✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

स्त्री पुरुष समानता म्हणजे काय?

स
सोत्रि यांनी
Tue, 03/13/2012 - 04:00  ·  लेख
लेख
स्त्री पुरुष समानता म्हणजे नेमके काय? हा प्रश्न फार दिवसा झाले पडला आहे. अदितीच्या ह्या लेखामुळे त्यावर जरा विचार करून उत्तर शोधून काढावेच असे वाटते. ह्या बाबतीत मला असे वाटते किंबहूना आजवरचे माझे मत असे की पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्री
  • आर्थिकदृष्ट्या परावलंबी असते
  • शिक्षणापासून वंचित राहते
  • सत्तेत किंवा अधिकारामध्ये तिला वाटा नसतो
  • चूल आणि मूल ह्या संकल्पनेत तिला जखडून टाकले गेले असते (हे समाजातील तळागाळापासून एलिट असे सर्व थर गृहीत धरून व्यक्त केलेले मत आहे)
तर, तिला शिक्षण मिळून ती आर्थिकदृष्ट्या स्वाबलंबी होऊन तिला सत्तेत किंवा अधिकारामध्ये वाव मिळायला हवा ही झाली स्त्री मुक्ती आणि त्यासाठी ‘सर्व पातळीवर समान संधी’ मिळणे म्हणजेच शिक्षण, करियर, सत्तेत (अधिकारात) वाटा ह्यामध्ये स्त्री पुरूष असा लिंगभेद न होता समान संधी मिळणे म्हणजे स्त्री पुरुष समानता. त्या अनुषंगाने आंतरजालावर जरा शोध घेतला तर फार काही हाती लागले नाही. खरंच हे जरा विस्मयकारकच होते. पण जे काही थोडे बहुत वाचायला मिळाले, काही चर्चा वाचायला मिळाल्या तेथेही मुळात स्त्री पुरुष समानता म्हणजे काय हेच स्पष्ट नाही. एके ठिकाणी स्त्रिया कुंकू लावतात पुरूष नाही, पुरुषाला फक्त मिस्टर असे संबोधन तर स्त्रियांना मिस आणि मिसेस असे वैवाहिक स्टेटस असलेले संबोधन असे काहीसे मत मांडून समानता आणि (अ)समानता असा उहापोह केला होता. हे वाचून हसू तर आलेच पण कीवही आली. सांख्यिकीच्या आधारे ही समानता मोजण्याचा प्रयत्न वर उल्लेखलेल्या अदिती ह्यांच्या लेखात झाला आहे. ज्या ज्या गोष्टी पुरूष करू शकतात त्या त्या स्त्रियांनी करणे म्हणजे समानता का? किंवा मग तसे नसेल तर निदान ज्या गोष्टी स्त्रिया करू शकतात त्यात त्यांची संख्या पुरुषांएवढी(च) हवी का? म्हणजे कुठल्याश्या सर्वे नुसार जर १०० पुरूष एखादी गोष्ट करतात तर तेथे स्त्रियांची संख्या पण १०० च असायला हवी का आणि तशी असली तर समानता आली का? ही स्त्री पुरुष समानता नेमकी काय हा विचार करता करता ‘दिमाग का दही’ का काय म्हणतात तसे झाले आणि अचानक एक छान लेख वाचायला मिळाला (हिंदीत आहे). ह्यात म्हटले आहे की स्त्री पुरूष हे अर्धनारीश्वर (शीव-पार्वती) असून ते एकमेकांना पूरक आहेत आणि समानता म्हणजे एकमेकांना Complement करणं आणि निर्भेळ सहजीवन अनुभवणं. मला हे एकदम भावले आणि पटले. साधक-बाधक चर्चा होऊन ह्याचे उत्तर इथे मिळेल असे वाटते ब्वॉ.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
127824 वाचन

💬 प्रतिसाद (247)

प्रतिक्रिया

सोल्यूशन हवंय कुणाला?

पिवळा डांबिस
Tue, 03/13/2012 - 04:13 नवीन
स्त्री पुरूष हे अर्धनारीश्वर (शीव-पार्वती) असून ते एकमेकांना पूरक आहेत आणि समानता म्हणजे एकमेकांना Complement करणं आणि निर्भेळ सहजीवन अनुभवणं. असं समजलं तर मग वाद कसे निर्माण करता येतील? 'अर्धनारीश्वर' मध्येदेखील उजव्या बाजूला पुरूष असावा की स्त्री असावी यावर वाद सुरू करतील लोक! कुठूनही वितंडायला निमित्त हवं ना!! :)
  • Log in or register to post comments

+१०००

असुर
Tue, 03/13/2012 - 06:28 नवीन
कुठूनही वितंडायला निमित्त हवं ना!!
ठ्ठो!!! याग्गाग्गो पिडांकाका, पाशवी धाग्यावर, मग भले तो सोत्रिचा का असेना, असला प्रतिसाद म्हणजे धाडसच की. :-) सगळ्याच्या सगळ्या प्रतिसादाशी सहमत!!! आणि समानता म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे समानतावादी लोकांना? इथे दोन पुरुष नसतात एकसारखे (जुळे लोक्स दिसायला सारखे असू शकतात), तर स्त्री आणि पुरुष समान असलेलं दाखवणं म्हणजे गायीची शेपटी रेड्याला जोडायचं काम है! 'एकमेकांना पूरक असणं', हा सोत्रिचा मुद्दा एकदम पटला. समानता आणून काय जगण्यातली मजा घालवायची आहे का? त्यापेक्षा डिफरंट असूनही एकमेकांना साथीला असणं जास्त भारी! सर्व पाशवी शक्तींना आज-आत्ता-ताबडतोब विनम्र अभिवादन! :-) --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

अरे वा! स्त्री मुक्त झाली

यकु
Tue, 03/13/2012 - 06:20 नवीन
अरे वा! स्त्री मुक्त झाली काय. च्यायला, आमच्या आईला कितींदा सांगतोय मुक्त हो, मुक्त हो - अशी रांधा, वाढा, उष्टी काढा कधीपर्यंत करीत रहाणार. पण तिचं आपलं तेच, हे अजून आले नाहीत.. कोणती भाजी करायचीय ते विचारलं असतं वगैरे.. असो. शुभेच्छा मुक्त स्त्रीयांना. बहुतेक मुक्त झाल्यानंतर आता समान होत असावी. स्त्रीमुक्तीबद्दल मागे हे वाचलं होतं ब्वॉ:
स्त्रीमुक्ती चळवळीची एक विदुषी मला भेटायला आली (मी अत्यंत उद्धट, निर्दयी माणूस आहे हे आधीच सांगतो). स्त्रीमुक्ती चळवळीबद्दल तुमचं काय मत आहे? तिने मला विचारले. मी म्हणालो मी पूर्णत: स्त्रीयांच्या बाजूने आहे - लढा तुमच्या हक्कासाठी. पण हेही लक्षात ठेवा की जोपर्यंत तुम्ही तुमच्या लैंगिक गरजांसाठी पुरूषांवर अवलंबून आहात, तोपर्यंत तुम्ही मुक्त होणार नाही. दुसर्‍या बाजूनेही हे असंच आहे. व्हायब्रेटर वापरून तुम्ही तुमच्या लैंगिक गरजा पूर्ण करू शकता, ती गोष्ट वेगळी. पण तुम्हाला पुरूष हवा असेल तर तुम्ही, मुक्त नसाल. पुरूषही मुक्त नसेल. - उप्पलुरी गोपाला कृष्णमूर्ती
आभार (अर्थात आमचेच)
  • Log in or register to post comments

स्त्री पुरुष समानता

सन्जोप राव
Tue, 03/13/2012 - 06:51 नवीन
स्त्री पुरुष समानता म्हणजे काय? असा प्रश्न न पडणे म्हणजेच स्त्री पुरुष समानता.
  • Log in or register to post comments

अगदी परफेक्ट उत्तर.

किचेन
Tue, 03/13/2012 - 15:11 नवीन
अगदी परफेक्ट उत्तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

समानता - असमानता.

प्रभाकर पेठकर
Sat, 03/17/2012 - 14:10 नवीन
मनाला, दृष्टीला असमानता अजिबात न जाणवणं म्हणजेही समानता मानायची का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

लेख पटला नाही

धन्या
Tue, 03/13/2012 - 07:32 नवीन
मराठी इंटरनेट साइट्सवर स्त्रियांचे प्रमाण पुरुषांच्या प्रमाणाइतकेच होणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय असे आमचे ठाम मत आहे.
  • Log in or register to post comments

+१००० टु असुर, 'तर स्त्री

५० फक्त
Tue, 03/13/2012 - 08:10 नवीन
+१००० टु असुर, 'तर स्त्री आणि पुरुष समान असलेलं दाखवणं म्हणजे गायीची शेपटी रेड्याला जोडायचं काम है!' - एकदम पटेश स्टेटमेंट, खुळं आहेत नुसती बाकी काही नाय, जसं शिंपी आपल्या चुका फॅशन म्हणुन खपवतो तशातला प्रकार आहे हा, वर यशवंतानं लिहिलेलं त्रिवार सत्य आहे, पण हे सत्य नाकारणं यातच या प्रश्नाचं मुळ आहे. स्त्री -पुरुष समानता याची व्याख्या करणं आधी जमतंय का ते पाहु मग नंतर ती आहे का नाही, होईल का नाही याचा विचार करु. पण त्यापेक्षाही मोठा आणि महत्वाचा विचार हा आहे की हे असं होण्याची गरज आहे का ?१ लिटर पाणि आणि १ किलो वाळु यांच्यात समानता काय अन फरक काय हे सांगणं समजणं शक्य आहे, पण ते दोन्हि समान करुन दाखवा म्हणलं तर कसं होईल.
  • Log in or register to post comments

तुम्ही कोण?

Nile
Tue, 03/13/2012 - 08:26 नवीन
१ लिटर पाणि आणि १ किलो वाळु यांच्यात समानता काय अन फरक काय हे सांगणं समजणं शक्य आहे, पण ते दोन्हि समान करुन दाखवा म्हणलं तर कसं होईल.
इथं जरा गोंधळलोय मी!! तुम्ही पाणी का वाळू? किती लिटर आणि किती किलो तो वेगळा प्रश्न! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/13/2012 - 08:42 नवीन
ऐतिहासिक व्याख्येला आजची व्याख्या समजून मग हसू येणं, कीव करणं .... आणि मग अमक्याची शेपटी तमक्याला ... वैतागून असं म्हणावंसं वाटतं, तुम्हाला मुलगी असती आणि तिने कळवळून तक्रारी केल्या असत्या तरी तुम्हाला समजलं असतं का स्त्रियांचं दु:ख? स्वतंत्र अस्तित्त्व असणार्‍या व्यक्तीला सतत ती लग्न झालेली आहे का नाही याची ओळख विचारणं, नाव ही मनुष्याची मूळ ओळख पण तीच बदलणं, यांतही किती क्रौर्य आहे हे जातायेता हिंसा करणार्‍यांना काय समजणार? स्त्री समानतेच्या बाबतीत कोण किती पाण्यात आहे आणि कोण अजून इ.स. १७६० मधे आहे हे दिसतं आहेच. संपादित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

अदिती, तुझा कळवळा समजू शकतो.

असुर
Tue, 03/13/2012 - 13:53 नवीन
अदिती, तुझा कळवळा समजू शकतो. नक्कीच. पण मी स्वत: माझ्यापासून सुरुवात करत नाही, तोपर्यंत ती समानता माझ्या कुटुंबात, आई/बहीण/बायको यांच्यापर्यंत पोहोचणार कशी? हाच विचार जसा घरी, तसाच हापिसातदेखील व्हायला हवा. मुळात हे प्रत्येकालाच, म्हणजे प्रत्येक स्त्री-पुरुषाला स्वत:हून वाटायला हवं. माझ्या परीने मी माझ्या आई/बहीण/बायकोला समान वागणूक देतो का हे महत्वाचं. बाकी तिकडे जगाचे रुल्स काही का असेना. आणि एकमेकांना पूरक असणं हे कुठेही वाईट नाही. कुणा एकाला सतत पडती बाजू घ्यावी लागत असेल तरच, नाहीतर यासारखी मजा नाही. आणि ज्या माणसाला धाकटी बहीण असेल तो तर समानतेच्या लाटेत आपोआपच सामील होऊन जातो. पर्यायच नाही. अनुभवावरुन सांगतोय. समानता येणार असेल तर बरंच आहे एका अर्थी. घरात आमच्या मताला एखादा टक्का तरी किंमत येईल. :-) --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मुक्ती!

Nile
Tue, 03/13/2012 - 08:35 नवीन
वरचे काही प्रतिसाद वाचून या पुरुषांनाच आधे मुक्ती मिळू दे अशी सैतानाकडे प्रार्थना केली! म्हणा रे.. राम नाम... !!
  • Log in or register to post comments

असमानता... असमानता..

प्रभाकर पेठकर
Sat, 03/17/2012 - 14:18 नवीन
सैतानाकडे प्रार्थना केली! म्हणा रे.. राम नाम 'हडळी'कडे का नाही प्रार्थना करीत? 'पंचकन्या' स्मरे नित्यं... असे सांगितलेले असूनही रामाचेच नांव घ्यायचे का? किती ही असमानता???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

तुमच्यामुळेच

Nile
Sun, 03/18/2012 - 06:35 नवीन
तुमच्या सारख्यांनी निर्माण केलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीमुळेच हो! सैतान आमच्यावर प्रसन्न आहे, पण या संस्कृतीमुळे हडळींना प्रसन्न करायचं कसब काही आम्हाला आत्मसात करता आलं नाही हो. नाहीतर हडळींवर प्रेम करायला आमची काही ना नाही! आहेत का काही क्लृप्त्या तुमच्याकडं? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

लिंगभेद...

प्रभाकर पेठकर
Sun, 03/18/2012 - 10:00 नवीन
तुमच्या सारख्यांनी निर्माण केलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीमुळेच हो! तथाकथित पुरुषप्रधान संस्कृतीच्या निर्माणात व्यक्तिशः माझा सहभाग आहे हा माझ्यासाठीही नवा शोध आहे. सैतान आमच्यावर प्रसन्न आहे, पण या संस्कृतीमुळे हडळींना प्रसन्न करायचं कसब काही आम्हाला आत्मसात करता आलं नाही हो. नाहीतर हडळींवर प्रेम करायला आमची काही ना नाही! आहेत का काही क्लृप्त्या तुमच्याकडं? सैतान आणि हडळ दोन्ही वृत्ती नकारात्मक आणि विघातक आहेत असे माझे मत असल्याकारणाने चांगल्या, सकारात्मक आणि विधायक वृत्तींना वश करण्याकडे माझा ओढा आहे. मग तो देव असो अथवा देवी. मी लिंगभेद करीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

तुमच्यासारखे..

Nile
Mon, 03/19/2012 - 07:25 नवीन
तथाकथित पुरुषप्रधान संस्कृतीच्या निर्माणात व्यक्तिशः माझा सहभाग आहे हा माझ्यासाठीही नवा शोध आहे.
सहभाग असेलही. पण मी फक्त तुमच्या सारख्यांबद्दल बोलत होतो. ;-)
मग तो देव असो अथवा देवी. मी लिंगभेद करीत नाही.
चांगलं आहे. देव्या प्रसन्न करायला माझी काहीच हरकत नाहीए, पण बहुतेक सगळ्या "टेकन" आहेत असे दिसते. (देव आणि देवता यांचा सुद्धा सेक्स रेशो भलता "स्क्यूड" आहे राव!!) असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

विनोदाचे वावडे.

प्रभाकर पेठकर
Mon, 03/19/2012 - 09:32 नवीन
सहभाग असेलही. पण मी फक्त तुमच्या सारख्यांबद्दल बोलत होतो. हा फार व्यक्तिगत आरोप होतो आहे. माझ्या सारख्यांबद्दल म्हणण्यासाठी काय जाणता आपण माझ्या बद्दल? ज्या प्रतिसादावरून आपण हा व्यक्तिगत हल्ला सुरू केला आहे तो मुळात विनोद निर्मिती करणारा प्रतिसाद आहे. हे कृपया ध्यानात घ्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

हा हन्त हन्त!

Nile
Mon, 03/19/2012 - 12:23 नवीन
आम्ही पण विनोदच करत होतो की हो! तुमच्याबद्दल काडीचीही माहिती नसताना तुमच्यावर आरोप करायला तुम्हाला मी काय मराठी संस्थळांवरचा कोणी मुर्ख सदस्य वाटलो की काय? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

पुनरुक्ती!

Nile
Mon, 03/19/2012 - 12:28 नवीन
दोविसात्यामजाम्ह.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

अनर्थ !

परिकथेतील राजकुमार
Tue, 03/13/2012 - 11:28 नवीन
म्हणा रे.. राम नाम... !!
ह्या परमेश्वरद्वेष्ट्या निळ्याच्या कळफलकातून रामनाम टाईपले गेलेले बघून आज एक वाचक म्हणून शरम वाटली. निळ्याच्या स्वप्नात जांबुवंत येवो. बाकी विहिर, समुद्र, तळे, डबके, नाला, धरण ह्यांच्या व्याख्या नक्की झाल्या की संबंधितांनी कळवण्याचे करावे. त्या आधारे आम्ही सर्व ठिकाणी कधी बेडूक, कधी देवमासा, कधी बोंबील, कधी अ‍ॅनाकोंडा वैग्रे बनून डूंबून यावे म्हणतो.
  • Log in or register to post comments

शिंच्या!!

Nile
Tue, 03/13/2012 - 12:05 नवीन
ह्या परमेश्वरद्वेष्ट्या निळ्याच्या कळफलकातून रामनाम टाईपले गेलेले बघून आज एक वाचक म्हणून शरम वाटली.
वाक्य पुर्ण केलेलं नाही हे लक्षात असुद्या!
निळ्याच्या स्वप्नात जांबुवंत येवो.
मेल्या!! जाबुंवती तरी म्हणायचस!! एक वेलांटी द्यायला तुला काय पैसे पडतात का रे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

वा वा वा...प्रामाणिक लेखावर

बॅटमॅन
Tue, 03/13/2012 - 11:38 नवीन
वा वा वा...प्रामाणिक लेखावर उग्गीच आरडा ओरडा करणाऱ्या प्रतिक्रिया पाहून कीव आली.
  • Log in or register to post comments

स्त्री पुरुष समानता म्हणजे

श्रावण मोडक
Tue, 03/13/2012 - 11:52 नवीन
स्त्री पुरुष समानता म्हणजे काय? साधक-बाधक चर्चा होऊन ह्याचे उत्तर इथे मिळेल असे वाटते ब्वॉ.
मिळालं तर, किंवा मिळालं की, मला कळव ही नम्र विनंती. इथं नाही मिळालं तर एक काम कर. वहिनींना, आईला, सासुबाईंना, भावजयीला, पोरींना (एकूण स्त्री नातलग, सुहृदांना) विचार. त्या देतील ते उत्तर त्या-त्या संदर्भात तुझ्यापुरतं खरं. तीच समता. त्या उत्तराचं विज्ञान करायला जाऊ नकोस, शास्त्रही करू नकोस, किंवा सिद्धांतही करू नकोस. म्हणजे असले प्रश्न पडणार नाहीत. सुखी राहशील. ;)
  • Log in or register to post comments

हाहाहा! उत्तर एक फटके अनेक!

बिपिन कार्यकर्ते
Tue, 03/13/2012 - 12:13 नवीन
हाहाहा! उत्तर एक फटके अनेक! अनेकता मे एकता! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

वहिनींना, आईला, सासुबाईंना,

धन्या
Tue, 03/13/2012 - 15:03 नवीन
वहिनींना, आईला, सासुबाईंना, भावजयीला, पोरींना (एकूण स्त्री नातलग, सुहृदांना) विचार. त्या देतील ते उत्तर त्या-त्या संदर्भात तुझ्यापुरतं खरं. तीच समता.
वरचा संजोपरावांचा प्रतिसाद आणि हे वाक्य अक्षरशः पटलं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

संजोपराव म्हणतात, स्त्री

मस्त कलंदर
Tue, 03/13/2012 - 12:18 नवीन
संजोपराव म्हणतात,
स्त्री पुरुष समानता म्हणजे काय? असा प्रश्न न पडणे म्हणजेच स्त्री पुरुष समानता.
हेच खरं. बाकी, ओढून ताणून प्रत्येक मुद्दा स्त्री-पुरूषाच्या लैंगिकतेशी आणणं, आणि आमच्या घरची बाई कशी घरच्यासांठी झिजण्यात सुख मानते आणि काय या आजकालच्या मुली आणि त्यांचं स्त्रीमुक्तीचं फॅड म्हणणं हे नेहमीप्रमाणेच पटत नाही. सगळेच स्त्रीपुरूष जगभर ताकाचं भाडं घेऊन फिरताहेत असं जरी मान्य केलं, तरी ती भूक भागल्यानंतर बुद्धीची, पोटाची अशा इतरही गरजा असतात हे यांच्या ध्यानी कधीतरी यावं अशी भाबडी अपेक्षा आहे. घरची स्त्री, मग ती नोकरी करत असू दे अथवा नाही, पण त्यांच्या माथी नुसती रांधा, वाढा, उष्टी काढा का मारावं? पुरूष करतात ती नोकरी, आणि बायका हापिसात चकाट्या पिटतात का? घरच्या बाईला विरंगुळा हवा असेल, एखादा छंदा जोपासायचा असेल, तर "तिचं काम आम्ही करतो" असं न म्हणता, "हे आमचं घर आहे, आणि तिथे मनापासून आम्ही सगळेच दिसेल ते काम करतो" असं आलं तर बिघडलं कुठे? बरं, कामवाली बाई करो वा घरातली बाई पण स्वयंपाक-धुणी-भांडी हे एवढंच काम नसतं. घरभर पसरलेल्या पेपरांपासून आल्या गेल्याची उसाभर हे सगळं तीच पाहात असते. घरच्या संस्कृती-परंपरांची पताकापण तिच्याच खांद्यावर असते. कामवाल्यांकडूनही कामं तिनंच करोन घ्यायची असतात, ती नीट नाही झाली तर, "उद्यापासून तूच करत जा गं, ती बाई चांगलं काम नाही करत" हे वाक्य येतं की "आपण मिळून करत जाऊ" असं म्हटलं जातं? एकेकाळी घरातली कामं स्त्रियांची अशी त्या काळाप्रमाणे विभागणी झाली असेल, तर बदलत्या काळानुसार प्रत्येकानं किमान आपलं काम तरी का करू नये? काम असेल तर घर काय तिचं एकटीचं आणि इतर वेळेस सगळ्यांचं असं म्हणणं म्हणजे शुद्ध दांभिकपणा आहे. स्त्री मुक्तीचा अर्थ फक्त आर्थिक स्वातंत्र्य, घरकामातून सुटी किंवा काही अंतर्वस्त्र न घालणं नव्हे. तिला मन आहे, तिचे काही विचार असू शकतात, स्वतःच्या गरजा असू शकतात या सगळ्यांची दखल घेणं आणि त्याप्रमाणे जसा आपण काही कामांपासून्/गोष्टींपासून पळ काढून आपल्याला हवं ते करतो, तसं न करता तिला MOM- Motive, Opportunity, Method उपलब्ध करून देणं होय. यातला पहिला 'M' बहुतेक जणींकडे असतोही. हे असं झालं तर "करावं पुष्कळ वाटतं पण कामांमुळे वेळ मिळत नाही" ही सबब कुणी देणार नाही.
  • Log in or register to post comments

मकी आणि संजोपरावांना ... +१

बिपिन कार्यकर्ते
Tue, 03/13/2012 - 12:22 नवीन
मकी आणि संजोपरावांना ... +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

सहमत

श्रावण मोडक
Tue, 03/13/2012 - 12:46 नवीन
प्रतिसादाशी सहमत. म्हणूनच सन्जोप रावांशीही सहमतच.
स्त्री मुक्तीचा अर्थ फक्त आर्थिक स्वातंत्र्य, घरकामातून सुटी किंवा काही अंतर्वस्त्र न घालणं नव्हे. तिला मन आहे, तिचे काही विचार असू शकतात, स्वतःच्या गरजा असू शकतात या सगळ्यांची दखल घेणं आणि त्याप्रमाणे जसा आपण काही कामांपासून्/गोष्टींपासून पळ काढून आपल्याला हवं ते करतो, तसं न करता तिला MOM- Motive, Opportunity, Method उपलब्ध करून देणं होय.
यातील तो मॉमचा घिसापिटा प्रकार सोडला तर उत्तम लिहिलं आहेस. त्यात धागाकर्त्याच्या प्रश्नाचं उत्तर सामावून जातं. ती सही तेवढी या प्रतिसादाखाली नको होती. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

ती सही तेवढी या प्रतिसादाखाली

मस्त कलंदर
Tue, 03/13/2012 - 13:45 नवीन
ती सही तेवढी या प्रतिसादाखाली नको होती.
हाहा.. उलट ती सही आयटीवाल्यांच्या घरात तर हवीच हवी. ;-) कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच नाही का? घर कितपत आणि कसं नीट आवरलंय यावरून तुम्हाला आता नक्की कुणाचा संगणक बंद पडला असू शकेल हे सांगता येईल ना आता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

स्त्री पुरूषात काही नैसर्गिक

बिपिन कार्यकर्ते
Tue, 03/13/2012 - 12:20 नवीन
स्त्री पुरूषात काही नैसर्गिक भेद आहेत. शारिरीक आणि भावनिक, दोन्ही प्रकारचे. ते राहणारच. पण एका माणूसपणाच्या पातळीवर मात्र दोघे समान आहेत. सभोवतालावर समान हक्क असणे, एकमेकांबद्दल माणूस म्हणून पूर्ण आदर असणे, साधक बाधक विचार करून आणि आपापल्या परिसंस्थेतल्या प्रत्येक घटकाचा नीट विचार करून मग आपापले निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दोघांनाही असणे, अनिर्बंध स्वातंत्र्य स्त्री अथवा पुरूष अशा कोणालाच नसणे इत्यादी गोष्टी म्हणजे समानता असे ढोबळमानाने म्हणता येईल. स्त्री केवळ स्त्री आहे म्हणून आणि पुरूष केवळ पुरूष आहे म्हणून एकमेकांपुढे लहान मोठे न ठरणे म्हणजे समानता.
  • Log in or register to post comments

+१

नितिन थत्ते
Tue, 03/13/2012 - 12:36 नवीन
अगदी अचूक विवेचन. अवांतर : मुंबईत एक पुरुषमुक्ती संघटना आहे. (बहुधा हरीश सदानी इत्यादि लोक चालवतात). त्यांचे ध्येय पुरुषप्रधान समाजाच्या पारंपरिक कल्पनांतून पुरुषांची मुक्ती करणे हे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अवान्तर: सांगलीत एक पुरुष

बॅटमॅन
Tue, 03/13/2012 - 12:49 नवीन
अवान्तर: सांगलीत एक पुरुष हक्क संरक्षण समिती देखील आहे. कधी गेलो नाही, बोर्ड मात्र लई वेळेस पाहिलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

+२

सोत्रि
Tue, 03/13/2012 - 14:10 नवीन
स्त्री केवळ स्त्री आहे म्हणून आणि पुरूष केवळ पुरूष आहे म्हणून एकमेकांपुढे लहान मोठे न ठरणे म्हणजे समानता.
परफेक्ट! आवडले!! - (नैसर्गिक भेद मान्य असलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+३

धन्या
Tue, 03/13/2012 - 15:18 नवीन
मोजक्या आणि नेमक्या शब्दांत सांगितलंत बिपीनदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

शारिरीक आणि भावनिक, दोन्ही

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/13/2012 - 21:47 नवीन
शारिरीक आणि भावनिक, दोन्ही प्रकारचे. ते राहणारच.
शारीरिक भेद हे नेचरमधून आलेले आहेत. भावनिक फरक दिसतात ते नेचरमधून आलेले आहेत का नर्चरमधून? या विषयांत अभ्यास करणार्‍या शास्त्रज्ञांनाही याची उत्तरं ठामपणे देता येत नाहीत आणि इथे आंजावर लोकं अशी विधानं करतात आणि त्याला +१ करतात याचं आश्चर्य वाटत नाही. फक्त असे प्रतिसाद देणार्‍या लोकांची नावं वाचून थोडं आश्चर्य वाटतं एवढंच. असुर, जाहीरपणे शॉव्हनिस्टच दिसणार्‍या लोकांच्या प्रतिसादांचं आश्चर्य वाटलं नाही. पण समानता म्हणजे गायीची शेपटी रेड्याला वगैरे वाचून मीच लोकांना ओळखण्यात कमी पडते हे निश्चित लक्षात आलं. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अदिती - काहीतरीच बरंका तुझं!

सेरेपी
Tue, 03/13/2012 - 22:27 नवीन
अदिती - काहीतरीच बरंका तुझं! अगं मानसशास्त्र, उतक्रांतीशास्त्र वाचायची काय गरज आहे? मला तर कीचेनचा प्रतिसाद १००% पटलेला आहे. स्टुप्पिड काहीतरी आर्ग्युमेंटस तुम्हा स्त्रीमुक्तीवाल्यांची...म्हणे नेचर आणि नर्चर. मला एवढंच कळतं की शेवटी नर्चरींग हे स्त्रीचंच काम आणि तेव्हढं जरी तिने धडपणे केलं तरी पुष्कळ झालं. नस्त्या भानगडीत बाईमाणसानं पडावंच कशासाठी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

भावनिक फरक दिसतात ते नेचरमधून

प्रभाकर पेठकर
Tue, 03/13/2012 - 22:39 नवीन
भावनिक फरक दिसतात ते नेचरमधून आलेले आहेत का नर्चरमधून? मला वाटतं तेही नेचरकडूनच आलेले आहेत. नर्चर च्या माध्यमातून ते बदलता मात्र येतील. आत्ता बहिणीच्या नातीला (वयवर्षे २) भातुकलीशी खेळताना बघितले आणि मिपावरील ह्याच चर्चेची आठवण झाली. मुली आईला स्वयंपाकघरात काम करताना पाहतात, वडिलांना सायकल, बाईक दुरुस्ती करताना पाहतात पण त्या आईच्या कार्याने जास्त प्रभावित होतात आणि भातुकलीची खेळणी पसरुन बसतात, बाहुलीची वेणीफणी करतात. पण मुले, ही खेळणी घरात असूनही, त्याकडे आकर्षित होत नाहीत. त्यांना बॅट-बॉल, बंदुक आणि इतर मैदानी खेळांचे आकर्षण वाटते. हा नैसर्गिक ओढाच म्हणावा लागेल. जे हार्मोन्स तुमच्या शरीरात असतात ते तुम्हाला तसे घडवितात आणि आजू बाजूची माणसे त्यालाच खतपाणी घालून वाढवतात. तुमची भावनिक वाढही त्या त्या साच्यातच होत जाते. ह्याहुन वेगळ्या साच्यात मुलांना वाढवायचे असेल तर प्रयत्नपुर्वक वेगळे नर्चरिंग करावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मुली आईकडे बघून प्रभावित

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/13/2012 - 23:46 नवीन
मुली आईकडे बघून प्रभावित होतात यात हॉर्मोन्स का महत्त्वाचे? शरीररचनाशास्त्राचा माझा फारसा अभ्यास नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे मुली आणि मुलांचे लैंगिक गुणविशेष दाखवणारे हॉर्मोन्स ८-१० वर्षांच्या आधी शक्यतोवर स्त्रवत नाहीत. मुलगा आणि मुलगी यांना एकमेकांमधे फरक आहे हे साधारण काय वयामधे समजतं? दोन वर्षांच्या नातीला भातुकलीही द्या आणि खेळण्यातल्या गाड्या, स्क्रूड्रायव्हरही द्या. तिच्यासमोर आई रोजच्यारोज पोळ्या लाटते तसेच वडील, आजोबा, काका, मामा (स्त्री नातेवाईकांनी केल्यास अधिकच उत्तम) कोणीतरी घरातली बिघडलेली उपकरणं दुरूस्त करू देत. तिला भातुकलीच दिली तर ती गाड्या आणि स्क्रूड्रायव्हरने खेळणार कशी? त्यातून एका मुलीवरून समस्त किंवा बहुतांश स्त्रियांबद्दल निष्कर्ष काढल्यास ते चुकीचे ठरण्याचीच शक्यता अधिक. मोठा भाऊ असेल तर बहिणींनी त्याचं अनुकरण करणं आणि बहिण असेल तर भावाने तिचं हे अगदी सर्रास दिसतं. मोठ्या भावांच्या बहिणींनी (घरचे काच करणारे नसतील तर) मुलग्यांचे कपडे घालणे, "मी आलो, गेलो" असं म्हणणे आणि बहिणींच्या भावांना फ्रॉकची आवड, "मी आले, गेले" असं म्हणणं कित्येक घरांमधे पाहिलेलं आहे. मोठं भावंडं सख्खंच पाहिजे असंही नाही, शेजारच्या मुलांशी घनदाट मैत्री असेल तर पिअर फॉलोइंग अगदी लहानपणापासूनच होतं. माझ्या ओळखीत दोन-तीन लहान मुलगे आहेत, ते रोज आई-आजी पोळ्या लाटताना, भांडी घासताना शेजारी उभे रहातात. असं करता आलं नाही तर रडून घर डोक्यावर घेतात. माझ्या ठाण्यातल्या शेजारच्यांच्या नातवाला, वय वर्ष चार-साडेचार असल्यापासून रोज घरी एकतरी पोळी लाटायची असते. अशा सवयी नसलेल्या मुलग्यांना वाढवण्यात त्यांचे आई-वडील, आजी-आजोबा चुकले म्हणायचं का? नाही. हा मुलगा आजीजवळ बराच काळ असतो, आजीबद्दल त्याला अधिकच प्रेम आहे आणि म्हणून आजीची नक्कल करायला त्याला फार आवडते. आजूबाजूला लोक काय म्हणतात हे लहान मुलांना चांगलंच समजतं. सुदैवाने किंवा दुर्दैवाने ही लहान मुलं आपल्या घरातले मोठे, विशेषतः जे त्यांची अधिक काळजी घेतात त्यांना, ऑलमोस्ट देवच समजतात. मोठे लोक काय बोलतात तेच्च प्रमाण मानतात. आणि मग मोठ्यांच्या स्त्रियांचं काम, पुरूषांचं काम अशा समजूती असल्या की मुलांना तेच खरं वाटत रहातं. दोन वर्ष हे असं काही समजण्यासाठी खूप मोठं वय झालं. दहा-बाराव्या महिन्याचे असताना मुलांना इगोही असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

पेठकरकाका, मुले, ही खेळणी

रेवती
Wed, 03/14/2012 - 03:10 नवीन
पेठकरकाका, मुले, ही खेळणी घरात असूनही, त्याकडे आकर्षित होत नाहीत. त्यांना बॅट-बॉल, बंदुक आणि इतर मैदानी खेळांचे आकर्षण वाटते. माझा मुलगा अगदी चार वर्षाचा होईपर्यंत स्वयंपाकघरातील भांडी, कांदे, बटाटे (सुरी, कात्री, किसणी सोडून बाकी सगळ्या वस्तू) यांच्याबरोबर मनसोक्त खेळायचा. नजर चुकवून धान्य डब्यातून काढणे, भिरकावणे, डिशवॉशरमध्ये भांडी जमतील तशी टाकणे असे करायचा. आई करतिये ते सगळं करून बघायचं. इतकच काय दोन वर्षाचा असताना शेजारणीकडे जाऊन तिच्या मुलीचे कपडे घालायला हवेत म्हणत होता. नंतर बांगड्याही मागितल्यावर विचित्र वाटले. बघू तरी काय करतोय म्हणून पुढे ठेवल्यावर निघून गेला. बाबा जे काही करतात तेही सगळे करून पाहिले. मुख्य म्हणजे ही दोन मोठी माणसे करतायत ते सगळं मलाही मिळालं पाहिजे ही भावना. नंतर मात्र कांद्याचा बॉल झाला आणि चार गोष्टी फुटल्यावर सगळं हळूहळू बंद झालं. आता फक्त आणि फक्त मैदानी खेळ. पण एका घरात फक्त मुले असतानाही डॉल्स हाऊस आणि किचन सेटस असे प्रकार होते. ती मुले भरपूर खेळायचीही. माझ्या भावाची मुलगी चार वर्षाची आहे पण भातुकली वगैरे फारच कमी खेळते. दंगा मात्र भरपूर. आम्ही मारे बाजारातून 'मुलींना (जास्त करून आम्हाला) आवडणार्‍या' गोष्टी (बांगड्या, पिना इ.) घेऊन आलो तर फारसा उत्साह दाखवला नाही. अजून काही वर्षांनी ती हे सगळं करेलही पण सगळेचजण मुलगा किंवा मुलगी असल्यामुळे मुलाचे अथवा मुलीचे खेळच खेळतील असे सांगता येत नाही असे म्हणण्यास वाव आहे. मी कॉलेजला जायच्या दिवसांमध्ये नवरा स्वयंपाक करीत असे त्यावेळी माझ्याच मुलाला नव्हे तर मुलाच्या मित्रांनाही वावगे वाटत नसे. उलट आज मुगाची खिचडी करा ना म्हणायची त्याची आठवण झाली. ज्या मुलांच्या घरी वडील 'बायकी' समजल्या जाणार्‍या कामाला हात लावत नसत ती मुले अचंबित होत व आपापल्या घरी सांगत व ज्यांच्या घरी वडील नेमानं स्वयंपाक करतात ती मुले जणू हे नेहमिचेच ;) अशी वागत असत. मोठ्यांचे वागणे एकवेळ नाटकी म्हणता येईल पण मुलांना काय म्हणणार? ती खर्‍या भावनाच दर्शवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

निरिक्षण.

प्रभाकर पेठकर
Wed, 03/14/2012 - 07:48 नवीन
मी सर्वसाधारण निरिक्षण नोंदविले आहे. प्रत्येक स्त्री मध्ये पुरुषाचे अंश आणि प्रत्येक पुरुषामध्ये स्त्रिचे अंश असतातच. जेंव्हा एखाद्या पुरुषांत स्त्रिचे अंश जास्त असतात तेंव्हा तो पुरुष स्त्रियांची पारंपारीक कामे जास्त आवडीने आणि सहजपणे करतो. जसे स्वयंपाक. मला स्वतःला स्वयंपाक करणे, लहान मुलांना सांभाळणे, संगोपन करणे आवडते आणि जमतेही. माझ्या पत्नीला हे तेवढे जमत नाही. ती रोजचा स्वयंपाक करते पण आवड नाही. ती नोकरी नाही करीत गृहिणीच आहे तरीही तिला घरकामाची आवड नाही. लहान मुलांशी ती तितकी लगेच समरस होत नाही. ज्या स्त्रियांमध्ये पुरषी अंश जास्त असतो त्यांचा पुरुषांची पारंपारीक कामे करण्याकडे ओढा जास्त असतो. पुरशी कपडे वापरणे, तशी केशरचना करणे, मनची कणखरता दाखविणे, बेफिकिरी वृत्ती, टेक्निकल गोष्टींची आवड इ.इ.इ. नृत्यकला निसर्गतः स्त्रियांकडे जास्त असते पण पुरुषही नृत्यकलेत पुढे आहेत. कारण त्यांच्यातील स्त्रित्वाचा अंश. हा त्यांच्यातील स्त्रित्वाचा अंश कित्येकदा इतका जास्त असतो की तो सहज, त्यांच्या वागण्या बोलण्यातून, दृश्यमान होतो. नटण्या मुरडण्याची आवड आणि ज्ञानही स्त्रियांना जास्त असते पण त्या क्षेत्रातही आघाडी घेतलेले व्यावसायिक पुरुष आहेत. तात्पर्य, परस्परांमध्ये विरुद्ध लिंगी अंश कमी जास्त प्रमाणात असतात त्यानुसार त्यांच्या आवडी निवडी आणि कौशल्ये ठरत असतात. माझे निरिक्षण हे सर्वसाधारण परिस्थितीचे आहे. मुलींना मुलींचे खेळ आवडतात तर मुलांना मुलांचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आता मोठ्या प्रमाणावर मुक्त स्त्री-पुरूषांचे निरीक्षण केल्यास ...

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 03/14/2012 - 09:50 नवीन
याचा सांख्यिकी विदा जमा केला तर थोडक्यात हेच दिसून येईल की स्वयंपाक, लहान मुले, सजावट, यंत्र, तर्क या गोष्टी व्यक्तीच्या स्त्री अथवा पुरूष असण्यावर अवलंबून नसून व्यक्तीच्या मूळ वृत्तीवर अवलंबून आहेत. लहानपणापासून बालकांवर अमकी वृत्ती स्त्रियांची आणि तमकी वृत्ती पुरूषांची असा भडीमार न झाल्यास स्त्री आणि पुरूष दोघेही या पुरूषप्रधान संस्कृतीचे बळी पडणार नाहीत. आणि आपापल्या आवडीची कामं निवडू शकतील. माझा वरच्या प्रतिसादांमधला प्रश्न नेचर का नर्चर हा याच अर्थाने होता. पारंपरिकदृष्ट्या पुरूषांची कामे करणार्‍या अनेक स्त्रिया पुरूषांपेक्षा लांब केस असणार्‍या, स्त्रियांसाठी बनवलेले कपडे वापरणार्‍याच बहुतांशाने दिसतात. मी स्वतः, पुरूषांची संख्या प्रचंड प्रमाणात अधिक आहे अशा क्षेत्रात काम केलं आहे. (विज्ञान, तर्क, भावनेला जागा नाही.) तिथेही स्त्रिया स्कर्ट, शॉर्ट्स, स्टॉकिंग्ज, साड्या, सलवार-कुडते असले स्त्रियांचेच कपडे घालून येताना दिसतात. (जीन्स-टीशर्ट्स ही तर वर्किंग क्लासमधून केव्हाच नर्ड, गीक वर्गाकडेही आलेली आहे. पण त्यातही स्त्रियांचे कपडे विशेषतः टीशर्ट्स इत्यादी वेगळ्या रंगाचे दिसतातच. आकारानेही कपडे वेगळे असतात.) आणि माझ्या या (एक्स)कलीग्ज, मैत्रिणी, ओळखीतल्या, संख्येने निदान ७०-७५ असतील, त्यांतल्या एक दोघींचेच केस थोडे लहान आहेत पण अगदी पेराएवढे केस ठेवणारी कोणीही नाही. अगदी खरोखरच लांबसडक म्हणता येतील असे केस असणारी एक ब्रिटीश मैत्रीण नेहेमी पुरूषांसारखे थोडे सैल कपडे घालते. पण लहान मुलांना उत्तमरित्या शिकवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

विपर्यास....

प्रभाकर पेठकर
Wed, 03/14/2012 - 16:39 नवीन
लहानपणापासून बालकांवर अमकी वृत्ती स्त्रियांची आणि तमकी वृत्ती पुरूषांची असा भडीमार न झाल्यास स्त्री आणि पुरूष दोघेही या पुरूषप्रधान संस्कृतीचे बळी पडणार नाहीत. माझ्या इतक्या वर्षांच्या आयुष्यात मी तरी कुठे असा भडिमार वगैरे झालेला पाहिला/अनुभवला नाही. पारंपरिकदृष्ट्या पुरूषांची कामे करणार्‍या अनेक स्त्रिया पुरूषांपेक्षा लांब केस असणार्‍या, स्त्रियांसाठी बनवलेले कपडे वापरणार्‍याच बहुतांशाने दिसतात. माझ्या विधानांचा विपर्यास होतो आहे . मी कुठेही असे म्हंटलेले नाही की पुरुषांची पारंपारिक कामे करणार्‍या/करू इच्छिणार्‍या स्त्रिया पुरुषांसारखे बारीक केस राखतात किंवा त्यांनी राखावे. मीही माझे स्वतःचेच उदाहरण दिले आहे. मला स्वयंपाक करायला, लहान मुलांचे संगोपन करायला आवडते पण म्हणून मी काही केस स्त्रियांप्रमाणे वाढवलेले नाहीत. (असे उरलेच किती म्हणा). मी काही बायकी कपडे घालत नाही. असो. माझ्याकडून हा विषय संपला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्या इतक्या वर्षांच्या

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 03/14/2012 - 21:48 नवीन
माझ्या इतक्या वर्षांच्या आयुष्यात मी तरी कुठे असा भडिमार वगैरे झालेला पाहिला/अनुभवला नाही.
१. घरी पाहुणे येतात, पुरूष बाहेरच्या खोलीत बसतात, बायका आतल्या खोलीत. २. घरचा रोजचा स्वयंपाक, साफसफाई, बालसंगोपन घरातली स्त्री करते. ३. बॅंकेतली कामं, प्लंबर, इलेक्ट्रीशियन, अशा 'पुरूष' माणसांशी बोलून कामं करवून घेणं, यंत्रदुरूस्ती आदी कामं घरातली पुरूषमंडळी करतात. ४. माळ्यावरचं सामान काढायला, प्रवासाला निघताना बॅगा उचलायला, इतर हमाली कामं करायला पुरूषमंडळीच असतात. ५. मोलकरीण, स्वयंपाकाच्या बाई यांच्याशी घरातली स्त्री बोलते. भंगारवाला, रद्दीवाला, धारवाला या पुरूष लोकांशी, नाही म्हणायला स्त्रियाही बोलताना दिसतात. अशा अनेक छोट्यामोठ्या गोष्टींमधून बालकांवरही स्टीरीओटाईप्सचा भडीमार होतो. "बायकांसारखा काय रडतोस"* हे त्यातलं सगळ्यात डोक्यात जाणारं वाक्य! *याचं अतिशय व्यक्तिगत कारण आहे, माझा भाऊ. वडील गेले तेव्हा मोकळेपणाने रडण्यासाठीही त्याला तब्बल चार दिवस वाट बघावी लागली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

पेठे काकांच मत पटतय (कारण

शिल्पा नाईक
गुरुवार, 03/15/2012 - 13:20 नवीन
पेठे काकांच मत पटतय (कारण स्वानुभव). मला दोन जुळी मुले आहेत. एक मुलगा आणी एक मुलगी. दोघेहि अगदि जन्मा पासुनच typical आहेत. म्हणजे मुलीला सगळी बायकी काम (फरशी पुसणे, बाहुलीला झोपवणे अशी काम आवडतात, पण याच वेळी माझा मुलगा मात्र त्या बाहूलीला फेकुन देतो. त्याला गाड्या खुप आवड्तात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हम्म...

दादा कोंडके
गुरुवार, 03/15/2012 - 22:01 नवीन
पेठे काकांच मत पटतय
वरती कुठेही पेठे यांचा प्रतिसाद नाहिये. तुम्हाला पेठकर असं म्हणायचं आहे का? एखादा सदस्य जरा पण्णाशीच्या आसपास असला तर त्याला "काका" असं म्हटलंच पाहिजे का?* त्या सदस्याचं आडनाव व्यवस्थित लक्षात न ठेवता त्याला "काका" म्हणल्यावरच आदर व्यक्त होतो का? बरं, काका म्हणल्यावर पुरुष तोंडातून ब्र काढत नसतील पण इथल्याच काही चाळीशीच्या पुढच्या स्त्रियांना काकू म्हणल्यावर राग येइल.** मी म्हणतो, इथं तुमची समानता की काय ती कुठे गेली? * तुम्ही वैयक्तीक रित्या त्यांना ओळखत असाल, आणि पेठकरांची त्यांना पेठेकाका म्हटलेलं चालत असेल तर शेपुट घालून मी हा प्रतिसाद मागे घेतो. :) ** हे सिद्ध करण्यासाठी विदा वगैरे मागू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा नाईक

कुठे आहे भडिमार?

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 03/15/2012 - 13:24 नवीन
घरी पाहुणे येतात, पुरूष बाहेरच्या खोलीत बसतात, बायका आतल्या खोलीत. गेला तो काळ. हल्ली बायकाही पुरुषांच्या बैठकीत बसून चर्चा करतात. घरचा रोजचा स्वयंपाक, साफसफाई, बालसंगोपन घरातली स्त्री करते. 'स्त्री करते' नाही करायची. सगळ्याच नाही तरी अनेक घरांमधुन पुरुष मंडळी ही कामे करताना दिसतात. बॅंकेतली कामं, प्लंबर, इलेक्ट्रीशियन, अशा 'पुरूष' माणसांशी बोलून कामं करवून घेणं, यंत्रदुरूस्ती कामं घरातली पुरूषमंडळी करतात. बँकेतील कामे बायका करताना सर्रास दिसतात. प्लंबर, इलेक्ट्रीशियन ह्यांच्या कामात पुरुषांना जास्त गती असल्या कारणाने पुरुष मंडळी करतात. माळ्यावरचं सामान काढायला, प्रवासाला निघताना बॅगा उचलायला, इतर हमाली कामं करायला पुरूषमंडळीच असतात. नैसर्गिक भेदाभेद. पुरुषांचे स्नायू स्त्रियांच्या स्नायुंपेक्षा अधिक बळकट असतात (सर्वसाधारणपणे) त्यामुळे वरील कामे पुरुषांकडे आली आहेत. मोलकरीण, स्वयंपाकाच्या बाई यांच्याशी घरातली स्त्री बोलते. भंगारवाला, रद्दीवाला, धारवाला या पुरूष लोकांशी, नाही म्हणायला स्त्रियाही बोलताना दिसतात मोलकरीण, स्वयंपाकाच्या बाईंशी बोलायला पुरुष खुप 'उत्सुक' असतात पण सुरक्षेच्या कारणास्तव बायकोच बोलू देत नाही. (ह. घ्या.) भंगारवाला, धारवाला, रद्दीवाला ह्यांच्याशी पुरुषही बोलतात बरं! असो. ह्यातही कुठे मला तथाकथित 'भडीमार' दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

+१

शिल्पा नाईक
गुरुवार, 03/15/2012 - 14:52 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

+१

सोत्रि
गुरुवार, 03/15/2012 - 15:46 नवीन
सहमत! - (समानतावादी) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

( सहमत असनार्‍या सोकाजींशी )

जेनी...
गुरुवार, 03/15/2012 - 21:28 नवीन
( सहमत असनार्‍या सोकाजींशी ) सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

या गोष्टी सगळ्या घरांमधून

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 03/15/2012 - 21:53 नवीन
या गोष्टी सगळ्या घरांमधून अशाच होतात असं नाही. पण अनेक घरांमधे हेच होतं. परिस्थिती काही घरांमधे बदलते आहे हे निश्चित. पण अशा अनेक छोट्यामोठ्या गोष्टींमधून स्टीरीओटाईप्सचा भडीमार लहान मुलांवर होतो. वरच्या गोष्टींमधल्या अनेक गोष्टी मला माझ्या नाही तरी इतर अनेकांच्या घरांमधे दिसतात. "ही सगळी बायकी कामं" असं सरळच बोलण्याचा जमाना शहरांमधून हद्दपार झाला असेल, होतो आहे. त्यामुळे मी ज्याला भडीमार म्हणते आहे, तो अतिशय सटल लेव्हलवर होतो. घरी फर्निचर बनवणारा सुतार स्त्री बोलली तर दुर्लक्ष करतो आणि पुरुषाने सांगितलं तरच ऐकतो हे मी माझ्या लहानपणापासून पहात आले आहे. त्याने फारसा फरक पडत नाही. पण सुतार घरी गेल्यावर घरात आई-बाबा फर्निचरबद्दल काय आणि कसे बोलतात याचा प्रचंड फरक पडतो. --- वरच्या एका प्रतिसादात दोन बालकांचं निरीक्षण करून काही निष्कर्ष मांडला आहे. अशा प्रकारचे निष्कर्ष संख्यात्मक पातळीवर काढण्यासाठी २ हा आकडा फार छोटा आहे. निदान १०० पटीने कमी आहे. माझ्याही ओळखीत दोन मुलगे आहेत ज्यांना अनुक्रमे पोळ्या करायची आणि भांडी घासायची फार आवड आहे. मला स्वतःला (आणि जाणत्या वयात झालेल्या काही मैत्रिणींनाही) भातुकली वगैरे खेळायची अजिबात आवड नव्हती. माझ्या घरातले बहुतेकसे पुरूष रोजचा स्वयंपाक अतिशय उत्तम करतात. पण एवढ्या कमी आकड्यांमधून संपूर्ण मानव जातीच्या मानसिकतेबद्दल बोलणं धोक्याचं आहे. अवांतरः मुलं टिपिकल आहेत हे एवढंच वर्णन पुरेसं आहे. स्त्रीवादी, समानतावादी लेखनात, विचारवंतांमधे, (संपूर्ण जगातल्याच, भारत, महाराष्ट्र असंही नाही.) टिपिकल हा शब्द टाकाऊ या शब्दाप्रमाणेच निगेटीव्ह मानला जातो. मूर्तीभंजन किंवा iconoclasm हा शब्द उच्च मानला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा