Skip to main content

एक शंका

लेखक शरद यांनी सोमवार, 09/01/2012 08:13 या दिवशी प्रकाशित केले.
प्रा. यनावाला यांची निरिश्वरवादी मते ते नेहमीच पोटतिडीकेने मांडत असतात. स्वखुशीने बुडणार्‍या लोकांना वाचवावयाचे प्रयत्न करणार्‍या अशा लोकांबद्दल मला नेहमीच कुतूहल (व आदरही ) वाटत असतो. आमची वर्गवारी निराळी. माझ्याकडे कधीही पूजा नसते पण कोणी बोलावलेच तर आनंदाने जातो, रुपया टाकतो, "प्रसाद छान झाला आहे" असे म्हणून परत एकदा मागून खातो ( घरी आल्यावर बायकोची बोलणीही!) पण कोणाला सुधारावे असे कधीच वाटले नाही. तर सांगत काय होतो यनावालांनी उपक्रमवर असाच एक लेख टाकला व त्या ललित लेखाला चांगले ९७ प्रतिसाद लाभले. खुन्नस म्हणून राजेश गुर्जींनी ( घासकडबी याचे लघुरूप गुर्जी का करतात हो ?) " गॉड्स ऍडवोकेट " असा एक नवीन धाग उघडला. त्यालाही ७५ प्रतिसाद लाभले. भलेभले ! त्या साठेमारीत माझ्यासारख्या प्रौढ लेकराला कळण्यासारखे फारसे काही नव्हते. पण त्यातले एक इंग्रजी वाक्य कळले. "Absence of evidence is evidance of absence " म्हणजे "असल्याचा पुरावा नसणे हा नसल्याचा पुरावा असतो ". "देव आहे याचा पुरावा देता येत नाही हाच देव नाही याचा पुरावा आहे." असेल, असेल (किंवा नसेलही ) आपल्याला काय कळते ? पण मला एक लहान शंका आहे (लघु नव्हे). ती तिथल्या विद्वान विचारवंतांना विचारावयाचे धाडस नसल्याने इथे विचारतो. म्हणजे इथेही विचारवंत आहेत हो पण त्यांनीच निरसन केले पाहिजे असे नाही ; तुम्ही तुमची मते सांगा. शंका अशी की खरेच वरील विधान सार्वत्रिक आहे कां ? याला छेद देणारी एखादी वस्तू असेल तरीही मग देव नाही हे ठरवण्यासाठी याचा उपयोग नाही. " माझे माझ्या आईवरील प्रेम. " या अमेय,निराकार, स्थलकालाबाधित गोष्टीला काहीही पुरावा नाही. इतरांचे सोडा, मी देखील काही "पुरावा" देऊ शकणार नाही. मग हे प्रेम नाहीच असे सिद्ध झाले कां ? हे एक सोडा, तुमच्या आमच्या सर्वांच्या अशा भावनांबद्दल कोणता "पुरावा" मिळणार आहे ? श्री. यनावालांबरोबर चर्चा करतांना ते म्हणाले " तुम्हाला आनंद झाला की तुम्ही हसता, चेहरा खुलतो, दु:ख झाले तर तुम्ही रडता, ... हा झाला पुरावा. " मला पटले नाही. हसणे हा आनंदाचा परिणाम आहे, तो "आनंद" नव्हे. कार्यकारणभावात गल्लत करू नये. ते असेही म्हणाले की या भावना मेंदूच्या कोणत्या भागात निर्माण होतात ते शास्त्रज्ञांनी शोधले आहे. हाही पुरावा वाटत नाही. हे झाले माझे विचार. फार तार्किक आहेत असे मी म्हणत नाही. एखादेवेळी सुस्पष्ट नसतीलही. पण मला काय विचारावयाचे आहे हे कळवण्यापुरते पुरेसे आहेत. आता तुम्ही काय म्हणता ? ( हा प्रश्न उपक्रमवर का नाही हे विचारू नका, मला येथील मते पाहिजे आहेत.) शरद

वाचने 21165
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

पुरावा काय घेउन बसलात... मी चक्क देवाचा पत्ता सांगु शकतो आणि कुणिही "याची देही याची डोळा" त्याला भेटु शकतो... नाहि हो.. तो कपील देव किंवा रमेश देव नाहि... अगदी खराखुरा देव. स्वतःच भेटा आणि खात्री करुन घ्या .... मग... कोणाला भेटायचय देवाला ??? अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

देव भेटल्यानंतरही संस्थळावर येऊन प्रतिसाद देण्याची वेळ तुमच्यावर यावी!! छ्या!! आम्ही काय भलत्याच कल्पना ऐकल्या होत्या तुमच्या देवाबद्दल...

In reply to by Nile

तुम्ही अवास्तव कल्पनावादी आहात हाच तुमचा प्रॉब्लेम. सुदैवाने देवाने बॅन केलेल्या संस्थाळांच्या यादीत मिपा नाहि ... शिवाय संपादकमंडळाशी सध्यातरी देवाचे उत्तम संबंध असावेत म्हणुन त्यांनीही व्हिसा नाकारला नाहि. तेंव्हा गल्ली चुकवायची शक्यता नाहि. आमचा मुद्दा एकदम सिंपल-सरळ आहे. कुणाला देवाला भेटायचे असेल तर पत्ता संगायला आम्ही तयार आहोत. प्रत्यक्ष भेट घ्यावी आणि खात्री करुन मग पुराव्याचं गुर्‍हाळ चालु ठेवावं.. कसं... अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

नको नको साठी उलटल्यानंतर असे पण देवाचे दर्शन होणारच आहे (याची डोळा आणि याची आत्मी). पण त्यासाठी आताच घाई नाही करायची आंम्हाला.

In reply to by अन्नू

ज्यांना तशी घाई आहे वा "पुरावा" हवाय त्यांनाच "तिथला पत्ता" सांगणार आम्ही. अर्धवटराव

काही विषय असे आहेत की ज्याने मानव जातीचे न भले झाले ना वाईट. देव, पुनर्जन्म , पाप पुण्य, भविष्य , मातृभाषा की ऑन्ग्ल इ.इ. ज्याने त्याने आपापल्या वकूबाने स्वीकारायचे असे हे धागे आहेत. म्हणून मी मथळा सोडला तर कुणाचेही काही वाचलेले नाही ....... एक मात्र वाटते...देव असलाच तर तो ग्रेट आहे वेडा आहे. विट्ठला तू वेडा कुंभार ......

देव खरंच या जगात आहे????? ............... आणि आहेच तर मग तो आपल्याला दिसत का नाही?