Skip to main content

" माझी माय .......!!"

लेखक जेनी...
Published on शनीवार, 07/04/2012
काय कमावलं अन काय गमावलं ,ह्या एकाच प्रश्नाच उत्तर माणूस शेवट पर्यंत शोधत शोधतच वाट चालत रहातो .काही वळणावर थांबतो विसावा घेतो अन पुन्हा चालू लागतो .बस फक्त चालताना कुणाच्यातरी मायेचा हात ,कुणाच्यातरी प्रेमाची साथ एवढ मात्र कायम सोबत राहावं अशी अपेक्षा न चुकता करतो .माझ्याही पाठीवर असाच एक हात ,अशीच एक साथ , माझ सर्वस्व ,माझी माय .. अजून आठवतो ,बाबा गेले तो दिवस .मला जास्त कळत नव्हत पण माईच्या डोळ्यातन वाहणारे दुखाचे लोट , वाफाळणारे अश्रू माझ्या गालावरण खाली वाहत होते .माईला घट्ट मिठी मारून बसलो होतो मी कारण माई सारखी बाबांच्या छातीवर जोरजोरात मारत होती .मला जाम भीती वाटली तेव्हा .माईच्या बांगड्यांच्या काचांनी माईचे हात रक्त बंबाळ झाले होते ,वाहणारे अश्रू घशाला कोरड पडेपर्यंत केलेला आकांत , राहून राहून मध्येच मला तीच जवळ घेण किती तरीच असह्य होत सगळं ,पण माईला तेव्हा एकट ठेवण ,तिच्यापासून दूर राहाण मला शक्य नव्हतं . माझी भावंड लहान होती .चीनुला तर काहीच कळत नव्हत ,इन मीन दोन वर्षांची होती ती .अन मनु तोही साडे तीन वर्षांचा .मी थोरला माझ वय तेव्हा पाच पूर्ण ..बाबांच्या अकस्मात जाण्यान आयुष्यातले पुढचे सगळेच प्रश्न समोर आ वासून उभे होते .मिळकतीचा मार्ग खुंटला ,मायेन डोक्यावर फिरणारा हात सुटला ,कधीतरी सुट्टीच्या दिवशी मिळणारी दादर चौपाटी वरची भेळही ह्या सगळ्या दुखात कुठेतरी सांडून गेली .अभ्यासासाठी ओरडणारे ,चिनूला खांद्यावर घेवून फिरणारे ,मनूच्या खोड्यांनी येणारी भांडण हसतखेळत सोडवणारे आणि माझ्यासाठी ,माझ्यासाठी नवीन नवीन पुस्तक मला भेट म्हणून आणणारे बाबा ..माझे बाबा हरवले होते ..शोधूनही सापडणार नाहीत अश्या ठिकाणी लपून बसले होते . आमचे प्रश्न हे आमचे होते ,तर माई..माईच्या पुढे अर्धवट संसाराची गाडी ..ज्याचे पुढचे पाय निघून ,गळून पडले होते .अशी हि गाडी ओढायची होती तिला ..तिला एकटीला .माई जास्त शिकली नव्हती .संसाराच गणित मात्र तिने उत्तम संभाळल होत ,लिहिता वाचता येत होत पण कुठे नोकरी करू शकेल इतपत शिक्षण नव्हतं .गडद अंधारात एक आशेचा किरण होता ,तो म्हणजे माझा मामा .माझ्या माईपेक्षा मामा तीन वर्षांनी लहान होता .बाबा गेले त्यावेळी मामाच लग्न नव्हत झालं ,नुकताच नोकरीला लागला होता .माईन जास्त दिवस दु़:ख कुरवाळलच नाही ,तिला तेवढीही उसंत पुन्हा परत कधी मिळालीच नाही . आम्हाला घेवून माईन पुन्हा एकदा कंबर कसली .मामा आईला माई म्हणायचा ,त्याच्यामुळ तिला सगळेच माई म्हणायचे .माझ्या पाठोपाठ माझी भावंड हि तिला माईच म्हणू लागले .आजीन माईला माहेरी रहायला बोलावलं पण माईन ते आमंत्रण पाहुनी म्हणून स्वीकारलं ..." माझ्या पदरात माझी पिल्लं आहेत , मायेचा एक हात दुरावलाय पण दुसर्‍या हातात त्या पहिल्या हातानं काही जवाबदार्‍या दिल्यात त्या मी तुमच्याच आधारान पेलणार .मला फक्त आधार द्या ,माझ्या पायात पुन्हा उभ राहाण्याच बळ द्या .." एवढीच एक हक्काची मागणी माईन तिच्या माहेरच्या माणसांकडं केली ...बाबांच्या माणसांच आणि माईच..जास्त जिव्हाळ्याच काहीच नव्हतं ..आजी आजोबा केव्हाच आभाळात गडप होवून गेलेले तर आत्त्या ,ती तिच्या संसारात रमलेली .त्यामुळे मदत मागावी ,आधाराची अपेक्षा करावी अस तिथे काहीच नव्हतं . एकाच शहरात माईच माहेर आणि सासर ..त्यामुळे आजी आजोबांच येन जाण होत .. मामालाही आमचा लळा होता .मामा हा एकमेव माईला गरजनार्‍या पावसात मिळणारा एका झाडाचा आडोसा होता .मोठा आधार वाटायचा तिला त्याचा ,मामाही शक्यतो आमच्याकडे राहूनच त्याच्या ऑफिसला जायचा .मामा बराच हातभार लावायचा पण माईला वाटायचं किती लहान जीव ,आम्ही एकत्र वाढलो ,खेळलो, बागडलो .जिथे मी त्याच्या पाटीवर आधाराचा हात ठेवायचा तिथे तोच माझ्या संसाराचा गाडा आपल्या पाठीवर घेवून माझ्या अश्रुना हलकं करण्याचा प्रयत्न करतोय .नाती अतूट असतात ,त्या नात्यात विरघळताना केव्हा समरस होवून जातो ह्याच भानच राहत नाही आणि मग जीवाला जीव देन ..एकमेकांसाठी होण ..ह्या शब्दांचा खरा खुरा अर्थ सापडतो . माईच शिक्षण नव्हत पण समंजसपणा आणि बुद्धी ह्यांचा एक अजब मेळ होता .सुरुवातीला माईनं घरगुतीच काही करण्याच ठरवलं माई वाती वळायला आणायची ,दिवसरात्र जागून जागून काम करायची ,जास्त पैसे सुटायचे नाहीत .शंभर वाती केल्यावर माईला दोन रुपये सुटायचे .दिवसाला माई दहा बारा रुपयापर्यंत करायची .कधी मध्ये कपड्यांचे धागे तोडायला आणायची .हाताला धागा लागून लागून बर्‍याच चिरा गेल्या होत्या ,पण त्या चीरांमध्ये तिला तिच्या मुलाचं भरलेलं पोट ,शाळेची न मिटनारी पण तात्पुरती पुढे ढकलली गेलेली चिंता दिसायची . माई कष्टाची भाकरी खायची ,चिंतेन व्यापलेली झोप घ्यायची अन तिच्या पिल्लांच्या चेहेर्यावरच्या समाधानान रोज नवीन स्वप्न बघण्याच बळ मिळवायची ..माझी माई . अति कष्टान माई हळूहळू थकत चालिय .जिथे हळूहळू चालून आयुष्याची रंगीत तालीम हर्षभरित नजरेन पहायचे दिवस तिच्यासोबत असायला हवे होते तिथे रोज रात्री उद्याच्या काळजीन ओल्या डोळ्यात उरलेलें प्राण आणून उजाडायची वाट बघण्याचे दिवस माईला सोबत करू लागले होते .माईन नंतर खानावळ चालू केली .आधी दोन जणांचा स्वयंपाक मग हळू हळू पाच जन आणि नंतर माईकडे दहा जणांच्या जेवनाच काम आलं त्यात बराच पैसा सुटू लागला .पण कष्ट फार होत .मला जमेल तशी मदत मी करायचो .मनु थोडा अवखळ होता पण तेवढीच चिनू हुशार ,बोलघेवडी अन कामात चपळ होती .चिनुची माईला बरीच मदत व्हायची ,भाजा चिरून देण, माई कामात असताना अभ्यास सांभाळत ...घर संभाळण .माईला वाटायचं ,परिस्थितीन माझ्या मुलाचं बालपण हिरावून घेतल .किती लवकर प्रौढपणा ..समजूतदारपणा आला ह्यांच्यात .पण त्याचवेळी माईच्या चेहेर्यावर एक समाधानही होत कि तिच्या मुलाना परिस्थितीची जाणीव आहे ह्या सगळ्यात खरच आमच बालपण हरवल .आम्ही तिघेही कधी मोठे झालो कळल देखील नाही .तिघांच्याहि स्वप्नाना माईन तिच्या कष्टाचे पंख ,त्या पंखात मायेच बळ दिल .मामान वडिलांची जागा मनात मिळवली .लग्नानंतर मामा वेगळ बिर्हाड करून राहिला पण हाकेच्या अंतरावर ,त्याच अजूनही माईकडे ,घराकडे तेवढच अन अगदी तसच लक्ष असतं . आज माई खूप थकलीय ,फार वाकलीय पण तरीही तिच्या डोळ्यात अजूनही कष्टाची तयारी असल्याची चमक जाणवते कि जी एखाद्या तरुणालाही लाजवेल .माईन त्यावेळी खंबीर राहून जर संसाराच्या वेलीला कष्टांच खतपाणी घालून मायेच्या ओंजळीन पाणी घातल नसत तर आज ..आज आम्ही आणि आमची माई ,माहित नाही कस कुठे आयुष्य चालत गेल असत .किवा मग आम्हीकुठे कसे चालते झालो असतो . आयुष्यभर चालता चालता माईन कधीच स्वतःची काळजी घेतली नाही ..माईचे गुढगे थकले ..त्यात ग्याप आला ... माईच्या मानेची शीर ..तिला अधून मधून सूज येवू लागली ..माईला हळूहळू दिसायचं कमी झाल ..पण माई ..माईन एवढ दुर्लक्ष केल स्वतःकडे कि ..कि माईला ब्रेन ट्युमर झाला .तिच्या ह्या रिपोर्ट ने माझ्या पायाखालची जमीन सरकली .क्षण क्षण फक्त आमचाच विचार करणारी माई ..आज दुख भोगायलाही एकटीच सज्ज झाली .माईन कधीच मनातल कसलच दुख चेहेर्‍यावर दाखवल नाही .बाबा गेले त्यावेळी जी माई आमच्यासमोर रडली ते एकदाच आणि शेवटच ,त्यानंतर माईचे अश्रू हे फक्त एकट्या माई साठीच ..तिला एकांतातच येवून भेटायचे .आज ह्या सगळ्या गोष्टी अगदी आत्ता घडल्यासारख्या डोळ्यासमोरून जातायत .माईच्या चेहेर्‍यावरच समाधान म्हणजे आम्हा तिघा भावंडाना जगातलं अनमोल दान पण आज मात्र माई एकटीच आहे .तीनं कधीच तिच्या पिल्लांच्या भरारीला आपल्या मायेचा अडसर होऊ दिला नाही .." उंच उडा आकाशात ..तिथपर्यंत ...जिथन खाली पाहताना तुमची माई तुम्हाला तांदळाच्या दाण्या एवढी दिसावी ..आन माईला तुमची भरारी बघून आलेल्या आनंदाश्रुना खाली गाळायलाही मिळू नये ..तेही माझ्यावानी तिथल्या तिथच थिजल्या वाणी गप्प गुमान ...." आज चिनू एच. आर. म्यानेजर आहे ,सध्या सिंगापूरला पोस्टिंग आहे तिची तर मनु सोफ्टवेअर इंजिनियर .सध्या इंग्लंड ला आणि मी मी अमेरिकेत एक न्युरो सर्जन .आज आम्ही कुणीच एकत्र नाही पण मनान ..मनान असे काही बांधलो गेलो आहोत आणि त्या बांधून ठेवणार्‍या धाग्याला आज आमची गरज आहे .माईन जे भोगल ,माईन जे केल ,माईन जे आम्हाला बनवल ,माईन जे आयुष्य आमच्या वाट्याला दिल ..त्या सगळ्यांचा मी ऋणी आहे .पण देवाण कुणावर इतकीही वाईट वेळ आणू नये ,जी माझ्यावर आणलीय . आयुष्यात जे काही जिच्यामुळे मिळाल आज त्या मिळकतीचीच ,त्या यशाचीच परीक्षा घेतली जातेय त्या मायेचा पदर माझ्या हातातून निसटतोय ..अन मीच आहे जो तो पदर अजूनही जशाचा तसा अंगावर ओढून ठेवू शकतो अस काहीबाही मनात येवू लागलय .माझ्या माईसाठी आज मी स्वतःच स्वतःच्याच हाताना मागण मागतोय ,स्वतःच्याच बुद्धीला साकड घालतोय .अशी वेळ ..अशी वेळ माझ्यावरच का यावी ..मीच का ? माझ्या माई साठी मलाच का?.. लिहितानाही गहिवरून याव ,वाचतानाही अश्रूंच्या पावसात भिजावं ,जगतानाही भावनाना कळवळून याव , अन आयुष्यभर ..मला मिळालेल्या माझ्या माई रूपी सर्वस्वाला मी मनातून पूजावं .माझ्याच मनाचा थांगपत्ता आज लागत नाहीय .सकाळी पहाटेची ७:३० फ्लाईट पकडून मी माईजवळ जाणार आहे ..माझ्या माईजवळ ,माझ्या माईची सर्जरी आहे ..माझ्याच हातून . *************************************************************
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3900
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.... ह्या व्यक्ती वर कितीही लिहा...चांगले आणि उत्तमच होईल...

वेगळा विषय, सुंदर मांडणी.

शेवटी आई ही आई असते आणि तिच्या ऋणातून मुक्त होणे एका जन्मात तरी नक्कीच शक्य नाही. हॅटस ऑफ पूजा.. - पिंगू

आपल्याला आवडले पण पूजा तै , प्रकाशित करा वर क्लिकण्यापूर्वी लेखरचनेकडे लक्ष दे ग. म्हणजे पूर्णविराम यांची संख्या किती असावी आणि paragraphs नेमके कुठे आणि किती पाडायचे ह्याकडे लक्ष दे म्हणजे तुझा छान लेख वाचताना लेखनातल्या हा चुकांकडे लक्ष जाऊन divert होणार नाही. बाकी नेहमीसारखाच छान लेख. आवडेश !

आणि जर माईबद्दल सगळ्या भावा- बहिणिंना एवढं प्रेम होतं तर ते सगळे या शेवटच्या हालातल्या दिवसात तिला सोडुन का गेले हे समजलं नाही, आणि जर पोटच्या पोरांनी त्यांची आयुष्यं स्वतंत्र जगण्यासाठी माईनं केलेला त्याग वगैरे गोष्टीची पोरांना जाणीव होत नसेल तर त्या त्यागांना काही किंमत नाही असं म्हणावं लागेल. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी - असं नव्हे तर, पोरांनीच आईला या परिस्थितीला आणुन ठेवलं आहे, आयुष्यात जे काही जिच्यामुळे मिळाल आज त्या मिळकतीचीच ,त्या यशाचीच परीक्षा घेतली जातेय त्या मायेचा पदर माझ्या हातातून निसटतोय ..अन मीच आहे जो तो पदर अजूनही जशाचा तसा अंगावर ओढून ठेवू शकतो अस काहीबाही मनात येवू लागलय .माझ्या माईसाठी आज मी स्वतःच स्वतःच्याच हाताना मागण मागतोय ,स्वतःच्याच बुद्धीला साकड घालतोय .अशी वेळ ..अशी वेळ माझ्यावरच का यावी ..मीच का ? माझ्या माई साठी मलाच का?.. - या फुकाच्या भावना धरुन रडण्यापेक्षा त्या माईच्या जवळ येउन राहिलं असतं किंवा तिला आपल्या जवळ ठेवुन घेतलं असतं तर त्या माउलीनं आजपर्यंत दिले त्यापेक्षा जास्त आशीर्वाद दिले असते. माईन जे आयुष्य आमच्या वाट्याला दिल ..त्या सगळ्यांचा मी ऋणी आहे .पण देवाण कुणावर इतकीही वाईट वेळ आणू नये ,जी माझ्यावर आणलीय . - यापेक्षा वाईट वेळ तुम्ही सर्वानी माईवर आणली आहे हे सत्य आता जीवघेण्या प्रकारे टोचतंय आणि ते नाकारायचंय हा मोठा दोष आहे. बाकी कथेबद्दल म्हणाल तर -फिक्स फॉर्मुला ५५ टाईपची स्टोरी आहे, आई आणि बाप या दोघांचे प्रत्येकाच्या आयुष्यातलं महत्व वादातीत असलं तरी ही गोष्ट ब-याच वेळा वाचलेली आहे असं जाणवलं.

In reply to by ५० फक्त

>>आणि जर माईबद्दल सगळ्या भावा- बहिणिंना एवढं प्रेम होतं तर ते सगळे या शेवटच्या हालातल्या दिवसात तिला सोडुन का गेले माईंची इच्छा नसेल कदाचित! व्यक्तिस्वातंत्र्य नावाची काही चीज आहे की नाही? एक स्त्री असली म्हणून काय झालं? त्यांची काही मते नसावीत का? आता असतो काहीजणांचा अट्टाहास. उगीच मुलांच्या घरात लोढणं म्हणून रहायची इच्छा नाही असंही असू शकते ना. >>फिक्स फॉर्मुला ५५ टाईपची स्टोरी आहे, आई आणि बाप या दोघांचे प्रत्येकाच्या आयुष्यातलं महत्व वादातीत असलं तरी ही गोष्ट ब-याच वेळा वाचलेली आहे असं जाणवलं. शांत घ्या हो हर्षदराव! लेखिकाबै टिपिकल नवरा-बायकोच्या विषयातून बाहेर येतायत. लगेच तुम्ही असं हतोत्साह का करताय? ;)

In reply to by अन्या दातार

'माईंची इच्छा नसेल कदाचित! व्यक्तिस्वातंत्र्य नावाची काही चीज आहे की नाही? एक स्त्री असली म्हणून काय झालं? त्यांची काही मते नसावीत का? आता असतो काहीजणांचा अट्टाहास. उगीच मुलांच्या घरात लोढणं म्हणून रहायची इच्छा नाही असंही असू शकते ना.'- पण मग हा व्यक्तिस्वातंत्र्याचा विचार माईनी केला का मुलांना मोठं करताना, दिलं का त्यांना स्वातंत्र्य त्यांना हवं होतं तसं वागायचं, त्यांची आयुष्यं व्यवस्थित रांगेला लागावीत म्हणुन लावलीच ना शिस्त, दिले असतीलच ना फटके, आता ते उलटं व्हायला हवं, तशीच शिस्त आता पोरांनी आईला लावायला हवी. एका विशिष्ट वयाच्या पुढं माणसाचा हटवादीपणा पुन्हा लहान मुलाच्या एवढाच वाढतो, लहान मुलाच्या हटवादीपणाला आईबाप जसं प्रेमानं गोंजारुन आवर घालतात, तसंच म्हाता-या आईबापाच्या हटवादीपणाला पोरांनी आवर घालावाच लागतो, पण त्यावेळी आपल्या अन बायकोच्या सुखापायी ' अहो, मी किती सांगितलं ऐकतंय नाहीत आई बाबा, हट्टी झालेत वयानुसार ' असं फसवं विधान टाकलं जातं. आणि अगदी आई बापांना आपण मुलांच्या घरातलं लोढणं होतोय ही भावना होणं हे देखील मुलाचंच फेल्युअर आहे, आईबापांच नाही. आज आपल वय झालं असलं तरी आपण या कुटुंबाचा एक भाग आहोत किंवा सध्याचं हे तरुण कुटुंब आपल्याच कुटुंबाचा एक्स्टेंडेड भाग आहे ही भावना घरातल्या म्हाता-यांच्या मनात रुजवणं हे काम फक्त आणि फक्त त्या घरातल्या तरुणांचंच आहे.

नाही आवडली.. कथा खुललीच नाही.. उगाच शब्द्बंबाळ झाली अस वाटल.. माफ करा पण तुमच इतर लेखन आवडत म्हणुन स्पष्ट मत देतोय..

पूजा ताई: कथा बरी आहे, पण predictable वाटली. तुमच्या इतर कथांप्रमाणे भावनापूर्ण शब्दांमध्ये अति-भिजलेलीही वाटली ;-) आणि शुद्धलेखनाबरोबरच जरा तांत्रिक गोष्टींकडेही लक्ष दिलं तर बरं असं वाटलं:
माईचे गुढगे थकले ..त्यात ग्याप आला ...माईच्या मानेची शीर ..तिला अधून मधून सूज येवू लागली ..माईला हळूहळू दिसायचं कमी झाल ..पण माई ..माईन एवढ दुर्लक्ष केल स्वतःकडे कि ..कि माईला ब्रेन ट्युमर झाला
...?! गुढघ्यांतल्या गॅपमुळे, मानेतल्या शीरेच्या सुजेमुळे, दिसायचं कमी झाल्याने किंवा या सर्वांकडे दुर्लक्ष केल्याने ब्रेन ट्यूमर होत नाही (ब्रेन ट्यूमर मुळे यातली काही दुखणी उद्भवणं शक्य आहे, पण उलट नाही). कथानायक न्यूरोसर्जन आहे ना? मग तो असं चुकीचं प्रतिपादन करतो हे खटकतं. इतक्या सविस्तर लिहिणार नव्हतो, पण तुमचं लेखन आवडतं म्हणून आवर्जून धागे वाचणारे माझ्यासारखे वाचक आहेत, त्यातील काही वैद्यकीय क्षेत्राशी फारसे संबंधित नसणारेही असणारच. त्यांना तुमच्या लेखनातून अनाहुतपणे चुकीची माहिती मिळू नये इतकाच उद्देश आहे.

In reply to by बहुगुणी

बहुगुनि प्रतिसादाबद्दल धन्यवाद , थोडासा खुलासा करण्याची इच्छा आहे . कथानायकाने कुठेहि अस ,गुडगे थकल्यामुळे ब्रेन ट्युमर झाला , मानेची शीर सुजल्यामुळे ब्रेन ट्युमर झाला , कमी दिसायच आल्याने ब्रेन टयुमर झाला ,नमुद केलेल नाहि . गुडगे दुखन ,मानेची शीर सुजन ,कमि दिसायच होन ही वार्धक्क्याची लक्षन सान्गितलि आहेत ..पूढे ' पण माई ' हे शब्द आहेत ,त्यात ' माई इतकि थकलि होती तरि काम करण्याची सवय तिला स्वस्थ बसु द्यायची नाहि ,त्यामुळे कामात कुठल्याहि दुखन्याला वय झाल म्हनुन दुखत असेल ह्या नावाखालि दुर्लक्ष करायची हेच त्या दोन शब्दात व्यक्त करन्याचा प्रयत्न केला. शक्यतो हे सगळ्याच स्त्रियांच्या बाबतित आहे .कुठल्याहि रोगाची लक्षण साध्या दिसन्याने त्यन्च्यात काहिच फरक पडत नाहि ,तो रोग जेव्हा सिरिअर होत जातो तेव्हा त्यांच लक्ष जात . स्त्री च आजारि पडण म्हनजे अक्ख्या घराला आजारपण येन असत . त्यामुळे ती कितिहि आजारि असु ,तिला तिच्या बाळाच्या खान्यापिन्याची ,नवर्‍याच्य डब्याची ,अक्ख्या घराची काळजि लागुन रहाते .त्यात मग सहसा मोठे आजार जोपर्यन्त बळावत नाहित तोवर लक्ष्य दिल जात नाहि . ब्रेन ट्य्मरच्या लक्षनाकडेहि माईने असच लक्ष दिल नाहि ,अस कथानायकाला सांगायच असल्याने फूफाट्पसारा न घालता ,त्याने " माइने इतक दुर्लक्ष केल ( अर्थातच स्वतहकडे) कि तीला ब्रेन ट्युमर " हे सरळ सांगुन टाकल . अर्थात कथेत एवढा विस्तार गरजेचा वाटलाच नाहि ..म्हनुन भावनाना मोजके शब्द देवुन मांडन्याचा प्रयत्न केला. कथानायकाला फार खोलात जाऊन लक्षण सांगन योग्य वाटत नसेल ,किवा त्याला लेखात फक्त भावना मांडायच्या असव्यात , असा विचारहि जरा करुन बघा . बाकि सडेतोड प्रतिक्रियाबद्दल नक्किच आभार . सुधरवन्याचे प्रयत्न १०१% करेन .

पुजा तै नी आपले काळीज काढुन ठेवले आहे . कवी ग्रेस यांची आई वरील कवीता फारच बोलकी आहे. देवाला प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष जाता येत नाही.म्हणूनच आई निर्माण केली आहे.हे खरं कि नाही. आणी कितीही प्यारा , पुर्णविराम टाकले तरी आई ची महती काही केल्या कमी होणार नाही. पुजा तै धन्यवाद मला आईची आठवण आली. ( लवकर जा तुमच्या माई कडे -सकाळी पहाटेची ७:३० फ्लाईट पकडून मी माईजवळ जाणार आहे ..माझ्या माईजवळ ,माझ्या माईची सर्जरी आहे ..माझ्याच हातून .) तुम्हाला शुभेछा रघु सावंत

पुजा मला लिखाण आवडले. छान लिहिलंयस !! थोडे वेगळ्या ढंगाने विषय मांडलायस, टिपिकल नाही. त्यामुळे कंटेंट आणि स्टाईल दोन्ही आवडले. खुप लिही. शुभेच्छा.

कथा थोडी त्यामूळे खूप आवडली असे म्हणणार नाही... वर विस्तृत विवेचन इतरांनी केलेलं आहेच. एक सूचना ते 'माइन' असं न लिहीता 'माइनं' असा लिहा... ते माइन माइन असं वाचता वाचता 'माइ नी माइ' हे गाणं आठवलं :-) पु.ले.शु. अमृत

In reply to by अमृत

अरे, आधीच मराठीच्या शुद्धलेखनाचा बोरा वाजलाय त्यात आता हिंदीला पण घेउ नका रे. माइन - माईनं असं हवंय, आणि ते गाणं माइ नी माइ असं नाहीत लिहित , माएं नी माएं, असं आहे.