बर्याच दिवसांपासून एखादा चांगला चित्रपट बघावा असे वाटत होते. मागील काही दिवसात टॉकीजला जाऊन पाहिलेले बहुतेक सगळेच चित्रपट वाईट किंवा बरे या कॅटेगरीतले होते. 'दिल्ली बेली' किंवा 'सिंघम' बरे होते पण एखादा चांगला चित्रपट बघण्याचा जो खरा आनंद असतो तो या चित्रपटांनी दिला नव्हता हे खरे. मनोरंजन म्हणून हे चित्रपट बरे होते. 'दिल्ली बेली' तसा थोडा (त्यातील आक्षेपार्ह बीभत्सता वगळता) उजवा वाटला होता. पटकथा आणि दिग्दर्शन या दोन्ही आघाड्यांवर 'दिल्ली बेली' बरा होता. 'सिंघम' चणे-फुटाणे चघळत बघण्यासारखा चित्रपट होता.
शनिवार-रविवारच्या सुटीत एखादा चांगला चित्रपट बघावा असे ठरले. 'दबंग', 'दम मारो दम' आणि 'सिंघम' पाहिल्यानंतर 'फोर्स' पाहण्यात मला काही इंटरेस्ट नव्हता. तिच ती अशक्य कोटीतल्या मारामारीची दृष्ये कधीतरी बरी वाटतात, पुन्हा-पुन्हा ती अतर्क्य दृष्ये बघवत नाहीत. जॉन अब्राहमची अभिनयाची पातळी 'काबूल एक्स्प्रेस'मध्ये दिसली होती. डोळ्यांना बराच वेळ बांधलेली पट्टी काढल्यानंतर डोळे काही काळ चुरचुरतात, पापण्यांची उघडझाप होते आणि मग दिसायला लागते. 'काबूल एक्स्प्रेस'मध्ये जॉनच्या डोळ्यांची पट्टी सोडल्यानंतर तो लगेच टक्क डोळे उघडे ठेवून बघायला लागतो हे बघून मला त्याच्या अभिनयक्षमतेविषयी शंका यायला लागली होती. त्यातच वर्तमानपत्रातला एक अवजड बाईक हातात (पेग धरावा तसा) धरून ठेवलेल्या जॉनचा फोटो पाहिल्यावर 'फोर्स'वर काट मारला. 'जॉनी इंग्लिश' बघावा असे वाटत होते पण त्याचा एकच खेळ होता आणि तो ही दुपारच्या वेळेस. दुपारी टॉकीजला चित्रपट बघायला जाणे म्हणजे डिसेंबरमधल्या एखाद्या रम्य पहाटे 'लाल लाल होंठों पे गोरी किसका नाम हैं...' ऐकण्याइतकेच विचित्र वाटते. देवसाहेबांचा 'चार्जशीट' पाहण्याचा प्लॅन नव्हताच पण त्याचे पोस्टर बघून तो इतरही कुणी बघू नये असे तीव्रतेने वाटून गेले. बाकी 'अव्वल नंबर', 'सच्चे का बोलबाला', 'सौ करोड' इत्यादी दिव्य चित्रपट कधीकाळी बघून अस्मादिक आधीच घायाळ झालेले होते; धारातीर्थी पडण्याचा लगेचच काही प्लॅन नसल्याने 'चार्जशीट'ला मळलेल्या बेडशीटप्रमाणे बाजूला टाकणे क्रमप्राप्त होते. आताच हाती आलेल्या वृत्तानुसार 'चार्जशीट'ला जवळ-जवळ शून्य टक्के ओपनिंग मिळाली आहे. देवसाहेबांच्या अदम्य आशावादाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
बाकी 'हम तुम शबाना' आणि 'तेरे मेरे फेरे' अशा पाचकळ कॉमेडीचा मी कधीच चाहता नसल्याने हे चित्रपटही बाद झाले. 'मौसम' फ्लॉप होणार हे माझे भाकित खरे ठरल्याने आणि असला काव्यात्म-बिव्यात्म चित्रपट बघणे झेपत नसल्याने 'मौसम' बाजूला पडला. 'मौसम'चे टाईम्स ऑफ इंडियामध्ये पहिल्या पानावरचे पोस्टर आले होते. त्याच्या मागच्या पानावर चौकट्यांमध्ये मौसमची काही दृष्ये आणि नाव असे एक पोस्टर होते. त्या चौकट्या बघूनच 'मौसम' गुळगुळीत अशा तरल-बिरल प्रेमकथेवर बेतलेला चित्रपट आहे हे लक्षात आले. एक अल्लड, खट्याळ तरुणी (एक लडकी थी अंजानी सी....छाप), तिच्या 'अल्हड अटखेलियां', तिचा संताप आणणारा तो आगाऊपणा, कानशीळात भडकावून देण्याच्या लायकीचे तिचे रुसवे-फुगवे असा सगळा पांचट मसाला त्या चौकटींमधून ओसंडून वाहत होता. त्या चौकटी फोटो म्हणून सुंदर होत्या पण चित्रपटाची सगळी कथा त्यातून कळाल्यावर चित्रपट किती भिकार असू शकतो हे लक्षात आले. शेवटी 'मौसम' चा 'करीब', 'गुजारीश', 'काईट्स' व्हायला वेळ लागला नाही.
मग लक्ष गेले 'साहेब बीवी और गँगस्टर'च्या पोस्टरकडे. तिगमांशु धुलिया या दिग्दर्शकाचे नाव आधीही 'हासिल'च्या वेळेस ऐकले होते. अर्थातच तो चित्रपट साफ पडला होता. नंतर 'चरस' आणि 'शागीर्द' हे ही चित्रपट झोपले. पण या चित्रपटांचं कौतुक मात्र ऐकलं होतं. बस्स, 'साहेब...' बघायचं ठरलं. आपल्या हक्काच्या नीलायमकडे मोर्चा वळवला.
'साहेब...' सुरु होतो एका मोडकळीस आलेल्या हवेलीच्या दृष्याने. काहीतरी इंटरेस्टिंग बघायला मिळणार याची खात्री पहिल्या काही दृष्यातच मिळते. उत्तर प्रदेशातल्या नवाबी-जुलुमी-गुन्हेगारीच्या खाणाखुणा दाखवत चित्रपट सरकतो. जिमी शेरगिल, माही गिल, रणदीप हुडा, श्रेया नारायण यांच्या मुख्य भूमिका असलेला 'साहेब..' जसा-जसा उलगडत जातो तसे-तसे आपण कथानकात आणि व्यक्तिरेखांमध्ये गुंतत जातो. उडालेल्या नवाबी वैभवाच्या खाणा-खुणा जपत त्याच थाटात राहण्यार्या, अगदी ब्रिटीशकालीन पद्धतीने काट्या-चमच्याने फळांचा नाश्ता करण्यार्या जिमीला बघून आपण कुठल्यातरी वेगळ्याच काळात आणि वातावरणात अलगद पोहोचतो. आपल्या नवाबी अय्याशीला न सोडता नीती-अनीतीचा कुठलाच विधिनिषेध न बाळगता, बंदुकीच्या आणि दहशतीच्या बळावर जिमी (म्हणजे साहेब) राजकारणात आणि कंत्राट यंत्रणेत स्थान मिळवू पाहतो. त्याची एक सुंदर रखेल एका आलिशान कोठीत राहत असते. साहेबची बायको (माही गिल) वेडी असते आणि दारू-सिगारेटच्या विळख्यात पुरती अडकलेली असते. साहेबचा एक गुंड प्रतिस्पर्धी गेंदासिंग (विपिन शर्मा, 'तारे जमीं पर' मधला लहान हीरोचा बाप) साहेबला मारण्याच्या प्रयत्नात असतो. त्याची खबर मिळावी म्हणून तो बबलू (रणदीप हुडा) ला ड्रायव्हर म्हणून साहेबकडे पाठवतो. मग सत्ता, पैसा, प्रेम, वासना यांचा जो जीवघेणा खेळ सुरु होतो तो प्रेक्षकांना शेवटपर्यंत श्वास रोखून धरायला भाग पाडतो.
साठच्या दशकात आलेल्या गुरु दत्तच्या 'साहिब बीबी और गुलाम' ची मूळ चौकट कायम ठेवत पटकथाकाराने एक जबरदस्त पटकथा लिहिली आहे. नव्या जमान्याचे नवे आणि वास्तवतेच्या जास्त जवळ जाणारे आयाम लेखकाने आणि दिग्दर्शकाने दिलेले आहेत. खटकण्यासारखी एक गोष्ट वाटली ती म्हणजे पटापट मुडदे पडत असतांना पोलीस कुठेच दिसत नाहीत. अगदी जंगलाचा कायदा असल्याप्रमाणे मुडदा पाडल्यानंतर दुसर्या प्रसंगात मुडदा पाडणारा आरामात हिंडत असतो. वास्तवाशी फारकत घेतलेला हा कथाभाग थोडा खटकतो. आणि हो, अगदी सहजपणे खून पाडणेदेखील जरा खटकते. सगळीच पात्रे अजिबात विचार न करता थंडपणे खून करतात ही अतिशयोक्ती वाटते खरी. कुणीतरी असेल ना जो जरा लॉजिकली विचार करू शकत असेल! पण या चित्रपटात तसा कुणीच नाही हे आश्चर्यच. पण या किरकोळ बाबी वगळता एक अनुभव म्हणून 'साहेब...' खूपच गुंतवून ठेवतो आणि विचार करायला लावतो. मानवी बुरख्याआड लपलेला जनावर इंस्टिंक्ट कसा असतो आणि तो कसा रौद्ररूप घेऊन बाहेर पडतो याचे उत्कृष्ट चित्रण म्हणजे 'साहेब बीवी और गँगस्टर'. मूळ 'साहिब बीबी और गुलाम' बंगालात घडतो; नवीन 'साहेब..' उत्तर प्रदेशात घडतो. मूळ चित्रपट थोडा हळवा आणि काव्यात्म आहे असे ऐकले आहे (मी पहिलेला नाही); नवीन चित्रपट थेट, डायरेक्ट आणि माणसाच्या मनात माणसानेच दडवून, दडपून, गाडून ठेवलेल्या आदिम भावनांवर स्पष्ट भाष्य करणारा आहे. सत्तेची हाव, पैशाची हाव, विलासी जीवनाची आसक्ती, शरीरसुखाची कधीही न शमणारी भूक, आपल्या वाटेत येणार्याला खतम करण्याची जबरदस्त इच्छा अशा अत्यंत मूलभूत भावनांना वाट मोकळी करून देणारा चित्रपट म्हणून 'साहेब बीवी और गँगस्टर्'चे वर्णन करावे लागेल.
जिमी शेरगिल, माही गिल, रणदीप हुडा, विपिन शर्मा या मुख्य कलाकारांसोबतच बाकी सगळ्यांनीच अफलातून अभिनय केला आहे. जिमीचा अभिनय लाजवाब! या माणसाला चित्रपट का मिळत नाहीत देव जाणे. माही गिल कमालीची मादक आणि सुंदर दिसली आहे. तिच्या व्यक्तिरेखेनुसार तिचा अभिनय खूपच छान रंगला आहे. एखाद्या सुंदर स्वप्नासारखा बीवीचा वावर माहीने छान दाखवलेला आहे. श्रेया नारायण (महुआच्या व्यक्तिरेखेत) कमालीची सुंदर दिसते. तिचे जिमीसोबतचे गाणे छान तर आहेच पण तिचे भाव, तिच्या डोळ्यातली जिमीविषयीची समर्पणाची भावना इतकी उत्कट वाटते की ती खरच त्याच्या प्रेमात असेल असे वाटते. तिचे गाणे खूपच छान चित्रित केलेले आहे. एखाद्या जुन्या महालात एखाद्या लावण्यवतीच्या सहवासात कसे वाटेल याचे यथार्थ चित्रण या गाण्यातून दिसते.
गाणी उगीच घुसडल्यासारखी वाटतात. ऐकायला छान आहेत हे मात्र कबूल करायलाच हवे. अशा चित्रपटात अगदी एक-दोन गाणी असावीत. या चित्रपटात मात्र चारच्या वर गाणी आहेत जी थोडा रसभंग करतात.
चित्रण अव्वल दर्जाचे आहे. पार्शवसंगीत, संकलन आणि इतर तांत्रिक बाबी जमून आलेल्या आहेत.
असा हा 'साहेब बीवी और गॅगस्टर' चित्रपट बघण्याचा पुरेपूर आनंद तर देतोच परंतु बुद्धीला आणि मनाला खाद्य देखील देऊन जातो. चित्रपटाचे नॅरेशन खूपच प्रभावी आहे.
दुपारी गाढ झोप झालेली आहे; संध्याकाळी गप्पांचा फड रंगून फक्कड चहाचे प्याले रीते झालेले आहेत; रात्रीचं मस्त भरपेट जेवण झालेलं आहे, बहुधा झणझणीत चिकन किंवा मटण; तोंडात पानाचा तोबरा रंगलेला आहे; दुसर्या (आणि जमलं तर तिसर्या, चौथ्या, पाचव्या...) दिवशी सुटी आहे आणि काहीतरी खास प्लॅन आधीच ठरलेला आहे; मित्रमंडळी किंवा बायको किंवा प्रेयसी सोबत आहे; गप्पांची आणि हास्याची कारंजी थुईथुई नाचत आहेत; अशा वेळेस नुकत्याच पाऊस पडून गेलेल्या ओल्या रस्त्यांवरून, अंगावर शहारा आणणार्या थंडीच्या गुदगुलीला चकवत तुम्ही टॉकीजवर पोहोचता आणि 'साहेब बीवी और गँगस्टर' सारखा उत्कंठावर्धक चित्रपट पाहता; बाहेर येता तेव्हा हवा खूपच गार असते; कुठेतरी मस्त वाफाळणार्या चहाचे घोट रिचवत (हल्ली सगळीकडेच कॉफीचा उल्लेख असतो; सीरीयल्स, चित्रपट सगळीकडेच लोकं कॉफी पितात किंवा पाजतात; का? चहा का नाही? इतका काही गरीब आणि फुटकळ नाहीये चहा) तुम्ही चित्रपटाची, माहीची, श्रेयाची चर्चा करता आणि मग रमत-गमत घरी येता...वा वा...आनंदाची आणि सुखाची कल्पना यापेक्षा वेगळी ती काय असावी? काय म्हणता?
याद्या
6551
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
मीही पाहिला...
जिमी
In reply to मीही पाहिला... by मन१
सहीच
अतिशय उत्तम परिक्षण केले
पाहाणार आहोतच
ष्टोरी उघड केलेली नाही
In reply to पाहाणार आहोतच by ऋषिकेश
मस्त
धन्स
सुंदर परीक्षण
स्वारी धागा वाचला
प्रोमो पाहून तरी चित्रपट
अगदी अगदी, साहेब,
In reply to प्रोमो पाहून तरी चित्रपट by मालोजीराव
अप्रतिप परिक्षण ... लवकरच
या चित्रपटाचे परीक्षण मला
सॉरी
In reply to या चित्रपटाचे परीक्षण मला by वपाडाव
नाही...
In reply to या चित्रपटाचे परीक्षण मला by वपाडाव
प्रकाटाआ
चांगलं लिहिलय परिक्षण! तुम्ही
रेवतीआज्जी, कशाला कष्ट करुन
In reply to चांगलं लिहिलय परिक्षण! तुम्ही by रेवती
तुम्हालाही बरा वाटलाय ना
In reply to रेवतीआज्जी, कशाला कष्ट करुन by वपाडाव
आज्जी, माझ्या आइही अशीच
In reply to तुम्हालाही बरा वाटलाय ना by रेवती
जिमी
In reply to आज्जी, माझ्या आइही अशीच by वपाडाव
शत्रू आणि अमिताभ?
In reply to जिमी by समीरसूर
प्रत्यक्ष अमितजींची त्या
In reply to शत्रू आणि अमिताभ? by फारएन्ड
अमिताभ
In reply to प्रत्यक्ष अमितजींची त्या by गवि
मान्य. अमिताभ त्याला
In reply to अमिताभ by समीरसूर
दिलवाले दुल्हनिया... हे दुसरे
In reply to शत्रू आणि अमिताभ? by फारएन्ड
हो
In reply to दिलवाले दुल्हनिया... हे दुसरे by प्रचेतस
अस्सय व्हय
In reply to हो by फारएन्ड
शत्रुघ्न आणि विनोद खन्ना
In reply to शत्रू आणि अमिताभ? by फारएन्ड
समीरसूर, अर्ध्यापर्यंत वाटतं की हे बहुदा..
पिच्चर रविवारी सक्काळी थेटरला
हा पिक्चर नक्की बघणार.