Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by नरेंद्र गोळे on Sun, 01/01/2012 - 20:28
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
सद्भावना
बातमी
माहिती


पदमविभूषण डॉ. ईलत्तुवलपीळ श्रीधरन व्यवस्थापकीय संचालक, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन.

दिल्ली मेट्रोचे जणू बोधचिन्हच असलेल्या श्रीधरन यांचे व्यासपीठाच्या मंचावरले चित्र, त्यांच्या अवकाशप्राप्तीनंतर, हात जोडून त्यांना अभिवादन करत असतांनाचे, हे प्रकाशचित्र, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या, कॉर्पोरेट कार्यालयात, म्हणजेच मेट्रो भवन येथे ३१-१२-२०११ रोजी काढलेले आहे.

भ्रष्टाचाराचा बोलबाला होत असलेल्या भारतात, शिष्टाचाराचे मूर्तिमंत प्रतीक बनून, विधिवत मिळालेले काम निष्ठापूर्वक करणारे अनेक लोक आजही आहेत. त्यांच्याच बळावर भारतीय समाज व्यवस्था घट्ट उभी आहे.

अशा व्यक्तींच्या कामांची नोंद घेऊन त्यांचा यथोचित सन्मान आपण करायला हवा. पद्मविभूषण डॉ. ईलत्तुवलपीळ श्रीधरन व्यवस्थापकीय संचालक, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन हे अशा लोकांपैकीच एक आहेत. कालच त्यांनी आपल्या कार्यभाराची सूत्रे, आपल्या उत्तराधिकार्‍यास सुपूर्त केली. त्यानिमिताने, त्यांच्या कारकीर्दीचा घेतलेला हा एक आढावा. कोकण रेल्वेचे दैदिप्यमान काम ज्यांनी संकल्पिले, नियोजले आणि नियत कालावधीत यशस्वीरीत्या करून दाखवले त्या श्रीधरन यांना माझा मानाचा मुजरा!




आज वाशी स्टेशनकडे देशातल्या आदर्श स्टेशनचा नमुना म्हणून पाहिले जाते. गाड्या, फलाट, इमारत, रूळमार्ग पार करणारे दादरे, सगळेच एका छताखाली आणल्याने, स्टेशन आहे की विमानतळ असे वाटवणारे भारतातले पहिले रेल्वे स्टेशन आहे वाशी. भारतभरच्या स्टेशनांभोवतीच्या बकाल वस्तीचा येथे निकास करून, आंतरराष्ट्रीय माहिती-तंत्र-उद्यानाची निर्मिती स्टेशनाच्या वरच केल्याने सार्‍या परिसराचेच उद्धरण केलेले स्पष्टपणे जाणवते. कोकण रेल्वे प्रकल्पाला अशीच विकासाची दिव्य दृष्टी देणारे श्रीधरन आज कार्यनिवृत्त झालेले आहेत. त्यांच्याच उत्तम कार्यांची ही उजळणी.

श्रीधरन यांचा जन्म १२ जून १९३२ रोजी केरळातील पलक्कड जिल्ह्यातील करुकपुथूरमध्ये झाला. बसेल-ईव्हांजेलिकल-मिशन-उच्च-माध्यमिक शाळेतून त्यांनी शिक्षण घेतले. पलक्कडच्या व्हिक्टोरिया कॉलेजातून महाविद्यालयीन शिक्षण घेतले आणि मग काकीनाडा येथील गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून अभियांत्रिकी स्नातक झाले. कोझिकोडे येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये नागरी-अभियांत्रिकीतील व्याख्याता म्हणून काम केले. नंतर मुंबईच्या पोर्ट ट्रस्टमध्ये उमेदवारी केली. त्यानंतर ते भारतीय रेल्वेत रुजू झाले. दक्षिण रेल्वेत ते १९५४ च्या डिसेंबरमध्ये, सहाय्यक प्रशिक्षणार्थी अभियंता म्हणून रुजू झाले.

दक्षिण आणि दक्षिणपूर्व रेल्वेत त्यांनी सहाय्यक अभियंता, कार्यकारी अभियंता, प्रभागीय अभियंता आणि उपमुख्य अभियंता इत्यादी पदे भूषवली. जेव्हा ते नवे मार्ग निर्माण करण्याची जबाबदारी सांभाळत होते, तेव्हा क्विलॉन-एर्नाकुलम मिटरगेज आणि मँगलोर-हसन मार्गांची निर्मिती करण्यात आली. त्यादरम्यान अनेक पूल, बोगदे यांचे प्रकल्प यशस्वीरीत्या पार पडले. तसेच पालघाट, हुबळी आणि बेझवाडा प्रभागांची देखरेखही केली गेली.



१९६३ मध्ये भारताच्या रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणारा तामिळनाडूतील पंबनम्‌ पूल वादळाने वाहून गेला. पंबनम्‌-पूलाचे वाहून गेलेले १२५ टप्पे, ४६ दिवसात पुन्हा उभे करण्याच्या त्यांच्या कामगिरीखातर रेल्वे मंत्रालयाने त्यांना पारितोषिक दिले. ते उपमुख्य अभियंता असतांना देशातील पहिली मेट्रो रेल्वे १९७० ते १९७५ या काळात कोलकाता येथे उभारण्यात आली. त्या कामाचे तेच प्रभारी होते. त्यांनीच ह्या कामाचा तपास, नियोजन आणि अभिकल्पन केले होते.

ऑक्टोंबर १९७९ ते नोव्हेंबर १९८० ते जहाज वाहतूक मंत्रालयाच्या कोचीन येथील जहाजबांधणी कारखान्याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून प्रतिनियुक्तीवर होते. त्यांच्या कार्यकाळात या कारखान्याने उभारलेले पहिले जहाज “राणी पद्मिनी” चे जलावतरण करण्यात आलेले होते.

जुलै १९८७ मध्ये ते पश्चिम रेल्वेचे प्रमुख व्यवस्थापक झाले. जुलै १९८९ मध्ये रेल्वे महामंडळाचे अभियांत्रिकी सदस्य व म्हणूनच भारत सरकारचे पदसिद्ध सचीव झाले. १९९० मध्ये अवकाशप्राप्त करतांनाच ते प्रतिष्ठेच्या समजल्या गेलेल्या कोकण रेल्वेवर अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त केले गेले. कोकण रेल्वेचा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर ५ नोव्हेंबर १९९७ पासून ते दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त केले गेले.



कोकण रेल्वे आणि मग दिल्ली मेट्रो यांच्या उभारणीत अथक परिश्रम करून भारतीय सार्वजनिक वाहतूकीचे चित्रच त्यांनी बदलवून टाकले. त्यांच्या निष्ठापूर्वक केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ म्हणून भारत सरकारने २००१ मध्ये त्यांचा “पदमश्री” देऊन सन्मान केला. टाईम्स ऑफ इंडियाने त्यांना २००२ साली मॅन ऑफ द ईयर म्हणून निवडले. २००३ साली टाईम नियतकालिकाने त्यांची आशियातील एक पुढारी म्हणून निवड केली. २००५ मध्ये फ्रेंच सरकारनेही त्यांचा गौरव केला.

२००९ मध्ये त्यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भरीव कामगिरीच्या सन्मानार्थ त्यांना भारत सरकारने “पदमविभूषण” देऊन गौरवले.

त्यांच्यासाठी त्यांच्या कार्यनिवृत्तीच्या निमित्ताने मी उत्तम आयुरारोग्य प्रार्थितो आणि त्यांच्या उत्तर आयुष्याकरता हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो.

श्रेयनिर्देशः प्रकाशचित्रे व मजकूर यांखातर संबंधित खाली दिलेल्या संस्थळांचे मनःपूर्वक आभार.

संदर्भः
१. http://india.gov.in/myindia/padmavibhushan_awards_list1.php?start=10
२. http://www.delhimetrorail.com/whatnew_details.aspx?id=NgRPa7TMhkQlld&rdct=d
३. http://en.wikipedia.org/wiki/E._Sreedharan
  • Log in or register to post comments
  • 3451 views

प्रतिक्रिया

Submitted by अन्या दातार on Sun, 01/01/2012 - 20:50

Permalink

देशसेवेसाठी झटणार्‍या

देशसेवेसाठी झटणार्‍या व्यक्तिचा यथोचित गौरव करणारा लेख. अब्दुल कलामांप्रमाणेच हेही एकदा भारताचे राष्ट्रपती म्हणून विराजमान झालेले बघायला आवडेल मला. :)
  • Log in or register to post comments

Submitted by आळश्यांचा राजा on Sun, 01/01/2012 - 21:34

Permalink

सलाम

सिस्टिम वाटते तेवढी बिघडलेली नाही याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे श्रीधरन यांचे कर्तृत्व. श्रीधरन साहेबांना उर्वरित आयुष्य शांतीपूर्ण तसेच निरामय जावो यासाठी शुभेच्छा. गोळेसाहेबांचे विशेष आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Sun, 01/01/2012 - 22:03

In reply to सलाम by आळश्यांचा राजा

Permalink

+१

अत्यंत महत्वाची प्रतिक्रिया. एक शंका:- श्रीधरन नक्की निवृत्त कधी झाले? १९३२ हे जन्मसाल धरले तर त्यांचे सधयचे वय ८० तरी असावे.
  • Log in or register to post comments

Submitted by नरेंद्र गोळे on Tue, 01/03/2012 - 13:28

In reply to +१ by मन१

Permalink

रेल्वेतून ते ९० सालीच निवृत्त झाले!

रेल्वेतून ते ९० सालीच निवृत्त झाले! पुढे कोकण रेल्वे प्रकल्पाचे ते कार्यकारी अधिकारी झाले. त्यांचे वय ८० चे आसपास असणार हा आपला तर्क खराच आहे. आणि त्यांच्या कार्यनिवृत्तीचे खरे कौतुक त्यामुळेच तर आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Sun, 01/08/2012 - 17:02

In reply to रेल्वेतून ते ९० सालीच निवृत्त झाले! by नरेंद्र गोळे

Permalink

प्र. का. टा. आ.

.
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Tue, 01/03/2012 - 13:37

In reply to +१ by मन१

Permalink

छान लेख

माझ्या माहिती प्रमाणे असे अधिकारी निवृत्त झाल्यावर पण त्यांना सल्लागार म्हणून घेतले जाते. ८०-८५ वर्षाच्या लोकांना राजकारणात ना नाहीये मग अश्या चांगल्या लोकांनी काम केले तर बिघडले कुठे? JRD किंवा रतन टाटा जर ६० व्या वर्षी निवृत्त झाले असते तर????
  • Log in or register to post comments

Submitted by नरेंद्र गोळे on Sun, 01/08/2012 - 06:18

In reply to छान लेख by मी-सौरभ

Permalink

सत्यवचन!

अगदी खरंय सौरभ!
  • Log in or register to post comments

Submitted by इन्दुसुता on Sun, 01/01/2012 - 22:05

In reply to सलाम by आळश्यांचा राजा

Permalink

+१. असेच

+१. वर आळश्यांचा राजा यांनी म्हटले आहे असेच म्हणते. गोळेसाहेबांचे आभार व श्रीधरन साहेबांना अनेक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on Sun, 01/01/2012 - 22:45

In reply to सलाम by आळश्यांचा राजा

Permalink

+१

श्रीधरन यांच्याबद्दल वाचून होतो. लेख छान झाला आहे. - नीलकांत
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Sun, 01/01/2012 - 23:02

Permalink

ओळख आवडली

पद्मविभूषण अशा लोकांनाच मिळावा!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 01/01/2012 - 23:43

Permalink

भारतरत्न

श्रेधरन याना द्या. एवढं कर्तृत्व एका जन्मात फार कमी लोक दाखवू शकतात.
  • Log in or register to post comments

Submitted by सविता००१ on Mon, 01/02/2012 - 10:06

Permalink

सहमत

पैसा ताईंशी पूर्णपणे सहमत. भारत रत्नाचा खराखुरा मानकरी हाच महात्मा असायला हवा.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Mon, 01/02/2012 - 10:42

Permalink

छान लेख...

ई.श्रीधरन , (सुरत ची सुधारणा करणरे) S. R. राव, तिरूचिरापल्ली चे एक पोलिस अधिकारी (नाव विसरलो) या लोकांनी सिस्टीम मध्ये राहून खूप खूप चांगले काम केले आहे.... मोदक.
  • Log in or register to post comments

Submitted by कॉमन मॅन on Mon, 01/02/2012 - 12:40

Permalink

नक्कीच स्पृहणीय..

नक्कीच स्पृहणीय..
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 01/02/2012 - 13:06

Permalink

ब्येष्ट...! खूप छान ओळख.

ब्येष्ट...! खूप छान ओळख.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Mon, 01/02/2012 - 14:19

Permalink

माहितीपूर्ण ....

प्रेरणादायी व्यक्तीमत्त्वावरील माहितीपूर्ण लेख. धन्यवाद. आपल्या समाजात अजूनही कुठे कुठे आशेचे दिवे लुकलुकत आहेत ह्याचे समाधान वाटले.
  • Log in or register to post comments

Submitted by निश on Mon, 01/02/2012 - 15:37

Permalink

अनुकणिय, गुरु करावे अश्या गरुतुल्य व्यक्क्ति आहेत ई.श्रीधरनसर

अनुकणिय, गुरु करावे अश्या गरुतुल्य व्यक्क्ति आहेत ई.श्रीधरन सर. लेख आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Mon, 01/02/2012 - 16:59

Permalink

धन्यवाद धन्यवाद, अतिशय मोठा

धन्यवाद धन्यवाद, अतिशय मोठा माणुस, खरंच खुप मोठा माणुस. एकदा एका सेमिनारच्या वेळी यांना प्रत्यक्ष बघायची संधी मिळाली होती, आपण केलेल्या कामाबद्दल एक छदाम सुद्धा गर्व नव्हता यांच्या चेह-यावर.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Mon, 01/02/2012 - 19:22

Permalink

छान लेख

श्रीधरन ह्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख आवडला.
भ्रष्टाचाराचा बोलबाला होत असलेल्या भारतात, शिष्टाचाराचे मूर्तिमंत प्रतीक बनून, विधिवत मिळालेले काम निष्ठापूर्वक करणारे अनेक लोक आजही आहेत. त्यांच्याच बळावर भारतीय समाज व्यवस्था घट्ट उभी आहे.
संपूर्ण सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by नरेंद्र गोळे on Tue, 01/03/2012 - 13:25

Permalink

प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

अन्या दातार, आळशांचा राजा, मन१, इंदुसुता, नीलकांत, दादाकोंडके, पैसा, सविता००१, मोदक, कॉनम मॅन, प्यारे१, प्रभाकर पेठकर, निश, ५० फक्त आणि प्रदीप सगळ्यांना प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on Sun, 01/08/2012 - 15:47

Permalink

श्रीधरन ह्यांना सलाम !!!

काका, खूप सुंदर ओळख करून दिलीत. आजच एक असाच लेख वाचनात आला मटामध्ये मेट्रो मॅन श्रीधरन...
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com