Skip to main content

बीज अंकुरे अंकुरे.... (अष्टाक्षरी)

लेखक वेणू
बुधवार, 28/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
बीज अंकुरे अंकुरे रुपं नव्हाळ मातीला, गर्भारता देह तिचा रंग केतकी कांतीला! बीज अंकुरे अंकुरे माझे स्वप्न तुझ्या डोळा, सूर ल्याले रे तुझे मी शब्द शब्द झाला खुळा... बीज अंकुरे अंकुरे जमिनीला लागे ध्यास, वाढ वाढावे गं रोप नको आभास आभास... बीज अंकुरे अंकुरे आता स्वप्नांना आकार, उद्या उमलेल पातं घरी बहार बहार.. बीज अंकुरे अंकुरे म्हणे करा तपासणी, जर देशी वंशा दिवा आकाशास गवसणी! बीज अंकुरे अंकुरे, का हा वणवा पेटला? नवा जन्म रुजताना कुणी गळा गं घोटिला? -बागेश्री ब्लॉगवर पूर्वप्रकाशित : http://venusahitya.blogspot.com/
लेखनविषय:

वाचने 3421
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

सुरेख रचना... ज्याप्रकारे गेयता सांभाळली आहे, ते खरचं कौतुकास्पद आहे.
बीज अंकुरे अंकुरे म्हणे करा तपासणी, जर देशी वंशा दिवा आकाशास गवसणी!
व्वाह!!

सुरेख काव्य आहे. तुमची या आधीची अष्टाक्षरी ही छान होती

विषय बरोबर पेलला गेला आहे. शेवट्च्या कडव्यातून अनपेक्षित धक्का देवून कविता संपते आणि कविता जबरदस्त परिणाम सोडून रहाते. १०० % ऊच्च रचना. अभिनंदन.

बीज अंकुरे अंकुरे म्हणे करा तपासणी, जर देशी वंशा दिवा आकाशास गवसणी! बीज अंकुरे अंकुरे, का हा वणवा पेटला? नवा जन्म रुजताना कुणी गळा गं घोटिला?>>> ब्बास...! एखाद्या विषयातली जाणिव,वेदना असे सामाजिक विषयावरच्या काव्याच्या बाबतीत जे काही म्हणतात ना, ते हेच...! मान गये.... आपला सलाम या रचनेला :-)

अर्थपूर्ण अष्टाक्षरी फक्कड जमली आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

+१

थोडक्या शब्दात सामाजिक भान जपलंय. नीरस काथ्याकुटापेक्षा हजार वेळा छान!

खत्रा कविता! मिपावरच्या दहा कवितांवर क्लिक केल्यावर एखादीतरी असली कविता वाचल्यामुळे चिडचिड होत नाही. :)

परिणामकारक आणि दर्जेदार रचना आहे. बीज अंकुरल्याच्या आनंद ते तो अंकुर खुडल्यापर्यंतचा हेलकावा छातीत धस्स करून जातो.

"बीज अंकुरे अंकुरे रुपं नव्हाळ मातीला, गर्भारता देह तिचा रंग केतकी कांतीला!" छान .. सुंदर..

बीज अंकुरे अंकुरे, का हा वणवा पेटला? नवा जन्म रुजताना कुणी गळा गं घोटिला? ह्या पापातून कधी मो़कळा होणार मानव ? तो हवा तशी ती पण हवीच ना ? एका चाकाचा रथ काय कामाचा ,जरी असेल आलिशान नि राजाचा ? @कवयित्री , मला सापडलेला अर्थ च आपल्याला अभिप्रेत आहे ना ? कविता सुघटली आहे . पुलेशु

छानच आहे. . . शेवटचे कडवे चटका लावून जाणारे.. अमृत

भरभरून प्रतिसादांसाठी मनःपूर्वक आभारी आहे. चौकटाराजाजी, कवितांचे आपले अनेक अर्थ निघतात, मी लिहीली, आता ती वाचकांची- अर्थ ही त्यांचेच, तुम्ही लिहीलेला अर्थ फारच सुरेख आहे, :)

सुरेख रचना. आवडली.