✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वातापिगणपतिं भजेऽहम् ॥

च
चैतन्य दीक्षित यांनी
Fri, 02/10/2012 - 12:43  ·  लेख
लेख
#जालावर आधीच प्रकाशित केला होता हा लेख. आज संकष्ट चतुर्थीच्या निमित्त इथे देत आहे. हंसध्वनी- एक प्रसन्न असा 'ओडव-ओडव' राग. (ओडव-ओडव म्हणजे ज्याच्या आरोहात आणि अवरोहात प्रत्येकी पाच स्वर येतात असा राग) अतिशय साधा, पण तितकाच प्रसन्न राग- हंसध्वनी! हंसध्वनी हा 'बिलावल' थाटातला राग. बिलावल थाट म्हणजे सगळे स्वर शुद्ध. असं म्हणतात, की बिलावल गात चालणार्‍या त्यागराजाचा पाय एका प्रेताला लागला, आणि ते प्रेत जिवंत झाले. (त्यागराज- कर्नाटक शास्त्रीय संगीताचा आधारस्तंभ.) ह्यावरून बिलावल (कर्नाटक पद्धतीतले बिलावलचे नाव 'बिलहरी') रागाला 'संजीवन राग' असे नाव पडले. त्याच संजीवन रागाच्या पठडीतला, आणि खरोखरच संजीवनीप्रमाणे असलेला हा राग- हंसध्वनी. ह्या रागाची रचना मुथुस्वामी दीक्षितार् (खरे तर 'दीक्षित' एवढेच नाव, पण तमिळ पद्धतीनुसार दीक्षितार्) ह्यांचे वडील 'रामस्वामी दीक्षितार्' यांनी केली असे म्हणतात. पण रामस्वामीनी, हंसध्वनी रागात गणेशाचे स्तवन करणारी एकही रचना केली नाही. ती कसर मुथुस्वामी दीक्षितार् ह्यांनी भरून काढली ती त्यांच्या 'वातापि गणपतिं भजेSहम्' ह्या रचनेने. ही अजरामर रचना कर्नाटक शास्त्रीय संगीतातच नव्हे, तर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातही तितकीच लोकप्रिय आहे. ह्याच रचनेच्या शेवटच्या ओळीत 'हरादिगुरुगुहतोषितबिम्बम्, हंसध्वनिभूषितहेरम्बम्' असे शब्द आल्यामुळे हंसध्वनी हा गणेशाचा आवडता राग ठरला. अर्थात् हंसध्वनी रागाच्या अतिशय प्रसन्न चलनामुळे, मोददात्या गणेशाला आवडणारा राग म्हणजे हंसध्वनी हे तर्कशुद्धही आहेच. 'वातापि गणपतिं' ही रचना इतकी सिद्ध आणि प्रसिद्ध आहे, की ह्याच रचनेवर आधारित हिंदी आणि मराठी रचनाही तशाच प्रसिद्ध झाल्या. हिंदी: 'जा तोसे मै ना बोलू कन्हैय्या' आणि मराठी: 'दाता तू गणपती गजानन'. ही रचना 'सिद्ध' आहे, ती त्यातल्या संस्कृतामुळे. प्रत्येक शब्द अगदी पैलू पाडलेल्या हिर्‍यासारखा मौल्यवान्! ह्यातल्या सुरुवातीच्या 'वातापिगणपति' ह्या शब्दाचा थोडक्यात इतिहास असा. चालुक्यांचा पराभव करणार्‍या 'सिरुतोंदर' (ह्याचे मूळ नाव 'परंज्योती' असे होते असे म्हणतात) ह्या पल्लवांच्या प्रधान-अमात्याने वातापि (आत्ताचे बदामी) इथून गणेशाची मूर्ती 'थिरुवरुर' इथे नेली. वातापीहून आणलेला म्हणून 'वातापिगणपती' असे त्या मूर्तीचे नाव पडले. मुथुस्वामी दीक्षित हेही थिरुवरुरचेच. थिरुवरुर इथे असलेल्या बर्‍याच देवळातील मुख्य देव आणि परिवारदेवतांवर मुथुस्वामींनी अनेक रागांमध्ये संस्कृत रचना लिहिल्या. त्यातलीच ही 'वातापिगणपतिं भजेSहम् '. ही रचना केवळ गणेशाचे स्तवन करणारी आहे असे नाही तर 'वातापी' चा इतिहासही सांगणारी आहे. असे म्हणतात की अगस्ति ऋषींनी वातापी नगरीत गणेशाची आराधना केली होती. ही गोष्ट 'पुरा कुम्भसम्भवमुनिवर-प्रपूजितम्' ह्या शब्दातून सांगितली आहे. त्यातही अगस्ति ऋषींसाठी वापरलेला 'कुम्भसम्भव' हा शब्द, किंवा आदितालात चपखलपणे बसणारा 'निजवामकरविधृतेक्षुदण्डम्' ह्या सारखे शब्द मुथुस्वामींच्या संस्कृतपांडित्याचा आणि पुराणादींविषयीच्या ज्ञानाचा पुरावा देतात. बरं, केवळ संस्कृतदृष्ट्या ही रचना महान आहे असं नाही. रागदॄष्ट्य़ा 'हंसध्वनी' रागाचे सारच ह्या रचनेत आहे असं म्हणणं अतिशयोक्ती नाही. 'वीतरागिणं विनतयोगिनम, विश्वकारणं विघ्नवारणं' किंवा 'कराम्बुजपाशबीजापूरं कलुषविदूरं भूताकारं' ह्यातले स्वरांचे खटके काय, किंवा 'मूलाधारक्षेत्रस्थितं' हा एकच शब्द आदितालात बसताना येणारी स्वररचना काय सगळंच सिद्धहस्त! ही रचना गाणारा कुणीही गायक, वातापिगणपतीला आणि मुथुस्वामींनाही मनातल्या मनात 'साष्टांग' नमस्कार घातल्याशिवाय गात नसेल हे नक्की. हंसध्वनीने भूषित असा हेरम्ब आपल्या सगळ्यांचे पालन करो आणि हंसध्वनी रागाप्रमाणेच प्रसन्नवदनाने आपणा सर्वांनाही प्रसन्न करो आणि कायम प्रसन्न ठेवो हीच वातापिगणपतीच्या चरणी प्रार्थना! - चैतन्य लेखन आणि जालावरील पूर्वप्रकाशन- अनंत चतुर्दशी- २०१०/०९/२२
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
3675 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

लेख आवडेश !!! मस्तच रे

प्रीत-मोहर
Fri, 02/10/2012 - 12:50 नवीन
लेख आवडेश !!! मस्तच रे :)
  • Log in or register to post comments

लेख आवडला! व्हिडिओ डिलिटलेला

बिपिन कार्यकर्ते
Fri, 02/10/2012 - 12:57 नवीन
लेख आवडला! व्हिडिओ डिलिटलेला आहे असं दिसतंय!
  • Log in or register to post comments

छान

JAGOMOHANPYARE
Fri, 02/10/2012 - 13:04 नवीन
छान
  • Log in or register to post comments

छान लेख व माहिती. तुम्ही

अन्या दातार
Fri, 02/10/2012 - 13:15 नवीन
छान लेख व माहिती. तुम्ही दिलेल्या दुव्यातील व्हिडिओ जरी डीलीटलेला असला, तरी काळजी करु नका. या रचनेचे विविध कलाकारांनी गायलेले काही व्हिडिओज तुनळीवर आहेत. त्यापैकी एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांचा व्हिडिओ इथे देत आहे. हंसध्वनीबद्दल काय बोलावे? मन प्रसन्न करणारा राग आहे (हे माझे अनुभवाधारीत मत). हंसाप्रमाणे ऐट आहे याची, तितकाच राजसही वाटतो ऐकताना. :) ऐका एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांच्या आवाजातील वातापिगणपतिं.....
  • Log in or register to post comments

हंसध्वनी

चैतन्य दीक्षित
Fri, 02/10/2012 - 15:08 नवीन
>>हंसाप्रमाणे ऐट आहे याची, तितकाच राजसही वाटतो ऐकताना. अगदी अगदी. बासरीवर तर तो अजूनच छान वाटतो ऐकायला/वाजवायला :) तो व्हीडिओ काढून टाकलाय का? अरेरे... मी जुन्या लेखातून लिंक कॉपी केली होती, त्यामुळे प्रत्यक्ष चेक केले नाही. तेलगू सिने-संगीतातले अव्वल दर्जाचे गायक घंटसाला यांच्या आवाजातलं 'वातापि' होतं तिथे. असो, दुसरीकडे मिळाल्यास लिंक देईन इथे. सुब्बलक्ष्मींनी गायिलेलं 'वातापि' थोडं संथ लयीतलं आहे. पण सुंदरच आहे, प्रश्नच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

मुथुस्वामी दीक्षितार्

हंस
Sat, 02/11/2012 - 15:16 नवीन
मुथुस्वामी दीक्षितार् यांच्या आवाजातील 'वातापि' ची ही एक चित्रफित सापडली- http://www.youtube.com/watch?v=ud-QqxtbixY
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य दीक्षित

धन्यवाद, पण

चैतन्य दीक्षित
Sat, 02/11/2012 - 20:02 नवीन
धन्यवाद, पण ही मुथुस्वामींच्या आवाजातली फीत नाही. Semmangudi R Srinivasa Iyer यांच्या आवाजातली आहे. मुथुस्वामी दीक्षितार, त्यागराज आणि श्याम-शास्त्री हे कर्नाटकी संगीताचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांचा काळ खूप आधीचा आहे. (मुथुस्वामींचा काळ विकीपेडियावर- १७७५-१८३५ असा दिला आहे) -धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हंस

माफ करा!

हंस
Mon, 02/13/2012 - 07:58 नवीन
माफ करा! मी फक्त शिर्षक वाचले, चित्रफितीखालील माहीती वाचलीच नव्हती. अचुक माहीतीबद्द्ल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य दीक्षित

लेख आवडला.भाईकाकांच्या

गणपा
Fri, 02/10/2012 - 13:19 नवीन
लेख आवडला. भाईकाकांच्या (बहुतेक) असामी असामीमध्ये प्रो. कुंभकोणमना या गणेशाचे स्तवनाच गायन करताना ऐकल होत. तुम्ही दिलेला दुवा काढुन टाकलेला दिसतोय.
  • Log in or register to post comments

प्रा. कुंभकोणम हे पु.लंच्या

अमेरिकन त्रिशंकू
Fri, 02/10/2012 - 16:18 नवीन
प्रा. कुंभकोणम हे पु.लंच्या "काय म्हणाले गुरुदेव?" या लेखामध्ये अवतीर्ण होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

असामी असामीमध्येही

चैतन्य दीक्षित
Mon, 02/13/2012 - 10:47 नवीन
प्रा. कुंभकोणम वातापि गणपतिं गातात असे आहे. (पु.लं. नी तो पार्ट तर काय छान लिहिलाय आणि वाचलाय.. आहा.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमेरिकन त्रिशंकू

अहाहा....

पिलीयन रायडर
Fri, 02/10/2012 - 14:47 नवीन
परवाच सवाई मध्ये बासरी आणि सॅक्सोफोन च्या जुगलबंदी मध्ये ऐकलं होतं.... निव्वळ आनंद...!!!
  • Log in or register to post comments

लेख छान , अभ्यासयुक्त

गणेशा
Fri, 02/10/2012 - 14:50 नवीन
लेख छान , अभ्यासयुक्त
  • Log in or register to post comments

आवडला

मेघवेडा
Fri, 02/10/2012 - 15:38 नवीन
धन्यवाद रे चैतन्य. मस्त प्रसन्न वाटलं सकाळी सकाळी. :)
ही रचना 'सिद्ध' आहे, ती त्यातल्या संस्कृतामुळे. प्रत्येक शब्द अगदी पैलू पाडलेल्या हिर्‍यासारखा मौल्यवान्!
अगदी खरंय! किती सुरेख तोललाय एकेक शब्द!
  • Log in or register to post comments

मस्तच लेख. अमोल केळकर

अमोल केळकर
Fri, 02/10/2012 - 16:09 नवीन
मस्तच लेख. :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments

लेख खूप आवडला

शुचि
Fri, 02/10/2012 - 19:00 नवीन
ही फीत म्हणताहात का तुम्ही? खूप प्रसन्न सुरुवात झाली दिवसाची. :) माहीती फार आवडली. पुलेशु.
  • Log in or register to post comments

हो हो हीच

चैतन्य दीक्षित
Sat, 02/11/2012 - 10:51 नवीन
हीच फीत म्हणायची होती. धन्यवाद शुचिताई :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

लेख आवडला.

स्वाती२
Fri, 02/10/2012 - 18:39 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

लेख फार आवडला

पैसा
Fri, 02/10/2012 - 19:14 नवीन
ही गणेशस्तुती आकाशवाणीवर ऐकलेली आठवते आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

चैतन्य दीक्षित
Sat, 02/11/2012 - 11:00 नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार !
  • Log in or register to post comments

सुंदर लेख

रामदास
Sat, 02/11/2012 - 11:32 नवीन
"वातापी "चा उलगडा झाला. दाक्षीणात्य संगीत आणि रचनाकार यांच्या बद्दल फारच कमी माहीती जमा होती पण या निमीत्तानी एक सुरुवात झाली. बिलावलची ओळख "ले तेरी लकरी -ले तेरी कावरी -"इतकीच.पंडीत भानु चरणकरांकडून शिकलो होतो. हंसध्वनी च्या अनेक रचना ऐकल्या त्यात "लागी लटक पती "असे काहीसे शब्द असलेली रचना फार आवडली होती. सोबत एक तराणा पण ऐकला होता याच रागात. बाकी हिंदी गाण्यांमध्ये बरीच गाणी ऐकली होती. लेखकानी या धाग्यातून एका नविन आस्वादात्मक चर्चेची सुरुवात आणि ओळख करून दिली आहे म्हणून विशेष आभार . अवांतर : या पाठोपाठ किरवानी आणि जयजयवंतीची पण ओळख करून द्यावी ही विनंती.
  • Log in or register to post comments

छान माहिती

धनंजय
Sat, 02/11/2012 - 21:27 नवीन
छान माहिती आहे.
चालुक्यांचा पराभव करणार्‍या 'सिरुतोंदर' (ह्याचे मूळ नाव 'परंज्योती' असे होते असे म्हणतात) ह्या पल्लवांच्या प्रधान-अमात्याने वातापि (आत्ताचे बदामी) इथून गणेशाची मूर्ती 'थिरुवरुर' इथे नेली.
ही माहिती कळल्यावर एक कोडे सुटले. बादामी येथे पर्यटन करताना मी "वातापिगणपती कुठला" हे मी शोधत होतो - नाही सापडला. एका लेणीमध्ये गणपतीची मूर्ती आहे, पण त्या लेणीतली सुद्धा ती दुय्यम मूर्ती आहे... आता कळले , की गाण्यातला वातापिगणपती तिरुवरूर येथे गेला होता.
  • Log in or register to post comments

हिंदुस्थानी

निल्या१
Sat, 02/11/2012 - 22:46 नवीन
हिंदुस्थानी धाटणीची एकही ध्वनीफीत धाग्यावर आली नव्हती म्हणून पं अजोय चक्रबोर्ती यांचा हसंध्वनी देत आहे. ३:३० ते ३:५४ हा भाग मला खास आवडतो. http://www.youtube.com/watch?v=9z-9BzFjPEk
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
Sun, 02/12/2012 - 17:33 नवीन
उस्ताद अमीर खानः http://www.youtube.com/watch?v=HQhpLpiUoHw
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निल्या१

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा