Skip to main content

बत्तीस तारखेला

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 21/09/2011 05:15 या दिवशी प्रकाशित केले.
बत्तीस तारखेला


भलत्याच ऐनवेळी, हटकून तोल गेला
नादान सद्गुणांनी अवसानघात केला

जागून रात्र सारी, उपयोग काय झाला?
सावज रणात येता, कुत्रा पळून गेला

सांगू नकोस भलते सलतेच तू बहाणे
उरलाय शब्द केवळ, का ओल आटलेला?

नेमून लक्ष्य केले साधेपणास माझ्या
झालीय तीच राणी, माझा गुलाम केला

समजायला हवे ते, समजून आज आले
काही इलाज नाही, पोटातल्या भुकेला

लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले
येणार वित्त आहे, बत्तीस तारखेला

त्याचे रडून झाले, रडतोय मी अजूनी
हिसकून का बरे मग, माझा रुमाल नेला?

राज्यात भेकडांच्या, जनतेस अभय नाही
सोकावलाय मृत्यू तो रक्त चाखलेला

                                     - गंगाधर मुटे
---------------------------------------------------------
लेखनविषय:

वाचने 1830
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

समजायला हवे ते, समजून आज आले काही इलाज नाही, पोटातल्या भुकेला लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले येणार वित्त आहे, बत्तीस तारखेला आणि राज्यात भेकडांच्या, जनतेस अभय नाही सोकावलाय मृत्यू तो रक्त चाखलेला अगदी वास्तविक ...

मस्तच ..वा..!! नेमून लक्ष्य केले साधेपणास माझ्या झालीय तीच राणी, माझा गुलाम केला समजायला हवे ते, समजून आज आले काही इलाज नाही, पोटातल्या भुकेला

चांगली गझल.. आवडली शेवटचा शेर (पहिली ओळ) वृत्तात गडबड आहे का? म्हणताना 'अभय' वर ठेका चुकतोय

In reply to by ऋषिकेश

वृत्तात गडबड नाही. पण दोन र्‍हस्व अक्षर मिळून एक दिर्घ बनविल्याने ठेका किंचितसा चुकतो, हे खरे आहे. पण "अभय" हे उपनाम वापरत असल्याने, तसे करावे लागले. राज्यात भेकडांच्या, लोकांस न्याय नाही असे असते तर ते ठेका धरून असते. :)

सगळ्या द्विपदी खूपच छान. समजायला हवे ते, समजून आज आले काही इलाज नाही, पोटातल्या भुकेला लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले येणार वित्त आहे, बत्तीस तारखेला या दोन मनाला विशेष भिडल्या आणि नेमून लक्ष्य केले साधेपणास माझ्या झालीय तीच राणी, माझा गुलाम केला ही द्विपदी वाचून अं.ह. झालो.

प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे. :)

अभय, सगळ्याच द्विपदी आवडल्या. मतला विशेष आवडला.