेचा कोकणातले घर व आन्गण हे स्वछ ठेवावेच लागते त्याला पर्याय नाही व ते तसे असते. आन्गणाबाहेर सगळे प्रचन्ड रान असते त्याची झाड्लोट शक्य नसते त्याच्या आकार्-मानामुळे, तिकडे पडलेला पालापाचोळा, झुडपे व वेड्यावाक्ड्या झाडान्मुळे आपल्याला अस्वछ वाटले असावे. (कोकणी ) विनोद१८

मलातरी कोकणी माणूस अजिबातच अस्वच्छ वाटला नाही. पालापाचोळा असणे म्हणजे अस्वच्छता नव्हे. DSC03812 देवळाच्या आत आणि आजूबाजूचा परिसर प्रचंड स्वच्छ होता. तिथल्या गुरवांकडे आम्ही जेवलो तर अतिषय स्वच्छ, चवदार आमटीभात आणि लोणचे वाढले. माझे काका कोकणात गेली पन्नास वर्षे तरी राहतायत. त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतल्यावर द्यायला पैसे नसले तर लोक शेतातले काहीबाही आणून देतात पण फुकट काही नको असते. मला तरी वर्षानुवर्षे चांगलाच अनुभव आला आहे. यापुढे बिल्डर्स, नेतेमंडळी काय वाट लावतील ती वेगळी.