Skip to main content

साहेब बीवी और गँगस्टर

लेखक समीरसूर
Published on सोमवार, 03/10/2011
बर्‍याच दिवसांपासून एखादा चांगला चित्रपट बघावा असे वाटत होते. मागील काही दिवसात टॉकीजला जाऊन पाहिलेले बहुतेक सगळेच चित्रपट वाईट किंवा बरे या कॅटेगरीतले होते. 'दिल्ली बेली' किंवा 'सिंघम' बरे होते पण एखादा चांगला चित्रपट बघण्याचा जो खरा आनंद असतो तो या चित्रपटांनी दिला नव्हता हे खरे. मनोरंजन म्हणून हे चित्रपट बरे होते. 'दिल्ली बेली' तसा थोडा (त्यातील आक्षेपार्ह बीभत्सता वगळता) उजवा वाटला होता. पटकथा आणि दिग्दर्शन या दोन्ही आघाड्यांवर 'दिल्ली बेली' बरा होता. 'सिंघम' चणे-फुटाणे चघळत बघण्यासारखा चित्रपट होता. शनिवार-रविवारच्या सुटीत एखादा चांगला चित्रपट बघावा असे ठरले. 'दबंग', 'दम मारो दम' आणि 'सिंघम' पाहिल्यानंतर 'फोर्स' पाहण्यात मला काही इंटरेस्ट नव्हता. तिच ती अशक्य कोटीतल्या मारामारीची दृष्ये कधीतरी बरी वाटतात, पुन्हा-पुन्हा ती अतर्क्य दृष्ये बघवत नाहीत. जॉन अब्राहमची अभिनयाची पातळी 'काबूल एक्स्प्रेस'मध्ये दिसली होती. डोळ्यांना बराच वेळ बांधलेली पट्टी काढल्यानंतर डोळे काही काळ चुरचुरतात, पापण्यांची उघडझाप होते आणि मग दिसायला लागते. 'काबूल एक्स्प्रेस'मध्ये जॉनच्या डोळ्यांची पट्टी सोडल्यानंतर तो लगेच टक्क डोळे उघडे ठेवून बघायला लागतो हे बघून मला त्याच्या अभिनयक्षमतेविषयी शंका यायला लागली होती. त्यातच वर्तमानपत्रातला एक अवजड बाईक हातात (पेग धरावा तसा) धरून ठेवलेल्या जॉनचा फोटो पाहिल्यावर 'फोर्स'वर काट मारला. 'जॉनी इंग्लिश' बघावा असे वाटत होते पण त्याचा एकच खेळ होता आणि तो ही दुपारच्या वेळेस. दुपारी टॉकीजला चित्रपट बघायला जाणे म्हणजे डिसेंबरमधल्या एखाद्या रम्य पहाटे 'लाल लाल होंठों पे गोरी किसका नाम हैं...' ऐकण्याइतकेच विचित्र वाटते. देवसाहेबांचा 'चार्जशीट' पाहण्याचा प्लॅन नव्हताच पण त्याचे पोस्टर बघून तो इतरही कुणी बघू नये असे तीव्रतेने वाटून गेले. बाकी 'अव्वल नंबर', 'सच्चे का बोलबाला', 'सौ करोड' इत्यादी दिव्य चित्रपट कधीकाळी बघून अस्मादिक आधीच घायाळ झालेले होते; धारातीर्थी पडण्याचा लगेचच काही प्लॅन नसल्याने 'चार्जशीट'ला मळलेल्या बेडशीटप्रमाणे बाजूला टाकणे क्रमप्राप्त होते. आताच हाती आलेल्या वृत्तानुसार 'चार्जशीट'ला जवळ-जवळ शून्य टक्के ओपनिंग मिळाली आहे. देवसाहेबांच्या अदम्य आशावादाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. बाकी 'हम तुम शबाना' आणि 'तेरे मेरे फेरे' अशा पाचकळ कॉमेडीचा मी कधीच चाहता नसल्याने हे चित्रपटही बाद झाले. 'मौसम' फ्लॉप होणार हे माझे भाकित खरे ठरल्याने आणि असला काव्यात्म-बिव्यात्म चित्रपट बघणे झेपत नसल्याने 'मौसम' बाजूला पडला. 'मौसम'चे टाईम्स ऑफ इंडियामध्ये पहिल्या पानावरचे पोस्टर आले होते. त्याच्या मागच्या पानावर चौकट्यांमध्ये मौसमची काही दृष्ये आणि नाव असे एक पोस्टर होते. त्या चौकट्या बघूनच 'मौसम' गुळगुळीत अशा तरल-बिरल प्रेमकथेवर बेतलेला चित्रपट आहे हे लक्षात आले. एक अल्लड, खट्याळ तरुणी (एक लडकी थी अंजानी सी....छाप), तिच्या 'अल्हड अटखेलियां', तिचा संताप आणणारा तो आगाऊपणा, कानशीळात भडकावून देण्याच्या लायकीचे तिचे रुसवे-फुगवे असा सगळा पांचट मसाला त्या चौकटींमधून ओसंडून वाहत होता. त्या चौकटी फोटो म्हणून सुंदर होत्या पण चित्रपटाची सगळी कथा त्यातून कळाल्यावर चित्रपट किती भिकार असू शकतो हे लक्षात आले. शेवटी 'मौसम' चा 'करीब', 'गुजारीश', 'काईट्स' व्हायला वेळ लागला नाही. मग लक्ष गेले 'साहेब बीवी और गँगस्टर'च्या पोस्टरकडे. तिगमांशु धुलिया या दिग्दर्शकाचे नाव आधीही 'हासिल'च्या वेळेस ऐकले होते. अर्थातच तो चित्रपट साफ पडला होता. नंतर 'चरस' आणि 'शागीर्द' हे ही चित्रपट झोपले. पण या चित्रपटांचं कौतुक मात्र ऐकलं होतं. बस्स, 'साहेब...' बघायचं ठरलं. आपल्या हक्काच्या नीलायमकडे मोर्चा वळवला. 'साहेब...' सुरु होतो एका मोडकळीस आलेल्या हवेलीच्या दृष्याने. काहीतरी इंटरेस्टिंग बघायला मिळणार याची खात्री पहिल्या काही दृष्यातच मिळते. उत्तर प्रदेशातल्या नवाबी-जुलुमी-गुन्हेगारीच्या खाणाखुणा दाखवत चित्रपट सरकतो. जिमी शेरगिल, माही गिल, रणदीप हुडा, श्रेया नारायण यांच्या मुख्य भूमिका असलेला 'साहेब..' जसा-जसा उलगडत जातो तसे-तसे आपण कथानकात आणि व्यक्तिरेखांमध्ये गुंतत जातो. उडालेल्या नवाबी वैभवाच्या खाणा-खुणा जपत त्याच थाटात राहण्यार्‍या, अगदी ब्रिटीशकालीन पद्धतीने काट्या-चमच्याने फळांचा नाश्ता करण्यार्‍या जिमीला बघून आपण कुठल्यातरी वेगळ्याच काळात आणि वातावरणात अलगद पोहोचतो. आपल्या नवाबी अय्याशीला न सोडता नीती-अनीतीचा कुठलाच विधिनिषेध न बाळगता, बंदुकीच्या आणि दहशतीच्या बळावर जिमी (म्हणजे साहेब) राजकारणात आणि कंत्राट यंत्रणेत स्थान मिळवू पाहतो. त्याची एक सुंदर रखेल एका आलिशान कोठीत राहत असते. साहेबची बायको (माही गिल) वेडी असते आणि दारू-सिगारेटच्या विळख्यात पुरती अडकलेली असते. साहेबचा एक गुंड प्रतिस्पर्धी गेंदासिंग (विपिन शर्मा, 'तारे जमीं पर' मधला लहान हीरोचा बाप) साहेबला मारण्याच्या प्रयत्नात असतो. त्याची खबर मिळावी म्हणून तो बबलू (रणदीप हुडा) ला ड्रायव्हर म्हणून साहेबकडे पाठवतो. मग सत्ता, पैसा, प्रेम, वासना यांचा जो जीवघेणा खेळ सुरु होतो तो प्रेक्षकांना शेवटपर्यंत श्वास रोखून धरायला भाग पाडतो. साठच्या दशकात आलेल्या गुरु दत्तच्या 'साहिब बीबी और गुलाम' ची मूळ चौकट कायम ठेवत पटकथाकाराने एक जबरदस्त पटकथा लिहिली आहे. नव्या जमान्याचे नवे आणि वास्तवतेच्या जास्त जवळ जाणारे आयाम लेखकाने आणि दिग्दर्शकाने दिलेले आहेत. खटकण्यासारखी एक गोष्ट वाटली ती म्हणजे पटापट मुडदे पडत असतांना पोलीस कुठेच दिसत नाहीत. अगदी जंगलाचा कायदा असल्याप्रमाणे मुडदा पाडल्यानंतर दुसर्‍या प्रसंगात मुडदा पाडणारा आरामात हिंडत असतो. वास्तवाशी फारकत घेतलेला हा कथाभाग थोडा खटकतो. आणि हो, अगदी सहजपणे खून पाडणेदेखील जरा खटकते. सगळीच पात्रे अजिबात विचार न करता थंडपणे खून करतात ही अतिशयोक्ती वाटते खरी. कुणीतरी असेल ना जो जरा लॉजिकली विचार करू शकत असेल! पण या चित्रपटात तसा कुणीच नाही हे आश्चर्यच. पण या किरकोळ बाबी वगळता एक अनुभव म्हणून 'साहेब...' खूपच गुंतवून ठेवतो आणि विचार करायला लावतो. मानवी बुरख्याआड लपलेला जनावर इंस्टिंक्ट कसा असतो आणि तो कसा रौद्ररूप घेऊन बाहेर पडतो याचे उत्कृष्ट चित्रण म्हणजे 'साहेब बीवी और गँगस्टर'. मूळ 'साहिब बीबी और गुलाम' बंगालात घडतो; नवीन 'साहेब..' उत्तर प्रदेशात घडतो. मूळ चित्रपट थोडा हळवा आणि काव्यात्म आहे असे ऐकले आहे (मी पहिलेला नाही); नवीन चित्रपट थेट, डायरेक्ट आणि माणसाच्या मनात माणसानेच दडवून, दडपून, गाडून ठेवलेल्या आदिम भावनांवर स्पष्ट भाष्य करणारा आहे. सत्तेची हाव, पैशाची हाव, विलासी जीवनाची आसक्ती, शरीरसुखाची कधीही न शमणारी भूक, आपल्या वाटेत येणार्‍याला खतम करण्याची जबरदस्त इच्छा अशा अत्यंत मूलभूत भावनांना वाट मोकळी करून देणारा चित्रपट म्हणून 'साहेब बीवी और गँगस्टर्'चे वर्णन करावे लागेल. जिमी शेरगिल, माही गिल, रणदीप हुडा, विपिन शर्मा या मुख्य कलाकारांसोबतच बाकी सगळ्यांनीच अफलातून अभिनय केला आहे. जिमीचा अभिनय लाजवाब! या माणसाला चित्रपट का मिळत नाहीत देव जाणे. माही गिल कमालीची मादक आणि सुंदर दिसली आहे. तिच्या व्यक्तिरेखेनुसार तिचा अभिनय खूपच छान रंगला आहे. एखाद्या सुंदर स्वप्नासारखा बीवीचा वावर माहीने छान दाखवलेला आहे. श्रेया नारायण (महुआच्या व्यक्तिरेखेत) कमालीची सुंदर दिसते. तिचे जिमीसोबतचे गाणे छान तर आहेच पण तिचे भाव, तिच्या डोळ्यातली जिमीविषयीची समर्पणाची भावना इतकी उत्कट वाटते की ती खरच त्याच्या प्रेमात असेल असे वाटते. तिचे गाणे खूपच छान चित्रित केलेले आहे. एखाद्या जुन्या महालात एखाद्या लावण्यवतीच्या सहवासात कसे वाटेल याचे यथार्थ चित्रण या गाण्यातून दिसते. गाणी उगीच घुसडल्यासारखी वाटतात. ऐकायला छान आहेत हे मात्र कबूल करायलाच हवे. अशा चित्रपटात अगदी एक-दोन गाणी असावीत. या चित्रपटात मात्र चारच्या वर गाणी आहेत जी थोडा रसभंग करतात. चित्रण अव्वल दर्जाचे आहे. पार्शवसंगीत, संकलन आणि इतर तांत्रिक बाबी जमून आलेल्या आहेत. असा हा 'साहेब बीवी और गॅगस्टर' चित्रपट बघण्याचा पुरेपूर आनंद तर देतोच परंतु बुद्धीला आणि मनाला खाद्य देखील देऊन जातो. चित्रपटाचे नॅरेशन खूपच प्रभावी आहे. दुपारी गाढ झोप झालेली आहे; संध्याकाळी गप्पांचा फड रंगून फक्कड चहाचे प्याले रीते झालेले आहेत; रात्रीचं मस्त भरपेट जेवण झालेलं आहे, बहुधा झणझणीत चिकन किंवा मटण; तोंडात पानाचा तोबरा रंगलेला आहे; दुसर्‍या (आणि जमलं तर तिसर्‍या, चौथ्या, पाचव्या...) दिवशी सुटी आहे आणि काहीतरी खास प्लॅन आधीच ठरलेला आहे; मित्रमंडळी किंवा बायको किंवा प्रेयसी सोबत आहे; गप्पांची आणि हास्याची कारंजी थुईथुई नाचत आहेत; अशा वेळेस नुकत्याच पाऊस पडून गेलेल्या ओल्या रस्त्यांवरून, अंगावर शहारा आणणार्‍या थंडीच्या गुदगुलीला चकवत तुम्ही टॉकीजवर पोहोचता आणि 'साहेब बीवी और गँगस्टर' सारखा उत्कंठावर्धक चित्रपट पाहता; बाहेर येता तेव्हा हवा खूपच गार असते; कुठेतरी मस्त वाफाळणार्‍या चहाचे घोट रिचवत (हल्ली सगळीकडेच कॉफीचा उल्लेख असतो; सीरीयल्स, चित्रपट सगळीकडेच लोकं कॉफी पितात किंवा पाजतात; का? चहा का नाही? इतका काही गरीब आणि फुटकळ नाहीये चहा) तुम्ही चित्रपटाची, माहीची, श्रेयाची चर्चा करता आणि मग रमत-गमत घरी येता...वा वा...आनंदाची आणि सुखाची कल्पना यापेक्षा वेगळी ती काय असावी? काय म्हणता?
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 6551
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

लेखन नेहमीप्रमाणेच अगदि सहज , स्वाभाविक वाटले. चालता चालता बोलावे तसे. पिच्चर झकास आहे, ह्यात वाद नाही. विशेषतः त्या चोप्रा-जोहरच्या गुलछबू वातावरणाने दोक्यात तिडिक गेली असल्यास अवश्य बघावा. तरीही माझ्या काही तक्रारी:- अशा काही "सत्तास्पर्धा" मांडणार्‍या कथांतले टिपिकल पंचेस आता ओळखीचे होउ लागलेत. मागच्याच महिन्यात थेटरात जाउन "भेंडीबाजार" हा गँगवॉर वरचा हटके सिनेमा पाहिल होता. तोही बरा वाटला. पण त्यामुळे काही पंचेस जसेच्या तसे असल्याची किंम्वा ह्याही क्षेत्रात काही प्रमाणात craftmanship किंवा तोचतोचपणा असल्याची जाणीव होते. जिमी शेरगिलने काम वाईट केले आहे, असे अजिबात नाही. पण त्याला अजूनही खूप काही करण्यास वाव नक्कीच होता. म्हणजे, मला असं म्हणायचय की "हा रोल त्यानेच का करावा" ह्या प्रश्नाचं उत्तर आख्खा पिक्चर पाहिल्यावर कुठेच मिळत नाही. स्वतःचे खास रंग भरणे म्हणजे समजा:- १.मुन्नाभाई एम बी बी एस मधला डॉ जे डॉट्ट अस्थाना हा रोल बोमन इराणीने ज्या ताकदीने केला ते पाहून दुसर्‍या कुणाला तसली धमाल करता आली असती असे वाटत नाही. २. हेराफेरी मधल्या परेश रावलला काढून दुसर्‍याला बसवण्याची कल्पनाही करवत नाही. ३. डॉन मध्ये अमिताभने एकाच वेळी शहरी गँगस्टर "डॉन"चा आब आणि गंगाकाठचा खेडूत "छोरा" विजय ह्यांना जे रंग भरले, त्याची उंची अधिकच जाणवली; ती म्हणजे शाहरूख नावाच्या लव्हर बॉय म्हणवल्या जाणार्‍या इसमाने हे रोल करून दाखवले तेव्हाच. शाहरूख नसता तर अमिताभच्या डॉनची उंची जाणवलीच नसती.(त्यातही ग्रामीण बाजाच्या भूमिकेत तो अगदिच मार खातो.) ४. अगदि "बाजीगर" मध्ये शाहरूखने सूडाने पेटलेला नायक जो उभा केलाय त्यास तोड नाही. कल्पना करा, हा रोल कुणा मोहनिश बेहल किम्वा जिमी शेरगिलला परवडला असता का?(बाजीगर आला त्यावेळी शाहरूख काही आजच्या इतका सूप्पर स्टार, अल्ट्रा स्टार वगैरे काही नव्हता.) त्यावेळेस त्याच्या आणि दीपक तिजोरीच्या अस्तित्वात काही जमीन्-अस्मानचे अंतर नव्हते. दीपक तिजोरी तेव्हा खिलाडी,जो जीता वही सिकंदर मधल्यासारखे साइड रोलचे पण महत्वाचे काम करायचा. खाली एका ठिकाणी म्हटलय तसं हा गुणी अभिनेता आहे, पण हीरोला "वाचवण्यासाठी " ह्याचे रोल कापले जातात ह्यात सरसकट तथ्य असेलच असे नाही. छोट्या भूमिकेत अमिताभ "आनंद" मध्ये तत्कालीन सिनेसृष्टीचा बादशहा असणार्‍या राजेश खन्ना समोरही लक्षात राहिलसे काम करून गेलाच की. "नमकहराम" मध्ये राजेश खन्नाला "वाचवायला" म्हणून अमिताभचे अनेकानेक सीन कापले गेले, ज्यात तो भारी ठरत होता,. तरीही चित्रपट आल्यावर राहिलेल्या लांबीतही साहेबांनी आपली छाप सोडलिच. अजून एक उदाहरण म्हणजे शोले आठवतोय?(ख्र्म तर असं म्हणणं म्हणजे पुण्यात राहून रस्त्यावरचे खड्डे आठवताहेत? किंवा सदाशिव पेथेत राहून "खोचक बोलणं आठवतय का" असं विचारण्यासारखं आहे. )मुळात आठवण्यासठी तो विसरता आला पाहिजे. तो जबरद्स्त एंटारटेनर, त्यातली ती जणू दंतकथा बनलेली पात्रे, ती म्हातारी "मौसी" , ती अबोल जया भादुरी, "इतना सन्नाटा क्यूं है भाई" म्हणणारा बाप, सगळं सगळं कसं लक्षात राहत, नै? जय्-वीरु-ठाकूर- बसंती हे तर आहेत्च. पण ह्याहूनही लक्षात राहतो तो -------- ग ब्ब र आपल्या आयुष्यातल्या पहिल्या-दुसर्‍या सिनेमातच असा खतरनाक रोल करणे म्हणजे मोठीच कामगिरी. खरेतर शोले हा बराचसा सेम वाटतो "मेरा गाव मेरा देस" ह्या पिच्चर्सारखा. ह्या पिच्चर मध्ये व्हिलनचं, डाकूचं काम सामान्य वकूबाच्या नटाप्रमाणं केलं होत "विनोद खन्ना"नं. एकदा दोन्ही पिच्चर पाहिल्यावर गब्बरचा "धाक" किंवा "दहशत" कुठे जाणवते हे आपणच ठरवू शकाल. जिमी शेरगिलला ह्या सगळ्यांप्रमाणच आपली भूमिका दमदार करायची संधी होती, पण त्याने तिचा पुरेपूर फायदा घेतला नाही. आणि हीरोंना भय वाटतं म्हणून ह्यांना दाबून ठेवतात हे वाचून गंमत वाटली. हे विधान एखादे वेळेस जावेद जाफरी बद्दल मान्य केलं असतं.(तो काहिसा आक्रस्ताळा वाटला तरी कुठलाही रोल प्रभावीपणे, लक्षात राहिलसा करतो.)

In reply to by मन१

बरोबर आहे. जिमीला कुणीही रीप्लेस करू शकलं असतं. पण त्याने त्याच्या कुवतीनुसार ती जागा व्यवस्थित भरून काढली आहे. त्याच्या जागी कुणीतरी तसाच दमदार अंडरप्ले करणारा अभिनेता आज तरी कुणी दिसत नाही. अजय देवगण थोडा फार शोभला असता पण अशा रोल्स मध्ये अजयचा चेहरा प्रमाणाबाहेर मख्ख होतो. विविध छटा अजयला दाखवणं फारसं जमत नाही. बाकी संजय दत्त, खान मंडळी त्या रोलमध्ये शोभली नसती असे वाटते. आपली उदाहरणे अगदी चपखल आहेत. शानच्या वेळेस शत्रुघ्नचा रोल कमी करण्याची खेळी अमिताभने केली होती असं कुठेतरी वाचलं होतं. असे प्रकार सर्रास तेव्हाही व्हायचे आणि आता तर खूप जास्त प्रमाणात होतात. आशिकीमध्ये दीपक तिजोरी राहुल रॉयपेक्षा कितीतरी सरस वाटला होता पण तरीही त्याला दिग्दर्शकाने मोठे होऊ दिले नाही. गुलाममध्ये दीपक तिजोरी ४ मिनिटांच्या रोलमध्येदेखील लक्षात राहतो. आमीरला वाचवायला जेव्हा तो बाईकवर येतो तेव्हा नक्कीच लक्षात राहण्यासारखा वाटतो. पण रोल अगदीच किरकोळ ठेवला होता. असो. आपल्याला उत्तम चित्रपट बघायला मिळाले म्हणजे झाले! बाकी पडद्याआड काय घडते इससे हमे की फर्क पैंदा? ;-)

आवडले परीक्षण. पिक्चर लिस्ट मधे आधीपासूनच आहे, बघून कॉमेंट टाकेन येथे. चहा-कॉफीबद्दल १००% सहमत :)

अतिशय उत्तम परिक्षण केले आहे. आता हा सिनेमा बघावाच लागेल... बाकि शेवटी जो काही तुम्ही सुखाची कल्पनेचा वर्णन केले आहे ते वाचुन अगदी पंखा झालो तुमचा!! :)

एका मित्राने सांगितले आहे की कहानीमे जबरदस्त ट्वीस्ट आहे तो कळू नये व चित्रपटाची श्टुरी आसेल म्हून मध्ला भाग वाचलेला न्हायी. :) चित्रपट पाहाणार आहोतच!

आता बघायलाच हव्वा...

चित्रपट पहाण्यासाठी रिव्ह्युची वाट बघत होतो. हा सिनेमा चांगला असावा अशी प्रोमो बघुन खात्री वाटत होती. हे परिक्षण वाचल्यावर कधी एकदा आता शिनेमा बघतो असे झाले आहे. - (बीबी असलेला पण गॅंगस्टर नसलेला साहेब) सोकाजी

दुपारी टॉकीजला चित्रपट बघायला जाणे म्हणजे डिसेंबरमधल्या एखाद्या रम्य पहाटे 'लाल लाल होंठों पे गोरी किसका नाम हैं...' ऐकण्याइतकेच विचित्र वाटते. ------ साक्षात्कारी वाक्य :) सुंदर परीक्षण, पाहावा किंवा नाही, हि दोलायमानता घालवल्या बद्दल धन्स !

स्वारी धागा वाचला नाही. शक्यतो जो चित्रपट पाहिलेला नसतो त्याच परिक्षण वाचत नाही. फक्त काही प्रतिसाद वाचतो. (त्यात पण कुठला (कथेचा) भांडाफोड करणारा प्रतिसाद दिसला की त्यास फाट्यावर मारल्या जाते. ;) ) प्रस्तुत धागाकर्त्याच नाव वाचुनच चित्रपट पाहिल्या जाईल. :)

प्रोमो पाहून तरी चित्रपट झक्कास असावा असं वाटतंय ! गुलाल मधल्या रणन्जय सारखा जिमी शेरगिल मग्रूर वाटतोय

In reply to by मालोजीराव

अगदी अगदी, साहेब, बिवी...पहिल्यांदा प्रोमो पाहिल्यानंतर मला सुध्दा गुलाल मधल्या या कॅरेक्टरचीच आठवण झाली होती

या चित्रपटाचे परीक्षण मला पाडायचे होते..... त्यांनी ही संधी माझ्याकडून हिरावुन घेतल्याबद्दल समीरसुर यांचा णिषेध..... बाकी, उत्तम परीक्षण लिहिले आहे..... वर सांगितल्याप्रमाणे गाणे पटकथेसोबत जातात... उगाच भडीमार केल्यासारखा वाटत नाही.... साहेब खरोखरच ठाकुर वाटतो.... अन त्याचा दराराही.... संवाद ही या चित्रपटाची जमेची बाजु.... प्रत्येक व्यक्तिरेखेने आपल्या भुमिकेसोबत न्याय केला आहे.... विपिन शर्माचा गेंदा सिंह व दीपराज राणाचा कन्हैया लक्षात राहतो.... आणी, कथेतला ट्विस्ट सर्वांसमोर उघड न केल्याने जाउन बघणार्‍यांचा हुरुप कायम राहील..... असो..... एकदातरी पहावाच असा सिनेमा आहे.....

चांगलं लिहिलय परिक्षण! तुम्ही मौसमबद्दल लिहाल आणि मगच मी ठरवणार होते की पहायचा की नाही असे वाटले पण आधीच पैसे वाचवल्याबद्दल आभार! हा शिनेमा पाहण्याच्या लिष्टमध्ये टाकते.

In reply to by रेवती

रेवतीआज्जी, कशाला कष्ट करुन घेतेस गं? नंतर शिव्या देउ नकोस त्या माहीला म्हंजे मिळिवलं? उगाच म्हणायचीस नाहीतर, काय आजकालच्या पोरी..... मी आपलं सावध केलंय आज्जे, बाकी तुह्यावर सोपिवतो.....

In reply to by वपाडाव

तुम्हालाही बरा वाटलाय ना शिनेमा? मग मलाही बघु द्या की! खरं सांगायचं तर माहीसाठी नाही पण जिमी शेरगीलबद्दल कळवळा आलाय.;) तो बरी अ‍ॅक्टींग कधीकधी करतो पण त्याच्या वाट्याला काही फारसे चांगले शिनेमे (संख्येनी) येत नाहीत.

In reply to by रेवती

आज्जी, माझ्या आइही अशीच म्हणते..... तिलाही जिम्मी शेरगिल आवडतो, ती म्हणते छान अ‍ॅक्टिंग करतो, दिसायलाही छान आहे.... मग याचं घोडं पेंड का खातं?

In reply to by वपाडाव

जिमी शेरगिलची अडचण तिच आहे जी दीपक तिजोरी, मोहनीश बहल यांची होती. जिमी शेरगिल उत्तम अभिनय करतो; दीपक तिजोरी देखील छान अभिनय करायचा (आशिकी, गुलाम, जो जीता वही सिकंदर), मोहनीश बहल बरी अ‍ॅक्टींग करतो (बेकरार, मैने प्यार किया, दुल्हेराजा, सिर्फ तुम, हम साथ साथ हैं)...पण यांच्यासारख्या अभिनेत्यांचं असं होतं की हे धड हीरो ही नसतात आणि धड साईड हीरो ही नसतात. मुख्य अभिनेत्याला वरचढ ठरू नयेत म्हणून यांच्या भूमिका कापल्या जातात कारण हे अभिनय तर चांगला करतात. 'शान' मध्ये शत्रुघ्न सिन्हा शाकालच्या दरबारात बंदूक घेऊन प्रकटतो तेव्हा त्याची संवादफेकी आणि आवेश बघितला की मग कळतं की त्याची भूमिका एवढी छोटी का ठेवली असेल ते. तेव्हाच्या जमान्यात शत्रुघ्न सिन्हा निव्वळ शैलीच्या जोरावर अमिताभला भारी पडण्याची शक्यता होती म्हणून अमिताभने त्याची भूमिका कापायला लावली असं ऐकलंय. जिमी शेरगिल दिसतो छान पण त्याच्या व्यक्तिमत्वात (आणि दिसण्यात) हिंदी पिक्चरच्या हीरोची जादू नाही हे मान्य करावेच लागेल. एक स्वतंत्र शैली, आत्मविश्वास, करिष्मा या गोष्टींमध्ये तो कमी पडतो. एक अख्खा चित्रपट तो फक्त स्वतःच्या बळावर तारू शकेल अशी कल्पनादेखील करवत नाही. तिच गोष्ट दीपक तिजोरीची आणि मोहनीश बहलची! हाच प्रॉब्लेम (अभिनय क्षमता तूर्तास बाजूला ठेवता) अमृता रावचा; अमृता अरोराचा, महिमा चौधरीचा; हंसिका मोटवानीचा; भूमिका चावलाचा, श्रिया सरणचा; अंजली जठारचा; अंजला झवेरीचा; सारिकाचा; अमिषा पटेलचा; सुश्मिता सेनचा; पद्मा खन्नाचा; काजल किरणचा; सोमी अलीचा; पूजा बत्राचा; सोनाली बेंद्रेचा; रीतू शिवपुरीचा; रागेश्वरीचा; रामेश्वरीचा; झरीना वहाबचा; शाहीनचा; तनिशाचा, शहनाझ ट्रेजरीवालाचा; हीरा राजगोपालचा....झाला/आहे/होता.

In reply to by समीरसूर

सॉरी आपलाच धागा असल्यानेच केवळ ही प्रतिक्रिया. शान मधले रोल त्यांच्या तत्कालीन लोकप्रियतेप्रमाणे होते. शत्रू ने अमिताभ वर मात केली असती असे कधीच वाटले नाही ("... लडकी हमे चूना लगा गयी", "हम आपके घबराहट की इज्जत करते है" ई. संवाद किंवा शशी बरोबर असताना शशी बिंदिया गोस्वामीकडे बघून आणि अमिताभ तिच्या कारकडे बघून बोलतो ते संवाद शत्रूच्या तोंडातून इमॅजिन करा :) ). अमिताभच्या तुलनेत तो साधारण एकाच टोन मधले रोल चांगले करायचा (तो त्याच्या स्टाईल साठी फेमस असला तरी अभिनेता चांगला आहे यात वाद नाही). या दोघांची खरी तुलना होउ शकते फक्त 'काला पत्थर' मधे - तेथे शत्रू ला ही चांगले फुटेज आहे. त्यात 'खुन्नस' हे त्याचे राखीव कुरण. पण त्यांच्या एकत्र शॉट्स मधे अमिताभ त्याला काकणभर भारीच पडलाय असेच जाणवते. अमिताभ त्याला ट्रक मधून घेउन जातो तेव्हा जाताना आणि येताना असलेले छोटेच शॉट्स याची खात्री देतात की सलीम-जावेद च्या स्क्रिप्ट मधला विजय जेव्हा अमिताभ सादर करायचा तेव्हा त्याला कोणीच भारी पडला नसता. धरम, विनोद, शत्रू, शशी एकेक दिग्गज होते पण अमिताभ ची रेंज आणि स्टाईल दोन्ही एकत्र असे त्यांच्याकडे नव्हते. मला फक्त धर्मेन्द्रच त्यातल्या त्यात टक्कर देऊ शकेल असा वाटायचा. बाकी मोहनीश बहल बद्दल सहमत. हीरो पेक्षा व्हिलनच जास्त चांगला दिसतो हे मैने प्यार किया मधे वाटले होते (दिलवाले दुल्हनिया... हे दुसरे उदाहरण) :)

In reply to by फारएन्ड

प्रत्यक्ष अमितजींची त्या जरबट्ट शत्रुघ्न सिन्हाशी तुलना..?? अरेरे.. वेदनादायक आहे हे. अमितजी एकमेवाद्वितीय आहेत.

In reply to by गवि

गविसाहेब, अमिताभला तोडच नाही. :-) हे फक्त व्यावसायिक दृष्टीकोनातून त्याला प्रतिस्पर्धी असणार्‍या लोकांविषयी थोडे... :-) सत्ते पे सत्ता असो, हम असो, आलाप असो, आखरी रास्ता असो, अभिमान असो, मिली असो, परवाना असो, रण असो...अमिताभची उंची आतापर्यंत कुणीच गाठू शकलेलं नाही आणि भविष्यातही ते कुणाला शक्य होणार नाही. ही इज सिंप्ली द बेस्ट!!! मी फक्त त्याचाच पंखा आहे; बाकी सगळे कलाकार ओके आहेत... पण, ब्लॅकमध्ये अमिताभने खूप हॅम केलं होतं; लाल बादशाह मध्ये त्याची कीव वाटली होती; मृत्युदातामध्ये त्याची दया आली होती; कोहराममध्ये त्याचा आणि त्याच्या सुपरस्टारपद मिळवण्याच्या आट्यापिट्याचा राग आला होता; जादूगर, तूफानमध्ये वास्तव डोळसपणे न पाहता केलेली त्याची केविलवाणी धडपड दिसली होती.... पण आजही मी केबीसी भक्तीभावाने पाहतो त्याला एकच कारण ते म्हणजे अमिताभ!!! त्या माणसाचा अभ्यास, उच्चार, व्यासंग, नम्रता, पाठांतर, इत्यादी गोष्टी फारच क्वचित कुणात असतील...आणि प्रेक्षकांची नजर त्याच्यावर खिळवून ठेवायला तो ज्या पद्धतीने भाग पाडतो ती एकमेवाद्वितीयच आहे!!! :-)

In reply to by समीरसूर

मान्य. अमिताभ त्याला मिळालेल्या कौतुकास एक पूर्णपणे न्याय देणारे आणि लायक व्यक्तिमत्त्व वाटते. बाकी ते म्हणतात ना तसे "ओव्हर्रेटेड" वाटतात ... (काही अपवाद तब्बू, आमीर खान, इरफान खान, नसिरुद्दीन शाह, पंकज कपूर, शबाना आझमी, माधुरी दीक्षित, काजोल, बोमन इराणी, जुही चावला, नाना पाटेकर हे मला भावणारे काही अ‍ॅक्टर्स)

In reply to by फारएन्ड

दिलवाले दुल्हनिया... हे दुसरे उदाहरण
ऑ, दिलवाले दुल्हनिया... मध्ये मोहनीश कुठे आहे, तिथं तो परमजीत आहे ना. तोच तो अर्चना पूरण सिंगचा नवरा.

In reply to by फारएन्ड

आपले मत बरोबर आहे, फारएन्ड. पण एक पैलू अजून आहे जो पूर्णपणे स्टाईलवर किंवा इतर कुठल्या फॅक्टरवर अवलंबून असतो. शत्रुघ्न, विनोद, आणि अमिताभ यांच्या अभिनयाच्या कुवतीत खूप फरक आहे. पण एक काळ असा होता की हे दोघे त्याचे कट्टर प्रतिस्पर्धी समजले जात. काही लोकं असेही म्हणतात की विनोद खन्नाने सन्यास घेतला नसता (ओशोचा) तर अमिताभला त्याने जबरदस्त टक्कर दिली असती. तो परत आला तोपर्यंत निवाडा होऊन गेला होता आणि विनोदचा करिष्माही संपला होता. विनोदला पश्चात्ताप झाला पण वेळ निघून गेलेली होती. सलमान हा काही फार चांगला अभिनेता नाही पण कुठल्यातरी दुसर्‍याच गुणाच्या जोरावर तो आजचा निर्विवाद सुपरस्टार आहे. आमीर त्याच्यापेक्षा कितीतरी चांगला अभिनेता आहे पण आमीरही दुसर्‍या/तिसर्‍या क्रमांकावर आहे. नसीरुद्दीन शाह इतका चांगला अभिनेता असून देखील व्यावसायिक सिनेमात कधीच बँकेबल स्टार म्हणून गणला गेला नाही. अमिताभला देखील कधीकाळी नाना पाटेकरची (कोहराम) साथ घ्यावी लागली; कधीकाळी गोविंदाची साथ घ्यावी लागली (बडे मियां छोटे मियां)... असो. जो होता हैं अच्छे के लिए ही होता हैं...अमिताभ निर्विवादपणे ग्रेटेस्ट आहे यात शंकाच नाही... :-)

..मी चित्रपट कसा निवडला याचं परिक्षण आहे! 'क्रमशः' टाकून परीक्षण पुढच्या भागात असेल असं म्हणेपर्यंत फिचर सुरू झालं :-)

पिच्चर रविवारी सक्काळी थेटरला पाहिला... वसूल आहे... याचे परीक्षण लिहवे असे ठरवले आणि आळसाने लिहिले नाही... उत्तम आहे .. थेटरला बघा.. पैसे वाया जाणार नाहीत...