✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

औरंगाबाद परिसर - वेरूळ - अजंठा- पैठण (1) : देवगिरी किल्ला

स
सोत्रि यांनी
Fri, 11/11/2011 - 15:29  ·  लेख
लेख
दिवाळीच्या सुट्टीत काय करायचे असे मुलांना विचारले. मोठा मुलगा म्हणाला कुतुबमिनार आणि ताजमहाल बघायचाय. पण आता असे घोड्यावर बसुन रेल्वे बूकिंग शक्य नव्हते. मग सहज त्याला म्हटले तुला मिनी ताजमहाल आणी मिनी कुतुबमिनार बघायचा का? तो एकदम चकितच झाला आणी म्हणाला म्ह्णजे काय? लगेच गुगलबाबाच्या चित्र विभागाला साकडे घातले आणि त्याला बिबी का मकबराची आणि चाँद मिनारची चित्रे दाखवली. ती चित्रे बघुन तो पडलाच. असं कसं काय शक्य आहे असे विचारून त्याने भंडावून सोडले. त्याला म्हटले जायचे का बघायला तर तो म्हणाला जाउया. मग जरा सिरीयस होउन औरंगाबाद परिसर - वेरूळ - अजंठा- पैठण अशी एक 'हिस्टॉरिकल टूर' प्लान केली आणि धमाल एन्जॉय केली. सर्वप्रथम पोहोचलो देवगिरी किल्ल्यावर. देवगिरी म्हणजे 'देवतांचा पर्वत'. पुढे महंमद-बीन-तुघलक ह्याने त्याचे दौलताबाद असे नामांतर केले. यादव राजवंशाने ह्या किल्ल्याचे निर्माण केले. ह्या काळात यादव साम्राज्य समृद्धी आणि उत्कर्षाच्या परमोच्च बिंदूवर होते. त्याची खबर अलाउद्दिन खिलजीला लागली आणि त्याने देवगिरीवर हल्ला केला. हा मुस्लिमांचा दक्षिणेवरचा पहिला हल्ला. हा हल्ला धरून एकून 3 हल्ले झाले देवगिरीवर. त्यात अनुक्रमे रामदेवराय, शंकरदेव आणि हरपालदेव ह्यांचा पराभव होउन देवगिरीवर मुस्लिम शासन सुरू झाले. एके काळी काही काळ ह्या किल्ल्याने भारताची राजधानी व्हायचा मानही मिरवलाय. पेशवाईतील 2 वर्षे सोडता हा किल्ला आणि आजुबाजुचा प्रदेश पुर्णकाळ मुस्लिम शासकांच्या ताब्यात होता. ह्या किल्ल्याची रचना इतकी अभेद्य केलीय की हा किल्ला अपराजित आहे. ह्यावर जो कब्जा मिळवला गेला तो फक्त कपट कारस्थानं आणि फंदफितुरीने. देवगिरी किल्ल्याचे प्रवेशद्वार हत्तींच्या धडकेपासुन संरक्षणासाठी लावलेले महाकाय खिळे ह्या किल्ल्यामधे बरेच दरवाजे आहेत आणी त्यांच्या दिशा आणी त्यांच्यामधली अंतरे अशा प्रकारे ठेवली आहेत की शत्रुला हल्ला करणे आणि रणनीती ठरवणे एकदम अशक्य होउन जावे. आत आल्यावर दिसणारे काही बुरुज मुख्य महादरवाज्यातुन आत आल्यावर बर्याच तोफा मांडुन ठेवल्या आहेत. भारतमाता मंदिर आतमधे एक मंदिर आहे जे यादवकालीन जैन मंदिर होते. तेथे कुतबुद्दीन खिलजी ने मस्जिद बनवली. जेव्हा 1948 साली हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले तेव्हा त्या तिथे भारतमातेची मुर्ती स्थापन केली आणी ते ठिकाण भारतमाता मंदिर म्हणुन प्रसिद्धीस आले. त्या मंदिराच्या प्रांगणातील काही कोरीव खांब चाँद मिनार भारतमाता मंदिराजवळ एक मोठा 3 मजली मिनार आहे. हे मंदिर तोडुन तिथे मस्जिद बांधली असल्यामुळे अहमदशहा बहामनीने हा उत्तुंग मिनार त्यावेळेच्या मशिदीजवळ बांधला. दिल्लीच्या कुतुबमिनार नंतर उंच मिनारांमधे ह्या 3 मजली चाँद मिनारचा दुसरा क्रमांक लागतो. चिनी महल एके काळी ह्या महालाच्या भिंती चिनी मातीच्या नक्षीकामानी अलंकृत केल्या होत्या. ह्या महालाचा कारागृह म्हणुन वापर केला जात असे. औरंगजेबाने ह्या महालात संभाजीराजांच्या पत्नी येसुबाई आणि पुत्र शाहुराजे ह्यांना कैद करून ठेवले होते अशी वंदता आहे. मेंढा तोफ चिनी महालापासुन जवळच एका बुरुजावर ही मेंढा तोफ आहे. चारही दिशांना फिरू शकणार्‍या ह्या तोफेला मागच्या बाजुला मेंढ्याचे तोंड आहे त्यामुळे ह्या तोफेला मेंढा तोफ असे नाव पडले. मुस्लिम शासक हिला 'तोप किला शिकन' म्हणजे 'किल्ला तोडणारी तोफ' म्हणत. ह्या तोफेवर ही तोफ तयार करणार्‍याचे आणि औरंगजेबाचे नाव कोरले आहे. ह्या तोफेच्या तोंडावर कुराणातील एक वचन कोरले आहे. खंदक मेंढा तोफेच्या बुरुजावरून पुर्ण किल्ल्याचे दर्शन करता येते. आणी किल्ल्यात जाण्याच्या मार्गात एक मोठा खंदक आहे. ह्या खंदकात दोन स्तर आहेत. ह्या दोन्ही स्तरांमधे पाणी भरलेले असायचे. नेहमीच्या वेळी फक्त खालचा स्तर भरून पाणी असायचे. त्याने किल्ल्यात जा-ये करण्यासाठी असलेला पुल उघड असायचा. हल्ल्याच्या वेळी पाणी दुसर्‍या स्तरात सोडले जायचे जेणेकरून पुल पाण्याखाली जाउन शत्रु खंदकात पडून खंदकातील मगरींच्या भक्षस्थानी पडायचा. ह्या खंदकातील भिंती विशिष्ट पद्धतीने बांधल्या होत्या ज्याने त्यावर शिडी लावणे अशक्य होते. अंधारी/ भुलभुलय्या हा भुलभुलय्या ह्या किल्ल्याच्या अभेद्य रचनेचा कळस आहे. बालेकिल्ल्यात जाण्यासाठीचा हा मार्ग आहे. बालेकिल्ल्यात जाण्यासाठी हा भुलभुलय्या पार करावा लागतो. ह्याचे प्रवेशद्वार एखाद्या गुहेसारखे आहे. आणि हा पुर्ण मार्ग एकदम अंधारी आहे. अक्षरश: काळोख. काहीही दिसत नाही. भुलभुलय्या अशासाठी म्हणतात की हा पुर्ण मार्ग वर्तुळाकार जिन्याने बनलेला आहे. पायरी पायरी मधील अंतर विषम आहे. एक पायरी एकदम उंच तर एक पायरी एकदम लहान. शत्रुला उल्लु बनवण्याची फुल तजवीज आहे इथे. हवा आणि प्रकाश येण्यासाठी काही झरोके आहेत. त्यात शत्रुने प्रवेश केला रे केला की तो डायरेक्ट खंदकात पोहोचलाच पाहिजे अशी सोय केलेली आहे. शत्रु जरा विचार करत थांबला की वरून दगडांचा मारा करायला छुप्या जागा बनवलेल्या आहेत. बारादरी सध्याला ह्या किल्ल्यावर चांगल्या स्थितीत असणरी ही एकच वास्तु आहे. शहाजहानने बनवलेला हा महाल अष्टकोनी आहे. ह्याच्या बाहेरच्या बाजुला 12 कमानी आहेत त्याने ह्याचे नाव बारादरी असे पडले. बारादरीवरून पुर्ण किल्ल्याचे आणी आजुबाजुच्या परिसराचे सुंदर असे विहंगम दृश्य दिसते. अत्त्युच्च शिखर हा ह्या किल्ल्यावरील अत्त्युच्च बुरुज. इथे एक मोठी तोफ आहे जीचे नाव आहे दुर्गा तोफ. इथे पोहोचे पर्यंत आपली फॅ फॅ होते, तर एवढी वजनदार आणि भव्य तोफ इथे कशी आणली असेल वाटून उगाच जीव दडपून जातो. एवढ्या टोकावर गड चढून गेलो त्याचा हा घ्या पुरावा. :) क्रमश: (पुढे-> बिबी का मकबरा)
  • औरंगाबाद परिसर – वेरूळ – अजंठा- पैठण (2) : बीबी का मकबरा आणि पाणचक्की

Book traversal links for औरंगाबाद परिसर - वेरूळ - अजंठा- पैठण (1) : देवगिरी किल्ला

  • औरंगाबाद परिसर – वेरूळ – अजंठा- पैठण (2) : बीबी का मकबरा आणि पाणचक्की ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
अनुभव
माहिती
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
30665 वाचन

💬 प्रतिसाद (64)

प्रतिक्रिया

छान ओळख करुन दिली आहे त्या

धन्या
Fri, 11/11/2011 - 15:54 नवीन
छान ओळख करुन दिली आहे त्या परीसराची... फोटोंची रेलचेल आवडली :) बघूया यकु कधी घेऊन जातोय ते. ;)
  • Log in or register to post comments

बघूया यकु कधी घेऊन जातोय

यकु
Fri, 11/11/2011 - 20:45 नवीन
बघूया यकु कधी घेऊन जातोय ते.
अरे ये की लेका.. कधीही ये.. आम्ही खास इंदूरहून संभाजीनगराकडे कूच करू म्हणे तुला हा भाग दाखवायला.. सोकाजी, बाकी हिरण्य रिसॉर्ट्ला गेला होतात की नाही? किल्ल्याजवळच्या घाटातल्या दरीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

>>>सोकाजी, बाकी हिरण्य

विलासराव
Sat, 11/12/2011 - 10:46 नवीन
>>>सोकाजी, बाकी हिरण्य रिसॉर्ट्ला गेला होतात की नाही? किल्ल्याजवळच्या घाटातल्या दरीत आहे. मस्त रिसॉर्ट आहे हे. यकुंनीच सुचवले होते. रहायला टेंटही आहेत तिथे. Image removed. हे भद्रा मारुती मंदीरः Image removed. Image removed. बाकीचे फोटो इथे पहाता येतीलः https://picasaweb.google.com/106420187666958293433/SHEGAON_AJANTHAWERUL
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

ईन्टरेस्टिंग!

स्वैर परी
Fri, 11/11/2011 - 16:01 नवीन
बर्याचदा इथे जाण्याचा प्लॅन होतो, पण काही कारणास्तव नाही जमलय, जावच लागणार असे दिसतय एकंदर. बाकि तुमची फोटो एकदाम झ्याक जमलेत. सहलीमध्ये काढलेले सहज फोटो आणि गूगल वर शोधुन काढलेले त्याच जागेचे फोटो यात केवढे अंतर असते नाही. आपण सहलीत काढलेले फोटोशी समोरची व्यक्ती जास्त रिलेट करु शकते अस मला वाटते. उदाहरणार्थ, तुम्ही काढलेल्या चाँद मिनार चा फोटो, फार मोहक नसला, तरी क्षणात तिथे जाउन आल्यसारखे वाटले! :)
  • Log in or register to post comments

छान माहिती+फोटो. हा लेख तुला

मदनबाण
Fri, 11/11/2011 - 16:02 नवीन
छान माहिती+फोटो. :) हा लेख तुला आधी वाचायला द्यायला पाहिजे होता. http://divyamarathi7.bhaskar.com/article/MAH-attar-market-aurangabad-2172263.html
  • Log in or register to post comments

सोका.. मस्त फोटो रे.. दीड

स्पा
Fri, 11/11/2011 - 16:26 नवीन
सोका.. मस्त फोटो रे.. दीड वर्षापूर्वी मी पण ह्याच पट्टयात फिरून आलो होतो..
  • Log in or register to post comments

चला या धाग्यातुन का होईना पण

गणपा
Fri, 11/11/2011 - 16:31 नवीन
चला या धाग्यातुन का होईना पण देवगिरी किल्ल्याचे दर्शन झाले. :)
  • Log in or register to post comments

+१

दादा कोंडके
Sat, 11/12/2011 - 00:48 नवीन
छान फोटु आणि वर्णन सुद्धा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

वाह.. शाळेच्या ट्रिपची आठवण

गवि
Fri, 11/11/2011 - 16:39 नवीन
वाह.. शाळेच्या ट्रिपची आठवण आणलीत.. तो भूलभुलैय्या.. तोफ... सगळं सगळं कालपरवा बघितलंय असं वाटलं.. मस्त फोटो आणि माहिती हो...
  • Log in or register to post comments

झकास

परिकथेतील राजकुमार
Fri, 11/11/2011 - 16:39 नवीन
अतिशय माहितीपूर्ण लेखमाला. फटू अतिशय सुरेख आहेत, विशेषतः दरवाजाचा फटू. स्क्रोल करताना तो दरवाजा आणि खिळे मोठे होत अंगावर पडत आहेत असे वाटते. बाकी तोफेच्या तोंडी गेल्यामूळे लेखमाला 'क्रमशः' झाली असावी काय ?
  • Log in or register to post comments

+१ आधी लक्षात आल नाही.तुमची

किचेन
Fri, 11/11/2011 - 18:01 नवीन
+१ आधी लक्षात आल नाही.तुमची कॉमेंट वाचून तसं करून बघितलं.भारी वाटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

भारी वाटतंय. काय भारी वाटतंय

सोत्रि
Sat, 11/12/2011 - 02:01 नवीन
भारी वाटतंय.
काय भारी वाटतंय ? सोक्या तोफेच्या तोंडी दिला गेला ही कल्पना की दरवाजा आणि खिळे अंगावर येत आहेत ही कल्पना? ;) - (पराने तोफेच्या तोंडी दिलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

अस मस्त खिळ्यांचा पाऊस पडतोय

किचेन
Sat, 11/12/2011 - 17:17 नवीन
अस मस्त खिळ्यांचा पाऊस पडतोय अस वाटत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

कल्ला !!

वपाडाव
Fri, 11/11/2011 - 16:40 नवीन
काय झ्याक ठिकाण निवडलं हो साहेब !!! बाकी, इथे गेलाच होतास तर भद्रा मारुती अन औरंगजेबाची कबर वेग्रे पाहिलीस की नाही ???? फटु कडक...
  • Log in or register to post comments

भद्रा मारुती अन औरंगजेबाची

सोत्रि
Sat, 11/12/2011 - 02:05 नवीन
भद्रा मारुती अन औरंगजेबाची कबर बघितली तर! पण का कोण जाणे इथले फोटो नीट नाही आले :( - (भद्रा मारुतीचे फोटो न आल्याची हूरहूर दाटलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

भद्रा मारुती अन औरंगजेबाची

सोत्रि
Sat, 11/12/2011 - 02:05 नवीन
भद्रा मारुती अन औरंगजेबाची कबर बघितली तर! पण का कोण जाणे इथले फोटो नीट नाही आले :( - (भद्रा मारुतीचे फोटो न आल्याची हूरहूर दाटलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

व्वा व्वा.. मस्त आहेत

सुहास झेले
Fri, 11/11/2011 - 16:43 नवीन
व्वा व्वा.. मस्त आहेत फटू. कधी पासून जायचं जायचं म्हणतोय, पण योग जुळून येत नाही आहेत :(
  • Log in or register to post comments

फोटॉ छान!!

मोहनराव
Fri, 11/11/2011 - 16:45 नवीन
मी २ वर्षापुर्वी हा पट्टा फिरुन आलेलो आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने निदान एकदातरी ही स्थाने पाहिलीच पाहिजेत!! (पर्यटनवेडा) मोहन.
  • Log in or register to post comments

मस्त आहेत फटू. बर्‍याच

जे.पी.मॉर्गन
Fri, 11/11/2011 - 17:17 नवीन
मस्त आहेत फटू. बर्‍याच दिवसांपासून प्लॅन करतोय अजंठा, वेरूळ, घृष्णेश्वर, देवगिरी आणि पैठण फिरायचा. तुमचा पूर्ण रिपोर्ट आला की रजा टाकतो :) येऊद्या पटकन जे पी
  • Log in or register to post comments

अजंठा वेरुळ कधी टाकताय मग

मृत्युन्जय
Fri, 11/11/2011 - 17:31 नवीन
अजंठा वेरुळ कधी टाकताय मग आता? तिथेही जायचे आहेच. कार्यबाहुल्यामुळे जाणे होत नाही (लिहायला कसले भारी वाटते ना हे कार्य बाहुल्य वगैरे?) :)
  • Log in or register to post comments

मस्त!

चित्रा
Fri, 11/11/2011 - 17:45 नवीन
धन्यवाद. लहानपणी औरंगाबादेला गेल्याच्या आठवणी जाग्या झाल्या. बिवी का मकबरा तेव्हा नावामुळेच पाहण्याची इच्छा होती.
  • Log in or register to post comments

छान छायाचित्रे आहेत.

चेतन सुभाष गुगळे
Fri, 11/11/2011 - 17:45 नवीन
एकूणच सुटी छान घालवलीत म्हणायची तर. छायाचित्रे उत्तमच. मी १९९० साली जाऊन आलो होतो. तेव्हा चांद मिनारच्या आतमध्ये थेट वर पर्यंत जाऊन देत असत. अजुनही जाऊन देतात का? बाकी पणचक्की वगैरे पाहिलीत की नाही?
  • Log in or register to post comments

आता वर जाउ देत नाहीत आणि आतही

सोत्रि
Fri, 11/11/2011 - 18:54 नवीन
आता वर जाउ देत नाहीत आणि आतही जाउ देत नाहीत :( - (चांद मिनारच्या आत ना गेलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

स्सही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/11/2011 - 17:57 नवीन
फोटो छान आले आहेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

भारीच! सगले फोटो मस्तच

किचेन
Fri, 11/11/2011 - 17:59 नवीन
भारीच! सगले फोटो मस्तच आलेत.इथे पूर्वी कधी गेले नसल्याने एकदा जाऊन यावच अस वाटायला लागलाय. बाकी किल्याचा पारीसार वैगैरे एकदम स्वस्च दिसतोय.कोठेही पाण्याच्या बाटल्या आणि फाटलेल्या करिबग नाहीयेत. छान काळजी घेतलीये किल्ल्याची.
  • Log in or register to post comments

आत्ताच कोकणाच्या धाग्याची

रेवती
Fri, 11/11/2011 - 18:49 नवीन
आत्ताच कोकणाच्या धाग्याची वाचनखूण साठवली. या धाग्यातही व्यवस्थित माहिती दिली असल्याने वाचनखूण साठवावी लागणार. फोटू छान आलेत.
  • Log in or register to post comments

दिवाळीची सुट्टी सार्थकी लागली

५० फक्त
Fri, 11/11/2011 - 20:18 नवीन
दिवाळीची सुट्टी सार्थकी लागली तुमची, मस्त आले आहेत फोटो. आणि तुझा फोटो तर सगळ्यात मस्त. तिथं जाउन आल्याचा पुरावा म्हणुन तिथल्या दगडावर चुन्यानं नाव न लिहिता फोटो काढुन ठेवलास याबद्दल धन्यवाद. लहान असताना बाबांबरोबर गेलो होतो, अशा ठिकाणी गेलं की माझ्या बाबांचा हरितात्या व्हायचा. त्यात ते इतिहासाचे शिक्षक मग काय मजा यायची. सोकात्रि, आठवणी जागवल्याबद्दल खुप आभार. पुढच्या सुट्टीत पोराला घेउन जाईन, अजुन त्याला दुश्मनी म्हणजे काय शिकवलं नाही आणि दुश्मनी काय हे कळाल्याशिवाय दुश्मनापासुन संरक्षणासाठी काय काय करुन ठेवलंय याचं महत्व् कळणार नाही. फोटो आणि माहिती मस्तच. एक ऐकीव माहिती. ती सर्वात वरच्या बुरुजावरची तोफ चढवण्यासाठी बुरुजाच्या कडेला रहाटाला असतात तश्या चक्री लावल्या होत्या व पलिकड्च्या बाजुने हत्तीनी ओढुन ती तोफ वर घेतली गेली असं म्हणलं जातं.
  • Log in or register to post comments

मस्तच..

मस्त कलंदर
Fri, 11/11/2011 - 20:28 नवीन
फोटो आणि वर्णन दोन्ही छान!! हे सर्व कधी पाहायला मिळेल याच्या प्रतिक्षेत.. :-(
  • Log in or register to post comments

त्यात काय अवघड आहे

रेवती
Fri, 11/11/2011 - 21:01 नवीन
त्यात काय अवघड आहे काकू?;) पतीदेवांना सांगा की! "राया मला देवगिरी दावा की, राया मला......" अशी गाणी म्हणून बघा.;) पाभे तर तुम्हाला चांगलीशी लावणीही तयार करून देतील. द्याल ना हो पाभे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/11/2011 - 21:19 नवीन
सहमत. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

तो नेत नाही म्हणून तर ना!!!

मस्त कलंदर
Fri, 11/11/2011 - 22:48 नवीन
त्याने नेलं असतं तर असं म्हणायची वेळच आली नसती ना. फक्त भद्रा मारूतीला एकदा नेऊन आणलंय त्याने. जाता जाता: मी आणि काकू, हूं; कभ्भी नहीं!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

खी खी खी...

सोत्रि
Sat, 11/12/2011 - 02:10 नवीन
मी आणि काकू, हूं; कभ्भी नहीं!!
हे तुमचे स्वगत आहे की तुमचे हे असे म्हणतात,कुठे एकत्र जायचे असल्यास? ;) (ह.घे.) - (हलकट) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

हा हा..

मस्त कलंदर
Sat, 11/12/2011 - 22:09 नवीन
आता आज्जीलोक काकू म्हणायला लागल्यावर असं म्हणायला होणारच ना!! ;-) अवांतराबद्दल काही मी काही बोलायची गरज नाही इतकं उत्तर पुरेसं आहे. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

त्याने नेलं असतं तर असं

परिकथेतील राजकुमार
Sat, 11/12/2011 - 11:13 नवीन
त्याने नेलं असतं तर असं म्हणायची वेळच आली नसती ना. फक्त भद्रा मारूतीला एकदा नेऊन आणलंय त्याने.
=)) =)) त्याच्यामागे कारण आहे. भूत पिशाच निकट नहीं आवे,महावीर जब नाम सुनावें. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

अगदीच देवगीरीचा किल्ला नाही

पाषाणभेद
Sat, 11/12/2011 - 02:00 नवीन
अगदीच देवगीरीचा किल्ला नाही पण "इश्काच्या किल्याची मी किल्लेदारीण" असली लावणी मी या आधीच लिहीलेली आहे. संकोचभयास्तव मी ती प्रकाशीत केली नाही परंतु आपल्या येथील 'भावड्या' या आयडी च्या मागणीस्तव मी त्याला दिलेली होती. देवगीरीच्या किल्यात ज्या ज्या गोष्टी आहेत ते ते वर्णन त्या लावणीत आलेले आहे. अर्थातच 'देवगीरी' ह्याच किल्याला ध्यानात घेवून जरी ती लावणी लिहीली गेली नसली तरी थोड्याफार शब्दात फेरबदल करून ती या संदर्भात ती लागू होवू शकते. त्या लावणीत आक्षेपार्ह काही नाही पण आधीच आमची इमेज चांगली नसल्याने आम्ही ती येथे डकवणार नाही. खरोखर पुरूषांचेच जे आयडी आहेत त्यांना 'मागणी तसा पुरवठा' या उक्तीनुसार आम्ही ती रचना त्यांना पुरवू शकतो. मनापासून धन्यवाद. अरे हो, मुळ धाग्यावर प्रतिक्रीया द्यायची राह्यलीय म्हणून प्रतिसाद नविन करतोयः फोटो अन वर्णन छान आहे. पण सोका तुम्ही गाईड घेतला होता काय? कारण किल्यातले बरेच डिटेल्स आलेले नाहीत. जसे त्या चाँद मिनारच्या समोर एक मोठा हौद आहे. त्यात रंगीत पाणी टाकून रंगपंचमी व्ह्यायची किंवा सुरूवातीला घोडे बांधायच्या पागा आहेत ते किंवा एक छोटेसे भोक आहे त्यात शत्रू सैन्याचा सैनिक पहिल्यांदा डोके घालायचा अन मग त्याचे डोके उडवले जायचे ते. अन हो ते भारतमातेचे मंदिर आताच्या काळातले आहे. ('भारतमाता' ही देवी 'संतोषीमाता' देवीसारखीच आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

नाही गाईड नव्हता घेतला. माझे

सोत्रि
Sat, 11/12/2011 - 02:15 नवीन
नाही गाईड नव्हता घेतला. :( माझे वडिल ईतिहास शिकवायचे आणि ते बरोबर होते त्यामुळेच एवढी (तरी) माहिती मला मिळाली :) - (ईतिहासप्रेमी) सोकाजी अवांतर: तुमच्या लावणीची रचना व्यनी करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

एक सांगायचे राहिले. पुर्वी

पाषाणभेद
Sat, 11/12/2011 - 02:47 नवीन
एक सांगायचे राहिले. पुर्वी त्या मिनारावर जावू द्यायचे. आता तसे करू देत नाही. लहाणपणी मी गेलोय वरती दुसर्‍या की तिसर्‍या मजल्यापर्यंत. लावणी व्यनी केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

देवगिरीचा किल्ला भयंकर उंच

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/11/2011 - 20:45 नवीन
देवगिरीचा किल्ला भयंकर उंच आहे...असे लहानपणी कधीतरी ऐकले होते...आणी आमच्या शेजारचा एक मुलगा जाउन आल्यावर पाय सुजले म्हणुन पायाला पट्ट्या बांधुन बसला होता. तरीही कधी जाय्ला मिळाले तर अधीच आपण पट्ट्या बांधुन चढवे,असा सूप्त विचार मनी बाळगुन आहे...म्हणजे पायला होणरा अपाय टळेल...पण तरीही तुंम्ही फोटो व महीतीच्य माध्यमातुन करुन दिलेले दर्शन घेऊन ''काहीही झाले तरी जाणरच'' असा विचार मनात बाळगतो.... मेंढा तोफ सा-भार दाखवल्याबद्दल आभार... ;-)
  • Log in or register to post comments

मस्त फोटो!

पैसा
Fri, 11/11/2011 - 21:22 नवीन
एकदम आवडले!
  • Log in or register to post comments

छान फोटो

मिहिर
Fri, 11/11/2011 - 22:10 नवीन
छान फोटो.
ह्या काळात यादव साम्राज्य समृद्धी आणि उत्कर्षाच्या परमोच्च बिंदूवर होते. त्याची खबर अलाउद्दिन खिलजीला लागली आणि त्याने देवगिरीवर हल्ला केला.
हे वाचून खुदकन हसू आले. अहो, तो खिलजी काय कोणते साम्राज्य उत्कर्षाच्या परमोच्च बिंदूवर आहे, हे बघून हल्ला करायचा का? किल्ल्याचा सर्वांत वरचा भाग जनार्दनपंताच्या पादुका असल्याचे आठवते. त्याचा काहीच उल्लेख नाही दिसला.
  • Log in or register to post comments

तो खिलजी काय कोणते साम्राज्य

सोत्रि
Sat, 11/12/2011 - 01:47 नवीन
तो खिलजी काय कोणते साम्राज्य उत्कर्षाच्या परमोच्च बिंदूवर आहे, हे बघून हल्ला करायचा का?
उगाच कोण कशाला एवढ्या लांब माहिती नसताना आणि मुख्य म्हणजे पैसा नसताना तडमडायला येईल :)
किल्ल्याचा सर्वांत वरचा भाग जनार्दनपंताच्या पादुका असल्याचे आठवते.
आहेत, सर्वात वरच्या भागात जनार्दनपंताच्या पादुका आहेत. पण वर जाइपर्यंत जीव गेला होता आणी फोटो काढायची शक्तीही नव्हती. खरेतर आता तुमचा प्रतिसाद वाचून खुप वाइट वाटते आहे फोटो न काढल्याबद्दल आणि न लिहिल्याबद्दल :( - (जनार्दनपंतांची मनापासुन माफी मागणारा) सोकाजी :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिहिर

मस्त!!

पूनम ब
Sat, 11/12/2011 - 01:41 नवीन
एकदम मस्त आहेत फोटो :)
  • Log in or register to post comments

आता पुढच्या अ‍ॅड्वेंचरसाठी

पिंगू
Sat, 11/12/2011 - 08:22 नवीन
आता पुढच्या अ‍ॅड्वेंचरसाठी तयात व्हा.. बाकी किल्लाच्या प्रतिमा छानच टिपल्या आहेत. - पिंगू
  • Log in or register to post comments

सुरेख वर्णन आणि अप्रतिम

प्रचेतस
Sat, 11/12/2011 - 09:39 नवीन
सुरेख वर्णन आणि अप्रतिम फोटो.
यादव राजवंशाने ह्या किल्ल्याचे निर्माण केले.
देवगिरीचे निर्माण राष्ट्रकूटांनी केले आहे. निदान अंधारी आणि खंदकाचे काम तर राष्ट्रकूट राजवटीतच झाले आहे. नंतरच्या तटबंदी आणि काही बांधकामे यादवकाळात झाली आहेत. वेरूळ लेण्यांच्या निर्मितीकाळाच्या आसपासच या किंवा त्याआधी ह्या किला बांधण्यात आला असावा. देवगिरीच्या भक्कम पाठिंब्याशिवाय या लेण्यांची निर्मित्ती तशी अशक्य वाटते.
  • Log in or register to post comments

देवगिरीचे निर्माण

सोत्रि
Sat, 11/12/2011 - 11:02 नवीन
देवगिरीचे निर्माण राष्ट्रकूटांनी केले आहे
वेरूळची कैलास लेणी घडवून घेणार्‍या राष्ट्रकूट राजानेच देवगिरी किल्ल्याची निर्मिती केली असाही एक 'स्कूल ऑफ थॉट' आहे. देवगिरीबाबतचा लिखित इतिहास मात्र यादव काळापासुन उपलब्द्ध आहे. असे एका सरकारी कागद पत्रात कुठे तरी वाचले होते. - (पास होण्याइतपतच इतिहास शिकलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

मस्त रे मस्त....! आम्ही पण

प्यारे१
Sat, 11/12/2011 - 12:26 नवीन
मस्त रे मस्त....! आम्ही पण गेलेलो म्हटलं मागच्या दिवाळीत. एवढा काय भाव खायची गरज नाही ब्रं.... ;) घृष्णेश्वराला गेलेलात काय?
  • Log in or register to post comments

मस्त

स्मिता.
Sat, 11/12/2011 - 22:58 नवीन
देवगिरी किल्ल्याचे वर्णन आणि फोटो दोन्ही आवडले. शेवटचा फोटोही नोटीस केला ;) प्राथमिक शाळेत असताना १ दिवसाकरता औरंगाबादला सहल गेली होती. पण त्यावेळी आम्हाला किल्ला दुरूनच दाखवला. या धाग्यामुळे तो जवळून बघायला मिळाला. बिबीका मकबरा पाहिला होता पण आता काही आठवत नाही. त्यामुळे पुढच्या धाग्याच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

मस्त छायाचित्रे..

प्रभाकर पेठकर
Sun, 11/13/2011 - 19:53 नवीन
सर्व छायाचित्रे आणि वर्णन मस्तच आहे. मला मधे मधे काळ्या चौकोनात पांढर्‍या रंगाचे उद्गारचिन्ह दिसते आहे. ते कशासाठी आहे?
  • Log in or register to post comments

मला मधे मधे काळ्या चौकोनात

सोत्रि
Mon, 11/14/2011 - 11:10 नवीन
मला मधे मधे काळ्या चौकोनात पांढर्‍या रंगाचे उद्गारचिन्ह दिसते आहे. ते कशासाठी आहे?
फोटोंचा थोडा घोळ झाला आहे, सं.मं. मदतीचे साकडे घातले आहे. - ('घोळ'कर) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

सोक्या, फोटु जरा पिकावर असतील

मदनबाण
Mon, 11/14/2011 - 11:17 नवीन
सोक्या, फोटु जरा पिकावर असतील तर फोल्डरचे सेटींग बघ रे, किंवा फोटु दुसर्‍या फोल्डरमधे हलवले असतील तरी असा घोळ होवु शकतो असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा